चार्वाक

संपादक, आजचा सुधारक, यांस,
प्रा. बा. य. देशपांडे यांनी लिहिलेले माझ्या ‘चार्वक दर्शन’ या पुस्तकाचे परीक्षण आणि प्रा. बा. वा. कोल्हटकर यांचे त्यावरचे टिपण प्रसिद्ध केल्याबद्दल मी आपला आणि त्या दोघांचाही अत्यंत आभारी आहे. प्रा. कोल्हटकरांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांविषयीची माझी भूमिका येथे मांडत आहे.
“शंका विचारतो, त्यांचे निरसन व्हावे ही विनंती” इत्यादी प्रकारच्या त्यांच्या भाषेतून एक प्रकारचा विनय सूचित होतो. त्यांच्या प्रत्यक्ष लेखनाचे स्वरूप पाहिले, तर मात्र त्यांनी शंका विचारलेल्या नसून आपल्या आक्षेपांचे खंडन करण्याचे आव्हान दिले आहे असे वाटते. शंका विचारत असल्याचा आभास निर्माण करण्याऐवजी त्यांनी थेट आक्षेपच घेतले असते तर ते प्रामाणिकपणाचे झाले असते. विनयाचा आभास निर्माण करणे, हा खरे तर अविनयाचाच एक प्रकार होय.
प्रा. कोल्हटकरांनी आपले मुद्दे उपस्थित करण्यापूर्वी त्या मुद्द्यांविषयी मी पुस्तकात केलेली सर्व विधाने ध्यानात घेतली असती, तर मला ती विधाने येथे पुन्हा उद्धृत करावी लागली नसती. त्यामुळे अनेकांचे श्रम, वेळ आणि ‘आजचा सुधारक’ ची काही पृष्ठे वाचली असती. आणखी एक गोष्ट-माझ्या पुस्तकात ‘पूर्वपक्ष’ आणि ‘चार्वाकांच्या ग्रंथांचा नाश हे परस्परांशी संबंधित मुद्दे एकापाठोपाठ आले आहेत. ‘आस्तिक’ या शब्दाच्या अर्थाविषयीचा मुद्दा पुढे स्वतंत्रपणे आला आहे. प्रा. कोल्हटकरांनी विशिष्ट चातुर्यान शेवटचा मुद्दा पहिल्या दोन मुद्द्यांच्या मधे आणून त्या दोन मुद्द्यांचा संबंध नसल्याचे भासविले आहे. हे अनुचित आहे. स्वाभाविकच, मी येथील विवेचनात मूळ क्रम स्वीकारणार आहे.
आपटेकोशाचा हवाला देऊन पूर्वपक्षाचे स्वरूप स्पष्ट करताना प्रा. कोल्हटकर म्हणतात, “केवळ चार्वाकमतच पूर्वपक्ष होते असे नव्हे, तर कोणतेही मत विरोधकांच्या दृष्टीने पूर्वपक्ष आहे. शंकराचार्यांच्या दृष्टीने प्रसंगवशात् मीमांसा, सांख्य, योग, वैशेषिक, न्याय, पाशुपत, जैन, बौद्ध ही सर्व मते पूर्वपक्ष होतात. जैनांच्या दृष्टीने जैन सोडून वरील सर्व मते पूर्वपक्ष होऊ शकतात. अशा स्थितीत चार्वाक मत केवळ त्यांचे समर्थन करणाऱ्या ग्रंथातच उत्तरपक्ष किंवा ‘सिद्धांतमत म्हणून विराजमान होऊ शकते. इतर सर्व दर्शनांच्या दृष्टीने चार्वाकदर्शन हे पूर्वपक्ष ठरते, हे प्रा. कोल्हटकरांना यातून सुचवायचे आहे. खरे तर यासाठी त्यांनी हे सगळे लिहिण्याची गरज नव्हती. कारण, दर्शनांच्या क्षेत्रातील ही वस्तुस्थिती मला ज्ञात आणि मान्यही आहे, हे माझ्या पुढील विधानावरून स्पष्ट होते. “वस्तुतः, प्रत्येक दर्शन स्वतःला उत्तरपक्ष वा सिद्धांतपक्ष मानून आपल्या विचारांचे मंडन करते आणि इतर दर्शनांना पूर्वपक्ष मानून त्यांचे खंडन करते.”
प्रा. कोल्हटकरांनी माझ्या या विधानाची दखल घेतलेली नाही. कारण, माझे संपूर्ण पुस्तक तर सोडाच, पण ज्या पहिल्या प्रकरणातील विवेचनाविषयी त्यांनी तथाकथित शंका उपस्थित केल्या आहेत, ते प्रकरणही त्यांनी नीट वाचलेले नाही. शिवाय, माझ्या भूमिकेविषयी लोकांची दिशाभूल करून देण्याची प्रबळ इच्छाही त्यांच्या मनात आहे. या दृष्टीने त्यांची पुढील विधाने तपासून पाहू या, “डॉ. साळुखे यांच्या मते चार्वाकाचे मत सर्वत्र पूर्वपक्ष म्हणूनच मांडण्यात आले आहे, हे त्या मतावर अन्याय करणारे किंवा त्याविषयी गैरसमज पसरविणारे आहे. चार्वाकाला पूर्वपक्ष मानणे ही मुदलातच चूक आहे, असा हट्ट धरणे किती रास्त आहे? वैदिक, जैन व बौद्ध मतांच्या अनुयायांनी आपल्या ग्रंथातून चार्वाकांचे उत्तरपक्ष या नात्याने प्रतिपादन करावे, अशी का साळुखे यांची अपेक्षा आहे?, अन्य पक्षांच्या लेखकांनी त्या मताला पूर्वपक्ष म्हटले म्हणून त्रागा करणे, हा बालहट्ट नाही का?”
वस्तुतः, इतरांनी चार्वाकाला पूर्वपक्ष मानणे योग्य असल्याची माझी भूमिका माझ्या वर उल्लेखिलेल्या विधानातून स्पष्ट झाली आहे. आता हे खरे आहे की चार्वाकाला पुनः पुन्हा पूर्वपक्ष म्हटल्याची वस्तुस्थिती मी आग्रहाने निदर्शनास आणली आहे. परंतु चार्वाकाला पूर्वपक्ष मानणे ही मुदलातच चूक आहे, असे मी म्हटले वा सूचितही केलेले नाही; मग तसा हट्ट धरणे तर दूरच, माझा आक्षेप चार्वाकाला पूर्वपक्ष मानण्यावर मुळीच नाही. कारण चार्वाकाला पूर्वपक्ष मानून त्याचे खंडन करणे, हा त्याच्या विरोधकांचा नुसता हक्कच नव्हे, तर ते त्यांचे कर्तव्यही आहे. चार्वाकाला पूर्वपक्ष मानण्याच्या बाबतीतील माझ्या भूमिकेचे दोन स्पष्ट पैलू पुढीलप्रमाणे सांगता येतीलः (१) पूर्वपक्ष म्हणून चार्वाकाचे खंडन करताना चार्वाकाविषयी योग्य तो आदर बाळगणे दूरच-उलट त्याची हेटाळणी करण्यात आली आहे. तसेच त्याचे म्हणणे विकृत्त स्वरूपातही मांडण्यात आले आहे. (२) काही आधुनिक अपवाद वगळतात चार्वाक कायमचा पूर्वपक्ष म्हणून राहिला, ही पूर्णाशाने स्वाभाविक स्थिती नाही. कोणीतरी जाणीवपूर्वक चार्वाकांचे ग्रंथ नष्ट करणे, हे या स्थितीमागचे किमान एक कारण आहे. या दोन पैलूंपैकी दुसऱ्याचे विवेचन ग्रंथनाशा वरील विवेचनात येणार आहे. म्हणून प्रथम येथे फक्त पहिल्या पैलूचे विवेचन करू या.
माझ्या पुस्तकात मी म्हटले आहे, “चार्वाक हा शब्द कानावर पडला तरी कपाळावर उद्वेगाच्या आठ्या पडाव्यात, इतका हा पूर्वपक्ष तुच्छ, तिरस्करणीय व त्याज्य मानला जात होता. त्याची हेटाळणी केली जात होती. त्याचा स्वीकार म्हणजे अधःपाताला निमंत्रण असे मानले जात होते”.
प्रा. कोल्हटकरांनी ही हेटाळणी व विकृतीकरण यांच्याबद्दल चकार शब्द काढलेला नाही. ही हेटाळणी योग्य आहे असे त्यांना वाटत असेल तर तसे म्हणून त्यासाठी योग्य ते युक्तिवाद त्यांनी करावयास हवे होते. किंवा अशी हेटाळणी करणे गैर आहे असे म्हणण्याचे सुसंस्कृत धैर्य तरी दाखवावयास हवे होते. परंतु असे मुद्द्याला घरून काही लिहिण्याऐवजी चार्वाकाला पूर्वपक्ष मानण्यालाच माझा विरोध आहे अशी दिशाभूल ते करू पहात आहेत. शिवाय माझ्या विवेचनाला बालहट्ट, त्रागा वगैरे म्हणून आपल्या वैचारिक पूर्वजांना साजेशा पद्धतीने माझा उपहास करीत आहेत. अशा विवेचनात ‘बाल हा शब्द ‘अज्ञानी’ या अर्थाचा असतो हे मुद्दाम ध्यानात घ्यायला हवे. तसेच वैदिक वगैरेंनी आपल्या ग्रंथातून उत्तरपक्ष म्हणून चार्वाकांचे प्रतिपादन करण्याची माझी अपेक्षा आहे काय, असे विचारून दर्शनशास्त्राच्या स्वरूपाविषयी मी अनभिज्ञ असल्याचे ते सुचवीत आहेत, चार्वाकांनाही नांगये, मेंढपाळ इ. प्रमाणे मतिमंद म्हणून हिणवण्यात आले होतेच.
येथे आणखी एक गोष्ट ध्यानात घ्यावयास हवी. इतरांना पूर्वपक्ष म्हणणे आणि चार्वाकाला पूर्वपक्ष म्हणणे यात काही फरक आहे. इतरांना दुसऱ्या कोणी पूर्वपक्ष म्हटले एवढ्यावरून त्यांचा टाकाऊपणा सिद्ध होत नाही. कारण ते इतरत्र सिद्धांतपक्ष म्हणून स्वतःचे समर्थन करीत असतात. चार्वाकांना आधुनिक अपवाद वगळता सिद्धांतपक्ष या स्वरूपात पुढे येण्याची संधीच नसल्यामुळे केवळ पूर्वपक्ष म्हटल्यामुळेही ते टाकाऊ आहेत असे घोषित केल्यासारखे होते. ही स्थिती केवळ दर्शनांच्या स्वरूपाशी संबंधित नसून दर्शनबाह्य अशा काही सामाजिक घटनांशी निगडित आहे. आपल्या दर्शनाला विरोधी आहे. या कारणावरून स्वाभाविकपणे एखाद्याला पूर्वपक्ष म्हणणे वेगळे आणि एखाद्यावर कृत्रिम पद्धतीने पूर्वपक्षत्व लादणे वेगळे. यापैकी पहिल्या गोष्टीला माझा विरोध नसून दुसऱ्या गोष्टीला आहे, हे पुस्तकातील माझ्या विवेचनावरून स्पष्ट होते.
मी पुस्तकात म्हटले आहे, “याचा अर्थ सिद्धांतपक्षाच्या स्वरूपातील त्याची मांडणी कोणत्या ना कोणत्या कारणाने लुप्त झाल्यामुळे आज उपलब्ध नाही, इतकेच चार्वाकांनी अशी मांडणी केलेलीच नसती, तर त्याचा दोष त्यांनाच द्यावा लागला असता यात शंका नाही, चार्वाकाच्या विरोधकांनी चार्वाक सिद्धांतपक्ष म्हणून मांडायला हवा होता काय, इ. प्रकारचे उपहासात्मक प्रश्न मग उचितही ठरले असते. परंतु इतिहास वेगळा आहे. चार्वाकांचे किमान काही ग्रंथ मुद्दाम नष्ट करण्यात आले होते. अशा स्थितीत कोल्हटकरांचे वरीलसारखे प्रश्न म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार होय. आधी ग्रंथ नष्ट करायचे आणि मग सिद्धांतमत मांडणारे तुमचे ग्रंथ कोठे आहेत असे विचारायचे हे सरळ दर्शनशास्त्र नव्हे. कुटिल कपटशास्त्र आहे. चार्वाकांनी सिद्धांतपक्ष म्हणून आपल्या दर्शनाची मांडणी केली होती, याचा तूर्त एकच आणि तोही वैदिकांनीच दिलेला पुरावा देतो. भगवान बृहस्पतीने लोकायतक सूत्रे रचली असे श्रीहर्ष या वेदांती पंडिताने आपल्या “खंडनखंडखाद्य” या ग्रंथात निःसंदिग्धपणे म्हटले आहे. चार्वाकांनी लिहिलेले ग्रंथ लुप्त झाले आहेत, हे एवढ्यावरूनही स्पष्ट होते.
आता ग्रंथ कसे लुप्त होतात याविषयी मी माझ्या पुस्तकात पुढील विवेचन केले आहे,”अगदी वाळवी, कसर, पाणी, आनी इ. मुळेही ग्रंथ नष्ट होऊ शकतात. ज्या ग्रंथाचा लोकांवर विशेष प्रभाव पडलेला नसेल, त्या ग्रंथाची लोकांकडून उपेक्षा झाल्यामुळेही ते ग्रंथ लुप्त होऊ शकतात किंवा आपल्या विरोधी मताचे ग्रंथ जाणीवपूर्वक नष्टही केले जाऊ शकतात. आजच्या छपाईच्या काळात छापलेल्या विशिष्ट ग्रंथाच्या सर्व प्रती नष्ट करणे जवळजवळ अशक्य आहे. परंतु प्राचीन काळी विशिष्ट ग्रंथाच्या मोजक्या प्रती नष्ट करण्याचे सोपे काम तशी इच्छा असेल, तर फारसे अवघड नव्हते. चार्वाकांचे ग्रंथ वाळवी-कसरींनी नष्ट केले असतील, लोकांनी विस्मृतीत ढकलले असतील वा स्वतः चार्वाकांनी त्या बाबतीत हलगर्जीपणा केला असेल; या सर्व घटना संभवतात आणि त्या बाबतीत मतभेद होण्याचे कारण नाही. खरा मतभेद आहे तो वैदिकांनी जाणीवपूर्वक त्यांचे निदान काही ग्रंथ नष्ट केले की नाही याबाबतीत”. या विवेचनानंतर एकनाथ व तुकाराम या संतांचे ग्रंथ नष्ट करण्याचा प्रयत्न झाला, या ऐतिहासिक सत्याचा निर्देश करून पुढील वचन उद्धृत केले आहे
नास्तिकस्य च यान्यासन् शास्त्राणि पृथिवीतले ।।
तानि सर्वाणि चिक्षेप जले, ये तदुपासकाः ।
तान् सर्वान् दण्डयित्वा स चकारास्तिकसंमतान् ।।”
(भाषांतरः आणि पृथ्वीतलावर नास्तिकाची जी शास्त्रे होती ती सर्व पाण्यात फेकली. त्यांचे जे उपासक होते, त्या सर्वांना दंड करून त्यांना त्याने आस्तिकसंमत केले.)
माझ्या या विवेचनावर शंका विचारताना प्रा. कोल्हटकर म्हणतात, “डॉ. साळुखे यांना चार्वाकाचे ग्रंथ जाळण्याचा किंवा नष्ट करण्याचा फतवा एका राजाने काढला होता, असा पुराणांतरी पुरावा मिळाला आणि त्यांचा आनंद गगनात मावेना. स्वतःसा सहिष्णू म्हणविणाऱ्या भारतीयांनी चार्वाकांचे ग्रंथच नष्ट केले की हो।” त्यांच्या या लेखनातील ‘त्यांचा आनंद गगनात मावेना,”की हो।’ इ. शब्दसमूहातून त्यांनी केलेला माझा उपहास बाजूला ठेवून फक्त मुद्द्याचे बोलू या. त्या दृष्टीने पाहता त्यांच्या या विधानात अनेक घोटाळे आहेत. ग्रंथ जाळण्याचा फतवा राजाने काढला असल्याचा पुरावा मला मिळाला असे ते म्हणतात. वस्तुतः ग्रंथ जाळण्याचा नव्हे. तर बुडवण्याचा पुरावा मी दिला आहे, हे मी उद्धृत केलेल्या संस्कृत वचनावरून आणि पुस्तकातील विवेचनात बुडविण्याचा उल्लेख मी दोनदा केला आहे, यावरून स्पष्ट होते. प्रा. कोल्हटकरांची ही चूक आशयाच्या दृष्टीने तशी गौण असली, तरी त्यांनी माझी विधाने काळजीपूर्वक वाचलेली नाहीत, हे त्यांच्या या चुकीवरून पुन्हा एकदा स्पष्ट होते.
एका राजाने फतवा काढला होता, असे प्रा. कोल्हटकर म्हणतात. माझ्या माहितीप्रमाणे प्रा. कोल्हटकर हे संस्कृत विषयाचे एक ज्येष्ठ प्राध्यापक आहेत. मूळ संस्कृत वचनात वा माझ्या विवेचनात फतव्याचा उल्लेख नसून नास्तिकाची शास्त्रे पाण्यात फेकल्याचा म्हणजे फतवा असलाच तर त्याच्या अंमलबजावणीचा उल्लेख आहे, हे त्यांना सहज समजू शकते. याचा अर्थ नुसता फतवा काढल्याचे सांगून प्रत्यक्ष ग्रंथ बुडवले नव्हतेच, असे ते सुचवत आहेत आणि वाचकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पुढची गोष्ट म्हणजे मी दिलेला पुरावा न्यायवार्तिकांच्या भूमिकेतील असल्याचे पुस्तकात स्पष्टपणे लिहिले असतांना प्रा. कोल्हटकर मला तो “पुराणांतरी”सापडल्याचे सांगत आहे. हे त्यांनी अनवधानाने केले आहे असेही नाही. कारण हा पुरावा पुराणातील आहे असे म्हटल्यामुळे तो अविश्वसनीय आहे, असे त्यांना वाचकांच्या मनावर बिंबवायचे आहे. चार्वाकांच्या विरोधकांना चार्वाकांनी विटंबना करताना मात्र पुराणांतले पुरावे चालतात. शिवाय आधुनिक काळात पाश्चात्यांनी लावलेले शोध आमच्या पूर्वजांनी लावले होतेच असे दाखविताना कुठल्याही ग्रंथातले अत्यंत अस्पष्ट व संदिग्ध पुरावेही यांना चालतात. आणि मी दिलेला पुरावा म्हणे पुराणांतरीचा ! ठीक आहे. पुराणांतरीचा तर पुराणांतरीचा, तो पुरावा काही मी अथवा कोणा चार्वाकाने निर्माण केलेला नाही. तो वैदिकांनी अभिमानाने दिलेल्या त्यांच्या ग्रंथातीलच आहे. वस्तुतः, मूळ पुराव्यात सर्व ग्रंथ पाण्यात बुडवल्याचा उल्लेख आहे. तरीही, वैदिकांनी जाणीवपूर्वक निदान काही ग्रंथ नष्ट केले की नाही, असा माफक मुद्दा उपस्थित करून मी विवेचन केले आहे. त्या पुराव्यामुळे माझा आनंद गगनात मावेना, असे कुत्सितपणाने म्हणण्याइतका प्रमाणशीरतेचा अभाव असलेली माझी कोणती विधाने प्रा. कोल्हटकरांना आढळली? आणि तसेच म्हणायचे, तर असा पुरावा मिळाल्यामुळे संशोधकाला यथोचित आनंद वाटण्यात गैर तरी काय आहे ?
परंतु खरा मुद्दा वेगळाच आहे. मी जो काही बरावाईट पुरावा दिला आहे, त्याच्या स्वरूपाविषयी तुम्ही काहीच बोलत नाही. तो खोटा, बनावट आहे म्हणा. त्याच्यातून असा निष्कर्ष निघत नाही म्हणा. मुद्द्याला धरून त्याचे काही खंडन करा. आक्षेप घ्या. अशा मुद्देसुद विवेचनाबरोबर आलेला शैलीदार उपहास केवळ क्षम्यच नव्हे, तर विवेचनाला जिवंतपणा आणण्यासाठी आवश्यकहीं मानता येईल. परंतु मुद्दा टाळण्यासाठी आणि दिशाभूल करण्यासाठी केलेल्या उपहासाने हाती काय लागणार आहे?
मी कोणकोणत्या प्रश्नांचा विचार केला नाही, त्याची एक यादी प्रा. कोल्हटकरांनी दिली आहे. ‘एखाद्या राजाच्या आज्ञेने ग्रंथ नष्ट होतात का, असे ते विचारतात. ग्रंथ नष्ट होण्याच्या संभाव्य अशा अनेक कारणांपैकी हेही एक कारण जरूर असू शकते. पूर्वीच्या काळी हस्तलिखिताच्या स्वरूपातील पुस्तकाच्या मोजक्या प्रती नष्ट करणे एखाद्याची इच्छा असेल तर शक्य होते, हे मी स्पष्टपणे सांगितले असताना १० कोल्हटकरांनी पुन्हा तेच विचारण्यात काय हशील आहे? त्यांना ते चुकीचे वाटत असेल तर राजाच्या आज्ञेने ग्रंथ नष्ट होऊ शकत नाहीत, हे सिद्ध करणारे युक्तिवाद त्यांनी करावयास हवेत. या संदर्भात ‘आजही असे म्हणून त्यांनी दिलेले ‘सटॅनिक व्हर्सेसचे उदाहरण त्यांच्यापेक्षा माझ्या मताला अधिक पोषक आहे. कारण, आधुनिक काळात छापलेल्या पुस्तकाच्या सर्व प्रती नष्ट करणे जवळजवळ अशक्य आहे, हे मी स्पष्टपणे लिहिले आहेच,
या पुस्तकाच्या लेखकाला मारण्याचा फतवा निघाला तरी अद्याप तो जिवंत आहे, हे विधान त्यांनी काय सिद्ध करण्याकरता केले आहे, हे मला कळले नाही. काही चार्वाक अनुयायांना मारल्याचे मी जे पुरावे दिले आहेत, ते खोटे पाडण्यासाठी जर त्यांनी असे म्हटले असले, तर ते व्यर्थ आहे. एका विशिष्ट पुस्तकाचा लेखक जिवंत आहे, याचा अर्थ विरोधी विचाराचे लोक जगात मारले जात नसतात, असे नव्हे. त्या पुस्तकाच्या दोन भाषांतरकारांची नुकतीच हत्या झालीही आहे. पाश्चात्यांनी सॉक्रेटीस, ब्रूनो, केनेडी बंधू इत्यादींना मारले आहे. आधुनिक भारताचा इतिहास तर ताजा आहे. तेव्हा चार्वाक अनुयायी मारले गेले नव्हते, असे कोणी म्हणू शकत नाही.
एखाद्या राजाने चार्वाकांचे ग्रंथ नष्ट केले असण्याची शक्यता नाही हे दर्शविण्यासाठी प्रा. कोल्हटकर म्हणतात, “ऐतिहासिक काळात सम्राट अशोक, औरंगजेब व इंग्रज यांच्याखेरीज कोणाचीही संपूर्ण भारतावर सत्ता नव्हती.” खरे तर त्यांचीही संपूर्ण भारतावर सत्ता नव्हती. अगदी इंग्रजांचीही गोवा, पाँडिचेरी इ. ठिकाणी सत्ता नव्हती. पण मुद्दा तो नाही. मुद्द्याची गोष्ट अशी आहे- मी दिलेल्या पुराव्यातून मी दोन निष्कर्ष काढले आहेत.१९ (१) वैदिकांनी जाणीवपूर्वक चार्वाकांचे निदान काही ग्रंथ नष्ट केले. (२) विरोधकांचे ग्रंथ नष्ट करण्याची असहिष्णता त्यांनी दर्शविली. याचा अर्थ चार्वाकांचे सर्व ग्रंथ राजांच्या अज्ञेनेच नष्ट झाले, असे मुळी मी म्हटलेलेच नाही. आता चार्वाकांचे काही ग्रंथ नष्ट करण्यासाठी कोणा राजाची संपूर्ण भारतावर सत्ता असण्याची गरजच नव्हती. एखाद्या छोट्याशा प्रदेशावर राज्य करणारा राजाच काय, पण पुरोहित, सरदार, पुढारी वगैरेसारखी एखादी त्या मानाने गौण व्यक्ती वा त्यांचा गटही हे करू शकत होता. शिवाय, चार्वाकाच्या विरोधकांची सांस्कृतिक सत्ता प्रदीर्घ काळपर्यंत जवळजवळ भारतभर असल्यामुळे ती सत्ता इच्छा असल्यास विशिष्ट ग्रंथ नष्ट करू शकत होती. आता त्या प्रकारची जी एक का होईना घटना घडल्याचा मी पुरावा दिला आहे, ती घटना निषेधार्ह आहे असे म्हणण्याऐवजी उगाच फाटे फोडण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा ती घटना एक तर अभिमानाचीच वाटत असली पाहिजे, किंवा ती अनुचित वाटण्यासाठी आवश्यक ती संवेदनशीलता नसली पाहिजे, हे स्पष्ट आहे. ग्रंथ नष्ट होण्यास राजाच्या आज्ञेची जरूरी असते का, असा एक प्रश्न त्यांनी विचारला आहे. एक तर अशी जरूरी असते असे मी कोठेही म्हटलेले नाही. आणि दुसरे म्हणजे ग्रंथ नष्ट होण्याचे इतर अनेक मार्ग स्वतः मीच निर्दिष्ट केले आहेत. तेव्हा त्यांचा हा प्रश्नच अनाठायी आहे. काही लुप्त झालेले ग्रंथ कसे सापडतात, असेही त्यांनी विचारले आहे. याचे उत्तर स्पष्ट आहे. लुप्त झालेल्या ग्रंथाच्या सर्व प्रती विस्मृती, वाळवी, पाणी, अग्नी इत्यादीपेकी एका वा अनेक कारणांनी कायमच्या नष्ट झाल्या वा केल्या गेल्या असतील, तर तो ग्रंथ सापडणार नाही. या सगळ्यातून कोणी एखादी का होईना प्रत कंठस्थ करून वा अशाच एखाद्या मागनि वाचवली असेल, तर तो ग्रंथ सापडू शकतो.
प्रा. कोल्हटकर म्हणतात, ” ‘कौटिल्याचे अर्थशास्त्र जाळावे असा कोणा राजाचा आदेश असल्याचे ऐकिवात नाही. तरीही हे पुस्तक बराच काल उपलब्ध नव्हते.” वस्तुतः, राजाच्या आदेश ने ग्रंथ नष्ट करण्यात आल्याचा एक पुरावा मी दिला, याचा अर्थ ग्रंथ लुप्त होण्याच्या सर्व घटना राजाच्या आज्ञेनेच होत असतात, असे नव्हे. माझ्या पुस्तकातील विवेचनाचा आशय मुळीच तसा नाही. तेव्हा प्रा. कोल्हटकरांचा हा मुद्दाच अनाठायी आहे.
असे असले तरी कौटिलीय अर्थशास्त्र लुप्त होण्याचा आणि वैदिकांच्या चार्वाकांविषयीच्या दृष्टिकोणाचा विशिष्ट संबंध असल्यामुळे मी त्याचे थोडे विवेचन येथे करीत आहे. अर्थशास्त्रातील विद्याविषयक विवेचनाचे पुढील भाषांतर मी माझ्या पुस्तकात उद्धृत केले आहे. “सांख्य, योग व लोकायत म्हणजे आन्वीक्षिकी होय. त्रयीमध्ये धर्म व अधर्म यांचे, वार्तेमध्ये अर्थ व अनर्थ यांचे आणि दंडनीतीमध्ये नय व अपनय यांचे विवेचन असते. आन्वीक्षिकी ही तकांच्या द्वारे त्रयी, वार्ता आणि दंडनीती या विद्यांच्या बलाबलांचे अन्वीक्षण करते. त्यामुळे ती लोकांच्या दृष्टीने उपकारक ठरते. आपत्तीच्या व संपत्तीच्या काळी लोकांची बुद्धी स्थिर ठेवते. तसेच, लोकांना प्रज्ञा, भाषा आणि क्रिया यांच्या बाबतीत नैपुण्य प्राप्त करून देते. त्यामुळे आन्वीक्षिकी ही नेहमीच सर्व विद्यांच्या दृष्टीने प्रदीप ठरते, सर्व कर्माचे साधन ठरते आणि सर्व धर्माचे (कर्तव्यांचे वा नियमांचे) आश्नयस्थान ठरते.”१२ लोकायताचा अंतर्भाव असलेल्या आन्वीक्षिकीला सर्व विद्यांचा प्रदीप वगैरे म्हणणारा ग्रंथ लुप्त झाला. वैदिकांना चार्वाकाचा हा गौरव मुळीच आवडला नाही, हे या लप्त होण्यामागचे एक महत्त्वाचे कारण असले पाहिजे यात मुळीच शंका नाही. त्याबरोबरच, सर्व दुष्ट प्रयत्नांना न जुमानता हा ग्रंथ कोणी तरी जपून ठेवला, म्हणून तो पुन्हा उपलब्ध झाला.
हीच गोष्ट भासाच्या नाटकांची असे प्रा. कोल्हटकर पुढे म्हणतात. मीही माझ्या बाजूने तेच म्हणतो. मात्र विस्तारभयास्तव मी येथे माझ्या भूमिकेचा फक्त संक्षेपाने निर्देश करतो. कौटिल्याच्या अर्थशास्त्राप्रमाणेच भासाच्या नाटकांतूनही वैदिकांना मुळीच न मानवणारा बराच भाग होता. प्रतिमा’ नाटकात त्याने केलेले कैकेयीचे समर्थन आणि ऊरुभंगातील दुर्योधनाचे त्याने केलेले चित्रण यांचा तूर्त मी फक्त निर्देश करून ठेवतो. राजशेखराने म्हटले आहे
“भासनाटकचनेऽपि छैकेः क्षिप्ते परीक्षितुम् । स्वप्नवासवदत्तस्य दाहको भून्न पावकः ।। १३
(भाषांतर – विद्वानांनी परीक्षा घेण्यासाठी भासाचे नाटकचक्र (अग्नीत) टाकले असता अग्नीने स्वप्नवासवदत्त जाळले नाही.) बुद्धीच्या आधारे नाटकांची परीक्षा घेण्याऐवजी अशा प्रकारे नाटके अग्नीत टाकून त्यांची परीक्षा घ्यावी, असे परीक्षकांना का बरे वाटले? परंतु तूर्त यावर भाष्य न करता मी एवढा माफक निष्कर्ष मांडतो की भासाची नाटके जाळून नष्ट करण्याचा काही प्रयत्न या देशात नक्की झाला होता.
तुकारामांची गाथाही लुप्त झाली, तशीच उपलब्धही झाली, असे प्रा. कोल्हटकर सहजपणे म्हणतात. छान ! जणू काही ती आपोआप लुप्त झाली आणि पुन्हा आपोआप उपलब्ध झाली | सामाजिक इतिहासाविषयी अज्ञानी असलेला मनुष्य तरी असे लिहील किंवा धूर्तपणे इतिहास लपवू पाहणारा मनुष्य तरी. वस्तुतः तुकारामांची गाथा सनातन्यांनी बुडवण्याचा प्रयत्न केला हा इतिहास जगजाहीर आहे. चार्वाकांना विरोध करणारांची आणि तुकारामांना छळणाऱ्या व त्याचे ग्रंथ बुडवणाऱ्या लोकांची वैचारिक नाळ अनेक दृष्टींनी एकच आहे. खरे तर प्रा. कोल्हटकरांची वैचारिक नाळही त्यांच्याशीच आहे. याउलट तुकारामांची गाथा उपलब्ध झाली तेही प्रसिद्ध आहे. व्यावहारिक दृष्ट्या भोळ्या-भावळ्या, परंतु चांगल्या-वाईटाचा निवाडा करण्याच्या बाबतीत विवेकी असलेल्या येथील सर्वसामान्य माणसांनी एक एक अभंग केवळ कंठाने नव्हे, तर हृदयाने जपला, म्हणून ही गाथा उपलब्ध झाली.
तुकारामांची गाथा कशी उपलब्ध झाली, हे प्रा. कोल्हटकरांना खरोखरचं जाणून घ्यायचे असेल, तर या सामान्य माणसांनी तुकारामांवर किती उत्कट प्रेम केले आहे, ते त्यांना समजून घ्यावे लागेल. सनातन्यांना मुळातच दूरचे असलेले तुकाराम आणि सनातन्यांनी भ्रामक धर्ममूल्यांच्या आधारे दूर ढकलून दिलेले ज्ञानेश्वर हे येथील सामान्यांचा जीव की प्राण होते. आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील कोणत्याही खेड्यात प्रा. कोल्हटकरांनी जावे, त्यांना तेथे दहा वीस घरांतून तुका आणि ज्ञान आढळतील. निवृत्ती, सोपान, मुक्ता आणि एकनाथही आढळतील. त्यानंतर त्यांनी ज्ञानेश्वरांपासूनचा सातशे आणि तुकारामांपासूनचा साडेतीनशे वर्षांचा इतिहास तपासून किती सनातन्यांनी ज्ञानेश्वर व तुकाराम या आपल्या लाडक्या आणि महान संतांची नावे आपल्या मुलांना दिली, त्याचा शोध घ्यावा. मग त्यांच्या ध्यानात येईल की तुकारामांचा ग्रंथ लुप्त करू पाहणारे वेगळे होते आणि त्या लोकांच्या प्रयत्नांना न जुमानता तो ग्रंथ जपू पाहणारे वेगळे होते.
इराकमध्ये उपलब्ध झालेल्या ग्रंथाविषयी तेथील ऐतिहासिक, सामाजिक इ. प्रकारच्या पाश्वभूमीचा माझा आज अखेर तरी अभ्यास नसल्यामुळे या संबंधातील प्रा. कोल्हटकरांच्या विधानावर मी भाष्य करू शकत नाही. परंतु त्यामुळे ग्रंथनाशाविषयीच्या आतापर्यंतच्या विवेचनाला बाधा येणार नाही, असा माझा विश्वास आहे.
मला सापडलेला एक पुरावा मी दिला आणि त्यावरून अगदी माफक निष्कर्ष काढला, तर हे म्हणतात, “एखाद्या पौराणिक मंत्राचा बाऊ करण्यात काय मतलब?” ज्याला बाऊ म्हणता येईल, असे माझे कोणते विधान यांना आढळले? यांना न आवडणारा पुरावा कोणी द्यायचाच नाही काय? आणि ‘एखाद्या श्लोकाचा पुरावा असला, तरी त्याचे महत्त्व कमी का बरे मानावे? एखाद्याची हत्या वगैरे झालेली असते, तेव्हा गुन्हेगाराने पुराव्यांचे डोंगर मागे ठेवून दिलेले नसतात. अनवधानाने राहिलेला एखादा छोटासा पुरावाही त्याचा गुन्हा सिद्ध करायला पुरेसा असतो. तेव्हा मला सापडलेला एक श्लोकही वैदिकांची मनोवृत्ती आणि त्यांचे वर्तन यांवर प्रकाश टाकण्यासाठी पुरेसा आहे. प्रत्यक्षात मी एकापेक्षा अधिक श्लोकांचा आशय दिला आहे ही गोष्ट अलाहिदा । आणखी एक. ज्यांना तुम्ही तत्त्वतः वैदिक मंत्रांचा अधिकार देतच नाही आणि ज्यांना केवळ पौराणिक मंत्रांचाच अधिकार आहे असे मानता, त्यांच्यापैकी कोणी एखाद्या तथाकथित पौराणिक मंत्राचा बाऊ केला, असा बाऊ तुम्ही करण्यात तरी काय मतलब, प्रा. कोल्हटकर?
‘आस्तिक शब्दाच्या अर्थाचे विवेचन करताना प्रा. कोल्हटकरांनी प्रथम आपटेकोशाच्या आधारे त्या शब्दाचे अर्थ स्पष्ट केले आहेत, आपटेकोशातील एक अर्थ ‘पवित्र परंपरेवर विश्वास ठेवणारा असा आहे, हे सांगून ते म्हणतात, “चार्वाकांचा पवित्र परंपरेवर विश्वास आहे, हे शब्द कानाला खटकतात. तरीही चार्वाक कोणत्या गोष्टीला पवित्र मानतात आणि त्यांच्या दृष्टीने पवित्र परंपरा कोणती, हे स्पष्ट झाल्यावर त्यांच्या आस्तिकतेचा पुरावा मिळेल.”
वस्तुतः चार्वाकांना कोणत्या रूढ अर्थानी नास्तिक म्हटले जाते आणि कोणत्या विशिष्ट परिस्थितीत त्यांना आस्तिक म्हणणे इष्ट ठरेल, याचे निःसंदिग्ध विवेचन मी पुस्तकात केले आहे.” मी कोणत्याही रूढ अथनि त्यांना आस्तिक म्हणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तेव्हा प्रा. कोल्हटकरांनी आपटेकोशाचा हवाला देणे आणि चार्वाकांची पवित्र परंपरा विचारून त्यांच्या आस्तिकतेचे स्वरूप ठरवू पाहणे हे गैरलागू आहे. खरे तर त्यांचे हे विवेचन पाहता, त्यांनी माझ्या पुस्तकातील संबंधित भाग नीट वाचलेला नाही आणि तो समजून घेण्याची तसदी तर थोडीशीही घेतलेली नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट होऊन जाते. आणखी एक-नव्या संशोधनांची-निदान नव्या मतांची (कारण माझी मते ही त्यांना संशोधन वाटणार नाहीत) नोंद जुन्या कोशांतून शोधायची नसते; ज्ञानावर प्रेम करणारांनी स्वतःच ती नव्या कोशांतून शन्दबद्ध करायची असते.
चार्वाकांनी काल्पनिक ईश्वर, मृत्यूनंतर जीवाला मिळणारा परलोक, देहभिन्न आत्मा, चिकित्सा न करता स्वीकारले जाणारे वेदप्रामाण्य, इ. नाकारले. आता चार्वाकांना केवळ ईश्वरादि नाकारणारे या अनि नास्तिक म्हटले गेले असते, तर मला हे विवेचन बहुधा करावेच लागले नसते. परंतु ‘मानवी मूल्ये नाकारणारे’ याही अर्थाने चार्वाकांना नास्तिक म्हणण्याची पद्धत स्वीकारली गेल्यामुळे मला पुस्तकात ‘आस्तिक’ व ‘नास्तिक’ या शब्दांच्या पारिभाषिक अथनि विवेचन उपस्थित करणे भाग पडते. प्रचाराच्या जोरावर ‘नास्तिक या शब्दाचा चारित्र्यहीन, नीतिहीन, कामांध, दुराचरणी, स्वार्थी – थोडक्यात म्हणजे जे जे चांगले ते ते नाकारणारा, असा अर्थ रूढ करण्यात आला. त्यामुळे नास्तिक म्हणजे समाजद्रोही अशी प्रतिमा निर्माण करण्यात आली. चार्वाक हे ‘निरीश्वर’ वगैरे अनि जरूर नास्तिक आहेत.
पण क्षेष्ठ मानवी मूल्ये नाकारणारे समाजद्रोही, या अनि ते मुळीच नास्तिक नाहीत. मानवी मूल्ये मानणे – न मानणे हा निकष लावून आस्तिक – नास्तिक ही विशेषणे लावायची, तर चार्वाकांना आस्तिक म्हणावे लागेल. अर्थात, तुम्ही शब्द कोणता वापरता, हे महत्त्वाचे नाही. तुम्ही त्या शब्दाद्वारे कोणता अर्थ देता, हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे “माझ्या मनात आस्तिक म्हणजे चांगले आणि नास्तिक म्हणजे वाईट, असा अर्था पक्का रुजला आहे”, असे जे प्रा. कोल्हटकर म्हणतात, ते स्वाभाविकच गतार्थ ठरते.
शिवाय माझ्या कोणत्याही विधानातून असा अर्थ माझ्या मनात रूजला असल्याचे व्यक्तही होत नाही. वस्तुतः, शब्दाचा पारिभाषिक अर्थ एक आणि वापर दुसऱ्याच अनि, या दुटप्पी नीतीला माझा विरोध आहे. तुम्ही शब्दांचे अर्थ निश्चित करून ते तसेच वापराल, तेव्हा चार्वाक हे चांगले असल्याचे आपोआपच स्पष्ट होईल- मग त्यांना आस्तिक म्हणा, वा नास्तिक म्हणा ! कारण केवळ ‘आस्तिक या शब्दाचा आधार घेऊन नव्हे, तर चार्वाकांनी स्वीकारलेल्या जीवनमूल्यांच्या आधारे चार्वाक चांगले असल्याचे मी दाखवून दिले आहे, हे माझ्या पुस्तकातील समग्र विवेचनावरून स्पष्ट होईल. यात प्रा. कोल्हटकर म्हणतात तसा हळवेपणा वगैरे मुळीच नाही. ही पारिभाषिक शब्दांच्या स्वरूपाविषयीची वस्तुस्थिती आहे.
यातूनही आपटेकोशाच्या आधारेच चार्वाकाची आस्तिकता तपासून घ्यायची असेल, तर प्रा. कोल्हटकरांनी चार्वाक कोणती गोष्ट पवित्र मानतात, एवढेच विचारून थांबू नये. चार्वाकाचा ईश्वर वगैरे कोणता, असेही विचारावे. लोकसिद्ध राजा हाच ईश्वर, चेतन देह हाच आत्मा, आनंदमय इहलोक हाच स्वर्ग वा परलोक (उत्तमलोक), स्वातंत्र्य हाच मोक्ष, हे चार्वाकाचे काही सिद्धांत होत. याचे बरेच विवेचन पुस्तकाच्या ४ थ्या प्रकरणात व विशेषतः त्याच्या शेवटच्या परिच्छेदात मी केले आहे. परंतु इतक्या पुढच्या प्रकरणातील विवेचनाकडे लक्ष न जाण्यामागची प्रा. कोल्हटकरांची अडचण मी समजू शकतो. तात्पर्य चाकोरीबद्ध विचारांची सवय असणारासाठी चार्वाक हे ईश्वरवादी, आत्मवादी, स्वर्गवादी, मोक्षवादी व म्हणून आस्तिक होते, असे उत्तर देता येईल. स्वातंत्र्यरूपी मोक्ष वगैरे गोष्टींना ते पवित्र मानत होते, असे म्हणता येईल. आणि, तुम्ही ज्याला ईश्वर, पवित्र गोष्ट वगैरे मानता, त्यालाच इतरांनीही ईश्वर पवित्र गोष्ट वगैरे मानावे असा काही सृष्टीचा नैसर्गिक नियम नाही.
” डावा म्हणजे ‘वाईट’ या लाक्षणिक परंतु रूढ अर्थाला न बुजता डाव्या विचारसरणीच्या लोकांनी स्वतःला अभिमानाने डावे म्हणवून घेतले”, असे प्रा. कोल्हटकर म्हणतात. येथे मुख्य मुद्द्याकडे वळण्यापूर्वी एक किरकोळ बाब, मराठीमध्ये लाक्षणिक हे विशेषण ‘अर्थी लाही लावले तर बिघडत नाही, हे खरे. परंतु संस्कृत काव्यशास्त्राप्रमाणे शब्द ‘लाक्षणिक असू शकतो आणि अर्थ मात्र लक्ष्य असू शकतो, ‘लाक्षणिक’ नव्हे. १ अर्थात, असल्या परंपरांना चिकटून बसाव, असे मी मुळीच मानत नाही. शब्द आणि अर्थ यांचे नाते प्रवाहशील असावे, असेच मी मानतो. म्हणून तर मी चार्वाकांना विशिष्ट परिस्थितीत ‘आस्तिक म्हणणे योग्य ठरेल, असे म्हणतो. परंतु आपटेकोशातील अर्थावरून चार्वाकाची पवित्र परंपरा कोणती असा प्रश्न विचारणाऱ्या परंपरानिष्ठांनी ‘लाक्षणिक’ वगैरे संज्ञांचा प्रयोग काव्यशास्त्राच्या संस्कृत परंपरेला अनुसरूनच करणे इष्ट ठरले असते.
आता त्यांच्या मुख्य मुद्द्याकडे वळू या.
डाध्यांनी अशुभ, वाईट इत्यादी अर्थांनी डावा हा शब्द स्वतःला अभिमानाने लावून घेतलेला नाही; पुरोगामी, आधुनिक मूल्ये मानणारा, बुरसटलेल्या विचारांना विरोध करणारा इत्यादी अथांनी त्यांनी तो शब्द स्वतःला लावून घेतला आहे, याची प्रा. कोल्हटकरांनी दखल घ्यायला हवी. म्हणजे शब्दावरून अर्थ कोणता घेता, यालाच महत्त्व आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट होते. प्रा. कोल्हटकर म्हणतात, “मग चार्वाकांना नास्तिक म्हणायला हरकत कोणती?” या प्रश्नाला “मग चार्वाकांना आस्तिक म्हणायला हरकत कोणती?” या प्रतिप्रश्नाने मी उत्तर देऊ शकतो. कारण जे आहे ते आहे असे म्हणणारा तो आस्तिक आणि जे आहे ते नाही असे म्हणणारा तो नास्तिक, असे अर्थ घेण्यास हरकत का असावीं परंतु बाळबोध उत्तरच द्यायचे तर असे म्हणता येईल-निरीश्वरवादी वगैरे अनि चार्वाकांना नास्तिक म्हण्यास माझी विशेष हरकत नाही, परंतु मानवी मूल्ये नाकारणारे या अनि त्यांना तो शब्द लावण्यास माझी जरूर हरकत आहे.
मी माझ्या पुस्तकात चार्वाकदर्शन सिद्धांतपक्षाच्या स्वरूपात मांडण्याचा यथामति प्रयत्न केला आहे. या संदर्भातील माझे लेखन वाचून त्यावर आक्षेप घेण्याऐवजी, आक्षेप घ्यायचे असे प्रा. कोल्हटकरांनी आधीच ठरविले आणि मग माझे लेखन चाळले. अशा रीतीने चार्वाकांविषयीच्या वैदिकांच्या भूमिकेची परंपरा त्यांनी याही बाबतीत निष्ठेने पाळली, याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करून एक विनंती करतो- माझ्या पुस्तकाचे चाळलेले पहिले प्रकरण त्यांनी आता ‘वाचावे, नंतरची न वाचलेलीन चाळलेली इतर प्रकरणेही ‘वाचावीत आणि या पूर्वपक्षाचे पुन्हा एकदा खंडन करून स्थूणानिखननन्यायाने (खुंटा हलवून बळकट करण्याच्या न्यायाने) आपला उत्तरपक्ष शक्यतो स्वतंत्र पुस्तकाच्या रूपाने प्रस्थापित करावा. माझी मांडणी तेवढ्या लायकीची नाही, असे ते जरूर म्हणू शकतात. तरीही असा उत्तरपक्ष प्रस्थापित करण्यासाठी माझ्या त्यांना हार्दिक शुभेच्छा.
आ. ह. साळुखे
संदर्भ :
१. ‘चार्वाक दर्शन , (प्र. केशव गोरे स्मारक ट्रस्ट, मुंबई: दुसरी आवृत्ती, ऑगस्ट १९८७.)
२. पृ.२, ३. पृ. २.४. पृ. २, ५. पृ. ३-४, ६. पृ. ४, ८. पृ. ४, ८.पृ.४; ९.पृ.
३; १०. पृ. ४-५, ११. पृ. ३३.
मूळ कौटिलीय अर्थशास्त्र -१.२.१०-१२; १२.
‘स्वप्नवासवदत्त’, संपा. मंगरूळकर, हातवळणे, माईणकर, प्रका, देशमुख आणि कंपनी, पुणे, पहिली आवृत्ती, १९५७, ‘अभ्यास हे परिशिष्ट, पृ.२, १४.पृ. १६-१९; १५. मम्मटकृत काव्यप्रकाश, द्वितीय उल्लास, श्लो. क्र. १ आणि ९.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.