पुस्तक परिचय

शास्त्रीय विचारसरणीची मीमांसा, ले. राजीव जोशी, मनोविकास प्रकाशन, मुंबई (१९८९), पृ. १०९, किं. रु. १६/-
‘शास्त्रीय विचारसरणीची मीमांसा’ हे शीर्षक असलेल्या शंभर पानी पुस्तिकेत तिचे लेखक डॉ. राजीव जोशी यांनी बुद्धिप्रामाण्यवाद, वैज्ञानिक पद्धति, धर्म, ईश्वर, अंधश्रद्धा इ. अनेक विषयांवर बरेचसे विवेचन केलेले आहे. पुस्तिकेचे शीर्षक पाहिल्यानंतर हा एक सलग निबंध असावा असे वाटले, पण विविध लेखांचा तो केवळ एक संग्रह आहे हे प्रस्तावना व अनुक्रमणिका वाचल्यानंतर लक्षात आले.
परीक्षणाच्या सोयीसाठी या पुस्तिकेतील निबंधांचे दोन गटांत विभाजन करता येईल. पहिल्या गटात लेख क्र. १,२,३ व ८ घालता येतील, कारण त्यांचा विषय जवळपास एकच आहे. दुसर्या गटात लेख क्र. ४,५,६, व ७ येतील. यांत काही विशिष्ट संशोधनकार्याविषयी वस्तुस्थितिविषयक निवेदन (factual information) चर्चा आहे. या गटातील विषय़ पहिल्या गटातील विषयांशी काही प्रमाणात पूरक आहेत असे म्हणता येईल.
पहिल्या गटातील पहिल्या लेखात अंधश्रद्धा निर्मूलनासंबंधी, जागतिक दृष्टिकोनातून ऐतिहासिक आढावा घेण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयत्न दिसतो. या लेखात अन्य देशांत व भारतात प्राचीन काळापासून अंधश्रद्धेच्या निर्मूलनासाठी कसे प्रयत्न केले गेले याचे त्रोटक वर्णन आहे. कोणत्याही देशाच्या प्रगतीची सुरवात धर्म, ईश्वर, साधुसंत, या कल्पनांच्या स्वीकारापासून होत असते. पाश्चात्य देशात धर्म, धर्म प्रेषित, धर्मगुरु व धर्मग्रंथ यांपासून सांस्कृतिक सृजनाला जशी सुरवात झाली, तशी भारतातही वेद, उपनिषदे, पुराणे व दर्शने (तत्त्वज्ञान) यांपासून बौद्धिक चिंतनाला सुरवात झाली. पुढे धर्माचा पगडा समाजावर जसा बसला तसाच तो राज्यव्यवस्थेवरही बसला. मानवजातीचा काही काळ धर्मप्रामाण्य व धर्मग्रंथप्रामाण्य यांच्या प्रभावाखाली गेला असला तरी हळूहळू या व्यवस्थेला आव्हान व विरोध सुरू झाला. राजीनीती व व्यवहार एका बाजूला तर धर्मकारण दुसर्याल बाजूला अशी फारकत झाली. भारतात कला, साहित्य व तत्त्वज्ञान अशा अनेक अंगांनी वैचारिक वे सांस्कृतिक प्रगती होत असली तरी पुढे तिच्यातील वैचारिकता लुप्त होऊन अध्यात्म, कर्मकांड व शब्दप्रामाण आदींनी तिची जागा घेतली. दोन्हीकडे – पूर्वेकडे व पश्चिमेकडे – अंधश्रद्धा कमी अधिक प्रमाणात होतीच. स्वतंत्र भारतात विज्ञानाच्या प्रगतीबरोबरच धार्मिकताही तेवढीच असल्याची खंत डॉ. जोशी व्यक्त करताना दिसतात. निधर्मी राष्ट्र असे एका बाजूने म्हणत असताना राज्यकर्त्यांची वैयक्तिक/सार्वजनिक ईश्वरपूजा, धर्मस्थानांचे दर्शन, धार्मिक आचरणाचे सार्वजनिक प्रदर्शन इ. जोरात चालूच असून अशा वर्तनाने अज्ञानी व दारिद्री जनतेचा पाठिंबा मिळविण्यात राज्यकर्ते यशस्वी होतात हा डॉ. जोशी यांचा निष्कर्षही योग्यच आहे.
परंतु पहिल्या लेखातील यानंतरच्या भागात अंधश्रद्धा व वैज्ञानिक दृष्टिकोन यांचे अचानकपणे आलेले विवेचन मूळ विषयाला सोडून तर आहेच; पण त्याचे स्पष्टीकरण आकृत्यांच्या साह्याने जे दिलेले आहे ते सुकर होण्याऐवजी अधिक क्लिष्ट झाल्याचे जाणवते. (पृ. ९ व २०) अंधश्रद्धा व वैज्ञानिक दृष्टिकोन या कल्पना एक-दोन साध्या उदाहरणांनी चांगल्या तर्हे.ने स्पष्ट करता आल्या असत्या.
प्रकरणे २,३ व ८ बुद्धिप्रामाण्यवाद, त्याचे स्वरूप, त्याच्या स्वीकारातील अडचणी व त्यापुढील आव्हाने या संबंधी असून त्या विषयांचे बर्याणपैकी विवेचन या प्रकरणात केलेलेआहे असे म्हणावयास हरकत नाही.
बुद्धिप्रामाण्यवादाचे वैशिष्ट्य डॉ. जोशी म्हणतात त्याप्रमाणे सर्वकालीन यथार्थता हे आहेच, परंतु या वृत्तीच्या विरोधी प्रवृत्ती देखील आपल्या ठिकाणी असल्याने ही वृत्ती मधून मधून शबल होते की काय असे वाटत राहते. धर्म, ईश्वर, धर्मग्रंथांतील अतींद्रिय वस्तूविषयक प्रतिपादने यांमुळे अशा काही वस्तूंवर विश्वास ठेवण्यास उद्युक्त करणारी मनोभावना (superstition) आपल्या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता असते. मानवी संस्कृतीच्या उगम व विकासाबरोबर या वृत्तीही निर्माण होऊन आपल्या ठिकाणी स्थिर झालेल्या दिसतात. या मुद्द्यांचे स्पष्टीकरणात्मक विवेचन तिसर्याण प्रकरणात केलेले असून त्याचबरोबर बुद्धिप्रामाण्याच्या सीमादेखील डॉ. जोशी दाखवून देतात. ते म्हणतात, ‘कोणत्याही प्रश्नाला एखादे अंतिम उत्तर असते असे बुद्धिप्रामाण्यवाद मानीत नाही. सर्व प्रश्नांची तात्पुरती का होईना, उत्तरे (माझ्यापाशी) आहेत असाही दावा करता येणार नाही. त्यासाठी चर्चा मात्र चालू राहावयास हवी. त्यानेच बुद्धिवाद वाढीस लागेल.’ (पृ. ३९)।
शेवटच्या लेखात हाच विषय आणखी पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. लेखकाच्या मते आपल्या देशात बुद्धिप्रामाण्यवादी विचारसरणीपुढे तीन प्रकारची आव्हाने आहेत. पहिले आव्हान परंपरावादी असहिष्णु मनोवृत्तीचे असून स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे लोटूनही भारताच्या काही भागात रेंगाळणार्‍या मध्ययुगाचे ते निदर्शक आहे. दुसरे आव्हान औद्योगिकीकरणाच्या रूपाने, तर तिसरे आव्हान बौद्धिक क्रांतीमुळे येऊ घातले आहे. बौद्धिक क्रांती ज्यांना म्हणता येईल अशा गोष्टी म्हणजे दूरदर्शन, संगणक, यंत्रमानव, व कृत्रिम बुद्धिमत्ता. यांच्यामुळे मानवी बुद्धीचे नैसर्गिक कार्य बाधित होईल अशी लेखकाला भीती वाटते. दूरदर्शनमुळे आपण खुर्चीत खिळून कसे बसतो, वे idiot box हे नाव आपण कसे सार्थ करतो ते डॉ. जोशी उदाहरण म्हणून सांगतात. अर्थात् बदलत्या परिस्थितीत तोल सांभाळणे व वैज्ञानिक सुखसोयींचा मर्यादित मात्रेतच लाभ घेणे असे उपाय वरील आव्हानाना उत्तरे म्हणून देता येतील.
“अस्पृश्य संकरातून झाले का?” आणखी एक नकली संशोधन, व पोषणमूल्याच्या शोधात ह्या तीनही लेखातील विषय वेगळा आहे. ह्या निबंधात संबंधित विषयांवरील संशोधने सदोष आहेत असा डॉ. जोशींचा दावा आहे. हे लेख वाचकांनी मुळातून वाचणेआवश्यक आहे.
या पुस्तकाची भाषा सोपी आहे. प्रतिपादनात कळकळ दिसते. डॉ. जोशी अंधश्रद्धानिर्मूलन व सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत असल्याने विवेकवादाची त्यांना जाणवलेली निकड़ समजण्यासारखी आहे. सामाजिक कार्य करीत असताना सैद्धांतिक स्पष्टीकरणे करणे आवश्यक वाटल्यामुळे वाचन -अध्ययन करून डॉ. जोशींनी प्रस्तुत लेखांचे लिखाण केले असे प्रस्तावनेत म्हटले आहे. परंतु त्याबरहुकूम पुस्तकाचे लेखन झालेले नाही हे पुस्तक वाचावयास सुरुवात करतानाच लक्षात येते. वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या लेखांचा संग्रह हे पुस्तक असल्याने त्यात पुनरुक्ती बरीच आहे, सतत विषयांतर झालेले दिसते. शास्त्रीय बाबी अधिक व्यवस्थित मांडता आल्या असत्या. काही निबंधांत वैयक्तिकसंबंधांचे कटु उल्लेख आहेत; ते टाळता आले असते. शास्त्रीय संशोधने कशी चुकीची आहेत हे डॉ. जोशी वैद्यकविषयक किंवा अन्य संशोधनात्मक त्रैमासिकात निबंध लिहून लोकांच्या – विशेषतः जाणकारांच्या नजरेत का आणीत नाहीत ते कळले नाही. पुस्तकाच्या द्वितीयावृत्तीत वरील उणीवा नाहीशा होतील अशी आशा करायला हरकत नाही.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.