चर्चा- डॉ. नी. र. वर्‍हाडपांडे यांच्या लेखाबद्दल

डॉ. नी. र. वर्‍हाडपांडे यांचा मार्च ९२ च्या अंकातील ‘मरू घातलेली जात’ हा लेख, एप्रिल ९२ च्या अंकातील श्री. केशवराव जोशी यांचे पत्र वाचल्यावर पुन्हा एकदा वाचला. त्यावरील प्रतिक्रिया.
डॉ. वर्‍हाडपांडे यांच्या प्रतिपादनाप्रमाणे मार्क्सवाद संपला आहे. ठीक आहे. मग त्याबद्दल इतका त्रागा करून लेख लिहिण्याची गरज कशासाठी?
वस्तुस्थिति अशी आहे की सगळ्या जगालाच मार्क्सवादाचा स्वीकार करणे अनिवार्य होणार आहे. कारण मानवतावाद हा मार्क्सवादाचा केंद्रबिंदु आहे. मार्क्सवाद हा अर्थशास्त्रापुरताच मर्यादित आहे हा चुकीचा समज आहे. मानवाशी संबंध असलेला कोणताच विषय मार्क्सवादाला वर्ण्य नाही. मार्क्स म्हणतात, “ज्या उद्दिष्टांसाठी असमर्थनीय साधने लागतात ते समर्थनीय उद्दिष्ट नव्हे’. स्टॅलिन यांच्या साम्यवादाबद्दल गोर्बाचेव्ह म्हणतात, “आज मी काही गोष्टी विश्वासपूर्वक सांगू शकतो. स्टॅलिनछाप साम्यवादाने सुरुवातीपासून कधी परिणामांची तमा केली नाही. स्टॅलिनच्या अमदानीत लोकशाही, मानवी हक्क आणि लोकांच्या गरजा पूर्णपणे दुर्लक्षिल्या गेल्या होत्या. असा साम्यवाद मृत झाला असून त्याचे दफनही झाले आहे.” (जागतिक नवे पर्व पाक्षिकाचा १-५-९२ चा अंक). गोर्बाचेव्ह हे स्टॅलिनछाप साम्यवाद मृत झाला असे म्हणतात. मार्क्सवाद मृत झाला असे म्हणत नाहीत हे लक्षणीय आहे.
डॉ. वर्‍हाडपांडे म्हणतात, “तरी रशियन जनतेला कम्युनिझम अमान्य होता ही वस्तुस्थिति होती व तिचा पुढेमागे परिणाम होणे अपरिहार्य होते. हा परिणाम गोर्बाचेव्हच्या धैर्यशाली व तत्त्वनिष्ठ धोरणाच्या रूपाने साकार झाला.”
गोर्बाचेव्ह यांच्या धैर्यशीलतेबद्दल व तत्त्वनिष्ठ धोरणाबद्दल वाद असण्याचे कारणनाही.
कॉ. यशवंतराव चव्हाण यांच्या संपादकत्वाखाली मुंबईहून प्रसिद्ध होणार्‍या जागतिक नवे पर्व या पाक्षिकाच्या १ मे १९९२ च्या अंकांत समाजवादाचा विचार टिकून राहणार आहे या मथळ्याचा श्री. गोर्बाचेव्ह यांचा लेख प्रसिद्ध झाला आहे. तो डॉ. वर्‍हाडपांडे यांनी अवश्य वाचावा.
मार्क्सवादाचा पराभव झालेला नाही व होणारही नाही. उलट भांडवलशाहीच्या पायाखालची वाळू झपाट्याने सरकू लागली आहे. भांडवलशाही राष्ट्रात समाजवादाची पहाटहोत असल्याची लक्षणे आताच दिसू लागली आहेत. अलीकडेच अमेरिकेतील रेल्वे कर्मचार्यांोनी संप केला होता. जर्मनीत तर सध्या वाहतूक, टपाल, इंजिनियरिंग क्षेत्रात ३० लाखापेक्षा जास्त कर्मचार्यांतचा पगारवाढीसाठी संप सुरू आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कर्मचारी संपात सामील होणार असल्याच्या बातम्या आहेत. ही कशाची लक्षणे समजायची?
जगाची घडी बसवण्याची स्वप्ने पाहणार्‍या बुश साहेबांच्या लॉस एंजिलिस व इतर अनेक शहरातील दंगली व विध्वंस. शुक्रवारी दूरदर्शनवर दाखविण्यात येणार्‍या World This Week या कार्यक्रमात अलिकडेच सांगण्यात आले की अमेरिकेतील teenagers मध्ये खुनासारखे गुन्हे करण्याच्या वाढत्या प्रवृत्तीमुळे या वयोगटातील मुलांना (१३ ते १९ वर्षे) रात्री ११ नंतर रस्त्यावर येण्यास बंदी घातली आहे. अशी मुले रस्त्यावर आढळल्यास त्यांच्या पालकांनाही दोषी धरण्यात येते. या सर्व प्रकारांना भांडवलशाहीच्या यशाचे की अपयशाचे प्रतीक समजायचे?
जागतिक नवे पर्व मधील लेखात गोर्बाचेव्ह म्हणतात, “नाझिझम व फॅसिझमवर विजय मिळविल्यानंतर आलेली खरीखुरी संधी रशिया व पाश्चिमात्य देशांनी गमावली. ती एक ऐतिहासिक चूक होती. याचे रूपांतर शीतयुद्धात झाले. १९४५ ते १९४७ या कालात आलेली एक महान संधी युरोप आणि साया जगाने अव्हेरली. अमेरिकेने शीतयुद्ध जिंकले आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी म्हटले आहे. याला माझे उत्तर असे की आपण सारेच शीतयुद्धात अनेक वर्षे गुरफटलो होतो. तेव्हा आपला सर्वांचा पराजय होता. आज संघर्ष आणि शत्रुत्व ही दोन्ही अव्हेरली गेली असल्याने आपण सगळेच विजयी झालो आहोत.”

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.