पुस्तक-परिचय

स्त्री उवाच : वार्षिक १९९१ मूल्य रु. पंचवीस,
संयुक्त राष्ट्रसभेने १९७५ हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून जाहीर केले आणि स्त्रियांना आणि पुरुषांनाही, स्त्रियांच्या अस्तित्वाची जाणीव व्हायला लागली. स्त्रियांना आपला चेहरा गवसू लागला आणि माणूस म्हणून स्वतःची ओळख पटू लागली. आजतागायत त्यांच्यावर लादलेले वस्तुत्व’ नाकारून त्या व्यक्तित्व जोपासू लागल्या. समाजाच्या मानसिक गुलामगिरीतून मुक्त होताना स्त्रीमुक्तीची चळवळ आकार घेऊ लागली, स्त्रीला अभिव्यक्तीची जी गरज भासली त्यातून स्त्री उवाच गटाची स्थापना झाली, हा गट गेल्या ५ वर्षांपासून स्त्री उवाच’ याच नावाने चळवळीचे वार्षिक मुखपत्र काढीत आहे.
यंदाचा अंकही नेहमीप्रमाणे ८ मार्चला प्रकाशित झाला. स्त्रीमुक्तीच्या चळवळीशी संबंधित अशा वेगवेगळ्या विषयांवरील २१ लेख या अंकामध्ये समाविष्ट केले आहेत. ते विषय स्थूल मानाने स्त्री आणि सांप्रदायिकता, स्त्री आणि आरोग्य, स्त्री आणि विज्ञान – अंधश्रद्धा, स्त्री आणि माध्यमे, परकीय साहित्यातील स्त्री आणि स्त्री आणि स्त्रीमुक्ती चळवळ असे सांगता येतील. अंकाचे संपादन मीना देवल यांनी केले आहे. एक – दोन लेख वगळता बाकीचे सगळे स्त्रियांनी आणि त्यातूनही बरेचसे स्त्री कार्यकत्यांनीच लिहिलेले आहेत. अंक वाचल्यावर चळवळीची अनेकविध अंगे, परिमाणे ठळकपणे नजरेत भरतात. भारतातील स्त्रीमुक्ती चळवळीचे आकलन आणि परखड मूल्यमापन करण्याचा हा प्रयत्न पुष्कळ अंशी यशस्वी झाला आहे असे म्हणावयास हरकत नाही.
या अंकातील महत्त्वाच्या लेखांच्या वर्गीकरणाचे थोडक्यात स्वरूप पुढीलप्रमाणे:
स्त्री आणि सांप्रदायिकता
स्त्रियांच्या चळवळीचा जोर जसजसा वाढू लागला आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे जसे कठीण होऊ लागले तसतसा प्रतिगामी शक्तींनीही स्त्रीवादीषणाचा आव आणायला सुरुवात केली आहे. अनेक धर्माध व सांप्रदायिक संघटनांनी महिला आघाड्या उघडल्या आणि त्यांच्या समस्यांचे भांडवल करून त्या आपल्या संघटना बळकट करून घेत आहेत. स्त्रियांच्या एकसंघ शक्तीमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न होत आहेत. “अशा वेळी आपण धर्मतत्त्वांच्या अतीत जाऊन स्त्रिया म्हणून एकत्र येऊन धर्माधतेचा लोंढा थोपवण्याची गरज प्रकनि जाणवते आहे” असे संपादक म्हणतात. याशिवाय देणे साऱ्याजणींचे’ या लेखात चयनिका आणि स्वातीजा यांनी धर्म आणि स्त्री यांच्या परस्परसंबंधाचा शोध घेणाऱ्या मुलाखती दिल्या आहेत.
स्त्री आणि आरोग्य
स्त्रीला वस्तू म्हणून वागविण्याच्या भूमिकेतूनच तिच्या आरोग्याविषयीची अनास्था जन्माला येते. तिच्या आरोग्याचा प्रश्न हा तिच्या अस्तित्वाचाच प्रश्न आहे म्हणून आरोग्य हा स्त्रीमुक्तीच्या चळवळीचा गाभा बनायला हवा असे प्रतिपादन ‘आरोग्यः अस्तित्वाचा शोध आणि बोध’ या लेखात चयनिका आणि स्वातीजा यांनी केले आहे. स्त्रीच्या शरीराकडे मेंदू असलेले एक सलग मानवी शरीर म्हणून न पाहता सुट्या अवयवांकडेच कसे पाहिले जाते याचे उल्लेख अनेक लेखांमधून आले आहेत, स्त्रिया म्हणजे मुले जन्माला घालण्याचे यंत्र असा सरसकट समज आजही आहेच, त्यामुळे तिच्या आरोग्याची फिकीर कधी केलीच तर फक्त गर्भारपणात आणि नंतर (मुलगा झाला तर) बाळंतपणातच केली जाते. विज्ञान चळवळींची स्त्रीआरोग्यावरची भूमिकाही त्यांना लोहाच्या गोळ्या वाटण्याइतकीच संकुचित आहे.
पण स्त्रीचा अनारोग्याशी संबंध केवळ असा नकारात्मक नाही. या दुर्लक्षाबरोबरच तिला शारीराला घातक अशाही अनेक गोष्टी’ पचवाव्या लागतात. त्यामध्ये पहिला नंबर लागतो तो संतति नियमनाच्या साधनांचा. आर. यू ४८६ ह्या गोळ्या म्हणजे गर्भपाताचा नवीन व सोपा उपाय. डॉ. कामाक्षी यांनी ‘मातृत्व नाकारण्याचा नवा मार्ग’ या लेखात या औषधाचा भारतीय संदर्भात विचार केला आहे. आपल्याकडील स्त्रिया हे ऑपध घेताना पाळावयाच्या अटी पाळू शकणार नाहीत व तसेच औषध घेऊन त्या स्वतःच्या घात करखून घतील किंवा अपुऱ्या वाढीच्या, मंदबुद्धी मुलाला जन्म देतील अशी साधार भीती त्यांनी केले आहे

स्त्री आणि विज्ञान – अंधश्रद्धा
याचे विवेचन रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांच्या ‘ मिथकांच्या धुक्याआड’ या एकाच लेखात आले आहे. धर्मसत्ता, कुटुंबसत्ता व राज्यसत्ता यांनी आतापावेतो विविध अंधश्रद्धा व खोट्या नीतिनियमांच्या सहाय्याने स्त्रीला पुरुषाहून कनिष्ठ ठरवण्याचा कसून प्रयत्न केला, त्या सर्वाविरुद्ध झगडा करताना विज्ञान हेच स्त्रीचे हत्यार होते. पण विज्ञानहीं कित्येकदा वस्तुनिष्ठतेची अपेक्षा कशी पूर्ण करीत नाही आणि अंधश्रद्धांच्याच वाटेने जाते, पुरुष शास्त्रज्ञांचा पुरुषीपणा तिथेही कसा आड येतो, याचे यथार्थ दर्शन या लेखात घडवले आहे.
स्त्री आणि माध्यमे
सामाजिक आणि मानसिक बंधनातून बाहेर पडणाऱ्या स्त्रियांनी मुक्तीचा टाहो फोडला आणि त्याचे पडसाद अनेक ठिकाणी उमटू लागले. मुद्रीत साहित्य आणि इतर माध्यमे यांच्यामधून पूर्वीपेक्षा वेगळ्या स्वरूपात स्त्री साकार होऊ लागली. ज्यांना स्त्रीमुक्तीचा आशय भावला त्यांनी तो नेटकेपणाने व्यक्त केला तर काहींनी फक्त देखावा करून त्याच्या विरोधी परिणाम घडवून आणला, आणखी काहींनी तर स्त्रीसमस्या आणि त्यावर आधारित कलाकृती यांना विक्रीयोग्य वस्तू बनवले. ‘स्त्रीवादी दृष्टिकोनातून स्त्रीप्रधान चित्रपट’ या लेखात शांता गोखले यांनी एक पल, रिहाई, उंबरठा, अर्थ, दृष्टी इ. तथाकथित स्त्री प्रश्नांवरच्या चित्रपटांचे समीक्षण केले आहे. त्यापैकी बहुधा सर्वच चित्रपटांमध्ये खरी स्त्रीवादी भूमिका कशी दिसत नाही आणि परंपरागत स्त्रीमूर्तीच कशी रंगवली आहे याचे विवरण त्यांनी केले आहे.
‘मराठी रंगभूमीच्या इतिहासातून स्त्रियांचा शोध’ या लेखात नीरा आडारकर यांनी रंगभूमीवर स्त्रियांनी काम करावे किंवा नाही या वादाचा प्रदीर्घ परामर्श घेऊन, पुरुष नाटककार आणि पुरुष समीक्षक यांनी या वादामध्ये केलेल्या दुटप्पीपणाचा चांगला समाचार घेतला आहे.
स्त्रीमुक्तीच्या अभिव्यक्तीला अधिक सच्चेपणाचे परिमाण देण्याच्या दृष्टीने ललित वाङ्मय किंवा चित्रपट यांच्यापेक्षा आत्मचरित्रे अधिक महत्त्वाची ठरतात. सरस्वती रिसबूड यांनी डॉ. अनुपमा निरंजन, शारदा आद्यरंगाचार्य व ची. न. मंगळा या कन्नड स्त्रियांची त्यांच्या आत्मचरित्रातून ओळख करून दिली आहे.
परकीय साहित्यातील स्त्रीमान
परदेशातील भगिनींची परिस्थिती आपल्यापेक्षा वेगळी नाही. परकीय स्त्रीची दोन चित्रणे या अंकात आली आहेत, अलेक्झांद्रा कोलनताई या रशियन लेखिकेच्या कथेचा वासंती दामले यांनी केलेला अनुवाद ‘बहिणी’ या नावाने प्रकाशित झाला आहे.
‘गजाआडच्या आठवणी’ हा असाच दुसरा लेख. डॉ. नवल अल् सदावी या इजिप्तमधील आघाडीच्या स्त्रीमुक्तीवादी कादंबरीकार आहेत. त्यांच्या Womanatzero Point या कादंबरीचा मीना देवल यांनी केलेला ‘शून्यात विलीन होण्यापूर्वी’ हा अनुबाद स्त्री उवाच च्या वाचकांना आठवत असेलच. डॉ. नवल ना १९८१ साली सरकारविरोधी कारवाया केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात टाकण्यात आले तेव्हाचे अनुभव त्यांनी Memoirs of Women sPrison या पुस्तकामध्ये शब्दबद्ध केले आहेत. या पुस्तकाचा विस्तृत परिचय (खरं म्हणजे त्यातील अवतरणांचा अनुवाद) मीना देवल यांनीच ‘गजाआडच्या आठवणी’ या लेखात करून दिला आहे.
अन्वर सादातची हुकूमशाही, तुरुंगातील अधिकाऱ्यांची दडपशाही, बुरख्याआडच्या स्त्रियांचे बंदिस्त मनोविश्व, आपल्या कृत्याचे समर्थन करणारी तिथली खुनी स्त्री, अर्थशून्य सरकारी यंत्रणा आणि कोठडीतील गलिच्छपणा, आजारपणा, नैराश्य व मृत्यू यांचे थैमान या सगळ्यांचे वेधक आणि प्रत्ययकारी वर्णन यामध्ये आले आहे. मूळ लेखिकेची शैली आणि सहजसुंदर अनुवाद यांच्यामुळे लेख अतिशय सुंदर उतरला आहे.
स्त्री आणि स्त्रीमुक्ती चळवळ
या अंकातील सर्वाधिक लेख या विषयावर आहेत. स्त्रीमुक्तीच्या चळवळीचे सिंहावलोकन आणि त्यातील रोजच्या कामामध्ये येणाऱ्या अडचणी यांचा एका कार्यकर्तीने घेतलेला शोध (‘जांभळ्या पहाटेपूर्वीची वळणे’: लेखिका : लता प्रतिभा मधुकर), स्त्रियांमध्ये वस्तीपातळीवर जागरूकता निर्माण करण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या प्रकल्पाचा अहवाल (जागरूकता प्रकल्पाच्या निमित्ताने: विद्या विद्वांस), समाज परिवर्तनापासून प्रथमपासूनच दूर राहिलेल्या मुस्लिम स्त्रियांनी आपण होऊन एकत्र येऊन बांधलेल्या एका स्त्रीमुक्ती संघटनेचा परिचय (आवज – ए – निस्वाँ – संध्या, स्वातीजा, चयनिका), जात पंचायतीमध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळवून देणाऱ्या धाडसी मेघवाळ स्त्रीची कहाणी (‘मुद्दा आहे हक्कांचा : अरुंधती सरदेसाई), कामगार स्त्रियांवर होत आलेल्या अन्यायांचे चित्रण (कामगार स्त्रियांचे बदलते रूप : सुजाता गोठस्कर) यांचा त्यात समावेश करता येईल.
फेमिनिस्ट आईबद्दल मुलांना काय वाटते? अशा मुलांच्या मुलाखती घेऊन त्याचे संकलन विनया खडपेकर यांनी ‘स्त्रीवादी आई : साद पडसाद’ या लेखामध्ये केले आहे. या मुलाखतींमधून काही चिंतनीय मुद्दे प्रकाशात आले आहेत. आईच्या स्त्रीवादी होण्याने मुलींना पुष्कळच फरक पडतो. आई त्यांची अधिक चांगली मैत्रीण बनते, त्यांना अधिक स्वातंत्र्य देते. पण मुलांचे मात्र असे नाही. त्यांचे कुटुंबातील स्थान अगोदरच स्वयंपूर्ण असल्याने आईच्या स्त्रीवादी असण्याचे त्यांना फारसे सोयरसुतक नाही. काही मुलगे त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात स्त्रीवादी विचारसरणीपासून दूर, तर बरेचसे त्याबाबत उदासीन आहेत. याचा गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे. स्त्रीचा समान पातळीवरून स्वीकार करण्यास पुरुषाची मनोभूमी तयार करणे या गोष्टीला स्त्रीवादी चळवळीने महत्त्व द्यावे असे लेखिका म्हणते. व्यक्तिगत वाटचालींचे चित्रण
“स्त्री ते मिळून साऱ्याजणी’ या लेखात विद्या बाळ यांनी ‘स्त्री’ मध्ये काम करताना त्यांचे व्यक्तिमत्व कसे प्रगल्भ होत गेले आणि एका संपादिकेमधून एक कार्यकर्ती कशी आकारत गेली याचे मनोवेधक चित्रण केले आहे. तसेच वेश्यांना वस्त म्हणन वापरणाऱ्या समाजातील ‘ दोन वस्तु-चित्रणे’ प्रतिमा जोशी यांनी रेखाटली आहेत. सामाजिक कार्यकत्यांच्या मदतीने काही वेश्यांना आपल्या मुलींना त्या जगाबाहेर काढता आले, पण काही मात्र ती मदत मिळूनही सामाजिक दडपणांचे कवच कसे भेटू शकल्या नाहीत, ते त्यातून कळते.
या पूर्ण अंकामध्ये ‘मिथकांच्या धुक्याआड’, ‘गजाआडच्या आठवणी’, ‘स्त्रीवादी आई: साद पडसाद आणि ‘आरोग्य – अस्तित्वाचा शोध आणि बोध या चार उत्कृष्ट लेखांचा विशेषत्वाने उल्लेख करावासा वाटतो. बहुतेक सगळेच लेख अभ्यासपूर्ण आहेत पण ‘कामगार स्त्रियांचे बदलते स्वरूप ‘ आणि ‘लोकसंख्येची गणती पण स्त्रीची खिजगणती या लेखात माहितीला आकडेवारीची जोड मिळाल्यामुळे त्यांची अधिकृतता आणि परिणामकारकता अधिकच उंचावली आहे. मुखपृष्ठावरील नवज्योतचे स्त्री : स्व-प्रतिमेचा शोध’ या मालिकेतील चित्र आणि अखेरच्या पृष्ठावरील ‘बचपन मिलेगा कब बोल भोलानाथ’ असे विचारणाऱ्या बालिकेचे चित्र ही दोन्ही आकर्षक आणि यथार्थ आहेत. शेवटच्या पृष्ठावर ‘बालिका दशक’ असे म्हणून पुढे १९०० ते २००० असा शतकाचा उल्लेख आहे. ही चूक मात्र खटकते.
अभ्यासपूर्ण लेखांच्या जोडीला काही ललित वाङ्मयही या अंकात अवतरले आहे. ललित वाङ्मयात अलीकडे एक दुबोधतेचा प्रवाह आला आहे. ‘उर्वशी-पुरूरवा’ हे सुकन्या आगाशे यांनी केलेले नाट्यारूपांतर काहीसे त्याच अंगाने जाणारे वाटते. ‘वस्त्रहरण’ ही दीनानाथ मनोहर यांची कथा ठीक, ‘सॉना बाथ’ या संज्ञानवाही लेखात जयश्री वेलणकर यांनी लैंगिकतेचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यांना नक्की काय म्हणायचे ते स्पष्ट होत नाही. भारतातील प्रतिनिधिक स्त्रीच्या दृष्टीकोणातून विचार करावयाचा झाल्यास हा विषय खूपच दूरचा आहे. त्यातील वातावरणही परके आहे. ‘स्त्री उवाच’ वाचून सर्वसाधारण स्त्रीची मानसिकता बदलावी अशी अपेक्षा असल्यास अशा लेखांची उपयुक्तता मर्यादितच म्हटली पाहिजे.
अनुराधा मोहनी

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.