मुस्लिम जातीयवादाचे आव्हान हे आहे

हिंदू-मुस्लिम संघर्ष खरा दोन मनांमधील प्रवृत्तींचा आहे….

मुस्लिम मन हे स्वभावतः विस्तारवादी आहे, कारण ते धर्मविस्तारवादी आहे. हिंदू हा बंधनवादी आहे. सीमा ओलांडावयाच्या नाहीत हा त्याने स्वतःवर घालून घेतलेला नियम….. तेव्हा हिंदू पुरेसा चैतन्यशील होण्यावर हिंदू-मुस्लिम संबंधाचे स्वरूप अवलंबून आहे….
ही चैतन्यशीलता येणे आणि मनाचा समतोलपणा साध्य होणे हे मुस्लिम राजकारणाचे आव्हान स्वीकारण्याचे खरे दोन उपाय आहेत. हिंदू सनातनीपणा कमी कमी होत जाणे, जाती नष्ट होणे, सामाजिक समतेच्या आणि मानवतेच्या मूलभूत कसोटीवर आधारलेल्या समाजाकडे चालू असलेली हिंदूंची वाटचाल अधिक जोराची होणे, हिंदू खऱ्या आधुनिकतेचा स्वीकार करीत असलेला दिसणे हे उपाय आहेत. दुर्दैव असे आहे की, हा मनाचा समतोल हिंदू मनाने बाळगलेला नाही. ज्यांनी आधुनिकतेचा, खऱ्या न्यायाचा आणि बंधुभावाच्या शिकवणुकीचा स्वीकार केला आहे त्यांतील काही, मुस्लिम जातीयवादाचा पाठपुरावा करतात, काही त्या जातीयवादाविरुद्ध बोलावयाचे टाळतात, आणि काही अप्रत्यक्षपणे त्या जातीयवादाला खतपाणी घालण्याचे कार्य करतात. ह्या जातीयवादाशी ज्यांना मुकाबला करावयाचा आहे ते हिंदू सनातनीपणाचा, चातुर्वण्याचा, गाईचे स्तोम माजविण्याचा, आणि हिंदूंना पुन्हा मध्ययुगीन काळात नेण्याचा आणि त्याला पर्यायाने चैतन्यहीन बनविण्याच्या क्रियेचा पाठपुरावा करीत असताना दिसत आहेत. हिंदू हिंदूंना आधुनिक बनवितो आहे. आणि त्याचबरोबर मुस्लिम जातीयवादी इर् रॅशनल जातीयवादी राजकारणाला विरोध करतो आहे असे दृश्य दिसेल काय? तसे दिसावे अशी माझी इच्छा आहे. कारण ते तसे दिसेल तेव्हा हिंदू-मुस्लिम प्रश्न संपुष्टात आला आहे हे आपल्या लक्षात येईल…..

– हमीद दलवाई
मुस्लिम जातीयतेचे स्वरूप : कारणे व उपाय

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.