धर्मनिरपेक्षता: काही प्रश्न

मार्च १९९१ च्या ‘आजचा सुधारक’च्या संपादकीयात जाहीर केल्याप्रमाणे त्यात उल्लेखिलेल्या दोन विषयापैकी धर्मनिरपेक्षता (सेक्युलरिझम) ह्या विषयावरील परिसंवादाची रुपरेषा दाखवणारी प्रश्नावली खाली देत आहोत. तिच्यावरुन विषयाच्या अपेक्षित व्याप्तीची कल्पना येइल. ही प्रश्नावली आमचे मित्र डॉ. भा. ल. भोळे व श्री. वसन्त पळशीकर यांनी ‘आजचा सुधारक’साठी तयार केली आहे. त्याचे आम्ही आभारी आहोत. पुढील अंकामध्ये ‘मार्क्सवादाचे भवितव्य’ ह्या विषयावरील परिसंवादाची अपेक्षित व्याप्ती दाखविणारी प्रश्नावली प्रसिद्ध करण्यात येईल. ह्या विषयांवरील चर्चेमध्ये भाग घेण्यासाठी आम्ही काही विचारवंताना मुद्दाम आमंत्रित करीत आहोत. त्यांचे लेख वेळोवेळी प्रसिद्ध होतीलच. परंतु ह्या परिसंवादात आमच्या वाचकांनीही भाग घ्यावा अशी विनंती आहे.
– संपादक

१. शासनाच्या धर्मनिरपेक्षताविषयक भूमिकेचे व धोरणाचे वर्णन ‘स्यूडो (pseudo) सेक्युलरिझम्’ अशा शब्दांत अलीकडे काहीजण करतात. व्याज-धर्मनिरपेक्षता (स्यूडो) आणि खरी धर्मनिरपेक्षता यातील भेद नेमकेपणाने आपण कसा स्पष्ट कराल?
२. जातजमात – विशिष्ट व्यक्तिगत कायदे हे मूलभूत हक्क, नागरी स्वातंत्र्ये व मानवी मूल्ये यांच्या आड येतात असा आपला गेल्या चार दशकांचा अनुभव आहे. या तीन गोष्टींना बाधक ठरणार नाही असा अवकाश व्यक्तिगत कायद्यासाठी असू शकतो काय? असल्यास कोणता?
३. धर्माचरणाला जीवनमार्ग मानण्याची धारणा जेथे पक्की आहे अशा भारतीय समाजात धर्माचरण घराच्या चार भिंतींपुरते सीमित ठेवण्याचा आग्रह धरणारी धर्मनिरपेक्षतेची व्याख्या कितपत सयुक्तिक म्हणता येईल?
४. भारतीय संविधानाने व्यक्तीला धर्मप्रसाराचा व धार्मिक संघटनबांधणीचाही मूलभूत अधिकार दिला आहे. या अधिकाराचा राजकीय-आर्थिक कारणांनी सर्रास गैरवापर घडलेला दिसतो. यातूनच संघटित धार्मिक दंगलीही वारंवार झाल्या आहेत. असा या हक्कांचा गैरवापर कोणालाही करता येऊ नये या दृष्टीने त्यांच्यावर काही मर्यादा घालण्याची गरज आहे काय? असल्यास कोणत्या?
५. शतकानुशतके परस्परांचे शेजारी म्हणून भिन्नधर्मीय लोक या समाजात रहात आले असून एकमेकांच्या धार्मिक सणवारांत सहभागी होत आले हे खरे असले तरी त्याचवेळी प्रत्येक धर्मसमूहाच्या मनात अन्यधर्मीयांबद्दल सतत संशय, दरावा आणि भयगंडही वसत आला आहे. त्यामुळेच लोकांच्या धर्मश्रद्धा व धार्मिक अस्मिता यांचा स्वार्थी राजकारणासाठी वापर करून घेणे राज्यकर्त्या वर्गाला फारसे कठीण गेले नाही. तो तसा यापुढे करता येऊ नये म्हणून या श्रद्धा व अस्मितांचे उन्नयन करण्याचे कोणते उपाय आपण सुचवाल?
६. सर्वधर्मभावाच्या नावाखाली स्वातंत्र्योत्तर भारतीय राज्यकर्त्यांनी इथल्या भिन्नधर्मीय धर्मपीठांचा व धर्मगुरूंचा अविवेकी अनुनय केला असे आपणास वाटते काय? सर्वधर्मसमभावाचा यापेक्षा वेगळा व इष्ट आशय कोणता असू शकेल?
७. वैयक्तिक जीवनात निधर्मी असलेल्या बॅ. जिना यांनी धर्माधिष्ठित द्विराष्ट्रवादाचा पुरस्कार केला, आणि विचाराने निधर्मी असलेल्या सावरकरांनी धर्माधिष्ठित हिंदू राष्ट्रवादाचा आग्रह धरला, यावरून धर्मनिरपेक्षतेच्या आड येणारी खरी अडचण लोकांची धार्मिक भाविकता ही नसून धर्माच्या आधारे केले जाणारे राजकारणच आहे असे म्हणणे युक्त ठरणार नाही काय?
८. आधुनिक – इहवादी उद्दिष्टांसाठी लोकांच्या धर्मश्रद्धा व धार्मिक अस्मिता यांचे जे राजकीयीकरण केले जाते त्याचा समर्थपणे प्रतिकार कसा करता येईल?
९. आपला आजवरचा अनुभव ध्यानात घेता आपण पुढीलपैकी कोणती भूमिका घ्याल? ‘धर्मनिरपेक्षतेवर आधारित राष्ट्राची उभारणी करण्याचा प्रयत्न आपण सोडूनच द्यायला हवा’, की ‘धर्मनिरपेक्षतेची अधिक अर्थपूर्ण व्याख्या करण्याचे आव्हान आपण स्वीकारले पाहिजे.’ सकारण सांगा.
१०. धर्मनिरपेक्षतेची नव्याने व्याख्या करण्याची गरज आहे असा आपला अभिप्राय असल्यास आज त्यापेक्षा वेगळी च सयुक्तिक व्याख्या आपण कशी कराल?

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.