विवेकवाद – १३

उपयोगितावाद -२
गेल्या तीन-चार लेखांकांत जे नीतीचे विवेकवादी विवेचन केले गेले आहे त्यामुळे अनेक वाचक बुचकळ्यात पडले आहेत. त्यांची अशी समजूत आहे की विवेकवादी नीतीच असू शकत नाही. ‘Rationaltion’ या शब्दाचा पर्याय म्हणून आम्ही वापरलेला ‘विवेकवाद’ हा शब्द ते वापरत नाही. या क्षेत्रात रूढ असलेला दुसरा एक शब्द, म्हणजे ‘बुद्धिवाद ‘ किंवा ‘बुद्धिप्रामाण्यवाद, हा शब्द ते वापरतात. आणि तसे केल्यावर त्यांच्यापुढे बुद्धीचा नीतीशी काय संबंध आहे? हा प्रश्न उपस्थित होतो असे त्यांचे म्हणणे. ते म्हणतात की बुद्धी ज्ञानांत यथार्थ आणि अयथार्थ, किंवा अनुमानांत वैध (निर्दोष) आणि अवैध (सदोप) असा भेद करते; पण बुद्धीला कर्मात नीति आणि अनीती असा विवेक कसा करता येईल? कार्यकारणांचा संबंध बुद्धी निश्चित करू शकते, आणि म्हणून आपले एखादे साध्य असेल तर ते कोणत्या कमनि प्राप्त होऊ शकेल ते बुद्धी सांगू शकेल. आणि तसेच आपल्याला हव्या असलेल्या असंख्य गोप्टी पैकी कोणत्या आपण निवडल्या असता आपले समाधान महत्तम होऊ शकेल हेही बुद्धी सांगू शकेल, परंतु नीती म्हणजे केवळ आपले समाधान जास्तीत जास्त प्रमाणात प्राप्त करणे नव्हे, आपण जी साध्ये आपल्यापुढे ठेवतो ती चांगली, मूल्यवान, उचित साध्ये असली पाहिजेत, ती वाईट, अनुचित असू नयेत अशी नीतीची मागणी असते. पण बुद्धी भल्याबुऱ्याचा, चांगल्यावाइटाचा विवेक कसा करू शकेल? आपण कोणती कर्मे करावीत? आणि कोणती करू नयेत हे नीती सांगते. पण हे काम निर्विकार, भावनाशून्य अशी बुद्धी कसे करू शकणार?

या युक्तिवादात असे गृहीत धरले आहे की बुद्धीचे कार्य फक्त सत्यज्ञानाचा शोध करण्यापुरतेच मर्यादित आहे. सत्यज्ञानाचा शोध करण्याचे काम बुद्धीचे आहे हे खरेच आहे, पण त्याखेरीज बुद्धीला आणखी काही सामध्ये नाहीत, तिचे त्याबाहेर कार्यक्षेत्र नाही हे या आक्षेपकांनी कसे ठरविले? बुद्धी कर्माची चांगली आणि वाईट, युक्त आणि अयुक्त असा भेद करीत नाही असे म्हणण्याला त्यांच्याजवळ काय कारण आहे ? क्षणभर कर्माचा विवेक बुद्धी करू शकत नाही हे मत आपण गृहीत धरू या. आता जर कर्मविवेक केला जात असेल तर तो करणारी शक्ती बुद्धीहून अन्य असली पाहिजे. ती कोणती शक्ती आहे ? मनुष्याच्या मानस शक्तींत संवेदने प्राप्त करून देणारी इंद्रिये, भावना, आणि इच्छा इतक्या स्थूलमानाने शक्ती आहेत. त्यांपैकी कर्माचे औचित्यानौचित्य ठरविणारी शक्ती कोणती आहे? भावनांचे कार्य वेळोवेळी मनुष्यावर हल्ला करून त्याला आपल्या कह्यात आणणे हे आहे. त्या स्वतःचे तारतम्य निश्चित करू शकत नाहीत. तीच गोष्ट इच्छांची. इच्छा या अंध शक्ती आहेत, आणि त्यांपैकी प्रत्येक आपले स्वतःचे समाधान करण्यास मनुष्याच्या मागे तगादा लावीत असते. इच्छा स्वतः अमुक इच्छा चांगली आणि अमुक वाईट असा भेद करू शकत नाहीत. परंतु आपल्या इच्छांचे, भावनांचे, कमांचे नियमन निदान थोड्या प्रमाणात आपण करीत असतो. पशृंमध्ये जयाप्रमाणे उद्भवेल ती इच्छा शक्य असल्यास तत्काळ पूर्ण केली जाते, त्याप्रमाणे माणसात होत नाही. इच्छांचे तारतम्य ठरवून त्यानुसार त्यांची पूर्ती (निदान काही प्रमाणात) होत असते. ही शक्ती बुद्धी (reason) खेरीज अन्य कोणती असू शकत नाही.

याप्रमाणे वस्तूंमधील साधु-असाधु भेद आणि कर्मामधील युक्तायुक्त भेद हा विवेक बुद्धी करते, एवढेच नव्हे तर बुद्धीशिवाय असा विवेक करू शकणारी शक्ती मनुष्याजवळ नाही. मानवाच्या अन्य शक्तींच्या तुलनेत बुद्धीचे वैशिष्ट्य हे आहे की ती एक आत्मभान असणारी शक्ती आहे आणि तिचे कार्य चिकित्सा करणे, नियमन आणि मार्गदर्शन करणे, हे आहे. ती निर्णय घेते, निवाडे करते; ती नियम – म्हणजे ज्यांना आपण विधी म्हणतो तसे नियम – बनविते.

यासंबंधात कांट या थोर तत्त्वज्ञाचे मत प्रसिद्ध आहे, त्याने बुद्धीची दोन रूपे मानली आहेत. त्यांपैकी एका बुद्धीला तो ‘theoretical reason’ हे आणि दुसरीला ‘practical reason’ हे नाव देतो. Theoretical reason चे क्षेत्र म्हणजे ज्ञानाचे क्षेत्र, आणि practical reason चे क्षेत्र कर्माचे क्षेत्र, ज्ञान ज्याप्रमाणे यथार्थ आणि अयथार्थ असू शकते, तसेच ते अन्य ज्ञानाशी सुसंगत किंवा विसंगत असू शकते. अनुमाने किंवा युक्तिवाद वैध किंवा अवैध म्हणजे बरोबर किंवा चूक असू शकतात. हे सर्व भेद करणे आणि ते विचारात पाळणे ही कामे theoretical reason ची आहेत. याच्याउलट कर्माची चिकित्सा करणे, त्यांचे नैतिक मूल्य निश्चित करणे, कर्तव्याचे नियम बनविणे, इत्यादि कामे practical reason ची आहेत.

तेव्हा वर ज्या आक्षेपाचा उल्लेख केला आहे तो गैरसमजातून उद्भवलेला आहे असे म्हणावे लागेल. असे असले तरी त्यात थोडा तथ्यांश आहे. हा तथ्यांश असा आहे. बुद्धीचे ज्ञानक्षेत्रातील काम उत्तम प्रकारे करणारा उद्योग म्हणजे विज्ञान असे आपण अनेकदा म्हणालो आहोत. त्यामुळे बुद्धी = विज्ञान असे समीकरण नकळत मांडले जाते. हे समीकरण त्यात ‘बुद्धी या शब्दाला ज्ञानक्षेत्रातील’ हे विशेषण जोडल्यास निर्दोष होते. म्हणजे जे जे विज्ञानाला संमत असते ते ते सर्व ज्ञानक्षेत्रातील बुद्धीला संमत असते, आणि जे विज्ञानाला संमत नाही ते ज्ञानक्षेत्रातील बुद्धीलाही संमत नाही असे आपण म्हणू शकतो. पण ‘ ज्ञानेक्षेत्रातील’ या विशेषणाकडे आपले दुर्लक्ष होते, आणि आपण असे समजतो की जे विज्ञानाच्या क्षेत्रात येत नाही ते बुद्धीच्याही क्षेत्रात येत नाही. उदा. आपण काय करावे? कोणती कर्मे कर्तव्ये आहेत? इत्यादि प्रश्न विज्ञानाच्या कक्षेत येत नाहीत. विज्ञान जनैतिक (non-moral, amoral) आहे. सत्कर्म आणि दुष्कर्म यांच्या भेदाच्या बाबतीत ते पूर्णपणे मूक आहे. पण विज्ञान ननैतिक आहे यावरून बुद्धीही नैनैतिक आहे असे निष्पन्न होत नाही. उलट नीती हा एक बौद्धिक व्यापार आहे, आणि म्हणून तो फक्त मानवप्राण्यातच घडू शकतो, कारण मानवालाच बुद्धी (reason) आहे.

– २ –

इष्टानिष्टाचा विवेक बुद्धी करते असे आपण म्हणालो. पण हे म्हणताना आपण लक्षात ठेवले पाहिजे की ‘इष्ट ‘ हा शब्द द्वयर्थी आहे. त्याचा सरळ अर्थ आहे ‘ इच्छित’ किंवा ‘इच्छाविषय ‘. पण हा अर्थ उघडच ननैतिक अर्थ झाला, अनुक गोष्ट इष्ट म्हणजे इच्छाविषय आहे असे म्हटल्याने ती चांगली, हितकर आहे असे म्हटले असे होत नाही, परंतु ‘ इष्ट’ शब्दाला एक नैतिक अर्थही आहे. ‘इष्ट’ म्हणजे जे आपण इच्छावे, जे इच्छिणे योग्य, उचित, युक्त आहे. हे दोन अर्थ समव्यापितक नाहीत, म्हणजे जे जे एका अर्थी इप्ट किंवा अनिष्ट ते दुसऱ्या अर्थानही इप्ट किंवा अनिष्ट असे नाही. आपल्या अनेक इच्छा अनिष्ट असतात असे आपण म्हणतो. ‘ इप्ट’ या शब्दाच्या या दोन अर्थामधील हा भेद’श्रेय आणि ‘प्रेय’ या शब्दांच्या जोडीत व्यक्त झाला आहे. ‘जानामि धर्म न च मे प्रवृत्तिः जानाम्यधर्म न च मे निवृत्तिः “हे सुभापित प्रसिद्ध आहे.

हा भेद नेमका काय आहे, इच्छित आणि इच्छनीय यांच्यात नेमका काय फरक आहे, याचा शोध प्राचीन काळापासून आजपर्यंत चालू आहे. या प्रश्नाला अनेक उत्तरे दिली गेली आहेत, त्यापैकी अनेक उत्तरे अर्थातच विवेकवादाला पटू न शकणारी आहेत. उदा. ईश्वरवादी, परलोकवादी, मोक्षवादी उत्तरे विवेकवादाच्या दृष्टीने बाद समजावी लागतील. याची कारणे मागे एका लेखांकात येऊन गेली आहेत. ही सर्व बाद केल्यावरही अनेक उत्तरे उरतात. ही उत्तरे विवेकविरोधी नाहीत, पण त्यांच्यात आपसांत अनेक मुद्यांवर मतभेद आहेत. त्यांचे विश्लेषण करून काळजीपूर्वक चिकित्सा करावी लागेल, आणि त्यांपैकी सर्वात समाधानकारक उपपत्ती कोणती हे ठरवावे लागेल. अशा प्रकारच्या एका उपपत्तीची, ती सर्वात समाधानकारक आहे असा दावा न करता, पण जी विवेकसमत आणि बऱ्याच प्रमाणात समाधानकारक आहे अशा एका उपपत्तीची माहिती गेल्या लेखांकात दिली होती. ही उपपत्ती म्हणजे उपयोगितावाद, तिच्यासंबंधी आणखी थोडे विवेचन आज करावयाचे आहे.

– ३ –

उपयोगिताबादाचे जे रूप गेल्या अंकात प्रदर्शित केले त्यात मूल्यकल्पना नीतिशास्त्रातील प्रधान कल्पना मानली आहे. ‘मूल्य’ या शब्दाने या ठिकाणी स्वतोमूल्य (intrinsic value किंवा goodness) अभिप्रेत आहे, म्हणजे असे मूल्य की जे एखाद्या वस्तूचे स्वतःचे, स्वगत मूल्य आहे, जे तिला ती अन्य कोणत्यातरी गोष्टीचे साधन असल्यामुळे प्राप्त झालेले नाही. जी वस्तू एकाकी अस्तित्वात असली, तिच्यातून अन्य काही इष्ट परिणाम उद्भवले नाहीत, तरीही जी मूल्यवान राहते, अभिलपणीय राहते ती स्वतोमूल्यवान वस्तू, ती आपल्याला अभिलषणीय वाटते ती स्वार्थ, म्हणजे केवळ तिच्या करिताच (desirable for is own sake). अशी वस्तू फक्त एकच आहे असे उपयोगितावादाचे प्रतिपादन आहे- सुख, समाधान किंवा इच्छापूर्ती. सुखाखेरीज जगात स्वतोमूल्यवान काही नाही. अन्य गोष्टींचे मूल्य परतोमूल्य आहे, म्हणजे त्या सुखसाधन आहेत म्हणून त्या मूल्यवान आहेत असे आपण मानतो. सुखाचे मूल्य साध्यमूल्य आहे, अन्य वस्तूंची मूल्ये साधनमूल्ये आहे.

मूल्यकल्पनेशी संबद्ध अशी दुसरी कल्पना म्हणजे कर्तव्याची. एखाद्या वस्तूला स्वतोमूल्य आहे हे आपण ओळखले की ती निर्माण करण्याचे, ती अस्तित्वात असल्यास तिचे रक्षण करण्याचे, बंधन आपल्यावर येते हेही आपण ओळखतो. म्हणजे कर्तव्यकल्पना या वादामध्ये मूल्यकल्पनेतून उद्भवलेली कल्पना मानली आहे. सुख ही एकमेव स्वतोमूल्यवान गोष्ट आहे हे एकदा मान्य केले की मग सुखनिर्मिती, सुखवृद्धी हे आपले कर्तव्य होऊन बसते. पण सुख हे कुणाचे तरी असते, केवळ सुख असू शकत नाही. त्यामुळे कोणाच्या सुखाची निर्मिती वा वृद्धि करावयाची असा प्रश्न उद्भवतो. त्याचे उत्तर ‘जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख’ असे या उपपत्तीत दिले जाते. यात थोडी सुधारणा करून ‘ जास्तीत जास्त जीवांचे जास्तीत जास्त सुख’ हे आपले प्रत्येकाचे सर्वदा साध्य असले पाहिजे असे उत्तर मिळते. येथपर्यंत आपण गेल्या लेखांकात आलो होतो.

आता आणखी थोडे पुढे जायचे आहे.

युटिलिटेरियनिझमचे वर सांगितलेले वर्णन बेंटम, जॉन स्टुअर्ट मिल आणि सिज्विक यांनी प्रतिपादलेल्या उपपत्तीचे आहे. हे सर्व विचारवंत एकोणविसाव्या शतकातील आहेत. परंतु चालू शतकात या उपपत्तीत काही लक्षणीय भर पडली आहे. विशेषतः जी. ई. मूर यांनी उपयोगितावादाला एक व्यापक स्वरूप दिले. ते प्रथम समजाऊन घेऊ.

मिल – सिज्जिकचा उपयोगितावाद आणि मूरचा उपयोगितावाद यांत एकच महत्त्वाचा भेद आहे, आणि तो म्हणजे स्वतोमूल्यवान काय आहे? या प्रश्नाच्या उत्तराच्या बाबतीत. जुन्या उपयोगितावाद्यांचे त्या प्रश्नाला उत्तर होते, ‘सुख’. सुख ही एकमेव गोष्ट स्वतोमूल्यवान आहे, अन्य सर्व गोष्टींचे मूल्य हे त्या सुखसाधन आहेत यामुळे आहे असे जुने उपयोगितावादी मानीत. पण या बाबतीत मूरचा आणि त्यांचा मतभेद होता. मूरचे म्हणणे असे होते की केवळ सुखच नव्हे, तर अन्यही काही गोष्टी स्वतोमूल्यवान आहेत. उदा. ज्ञानप्राप्ती, कलास्वाद किंवा सौंदर्यास्वाद, मैत्रीचा अनुभव- याही गोष्टी स्वतोमूल्यवान आहेत असे मूर म्हणतो. एवढा बदल केला की मग जुना उपयोगितावाद आणि नवीन उपयोगितावाद यात काही फरक राहत नाही. सुखाखेरीज अन्यही अनेक प्रकारच्या गोष्टी स्वतोमूल्यवान असतात ही गोष्ट मान्य केल्यामुळे कर्तव्याच्या विवेचनात काही किरकोळ बदल अर्थात् करावे लागतील. उदा. आता मानवाचे नैतिक साध्य महत्तम सुखवृद्धी आहे असे न म्हणता, महत्तम मूल्यवृद्धी आहे असे म्हणावे लागेल. म्हणजे सुखाबरोबरच ज्ञानोपासना, कलोपासना, शुद्ध मैत्री इत्यादि गोष्टींचीही वृद्धी करणे, जास्तीत जास्त प्रमाणात वृद्धी करणे, हे आपले कर्तव्य आहे असे म्हणावे लागेल.

जुन्या उपयोगितावाद्यांना ही सुधारणा मान्य होण्यासारखी आहे काय ? या प्रश्नाला उत्तर ‘ नाही ‘ असे आहे. जुने उपयोगितावादी म्हणतील की ज्ञानोपासना, कलोपासना, मैत्री इत्यादि गोष्टीही सुख देणाऱ्याच आहेत, ज्याला ज्ञानाची गोडी आहे, किंवा कलेत रस आहे, अशा मनुष्याला ज्ञानप्राप्ती आणि कलास्वाद सुख देतात, आणि म्हणून त्या गोष्टी स्वतोमूल्यवान आहेत असे आपल्याला वाटते. वस्तुतः स्वतोमूल्यवान आहे फक्त सुख किंवा समाधान. परंतु भिन्न लोकांना भित्र गोष्टींची आवड किंवा इच्छा असते, आणि त्यामुळे त्यांना भिन्न गोष्टींमुळे सुख होते. पण या भिन्न गोष्टी मूल्यवान आहेत याचे कारण त्या सुखसाधन आहेत. म्हणजे ही मूरकृत तथाकथित सुधारणा सुधारणा नव्हे. ती जुन्या उपयोगितावादात कसलीच भर घालत नाही.

यावर नवीन उपयोगितावादी पुढील युक्तिवाद करू शकतो. तो म्हणू शकतो की सुखाखेरीज अन्य सर्व गोष्टींचे मूल्य साधनमूल्य, सुखसाधन म्हणून त्यांना प्राप्त झालेले असते हे खरे नव्हे. या सर्व प्रकरणी, म्हणजे ज्ञानोपासनेत, कलोपासनेत, मैत्रीपूर्ण व्यवहारात सुख असते हे खरे, पण ते सुख भोजनाचे सुख, किंवा अन्य शारीरिक सुखांहून वेगळे आहे, नुसते वेगळे नव्हे तर त्यात उच्चनीचतेचे भेद आहेत. ज्ञानोपासनेत बुडालेल्या वैज्ञानिकाला होणारे सुख हे भोजनाच्या सुखापेक्षा उच्च दर्जाचे आहे असेच कोणीही म्हणेल. किंवा प्रसंगी त्यागातही एक प्रकारचे समाधान असते. ते समाधान खचितच पत्ते किंवा सोंगट्या खेळण्याच्या सुखाहून वरच्या स्तरावरील असते असाच निर्णय मनुष्यमात्राकडून मिळेल. आता ही उच्च सूखे नुसतीच मानेने जास्त असतात असे नव्हे, त्यांची परस्परांशी तुलना होऊ शकत नाही, अशा स्थितीत असे म्हणायला काय हरकत आहे की केवळ सुख नव्हे, तर अन्यही काही वस्तू स्वतोमूल्यवान आहेत?
नवीन उपयोगितावादी एवढेच बोलून थांबणार नाही. तो जुन्या उपयोगितावादाला खुद्द मिलच्या एका प्रसिद्ध वचनाचे स्मरण देईल, ते मत म्हणजे सुखांमध्ये केवळ मात्रात्मक, म्हणजे कमी-जास्तीचे भेद असतात असे नसून त्यात गुणात्मक, उच्चनीचतेचेही भेद आहेत हे होय. आपल्या Utilitarianism या पुस्तकात एके ठिकाणी तो म्हणतो की ‘संतुष्ट डुक्कर असण्यापेक्षा असंतुष्ट मनुष्य असणे चांगले, आणि संतुष्ट मूर्ख असण्यापेक्षा असंतुष्ट सॉक्रेटीस असणे चांगले.’ येथे मिलने असंतोष, असमाधान, ही सुखविरोधी गोप्ट संतोषापेक्षा, समाधानापेक्षा चांगली आहे असे म्हटले आहे. याचा अर्थ सुख ही एकमेव स्वतोमूल्यवान गोष्ट आहे हे खरे नव्हे असा मिलच्या उद्गाराचा अभिप्राय आहे. याप्रमाणे खुद्द मिलची साक्ष तुमच्या मताविरुद्ध जाते असे नवीन उपयोगितावादी जुन्या उपयोगितावाद्याला सांगू शकतो.
जुन्या आणि नवीन उपयोगितावाद्यांमधील या वादाचा निकाल लागला असे अजून म्हणता येत नाही. परंतु नवीन उपयोगितावाद्याचे पारडे थोडे झुकलेले दिसते असे म्हणायला हरकत नाही. आता आणखी एका आक्षेपाचा विचार करून उपयोगितावादाचे हे विवेचन संपवू,
हा आक्षेप असा आहे की उपयोगितावाद अनेकदा नीतिविषयक काही सर्वसामान्य जाणिवांविरुद्ध जातो. विशेषतः न्यायाचे तत्त्व आणि उपयोगितावादाचे तत्त्व यांत बिरोध येऊ शकतो, आणि अशा प्रसंगी न्यायाचे तत्त्व नाकारणे ही गोष्ट नैतिक प्रतिभानाला मान्य होण्यासारखी नाही. उदारहणाच्या साह्याने हा आक्षेप विशद करतो.
उपयोगितावादाच्या मते प्राप्त परिस्थितीत ज्या कमाने महत्तम सुख (किंवा मूल्य) निर्माण होईल ते कर्म युक्त आहे. आणि म्हणून ते आपले कर्तव्यही आहे. आता पुढील परिस्थितीची कल्पना करू या. समजा एका विशिष्ट परिस्थितीत अ आणि ब ही दोन कमें अशी आहेत की त्या दोहोंनीही जास्तीत जास्त सुख निर्माण होणार आहे, म्हणजे उपयोगितावादानुसार त्या दोन कपैिकी कोणतेही एक कर्म करणे त्या परिस्थितीतील मनुप्याचे कर्तव्य आहे. पण आता असे समजा की जरी त्या दोन्ही कानी सारखेच सुख निर्माण होणार असले तरी त्यांपैकी अ मध्ये कोणावर तरी अन्याय (उदा. निर्दोष मनुष्याला शिक्षा) घडणार आहे, आणि ब मध्ये मात्र अशी एकही गोष्ट नाही, असे असेल तर ब हे कर्म अपेक्षा श्रेष्ठ आहे असा निर्वाळा सामान्य नैतिक बुद्धी देईल, उपयोगितावादानुसार मात्र त्या दोन कर्मात तारतम्य ठरविण्याचे कसलेही साधन नाही. याठिकाणी उपयोगितावाद आणि आपली सामान्य नैतिक बुद्धी यांत विरोध निर्माण झाला आहे असे म्हणावे लागेल, आणि म्हणून उपयोगितावादाचे तत्त्व पूर्णपणे समाधानकारक नाही असा निर्णय द्यावा लागेल.
वरील आक्षेपात खूपच तथ्य आहे हे मान्य करावे लागेल. कारण जी नीतिबुद्धी सुख (आणि इतर गोष्टी) स्वतोमूल्यवान आहेत असा निर्णय देते तीच नीतिबुद्धी न्यायाच्या तत्त्वालाही आपली संमती देते. सुख ही स्वतोमूल्यवान गोष्ट आहे आणि म्हणून जास्तीत जास्त सुखवृद्धी करणे आपले कर्तव्य आहे हे मत आपण स्वीकारले, कारण आपल्या सामान्य विवेकी बुद्धीला ते स्वयंसिद्ध दिसते. तसेच निरपराध मनुष्याला शिक्षा करणे अयोग्य आहे ही गोप्टही आपल्या विवेकी बुद्धीला स्वयंसिद्ध दिसते. न्यायाचे तत्त्व आपण शेवटी कसेही ग्रथित केले तरी निरपराध मनुष्याला शिक्षा करणे अन्यायाचे आहे ही गोष्ट निर्विवाद आहे.
अशा परिस्थितीत या दोन तत्त्वामध्ये तडजोड घडवून आणणे याहून अन्य मार्ग नाही. उपयोगितावादाच्या तत्त्वाला जर आपण न्यायाच्या तत्त्वाची जोड दिली तर तयार होणारी उपपत्ती नीतीची विवेकवादी उपपत्ती म्हणून स्वीकारण्यास हरकत नाही असे म्हणता येईल.
अर्थात् न्याय म्हणजे काय ? आणि न्यायाचे तत्त्व नेमके काय आहे ? ह्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यावी लागतील, पण ते केव्हा तरी पुढे करू.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.