वाचक मेळावा

मुळात ‘ नवा सुधारक’ या नावाने सुरू झालेले आमचे हे मासिक किती दिवस चालेल याची खात्री नव्हती. ‘सर्वारम्भास्तण्डुलाः प्रस्थमूलाः’ हे खरे आहे. पण नुसती तांदुळाची सोय असली तरी अशी कार्ये शेवटाला जात नाहीत. लोकाश्रय नसेल तर सारे व्यर्थ. ह्या भीतीमुळे सुरुवातीला चालकांना ‘आजीव वर्गणीदार’ ही पद्धत जाहीर करायचादेखील संकोच वाटला ही वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर ‘आजचा सुधारक’ दोन वर्षे चालला आणि तो वाढत आहे ही गोष्ट चालकांना समाधानाची वाटते. अधूनमधून वाचकांच्या पत्रांद्वारे आमच्या कामाबद्दल भल्याबुर्‍या प्रतिक्रिया मिळतात. पण त्याने पुरेसे प्रतिपोषण होत नाही. म्हणून खुला वाचक मेळावा घ्यायचा परिपाठ आम्ही ठेवला आहे. यावर्षी एप्रिल ९२ मध्ये हा मेळावा झाला. आजचा सुधारक हे मनुताई नातूंचे वाङ्मयीन स्मारक म्हणून सुरू झालेले नियतकालिक आहे हे वाचकांना आठवत असेल. मनुताईंचा स्मृतिदिन एप्रिल महिन्यात येतो. त्यामुळे स्मृतिदिन आणि वाचकमेळावा असा संयुक्त कार्यक्रम २१ एप्रिल रोजी घेतला. नागपूरच्या प्रि. आय् .ए.एस. कोचिंग सेंटरचे संचालक प्रिं. प. सि. काणे हे विदर्भ महाविद्यालयात अनेक वर्षे मनुताईंचे सहकारी होते. कार्यक्रमाच्या आरंभी प्रि. काण्यांनी मनुतांईच्या कार्याचे व व्यक्तिमत्त्वाचे मर्म विशद करून त्यांना भावसुमनांजली अर्पण केली व पुढील कार्यक्रमाची सूत्रे अध्यक्ष प्रा. सुरेश द्वादशीवार यांच्या स्वाधीन केली. प्रा. द्वादशीवारांनी वाचकांच्या लिखित प्रतिक्रयांचे सारांश वाचून दाखविण्यास आजचा सुधारकचे साहाय्यक संपादक श्री.प्र.ब.कुळकर्णी ह्यांना पाचारण केले. ह्या मेळाव्यापूर्वी नागपुरस्थ काही वाचकांना प्रत्यक्ष भेटून विनंती करून त्यांच्या लिखित प्रतिक्रिया मिळविल्या होत्या. गेल्या दोन वर्षांच्या एकूणच लिखाणाबद्दल, संपादकीय धोरणाबद्दल किंवा मासिकाच्या कोणत्याही अंगाबद्दल मोकळेपणाने अनुकूल प्रतिकूल, विशेषतः प्रतिकूल टीकाटिप्पणीचे स्वागत होईल अशीविनंती करण्यात आली होती. या आवाहनानुसार दहा वाचकांनी आपले म्हणणे लेखी कळवले होते. अर्थात वेळेवरही अभिप्राय आणि सूचना करता येणार होत्या. पण पूर्वविचाराने, संदर्भ देऊन केलेली चर्चा अधिक मोलाची ठरणार होती. झालेली चर्चा निःसंशय उद्बोधक झाली. तिचा अतिसंक्षिप्त गोषवारा सादर करीत आहोत.
१. अंधश्रद्धा, सुधारणा हे प्रश्न नुसत्या हिंदूंपुरतेच सीमित नाहीत. सतत एका समाजालाच उपदेश करत गेल्याने ते लोक अधिक बचावात्मक भूमिका घेतात. इतर समाजात काही सुधारणांचे कार्य होत असेल तर ते सांगावे.
२. विवेकवाद नकारात्मक तत्त्वज्ञान आहे. स्वातंत्र्यलढ्यासारख्या मोठ्या कार्याच्या प्रेरणा प्रखर भावनेपोटी मिळतात. यावरून विवेकापेक्षा भावना अधिक कृतिप्रेरक आहे असे दिसते.
३. गांधीवाद हे एक संपूर्ण तत्त्वज्ञान -जीवनविषयक, आहे. आ. सुधारकाने त्याची दखल घ्यावी.
४. भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास रसेलच्या ‘ मॅरेज अँड मॉरल्स’ इतकाच चित्तवेधक आहे आणि विचारप्रवर्तकदेखील. त्याचा परामर्श घेतला पाहिजे.
५. परंपरा, श्रद्धा आणि ईश्वरनिष्ठा नाकारून आपण बहुजनांचा बुद्धिभेद करणार काय?
६. प्रा. दि. य. देशपांडे यांचे लिखाण अधिक परिणामकारक व्हायचे असेल तर ते सोप्या सुबोध भाषेत मांडणे जरूर आहे.
७. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांत भेद करणे आवश्यक आहे. पुष्कळ धार्मिक समजले गेलेले आचार विज्ञानावर अधिष्ठित आहेत. त्यांच्या मागे आयुर्विज्ञान आहे.
८. प्रतिमा आणि देवतापूजन ही टाकाऊ गोष्ट नाही. ज्युडोकराटे शिकणारांना ब्रूस ली आणि रंगभूमी कलावंताना नटेश्वर स्फूर्ती आणि हिंमत देतो हे पटते तर बलोपासकांनी बजरंग बली किंवा सूर्याची उपासना केली तर का खटकावे?
९. विवाहसंस्था कामजीवनाच्या नियमनासाठी आहे. स्वैराचाराचे समर्थन केले तर जो समाज आ. सुधारकांना सुधारायचा आहे तोच शिल्लक राहणार नाही.
१०. हिंदुधर्म, हिंदुसमाज आणि हिंदुत्व या संकल्पना एकच समजून टीका होत आहे.
११. संपादक प्रा. देशपांडे हिंदूंना स्वजन म्हणतात. उघडच ते अहिंदूंना इतरेजन समजत असावेत, मग सावरकर भारताला पूण्यभू समजणार्‍यांना हिंदू आणि तसे न मानणार्‍यांना अहिंदू म्हणतात त्याचा आपल्याला राग येऊ नये,
१२. सावरकारांनाही इतिहासातील हिंदू-मुस्लिम भांडणे आज भांडायची नाहीत. सर्वांची एकत्र राहण्याची इच्छा ही महत्त्वाची तिलाच वेबाँ राष्ट्र म्हणतो.
१३. आजचा सुधारकच्या वर्गणीदारांची नावे, पत्त्यासह एकदा प्रसिद्ध करावीत, या विषयांमध्ये कोणाकोणाला आस्था आहे ते कळेल. नियतकालिकांच्या संपादकांना, पुस्तकप्रकाशकांना, व्याख्यानमालांच्या आयोजकांना उपयोगी पडण्यासारखी ही माहितीआहे.
१४. महाराष्ट्रातील जिल्हा वर्तमानपत्रांना आजचा सुधारकमधीलआवडलेले लेख अग्रलेखाच्या पानावर पुनर्मुद्रित करण्याची विनंती करावी. याने आपली प्रसिद्धी होईल आणि त्यांनाही दर्जेदार लिखाणाची जी वाण असते ती अंशतः दूर करता येईल.
१५. आपल्या पत्रिकेस कुटुंबपत्रिका, गटपत्रिका किंवा प्रातिनिधिक लेखसंग्रह असे स्वरूप येणार नाही याची काळजी घ्यावी.
१६. प्रा. देशपांडे यांचे विवेकवादाचे विवेचन तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकाला फार उपकारक आहे.
१७. आत्मतुष्ट विद्याविभूषितांना आपण समतेपासून किती दूर आहोत याचे भान आणून देणे अवश्य आहे. आ. सुधारक ते काम करीत आहे.
१८. गीता मानवी व्यक्तित्वातील विराटतेच्या पेशींना प्रतिसाद देणारा ग्रंथ आहे. म्हणून कोणत्याही पातळीवरील मनुष्याला त्यातून लाभ होत आला आहे. मानवी व्यक्तित्वात केवळ गणित, न्याय आणि तर्क यांच्याच पेशी तेवढ्या नाहीत.गीतेत मोक्ष हे साध्य ठरविलेले असले तरी त्यातच कर्तव्य अंतर्भूत आहे. विवेकी जीवन हे संपूर्ण जीवनाचे एक अंगमात्र आहे असे सिद्धांना वाटत आले आहे. गीतेत साधकाची पातळी विचारात घेतली तशी सिद्धाचीही घेतली आहे. पारमार्थिक पातळीवरील उपपत्ती आजमावून पाहण्याचे साधकाचे स्वातंत्र्य आपण हिरावून घेऊ शकत नाही. निदान विवेकवादी पातळीवरून तर नाहीच नाही.
१९. आ. सुधारकात वाचकाला सतत जाणवतो तो तोचतोपणा. इतके एकसुरी पत्र दुसरे नसेल.
२०. धर्मनिरपेक्षतेवरील परिसंवाद वांझोटा ठरला आहे.
२१. भाषेचा कठिणपणा लेखकवाचकांमधील आपुलकी किंवा सुसंवाद यात येणारा अडथळा आहे. कधी कधी तर हे लिखाण एक पोज (pose) म्हणून केल्यासारखे वाटते.
२२. गंभीर विषयावरील मासिकालाही खेळकरपणाचे वावडे नसावे. एखादे पान, शेवटचे पान अशा लिखाणाला द्यावे.
२३. बहिरंग स्वच्छ व आकर्षक आहे. मुखपृष्ठ मात्र नको तेवढे साधे आहे.
२४. विवेकवादावरील लिखाणात भाषेचा काटेकोरपणे वापर केलेला दिसतो. हे लिखाण अनलंकृत भाषेत स्वच्छ विचार अभिनिवेशमुक्त शैलीत कसे मांडावेत याचाआदर्श आहे. मराठी भाषेचे सामर्थ्य प्रगट करणारे आहे.
२५. विवेकवाद ही जीवनपद्धती आहे केवळ एक विचारसरणी नाही असे संपादकीय मत आहे. मग इतर पद्धतींनी जगणारांचे उत्कट, प्रामाणिक जीवन आणि त्याचे चित्रण करणारी कलाकृती यांचे मूल्यमापन तुम्ही कसे करणार? साहित्य आणि समीक्षा या संदर्भात पडलेला हा प्रश्न आहे. ‘सत्य असत्यासि मन केले ग्वाही म्हणणार्‍या तुकारामाच्या कवितेचे स्थान आता कोणते राहील? साहित्य, व्यवहार आणि विवेकवाद यांच्या संबंधावर या मासिकातून प्रकाश पडावा ही अपेक्षा.
२६.’विवाह आणि नीती’ ही लेखमाला महत्त्वाची आहे. पण ती वाचताना एक प्रकारचा दूरस्थपणा जाणवतो. सततच्या पाश्चात्य संदर्भामुळे किंवा भाषांतरामुळे तसे वाटत असेल.
२७. वाचकांचा पत्रव्यवहार वेगवेगळ्या वैचारिक पातळ्यांवरून चाललेला दिसतो. आपली भूमिका कोणीच सोडत नाही. पिष्टपेषणाचे रूप येईल अशी भीती वाटते.
२८. आ. सुधारका मधील लिखाण केवळ प्रौढांकरिताच आहे काय? तरुण मने, त्यांच्या आकांक्षा, प्रेरणा यांची कुठे दखल घेतलेली दिसत नाही.
२९. गीताविषयक लिखाणात जबाबदारीची जाणीव दिसत नाही. गीतेची तुलना नीतिशास्त्रावरील पाश्चात्य ग्रंथांशी करणे बरोबर नाही. धम्मपद, ख्रिस्ताचा उपदेश ती यांशीकरा.
३०. आर्थिक (अर्थशास्त्रीय) दृष्टिकोणाचे सुधारको लिखाण प्रसिद्ध व्हावे.
३१. मनुस्मृतीतील विचारांवर टीका करताना मनुकालीन इतर समाजातील विचारसरणी पाहा. कन्फ्यूशस, बायबलचा जुना करार यांतील विचारांशी तुलना करा. मग मनु तेवढा भयंकर वाटणार नाही.
३२. आ. सुधारक चे बहुसंख्य वाचक, लेखक, शिक्षणक्षेत्राशी संबद्ध आहेत. त्या क्षेत्रात जे चालले आहे त्याचा, त्या अपप्रवृत्तींचा विचार, सखोल विचार व्हावा.
३३. ग्राहक-संरक्षण-विषयक काही कायदे, ग्राहकांचे हक्क या विषयांनाही स्थान द्यावे.
३४. परंपरेत टाकाऊ आणि टिकाऊ असे दोन्ही अंश आहेत. आपले लिखाण फक्त Sanitary Inspector’s Report बनू नये.
३५. गीतेसंबंधीच्या लिखाणात श्रीकृष्णाबद्दल अनुदार भाषा वापरली आहे. त्यातून लेखकाचे पूर्वग्रह दिसतात.
३६. मोक्ष, स्थितप्रज्ञ या संकल्पना समजून घेतलेल्या दिसत नाहीत. सुख-दुःख हे अनुभव द्वंद्वजनित आहेत. मनात उमटतो तो भावार्थ असतो. यथार्थ असतो केवळ अस्तित्वभाव. गीता, अध्यात्मशास्त्र यावरील लिखाण ढोबळ विवेचन आहे. अन्यायकारक आहे.
३७. बेछूट, स्वैरवृत्तींचे समर्थन नसावे.
३८. अध्यात्मवादी, हिंदुत्ववादी विचारसरणीचे घातक पुनरुज्जीवन होत आहे तिला ठोस उत्तरे द्या.
(या सारांशात आलेले विचार पुढील वाचकांनी मांडले आहेत. प्रा. जयंत देवधर, प्रा. घोंगे, श्रीमती प्रवीणा कवठाळकर, डॉ. श्री. प्र. कुळकर्णी, श्री. अजय अंबेकर (गोवा), डॉ. उषा गडकरी, डॉ. के.पी. आंबेकर, डॉ. विजया डबीर, प्रा. बोरावार, प्रा. लोथे, श्री. श्रीकांत कारंजेकर (वर्धा) प्रा. बा.के. सावंगीकर, डॉ. नी.र. वर्हा,डपांडे, डॉ. कुमार शास्त्री, डॉ. सतीश शास्त्री, डॉ. सुरेश देशपांडे, डॉ. नलिनी वर्हागडपांडे, डॉ. अयाचित.)
चर्चेला प्रमुख संपादक प्रा. दि.य. देशपांडे यांनी संक्षिप्त उत्तरे दिली. तपशीलवार उत्तरे, संपादकीय भूमिकेचे स्पष्टीकरण इ. गोष्टी पुढे ‘आ. सुधारक’च्या माध्यमातून यथावकाश होतीलच.
वाचकांनी चर्चेत मनापासून भाग घेतला यातून त्यांची जी आपुलकी प्रकट झाली त्याबद्दल त्यांनी वाचक श्रोत्यांना धन्यवाद दिले.
मेळाव्याचे अध्यक्ष प्रा. द्वादशीवार यांनी उपक्रमाचे कौतुक केले. एक वैचारिक मासिक विदर्भातून निघावे, ते दोन वर्षे चालावे आणि एवढ्या समारंभाने त्याने वाचकमेळावे भरवावे ह्या सगळ्याच बाबी नागपूरकरांना भूषणास्पद आहेत असे ते म्हणाले. पूर्वग्रह आणि सांप्रदायिक विचारांच्या चौकटी टाकून मुक्तपणे लिखाण व्हावे. नव्या विचाराचे वाचकांनी स्वागत करावे असे आवाहन करून त्यांनी अध्यक्षीय समारोप केला.वाचकमेळाव्याला शहरातील सुमारे पन्नास वाचक उपस्थित होते. अकोल्याहून डॉ. शेषराव हराळे व डॉ. विमल भालेराव हे दाम्पत्य आणि वध्र्याहून श्री. श्रीकांत कारंजेकर अगत्यपूर्वक आले होते. वाचकसंघातर्फे प्रा. पु.गो. कवठाळकर यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम घडवून आणला. डॉ. सौ. सुनंदा वसू यांनी अल्पोपाहाराची बाजू सांभाळली. सुमारे अडीच तास चाललेल्या या कार्यक्रमाच्या यशस्वितेबद्दल सर्व संबंधीयांचे आभार आ. सुधारकचे सहा. संपादक प्रा. बा. य. देशपांडे यांनी मानले आणि हा उत्साहवर्धक कार्यक्रम संपला.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.