अध्यात्म की विज्ञान

आधुनिक विज्ञान हे अध्यात्माच्या जवळ चालले आहे असे मत अनेक वेळा प्रदर्शित करण्यात येते; अशा अर्थाची काही पुस्तकेही प्रसिद्ध झाली असून काही पाश्चात्त्य वैज्ञानिकांनीही या विधानाचे समर्थन केले आहे. परंतु खरोखर अशी वस्तुस्थिती आहे काय याविषयी आज विचार करणे आवश्यक झाले आहे.

अध्यात्मातील काही संकल्पना :अध्यात्म म्हणजे आत्म्याचा शोध! त्याचे प्रयोजन म्हणजे आत्मा आणि परमात्मा यांचे तादात्म्य प्राप्त करणे, व अशा रीतीने मोक्ष मिळविणे. या ध्येयाला मुक्ती प्राप्त करणे, निर्वाणाप्रत जाणे, साक्षात्कार होऊन परमेश्वराची प्राप्ती होणे, अशा विविध प्रकारे व्यक्त करण्यात येते. अध्यात्माचा मार्गही ठरलेला आहे व तो म्हणजे मनाचे सतत केंद्रीकरण करून (म्हणजे विचारांना निश्चित दिशा देऊन) चिंतन, मनन आणि ध्यान करणे. या मार्गाने जाणार्‍या साधकांना जिवाशिवाची भेट होऊन अतीव विलक्षण उत्कट आनंदाचा अपूर्व अनुभव येतो. याला साक्षात्कार म्हणतात. हा साक्षात्कार साधकाच्या वैयक्तिक आराध्यदैवताचाच होतो असे आढळते. उदा. समर्थांना प्रभू रामचंद्राचे तर तुकाराम महाराजांना विठोबाचे साक्षात् दर्शन होत असे. साक्षात्कारप्रसंगी दुःखाची निवृत्ती होऊन आत्यंतिक सुखाची प्राप्ती होत असते. साक्षात्कार हा एक आगळाच अनुभव आहे! या अनुभवाला ज्ञान म्हणावे काय? असे मान्य केले की या भावोत्कटतेच्या प्रसंगी ज्ञानदेखील मिळते तर हे ज्ञान कशाबद्दल? कोणाबद्दल? संतांना आपल्या वैयक्तिक आराध्य दैवताचाच साक्षात्कार होतो हे पाहिल्यास अध्यात्ममार्गाने जाण्यासाठी ज्या जड, भौतिक वस्तूंच्या विचारांचा त्याग केला त्या जड भौतिक विश्वाविषयी त्यांना ज्ञानप्राप्ती होत नसावी असे वाटते. ब्रह्मजिज्ञासेचा अहर्निश ध्यास घेणार्‍यांना जड मायास्वरूपी विश्वाच्या ज्ञानाची काय आवश्यकता?
साक्षात्कारप्रसंगी होणारे आत्मज्ञान हेच ब्रह्मज्ञान व हेच विश्वज्ञान असेही म्हणतात. ही नित्यसमिका (identity) मान्य केल्यास आत्मा, ब्रह्म आणि विश्व अभिन्न आहेत असे मानावे लागेल. यांतील ‘ब्रह्म आणि ‘विश्व या शब्दांमागे कोणती संकल्पना अभिप्रेत आहे हे पाहणे आवश्यक आहे. ऋग्वेदात हा शब्द मंत्र, देवतास्तवन, प्रार्थना, गूढशक्ती यासंबंधी वापरला आहे. उपनिषदांत विश्वाचे आद्यकारण, परतत्त्व, विश्वाच्या विविधतेच्या मुळाशी असलेले परतत्त्व अशी ब्रह्माची कल्पना असून त्याच्याशी पावित्र्य आणि गूढता निगडित आहेत. छांदोग्यात भूक नसलेला, तृष्णा नसलेला, सत्यकाम, सत्यसंकल्प असे ब्रह्माचे वर्णन आहे. रामानुजाचार्यांच्या मते ब्रह्म अनंत कल्याणगुणांनी युक्त असून ते जगाचे कर्तृत्व, जीवांचा शास्ता आणि नियामक आहे. सर्वांच्या कानी असलेले ‘नेति नेति’ हे वर्णन बृहदारण्यकामध्ये आहे. इतर प्राचीन साहित्याचे परिशीलन केले तर ब्रह्माची परस्परविरोधी वर्णनेही आढळतात; ब्रह्मावर मानवी गुणांचे आरोपण केलेले आढळते. अनेक प्रसंगी ब्रह्म, ईश्वर, परमेश्वर, देव, परमात्मा, प्रभू, पुरुष (प्रकृतीच्या संदर्भात) हे शब्द एकाच अर्थाने वापरण्यात येतात. विश्वाचा कोणी निर्माता असणे ही कल्पना केवळ सेमेटिक (ख्रिश्चन) धर्मातच नाही; आपल्या धर्मात ही ब्रह्मा-विष्णु-महेश या त्रयीतील ब्रह्म्याला विश्वनिर्माता मानतात. एकंदरीत ब्रह्माच्या संकल्पनेत काही सुसंबद्धता आढळत नाही तेव्हा सर्वच वर्णने खरी मानून ज्या प्रसंगी जो अर्थ आपल्या प्रतिपादनासाठी उपयोगी पडेल तो खरा मानणे अशा सोप्या पळवाटा अध्यात्मवाद्यांना उपलब्ध आहेत!

याचप्रमाणे विश्व कशाला म्हणावे यासाठी प्राचीन साहित्य पाहिले तर त्यात विश्व, ब्रह्मांड, प्रकृती, सृष्टी जग हे शब्द समानार्थी वापरले जातात. विश्वाचे दर्शनभगवान श्रीकृष्णांनी बालपणी यशोदेला आणि नंतर अर्जुनाला घडविले. गीतेमधल्या विश्वरूपदर्शनातील अद्भुतरंसात्मक काव्य बाजूला सारले तर असे म्हणता येते की त्यावेळच्या विश्वाच्या कल्पनेत पृथ्वी, तीवरील सजीवनिर्जीव पदार्थ, सूर्य, चंद्र, नक्षत्रे, तारे एवढीच असावी. साध्या डोळ्यांनी दिसणार्‍या देवयानी दीर्घिकेचा (Andromeda Galaxy) उल्लेखही कोठे आढळत नाही यावरून वरील विधानाला पुष्टी मिळते.
आत्मज्ञान याविषयी विचार करता त्याचा अर्थ स्वतः विषयीचे ज्ञान असा होतो. ब्रह्मज्ञान होण्यासाठी ‘मी’ चा विस्तार करून त्यास एवढे विशाल करावे की ते अखिल विश्व व्यापून टाकील असे म्हटले जाते. हा मी म्हणजे शरीर आणि मन (मन = मेंदूची विचारप्रक्रिया) युक्त वस्तू (entity). मनाच्या विस्तारणाच्या प्रक्रियेमध्ये मनुष्याला विश्वातील सजीव पदार्थांच्या (उदा. मानव समाजाच्या काम, क्रोधादि गुण, हर्ष, खेद, शोक इत्यादि भावना) संवेदना-भावना यांचे आकलन व समरसता होणे शक्य आहे कारण हे तादात्म्य मानसिक अथवा भावनिक पातळीवर आहे परंतु विश्वातल्या जड निर्जीव वस्तूंच्या (उदा. पर्वत, समुद्र, नद्या, खडक, माती) बाबतींत ही समरसता कशी होऊ शकेल?

वैज्ञानिक शब्दांचे अर्थ
नवविवेकवादाच्या आवश्यकतेबद्दलच्या लेखात ज्या संकल्पनांच्या आधारे विज्ञानाचे अध्यात्माशी साम्य दर्शविले आहे. त्या संकल्पनांचा वैज्ञानिक अर्थ समजल्यावाचून विज्ञान आणि अध्यात्मामधील तथाकथित साम्याचा फोलपणा समजणार नाही. त्यातला ऊर्जा-अक्षय्यतेचा (conservation of energy) उल्लेख विश्वामध्ये काही तरी कायम अविनाशी स्वरूपाचे आहे अशा संदर्भात वापरला असावा, असे वाटते. पूर्वी ऊर्जा-अक्षय्यता आणि वस्तुमान यांच्या अक्षय्यतेचा वेगवेगळा विचार करीत असत; पण किरणोत्सारण (radioactivity) आणि सापेक्षता-सिद्धांताच्या शोधानंतर दोहोंचा साकल्याने विचार करतात. परंतु वस्तुमान – ऊर्जा अक्षय्यतेखेरीज भौतिकशास्त्रात रेखीय संवेगाची (linear momentum), कोणीय संवेगाची (angular momentum) आणि प्रभाराची (charge)अक्षय्यता हे नियम आहेत. याशिवाय आणखीही तीन अक्षय्यता – नियम असे एकूण सात अक्षय्यता नियम आहेत. यावरून भौतिकशास्त्र अध्यात्माच्या बरेच पुढे गेले आहे असे का म्हणू नये?
Singularity म्हणजे एक तत्त्व नव्हे. त्याला योग्य प्रतिशब्द ‘संविशेषता आहे. विशिष्ट परिस्थितीत एखाद्या राशीची किंमत अनंत झाली तर त्या परिस्थितीला Singularity म्हणतात. उदा. वस्तुमान स्थिर ठेवून आकारमान कमी करीत गेले तर घनता = (वस्तुमार्ने आकारमान) वाढत जाते. अखेरीस आकारमान शून्य केले तर घनता अनंत होईल. ही एक संविशेषता झाली. ही सर्वस्वी गणितीय संकल्पना आहे. भौतिकशास्त्रात अनेक प्रसंगी गणितात अशा संविशेषतांना तोंड द्यावे लागते. त्याला एक तत्त्व म्हणणे सर्वथैव चुकीचे आहे. असाच चुकीचा अर्थ Zero size विषयी लावला आहे. Zero size म्हणजे शून्य आकारमान! शून्य अवस्था नव्हे!!

अशीच गफलत कण-प्रतिकण आणि ब्रह्म-माया यांमध्ये साम्य शोधण्यात झाली आहे. कण-प्रतिकण यांची अनेक उदाहरणे देता येतात. सर्वात सोपे म्हणजे इलेक्ट्रॉनपॉझिट्रॉन. दोहोंचेही वस्तुमान (mass) आणि प्रभार (charge) समान असतात. फरक एवढाच की एकावरचा प्रभार ऋण आहे तर दुसर्या)वर धन प्रभार आहे. प्रोटॉन आणि प्रतिप्रोटॉन हे असेच कण-प्रतिकण आहेत. कण-प्रतिकणांचा प्रमुख गुणधर्म असा की ते एकत्र आले तर परस्परांचे नाशन (annihilation) करतात व त्यापासून प्रारण (radiation) निर्माण होते. याच्या उलट अभिक्रियादेखील होत असते. प्रारण विशिष्ट तीव्रतेपेक्षा (intensity) जास्त असले तर त्याच्यापासून कण-प्रतिकण जोडी निर्माण होते. या सर्व घटनांचा अभ्यास करून त्याच्या गणिताचा पडताळाही घेण्यात आला आहे. या संकल्पनेचाआणि ब्रह्म-माया यांमध्ये साम्य एवढेच की या दोन्ही शब्द-जोड्या आहेत. विश्वामध्ये कण (म्हणजे ब्रह्म म्हणावे काय?) विपुल प्रमाणात आढळतात पण प्रतिकण (याला माया समजावे काय?) अल्पांशाने, जवळजवळ नगण्यच आढळतात. असे का हा प्रश्न अजून वैज्ञानिकांना सुटला नाही. अध्यात्माने त्याचे उत्तर दिल्यास वैज्ञानिक प्रगती वेगाने होईल.

वैदिक गणितात प्रगत गणितशास्त्राचे विवेचन आढळत नाही. उपलब्ध साहित्यावरून गुणाकार, भागाकार, वर्ग, वर्गमूळ, चतुर्थघात, चतुर्थमूळ या पलीकडे ते जात नाही असे दिसते. प्रगल्भ गणिताचे श्रेय भास्कराचार्यांना दिले पाहिजे. काही वेदज्ञात्यांचे तर असे म्हणणे आहे की वैदिक गणितात ज्या सूत्रांचा आधार घेतात ती वेदांमध्ये नाहीत. ब्रह्म्याचा दिवस आणि ब्रह्म्याचे वर्ष ही काल मोजण्याची मापे आहेत. ब्रह्म्याचा एक दिवस ८.६४ अब्ज मानवी वर्षांएवढा येतो. पण प्रकाशवर्ष, प्रकाशदिवस ही काल मोजण्याची मापे नसून अंतर मोजण्याची मापे आहेत. एक प्रकाशवर्ष २५.९२ अब्ज किलोमीटर होते.

प्रदूषणाची समस्या अध्यात्माने कशी सुटणार? या समस्येवर उत्तर विज्ञानानेच मिळू शकते!

विश्वरचनेविषयीचे सिद्धान्त :
आधुनिक दृष्टीने विश्वरचनेविषयी तीन सिद्धांत आहेत. (१) महास्फोट सिद्धांत (big bang) (२) स्थायी अवस्था (Steady state) अथवा सतत निर्मिती सिद्धान्त (३) दोलनकारी विश्व, प्राचीन साहित्यात या तिन्ही मतप्रवाहांसाठी पुरावे आढळतील. उदा. (१) प्रत्येक वस्तूला कोणीतरी निर्माता असतो. त्याप्रमाणे विश्वाचा कुणीतरी निर्माता असला पाहिजे. अर्थात् ज्यावेळी त्याने विश्वरचना केली त्यावेळी विश्वाची उत्पत्ती असते (२) दृष्टीस पडणार्‍या तार्‍यांच्या पलीकडे काय असावे? तार्‍यांच्या पलीकडे अमर्याद पोकळी असावी. म्हणजे विश्व अनादि अनंत असावे (३) ज्याप्रमाणे सर्व सृष्टीला आदि, मध्य, अंत असतो आणि मृत्यूनंतर पुनर्जन्म असतो (पुनरपि जननं पुनरपि मरणम्) त्याच न्यायाने अखिल विश्वाचा सतत पुनर्जन्म आणि मृत्यू होतो. प्राचीन विचारांमधून (किंवा अध्यात्मातून) या तीन उपपत्तीपैकी कोणती खरी हे सांगता येणार नाही. १९२९ सालीहबल-नियमाच्या शोधामुळे अनिर्णायक चर्चेच्या क्षेत्रातून ही समस्या विज्ञान क्षेत्रात आली. आणि निरीक्षणांच्या पुराव्यामुळे महास्फोट सिद्धांताला मान्यता मिळाली आहे. ही महास्फोट प्रतिकृती (big bang model) संविशेषतेनंतर १ अब्जांश सेकंद ते ३ लक्ष वर्षापर्यंत उपयोगी आहे. पण एक अब्जांश सेकंदापूर्वी काय आणि कसे घडले याविषयी वैज्ञानिकांनी गणित आणि तर्क केले आहेत. त्यामुळे १० (१ भागिले १ वर४४ शून्ये) सेकंदापर्यंत माहिती उपलब्ध आहे.

विज्ञानाची भूमिका:विज्ञानाला कल्पनाविलासाचे वावडे नाही, परंतु त्या कल्पनांना सतत पडताळ्याच्या कठोर कसोटीला तोंड द्यावे लागते. इलेक्ट्रॉन कोणीही पाहिला नाही. ही संकल्पना म्हणजे एक प्रतिकृती (model) आहे, व तिला काही गुणधर्म दिले आहेत. ही प्रतिकृती गृहीत धरून तिच्या आधारे भिन्न भिन्न क्षेत्रातील घटनांबद्दल भाकित केले तर त्यांचा अचूक पडताळा मिळतो. यामुळे वैज्ञानिक इलेक्ट्रॉनला खरी भौतिक वस्तू (real physical entity) मानतात. विज्ञानात पराकोटीचे ज्ञान संपादन करणार्‍या व्यक्ती मोजक्याच असतात. परंतु आपले संशोधन तर्कासह गणित-स्वरूपात स्पष्ट शब्दांत व्यक्त करतात. आध्यात्मिक शब्दांसारखा भोंगळपणा वैज्ञानिक संज्ञांत नसल्यामुळे त्या संशोधनाचा नक्की अर्थ शेकडो शास्त्रज्ञांना कळतो आणि ते पुढे संशोधन करतात. आरंभी आइन्स्टाइनचा सापेक्षतावाद. फारच कमी लोकांना समजला असेल पण त्या सिद्धांताच्या विकासाला आज दरवर्षी शेकडो शास्त्रज्ञ शोधनिबंधाद्वारे योगदान करीतआहेत.
वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे नवी साधने आणि उपकरणे सिद्ध करण्यात येतात. ती संकल्पित रीतीने कार्य करतात हा वैज्ञानिक कार्यपद्धतीचा विजयच आहे. ज्ञान सर्वांना मुक्त असल्यामुळे तंत्रज्ञानाची भराभर प्रगती होऊन नवी क्षेत्रे विज्ञानाच्या अभ्यासाच्या क्षेत्रात येतात. तसेच वैज्ञानिक निष्कर्ष अधिकाधिक अचूकपणे पडताळून पाहता येतात. संशोधन-प्रवास सदैव चालू असल्यामुळे विज्ञानात अंतिम असे काहीही नाही. नव्या ज्ञानप्राप्तीनंतर जुन्या कल्पनांमध्ये मोकळेपणाने सुधारणा, बदल करण्याची प्रक्रिया देखील सतत चालू असते. वैज्ञानिकांना या सर्व मर्यादा माहीत असून ते त्या मान्य करतात, पण त्यांचा विश्वास असा की जसजशी विज्ञानाची प्रगती होईल तसतशा या मर्यादा विस्तार पावतील.

याउलट अध्यात्म सर्व सृष्टीला नश्वर आणि माया मानून तथाकथित अंतिम सत्याचा (म्हणजे काय?) शोध घेते. अतएव दृश्य विश्वाला वगळून प्राप्त झालेले ज्ञानदेखील सर्वस्वी एकांगी, अपुरे आणि मर्यादित स्वरूपाचे म्हणावे लागेल. हे ज्ञान अभिव्यक्त करताना एकच शब्द भिन्न भिन्न संकल्पनांसाठी अथवा वेगवेगळे शब्द एकाच संकल्पनेसाठी वापरल्याने अर्थामध्ये नेमकेपणा नसतो. त्यामुळे हे ज्ञान अतिशय अनिश्चित/मोघम स्वरूपाचे असते. त्यात एकवाक्यता नसते. भारतीय अध्यात्माचा पाया म्हणजे आत्मा, पुनर्जन्म आणि ईश्वर यांवर विश्वास या संकल्पना विवाद्य आहेत. ईश्वरानेसृष्टी निर्माण केली अर्थात् त्याने मानवांचीही निर्मिती केली ही भूमिका अध्यात्माची आहे. वास्तविक पहाता ईश्वराने मनुष्य निर्माण केला नसून मनुष्यानेच स्वतःच्या समाधानासाठी ईश्वर निर्माण केला आहे! सामान्य माणसांना आधुनिक विज्ञान भारतीय अध्यात्मशास्त्राच्या निकट आले आहे असे वाटण्याचे कारण वैज्ञानिक शब्दांमागील संकल्पनांचे सुस्पष्ट आकलन न होणे हे आहे. परंतु एखादा वैज्ञानिक जेव्हा या दोहोंचा संबंध प्रस्थापित करू लागतो तेव्हा ज्या स्टीफेन हॉकिंगचा उतारा सदरहू लेखात दिला आहे. त्याचेच खालील विधान उत्तर म्हणून देता येईल.
“The universe of Eastern mysticism is an illusion. A physicist who attempts to link it with his own work has abandoned physics’.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.