श्री दिवाकर मोहनी यांचे आम्हाला आलेले एक पत्र आम्ही अन्यत्र छापले आहे. त्यांनी त्या पत्राद्वारे एका अत्यंत गंभीर समस्येकडे लक्ष वेधले आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशाला भ्रष्टाचाराची जी लागण झाली तिची तीव्रता गेली चाळीस-पंचेचाळीस वर्षे सतत वाढतच आहे, आणि आज जीवनाचे एकही क्षेत्र असे राहिलेले नाही की जे भ्रष्टाचारामुळे किडलेले नाही. राजकारण आणि व्यापार ही भ्रष्टाचाराची पारंपारिक क्षेत्रे. पण आता शासन आणि शिक्षण यातही हे विष बेसुमार शिरले आहे. आजची तरुण पिढी या वाढत्या भ्रष्टाचाराच्या वातावरणात लहानाची मोठी झाली असल्यामुळे तिच्या ते पूर्ण अंगवळणी पडले आहे, आणि त्यात काही अनिष्ट आहे अशी जाणीवही तिला नाही. त्यांच्या मागची आता मध्यम वयाची आणि वृद्ध झालेली पिढी या सर्वागीण भ्रष्टाचारापुढे शक्तिपात झाल्यासारखी झाली आहे, आणि त्याला विरोध करण्याची आपली दुर्बलता ओळखून ती हताशपणे ही अधोगती पहात आहे. सर्वांगीण भ्रष्टाचार अपरिहार्य मानून त्याचा स्वीकार करणे याखेरीज अन्य उपाय नाही अशी सर्वांचीच खात्री झाली आहे.
श्री मोहनी असे विचारतात की ही सर्वकष अधोगती रोखणे खरोखरच अशक्य आहे काय? ते अशक्यप्राय दिसते हे खरे, आणि एकट्यादुकट्याने ते करावयाचे काम नव्हे हेही खरे पण ज्यांना ही अधोगती अनिष्ट आहे हे पटते अशा लोकांनी ती थांबविण्याकरिता काही करणे शक्य आहे काय याचा निदान विचार करायला काय हरकत आहे? मोठी आंदोलने आंरभी नेहमीच अतिशय लहान असतात, पण कालांतराने त्यांतून विराट युगांतरकारी चळवळी उभ्या राहतात. तसे थोड्या फार प्रमाणात इथेही कदाचित होऊ शकेल असा श्री मोहनींना विश्वास आहे.
या करिता आपल्याला या क्षेत्रात काय करणे शक्य आहे याचा विचार करण्याकरिता एकत्र येण्याचे आवाहन आम्ही या लेखाद्वारे करतो. ज्यांना याबाबतीत काहीतरी करणे अत्यावश्यक आहे हे पटते त्यांनी आम्हाला तसे कळविल्यास पुढील कार्याची दिशा ठरविता येईल.आम्हाला विश्वास आहे की या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळेल,
-संपादक