डॉ. के. रा. जोशी यांचे विवेकवादीनीतिविचारावरील आक्षेप

आजचा सुधारकच्या जुलै अंकात डॉ. के. रा. जोशी यांनी मी केलेल्या विवेकवादी नीतिविचाराच्या मांडणीवर ती भोंगळ असल्यास आरोप केला असून त्याच्या पुष्ट्यर्थ अनेक युक्तिवादही सादर केले आहेत. त्यांना उत्तर देण्यापूर्वी प्रथम डॉ. जोशी यांचे आभार मानणे मी आपले कर्तव्य समजतो. त्यांनी माझ्या लिखाणावर आक्षेप घेतले याचा अर्थ ते त्यांनी वाचले, आणि नुसतेच वाचले नाहीत तर ते काळजीपूर्वक वाचले (कारण आक्षेप घेण्याकरिता ते अवश्यच असते), आणि त्यावर आक्षेप घेण्याच्या लायकीचे ते आहेत असे त्यांना वाटले. गंभीर लिखाण वाचणारे लोक अतिशय दुर्मिळ असलेल्या या काळात वरील गोष्ट मला फार स्वागतार्ह वाटते, आणि म्हणून मी त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.
त्यांचे आक्षेप आणखी एका दृष्टीने स्वागतार्ह आहेत. कारण त्यामुळे मला माझी बाजू अधिक स्पष्टपणे मांडण्याची संधी मिळते. तत्त्वज्ञान विषयाचे विद्यार्थी नसलेल्या लोकांना नीतिशास्त्र हा बहुवंशी अपरिचित विषय आहे, आणि त्यामुळे त्यांचे त्या विषयाचे आकलन अपुरे असण्याची भीती नेहमीच असते. अशा वेळी त्याविषयी आक्षेप आणि शंका उद्भवल्या तर त्यांना उत्तरे देण्याच्या निमित्ताने मूळ विवेचनात भर घालता येते. तशी संधी मला डॉ. जोशांनी दिली याबद्दल मी आभारी आहे.

मी एप्रिल ९२ च्या अंकात कांटच्या नीतिविचाराला उपयोगितावादी विचाराची जोड देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याविषयी डॉ. जोशी म्हणतात की ‘कांटची नीतिमीमांसा, कर्तव्यासाठी कर्तव्य करावे हे सांगणारी विचारसरणी आणि कर्तव्य ठरविण्यासाठी कर्माचे सुखकरत्व लक्षात घेणे आवश्यक मानणारी उपयोगितावादी विचारसरणी या दोहोंतील विरोध स्वयंस्पष्ट आहे. अर्थात् त्यांचा अभिप्राय असा आहे की त्यांची सांगड घालण्याचामाझा प्रयत्न निष्फळ आहे.
परंतु डॉ. जोशांना जो विरोध स्वयंस्पष्ट दिसतो तो खरोखर विरोधच नाही हे सहज दाखविता येईल. प्रथम ‘कर्तव्य कर्तव्यासाठी करावे या तत्त्वाचा विचार करू. हे तत्त्व कांटचे म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु वस्तुतः ते कोणालाही मान्य होईल असे आहे, एवढेच नव्हे तर ते मान्य करण्यास कोणत्याही नीतिमीमांसेची आडकाठी असू नये. या तत्त्वाविषयी आपण प्रथम हेलक्षात ठेवले पाहिजे की कर्तव्य कर्तव्यासाठीच केले पाहिजे हे विधान एका अर्थाने स्वयंसिद्ध आहे. एखादे कर्म कर्तव्य आहे हे एकदा मान्य कोल्यावर ते आपण का करावे, कशासाठी करावे हा प्रश्न विचारायला जागाच राहत नाही. ते कर्तव्य आहे म्हणून ते केले पाहिजे. अमुक कर्म कर्तव्य आहे, पण मी ते करणार नाही असे म्हणण्यात एक प्रकारचा व्याघात आहे. या ठिकाणी कोणी म्हणेल की कर्तव्य मी स्वार्थाखातर करू शकेन. हे खरे आहे. पण असे असेल तर आपल्या कर्मात नैतिक मूल्य निर्माण झाले आहे असे आपल्याला म्हणता येणार नाही. स्वार्थाकरिता केलेल्या कर्माचे वर्णन कर्तव्य करणे असे करता येणार नाही. कर्तव्य करण्यात नैतिक मूल्य निर्माण व्हायचे असेल तर ते कर्म कर्तव्य आहे म्हणून केले पाहिजे हे उघड आहे.
आता प्रश्न असा उद्भवतो की उपयोगितावादी विचारसरणीत हे तत्त्व बसू शकेल काय? उपयोगितावाद्याच्या मते एखादे कर्म कर्तव्य ठरते याचे कारण ते प्राप्त परिस्थितीत शक्य असलेल्या कर्मापैकी जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख’ निर्माण करणारे कर्म असते. म्हणजे आपले कर्तव्य काय आहे हे ठरविण्याचा उपयोगितावाद्यांचा निकष जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख हा असतो. हा निकष वापरून एखादे कर्म कर्तव्य आहे हे ठरल्यानंतर ते आपण का करावे?’ या प्रश्नाला उत्तर ‘ते कर्तव्य आहे म्हणून याखेरीज काय असू शकेल? हे कर्म कोणी स्वार्थाकरिता करू शकेल; पण तसे झाले तर त्याने आपले कर्तव्य केले असे आपण म्हणणार नाही, किंवा कांटच्या भाषेत बोलायचे तर त्या कर्मात नैतिक मूल्य अवतरले असे आपण म्हणू शकणार नाही हे वर म्हटलेच आहे. स्वार्थाखातर कर्तव्य करणे यात व्याघात आहे. हे आणखी एका तर्हेाने दाखविता येईल. जे कर्म अधिकतम सार्वजनिक सुख निर्माण करणारे असेल त्यात एखादे वेळी अपघाताने माझा स्वार्थ असू शकेल, आणि म्हणून मी ते करीन. परंतु असे नेहमीच होणार नाही. अशा वेळी जे सार्वजनिक अधिकतम सुख निर्माण करणारे आहे असे कर्म करणे हे माझे कर्तव्य असल्यामुळे ते करणे, जरी त्याने माझा स्वार्थ साधत नसला तरी करणे, मला बंधनकारक होईल. याचा अर्थ उपयोगितावाद्यालाही कर्तव्य कर्तव्याकरिता करायचे असते हे सहज पटण्यासारखे आहे. कांट आणि उपयोगितावादी यांच्या विचारांतील भेद मुख्यतः कर्तव्य काय आहे हे ठरविण्याच्या निकषाचा आहे. कर्तव्य कोणत्या हेतूने करायचे याविषयी नाही.

डॉ. जोशांचा वरील आक्षेप प्रास्ताविक स्वरूपाचा होता. त्यानंतर ते कांटवादी आणि उपयोगितावादी नीतिमीमांसेवर अनेक आक्षेप घेतात.डॉ. जोशांचा पहिला आक्षेप असा आहे की विवेकवादाला मान्य असणार्यान प्रमाणविचाराने कांटच्या किंवा उपयोगितावादाच्या नीतिमीमांसेचे परीक्षण करणे अशक्य आहे. ह्या प्रमाणविचारात प्रत्यक्ष व त्यावर आधारलेले अनुमान ही दोनच प्रमाणे मान्य आहेत. पण या दोन प्रमाणांच्या
[१. सोयीकरिता आपण वरील शब्दबंधाचा संक्षेप अधिकतम सार्वजनिक सुख (greatest general happiness) असा करू.]साह्याने कांटवादी किंवा उपयोगितावादी नीतिविचाराची युक्तायुक्तता कशी तपासणार हा त्यांचा प्रश्न आहे.
या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे अशी की प्रमाणे ही यथार्थ ज्ञानाची प्रमाणे असतात. यथार्थ ज्ञान म्हणजे कोणत्याही वस्तूचे वास्तव स्वरूप जसे आहे तसे जाणणे. उदा. पृथ्वी गोल आहे, किंवा ती सूर्याभोवती फिरते, किंवा सूर्य पृथ्वीपासून इतके किलोमीटर दूर आहे, इ. परंतु नीतीचा संबंध निसर्गाविषयीच्या यथार्थ ज्ञानाशी नसतो. तो असतो विधींशी. अमुक वस्तू अशी आहे असे विधान सत्य किंवा असत्य असते, आणि जर एखादे सत्य विधान आपल्याला सत्य म्हणून कळले, तर आपल्याला यथार्थ ज्ञान झाले असे आपण म्हणतो. परंतु नैतिक वाक्ये विधान व्यक्त करीत नाहीत; ती विधी व्यक्त करतात. आपण अमुक अमुक करावे, किंवा अमुक कर्म करणे इष्ट आहे किंवा कर्तव्य आहे या आकाराची वाक्ये विधी होत. आता ही वाक्ये कोणत्याही वास्तवाचे वर्णन करीत नसल्याने ती सत्य किंवा असत्य असू शकत नाहीत. उदा. जर मी म्हणालो की हिंसा करू नये तर हे वाक्य सत्य आहे की असत्य हे कसे ठरविणार? जशा आज्ञा सत्य किंवा असत्य असत नाहीत, तशीच विध्यर्थी वाक्येही सत्य किंवा असत्य असत नाही. आज्ञा आणि विधी यांचे काम एकच आहे, म्हणजे कर्माला आवाहन. एकात (आज्ञेत) ते सरळ असते, तर दुसयात ते काहीसे अप्रत्यक्ष असते. म्हणून नैतिक विधी किंवा तत्त्वे यांच्या बाबतीत प्रमाणांची भाषा गैरलागू आहे असे म्हणावे लागते.
परंतु नैतिक वाक्ये (विधी) सत्य किंवा असत्य नसतात हे जरी खरे असले तरी सर्वच विधी स्वीकरणीय असतात असे आपण म्हणत नाही. एखादे वाक्य विध्यर्थी आकारात आहे एवढ्यानेच ते स्वीकारले पाहिजे असे होत नाही. विधींचेही आपण तारतम्य ठरवितो. ते कोणत्या निकषाच्या साह्याने?ते सत्य किंवा असत्य असू शकत नाही म्हणून आपण या निकषाला प्रमाण म्हणणार नाही. पण विधींचे तारतम्य ठरवायचे तर येथेही प्रमाणसदृश काहीतरी आपल्याला लागेलच. ते काय आहे?उदा. खरे बोलावे’, ‘हिंसा करू नये, हे विधी आपण सामान्यपणे स्वीकारणीय मनतो, आणि तसेच चोरी किंवा खून ही कर्मे । टाळावीत याविषयीही आपले स्थूल मानाने एकमत असते. तेव्हा याबाबतीत आपण वापरीत असलेला निकष कोणता?

हा निकष शोधून काढायचा उपाय एकच आहे, म्हणजे सर्वसामान्य मानवांच्या नैतिक अवधारणांचे (moral judgments) विश्लेषण. आपली नैतिक अवधारणे ज्या वाक्यांत व्यक्त होतात त्यांचे विश्लेषण, म्हणजे त्यातील घटक संकल्पनांचे आणि त्यांनी बनलेल्या अवधारणांचे पृथक्करण करणे हा तो उपाय. नैतिक भाषेच्या विश्लेषणाने नैतिक नियमांची आणि ते स्वीकारण्याच्या कारणांचा शोध लावता येतो. या विश्लेषणाचे स्वरूप आपल्याला आपल्या मातृभाषेचे जे ज्ञान असते त्याच्या उदाहरणाने स्पष्ट होईल.
आपली मातृभाषा आपल्याला कोणी शिकवीत नाही. आपण ती प्रौढांच्या भाषेचे निरीक्षण करून अगदी वयाच्या दुसर्याो-तिसर्या् वर्षात आत्मसात् करतो. भाषा ही नियमबद्ध व्यवहार आहे. परंतु हे नियम काय आहेत असा प्रश्न जर विचारला तर ती भाषा सामान्यपणे बिनचूक आणि सहज वापरणाच्या बालकाला त्याचे उत्तर येत नाही. ते उत्तर वैयाकरणाला आणि व्याकरण शिकलेल्या लोकांनाच फक्त ज्ञात असते. परंतु आपल्या भाषेचे नियम जरी अशिक्षित बालक सांगू शकत नसले तरी ते त्याला एका अर्थी माहीत असतात. कारण बोलताना ते त्यांचे पालन सतत करीत असते. आता हीच गोष्ट नीतीच्या नियमांविषयीही खरी आहे. सामान्य मनुष्य नैतिक अवधारणे करताना काही नियमांचे पालन करीत असतो. व ते नियम काय आहेत हे त्याला फारसे स्पष्टपणे सांगता येत नाही. त्यांचे स्वरूप स्पष्ट आणि नेमक्या भाषेत ग्रथित करण्याचे काम नीतिमीमांसक करीत असतो. तो नैतिक भाषेचे विश्लेषण करून तिच्यात वापरल्या जाणार्याे संकल्पना आणि नियम शोधून काढू शकतो.
नीतीच्या भाषेचे विश्लेषण करू लागल्याबरोबर आपल्या लक्षात येणारी पहिली गोष्ट म्हणजे ती भाषा मानवांना काही विशिष्ट प्रकारची कर्मे करण्यास प्रवृत्त करणारी आणि अन्य काही कर्मापासून परावृत्त करणारी भाषा आहे. एखाद्या कर्मापासून परावृत्त करणे म्हणजे ते न करण्यास प्रवृत्त करणे असेही आपण म्हणू शकतो, आणि म्हणून नैतिक भाषेला प्रवर्तक भाषा असे म्हणता येते. वस्तुस्थितीचे वर्णन करणारी भाषा म्हणजे विधानांची भाषा. म्हणजे सत्य किंवा असत्य असणार्या वाक्यांची भाषा. परंतु नीतीची भाषा विधींची, विध्यर्थी वाक्यांची भाषा. नीतीचा संबंध वस्तुस्थिती काय आहे याच्याशी नसतो; आपण काय करावे, कोणते कर्म करणे इष्ट, युक्त किंवा कर्तव्य आहे याच्याशी असतो.
नीतीची भाषा प्रवर्तक – म्हणजे कर्माला प्रवृत्त करणारी, कर्म करण्यास आवाहन करणारी असते असे वर म्हटले. पण ते पुरेसे काटेकोर नव्हते. आज्ञार्थी वाक्यांचा उद्देशही कर्मे करण्यास उद्युक्त करणे हाच असतो. परंतु आज्ञार्थी वाक्ये नैतिक वाक्ये नव्हते. विधी आणि आज्ञा यांची तुलना केल्यास असे लक्षात येईल की स्थूलमानाने आज्ञा सशक्त माणसाने अशक्त माणसाला दिली जाते. ती देण्यात आज्ञापकाची इच्छा याखेरीज अन्य कारण नसते. परंतु विधी हा कोणा व्यक्तीची इच्छा व्यक्त करीत नाही. एका अर्थाने विधी हा impersonal, अव्यक्तिगत असतो, आणि त्याचे अव्यक्तिगतत्व दुहेरी असते. जर मी म्हणालो की अहिंसा पाळावी, तर सामान्यपणे हा विधी सर्वांना मान्य आहे असा आपला अभिप्राय असतो. त्या निधीतून कोणाही विशिष्ट मनुष्याची वैयक्तिक इच्छा व्यक्त होत नाही, तो उच्चारणार्या.चीही नाही. आणि दुसरे म्हणजे विधी सार्विक म्हणजे सर्वांना उद्देशून असतात. म्हणजे ज्याला उद्देशून तो विधी एखाद्या प्रसंगी उच्चारला जाईल त्याला जसा तो लागू असतो, तसाच तो त्या परिस्थितीत असणार्याू अन्य सर्वांना लागू असतो, बंधनकारक असतो.
नैतिक भाषेची वैशिष्ट्ये काय आहेत याचा शोध करू लागल्याबरोबर आपल्या असे लक्षात येते की तिचा एक विशिष्ट शब्दसंग्रह आहे, आणि तसेच काही वैयाकरणी आकारही आहेत. विध्यर्थी वैयाकरणी आकाराविषयी आधीच सांगून झाले आहे. परंतु नीतीचा खास शब्दसंग्रहही आहे. हा संग्रह छोटासाच आहे, आणि त्यात चांगले-वाईट’, इष्ट-अनिष्ट, युक्त-अयुक्त, कर्तव्य, हितकर, इत्यादि शब्द प्रधान आहेत.
नीतीची भाषा व्यक्तिगत किंवा व्यक्तिसापेक्ष नसते, ती व्यक्तिनिरपेक्ष असते याचीआणखी काही उदाहरणे पाहू. मला हे आवडते आणि ‘हे चांगले, किंवा इष्ट आहे यांतील ‘आवडते आणि चांगले किंवा इष्ट’, ‘युक्त ह्या विशेषणांकडे दृष्टी टाकली तर आपल्या लक्षात येते की ‘आवडते हे विशेषण व्यक्तिसापेक्ष आहे, परंतु चांगले किंवा युक्त या शब्दांचा अर्थ व्यक्तिनिरपेक्ष आहे. एखादी वस्तू मला आवडते असे मी म्हणतो तेव्हा सर्वांना आवडेल असा माझा अभिप्राय नसतो. परंतु एखादी वस्तू चांगली आहे किंवा एखादे कर्म युक्त आहे असे मी म्हणतो तेव्हा ती वस्तू सर्वांना प्राप्य (प्राप्त करण्यास योग्य) वाटेल असा सामान्यपणे आपला दावा असतो. आपण क्वचित् असेही म्हणतो की ‘मला अमुक गोष्ट आवडत नाही, पण ती चांगली आहे, किंवा ‘अमुक गोष्ट चांगली नाही, पण ती मला आवडते; आणि असे म्हणण्यात ‘अमुक वस्तू चांगली आहे हा नैतिक दावा आणि ती मला आवडते हे मानसशास्त्रीय घटित यांतील भेद मी अधोरेखित करीत असतो.
वर विध्यर्थी आकाराचा उल्लेख नीतीच्या भाषेचे एक वैशिष्ट्य म्हणून केला आहे. परंतु विधींचे एक ननैतिक क्षेत्रही आहे. ज्यांना आपण काय म्हणतो तेही विधींच्या आकारातच व्यक्त केले जातात. आणि विधीच नव्हेत, तर कर्तव्येही दोन प्रकारची असतात. कायदा पाळणे हे आपले कर्तव्य असते, आणि तसेच खरे बोलावे, ‘हिंसा करू नये इ. विधींचे पालन हेही आपले कर्तव्यच असते. पण या दोन कर्तव्यांत भेद आहे. कायदा हाराष्ट्राच्या विधिमंडळाने केलेला असतो, आणि तो मोडला तर मोडणार्या्ला शिक्षा देण्याची तरतूद असते. परंतु अमुक कर्म आपले नैतिक कर्तव्य आहे ही गोष्ट कोणा मानवी संस्थेने प्रस्थापित करावी लागत नाही, आणि तसेच तो नियम मोडल्यास शिक्षाही होत नाही. इतर मानवांची स्तुतिनिंदा ह्यापलीकडे नैतिक नियमांना बळाचे पाठबळ नसते.
आपल्या नैतिक भाषेच्या विश्लेषणातून नैतिक नियमांचे कोणते स्वरूप निष्पन्न होते?या प्रश्नाला अनेक उत्तरे दिली गेली आहेत. त्यांपैकी एक उत्तर म्हणजे उपयोगितावाद. आपण ज्या कर्माना युक्त (right) म्हणतो, किंवा ज्यांना कर्तव्ये समजतो त्यांनी मानवांचे सुख मोठ्या प्रमाणात निर्माण होते असे आपल्या लक्षात येते, आणि ज्या कर्माना आपण अयुक्त म्हणतो त्यांनी बरेचसे असुख निर्माण होते, सुखापेक्षा जास्त असुख निर्माण होते असे, आपल्याला दिसते असे उपयोगितावादी म्हणतो.
नीतिशास्त्राची कार्यपद्धती कोणती याची स्थूल कल्पना येथपर्यंत दिली. आता आपण डॉ. जोशांच्या आक्षेपांकडे वळू शकतो.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.