परिणामशून्य होमिऑपथी

१८ व्या शतकाच्या शेवटी सॅम्युएल हानेमान या जर्मन डॉक्टरने होमिऑपथीचे मूळ तत्त्व सुलभ रूपात मांडण्यास सुरुवात केली. त्याच्या काळातील प्रचलित वैद्यकीय उपचारपद्धतीमध्ये जळवा लावणे, कोठा साफ करणे व इतर उपचार यांनी लाभ होण्याऐवजी हानीच जास्त व्हायची. हे पाहून खरे तर हानेमान व्यथित झाले होते. मयुरी क्लोराईडसारख्या औषधामुळे होणार्‍या विषबाधेची त्यांना चिंता वाटत असे. त्यांनी नंतर समानांचा नियम” (Law of Similars) विकसित केला – रुग्णाच्या लक्षणांसारखी लक्षणे उत्पन्न करणारे औषध अल्प प्रमाणात देऊन रोगाचे निर्मूलन करणे. Let likes be treated by likes.
होमिऑपथी हा शब्द होमिओ (सम) आणि पॅथॉस् (आजार) या ग्रीक शब्दांनी बनलेला आहे. हिप्प्रोक्रॅटीसने इ. स. पूर्व ४ थ्या शतकात व पॅरासेल्ससने १५ व्या शतकात यासारख्या कल्पना जरी अंगीकारल्या होत्या, तरी हानेमान हा त्या व्यवस्थितरीत्या मांडणारा पहिलाच वैद्यकीय व्यावसायिक होता. त्याने व त्याच्या अनुयायांनी काही प्रयोग केले. यामध्ये त्यांनी औषधी वनस्पती, खनिजे व इतर पदार्थांचा उपयोग निरोगी लोकांवर व स्वतःवरही केला. काय लक्षणे आढळली त्यांची व्यवस्थित नोंद केली. नंतर या सर्व नोंदी एकत्र करून एक संदर्भ ग्रंथ तयार केला. तो ‘मटेरिया मेडिका या नावाने ओळखला जातो. हाच ग्रंथ पुढे रुग्णाच्या लक्षणांशी सुसंगत असणारी लक्षणे कोणत्या औषधांमुळे निर्माण करता येतील हे ठरविण्याकरिता आधारग्रंथ म्हणून वापरला जाऊ लागला.
हानेमानला असे वाटत होते की रोग हे शरीरातील शक्तींची अस्थिरता दर्शवितात व ते शरीरांतर्गत बरेही होऊ शकतात. फक्त बरे होण्याची प्रक्रिया चालू करण्याकरिता एका लहानशा उत्तेजनाची आवश्यकता असते. औषधाची अल्प मात्रा देऊन बरे होण्याच्या क्रियेस काही चालना मिळते का हे पाहण्यासाठी त्याने काही प्रयोग केले. प्रथम त्याने प्रचलित औषधांची थोडी मात्रा वापरून पाहिली. पंरतु नंतर त्याने औषधे प्रचंड प्रमाणात सौम्य करून वापरली आणि असे अनुमान काढले की, औषाची मात्रा जितकी कमी तितकाच त्याचा परिणाम जास्त. ‘Dilution and succession potentiate the action of drug या तत्त्वाला त्याने ‘अतिसूक्ष्मतेचा नियम (Law of Infinitesimals) असे संबोधिले.
होमिऑपथीची औषधे कशी बनवतात?
जर औषधी पदार्थ विद्राव्य असेल तर एक भाग ९ किंवा ९९ भाग उर्ध्वपातित पाण्याच्या (डिस्टिल्ड वॉटर) किंवा मद्यार्काच्या द्रावणात मिसळतात, व पूर्णपणे एकजीव मिश्रण तयार करतातं. जर पदार्थ पाण्यात अथवा मद्यार्कात विरघळणारा नसेल तर त्याची अगदी बारीक पूड करून दुग्धशर्कमध्ये (लॅक्टोज) त्याच प्रमाणात मिसळतात. अशा सौम्य औषधाचा एक भाग पुन्हा ९ किंवा ९९ पट पाण्यात अधिक सौम्य केला जातो. ही कृती पुनःपुन्हा करून तथाकथित ‘तीव्रतेचे मिश्रण मिळवले जाते. दहापटीने सौम्य केलेले मिश्रण ‘x’ या रोमन अंकाने दर्शविले जाते.
१एक्स = १/२, २ एक्स, =१/१००, ३ एक्स १/१०००, ६ एक्स १/१,००,०००
त्याचप्रमाणे शंभरपटीने सौम्य केलेले मिश्रण ‘C’ या रोमन अंकाने दर्शवितात.
१सी = १/१००, २ सी -१/१००००, ३ सी = १/१,००,००० याप्रमाणे
अमेरिकेतील सर्वेक्षण
१९ व्या शतकात मान्य असलेल्या वैद्यकशास्त्रापेक्षा होमिओपॅथिक उपाय हे कमी हानिकारक होते. परंतु जसजसे वैद्यकीय शास्त्र व वैद्यकीय शिक्षण प्रगत होत गेले तसतशी होमिऑपथीस उतरती कळा लागली. विशेषतः अमेरिकेतील काही कॉलेजे बंद झाली, तर काहींचे आधुनिक पद्धतीत रूपांतर झाले. अमेरिकेतील सर्व फॉर्मसी कॉलेजांच्या डीनना एक प्रश्नावली पाठविली होती. बहुतेक जण म्हणाले की आम्ही होमिऑपथीचा उल्लेख कोठेच करीत नाही. केलाच तर केवळ एक ऐतिहासिक बाब म्हणूनच करतो. हानेमानच्या ‘समानांच्या नियमास पाठिंबा देणारा एकही जण मिळाला नाही. अपवाद वगळता बाकी सगळ्यांनी सांगितले की ‘अतिसूक्ष्मतेचा नियम चुकीचा आहे. बहुतेकांनी सांगितले की होमिऑपथीची औषधे परिणामकारक नाहीत. निम्म्या फार्मासिस्टांनी सांगितले की होमिओपॅथिक औषधे बाजारातून काढून घेतली पाहिजेत.
बहुतेक होमिओपॅथिक डॉक्टर ‘मटेरिया मेडिका या संदर्भग्रंथावर विसंबून राहून उपलब्ध असलेल्या हजारो उपायांतून औषध शोधतात. काही पहिल्या दर्जाचे समजले जाणारे होमिओपाथ – जे हानेमानच्या पद्धतीचे लक्षपूर्वक पालन करतात – रुग्णाचा पूर्ण इतिहास बघून प्रत्येकाला योग्य असा उपाय सुचवितात. रुग्णाचा पूर्ण इतिहास, अनुवंशिकता, यावरील प्रश्नांबरोबरच भावना, मनस्थिती, खाण्याच्या सवयी व हवामानविषयक प्रतिक्रिया यावर प्रश्न विचारले जातात. आजारापेक्षा लक्षणाला, लक्षणसमूहाला महत्त्व दिले जाते. पहिल्या दर्जाचे समजले जाणारे होमिओपाथ एकावेळी एकच औषधसुचवितात, तर इतर होमिओपाथ एकाहून अधिक औषधे सुचवितात.
होमिऑपथीचा अवैज्ञानिकपणा
मध्यंतरी होमिऑपथी किती शास्त्रोक्त आहे याचा पुरावा म्हणून Nature या वैज्ञानिक नियतकालिकात आलेल्या डॉ. जाक बेनव्हेनिस्त’ यांच्या प्रबंधाकडे बोट दाखविण्यास होमिऑपथीवाल्यांनी सुरुवात केली होती. परंतु ही बाब त्यांच्या चांगलीच अंगलट आली. कारण त्याच मासिकाने या गोष्टीच्या मुळाशी जाण्यासाठी निरीक्षकांची एक समिती बेनव्हेनिस्त यांच्या पॅरिस येथील प्रयोगशाळेत पाठविली. या समितीमध्ये तिघेजण होते. पहिले जेम्स रॅडी. यांनी परामानसशक्ती किंवा अतींद्रिय शक्ती असल्याचे अनेक दावे ढोंगी असल्याचे व अशा व्यक्तींनी केलेले चमत्कार हा एक हातचलाखीचा खेळ असल्याचे अनेकवार सिद्ध केले होते. दुसरे होते स्टुअर्ट. हे विज्ञान क्षेत्रातील ढोंगबाजी, बुवाबाजी उघडकीस आणण्यात पटाईत होते. तिसरे होते स्वतः Nature चे संपादक जॉन मॅडॉक्स.
बेनव्हेनिस्तने आपल्या प्रयोगाद्वारे असे सुचविले होते की द्रावण कितीही विरळ केले, त्यातील रेणूंची संख्या कितीही घटली तरी त्या रेणूंचे गुणधर्म द्रावणात राहतातच. रक्तातील विशिष्ट प्रकारच्या पांढर्याल पेशींवर आघात करणार्‍या एका पदार्थाचे द्रावण त्यांनी कितीही सौम्य केले, अगदी त्यात एकही रेणू कदाचित असणार नाही या टोकाला आणले, तरी त्यांना त्या पेशीवर आघात होताना आढळला होता. चौकशी करणार्‍या समितीपुढे हे प्रयोग चक्क अयशस्वी ठरले. चौकशी करणार्‍या समितीने नंतर एक अहवाल दिला. होमिओपॅथिक औषधे बनविणार्‍या काही कंपन्यांनी या प्रयोगांना आर्थिक पाठबळ दिले होते. काही वेळा निष्कर्ष पूर्वग्रहानुसार आले. प्रयोगामधील चुका होण्याची संभाव्यता कमी करण्याचे प्रयत्न न केल्याचे, व एकंदरीत प्रयोगाचा आराखडा संख्याशास्त्राच्या नियमानुसार आखलेला नसल्याचे समितीस आढळले. जॉन मॅडॉक्स यांच्या म्हणण्याप्रमाणे याचे उत्तम स्पष्टीकरण म्हणजे ऑटो-सजेस्चन (auto-suggestion). एक किंवा अनेक संशोधक उत्तर अगोदरच गृहीत धरतात, किंवा जे इच्छित आहे तेच होणार असे मानतात.
होमिऑपथीसंबंधी पुरावा
बायोकेमिस्ट्रीचे प्राध्यापक ए. एम्. स्कोफील्ड यांनी १९८४ च्या ब्रिटिश होमिओपॅथिक नियतकालिकामध्ये असा निष्कर्ष काढला की, एवढे सातत्याने प्रयोग करून आणि चिकित्सालयातील उपचार यावरून होमिऑपथीसंबंधी फारच थोडा वैज्ञानिक पुरावा उपलब्ध होतो. चुकीचा आराखडा, चुकीची अंमलबजावणी, खरी वस्तुस्थिती नेमकी न मांडणे, व सातत्याने प्रयोगातून तेच निष्कर्ष निघण्यामधील अपयश ही त्याची कारणेआहेत. औषधाचा अपेक्षित परिणाम हमखास घडवून आणणारी उपचारपद्धती म्हणून होमिऑपथीकडे आपणास बघावयाचे असेल तर त्याकरता आवश्यक त्या वैज्ञानिक चाचण्या व्हायला पाहिजेत. शिवाय या उपचारपद्धतीमध्ये वैज्ञानिक प्रयोगांपेक्षा तात्त्विक कल्पनांनाच जास्त प्राधान्य दिले गेले आहे. परंतु स्कोफील्ड हे होमिऑपथीचे मुलभूत तत्त्व वैज्ञानिक क्षेत्रात चपखल बसत नाही या एकाच कारणास्तव होमिऑपथीचे उच्चाटन करण्याच्या विरोधात आहेत. ते असे सुचवतात की काळजीपूर्वक प्रयोग करून होमिऑपथीची पुढेमागे चाचणी करता येईल.
रसायनशास्त्राचा नियम : ॲव्होनॅड्रोज नंबर
एखाद्या द्रावणात मिसळलेल्या पदार्थाचे किती रेणू असतात याचे मोजमाप डाल्टनने केव्हाच करून ठेवले आहे. उदा. मिठाचे रेण्वीय वस्तुमान ५८.५ आहे. याचाच अर्थ असा की, जर ५८.५ ग्रॅम इतके मीठ एक लिटर पाण्यात विरघळले तर जे द्रावण तयार होईल त्यात अॅव्होनॅड्रोजच्या संख्येइतके, म्हणजे ६.०२३४१०२३ एवढे रेणू असतील. त्या द्रावणाच्या प्रत्येक मिलिलिटरमध्ये ६.०२३४१०° एवढे रेणू असतील. आता त्यात आणखी पाणी घालून आपण त्या एका मिलिलिटरचे परत एक लिटर द्रावण बनवले तर त्यातल्या प्रत्येक मिलिलिटरमध्ये त्याहूनही कमी म्हणजे ६.०२३४१० एवढेच रेणू असतील. अशा तर्हेतने जर आपण ते द्रावण अधिकाधिक विरळ बनवत गेलो, तर त्यातील रेणूंची संख्या घटत जाईल. त्याप्रमाणात त्याचा खारटपणा किंवा इतर रासायनिक गुणधर्माचे प्रमाणही घटायला हवे. होता होता एक वेळ अशी येईल की एका मिलिलिटरमध्ये केवळ एकच रेणू असेल,आणि त्यातही पाणी घालून त्याचे आकारमान आपण १० मिलिलिटर बनवले तर त्या प्रत्येक मिलिलिटरमध्ये कदाचित एकही रेणू असणार नाही. रसायनशास्त्राच्या नियमानुसार एका मर्यादेपलीकडे पदार्थ सौम्य केल्यास त्याचे मूळचे गुणधर्म नाहीसे होतात. या मर्यादेस ‘अॅव्होनॅड्रोज नंबर’ (६.० २३x९०२३) असे म्हणतात. होमिऑपथीच्या औषधाच्या बाबतीत ही मर्यादा १२ सी किंवा २४ एक्स इथपर्यंत असते. हानेमानला माहित होते की सौम्यतेची अंतिम पातळी गाठल्यानंतर मूळपदार्थाचा एकही रेणू त्या द्रावणात राहात नाही. परंतु त्याला असे वाटत होते की मिश्रणाचे चूर्ण करून व ते जोरजोरात हलवून प्रत्येक वेळी मिश्रण सौम्य केल्याने जो अर्क राहातो, एक प्रकारची स्मृति मागे रेंगाळते, त्यामुळे शरीरातील जैवशक्ति पुनरुज्जीवित होऊन आजार बरे होण्यास मदत होते.
आजचे वैद्यकशास्त्र
डॉ. हानेमानचा हा सिद्धान्त शास्त्राची पुरी ओळख असलेल्या वैद्यांना व वैज्ञानिक क्षेत्रात कधीच मान्य झाला नाही. आजचे वैद्यकशास्त्रही हानेमानच्या निष्कर्षाच्या उलटच सांगते. १९७७ साली ऑस्ट्रेलियातील संसदेने या संदर्भात सत्य काय आहे हे तपासून पाहण्यासाठी एक समिती नेमली होती. प्रत्येक औषधी गुणधर्माच्या बाबतीत औषधाची मात्रा आणि रुग्णाच्या शरीराने दिलेला प्रतिसाद यामध्ये अगदी सुस्पष्ट संबंध असतो. मात्रा योग्य त्यामर्यादेपर्यंत वाढविली तर औषधाचा परिणामही वाढतो.’ असा त्या समितीच्या पाहणीचा निष्कर्ष निघाला, हे इथे आवर्जून सांगितले पाहिजे.
डॉ. हानेमानने शिफारस केलेली सौम्यता डॉ. क्लार्क या फार्मकॉलजीच्या प्रोफेसरांनी ठरविलेली आहे ती अशी. औषधाचा एक रेणू जर एखाद्या गोलाच्या परिघावर घेतला तर तो परिघ नेपच्यूनच्या कक्षेएवढा असेल. इतक्या प्रचंड प्रमाणातील सौम्य औषधाने केलेले उपचार सध्याच्या वैद्यकीय कल्पनेत बसणे अवघड आहे. तसेच ते निरनिराळ्या प्रयोगांद्वारे पुराव्यानिशी सिद्धही करता येत नाहीत. औषधाची सौम्यता वाढविली असता अधिक उत्तम प्रतिसाद देणारे औषध आजच्या औषधनिर्मितीच्या क्षेत्रात अस्तित्वात नाही. ‘औषध अधिक सौम्य केले असता अधिक उत्तम प्रतिसाद देते;’असे म्हणणे म्हणजे रंगामध्ये थिनर मिसळला असता रंग अधिक गडद होतो असे म्हणायचे का? किंवा साखरेचे प्रमाण जसजसे कमी करू तसतसा पदार्थाचा गोडपणा वाढत जातो, असे म्हणजे बरोबर होईल का?
नत्रम मूर गुणकारी औषध?
आपण होमिऑपथीच्या बहुगुणकारी समजल्या जाणार्‍या? नत्रम मूर या औषधाचे उदाहरण घेऊ. यामध्ये औषधी घटक म्हणजे दुसरे तिसरे काही नसून सोडियम क्लोराइड अथवा शुद्ध मीठ असते. ६x या क्षमतेच्या एका गोळीमध्ये एका ग्रॅमचा एक लाखावा भाग एवढे मीठ असते. मग अशा गोळ्या तासाला एक म्हणजे दिवसाला २४ जरी घेतल्या तरी किती मीठ (औषध?) शरीरात जाणार?सर्वसाधारणपणे ५ ते २० ग्रॅम मीठ रोज आपल्या अन्नातून आपण घेतो, म्हणजे गोळ्यांतून घेतल्या जाणार्‍या ५ मिठाच्या जवळजवळ २० ते ८० हजारपट मीठ आपण अन्नातून घेत असतो. औषधी गोळ्यांतले मिठाचे गुणधर्म व अन्नातून जाणार्‍या २ मिठाचे गुणधर्म शास्त्रीय दृष्ट्या एकच असतात. मग अशा गोळ्यांमुळे आपले आजार बरे होतात असे म्हणणे कितपत योग्य आहे?
होमिऑपथीमध्ये श्वानदंशावर उपाय?
श्वानदंशावर रेबीजप्रतिबंधक लस टोचणे हा एकमेव खात्रीचा उपाय आहे. श्वानदंशावर गावठी इलाज करणारे लोक आहेत. परंतु अंधश्रद्धेपोटी असा उपचार करून घेणे म्हणजे पर्यायाने मृत्यूला निमंत्रण देणे, हे कुणीही सुज्ञ मान्य करील. ‘होमिऑपथीची पायवाट’ या डॉ. रमेश रानडे यांच्या पुस्तकात काय लिहिलेय ते बघा. डॉ. रानडे हे M.D. असून ते अनेक वर्षे पॅथॉलॉजीचा अभ्यास करतात. अलॉपथीच्या औषधांचे दुष्परिणाम लक्षात आल्यावर ते होमिऑपथीकडे वळले. पुस्तकात खालील उल्लेख आढळतात. पिसाळलेल्या कुत्र्याच्या लाळेपासून हायड्रोफोबियम हे लसयुक्त औषध तयार करण्याचा मान खरे पाहिले तर डॉ. हानेमान यांचे शिष्य डॉ. हेरिग यांना दिला पाहिजे. १८३२ मध्ये त्यांनी प्रथम ही लस तयार केली. त्यावेळी लुई पाश्चर अवघा दहा वर्षांचा असेल. योग्यमाहितीअभावी या शोधाबद्दल आपण त्याला मोठेपणा देतो. कारण तीच लस आज अधिक मोठ्या प्रमाणात प्रचारात आहे.”
लुई पाश्चरची रेबीजवरील लस ही अधिक प्रमाणात प्रचारात का आहे? पुष्कळ प्रयोग करून सिद्ध झालेली, व एक खात्रीचा उपाय म्हणून या लसीकडे पाहिले जाते. रेबीजवरील होमिऑपथीची लस हे या खात्रीच्या कसोटीस उतरते का? कोणीही सुज्ञ डॉक्टर जीवनमरणाच्या लढाईत खात्रीचा उपाय सोडून होमिओपॅथीची लस सुचवणार नाही. आणि तशीच खात्री जर डॉ. रमेश रानडे यांना वाटत असेल तर पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर त्यांनी स्वतःवरच किंवा आपल्या नातेवाईकांवर या लसीचा उपयोग करावा. पुस्तकांमध्ये वाचून जर कोणी याचा वापर केला व दगावला तर याची जबाबदारी हे पुस्तक लिहिणारे डॉक्टर घेणार आहेत का?
होमिऑपथीच्या औषधाने रोग बरे होतात म्हणजे काय?
वैज्ञानिक क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात की होमिऑपथीचे उपाय म्हणजे प्लॅसिबोज्. रुग्णाची समजूत करण्यासाठी औषध म्हणून दिलेले पण प्रत्यक्षात औषध नसलेले असे काहीतरी. होमिऑपथीच्या औषधाचा परिणाम का व कसा झाला याचे स्पष्टीकरण होमिऑपथीचे पुरस्कर्ते देऊ शकत नाहीत. औषधाचा मनोवैज्ञानिक परिणाम अथवा प्लॉसिबो इफेक्ट यामध्ये बहुतांशी होमिऑपथीची यशस्विता लपलेली असते. आपल्याला आता औषध दिले आहे व आता बरे वाटणार आहे, ही स्वयंसूचना रोग बरे होण्यास कारणीभूत ठरते. खरे तर ५५ ते ६०% आजार मनःकायिक असतात. अशा आजारात होमिऑपथी एक प्रकारचा मानसोपचार ठरतो. काही आजार हे औषधाशिवाय कालानुरूप बरे होत असतात. उदा. गोवर, कांजण्या, सर्दी, कावीळ, इत्यादि; तर काही आजार जुनाट (chronic) असतात. उदा. दमा, संधिवात, फिट, (एपिलिप्सी), इत्यादि. अशावेळी लोकांनी होमिऑपथीची औषधे घेतली तर श्रेय मात्र होमिऑपथीकडे जाते.
विरोधी पुरावे
वैज्ञानिक कसोटीस उतरत नाही म्हणून उत्तर कॅरोलिना, जर्मनी (पूर्वीचा पूर्व जर्मनी), झेकोस्लोवाकिया येथे होमिऑपथीच्या व्यवसायास बंदी आहे. होमिऑपथीस वैज्ञानिक क्षेत्रात मान्यता मिळावी यासाठी कॅनडा, इस्रायल, फ्रान्स व इटली या ठिकाणी प्रयोग केले गेले. परंतु एकही प्रयोग होमिऑपथीस वैज्ञानिक क्षेत्रात मान्यता देऊ शकला नाही. डॉ. पी. एम्. भार्गव या जीवशास्त्रज्ञाने सुद्धा यातील अवैज्ञानिकपणा आणि तर्कविसंगतता दाखवून दिली आहे. होमिऑपथीतील कोणतेही तत्त्व वैज्ञानिक नियमात बसत नाही. पुष्कळ ठिकाणी होमिऑपथीचे डॉक्टर लायसन्सशिवाय अलॉपथीची प्रैक्टिस करीत आहेत. ते आपली प्रैक्टिस गुलदस्तातच ठेवतात. छाननीसाठी ती खुली नसते. अपयशाची उत्तरे त्यांच्याकडे नसतात. हानेमानची तत्त्वे कधीच सिद्ध झाली नाहीत. ही तत्त्वे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र यातील नियमांच्या विरोधी आहेत.
परिणामशून्य होमिऑपथी
बहुतेक होमिओपॅथिक उपाय हे अतिसौम्यतेमुळे कोणताही शारीरिक परिणाम करण्यास असमर्थ आहेत. अपरिणामकारक औषधे ही जेव्हा गंभीर किंवा जीवघेण्या आजारात दिली जातात, तेव्हा ती धोकादायक ठरतात. शिवाय होमिओपॅथीची औषधे जरी मूलतः दुष्परिणामकारक नसली तरी स्वयंऔषध योजना धोक्याची ठरू शकते. गंभीर आजारात किंवा ज्या दुखण्याचे निदान झाले नाही अशा रोगात योग्य औषधोपचाराऐवजी होमिओपॅथिक औषधे वापरणे हानिकारक किंवा घातकही ठरू शकते. होमिओपॅथिक औषधामधील कार्यक्षम घटक प्रयोगशाळेत शोधताही येत नाहीत. ती सुरक्षित समजली जातात, परंतु परिणामकारक आहेत असेही सिद्ध झालेले नाही.
होमिऑपथीचे पुरस्कर्ते आग्रहाने सांगत असतातः होमिओपॅथिक उपाय हे परिणामकारक आहेत व यावरचा अभ्यास, उपचार त्यांच्या म्हणण्यास दुजोराच देतो. ते असे ही म्हणतात की होमिऑपथीची लोकप्रियता आणि त्याचे दीर्घकाळपर्यंत टिकून राहणे या गोष्टी त्याचे प्रमाण आहे. परंतु होमिऑपथीस वैज्ञानिक क्षेत्रात मान्यता मिळण्यासाठी टीकाकारांना समर्पक उत्तरे देत व कोणताही पूर्वग्रह न धरता ठळक निष्कर्ष पुनःपुन्हा करता येणार्‍या प्रयोगातून सिद्ध करता आले पाहिजेत.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.