चर्चा- विवेकवादातील भोंगळ नीतिविचार

‘विवेकवाद’ या शीर्षकाच्या अंतर्गत प्रा. दि. य. देशपांडे यांनी नीतिविचाराची स्वमते चिकित्सक मांडणी ‘आजचा सुधारक’ या मासिकाच्या अनेक अंकातून लेखमाला लिहून चालविली आहे. त्याविषयी त्यांना विचारण्यात आलेल्या शंकांची उत्तरे त्यांनी विवेकवाद – २० (एप्रिल ९२) मधून देण्याचा प्रयत्न केला आहे. स्वतःला विवेकवादी म्हणवून घेणार्‍या मंडळींचे नीतिविषयक विचार यामुळे एकत्रित वाचावयाला मिळतात हा या लेखमालेचा अभिनंदनीय विशेष आहे. कांटवादी नीतिमीमांसेला उपयोगितावाद्यांच्या नीतिविचारांची जोड देऊन त्यांनी ही जी ‘अभिनव मांडणी केली ती शक्य तो त्यांचेच शब्द वापरून संकलित केल्यास पुढीलप्रमाणे दिसते. नीतिविचार हा मानवाशी संबंधित आहे. कारण नीतिविचार हा विवेकामुळे शक्य होतो, व ही विवेकाची देणगी केवळ मानवालाच लाभली आहे.‘साधु ई’ (good will) ही या विवेकाचेच स्वरूप होय. ‘साधु ईहा’ म्हणजे कर्तव्यबुद्धी. तदनुसार ही कर्तव्ये ठरविण्याचा निकष नीतिमीमांसक कांटच्या मते सार्विकीकरणाची शक्यता होय. कांट म्हणतो की, ज्या कर्माच्या नियमांची कल्पना आपण सार्विक नियम म्हणून करू शकतो ती कर्मेच खरोखर कर्तव्यकर्मे होत. पण या शक्यतेमुळे ‘अंधारात सापडल्यास शीळ घालणे, रोज सकाळी छातीला तीन वेळ हात लावणे अशीही कमें कर्तव्यकर्मे ठरतील. पण ही कमें ननैतिक कर्मे आहेत. कारण, जी कमें मानवी हिताहिताशी संबंधित आहेत किंवा जी कमें मानवी जीवनाला उपकारक ठरतात तीच कर्मे नैतिक आणि कर्तव्ये समजली जातात. त्यामुळे कांटचा हा सार्विकीकरणाचा निकष वरीलप्रमाणे अतिव्याप्त ठरल्यामुळे अपुरा आहे. ही उणीव नीतीच्या उपयोगितावादी मीमांसेच्या साह्याने भरून काढावी अशी प्रा. देशपांडे यांची सूचना आहे. काही उपयोगितावादी नीतिमांसक सुख, ज्ञान, सौंदर्य, प्रेम, मैत्री इत्यादी बाबी ‘स्वतोमूल्यवान (ends in themselves) आहेत असे म्हणतात. ही सुखादी जीवनमूल्ये जास्तीत जास्त निर्माण करणे ज्यामुळे शक्य होईल अशी कर्मे करणे म्हणजे कर्तव्य करणे अशी उपपत्ती प्रा. देशपांडे यांनीसुचविली आहे. (विवेकवाद – २०, एप्रिल ९२) भारतात झालेला नीतिविचार हा आधुनिक नीतिशास्त्रातील मीमांसेच्या कसाला उतरणारा नाही म्हणून त्याला धिक्कारणारे पाश्चात्यमुखी विवेकवादी नीतिमीमांसक स्वतःला अभिप्रेत असलेले नीतिशास्त्र कसे मांडतात त्याचा हा खास नमुना आहे.
कांटची कर्तव्यासाठी कर्तव्य करावे हे सांगणारी विचारसरणी आणि कर्तव्ये ठरविण्यासाठी कर्माचे सुखकरत्व लक्षात घेणे आवश्यक मानणारी उपयोगितावाद्यांची विचारसरणी या दोहोतील विरोध स्वयंस्पष्ट आहे. कांटला उपयोगितावादाची जोड देण्याचाआणि उपपोगितावाद्यांना कांटची जोड देण्याचा प्रा. देशपांडे यांचा प्रयत्न (परामर्श, फेब्रुवारी १९८३) दोन्ही नीतिमीमांसकांच्या पंथांना मान्य असल्याची साक्ष अजून तरी उपलब्ध नाही.
प्रमाणविरुद्ध प्रतिपादन
पण याहीपेक्षा मुख्य अडचण अशी आहे की ज्या विवेकवादाच्या अंतर्गत ही नीतिविषयक मीमांसा सुरू आहे, त्याला मान्य असणार्‍या प्रमाणविचाराने ह्या दोन्हीचे स्वतंत्र वो संयुक्त समर्थन संभवनीय दिसत नाही. कारण हे दोन्ही पंथ तर्काच्या कसोटीला न उतरणारे व अपर्याप्त आहेत. उदाहरणार्थ कांटच्या नीतिमीमांसेतील साधु ईहेचे स्वरूप काय आहे? कोणतीही ईहा ही साधू (good) कशी ठरते? साधुत्व म्हणजे काय? ती निरपेक्षपणे कर्तव्यप्रेरणा देते असे मानले तर सार्विकीकरणाच्या नियमाशी तिचा संबंध कसा जोडावयाचा आणि व्यक्तीने स्वकर्तव्य कसे निश्चित करावयाचे? यांची तर्कसंगत उत्तरे दुर्लभ आहेत. उपयोगितावाद्यांपैकी एका गटातील नीतिमीमांसकांच्या मते सुखाबरोबरच ज्ञान, सौंदर्य, प्रेम, मैत्री इत्यादी बाबी स्वतोमूल्यवान आहेत. या स्वतोमूल्यवान् बाबींपैकी सुख हीच बाब विचारार्थ घेऊ या. या सुखशब्दाने काय अभिप्रेत आहे? अनुकूलसंवेदना (अनुकूलवेदनीय) हे जर सुख असेल तर ते त्यांच्या मते ‘भूयिष्ठांचे अधिकतम सुख हे तपासण्याची रीत कोणती? सुख ही बाब स्वसंवेद्य असल्यामुळे इतरांना सुख होते की नाही हे समजण्याचे साधन तपासणार्‍याला कधीही उपलब्ध होऊ शकत नाही. सुखसंवेदनाचा परिणाम शरीराच्या अंतर्घटनेवर भौतिकरूपाने होतो म्हणून तसा निष्कर्ष शक्य आहे असे उत्तर मिळू शकेल. पण ते प्रत्यक्ष आणि लौकिकमर्यादेत अनुमान प्रमाण मानणार्‍या प्रस्तुत विवेकवादाशी अजिबात सुसंगत नाही. कारण, प्रत्यक्षाचा उपयोग नसलेल्या या स्थळी ज्या व्याप्तीसंबंधावर आधारून सुखाचे अनुमान करणार त्याच्या अचूकपणाविषयी काहीही खात्री देता येणार नाही. त्याच्याही पुढे हे सुख भूयिष्ठांचे आणि अधिकतम प्रमाणात असणारे आहे की नाही हेही तपासणे असंभव आहे. कारण, ही तपासणी ज्या लोकांची करावयाची ते लोक वर्तमान, भूत व भविष्य या सर्वकाळातले आहेत. भूत, भविष्य हे काळ तर सोडाच पण वर्तमान काळातील विश्वातील सर्व लोकांची या मुद्द्यावर तपासणी करणे केवळ अशक्य आहे. एवढेच नव्हे तर सुखाचे तारतम्य व त्याची अधिकतमता हीही तपासणे केवळ अशक्य आहे.वर नमूद केलेल्या अडचणींनी कांटच्या पद्धतीने कोणत्याही नियमांच्या सार्विकीकरणाची संभाव्यता तपासणे हेही तितकेच असंभव आहे.
कर्तव्यनिर्णयच अशक्य!
कर्तव्यकर्मे कोणती हे ठरविताना जी कमें मानवी हिताशी संबद्ध असतात आणि मानवी जीवनाला उपकारक ठरतात ती कर्तव्यकर्मे होत असे सांगितले गेले आहे. याचा अर्थ असा होतो की कर्तव्यनिर्णय करू इच्छिणार्‍या सामान्य माणसाला एखादे कर्म कर्तव्य होईल की नाही हे ठरविण्यासाठी त्या कर्माची उपकारकता किंवा हितकारकता तपासता आली पाहिजे. आता ती उपकारकता किंवा हितकारकता कशी तपासावयाची? उपकारक होणे किंवा हितकारक होणे हे करावयाच्या कर्माच्या परिणामावरून ठरणारे असते. त्यांपैकी हितकारकता तपासणे तर अधिक कठीण, कारण हितकारक याचा अर्थ होतो ‘परिणामी सुखकारक प्रत्येक कर्माचा परिणाम ताबडतोब प्राप्त होईल हे काही सांगता येत नाही. कर्माची हितकारकता समाजाच्या किंवा व्यक्तीच्या दृष्टीने तपासण्यासाठी किती कालखंड लागेल हेही सांगणे शक्य नाही. कर्तव्य ठरविण्यासाठी कर्माची हितकारकता लक्षात घेणे आणि हितकारकता सिद्ध झाल्यावर कर्तव्य करणे असल्या अद्भुत कसोटीने कोणतेही कर्म कर्तव्यकर्म ठरविणे हे किती अशक्य व हास्यास्पद आहे याची जाणीव सहज होऊ शकेल.
चुकीचा कार्यकारणभाव
दुसरे असे की, नैतिक कर्तव्ये ही नियमतः सुख निर्माण करणारी असतात असा विचार उपयोगितावादी नीतिमीमांसक मांडतात. ती नैतिक कर्तव्ये भूमिष्ठांचे अधिकतम सुख निर्माण करणारी असावी असा त्यांचा आग्रह आहे. हा निकष मानला तर नैतिक कर्तव्यामुळे काही थोड्या का होईना, लोकांना दुःखकारक अनुभव हमखास येऊ शकतो असे मानण्याची आपत्ती येते. त्यामुळे नैतिक कर्तव्ये सुखाचे कारण असतात हा कार्यकारणभाव चुकीचा ठरतो. नैतिक कर्तव्ये आणि सुखप्राप्ती हा कार्यकारणभाव तरी जगात सर्वात अनुभवाला येत असतो का? कारण, एखाद्याने नैतिक कर्तव्य केले आणि तो सुखी झाला असे दिसत नाही. उलट, नीतीने वागणारा माणूस संकटात आणि अडीअडचणीतही न डगमगता तसा वागतो म्हणूनच त्याचे मोठेपण जग मान्य करते. कर्तव्यबुद्धीने काम करणारा माणूस स्वार्थ किंवा कुठल्याही ऐहिक सुखाच्या मोहाने काम करतो असे ठरले तर त्याचे काम करणे नैतिक कर्तव्यपालन या सदरात येणार नाही असे कांटवादी नीतिमीमांसक मानतात. तेव्हा सुखनिर्मिती हा मुद्दा कर्तव्याचा निर्णय करताना चुकीचा ठरतो.
स्वतोमूल्यतेचे यथार्थ स्वरूप.
सुख, ज्ञान, सौंदर्य, प्रेम, मैत्री इत्यादींना स्वतोमूल्यवान् मानून त्यांची भलावण करणे व त्यांची वाढ होईल अशा कर्माना नैतिक कर्तव्ये मानणे हाही काही उपयोगितावादी नीतिमीमांसकांचा विचार तपासण्याच्या कसोटीला टिकणारा नाही.
सुखादी बाबींपैकी सुख ही गोष्ट एकमात्र माणसाला स्वयं भावणारी आहे. नैयायिक यालाच पुरुषार्थ (पुरुषाचे साध्य) म्हणतात. ज्याचे केवळ ज्ञान झाल्याबरोबर ते आपल्याजवळ हवे असे वाटू लागते तोच खरा पुरुषार्थ होय. (यज्ज्ञातं सत् स्ववृत्तितया इष्यते स पुरुषार्थः, सिद्धान्तमुक्तावली .) सुखाचे स्वरूप असे आहे की सुख हे सुख आहे म्हणून माणसाला हवे असते. ते इतर कोणत्याही प्रयोजनासाठी हवे नसते. म्हणून भारतीय विचारक ‘इतरेच्छानधीन-इच्छाविषयत्व -ज्याची इच्छा इतर कोणत्याही इच्छेवर अवलंबून नसते ते सुख अशी व्याख्या देतात. ‘स्वतोमूल्यवान’ या संकल्पनेची स्पष्टता वरील व्याख्येने अधिक अचूक होऊ शकेल. तेव्हा ‘सुख ही बाब सोडल्यास ज्ञान, सौंदर्य, प्रेम, मैत्री या बाबी स्वतोमूल्यवान् (ends in themselves) आहेत असे कोणी कां मानावयाचे? उदाहरणार्थ ज्ञान व्यवहारात वस्तूचे ज्ञान झाल्यामुळे एखादा विषय समजल्यामुळे माझे जीवन सुखी होण्यास मला साहाय्य होते म्हणून मला ते हवे आहे. व्यवहारात ज्ञानासाठी ज्ञान ही कल्पनाकां मानावयाची?
सौंदर्य हीही कल्पना अशीच आहे. सौंदर्य हे विशेष प्रकारच्या आनंदाला कारणीभूत होते म्हणून ते हवे आहे. सौंदर्य म्हणजे ज्यांचे आकलन विशिष्ट प्रकारच्या आनंदात परिणत होते असे वस्तुविशेष.
प्रेम, मैत्री ह्याही बाबी जीवनातील आनंदाचे कारण ठरतात म्हणून बहुमोल आहेत. म्हणून त्यांना स्वयंसाध्यरूप किंवा स्वतोमूल्यवान् मानणे योग्य होणार नाही.
दुसरी अडचण अशी आहे की सुख-सौंदर्य यांचे विषय व त्यांचे स्वरूप व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने भिन्नभिन्न असल्यामुळे एखाद्या व्यक्तीला वा व्यक्तिसमूहाला सुखसौंदर्यवर्धक वाटणारा आचार भिन्नरुचींना तसा वाटणार नाही, आणि मग तशी कामे कर्तव्य म्हणून केली तर नैतिक ठरणार नाहीत.
तिसरी अडचण अशी की सुखसौंदर्यादी मूल्ये वाढवणारा आचारधर्म नैतिक ठरल्यास संगीताचा कार्यक्रम, मूर्ती घडविणे, चित्रकर्म हीही कमें मुळात ननैतिकता असणारी नैतिक म्हणवली जातील.
चौथी अडचण अशी की ज्यामुळे भूमिष्ठांचे अधिकतम सुख निर्माण झाले नाही, जसे हरिश्चंद्राचे सत्यपालन, विश्वामित्राने पुत्रसंहार केला असतानाही वसिष्ठांचे क्षमापालन, भारताच्या स्वातंत्र्यचळवळीतील क्रांतिवीरांची आत्माहुती – अशी कमें अनैतिक ठरण्याची आपत्ती येईल.
अनुभवाचा अपलाप अमान्य
कर्तव्यकर्म कर्तव्यबुद्धीने केले तरच त्यात नैतिक मूल्य उत्पन्न होते हा नीतिमीमांसकांचा दावाही चिंतनीय आहे. ज्या व्यावहारिक जगातील नैतिक वर्तनाची ही चर्चा सुरू आहे त्यात भगवद्गीतेतला स्थितप्रज्ञ किंवा गुणातीत किंवा जीवन्मुक्त यांच्या जीवनप्रणालीतील कर्तव्यकर्माची कसोटी म्हणजे ती कर्मे निर्लेपपणे पार पाडण्याची संभावना ही विचारात घेणे शक्य नाही. कारण ते सर्व ‘खोटे व खरे असेलच तर जगाच्यादृष्टीने निरुपयोगी’ ही भूमिका तथाकथित विवेकवाद्यांची आहे. वस्तुतः जगातली कोणतीही बुद्धिपूर्वक कृती/प्रवृत्ती कुठल्याही इच्छेशिवाय होते हे असंभाव्य आहे.
अकामस्य क्रिया काचिद् दृश्यते नेह कहिंचित् ।
यद्यद्धि कुरुते किंचित् तत्तत्कामस्य चेष्टितम् ।।
ही प्राचीन विचारवंतांनी केलेली नोंद केवळ भारतातल्या प्राचीनांनी केली म्हणून तिरस्करणीय ठरू शकत नाही. कारण तो अनुभवविषय आहे व अनुभवाचा अपलाप कोणालाही मान्य होणार नाही. मानवी प्रवृत्तीचा क्रम ‘जानाति – इच्छति – यतते’, ज्ञान – इच्छा – कृती असाच प्रत्यक्षात अनुभवास येतो. तो भारतीय दार्शनिकांनी प्रमाणभूत म्हणून स्वीकारला आहे. यावरील अडचणींचा परिहार करण्यासाठी शुद्धबुद्धीच्या स्वरूपातील ‘साधु ईहा आणि उपयोगितावाद्यांची स्वतोमूल्याच्या कल्पनेवर आधारलेली कर्तव्यमीमांसा यांची प्रा. देशपांडे यांनी सुचविलेली अद्भुत जोड उभय वर्गातील नीतिमीमांसकांना मान्य होणे संभव दिसत नाही व तशी जोड करून अडचणींचा परिहार होत नाहीच आणि नवी खेकटे उभी राहतात.
विवेकवादाची व्यर्थ प्रौढी
त्यामुळे पाश्चात्त्यमुखी भारतीय नीतिमीमांसकांचा विवेकवादानुसार व्यावहारिक भूमिकेवरून आम्ही यशस्वीपणे नीतिमीमांसा करू शकतो हा दावा नुसतीच प्रौढी ठरतो. प्रस्तुत विचारसरणीत अनेक आश्चर्यकारक समजुती आढळून येतात. सार्विकीकरण ही कसोटी प्रत्यक्ष आणि अनुमान या दोहोंच्या साह्याने तपासता येणे असंभव असताना कोणीही आपले कर्तव्य सार्विकीकरणाच्या नियमाने ठरवू शकतो असे मानले जाते. जे कर्म माझे कर्तव्य असेल ते माझ्या परिस्थितीत असलेल्या प्रत्येक मनुष्याचे कर्तव्य असावे लागेल या स्पष्टीकरणाने तैमूरलंगाच्या दृष्टीने अशा कत्तली करणे कर्तव्य ठरू शकते. कारण, त्याच्या परिस्थितीतील प्रत्येकाचे कर्तव्य म्हणून तो मान्य करू शकेल व त्यांच्या वृत्तीचे इतरही मान्य करतील. त्यामुळे व्यक्तींची परिस्थिती लक्षात घेऊन कर्तव्यनिर्धारणाचे स्वरूप ठरविण्याची त्याला अनुमती देणे हा प्रमाद ठरतो. सत्य- अहिंसेच्या पालनाच्या प्रसंगीची विशिष्ट स्थळे, उदाहरणार्थ एखाद्या माणसाच्या सत्य बोलण्याने दुसरा निरपराध माणूस भयानक संकटात सापडतो असे सत्य, किंवा आततायी चालून आला असता त्याच्या प्रतिकारासाठी सोडावी लागणारी अहिंसा, इत्यादी, सार्विकीकरणाच्या नियमाला तडा देणारी आहेत. तेव्हा आधुनिक विवेकवादी (?) नीतिमीमांसकांनी आपल्या पद्धतीने पाश्चात्य नीतिमीमांसकांना वाट पुसत जे निकष दिले आहेत ते किती अपुरे व बुद्धिवादाला अग्राह्य आहेत हे पाहिले म्हणजे स्वमते विवेकवादाच्या नावाने चालविलेला नीतिमीमांसेचा हा प्रयत्न निष्फळ व निःसार ठरतो.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.