पत्रव्यवहार

संपादक
मार्च १९९१ च्या अंकात डॉ. साळुखे यांनी लिहिलेल्या ‘चार्वाक दर्शन ‘ या पुस्तकाचे परीक्षण वाचले. योगायोगाने पाठोपाठ ते पुस्तक वाचण्याची संधी मिळाली, वाचनानंतर माझ्या मनात काही शंका निर्माण झाल्या. त्यांचे निरसन झाल्यास मी आपला आभारी होईन. अर्थात् परीक्षणकत्यनिच निरसन करावे अशी अपेक्षा नाही.
माझ्या शंका पुढील तीन मुद्याबाबत आहेत. (१) पूर्वपक्ष शब्दाचा अर्थ, (२) चार्वाक हे आस्तिक मत आहे का 7(३) चार्वाकाचे ग्रंथ जाळले व त्यामुळे ते नष्ट झाले का?
पूर्वपक्ष :- डॉ. साळुखे यांच्या मते चार्वाकाचे मत सर्वत्र पूर्वपक्ष म्हणूनच मांडण्यात आले आहे हे त्या मतावर अन्याय करणारे किंवा त्याविषयी गैरसमज पसरविणारे आहे. लेखकाला हे मान्य आहे की चार्वाकाचे समर्थन करणारा एकही ग्रंथ उपलब्ध नाही. चार्वाकमताची माहिती त्याच्या विरोधकांनी खोडण्यासाठी मांडली त्याच्या आधारेच संकलित करावी लागते. अशा स्थितीत चार्वाकाला पूर्वपक्ष मानणे ही मूदलातच चूक आहे असे हट्ट धरणे किती रास्त आहे ? वैदिक, जैन व बौद्ध मतांच्या अनुयायांनी आपल्या ग्रंथातून चार्वाकाचे उत्तरपक्ष या नात्याने प्रतिपादन करावे अशी का साळुखे यांची अपेक्षा आहे ? माझ्या माहितीप्रमाणे पूर्वपक्ष आपल्या विरोधकांची मते. ती यथावकाश खोडून उत्तर-पक्ष म्हणजेच सिद्धांत मत मांडावयाचे असते. आपटे यांच्या संस्कृत कोशात या संदर्भात लागू होणारा पुढील अर्थ दिला आहे : ‘The first part of an argument, the prima facie argument or view of a question’. केवळ चार्वाक मतच पूर्वपक्ष होते असे नव्हे, तर कोणतेही मत विरोधकांच्या दृष्टीने पूर्वपक्ष आहे. शंकराच्यायांच्या दृष्टीने प्रसंगवशात् मीमांसा, सांख्य, योग, वैशेषिक, न्याय, पाशुपत, जैन, बौद्ध ही सर्वमते पूर्वपक्षे होतात. जैनांच्या दृष्टीने जैन सोडून वरील सर्व मते पूर्वपक्ष होऊ शकतात. अर्थात मतभेद असेल ती सर्व मते पूर्वपक्ष होऊ शकतात. अशा स्थितीत चार्वाक मत केवळ त्यांचे समर्थन करणाऱ्या ग्रंथातच (उत्तरपक्ष) किंवा ‘ सिद्धान्तमत ‘ म्हणून विराजमान होऊ शकते. अन्य पक्षांच्या लेखकांनी त्या मताला पूर्वपक्ष म्हटले म्हणून त्रागा करणे हा बालहट्ट नाही का?
आस्तिक शब्दाचा अर्थ: आपटे यांच्या कोपाप्रमाणे आस्तिक या शब्दाचे पुढील 37ef Stea. (1) One who believes in Godand another world. (2) A heliever in sacred tradition. यावरून (२) देव, (२) परलोक, (३) पवित्र परंपरा या परंपरा यांपैकी एका किंवा अनेक गोष्टींवर विश्वास ठेवणारी व्यक्ती आस्तिक म्हटली जाऊ शकते, चार्वाक किंवा लोकायत यांचा देव आणि परलोकावर विश्वास नाही म्हणून तर त्यांना बुद्धिवादी जगात प्रतिष्ठा आहे. चार्वाकांचा पवित्र परंपरेवर विश्वास आहे हे शब्द कानाला खटकतात. तरीही चार्वाक कोणत्या गोष्टीला पवित्र मानतात आणि त्याच्या दृष्टीने पवित्र परंपरा कोणती हे स्पष्ट झाल्यावर त्यांच्या आस्तिकतंचा पुरावा मिळेल.
देव किंवा परमेश्वर आणि परलोक यांच्यावर श्रद्धा ठेवणारा आस्तिक ही कल्पना खिश्चन आणि मुसलमान या धर्माच्या दृष्टीने ठीक आहे पण भारतीय समाजात मात्र जैन, बौद्ध आणि वैदिक धर्मातील काही पंथ यांमधे परमेश्वराला फारसे स्थान नाही. त्यामुळे परलोकावर विश्वास ठेवणारे व आपापल्या दृष्टीने पवित्र परंपरेवर विश्वास ठेवणारे अशा अनि हे सर्व धर्म किंवा मतप्रणाली आस्तिक ठरतात, या दृष्टीनच ‘ अस्ति नास्ति दिष्टं मतिः ‘ या आस्तिक आणि नास्तिक या शब्दांची सिद्धि करणाऱ्या पाणिनीच्या सूत्राची व्याख्या करताना भट्टोजी दीक्षितांनी ‘अस्ति परलोकः ‘असे मानणारा आस्तिक हे स्पष्ट केले. पण साळुखे यांना हे पसंत नाही. त्यांच्या मते चार्वाक हेच खरे आस्तिक आहेत.
dar ‘चार्वाक हेच खरे आस्तिक आहेत’ असे मत व्यक्त करताना लेखकाच्या मनात आस्तिक म्हणजे चांगले आणि नास्तिक म्हणजे वाईट असा अर्थ पक्का रुजला आहे. त्यामुळे वरील वाक्याचे भाषांतर’चार्वाक हेच खरे चांगले आहेत असे करता येईल. वस्तुतः अशा प्रयत्नांची किंवा हळवेपणाची गरज नाही. अर्वाचीन काळात सामाजिक तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात ‘डावे मत, उजवे मत ‘ किंवा ‘ डावे पक्ष, उजवे पक्ष ‘ असे शब्द योजताना डावा म्हणजे वाईट’ या लाक्षणिक परंतु रूढ अर्थाला न बुजता डाच्या विचारसरणीच्या लोकांनी स्वतःला अभिमानाने डावे म्हणवून घेतले. मग चार्चाकांना नास्तिक म्हणण्याला हरकत कोणती?
चार्वाकांच्या ग्रंथाचा नाश :- डॉ. साळुखे यांना चार्वाकाचे ग्रंथ जाळण्याचा किंवा नष्ट करण्याचा फतवा एका राजाने काढला होता असा पुराणांतरी पुरावा मिळाला आणि त्यांचा आनंद गगनात मावेना. स्वतःला सहिष्णू म्हणविणाऱ्या भारतीयांनी चार्वाकांचे ग्रंथच नष्ट केले की हो ! आता डॉ. साळुखे यांनी असा विचार केला नाही की एखाद्या राजाच्या आज्ञेने ग्रंथ नष्ट होतात का? ग्रंथ नष्ट होण्यास राजाच्या आज्ञेची जरूरी असते का? काही लुप्त झालेले ग्रंथ कसे सापडतात? वस्तुतः ऐतिहासिक काळात सम्राट अशोक, औरंगजेब व इंग्रज यांच्या खेरीज कोणाचीही संपूर्ण भारतावर सत्ता नव्हती. आजही एखाद्या प्रदेशात एखादे मासिक किंवा पुस्तकावर एखाद्या राज्याने बंदी घातली तरी ते पुस्तक नष्ट होत नाही. उदा. सॅटनिक व्हर्सेस, याच्या लेखकाला मारण्याचा फतवा निघाला तरी अद्याप तो जिवंत आहे. ‘ कौटिल्याचे अर्थशास्त्र’ जाळावे असा कोणा राजाचा आदेश असल्याचे ऐकिवात नाही. तरीही हे पुस्तक बराच काल उपलब्ध नव्हते. १९१२ च्या सुमारास केरळमध्ये त्याची एकच प्रत उपलब्ध झाली. हीच गोष्ट भासाच्या नाटकांची. इराकमधल्या मानी या धर्मसंस्थापकाच्या मतांचे समर्थन करणारे काही ग्रंथही नुकतेच उपलब्ध झाले. तुकारामांची गाथाही लुप्त झाली तशीच उपलब्धही झाली, तेव्हा एखाद्या पौराणिक मंत्राचा बाऊ करण्यात काय मतलब?
कृपया माझ्या शंकांचे निरसन व्हावे ही विनंती,
आपला
बा. वा. कोल्हटकर ,नागपूर

श्री. संपादक आजचा सुधारक
आजचा सुधारकच्या एप्रिल १९९१ (वर्ष २ अंक १) ह्या अंकात “धर्मनिरपेक्षताः काही प्रश्न ” ह्या शीर्षकाखाली आपण डॉ. भा. ल. भोळे आणि श्री. वसंत पळशीकर ह्यांनी परिसंवादासाठी तयार केलेली एक प्रश्नावली प्रसिद्ध कली आहे, तीत क्र. ७ च्या प्रश्नात पुढील विधान आढळले:
…. विचाराने निधर्मी असलेल्या सावरकरांनी धर्माधिष्ठित हिंदू राष्ट्रवादाचा आग्रह धरला ….”
धर्मावर (किंवा हिंदू धर्मावर) आधारलेले राज्य किंवा राष्ट्र (theocratic state or nation) असा ह्या वाक्यखंडाचा अर्थ असेल तर तो चूक आहे. सावरकरांनी तसे प्रतिपादन कधीही केले नाही.
सावरकरांचे एकही पान उघडायचे नाही असा एक पुरोगामी ‘दंडक महाराष्ट्रातले अनेक विचारवंत पाळतात असे दिसते. उपर्युक्त लेखकद्वयानेही तो पाळावा हे ओघाने आलेच. मात्र आपण योजिलेल्या परिसंवादाचा अशा गफलतींपासून बचाव व्हावा असे वाटते. तेवढ्यासाठीच हे पत्र लिहिले आहे.
कळावे. ११५२ शुक्रवार,
आपला
स. ह. देशपांडे
सुभाषनगर, पुणे ४११००२

वाचकांचे प्रतिसाद
स. न. वि. वि.
‘नवा सुधारकाचे अंक मला मिळतात. फार आभारी आहे.
विचारप्रसाराचे काम आपण व्रत म्हणून करीत आहात. त्यासाठी आपल्याला आणि आपल्या सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद.
आपला नाशिक – २
वि. वा. शिरवाडकर
प्रिय मित्र प्रा. डी. वाय. देशपांडे
सप्रेम नमस्कार
‘आजचा सुधारक’तुम्ही ज्या रीतीने चालविता त्यामुळे आपली मैत्री दृढतर झाली आहे. एक वर्षाच्या वाटचालीनंतरचे संपादकीय निवेदन हे तुमच्या बौद्धिक निष्ठेचा पुनश्च प्रत्यय आणून देणारे वाटले. ‘ विवेकवाद’ ही लेखमाला पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली पाहिजे.
प्रकृती ठीक आहे ना? सोबत १०० रु. चा चेक पाठवीत आहे. त्याचा स्वीकार व्हावा ही विनंती
आपला
ग. प्र. प्रधान

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.