विवाह आणि नीती (भाग १३)

कुटुंब आणि वैयक्तिक मानसशास्त्र
या प्रकरणात मी व्यक्तीच्या शीलावर (character) कौटुंबिक संबंधांचा काय परिणाम होतो याचा विचार करणार आहे. या विषयाचे तीन स्वाभाविक भाग पडतातः मुलांवर होणारे परिणाम, मातेवर होणारे परिणाम, आणि पित्यावर होणारे परिणाम. हे तीन परिणाम वेगळे करणे अर्थातच कठीण आहे, कारण कुटुंब हे एक सुसंहत एकक (closely – knit unit) असते, आणि त्यामुळे ज्या गोष्टीचा परिणाम माता-पित्यावर होईल, त्याचा मुलावरही परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु तरीही मी ही चर्चा तीन भागात विभागणार आहे. चर्चेचा आरंभ मुलापासून करणे स्वाभाविक होईल, कारण कोणीही माता किंवा पिता बनण्यापूर्वी आधी मूल असतो.
फ्रॉइडचे म्हणणे बरोबर असेल तर बालकाचे कुटुंबातील अन्य घटकांशी असलेले संबंध काहीसे अनिष्ट स्वरूपाचे असतात. मुलगा आपल्या बापाचा द्वेष करतो, कारण तो लैंगिक बाबतीत आपला प्रतिस्पर्धी आहे असे तो समजतो. मातेसंबंधी त्याने बाळगलेल्या भावना पारंपरिक नीतीनुसार सर्वथा गर्हणीय मानल्या जातात. तो आपले भाऊ आणि बहिणी यांचा द्वेष करतो, कारण ते त्याला आईबापांकडून मिळणाऱ्या प्रेमात वाटेकरी असतात, आणि त्याला ते सर्व प्रेम एकट्याला हवे असते. या दुर्दम्य भावनांचे उत्तरायुष्यांत होणारे परिणाम समलिंगी संभोगापासून ते प्रत्यक्ष वेड लागण्यापर्यंत अतिशय विविध आणि भयानक असतात.
या फ्रॉइडप्रणीत सिद्धांताने लोकांना अपेक्षेपेक्षा कमी धक्का बसला आहे. आता हे खरे आहे की त्या सिद्धांतावर विश्वास ठेवल्याबद्दल प्राध्यापक बडतर्फ झाले आहेत, आणि आपल्या पिढीतील एका अतिशय गुणी माणसाला ‘ त्यानुसार वागण्याबद्दल देशातून हद्दपार कण्यात आले आहे. परंतु ख्रिस्ती तापसवादाचा प्रभाव असा आहे की लोकांना बालकांच्या द्वेषकहाण्यांपेक्षा फ्रॉइडने कामवासनेला जे प्राधान्य दिले आहे त्यामुळे अधिक मोठा धक्का बसला. पण आपल्याला मात्र फ्रॉइडच्या बालकांच्या वासनांसंबंधीच्या मताची सत्यासत्यता पूर्वग्रहविरहित वृत्तीने निश्चित केली पाहिजे. मला आरंभीच कबूल करणे भाग आहे की गेल्या काही वर्षांत बालकांचा मला जो अनुभव आला त्यामुळे फ्रॉइडच्या सिद्धांतात मला पूर्वी वाटे त्याहून पुष्कळच अधिक तथ्य आहे असे माझे मत झाले आहे. परंतु ते सिद्धांत सत्याची केवळ एक बाजू मांडतात असे मला वाटते, आणि ही बाजू अशी आहे की तिचे महत्त्व मातापित्यांच्या थोड्याशा शहाणपणाच्या वागण्याने नाहीसे होणार आहे.
आपण इडिपस गंडापासून (Oedipus Complex) आरंभ करू या. बाल्यावस्थेतील कामविकार फ्रॉइडच्या आधी कोणालाही वाटला असेल त्याहून अधिक प्रबल असतो यात संशय नाही. आणि मला असेही वाटते की भिन्नलिंगी कामविकारही फ्रॉइड मानतो त्यापेक्षा अधिक प्रबल असतो. एखाद्या असमंजस मातेच्या हातून अजाणता असे घडू शकेल की त्यामुळे मुलाची कामवासना तिच्यावर केंद्रित होईल, आणि असे झाले म्हणजे त्याचे फ्रॉइडने सांगितलेले दुष्परिणाम बहुघा घडून येतील हेही खरे आहे. परंतु जर मातेचे लैंगिक जीवन तिला समाधान देणारे असेल, तर हे होण्याचा संभव पुष्कळच कमी असतो, कारण मग जे समाधान प्रौढांकडून मिळवावे ते बालकाकडून मिळविण्याची इच्छा तिला होणार नाही. शुद्ध वात्सल्य-मावनेची प्रवृत्ती बालकांची काळजी घेण्याची असते, त्यांच्याकडून स्नेहाची अपेक्षा करण्याची नसते, आणि जर एखादी स्त्री आपल्या लैंगिक जीवनात संतुष्ट असेल तर ती आपोआपच आपल्या अपत्याकडून गैर प्रतिसादाची अपेक्षा करणार नाही. या कारणास्तव संतुष्ट स्त्री ही असंतुष्ट स्त्रीपेक्षा अधिक चांगली माता होण्याचा संभव असतो. पण कोणतीही स्त्री सर्वथा संतुष्ट राहील हे असंभव आहे, आणि म्हणून असमाधानाच्या काळात तिने काही प्रमाणात आत्मसंयम बाळगणे आवश्यक आहे. इतका आत्मसंयम पाळणे फारसे कठीण नाही; परंतु यापूर्वी त्याची आवश्यकता मानली जात नसे, आणि आपल्या मुलावर प्रेमाचा अविरत वर्षाव करणाऱ्या आईचे वागणे कोणाला गैर वाटत नसे. बालकांच्या असमलिंगी कामविकाराला (hetero-sexual) अन्य बालकांच्या संबंधात नैसर्गिक, हितावह आणि निरागस वाव मिळत असतो. या स्वरूपात तो खेळाचा भाग असतो, आणि सर्वच खेळांप्रमाणे त्यातूनही प्रौद्ध व्यवहाराचे प्राथमिक घडे मिळत असतात. तीन किंवा चार वर्षे वयानंतर बालकांची भावनिक वाढ नीट होण्याकरिता त्याला किंवा तिला दोघांनाही दोन्ही लिंगांच्या समान वयाच्या बालकांच्या संगतीची गरज असते. बहीण आणि भाऊ यांच्याखेरीज अन्य बालकांच्या संगतीची- कारण त्यांचे भाऊ – बहीण स्वाभाविकच त्यांच्यापेक्षा लहान किंवा मोठे असतात. आधुनिक कुटुंब हे अल्पवयीन बालकाच्या वाढीच्या दृष्टीने फारच कुंद आणि बंद असते, पण म्हणून त्याचे बालकाच्या परिसरातील एक घटक म्हणून महत्त्व कमी नाही.
बालकाच्या ठिकाणी अनिष्ट प्रकारची स्नेहभावना निर्माण करण्यात केवळ त्याची आईच जबाबदार असते असे नाही. मुले सांभाळणाऱ्या मुली, नर्सेस, आणि शाळेतील शिक्षिकाही तितक्याच भयावह असतात. खरे म्हणजे त्या अधिक भयावह असतात, कारण सामान्यपणे त्यांची लैंगिक उपासमार झालेली असते. शिक्षणाधिकाऱ्यांचे मत असे आहे की ज्यांचा बालकांशी संबंध येणार असतो त्या सर्व प्रौढ असंतुष्ट कुमारिका असाव्यात. हे मत घोर मानसशास्त्रीय अज्ञान दाखविणारे आहे, आणि ज्याने बालकांच्या भावनिक विकासाचा अभ्यास केला आहे असा कोणीही ते मत स्वीकारणार नाही.
भाऊ आणि बहीण यांच्यातील मत्सर ही कुटुंबात सामान्यपणे आढळणारी गोष्ट आहे आणि त्याच्यातून उत्तरायुष्यात मनुष्यहत्येचे वेड किंवा त्याहून कमी गंभीर मानसिक विकार उद्भवतात. परंतु सौम्य प्रमाणातील मत्सर सोडून दिला तर त्याचा बंदोबस्त करणे कठीण नाही, मात्र त्याकरिता आईबाप आणि वडील माणसे यांनी आपल्या वर्तनात संयम बाळगला पाहिजे. अर्थातच कुटुंबात पक्षपात नसला पाहिजे. खेळणी, खाऊ, आणि स्नेह यांच्या बाबतीत अतिशय सावधान न्यायीपणा बाळगला पाहिजे. नव्या भावाच्या किंवा बहिणीच्या जन्माच्या वेळी मोठ्या अपत्यांना आता आपले महत्त्व पूर्वपिक्षा कमी झाले आहे, असे वाटू नये याची आईबापांनी खबरदारी घेतली पाहिजे. जिथे जिथे गंभीर मत्सराचे प्रसंग उद्भवतात तिथे तिथे ही खबरदारी घेतली जात नाही असे आढळून येईल.
वर सांगितलेले उपाय केल्यास फ्रॉइडने ज्यांचा उल्लेख केला आहे ते दुष्परिणाम बहुधा घडणार नाहीत असे म्हणता येईल.
मातापित्यांचा स्नेह जेव्हा उचित प्रकारचा असतो तेव्हा तो मुलांच्या विकासास उपकारक होतो हे निःसंशय. ज्या मुलांविषयी त्यांच्या आयांना उत्कट प्रेम वाटत नाही ती अशक्त आणि भेदरट निपजण्याचा संभव असतो, आणि पुष्कळदा त्यांच्यात चौरविकारासारखे (Heptomania) दोष उद्भवतात. या भयानक जगात मुलांना आईबापांच्या प्रेमामुळे सुरक्षित वाटते, आणि मग निरनिराळे प्रयोग करण्याचा आणि परिसर धुंडाळण्याचा धीटपणा त्यांच्या अंगी येतो. आपण उत्कट स्नेहाचा विषय आहोत ही जाणीव बालकाला अत्यावश्यक असते, कारण आपली असहायता त्याला सतत जाणवत असते, आणि त्याला अशा स्नेहातून सुरक्षा मिळू शकते. जर मूल संतुष्ट, प्रसन्न आणि निर्भय व्हायचे असेल तर त्याला त्याच्या परिसरात काही प्रमाणात उत्साहाचे वातावरण हवे, आणि ते आईबापांच्या स्नेहाखेरीज अन्य मार्गानी मिळणे दुरापास्त असते.
सुबुद्ध आईबाप आपल्या मुलांकरिता आणखी एक गोष्ट करू शकतात. परंतु अगदी अलीकडच्या काळापर्यंत ते ती क्वचितच करीत. ही गोष्ट म्हणजे लिंगविषयक आणि जननविषयक माहिती त्यांना उत्तम प्रकारे देणे. आपल्या आईबापांच्या लैंगिक संबंधातून आपण निर्माण झालो हे जर मुलांना कळले तर त्यांना या विषयाची आणि त्याच्या जीवशास्त्रीय हेतूची माहिती अत्युत्तम मार्गाने मिळाली असे म्हणता येईल. जुन्या काळी या गोष्टींची त्याला जी माहिती मिळे ती अश्लील परिहासाचा विषय आणि लज्जास्पद सुखाचे साधन म्हणून. गुह्य, अश्लील भाषेद्वारा झालेला त्या विषयाचा प्रथम परिचय त्याच्यावर कायमचा ठसा उमटवी, आणि लैंगिक विषयासंबंधी विशुद्ध भूमिका घेणे त्याला कायमचे अशक्य होऊन जाई.
कौटुंबिक जीवन एकंदरीने इष्ट आहे की अनिष्ट हे ठरविण्याकरिता आपल्याला त्याचे व्यवहार्य पर्याय काय आहेत ते पाहावे लागेल. असे पर्याय दोन दिसतात. एक, मातृसत्ताक कुटुंब, आणि दोन, अनाथालयासारख्या सार्वजनिक संस्था, यांपैकी कोणतीही गोष्ट सार्वत्रिक करायची तर त्याकरिता मोठे आर्थिक बदल करावे लागतील. ते बदल झाले आहेत अशी कल्पना करून, त्यांचा मुलांच्या मानसशास्त्रावर काय परिणाम होतो त्याचा विचार करू.
आपण मातृसत्ताक कुटुंबापासून सुरुवात करू या. या पद्धतीत मुलांना फक्त आईच असेल. स्त्रीला हवे तेव्हा ती मुलाला जन्म देईल, परंतु त्याच्या पित्याला त्या मुलात काही रस असेल अशी अपेक्षा ती करणार नाही, आणि तसेच तिच्या सर्व मुलांना एकच पिता असेल असेही नाही. आर्थिक तजवीज समाधानकारक आहे असे गृहीत धरल्यास अशा व्यवस्थेत मुलांचे फार नुकसान झाले असे आपण म्हणू काय? मुलाला आपल्या बापाचा मानसशास्त्रीय उपयोग काय असतो? माझ्या मते सर्वांत महत्त्वाचा उपयोग म्हणजे लिंगभेदाचा विवाहितांचे प्रेम आणि अपत्योत्पत्ती यांच्याशी असलेला संबंध त्यांना ज्ञात होतो. तसेच बाल्याच्या पहिल्या काही वर्षांत पुरुषी आणि बायकी दोन्ही दृष्टिकोणांशी मुलांचा संबंध आल्याने त्यांचा निश्चित फायदा होतो. विशेषतः मुलांच्या ( म्ह. मुलग्यांच्या) दृष्टीने हे विशेष महत्त्वाचे असते. परंतु हा फायदा फार मोठा आहे असे मला वाटत नाही. ज्यांचे वडील अपत्यांच्या लहानपणीच वारलेले असतात ती मुले अन्य मुलांपेक्षा सरासरीने कमी कर्तृत्ववान निपजतात असे दिसत नाही. आदर्श पिता लाभणे अर्थातच पिता नसण्याहून चांगले; परंतु कितीतरी पिते आदर्शापासून इतके दूर असतात की ते नसले तर मुलांचा फायदाच होईल.
आता वर जे म्हटले त्यात आपल्या समाजातील प्रस्थापित रूढींहून भिन्न रूढी गृहीत धरल्या आहेत. जेव्हा समाजात एखादी रूढी किंवा संकेत अस्तित्वात असतो, तेव्हा त्याचा भंग झाल्याने मुलांना त्रास होतो, कारण आपण मुलखावेगळे आहोत ही जाणीव मुलांना फार क्लेशकारक असते. आपल्या समाजातील घटस्फोटांबाबत हे लागू होते. ज्या मुलांना आई आणि बाप दोघांचीही सवय लागली आहे, आणि ज्यांना त्या दोघांचाही लळा लागला आहे, त्यांना त्यांच्या घटस्फोटाने आपली सुरक्षितता पूर्ण उद्ध्वस्त झाली आहे असे वाटते. खरे म्हणजे अशा परिस्थितीत त्याला मानसिक विकार जडण्याची भीती असते. एकदा मुलाला आई आणि बाप या दोघांचाही लळा लागला की मग विभक्त होण्यात ते एक गंभीर जबाबदारी स्वीकारतात. म्हणून मला वाटते की ज्यात पित्यांना स्थान नसेल असा समाज ज्यात घटस्फोट वारंवार होतो अशा समाजापेक्षा मुलांच्या दृष्टीने अधिक चांगला असेल.
मुलांना केवळ पित्यापासूनच नव्हे, तर मातेपासूनही विभक्त करावे या प्लेटोच्या प्रस्तावाच्या बाजूने बोलण्यासारखे मला फारसे दिसत नाही. वर उल्लेखलेल्या कारणांस्तव आईबापांचा स्नेह मुलांच्या वाढीकरिता, विकासाकरिता अवश्य आहे, आणि जरी हा स्नेह एकट्या आईकडून मिळणेही पुरेसे असले तरी तो त्यांपैकी कोणाकडूनही न मिळणे मात्र शोचनीय होईल. लैंगिक नीतीच्या दृष्टिकोणातून पाहता (आणि या पुस्तकात आपला तो प्रधान विषय आहे) महत्त्वाचा प्रश्न आहे पित्याची उपयोगिता. या विषयासंबंधी निश्चित मत देणे कठीण आहे. परंतु असे म्हणता येईल की काही सुदैवी प्रकरणात पित्याला काही मर्यादित उपयुक्तता असली, तरी दुर्दैवी प्रकरणात मात्र अरेरावी वृत्ती, चिडखोर स्वभाव, आणि भांडखोर प्रवृत्ती यांच्यामुळे तो हितापेक्षा अहितच जास्त करू शकतो. म्हणून मुलांच्या मानसशास्त्राच्या दृष्टीने पाहता पित्याची बाजू फारशी बळकट नाही असे म्हणावे लागते.
मातेच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या कुटुंबाचे महत्त्व काय आहे ते निश्चित सांगणे फार कठीण आहे. माझी अशी समजूत आहे की गरोदरपणात आणि अपत्यजन्मानंतर स्तनपानाच्या काळात स्त्रीला पुरुषाच्या रक्षणाची इच्छा वाटण्याची प्रवृत्ती स्वाभाविकच आहे. ही प्रवृत्ती मानवसदृश वानरांपासून अनुवंशाने आली आहे. ज्या स्त्रीला सध्याच्या निष्ठुर जगात या रक्षणाला मुकावे लागते ती जास्तीची कलहप्रिय आणि आक्रमक होण्याचा संभव असतो. परंतु या भावना केवळ अंशतःच सहजात आहेत. जर शासनसंस्थेने अपत्यजन्म समीप असण्याच्या काळात आणि अपत्यजन्मानंतर काही काळ मातांची आणि अपत्यांची पुरेशी काळजी घेतली तर त्या भावना बऱ्याच दुर्बल होतील, आणि कदाचित् पूर्णपणे नाहीशाही होतील. पित्याचे घरातील स्थान नाहीसे झाल्यामुळे स्त्रियांचे होणारे मुख्य नुकसान म्हणजे पुरुषांबरोबर च्या संबंधातील घनिष्ठता आणि गांभीर्य यांचा होणारा हास असे मला वाटते. मानवप्राणी असे बनलेले आहेत की स्त्री आणि पुरुष दोघांनाही परस्परांपासून पुष्कळ शिकण्यासारखे असते, आणि त्याकरिता केवळ लैंगिक संबंध (ते उत्कट असले तरी) पुरत नाहीत. मुले वाढविण्याच्या महत्त्वाच्या कामात सहकार्य, आणि ते करीत असताना घडणारे सख्य यांतून असा एक अतिशय महत्त्वाचा आणि समृद्ध करणारा संबंध निर्माण होतो की जो पुरुषाकडे मुले वाढविण्याची जिच्यात जबाबदारी नाही अशा परिस्थितीत निर्माण होऊ शकत नाही. आणि मला असेही वाटते की ज्यांचे विवाह सुखी आहेत, आणि ज्या प्रत्येक अवस्थेत नवऱ्याशी सहकार्य करतात अशा आयांच्या तुलनेत ज्या केवळ स्त्रैण जगात वावरतात आणि ज्यांचे पुरुषांशी संबंध अल्पकालिक असतात अशा आया आपल्या मुलांच्या भावनिक शिक्षणाच्या दृष्टीने कमी पडतील. एखादी स्त्री विवाहित जीवनात असंतुष्ट असेल – आणि ही गोष्ट मुळीच अपवादात्मक नाही – तर तिच्या असंतुष्टपणामुळे तिला आपल्या मुलांशी होणाऱ्या व्यवहारात अवश्य असलेला भावनिक समतोल प्राप्त करणे कठीण असते. अशा स्थितीत जर ती नवऱ्यापासून विभक्त झाली तर ती नक्कीच अधिक चांगली आई होऊ शकेल, याप्रमाणे आपण पुढील अतिशय सामान्य निष्कर्षाप्रत आलो आहोतः सुखी विवाह हितावह असतात, आणि असंतुष्ट विवाह अहितावह असतात.
वैयक्तिक मानसशास्त्राच्या दृष्टिकोणातून कुटुंबाकडे पाहताना त्याचा पित्यावर होणारा परिणाम हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. पितृत्व आणि त्यातून उद्भवणाऱ्या तीव्र भावना यांच्याविषयी मी या पुस्तकात वारंवार लिहिले आहे. प्राचीन इतिहासात पितृसत्ताक कुटुंबसंस्था आणि स्त्रियांची परवशता यांच्या विकासात त्याचा वाटा काय होता ते आपण पाहिले आहे, आणि यावरून पितृत्वाची भावना किती प्रबल आहे याची कल्पना आपण करू शकतो. त्या मानाने ही भावना काहीशा गूढ कारणास्तव उच्च नागरित समाजात तितकी प्रबल असत नाही असे दिसते. रोमन साम्राज्यातील वरिष्ठ वर्गात ही भावना नाहीशी झाल्यासारखी दिसते, आणि आजदेखील बौद्धिक जीवन जगणाऱ्या अनेक लोकांमध्ये ती जवळपास नाहीशी झालेली दिसते. असे असले तरी बहुतेक मनुष्यात, अतिशय नागरित समाजातही, ही भावना आहे. पुरुष लग्न करतात ते या भावनेखातर, लैंगिक सुखाकरिता नव्हे, कारण लैंगिक समाधान त्यांना विवाहावाचूनही मिळू शकते. अपत्यांची इच्छा पुरुषांपेक्षा स्त्रियांत अधिक प्रमाणात असते अशी एक समजूत आहे, पण माझे स्वतःचे अवलोकन याच्या नेमके उलट आहे. आधुनिक विवाहांपैकी मोठ्या संख्येत अपत्यसंभव हा पुरुषांच्या आग्रहाखातर झालेला असतो. अपत्य जगात आणण्याकरिता स्त्रीला प्रसूतिवेदना, अन्य कष्ट आणि संभाव्य सौंदर्यहानी यांना तोंड द्यावे लागते, परंतु पुरुषाला असली कसलीच चिंता नसते. पुरुष जेव्हा कुटुंबाच्या विस्तारावर मर्यादा घालायची म्हणतो तेव्हा त्याची कारणे आर्षिक असतात. ही कारणे स्त्रीलाही असतात, पण त्याखेरीज तिची स्वतःची कारणेही असतात. पुरुषांची अपत्येच्छा प्रबळ असते याचे प्रमाण आपल्या वर्गाला शोभेल असे महागडे शिक्षण आपल्या मलांना देण्याकरिता ते आपल्या केवढ्या सुखाचा जाणूनबुजून त्याग करतात यावरून उघड मिळते.
आज पितृत्वामुळे पुरुषाला जे हक्क प्राप्त होतात ते जर त्याला मिळेनासे झाले तर पुरुष मुलांना जन्माला घालतील का? काही लोक म्हणतील की जर त्यांना अपत्यांची कसलीच जबाबदारी राहणार नसेल, तर ते अनिर्वधपणे अपत्यांना जन्म देतील. मला असे वाटत नाही. ज्या पुरुषाला अपत्य हवे असते त्याला त्याच्या जबाबदाऱ्याही हव्या असतात, आणि आजच्या संततिप्रतिबंधक साधनांच्या दिवसात पुरुष केवळ मौजमजा करण्याचा गौण परिणाम असलेल्या अपत्योत्पत्तीची इच्छा सामान्यपणे करणार नाही. आता हे खरे आहे की कायदा काहीही असला तरी एक स्त्री आणि एक पुरुष यांना कायम एकत्र राहण्यास कोणी रोखू शकत नाही, आणि अशा स्थितीत सध्या पित्याला जे कायदा आणि रुढी यांमुळे प्राप्त होते तसे काहीसे पुरुषाला मिळू शकेल. पण जर कायदा आणि रुढी मुले फक्त आईचीच असतात असे मानीत असतील तर आपल्या वर्तमान विवाहासारखा कोणताही संबंध आपल्या स्वातंत्र्याचा भंग करणारा आहे. आणि त्यामळे आपल्याला असलेल्या आपल्या मुलांवरील पूर्ण अधिकारात विनाकारण कपात होते आहे असे स्त्रिया मानतील. म्हणून आपल्या कायदेशीर हक्कांमध्ये कपात करण्यास पुरुष स्त्रियांचे मत वळवू शकतील अशी अपेक्षा करणे सामान्यपणे चूक होईल असे मानले पाहिजे.
अशा प्रकारच्या व्यवस्थेच्या पुरुषी मानसशास्त्रावर होणारा परिणामांविषयी गेल्या प्रकरणात मी बोललो होतो. मला वाटते की स्त्रीपुरुषांच्या संबंधातील गांभीर्य फार मोठ्या प्रमाणात कमी होईल. ते संबंध हृदय, मन आणि शरीर यांच्या गाढ मिलनाचे संबंध न राहता त्यांना केवळ मौजेखातर स्वीकारलेल्या संबंधांचे स्वरूप अधिकाधिक प्रमाणात येईल. सर्व प्रकारच्या वैयक्तिक संबंधांत एक प्रकारचा थिल्लरपणा येईल, आणि पुरुषाच्या गंभीर भावना आपली जीविका (career), आपला देश, किंवा काही अन्य अवैयक्तिक विषयाशी संबद्ध होतील. अर्थात् हे सर्व केवळ सामान्यपणे बोलणे झाले, कारण माणसे परस्परांहून मोठ्या प्रमाणात भिन्न असतात, आणि एकाला जी एक मोठी हानी वाटते ती दुसऱ्याला पूर्णपणे संतोषकारक व्यवस्था वाटू शकेल. माझी समजूत (मी ती भीत भीत व्यक्त करतो) अशी आहे की समाजमान्य संबंध म्हणून पितृत्वाच्या लोपामुळे पुरुषांचे भावजीवन उथळ आणि दरिद्री होईल. त्यातून शेवटी कंटाळा आणि निराशा ही उद्भवतील, आणि अपत्योत्पादन हळू हळू नाहीसे होईल. असे झाले तर ज्यात जुन्या रुढी टिकून आहेत अशा समाजांमधून मानवसंख्येची भरपाई करावी लागेल. उथळपणा आणि कंटाळा या गोष्टी टाळता येतील असे मला वाटत नाही. लोकसंख्येच्या -हासाचा बंदोबस्त स्त्रियांना मातृत्वाचा व्यवसाय स्वीकारण्यास पुरेसे वेतन देऊन करता येईल. जर लष्करशाही सध्या आहे तशीच अनिर्बध चालू राहिली तर हे बहुधा लवकरच घडून येईल, पण हा विचार लोकसंख्येच्या प्रश्नाशी संबद्ध आहे, आणि त्याचा विचार आपण नंतर करणार आहोत. म्हणून मी येथे त्याचा पाठपुरावा करीत नाही.

अनुवादक : म. गं. नातू

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.