आजचा सुधारकः वाचक मेळावा

‘आजचा सुधारक एक वर्षाचा झाला तेव्हापासून एखादा वाचक मेळावा घ्यायचे वाटत होते. नागपूरच्या वसंतराव नाईक कला व समाजविज्ञान संस्थेच्या (जुने मॉरिस कॉलेज) राज्यशास्त्रविभागाच्या पुढाकाराने ती कल्पना साकार झाली, “धर्मनिरपेक्षता, विवेकवाद आणि आजचे सुधारक’ या विषयावर एक परिचर्चा उपर्युक्त संस्थेचे राज्यशास्त्रविभागप्रमुख प्रा. कवठाळकर यांनी १४ सप्टेबर १९९१ रोजी घडवून आणली. या चर्चेसाठी शहरातील विविध क्षेत्रांशी संबंधित विचारवंत, सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक, धर्मशास्त्राचे अभ्यासक, व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर आमंत्रित केले होते. योगायोगाने प्रसिद्ध विचारवंत श्री. वसंत पळशीकर नागपुरात मुक्कामाला होते. त्यांच्याही उपस्थितीचा आम्ही लाभ घेतला. या सर्वांनी ‘आजचा सुधारक मधून गेले वर्ष-दीड वर्ष जे विचारमंथन होत आहे त्यावर साधकबाधक चर्चा केली. प्रस्तुत परिचर्चेचा उपोद्घात आणि तिचे संचालन या संस्थेचे एक ज्येष्ठ सेवानिवृत्त प्राध्यापक, अर्थशास्त्रज्ञ श्री. अ. ना. लोथे यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख आणि तरुण भारत दैनिकाचे पूर्वसंपादक श्री. मा. गो. वैद्य या संस्थेचे माजी विद्यार्थी व प्राध्यापक आहेत. त्यांना प्रमुख अतिथी म्हणून बोलविले होते.
प्रा. लोथे यांनी प्रारंभीच ‘आजचा सुधारक’ चे संस्थापक संपादक प्रा. दि. य. देशपांडे यांच्याविषयी गौरवोद्गार काढून ‘आजचा सुधारकला शुभेच्छा दिल्या व चर्चेसाठी पुढीलप्रमाणे आवाहन केले.
१. धर्माचरण हे नैतिक आचरण नव्हे ?
धर्माचरण व नैतिक आचरण एक असू शकत नाहीत असे देशपांडे म्हणतात. कर्तव्यबुद्धी हा हेतू नसता केवळ आवडीने एखाद्याने कर्म केले तर देशपांडे त्याला ननैतिक कर्म ठरवतात या न्यायाने एखादा धार्मिक मनुष्य श्रद्धेने सदाचरण करतो, तेही कर्तव्यबुद्धीच्या अभावी देशपांड्यांच्या मते नैतिक आचरण होत नाही. हे प्रतिपादन आम्हाला खटकते. प्रा. देशपांड्यांनी याचा खुलासा करावा.
२. आध्यात्मिक जिज्ञासा निरर्थक ?
मनुष्याला भौतिक गरजा आणि ऐहिक समस्या यांच्यामध्ये जशी रुची असते तशीच आत्मिक प्रश्नांबद्दलही असते. ‘कस्त्वं (तू कोण आहेस?) ‘कुतः आयातः? (कुठून आला आहेस?) अशा प्रश्नांची ‘निरर्थक प्रश्न म्हणून प्रा. देशपांड्यांनी संभावना केली आहे. देशपांड्यांनी ज्या पातळीवरून या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत ती उत्तरे, हे प्रश्न मांडणाऱ्या तत्त्वज्ञाला काय माहीत नव्हती? विचारी मनाला कर्मजिज्ञासेएवढीच आध्यात्मिक जिज्ञासा अस्वस्थ करते हे प्रा. देशपांडे कसे विसरतात?
३. संस्कृती, परंपरा यापेक्षा विवेक श्रेष्ठ ?
श्री. दिवाकर मोहनींनी आपल्या ‘धर्म, धर्मनिरपेक्षता….’ या लेखात (जुलै ९१) इतिहास, परंपरा, संस्कृती व विवेक यांत श्रेष्ठ काय असा प्रश्न केला आहे. आणि या सर्वांत विवेक श्रेष्ठ असे सुचविले आहे. परंतु प्रत्यक्ष जीवनात संदर्भानुसार या सर्वांनाच आपापल्या परीने स्थान आहे. सर्वांना सर्वदा विवेक करता येत नसतो. हे समाजसुधारकांनी लक्षात ठेवावे.
४. हिंदुनेतृत्वाला अंतःकरण नाही ?
रामजन्मभूमीच्या जागेवर मशीद पाडून अपमानाच्या भावनेने क्रोधित होणारे हिंदू आणि हिंदुनेतृत्व समाजातल्या निपूण विषमतेने, डोक्यावरून विष्ठा वाहून नेण्यासारख्या प्रथेने आणि सामाजिक अन्यायाने व्यथित होत नाहीत असे श्री. मोहनी लिहितात. (जुलै ९१). यावर इतकेच म्हणावे लागते की त्यांचे अवलोकन अपुरे आहे. हिंदूधर्माभिमान्यांनी अशा गोष्टींची दखल घेतली नाही हे म्हणणे त्यांना अन्यायकारक आहे.
५. सामुदायिक प्रतिक्रिया व्यक्तिगत प्रतिक्रिया एकच नव्हत.
“एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारावे काय ? त्यांनी मंदिर फोडले म्हणून आम्ही मशीद पाडावी काय?” असे प्रश्न मोहनी विचारतात. (एप्रिल व जुलै/सप्टेंबर १०) हे प्रश्न वैचारिक गोंधळाचे द्योतक आहेत. एक व्यक्ती ज्या संयमाने, औदार्याने वागू शकते तीच अपेक्षा संपूर्ण समाजाकडून करता येत नाही. A man is kind but men are cruel असे एक वचन आहे. शिवाय हिंदुधर्माभिमानी सरसकट मंदिरवादी असेलच असेही नाही.
६. धर्मनिरपेक्षता व भयगंड :
धर्मनिरपेक्षता या विषयावर आजचा सुधारकात एक परिसंवाद व्हावा असा जो संकल्प जाहीर झाला, त्याची व्याप्ती दर्शविणारी एक प्रश्नावली डॉ. भा. ल. भोळे व श्री. वसंत पळशीकर यांनी दिली आहे. (एप्रिल ९१) तिच्यात असे एक विधान केले आहे की, ‘प्रत्येक धर्मीयाच्या मनात अन्य धर्मीयांबद्दल संशय, दुरावा आणि भयगंड बसत आला आहे.’ हे खरे आहे का? पारशीधर्म हा अत्यल्पांचा धर्म आहे. त्यांना कधी भयगंडाने ग्रासले आहे असे दिसत नाही. मग ज्या धर्माचे करोडो अनुयायी आहेत त्यांना भयगंड वाटतो तो खरा आहे की, त्याच्यामागे काही राजकारण आहे असा प्रश्न पडतो.
या प्रमाणे प्रश्नांची मांडणी झाल्यावर ‘आजचा सुधारक’ चे संपादक प्रा. दि. य. देशपांडे यांना उत्तरे देण्यासाठी अध्यक्षांनी सर्वप्रथम पाचारण केले.
प्रा. दि. य. देशपांडे : कर्तव्यबुद्धी असल्यावाचून कर्माला नैतिक मूल्य येत नाही हे म्हणणे समजण्यासाठी थोडे मागे जाऊ. नैतिक मूल्य आणि ननैतिक मूल्य हा भेद आधी करू, मूल्य म्हणजे हवेसे वाटणारे, ज्याच्यासाठी काही किंमत द्यायची आपली तयारी असते ते. ते दोन प्रकारचे – एक साधनमूल्य, दुसरे साध्यमूल्य. पहिल्यासाठी दुसऱ्याची आवश्यकता आहे. काहीच जर स्वतोमूल्यवान नसेल तर कशालाच साधनमूल्य येणार नाही, साध्यमूल्य असणारी गोष्ट स्वयमेव वाच्छनीय असते. जसे सुख, सुख कशासाठी हा प्रश्न व्यर्थ आहे. अर्थाला साधनमूल्य आहे सुखाच्या अपेक्षेने. तीच गत आरोग्याची, सुख साध्यमूल्यवान खरे; पण ते ननैतिक साध्य आहे. एखादा मनुष्य सुखी आहे एवढ्यानेच तो नीतिमान ठरत नाही. म्हणून एखादे साध्य नैतिक साध्य या पदवीला पात्र होण्यासाठी कांचा हेतू महत्त्वाचा असतो. कत्यांच्या ठायी कर्तव्यबुद्धी असेल तरच त्याच्या कर्माला नैतिकमूल्य येते. धर्माचरणाचा हेतू पारलौकिक लाभहानी हा असतो. म्हणून धर्माचरण नैतिक आचरण नव्हे. तसेच आवड, आसक्ती यामुळे केलेले आचरण नैतिक आचरण नसते.
डॉ. नी. र. व-हाडपांडे : तैमूरलंगाने कर्तव्यबुद्धीने कत्तली केल्या. त्याला तुम्ही नैतिक आचरण म्हणणार काय?
दि. य. दे. : त्याचा हेतू कर्तव्यबुद्धी असेल तर त्यात नैतिकमूल्य असेल. पण कर्तव्य काय हे ठरवण्यात त्याची चूक संभवते.
शिवाय धर्माचे आवाहन स्वार्थाला असते. अनिष्टकर्मे केल्याने पाप होते. आपण नरकात जाऊ ही भीती असते. पुण्यकर्म केल्याने स्वर्ग मिळतो म्हणून धर्माचे आचरण होते. त्यामुळे धर्माचरण व नैतिक आचरण एकच समजता येत नाही. धर्माचरणाला ननैतिक म्हटले ते या अर्थाने.
प्रा. श्री. गो. काशीकर : नीतीची संकल्पना व्यक्तिगत की सामाजिक? दि. य. दे. : व्यक्तिगत. ज्याची त्याने ठरवायची असते.
अध्यक्षीय उपोद्घातातील दुसरा प्रश्न आत्मजिज्ञासेचा. ‘कस्त्वं? “कुत आयातः?’ हे प्रश्न काही गृहीतावर आधारलेले आहेत. येथे जन्माला येण्यापूर्वी आपण अस्तित्वात होतो हे गृहीत धरलेले आहे. याला आधार काय? नुसती श्रद्धा आधार होऊ शकत नाही.
प्राचार्य श्री. मा. पांडे : धर्माचा परलोकाशी संबंध अनिवार्य नाही. ‘धारणात् धर्म इत्याहुः’ हा धर्म केवळ समाजधारणेशी संबद्ध आहे. तो परलोकनिरपेक्ष आहे.
प्रा. श्री. गो. का: वास्तविक सत्य काय आहे या बाबतीत प्रा. देशपांडे यांनी वैज्ञानिक पद्धतीची भलावण केली आहे ती पटण्यासारखी नाही.
अंतिम सत्याचे दर्शन विज्ञानाच्या पद्धतीने होत नाही. आईन्स्टाइन स्वच्छ म्हणतो की, विज्ञानाने ईश्वराचे ज्ञान होऊ शकत नाही,
प्रा. श्री. गो. का: रसेलने म्हटले आहे ना की Mystic experiences are all over the same. तुमच्या आजच्या सुधारकातच हे आले आहे.
यावर प्रा. प्र.ब. कुळकर्णी खुलासा देतात की, रसेलचे म्हणणे तसे आहे ही एका वाचकाची समजूत पत्रव्यवहारात व्यक्त झाली आहे. तिचा आधार रसेलच्या एका पुस्तकाचे मराठी भाषांतर हा आहे. ते भाषांतर चूक आहे हे प्रा. देशपांडे यांनी (जुलै १९९१ अंकात) मूळ इंग्रजी वाक्य व त्याचा अनुवाद देऊन दाखविले आहे. रसेलच्या म्हणण्याचा आशय हा होता : गूढवाद्यांच्या बाजूने हमखास पुढे करण्यात येणारा एक पुरावा हा की, गूढज्ञान सर्वत्र एकसारखेच असते. यातून रसेलने गूढज्ञानाची बाजू मान्य केली आहे असा अर्थ निघत नाही. शिवाय गूढवाद्यांच्या ह्या दाव्याचा रसेलने विस्तृत प्रतिवाद केला आहे.
डॉ. पु. वि. खांडेकर : Spiritual experiences या मानसिक गोष्टी आहेत. आइन्स्टाइनचा शोध किंवा मॅक्सवेलची चार समीकरणे यासारखे शोध कोणी गुढज्ञानाने लावले असा इतिहास नाही. अनुभवनिष्ठ वैज्ञानिक पद्धती हाच सत्यज्ञान मिळवण्याचा मार्ग आहे. Grammarof Science या ग्रंथात म्हटले आहे की, Truth lies on a curve whose asymptote is followed by science’ ‘कुतः आयातः” हा प्रश्न निरर्थकच आहे. भूतलावर एक लक्ष वर्षांपूर्वी मनुष्य नव्हता. तो हळूहळू निसर्गक्रमाने उत्क्रांत झाला आहे. अंतर्ज्ञान सर्वत्र सारखे असल्याचे दिसत नाही. त्याला मर्यादा असतात. व्यक्तीचा परिसर, संस्कार, रिवाज, सभोवतीचा समाज या सर्वांचा त्याच्यावर प्रभाव पडलेला दिसतो.
डॉ. नी. र. व. श्री. मोहनींच्या लेखात उपस्थित केलेल्या एका प्रश्नाचा रोख असा आहे की, रामजन्मभूमीच्या प्रश्नापेक्षा इतर अनेक प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत. ते सोडून या एका प्रश्नावरच लक्ष केंद्रित करावे काय? या बाबतीत माझे म्हणणे असे की, आगरकरांच्या वेळीही असाच युक्तिवाद केला जात असे. विधवांचे केशवपन आणि विधवा हे प्रश्न केवळ ब्राह्मण जातीपुरते मर्यादित आहेत. ते सुटल्याने सर्व समाजाचे प्रश्न सुटणार आहेत काय असे टीकाकार विचारत. हे लक्षात ठेवले पाहिजे की कोणत्याही एका प्रश्नाने जगाचे सर्व प्रश्न सुटत नसतात. प्रत्येक प्रश्नाचे स्वतःचे काही महत्त्व असते. परकीय आक्रमकांनी ठेवलेली स्मारके नष्ट केल्याशिवाय राष्ट्र जिवंत होणार नाही. रामजन्मभूमीकडे या दृष्टीने पाहावे लागते.
श्री. दि. पु. मोहनी : रामजन्मभूमीचा प्रश्न माझ्या लेखाचा मूळ मुद्दा नाही. तो आनुषंगिक आहे. हिंदुत्व, हिंदू कोण? हे माझ्या कुतूहलाचे विषय आहेत. माझ्या लेखातून जे प्रश्न मी उपस्थित केले त्याबद्दल माझी भूमिका जिज्ञासूची आहे. आणि माझ्या प्रश्नांच्या उत्तराची मी अजूनही वाट पाहत आहे.
एक आवाज : पण तुमची बाबरी मशिदीबाबत काय भूमिका आहे. तुमच्या मते बाबरी मशीद तेथे असावी की नसावी?
श्री. दि. मो. : बाबरीमशीद तेथे नसावी असेच माझे मत आहे.
श्री. मा. गो. वैद्य : बाबरी मशीद तेथे का नसावी?
श्री. दि. मो. : ती दगडामातीची आहे म्हणून.
प्रा. श्री. गो. का.: स्वातंत्र्य मिळाले तेव्हा हिंदू जुने विसरायला तयार होते. वास्तविक मुसलमानांना घटनेने जादा अधिकार दिले आहेत. आणि मुसलमान आपले वेगळेपण सोडायास तयार होते. पण…..
नी. र. व. : तथाकथित धर्मनिरपेक्षतावाद्यांनी-सेक्युलरिस्ट नावाचा जो वर्ग आहे त्यांनी हे होऊ दिले नाही.
[सभेची वेळ संपत्त असल्यामुळे अध्यक्षांनी श्री. वसंत पळशीकरांना आपले विचार मांडण्याची विनंती केली.]
श्री. वसंत पळशीकर : आजच्या सुधारकात पुष्कळ तात्त्विक प्रश्न उपस्थित केले जातात. सत्य म्हणजे काय? असत्य म्हणजे काय? अशी खुप विश्लेषक चर्चा चालते. पण ही चर्चा कोणास सत्य भाषण करायला प्रवृत्त करीलच असे नाही. प्रा. देशपांड्यांच्या लेखनाचे स्वरूप बौद्धिक आहे. पाप पुण्य हे तथ्यांच्या जगात नाहीत, पण म्हणून त्या जीवनोपयोगी संकल्पना आहेत हे नाकारता येईल काय ? अमुक एक गोष्ट पाप आहे. कितीही लाभ होत असो मी ते करणार नाही असे जेव्हा एखादा मनुष्य म्हणतो, तेव्हा त्याच्यासाठी त्या गोष्टी अस्तित्वात आहेतच. अगदी सूर्य, चंद्र, पाणी यांच्यासारख्या. म्हणून कार्यकर्त्याने बौद्धिक सुसंगतीची फारशी भीती बाळगू नये. काही गोष्टी तीव्र भावनांशी निगडित असतात. ईश्वर आहे आणि ईश्वर नाही या समांतर भूमिका आहेत. त्या बाद करण्याच्या गोष्टी नव्हेत. समजावून घेण्याच्या गोष्टी आहेत.
विवेक आणि बुद्धिप्रामाण्य एकच नव्हत. वस्तुस्थिती अशी आहे की देशात धर्मप्रिय लोक आहेत. धर्माचे आग्रही आहेत. ते शेजारी आहेत आणि त्यांना शेजारी राहावयाचे आहे. त्यांना जेव्हा शेजारी राहायचे नसते तेव्हा कुरापती काढल्या जातात. जुन्या निझामशाहीत मुसलमान अल्पसंख्य होते, पण राज्य त्यांचे होते. हिंदू प्रजेला रोजच्या रोज छळ सोसावा लागत होता असे नाही. पण प्रजा हे जाणून होती की हे राज्य मुसलमानांचे आहे. ही जाणीव ठेवून वागत होती. रामजन्मभूमीचा प्रश्नही असाच सुटू शकतो. शल्यही जाईल आणि त्यात सूडही असणार नाही, मुसलमान अशी भूमिका घेऊ शकतात. हिंदू बहुसंख्यक आहेत हे लक्षात ठेवून हिंदुमुसलमानांना राष्ट्रवादी भूमिका घेता येईल. या प्रश्नांची सन्मानाने सोडवणूक शक्य आहे. पण ते तसे करीत नसावेत.
श्री. गो. का. : सन्मानपूर्वक सोडवणूक शक्य आहे म्हणता तर तिचा मार्ग सांगा
नी. र. व : प्रश्न टाळू नका व. प. : मी प्रश्न टाळत नाही. दुसरे उदाहरण देतो.
पूर्वी माशिदीसमोरून सवाद्य मिरवणूक नेण्याचा प्रश्न असे. ठिकठिकाणी स्थानिक तोडगे असत. जनता विविध धर्माची आहे आणि राष्ट्र बांधायचे आहे. तेव्हा तोडगा निघू शकेल.
हिंदूं कोण हा प्रश्न व्याख्येने सोडवता येण्यासारखा नाही. व्यवहारवाद्यांना त्याचे उत्तर माहीत आहे. व्याख्या पढे नेणारी पद्धत नाही. मुसलमानात काम करावयाचे याची जाणीव ठेवून शेवटी शेवटी हमीद दलवाई म्हणत : ‘मी मुस्लिम आहे.’ हिंदूंशी संवाद करायचा असेल तर तुम्ही हिंदू आहात हे own करा. भारत अखंड करायचा तर फुटून निघालेल्यांना जिंकणे हा मार्ग नाही. प्रेमाची किंवा आत्मीयतेची रीत ही एकच रीत अखंड करणारी आहे. फाळणीनंतर गांधी पाकिस्तानात जायला निघाले होते. भारत जोडायला निघालेल्या गांधींना मारणाऱ्याने अखंड भारताला मारले आहे.
[वेळ फार झाल्याने अध्यक्षांनी चर्चेत उपस्थित केलेल्या मुद्यांना धरून श्री. मा. गो. वैद्य यांनाच समारोप करण्याची विनंती केली. धर्मनिरपेक्षता या विषयावरील श्री. मा. गो. वैद्यांचा स्वतंत्र लेख गेल्या अंकात (सप्टेंबर-ऑक्टोबर १९९१) अन्यत्र आलेला आहे. स्थूल मानाने त्यांनी तेच विचार येथे मांडले.]
शांतिविहार, सिव्हिल लाईन्स, नागपूर ४४००११

ह्या अंकामध्ये सेक्युलरिझमविषयक परिसंवादाचा समारोप करण्यात येईल असे आम्ही मागच्या अंकाच्या संपादकीयामध्ये म्हटले होते. पण आमचे अनेक वाचक त्या चर्चेमध्ये भाग घेऊ इच्छित आहेत म्हणून ही चर्चा एवढ्यात संपणार नाही. त्या चर्चेतून ठोस काहीतरी बाहेर पडावे अशी आमची इच्छा आहे. वाचकांनी त्यादृष्टीने आम्हास साह्य करावे ही विनन्ती.
– संपादक

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.