ग्रामीण महिलांच्या गंभीर लैंगिक व मानसिक समस्या

आरोग्यसेवेचे फायदे घेण्यासाठी स्त्रिया पुढे येऊ शकत नाहीत यासाठी पुराव्याची आवश्यकता नाही. भारतीय आरोग्यसेवा पद्धतीत स्त्रीला फक्त माता किंवा भावी माता एवढ्याच स्वरूपात स्थान दिले जाते. ही या पद्धतीतील महत्त्वाची त्रुटी आहे. ही विचारसरणी जनारोग्य चळवळीतील पुरोगामी व्यक्तींनीसुद्धा कमी अधिक प्रमाणात स्वीकारलेली आढळून येते. माता-आरोग्य-संवर्धन या कार्यक्रमाचे फायदे गरीब, कामकरी महिलांपर्यंत, विशेषतः ग्रामीण भागातील महिलांप्रर्यंत परिणामकारक रीत्या पोहचू शकत नाहीत.
सार्वजनिक आरोग्य सेवेत, स्त्रीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने, महिला आरोग्याच्या दुरवस्थेत अधिकच भर पडली आहे. जननक्षमता, तसेच अपत्यजन्माशी थेट संबंध नसलेले प्रश्न, सोयिस्करपणे वळचणीला टाकले जातात. अपत्यजन्माआधीचे स्त्रीचे आरोग्य या प्रश्नाचे महत्त्व न मानण्याचे आपल्या सरकारचे धोरण असल्यामुळे वंध्यत्वाकडे योग्य तेवढे लक्ष दिले जात नाही. वंध्यत्वाची कारणे शारीरिक किंवा मानसिक अशी दोन्ही असू शकतात हे फारसे कोणाच्या ध्यानातच येत नाही. स्त्रियांवर होणारे अत्याचार ही एक भयंकर समस्या आहे. नवरयाची मारझोड, सासरी होणारा छळ, बलात्कार, नातेवाईकांकरवी भोगावा लागणारा जबरी संभोगर्या, प्रश्नांचा विचारच केला जात नाही. कधी विचार झालाच तर त्यावेळी वातावरण स्त्रीविरोधी व संशयाचेच असते.
यातनांनी ग्रासलेल्या स्त्रिया ,
स्त्रियांना सोसाव्या लागणार्‍या काही अदृश्य छळांवर अत्यंत हळुवारपणे वैद्यकीय उपचार करावे लागतात. या लेखात याचा परामर्श घेण्यात येत आहे. सर्व प्रश्नांचा विचार येथे करता येणार नाही. परंतु माझा प्रयत्न आहे ग्रामीण महिलांच्या दुःखाला वाचा फोडण्याचा! स्त्रियांना स्वतःबद्दल आणि स्वतःच्या शरीराबद्दल लाज वाटते. त्यामुळे त्यांना भोगाव्या लागणार्‍या अनन्वित यातनांकडे लोकांचे लक्ष वेधण्याचा या लेखाचा हेतू आहे. माझ्या अनुभवांवर आधारित या लेखाला अर्थातच काही मर्यादा पडल्या आहेत. या लेखात मी दिलेली उदाहरणे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात घडलेल्या घटनांची आहेत.
पुरंदर भागातील स्त्रियांचे मुख्य शारीरिक आजार म्हणजे योनिमार्गातून पांढरा स्राव जाणे, गर्भाशयाचा काही भाग बाहेर येणे, अशक्तपणा, रक्तक्षय (अनिमिया), कंबर व पाठदुखी, अनियमित मासिक पाळी, योनिमार्गतील व मूत्रमार्गातीलजंतुसंसर्ग आणि वांझपणा हे आहेत. त्याचबरोबर मानसिक औदासीन्य, नैराश्य, अतिकाळजी, हिस्टेरिया, मनाचा तोल जाणे, जीव नकोसा होणे, दुभंगलेले व्यक्तिमत्त्व अशा मानसिक व्याधीही त्यांना असतात.
आजाराकडे दुर्लक्ष
आपल्या आजारावर औषधपाणी किंवा अन्य वैद्यकीय उपचार करून घेण्यात स्त्रिया कमालीची दिरंगाई करतात. दुखणे अंगावर काढतात. या भागातील प्राथमिक आरोग्यकेंद्रावर साधारण चाळिशीची बाई पांढच्या स्रावावर उपचार करून घेण्यासाठी आली तेव्हा कळले की तिची ही तक्रार गेली पंधरा वर्षे चालू आहे. हे एक अपवादात्मक उदाहरण आहे असे मानले तरी तेथील परिचारिका सांगतात की अंगावरून पांढरा स्राव जाणे या विकाराच्या उपचारासाठी स्त्रिया साधारणपणे सहा महिन्यापासून तीन वर्षांपर्यंत वाट पाहतात. एखादीची मासिक पाळी दहा पंधरा दिवस चालणे, अन् पाठोपाठ काही दिवस पांढरा स्राव हा प्रकार दर महिन्याला होत असतो. कधी कधी तांबी बसविल्यामुळे मासिक पाळीच्या वेळी जोराचा रक्तस्राव होत असतोच आणि तो थांबल्यावर मग पांढरा रक्तस्राव जातो. काही बायको तर आपण तांबी बसवून घेतली आहे हे विसरूनच जातात. जेव्हा त्या गर्भाशयाच्या दुसर्‍या आजारासाठी डॉक्टरकडे येतात तेव्हा तांबीचे अस्तित्व लक्षात येते. एक अगदी अविस्मरणीय उदाहरण आहे. एका अगदी प्राथमिक आरोग्य केंद्रातून एक पहिलटकरीण बाळंतपणासाठी आली. तिच्याबरोबर तिची सत्तर वर्षाची म्हातारी आजी होती. एक दोन दिवसातच आजीबाईची आणि नर्सबाईची गट्टी जमली. तिसर्‍या दिवशी आजीबाईनी नर्सला विश्वासात घेऊन सांगितले की ‘अजूनही मला पाळी येते. किती लाजिरवाणी बाबआहे ही!’ ‘शरीराच्या अंतर्भागाची तपासणी करून घ्या’ असे नर्सने त्यांना सुचवल्यावर आजींनी त्यांना सांगून टाकले की आत लूप बसवले आहे! नर्सबाई आश्चर्याने स्तंभित झाल्या. त्यांनी खोदून खोदून विचारल्यावर अशी माहिती कळली की त्या म्हाताच्या बाईने चाळीस वर्षापूर्वी तिच्या शेवटच्या मुलाच्या जन्मानंतर लूप बसवून घेतले होते. (हे लूप म्हणजे कदाचित डाल्कन शील्ड असावे.) नंतर ते काढून घेण्यासाठी ती कधी डॉक्टरकडे गेलीच नाही. तिला रक्तस्राव होत होता एवढेच नव्हे तर तो स्राव काळा, फेसाळ व दुर्गंधीयुक्त होता यात काहीच आश्चर्य नाही. मोठ्या मुश्किलीने ते लूप काढण्यात आले. आजीबाईंना वेदनाही खूप झाल्या. डॉक्टरांकडून पूर्ण तपासणी करून घेण्याबद्दल नर्सने त्यांना परोपरीने सांगितले. पण त्यांचा एकच हेका, इतकी बाळतंपणं झाली, मी एकाही पुरुष डॉक्टरला माझ्या अंगाला हात लावू दिला नाही. आता म्हातारपणी लाज वाटते मला.’ नर्सच्या आग्रहाखातर गर्भाशयमुखावर पेसरी बसवून घ्यायला ती तयार झाली. व्हिटॅमिनच्या गोळ्या घेतल्या. परंतु इतर सल्ला धुडकावून लावून ती निघून गेली. गर्भाशयमुखाचा कॅन्सर झालेल्या आणि आपल्या वेदना मुकाटपणे सोसणार्‍या स्त्रियांपैकीच ही एक असावी अशी शंका आल्यावाचून राहत नाही.
पुष्कळदा बायका घरीच प्रसूत होतात अन् लगेच कामावर जातात. अशा काही स्त्रियांना गर्भाशयाचा थोडा भाग किंवा मोठ्या आतड्याचा थोडा भाग बाहेर आल्यामुळे खूपत्रास सोसावा लागतो असे स्थानिक आरोग्य सेविका सागंतात. वरचेवर होणारी बाळंतपणे ही या विकारांना कारणीभूत ठरतात. बाळंतपणाच्या वेळी, कुणीतरी वडीलधारी नातेवाईक स्त्री किंवा शेजारीण बाईच्या मदतीला येते आणि त्या या बायकांना कोणत्याही तहेचे कुंथायला सांगतात. अशामुळे योनिमार्ग कुठेतरी फाटतो. तो घरी शिवला जात नाही, आणि नंतर आयुष्यभर बाळंतीण स्त्रीला तेथून गर्भाशय बाहेर आल्याचा त्रास सोसावा लागतो. बहुतेक स्त्रिया या त्रासासाठी कोणत्याही तव्हेचे डॉक्टरी उपचार करून घेत नाहीत असा आमचा अनुभव आहे. नंतर येणार्‍या गर्भारपणात काही तक्रार उद्भवली तरच त्या उपचार करून घेतात. एरवी मूकपणे सोसतच राहतात. आम्ही महिला मंडळांच्या बैठका भरवतो. तेव्हा कधीमधी बैठकीनंतर एखादी बाई आम्हाला बाजूला घेऊन आपल्या शारीरिक तक्रारी सागंते. पांढरा स्राव किंवा गर्भाशय बाहेर आल्याबद्दल अत्यंत लाजेने आम्हाला सांगते. याआधी तिने बहुतेक करून डॉक्टरी इलाज करून घेतलेला नसतोच. एखादीने इलाज करून घेतलेला असतो, पण तरीही पांढरा स्राव होतच असतो. आरोग्य केंद्रावरच्या परिचारिका सांगतात की या आजारावर पती व पत्नी दोघांवरही उपचार करणारे डॉक्टर आम्हाला दिसून येत नाहीत. योनिमार्गात पेसरी वगैरे बसवणे याचा बायकांना तिटकारा असल्याने त्यांना पोटात घेण्याची ओषधेच दिली जातात. थोड्या दिवसांनी त्यांना पुनः जंतुसंसर्ग होतो. पुनः आजाराचे चक्र सुरू होते. मग अशी स्त्री कंटाळून हताश होऊन उपचारच सोडून देते. वरचेवर होणार्‍या या आजाराकरिता बायका जेव्हा आरोग्य केंद्रात पुनः पुनः येतात तेव्हा आरोग्य, सेविका त्यांच्या अस्वच्छतेविषयी तिरस्काराने बोलून त्यांना आणखी लाज आणतात.
भिडस्त स्वभाव
साधारणपणे बहुसंख्य स्त्रिया नर्सकडूनसुद्धा योनिमार्गाची तपासणी करून घेत नाहीत. त्यामुळे रोगनिदान करणे अवघड होऊन बसते. तपासण्याची संधी मिळाली नसताही डॉक्टर लोक औषधे लिहून देतात. परिचारिकांचे म्हणणे असे की या बायकांना डॉक्टरी तपासणीची लाज वाटते, आणि दुसरे असे की घरकाम, शेतीकाम किंवा रोजगार हमी योजनेवरील काम यामुळे त्यांना आरोग्यकेंद्रावर येण्यास फुरसदच मिळत नाही. उन्हाळ्यात शेतीची कामे थांबतात तेव्हाच बायकांना केंद्रावर यायला सवड मिळते. लाग्न होऊन वीस पंचवीस वर्षे झालेल्या बायकांनीही, कधी वर्षाकाठी माहेर जाण्याव्यतिरिक्त एरवी गावाबाहेर पाऊल टाकलेले नसते. गावापलीकडे वाडीवरच्या वस्तीत राहणार्‍या स्त्रिया तर जवळच्याच गावात वर्षातून फक्त तीनचार वेळा सणासमारंभासाठी येतात. घरात लागणारे वाणसामान आणण्याचे काम पुरुषांचे, तेव्हा बायकांनी बाहेर जाण्याची गरजच नाही असे त्यांना वाटते. बायकांना बाहेर पडण्याची मुभा केव्हा? तर रोजगार हमी योजनेच्या कामासाठी, जत्रा उत्सव अशा निमित्ताने बायका वस्तीबाहेर पडल्या तर, आलोच आहोत गावात तर, जाऊन ये आरोग्य केंद्रात, अशा निरुद्देश वृत्तीने त्या केंद्राला भेट देतात. दीर्घकाळ इलाज करून घ्यायचा असल्यास त्यासाठी साहजिकच त्या पुनः केंद्रावर येत नाहीत.
गर्भपाताची सुरक्षित पद्धत ग्रामीण भागात उपलब्ध नसल्याने तेथील स्त्रियांना प्रसंगीजीव धोक्यात घालावा लागतो. विवाहपूर्व किंवा विवाहबाह्य लैंगिक संबंधाचे प्रकार इतरत्र असतात तसे या भागातदेखील भरपूर आढळून येतात. पंधरा वर्षांच्या कोवळ्या मुलीचा गर्भपात करण्याची वेळ आल्यास तो अत्यंत असुरक्षित पद्धतीने केला जातो ही परिस्थिती अति दुखःदायक आहे. तेथे एक विशेष गोष्ट आमच्या लक्षात आली. जेव्हा आम्ही गर्भधारणा चिकित्सा उपकरणाच्या आवश्यकतेविषयी बोललो तेव्हा दोन बायकांनी त्यात विशेष रस दाखवला. आडून आडून चौकशी करून ती उपकरणे किती लौकर उपलब्ध होतील असे उत्सुकतेने विचारले. या दोघीही पतिविना जीवन कंठणार्‍या होत्या. एक जण विधवा तर दुसरी परित्यक्ता!
धोकादायक उपचार
अलीकडेच आमच्या पाहण्यात एक केस आली. एक अविवाहित किशोरवयीन मुलगी गरोदर राहिल्याचे कळल्यावर तिच्या आईने गावातील एका माणसाकरवी तिचा गर्भपात करून घेण्याचा बेत आखला. मुलगी घाबरली आणि नर्सबाईकडे येऊन तिने आपली भीती बोलून दाखवली. नर्सने तिला तपासल्यावर तिला चार महिने झाल्याचे आढळून आले. नर्सने तिला अन् तिच्या आईला पुष्कळ समजावून सांगून पुण्याला ससून हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे सुरक्षितपणे तिला मोकळे करण्यात आले. अविवाहित मातृत्व येणारी प्रत्येक मुलगी इतकी नशीबवान असेल असे नाही. बहुतेक प्रसंगी घरगुती उपायांनीच गर्भपात घडवून आणला जातो. सौम्य विषारी पदार्थ पोटात घेणे, योनिमार्गात कडुनिंबाच्या काड्या खुपसणे असे हे अघोरी उपाय असतात. यापेक्षा कमी धोकादायक घरगुती उपाय असू शकतील. परंतु त्यांची परिणामकारकता अजून अजमावता आलेली नाही. गर्भपातहाविषयच नीतिबाह्यआणि कलंकित ठरवण्यात आल्यामुळे या विषयावरच्या चर्चा घडून येतच नाहीत.
समस्याग्रस्त मनःस्थिती
वांझपणा हेही स्त्रीच्या विकल मनःस्थितीचे प्रमुख कारण असते. जोड्यात जननक्षमता नसणे अथवा जन्माला आलेली मुले दगावणे, फक्त मुलीच होणे यापैकी काहीही झाले तरी त्याचा ठपका स्त्रीवरच ठेवला जातो. ते दुःख तिचे तिलाच एकटीला सहन करावे लागते. मुलासाठी उपासतापास, मंत्रतंत्र, मठ वा मंदिरांचे उंबरठे झिजविणे वगैर परंपरागत प्रकार चालूच असतात. मूल नुकतेच दगावल्यामुळे दुःखाने वेडीपिशी झालेली तरुण स्त्री आम्हाला भेटली. गरोदरपणाची सर्व लक्षणे तिला अनुभवायला येत होती. उलट्या, तळमळ, घशात खवखव वगैरे. परंतु नर्सने तिची तपासणी केल्यावर ती स्त्री गरोदर नसल्याचे आढळूनआले. तिला खोदून खोदून प्रश्न विचारल्यावर असेही दिसून आले की गेले सहा महिने तिचा नवर्या.शी शारीरिक संबंधही आलेला नव्हता. तिने सांगितले की सासूसासरे आम्हाला दोघांना एकत्र येऊ देत नाहीत. एवढेच काय पण एकमेकांशी बोलूही देत नाहीत. या परिस्थितीमुळे आणि नुकतेच मूल वारल्यामुळे तिला कमालीचा एकटेपणा वाटत होता. आज ना उद्या आपल्याला मूल होईल अशा आशेच्या आधारे व आपण गरोदर असल्याच्या दिवास्वप्नातच ती स्त्री वावरत होती.
देवी अंगात येते असे सांगणार्‍या बायका आपण पाहिल्या तर आपल्याला असे दिसून येते की, यांपैकी बहुतेकजणी मूल नसलेल्या परित्यक्ता किंवा वयस्क असतात. ज्यांचे आयुष्य सुखनैव व सुरळीत चालू आहे अशा बायकांच्या अंगात देवी का आणि कशी येत नाही असा प्रश्न मांत्रिकाला विचारला तर उत्तर मिळते अशा बायकांना सवडच कुठे आहे? आयुष्यात काहीतरी कमी पडले म्हणजेच माणूस देवाकडे वळतो ना? वंध्यत्वाचा दोष स्त्रीचा असो की पुरुषाचा, ही अवस्था चिंताजनकच आहे. मूल नसलेल्या स्त्रीचा इतर स्त्रियासुद्धा दुस्वास करतात. वांझ स्त्रीची प्रत्येक कृती इतर बायकांना संशयास्पद वाटते. मग ही बाई देवस्की करून त्यांच्यावर सूड घेण्याचा प्रयत्न करते. असे होत राहिल्याने दोन्ही बाजू एकमेकांचा द्वेष करू लागतात आणि मग त्यांच्यात सुसंवाद, सामंजस्य निर्माण होऊ शकत नाही.
अपत्य नसल्याने छळ
आपल्या पतीचे नपुसंकत्व हे स्त्रीचे फार मोठे दुःख असते. हे दुःख लाजिरवाणे मानून ती ते मूकपणे सहन करते. लग्न होऊन वीस वर्षे झालेल्या एका स्त्रीने आरोग्यसेविकेला पतीच्या नपुंसकतेवर काही औषधे आहेत का असे हळूच खाजगीत विचारले. इतके दिवस तिने मुकाट्याने जीवन कंठले, पण आता मूल होईना म्हणून सासू सासरे तिच्या नवर्यानला दुसर्या, लग्नाचा आग्रह करू लागले म्हणून ती घाबरली. दुसरी एक सोळा वर्षांची मुलगी, लग्नानंतर दोन वर्षांनी सासरचा छळ असह्य होऊन माहेरी पळून आली. नवरा नपुंसक होता याचा तिने बाहेर बोभाटा करू नये यासाठी तिची सासरची मंटळी तिचा अतोनात छळ करीत. तिला माहेरच्या माणसांना भेटू देत नसत. डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे किती आवश्यक आहे हे तिने पतीला पटवून दिले. तो कबूल झाला. त्याचा दोष उघडकीला आल्यावर सासरच्या मंडळींनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्याच्या तपासणीचा रिपोर्ट डॉक्टर तिच्याजवळ द्यायला इच्छुक नाहीत. कारण सासरच्या मंडळींनी डॉक्टरांवर दबाव आणला आहे. त्यांनी नुसतेच तोंडी सांगितले की एक लहानशी शस्त्रक्रिया केल्यावर सर्व ठीक होईल. यावर लगेच सासरच्यांनी तिला काडीमोडीची कायदेशीर नोटीस पाठविली. त्याचबरोबर वाईट चालीची आहे अशी अफवा उठवायला सुरुवात केली.
प्राथमिक आरोग्य केंद्रावर आणखी एक चाळीस वर्षांची स्त्री पांढच्या स्रावाची तक्रार घेऊन आली. ती प्रथमच गरोदर राहिल्याचे पाहून नर्सने कुतूहलाने इतक्या उशीरा कसे दिवस गेले असे विचारले. तिने सांगितले की बाहेरख्याली नवर्याेने तिच्याशी आजवर संबंधच ठेवला नव्हता. अलीकडेच त्याने बयकोकडे लक्ष वळवले. ती कळवळून म्हणत होती, ‘अगदी कुत्र्या मांजराचे पिल्लू झालं तरी चालेल, पण मला एकदा आईपणाचा आनंद मिळू दे. एवढे बोलून ती थाबंली नाही, तर तिने नर्सला विनवले की, ‘मी तुमच्याशी मन मोकळे केले हेमाझ्या नवर्याबला सांगू नका, नाहीतर त्याचे माझ्यावरचे लक्ष उडेल आणि पुनः तो बाहेर जायला लागेल.’
उभ्या आयुष्याची फरफट
एका बड्या श्रीमंत शेतमालकाची सून केंद्रावर पांढर्या स्रावावरील उपचारासाठी येत होती. ती तिच्या नवर्यासची पहिली बयको होती. तिचा नवरा टूकड्रायव्हर, बाहेरख्यालीपणाबद्दल प्रसिद्ध. हिला मूल होईना, म्हणून त्याने दुसरे लग्न केले. तर दोघी बायका एकाच सुमाराला गरोदर राहिल्या, नवग्याच्या वर्तणुकीबद्दल पहिलीने त्याला भरपूर शिव्या घातल्या. पण त्याचबरोबर आपल्याला दिवस गेल्याचाही तिला आनंद झाला. पुरुषांच्या सततच्या बाहेरख्यालीपणामुळे स्त्रियांची कमालीची मानहानी होत असते. पण ती त्यांना एकटीने मूकपणे सोसावी लागले.
संभोगानंतर योनिमार्गात जळजळ होते अशी अनेक बायकांची तक्रार असते. अशीच एक बाई केंद्रावर आली. तिच्या नवर्याअने दुसरे लग्न केले होते. तो दारुडा होता. ती विचारू लागली की, ‘नवर्यातच्या अंगातील गरमी म्हणजे उष्णता माझ्या शरीरात शिरल्याने ही जळजळ होतेय का? ‘गुप्तरोग’ विशेषतः ‘सिफिलिस’ रोगाला गावच्या बोलीचालीत गरमी असे नाव आहे. दुसर्‍या एका तरुण मुलीची अधिक भयंकर कहाणी आहे. बाळंतपणानंतर थोड्याच दिवसानंतर नवर्याीजवळ झोपायला तिने नकार दिल्यामुळे त्याने तिला बेदम मारले, इतके की ती बेशुद्ध पडली. त्याचे म्हणणे मी काही बायकोची पूजा करायला लग्न केलेले नाही. तिची विनवणी धुडकावून लावून त्याने तिचा भोग घेतला. म्हणजे एका प्रकारे बलात्कारच केला. वेश्यांकडे जाणे हा त्याचा नित्यक्रम होता. या तरुण मुलीला योनिमार्गातील जळजळीचा त्रास होऊ लागल्याने ती उपचारासाठी केंद्रावर आली होती.
आणखी एक अठरा वर्षांची नवविवाहिता. ती सात महिन्यांची गरोदर, तिचा नवरा जीपड्रायव्हर अन् त्यालाही बाहेरचा नाद. हे त्याच्या घरच्या माणसांना माहीत होते. ती माणसे मुलीला ऐकवीत, ‘तो असा आहे म्हणून तर आम्ही तुझ्यासारखे बावळट ध्यान पसंत केले! नाहीतर एरवी पत्करले असते काय, छे!’ गेल्या वर्षी ती नासावली. आता तिला सारखी भीती वाटते, की पुनः जेव्हा मूल होईल तेव्हा बाळालाही रोगाचा प्रसाद मिळालेला असेल काय? गरोदरपणात तिला इतका जोराचा पांढरा स्राव होत राहिला की आपले कपडे खराब होतील या भीतीने ती खाली बसायचीच नाही. तिची आई आरोग्यसेविका होती. मुलीला पुरते बरे वाटल्याखेरीज तिला नवच्याकडे पाठवू नये असे आईचे म्हणणे होते. आमचे असे बोलणे झाल्यावर आठ दिवसांच्याआतच मुलीचा नवरा तिला घेऊन जायला आला. मुलगी गरीब गाईसारखी मुकाट्याने त्याच्याबरोबर गेली. त्याने बाहेरच्या बायकांकडे जाऊ नये याकरता हाच एक उपाय आहे असे म्हणून ती गेली.
मानसिक आरोग्यही ढासळते
रोगग्रस्त नवर्यातशी शारीरिक संबंध ठेवायला सर्वच बायका राजी असतात असेनव्हे. पण त्यांचा निरुपाय होतो. एका बाईला नवयाच्या इंद्रियावर रक्त दिसले. या जीप ड्रायव्हर माणसाच्या दोन प्रेयसी होत्या. ही बाई आम्हाला विनवून सांगू लागली की, ‘माझ्या नवर्यााला तुम्ही सांगा की माझ्या अंगाला हात लावू नकोस, तो घराबाहेर काहीही करू देत. साच्या बायका असे म्हणतात, परंतु प्रत्यक्षात तसे घडत नाही. नवग्याच्या वागणुकीचा त्यांना अत्यंत मनस्ताप होतो. अलीकडेच या स्त्रीचा मानसिक तोल बिघडू लागला आहे. दोन तीन वेळा तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. भरीत भर म्हणजे तिचा नवरा कमालीचा संशयी आहे. ती कुणाही पुरुषाशी बोलताना दिसली की नवरा तिला झोडपून काढतो.
आणखी एक कहाणी आहे पस्तीस वर्षांच्या एका विवाहित स्त्रीची. तिला दोन मोठी मुले आहेत. ती सांगत होती, माझा नवरा माझ्या नाकावर टिच्चून दुसर्याी बायकांना घरी घेऊन येतो. माझ्याच अंथरूणावर त्यांच्याशी संग करतो. या स्त्रीला काही शारीरिक दुखणी आहेत. मासिक पाळी पंधरा दिवसांपेक्षा अधिक काळ चालू असते. नंतर पांढरा स्राव जात राहतो. संभोगानंतर अंगाला मिरची लागल्यासारखी जळजळ होत असते. नवरा दारुडा तर आहेच. शिवाय स्वभावाने संशयी. ती त्याला विनवण्या करते मला हात लावू नका. पण तो तिला मुळीच जुमानत नाही.
लैंगिक संबंधामुळे होणार्‍या रोग्यांची स्पष्ट लक्षणे दिसून येणार्‍या फारच थोड्या बायका आरोग्य केंद्रावर औषधोपचारासाठी येतात. विधवा किंवा परित्यक्ता स्त्रियांना गर्भरोधक साधने हवी असल्यास त्या सरकारी आरोग्य केंद्रावर येण्यास राजी नसतात. एकदा एक परित्यक्ता स्त्री केंद्रावर बिनटाक्याची गर्भरोधक शस्त्रक्रिया करून घ्यायला आली. तिला मुले नव्हती पण तिने आपल्याला दोन मुले आहेत असे खोटेच सांगितले. आमच्या विभागातील स्त्रिया दुसरीकडे जाऊन संततिप्रतिबंधाची शस्त्रक्रिया करून घेतात असेही आढळून आले आहे. अलीकडेच येथील दोन विधवा स्त्रियांनी शेजारच्या तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन अशी शस्त्रक्रिया करून घेतली. सात व आठ दिवसांनी त्या परत आल्या. ही शस्त्रक्रिया करून घेतल्यावर गुप्तरोग होणार नाही असे मात्र नसते. एका विधवेला आणि एका परित्यक्तेला गुप्तरोग झाल्याचे काही दिवसांपूर्वी एका आरोग्यसेविकेला आढळून आले. आरोग्यकेंद्रावर येणे अत्यंत जरूरीचे असताही औषधोपचारासाठी केंद्रावर यायला त्यांनी नकार दिला. ‘
महिला संघटनांचा पुढाकार हवा
अडचणीत सापडलेल्या स्त्रियांची आरोग्य-सेविकांकडे बघण्याची दृष्टी गढूळ असते. सेविका सांगतात की, “आम्ही या कानाचं त्या कानाला कळू न देता त्यांना मोकळे करतो. पण नंतर त्या आम्हाला ओळखदेखील दाखवत नाहीत. आम्ही त्यांचे भयानक गुपित जाणतो ही कल्पनाच त्यांना बेचैन करून सोडते. केंद्रात एखादी रुग्ण स्त्री आली की तिच्या घरी काहीतरी गंभीर आहे हे परिचारिका लगेच ताडतात. बायकांच्या मनात आमच्याबद्दल भीती आणि किंतु असतो. त्यांच्या खाजगी प्रश्नाचा आम्ही बभ्रा करू असे त्यांना वाटते. कधी कधी त्यांना वाटते की आम्ही त्यांच्या सासरच्या नातलगांपैकी असू. घरचे प्रश्न बाहेर नेले तरघरची माणसे आपल्याला खाऊ की गिळू करतील, अशी धास्ती त्यांना वाटते. अत्याचाराला बळी पडणार्‍या स्त्रिया तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करीत असतात. आपण बाहेर काही बोललों तर आपल्याला घराच्या चार भिंतीच्या आत काय काय सहन करावे लागेल या भीतीने त्या तोंड मिटून बसतात. एक परिचारिका हुताशपणे कडवट शब्दांत म्हणाली की, आम्हाला सुद्धा नवर्यााचा मार खावा लागतो. तो आम्ही थांबवू शकत नाही तर आम्ही काय पेशंट बायकांना मदत करणार!’
एकंदरीत काय, लाज, दुःख आणि मुकाट्याने सोसणे यांचे एक दुष्टचक्र या स्त्रियांच्या जीवनात सतत फिरत राहते. आपल्या आरोग्यव्यवस्थेत स्त्रियांवर होणारे अत्याचार थांबवण्याची सोय नाही, किंवा दीर्घकाळ चालू राहणार्‍या स्त्रीरोगांवरच्या औषधोपचाराचीही पुरेशी व्यवस्था नाही. आणखी असेही आहे की दुःखपीडित स्त्रिया आपल्या दुःखाला वाचा फोडू शकत नाहीत, आणि आरोग्यसेवेचा फायदाही घेऊ शकत नाही. या स्त्रियांच्या मनात स्वतःच्या देहाबद्दल लाज असते. ती केवळ पांढरा स्राव किंवा वंध्यत्व यापुरतीच मर्यादित नसते, तर मासिक पाळी आणि प्रसूती याबद्दलही असते. या मानसिक काचातून स्त्रियांना मुक्ती मिळवून देण्याच्या कामात प्रगतिशील विचारांच्या महिलासंघटना महत्त्वाच्या भूमिका बजावू शकतील. अशा संघटनाद्वारे स्त्रियांना वाटणारी लाज आणि भीती या भावनांना वाचा फोडता येईल. नंतर आपल्या मागण्या पुण्या करून देण्यासाठी आरोग्यसेवेतील त्रुटींशी सामना देता येईल. आपल्या समस्यांना घराच्या चार भिंतींच्या बाहेर नेऊन त्याविरुद्ध जोरदार आवाज उठविला तरच चार भिंतीच्या आत काय होईल ही भीती कमी करता येईल!

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.