धर्म वेगळा, रिलिजन वेगळा

भारतीय संविधानानुसार भारत हे जसे लोकशाहीप्रधान राज्य तसेच ‘सेक्युलर’ म्हणजे ‘धर्मनिरपेक्ष’ राज्य आहे. इंग्रजी भाषेतील ‘रिलिजन’ला समानार्थी शब्द म्हणून ‘धर्म’चा वापर करण्यात येतो. ‘धर्म’ व ‘रिलिजन’ या संकल्पना एक नव्हेत. ‘सेक्युलर म्हणजे ‘रिलिजन’निष्ठ राज्य नाही; तर धर्मप्रधान राज्य होय. परंतु ‘धर्म व रिलिजन’ यांचा समानार्थी वापर केल्यामुळेच ‘सेक्युलर’चा देखील चुकीचा अर्थ लावण्यात आला हे यथामति सांगण्याचा येथे प्रयत्न केला आहे.
जो राजकीय पक्ष संविधानाशी एकनिष्ठ नाही, त्यास निवडणुकांत भाग घेता येणार नाही. निवडणुकीच्या प्रचारात धार्मिक भावनेस आवाहन करून प्रचार केल्याचे सिद्ध झाल्यास न्यायालय विजयी उमेदवाराची निवड रद्द करू शकते. कदाचित त्यामुळे भारतीय जनता पक्षाने आपला ‘सेक्युलरिझम’ला विरोध नसून स्यूडो-सेक्युलरिझम’ला विरोध आहे अशी भूमिका घेतली असावी. ‘धर्मनिरपेक्षतेला’ नव्हे तर मिथ्या धर्मनिरपेक्षतेला विरोधी असलेल्या पक्षाने ‘होकारात्मक धर्मनिरपेक्षता’ स्पष्ट केल्याचे फारसे वाचनात नाही. परंतु मुळातच असा प्रयत्न नागरिक-जागृतीच्या दृष्टीने आवश्यक आहे.
सेक्युलरिझमचे विविध अर्थ:
युरोपमधील सुधारणावादासाठी जे प्रयत्न आले, ते प्रामुख्याने ख्रिश्चन रिलिजनमध्ये सुधारणा करण्याचे (Reformation) प्रयत्न म्हणून ज्ञात आहेत. रोमनिवासी पोपचे नेतृत्व मानणार्‍या कॅथॉलिक उपपंथाच्या विरोधात ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी इ. देशात अनेक उपपंथ उभे राहिले. ग्रेट ब्रिटनचा राजा स्वार्थाने कॅथॉलिक उपपंथ नाकारून सुधारणावादी उपपंथाचा अनुयायी झाला. तेव्हापासून ग्रेट ब्रिटनमध्ये ‘खो खो’चा खेळ सुरू झाला. राजसत्ता कॅथॉलिक राजाच्या हाती असे तेव्हा प्रॉटेस्टंटांचा छळ होई व राजा प्रॉटेस्टंट असल्यास कॅथॉलिकांचा. कालांतराने दोन्ही उपपंथीयांची डोकी ठिकाणावर आली. कॅथॉलिक चर्चतर्फे चालविल्या जाणार्‍या शाळांत ‘रिलिजन’ या तासिकेमध्ये कॅथॉलिक उपपंथानुसार शिकविले जाई. डोकी शांत झाल्यावर प्रॉटेस्टंट पालक असे लिहून देऊ शके की आपल्या पाल्यास ‘रिलिजन’च्या तासिकेला गैरहजर राहण्याची परवानगी असावी. ही सवलत ज्या कलमाद्वारे मिळे त्यास ‘सदसद्विवेकाचे कलम’ म्हणत. ज्या विषयांत या जगतातील (इहलोकातील) विषयांचे अध्यापन होई ते विषय तो प्रॉटेस्टंट पाल्य शिके. ही सवलत अन्य उपपंथांच्या शाळेतील कॅथॉलिक पाल्यांना देखील मिळे. जगद्विषयक (ऐहिक) शिक्षणास सेक्युलर एज्युकेशन असे संबोधले जाऊ लागले. मात्र ग्रेटब्रिटनच्या राज्याचा प्रेस्बिटेरियन हा ख्रिश्चन रिलिजनचा उपपंथ अधिकृत रिलिजन असे.
उत्तर अमेरिकेतील आजच्या ‘अमेरिकेची संयुक्त संस्थाने’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या प्रदेशातील, म्हणजेच अमेरिकेच्या मूळच्या तेरा वसाहतींत बहुसंख्य लोक इंग्रज होते. त्यांत कॅथॉलिक, प्रेस्बिटेरियन जसे होते तसेच काही इटालीतील प्रॉटेस्टंट, जर्मनीतील कॅथॉलिक, तर फ्रान्समधील कॅलव्हिनिस्ट इ. युरोपीयांतील भिन्न उपपंथांचेही लोक होते. उपपंथनिष्ठेमुळे मातृभूमीचा त्याग केलेल्या त्या सर्वांनीच आपल्या वसाहतींच्या ग्रेटब्रिटनच्या वर्चस्वापासून मुक्त होण्याच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. तेथेही जुनाच प्रश्न पुन्हा उभा राहिला. त्यांनी तेथे जे उत्तर शोधले ते नवे होते. राज्याला जो कर नागरिकांतर्फे प्राप्त होतो, त्यातील एक नवा पैसादेखील कोणत्याच रिलिजनच्या प्रसारावर व अध्यापनावर खर्च होऊ नये. रिलिजनचे शिक्षण हा कुटुंबाचा प्रश्न आहे. प्रत्येक ख्रिश्चन उपपंथाचे अनुयायी स्वतःच्या खर्चाने स्वतःचे चर्च उभारत. गुलाम म्हणून आलेले निग्रो बहुतांशी ख्रिश्चन रिलिजनचे अनुयायी असत. बहुसंख्य ख्रिश्चनांनीच हा मार्ग स्वीकारल्याने अल्पसंख्य ज्यू व मुस्लिमांना तो मार्ग स्वीकारणे कठीण वाटले नाही.
थोडक्यात ‘सेक्युलर’चा उदय असा झाला. ज्ञानाच्या क्षेत्रातील जे विषय या जगाशी (इहलोकाशी) संबंधित त्यांचा अभ्यास. त्यातून ‘सेक्युलरिझम म्हणजे ‘इहवाद असे मानले जाऊ लागले. भारतात देखील ‘सेक्युलर विषयांचे शिक्षण शासनमान्य शिक्षणसंस्थांतून दिले जावे, हा विचार प्रथम इंग्रजी सत्तेच्या प्रारंभीच आला.
इ. स. १८५७ ते इ. स. १९४७ च्या प्रदीर्घ स्वातंत्र्यलढ्याच्या काळांतच इंग्रजीसत्तेच्या ‘फोडा व झोडा’ या धोरणाच्या विषवल्लीला हिंदू विरुद्ध मुस्लिम हे विषारी फळ आले. हिंदुस्थानची फाळणी होऊन देखील हे फळ नष्ट न झाल्याने सेक्युलरिझमचा अर्थ ‘सर्वधर्मसमभाव’ असा रुजविण्याचा प्रयत्न मौ. आझाद यांनी केला. परंतु तोपर्यंत ‘रिलिजन’ म्हणजेच ‘धर्म’ हा अर्थ रूढ झाला होता. परिणामतः हिंदुधर्म, मुस्लिमधर्म किंवा ख्रिश्चन धर्म असा शब्दप्रयोग सर्रास रूढ झाला.
‘रिलिजन’ म्हणजे ‘धर्म’ हा अर्थ कसा रूढ झाला?
ईस्ट इंडिया कंपनीने जेव्हा व्यापाराबरोबर सत्तास्थापनेस प्रारंभ केला तेव्हा इंग्रजी भाषेच्या, संस्कृतीच्या प्रसाराचे कार्यही हाती घेतले. पोर्तुगीजांप्रमाणेच ब्रिटिश मिशनरीदेखील ख्रिश्चन रिलिजनच्या प्रसारासाठी भारतात आले. धाक, दडपशाही, तलवार व प्रलोभने याबरोबरच भारतीय मनाला येशूचा मार्ग पटला पाहिजे हे त्यांनी ओळखले. पवित्र बायबलचे भाषांतर भारतीय प्रादेशिक भाषांत करण्यास त्यांनी प्रारंभ केला. त्यासाठी ख्रिस्तीधर्मप्रसारकांपैकी काही संस्कृत शिकले. इंग्रज व अन्य पाश्चात्य विद्वानांचा भारतीय संस्कृतीशी परिचय झाला. जातिभेदावर आधारलेला हिंदुसमाज हजार वर्षे अनेक आघातसहन करून टिकला याचे रहस्य शोधण्याच्या प्रयत्नांत ते वेद, उपनिषदे, गीता इ. ग्रंथांचा अभ्यास करू लागले. या विद्वानांना इतिहासात पौर्वात्यवादी म्हणून ओळखले जाते. ‘संस्कृत’ या अभिजात भाषेचा अभ्यास करून, संस्कृतमधील ग्रंथांचे इंग्रजीत भाषांतर व अभ्यास हे ख्रिश्चन प्रसारक व पौर्वात्यवादी यांचे उद्दिष्ट होते. त्यासाठी इंग्रजीच्या आधारे संस्कृत शिकण्याशिवाय अन्य पर्यायही नव्हता. भाषा ही त्या समाजाच्या संस्कृतीची वाहक असते. प्रत्येक भाषेतील पदांचा गुणार्थ व द्रव्यार्थ ती भाषा ज्या भूमीत जन्मास येते तेथील संस्कृती, जीवन, कला व परंपरा यांनी निश्चित होत असतो.
इंग्रजी मातृभाषा असलेले जेव्हा संस्कृत ही परकीय भाषा शिकू लागले तेव्हा संस्कृत शब्दांना समानार्थी इंग्रजी शब्द निश्चित करणे त्यांना आवश्यक वाटू लागले. ‘धर्म’ साठी जेव्हा इंग्रजीतील ‘रिलिजन’ शब्द त्यांनी समानार्थी म्हणून निश्चित केला तेव्हा त्यांना प्रामाणिकपणे वाटले की ‘धर्म चा गुणार्थ व द्रव्यार्थ शंभर टक्के ‘रिलिजन मधून व्यक्त होतो. मात्र प्रत्यक्षात घडले ते असे की नकळत ‘रिलिजन’चा गुणार्थ व द्रव्यार्थ ते ‘धर्म मध्ये पाहतात. मोनियर विल्यम्सने इ. स. १८५१ मध्ये ए डिक्शनरी ऑफ इंग्लिश अँड संस्कृत मध्ये ‘रिलिजन’ या शब्दाचा समानार्थी संस्कृत शब्द ‘धर्म असाच दिला. आंग्ल पौर्वात्यवाद्यांची कळकळ व विद्वता यांनी प्रभावित झालेल्या भारतीय विद्वानांनी प्रथम हे स्वीकारले व नंतर सामान्य भारतीय तसा वापर करू लागले. त्यामुळे वैचारिक गोंधळ मात्र वाढला.
वैचारिक गोंधळाचे स्वरूप
‘धर्म व राजकारण’ समवेत चालती ही स्वामी रामदासांची काव्यपंक्तीदेखील त्यामुळे वादविषय ठरली. ख्रिश्चन रिलिजनचा प्रमाणित ग्रंथ ‘पवित्र बायबल’, मुस्लिमांचे ‘पवित्र कुराण. हिंदू धर्म म्हणजे जर हिंदू रिलिजन तर हिंदूंचा प्रमाणित पवित्र ग्रंथ कोणता? नव्हताच तर उत्तर काय देणार? पुढे विद्वानांनी ‘गीता’ हे त्याचे उत्तर शोधण्याचा अट्टाहास केला. जैन मत पटल्याने काही हिंदू जैन झाले. बौद्ध मत पटल्याने हजारो हिंदू बुद्धानुयायी झाले. या उलटही घडले. अनेक हिंदू शीखही झाले. परंतु ख्रिश्चनमुस्लिमांप्रमाणे तलवार, प्रलोभनाच्या मार्गाने जैन, बौद्ध, शीख किंवा हिंदूंनी स्वमताचा प्रसार केल्याचे उदाहरण नाही. हिंदू म्हणून जन्मावा लागतो. हिंदू मताचा त्याग करता येतो, पण अन्य रिलिजन असणारे हिंदू बनण्याचा राजमार्ग नव्हता. थोडक्यात अन्य रिलिजनशी तुलना करिता हिंदू रिलिजन नाही, म्हणून हिंदूधर्म नावाचा धर्मच नसावा, असे हिंदूंनाच वाटू लागले. हिंदू म्हणून कोणी जन्मतच नाही. ब्राह्मण, मराठा, तेली इत्यादि म्हणून तो जन्मतो. जातिनिष्ठ पूजा, उपासना, देव-दैवते व रीती म्हणून स्वीकारतो. मग तो हिंदू कसा?
ख्रिश्चन-मुस्लिमांत उपासना, विधी करण्याचा अधिकार असणार्‍या पुरोहित वर्गाच्या श्रेणीबद्ध संघटना आहेत. हिंदूंचा भिक्षुक केवळ ब्राह्मण म्हणून जन्मला म्हणून पौरोहित्यकर्म शिकण्यास पात्र, पण त्याचेही नियमन करणारे संघटन नाही. हिंदुधर्माचे अनागोंदी, अव्यवस्थित, अनिश्चित स्वरूपच निश्चित पाहून, हिंदू असतील पणहिंदूधर्म नांवाची चीजच नसावी असे हिंदूंनाच वाटणे यास वैचारिक गोंधळाशिवाय काहीअन्य म्हणणे शक्यच नाही. प्रगतिवादी हिंदू त्यामुळे ‘हिंदू’ शब्दाची व्युत्पत्तीदेखील मोठी मजेशीर पण गंभीरपणे मांडू लागले. ग्रीक, पर्शियन, शक, मुस्लिम आक्रमक सिंधूचा उच्चार हिंदू असा करीत. त्यांच्या दृष्टीने सिंधू म्हणजेच हिंदू नदीच्या पूर्वेकडील प्रदेशांत राहणारे ते सर्व हिंदू व त्यांचा जिंकलेला प्रदेश म्हणजे हिंदुस्थान. आक्रमकांनी पराभूत प्रदेशातील जनसमूहास दिलेले सामान्य नाव म्हणजे हिंदू. भिन्न जाती, भिन्न भाषा, भिन्न परंपरा जगणारे, पण पराभूतपणात साम्य असणारे सिंधुनदीच्या पूर्वेकडील प्रदेशात राहणारे ते हिंदू. पुढे जित जेते झाले व हेटाळणीवाचक सामान्य नामाचा त्यांनी सन्मानवाचक विशेषनाम म्हणून स्वीकार केला. परंतु मुळांतील समानतेचा अभाव असण्याचे गुणवैशिष्ट्य कायम राहिले. हिंदू नावाचा धर्म नाही, हे सांगणारी भारतीय प्रगतिवाद्यांची विशेषत्वाने भारतीय साम्यवाद्यांची विचारसरणी शब्दशः अशी नसली तरी सूत्र हेच आहे.
हिंदू मन वरीलप्रमाणे भ्रांत होण्याचे खरे कारण, ‘धर्म म्हणजेच रिलिजन’, या चुकीच्या गृहीतकाचा स्वीकार होय. ‘रिलिजन’ व’धर्म’ या दोन संकल्पना भिन्न कशा, हे त्यासाठी पाहणे आवश्यक आहे.
‘रिलिजन’ म्हणजे काय?
ऑक्सफर्ड कन्साईज डिक्शनरीत ‘रिलिजन’चा अर्थ खालीलप्रमाणे दिला आहे.
(1) Monastic condition, being monk or nun; (2) a monastic order; (3) practice of sacred rites; (4) one of the prevalent systems of faith and worship; (5) human recognition of superhuman controlling power and especially of a personal God entitled to obedience; effect of such recognition on conduct and mental attitude; (6) action one is bound to do.
‘रिलिजन’चा अर्थ काही विशिष्ट विधी पवित्र मानून ते करणे. श्रद्धा व पूजा करण्याच्या विविध प्रचलित पद्धतींपैकी एकीचा स्वीकार. मानवावर नियंत्रण ठेवणार्‍या अतिमानवी शक्तीला, विशेषत्वाने व्यक्तिप्रधान ईश्वराला, मान्यता व त्याच्या समोर नतमस्तक होणे. शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा विशेष असा की प्रत्येक रिलिजनचा मृत्यूनंतर आत्म्याच्या स्थानासंबंधी एक निश्चित असा दृष्टिकोन असतो. त्यामुळेच निर्वाण, मोक्ष, स्वर्ग किंवा नरक, वैकुंठवास किंवा शिवस्वरूप होणे, विश्वाचा शेवटचा दिवस व त्या दिवशी परमेश्वराचा निवाडा इ. भिन्न दृष्टिकोन भिन्न रिलिजनांचे असतात. लिंगायत मृतदेहाला एका विशिष्ट आसनात पुरतात, तर काही मृतदेहाचे दहन करतात. परिणामतः प्रत्येक रिलिजनचे एक प्रमाणित पवित्र पुस्तक असते. त्यातील आज्ञानुसार वर्तनाचे फळ इहलोकी मिळणार नसते तर मृत्यूनंतर मिळणार असते. या आज्ञांना अनुयायी तर्काचा, बुद्धीचा निकष लावत नाहीत. त्या आज्ञांना अनुयायी गृहीतके म्हणून स्वीकारतो.ख्रिश्चन रिलिजनचे ‘पवित्र बायबल’च्या अर्थासंबंधी काळाच्या ओघात अनुयायांत मतभेद, झाले; परंतु ‘पवित्र बायबल’ हा प्रमाणित, निरपेक्ष सत्य सांगणारा ग्रंथ, विश्वाचा शेवटचा दिवस व त्या दिवशी होणारा परमेश्वराद्वारे निवाडा या बाबतीत ख्रिश्चन रिलिजनचे उपपंथीयांत मतभेद नाहीत. या उलट अद्वैत, द्वैत, द्वैताद्वैत इतकेच काय नास्तिक देखील हिंदू. यज्ञ करणारे, मूर्तिपूजा करणारे; शिवालाच सर्वश्रेष्ठ मानणारे, विष्णूलाच सर्वश्रेष्ठ मानणारे देखील हिंदूच. म्हणून हिंदूरिलिजन नाही. थोडक्यात मृत्यूनंतरचे आत्म्याचे स्थान व अस्तित्व हा रिलिजनचा विषय होय. अंतिमतः प्रत्येकाचा आत्मा स्वतंत्र असून त्यास मृत्यूनंतर जी स्थिती प्राप्त होणार ती देहधारी आत्म्याने केलेल्या कर्मानुसार, हे प्रत्येक रिलिजन मानतो.
‘धर्म’ म्हणजे काय?
‘धर्म’ ही संकल्पना फक्त हिंदुसमाजालाच लागू आहे. वेद, उपनिषदे, गीता, भिन्न दर्शने हे हिंदूंचे काही प्रमुख ग्रंथ होत. मध्ययुगात जे ग्रंथ निर्माण झाले ते प्रामुख्याने प्राचीन ग्रंथांवरील भाष्ये म्हणून. यांतून ‘धर्म याच्या अनेक व्याख्या आढळतात. प्राचीनकाळातील ‘धर्म या संकल्पनेचा विकास कसा झाला हे या व्याख्यांवरून स्पष्ट होते. ‘महाभारत’ हा प्राचीन काळातील शेवटचा ग्रंथ होय. त्याचप्रमाणे ‘धर्म’ हा शब्द अनेक संदर्भात वापरलेला आढळतो. उदा. ब्राह्मण धर्म, क्षत्रिय धर्म, आश्रम धर्म, पत्नी धर्म इ. परंतु वरील सर्व शब्दप्रयोगांत ‘धर्म या नामाला ब्राह्मण, क्षत्रिय इ. विशेषणे लागली आहेत. सामान्य नामाचा अर्थ संकुचित करणारे ते विशेषण, हे सुज्ञास सांगण्याची गरज नाही. त्यामुळे ‘धर्म या शब्दाचा अर्थ पाहणेच आवश्यक होय.
महाभारतातील शांतिपर्वातील अध्याय १०९ चा प्रारंभच प्रश्नाने होतो. युधिष्ठिर भीष्माला विचारतो, “धर्मामध्ये राहू इच्छिणार्‍या मनुष्याने कोणत्या प्रकारचे वर्तन ठेवले पाहिजे हे जाणावयाची मला इच्छा आहे.” युधिष्ठिर पुढे आपली नेमकी अडचण स्पष्ट करतो.“सत्य आणि असत्य ही उभयता सर्व लोकांना व्याप्त करून राहिलेली आहेत. त्यापैकी धर्माचे आचरण करण्याविषयीचा निश्चय असलेल्या मनुष्याने काय आचरण केले पाहिजे?”
भीष्माने उत्तर देताना सांगितले, “हा प्रश्न असा आहे की, त्यामध्ये धर्म कोणता याची निवड करणे अत्यंत कठीण आहे, व त्याच्या भेदाची गणना करिता येणे अशक्य आहे. मगया विषयीचा निश्चय ठरवावा कसा? अर्थात् ठरविता येणे अशक्य आहे.”
यावरून काही अनुमाने काढता येतात. अमुकच धर्म असा अंतिम निर्णय देता येत नाही. धर्म हा फक्त सत्य किंवा असत्यावर आधारलेला नाही. याउलट प्रत्येक रिलिजन आत्म्यासंबंधीचे अंतिम सत्य निश्चयात्मकपणे सांगतो.
मग धर्माचा निकष कोणता?
भीष्म पुढे सांगतो, ‘…. लोकांच्या अभ्युदयासाठीच धर्म सांगितलेला आहे. ह्यामुळेज्याच्या योगाने लोकांचा अत्यंत उत्कर्ष होईल तोच धर्म होय, असा विश्वास आहे. ‘धर्म’ शब्दाचा अर्थ धारण करणे असा आहे. सर्व लोकांना धर्माचेच अवलंबन असल्यामुळे, धर्मानेच त्यांना धारण केले आहे. म्हणूनच ज्याच्या योगाने धारण होईल तो धर्म होय असा सिद्धान्तआहे….”
धर्म लोकांसाठी आहे; लोकांच्या उत्कर्षासाठी आहे. धर्म समाजासाठी आहे, व्यक्तीसाठी नाही.
धर्म व रिलिजन यांमधील फरक :
रिलिजन व्यक्तिनिष्ठ आत्म्यासाठी, आत्म्याच्या अंतिमाच्या ज्ञानासाठी आहे. ते गृहीतक प्रमाण म्हणून अनुयायाने स्वीकारले पाहिजे व त्यास प्रमाण मानून अनुसरले पाहिजे. धर्म लोकांसाठी – समाजासाठी – आहे. सत्याचा असत्यासारखा उपयोग होत असेल तर सत्य भाषण न करावे, उलट असत्य भाषण करावे असे धर्म सांगतो. रिलिजन सत्य असत्य असा द्वंद्वात्मक विचारच करीत नाही. रिलिजन निरपेक्ष तर धर्म सापेक्ष आहे. धर्म समाजनिष्ठ तर रिलिजन व्यक्तिनिष्ठ आहे. समाजधारणा करणे, समाजाचा उत्कर्ष साधणे यासाठी धर्म आहे. लोक जेव्हा धर्माचे पालन करतील तेव्हाच धर्म समाजाचा उत्कर्ष साधू शकेल. धर्म समाजनिष्ठ नागरिकासाठी आहे. परंतु हाच नागरिक त्याच वेळी व्यक्ती म्हणून स्वतंत्र आहे. व्यक्ती म्हणून निर्वाण, मोक्ष, स्वर्ग आत्म्यास प्राप्त व्हावा म्हणून त्याने रिलिजनचे पालन केले पाहिजे.
हिंदूंच्या विवाहाच्या वेळी वर व वधू अग्नीच्या साक्षीने धर्म, अर्थ व काम या तीन पुरुषार्थांच्या सिद्धीसाठी एकमेकांशी वचनबद्ध होतात. कुटुंबनिर्मिती व स्थैर्यासाठी अर्थ व काम यांत दोघे सहभागी आहेत. हे दोन पुरुषार्थ साधण्यासाठी ते ज्या समाजजीवनाचा भाग बनण्याचे स्वीकारतात, त्या समाजाच्या उत्कर्षांत त्यांचा उत्कर्ष व त्यांच्या उत्कर्षात समाजाचा अभ्युदय आहे. या तिसर्‍या उत्कर्षासाठी धर्म या तिसर्‍या पुरुषार्थाची सिद्धी आवश्यक आहे. धर्म या जगतामधील उत्कर्षाचा विचार करतो. धर्म इहवादी आहे. मोक्ष या चवथ्या पुरुषार्थासाठी पुरुषाला स्त्रीची किंवा स्त्रीला पुरुषाची गरज नाही. आत्म्याच्या मरणोत्तर अंतिमासाठी दोघेही स्वतंत्र एकक आहेत. आत्म्याचे अंतिम ज्याचे त्यास ठरवायचे व मिळवायचे असल्याने विवाहाच्या प्रतिज्ञेत मोक्ष या पुरुषार्थाचा उल्लेख नाही. दोघांना स्वतंत्रपणे मान्य अशा रिलिजनचा स्वीकार करण्याचे केवळ स्वातंत्र्यच नव्हे, तर तो त्यांचा हक्क आहे.
वाल्याने पत्नी व अपत्यांच्या पोषणासाठी अर्थार्जन करणे त्याचा धर्म आहे. परंतु त्याच्या आत्म्याच्या मरणोत्तर स्थितीचे भागीदार त्याची पत्नी व अपत्ये नाहीत. या दोन विधानांत म्हणूनच अंतर्विरोध नाही. एकाच कुटुंबातील एक भाऊ शीख उपासनापंथाचा तर दुसरा दुसर्‍या उपासनापंथाचा. शीख उपासनापंथाचा वर व अन्य उपासनापंथाची वधू ही उदाहरणे इतिहासाचा भाग बनण्याइतकी प्राचीन नाहीत. राजा राममोहन रॉय यांचे रॉय घराणे वैष्णव, तर त्यांची माता तारिणी देवी यांचे माहेर शाक्त पंथाचे होते.
आर्य चाणक्याच्या अर्थशास्त्रात, ‘हे शास्त्र धर्म, अर्थ आणि काम यांना प्रवृत्त करते आणि त्याचे पालन करते, आणि अधर्म, अनर्थ व द्वेष यांचा नाश करते,’ (प्रा. र. पं. कालेः कौटिलीय अर्थशास्त्रम्; अधिकरण १५, अध्याय १; प्रकरण १८० श्लोक ७२) असा उल्लेख आहे. यातही ‘मोक्ष या चवथ्या पुरुषार्थाचा उल्लेख नाही.
हिंदूधर्माची जागा भारतीय धर्म घेईल का?
विविध उपासना पंथ (रिलिजन्स) मानणार्‍या समुदायांतून एकात्म समाजनिर्मितीसाठी हिंदुधर्माची निर्मिती प्राचीन भारतात झाली असावी असे म्हणूनच वाटते. समाजासाठी समाजशास्त्र सांगणारा धर्म. परंतु त्याच वेळी व्यक्तीचे अंतिमासंबंधीचे त्याचे स्वातंत्र्य त्यास त्याच्या उपासनापंथानुसार देण्याचा लवचीकपणा जरी त्यावेळी होता तरी हिंदुधर्माने हिंदूसमाजाचा आधार विषमता मानला होता, हे विसरता येत नाही. प्राचीन वर्णव्यवस्था काय किंवा नंतरची जातिव्यवस्था काय, विषमतेवर आधारलेला हिंदुसमाज उत्कर्षाप्रत जाईल, या गृहीताधारावरच उभा होता.
धर्म व रिलिजन एक नसले तरी स्वंतत्र भारतीय समाजाने समता, बंधुता व स्वातंत्र्य या तत्त्वांच्या आधारावर लोकशाही तत्त्वज्ञानाचा स्वीकार केल्याने, हिंदुधर्मसमाजरचनेला आज स्थान नाही, हे सत्य मानले पाहिजे. गेल्या दीडशेपेक्षा जास्त वर्षांच्या इतिहासात हिंदू धर्म म्हणजे हिंदू रिलिजन हे चुकीचे वळण अंगवळणी पडले आहे. हिंदुसमाजाने त्यामुळे हिंदू धर्म व हिंदू समाज या शब्दप्रयोगांना नाकारण्याचे धैर्य दाखविले पाहिजे. धर्म व रिलिजन (उपासनापंथ) एक नव्हेत याचा फायदा मात्र घेतला पाहिजे; कारण भारतीय समाजांतही नागरिक व व्यक्ती हा भेद आहेच व तो राहणार. शैव, वैष्णव, शाक्त, गाणपत्य इ. उपासनापंथाप्रमाणेच मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध इ. नवीन उपासनापंथांचा अंतर्भाव भारतीय समाजात जर आहे तर भारतीय धर्मात तो झाला पाहिजे. अर्थात् यासाठी हिंदूप्रमाणेच मुस्लिम, ख्रिश्चन उपासनापंथांनी धर्म व रिलिजन भिन्न यांस मान्यता देणे आवश्यक आहे. कालच्या हिंदुधर्मात पति वैष्णव व पत्नी शैवपंथाची अशी दोघे इहवादी दृष्टीने कुटुंबे निर्माण होत होती, तर आजच्या भारतीय धर्मात हे घडू शकते, हे मानणेच खर्‍या सेक्युलरिझमचे द्योतकआहे.
हिंदुसमाजाची जागा भारतीय समाज व हिंदुधर्माची जागा भारतीय धर्म घेऊ शकतो. कारण भारतातील जनतेने येथील समाज जिवंत व गतिमान आहे, हे सिद्ध केले आहे. समाज परिवर्तनीय व स्थिर एकाच वेळी असतो. कालानुगामित्वासाठी बदल व स्थैर्यासाठी परंपरानिष्ठा म्हणूनच आवश्यक आहे. या दोन्हीचा एकमेव निकष समाजधारणा व उत्कर्ष हा आहे. धर्माचे हेच उद्दिष्ट असते. त्यामुळे नागरिक म्हणून एकच धर्म अत्यावश्यक असतो. रिलिजन व्यक्तीसाठी आहे. श्रद्धा व विश्वास ही त्याचा आधार आहे. रिलिजन व्यक्तिनिष्ठ असल्याने तो सक्तीचा असावा असा आग्रह धरणे चूक आहे. हे नागरिक व व्यक्तीचे संतुलन आमच्या पूर्वजांना जर शक्य होते तर आम्हाला ते अशक्य का व्हावे?

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.