भाषा, वर्ण, इत्यादींची दैवी (?) उपपत्ती

भाषा, वर्ण, इत्यादींची दैवी (?) उपपत्ती
इतिहासाचार्य वि.का. राजवाडे
एणेप्रमाणे (१) ध्वनीपासून भाषा, (२) रंगीत किंवा साध्या रेखाचित्रांपासून अक्षरमालिका, (३) नैसर्गिक हावभावांपासून कृत्रिम अभिनय, व (४) पाहिलेल्या आकृतींपासून बनावट भांडी-अशा चार कृत्रिम व्यावहारिक कला मनुष्याने आपल्या अकलेने संपादन केल्या. शेकडो टक्के टोपणे खाऊन व हजारो प्रयोगांत फसून मनुष्याला या चार नित्योपयोगी कला परम कष्टाने व निढळाच्या घामाने साध्य झाल्या. कोण्या काल्पनिक स्वर्गात किंवा नरकात राहणाऱ्या देवासुरानी दिल्या अशातला बिलकूल भाग नाही. शंकराच्या डमरूतून ध्वनी निघाले, चित्रलेखानामक गंधर्वकन्येने चित्रे काढण्याचे कसब शिकविले, कोण्या किन्नराने अभिनय पढविला, किंवा विश्वकम्यनि भांडी बनविण्याचा धडा घालून दिला वगैरे बोलणी केवळ भाकडकथा होत. या सर्व भाकडकथांचा अर्थ इतकाच आहे की भाषा, अक्षरमालिका, अभिनय व भांडी निर्माण करण्याची परंपरा काय आहे याचा ऐतिहासिक उलगडा करण्याचे ज्ञान परवापर्यंत भारतीय मनुष्यांत नव्हते. ज्या बाबींचा उगम, घटना, वृद्धी व परिणती कळत नव्हत्या त्या बाबी कोण्यातरी दैवी शक्तीच्या प्रसादाने प्राप्त झाल्या असा तर्क अज्ञ मनुष्य सदैव व सर्वत्र लावीत असलेला दृष्टीस पडतो. हे सर्व आपलेच स्वतःचे कर्तृत्व आहे, हा शोध मनुष्याला परम कष्टाने लागलेला आहे. आता शंकराच्या डमरूचे किंवा देवांच्या विश्वकाचे किंवा वागधिष्ठात्र्या सरस्वतीचे किंवा पशुपक्ष्यांचे नामकरण करणाऱ्या नोहाचे दैवी अनि काही एक प्रयोजन उरलेले नाही.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.