चर्चा -गीता, मनुस्मृति व प्राध्यापक देशपांडे

ऑगस्ट ९२ च्या आजच्या सुधारकमध्ये प्रा. देशपांडे यांनी त्यांच्या गीतेवरील लिखाणावर मी घेतलेल्या आक्षेपांना उत्तर दिल्याचा दावा मांडला आहे. ते म्हणतात त्याप्रमाणे गीतेने नीतीच्या मूलभूत प्रश्नांना बगल दिलेली नसून देशपांड्यांनी मात्र माझ्या सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांना बगल दिली आहे. दोन कर्तव्यांत संघर्ष कसा टाळावा या प्रश्नाचे उत्तर त्यांना गीतेत सापडत नाही, मी दाखवून दिल्यावरही सापडत नाही. दुष्टांना शासन करण्यासाठी युद्ध करणे व शासनयोग्य स्वजनांना शासन न करता, आपण स्वजनांवर हात उगारला नाही याचे समाधान मिळविणे या दोन कर्तव्यांत अर्जुनापुढे संघर्ष होता. या संघर्षाची सोडवणूक गीतेने ‘लोकसंग्रह व ‘सर्वभूतहित’ हे दोन नीतीचे उद्देश सांगून केली आहे. शासनयोग्य स्वजनांना शासन न केल्याने, स्वजनांवर शस्त्र उचलण्याच्या खन्तीपासून मुक्तता मिळेल, पण त्याने लोकसंग्रह म्हणजे लोकांचे समष्टिरूप कल्याण व सर्वभूतहित साधेल काय?दुर्योधनासारख्या अन्यायी व अनीतिमान् राज्यकर्त्यांच्या हाती सत्ता गेल्यामुळे सर्वभूतहित व लोकसंग्रह यावर गंडांतर येणार होते. तेव्हा दुर्योधनाला शासन करणे हाच पर्याय गीतेत सांगितलेल्या नीतीच्या निकषानुसार ग्राह्य ठरतो.
गीतेच्या दृष्टीने कोणते कर्म करावे याला महत्त्व नाही, कर्म स्थितप्रज्ञवृत्तीने केले म्हणजे झाले असा देशपांड्यांचा आरोप आहे. कार्यं कर्म समाचर’ म्हणजे करण्यास योग्य असेच कर्म कर या शब्दांनी गीतेने या आक्षेपाला उत्तर दिले आहे.
नीतीच्या मूलभूत प्रश्नांची चर्चा महाभारतात कोठे आली आहे हे वहाडपांड्यांनीसांगितले तर बरे होईल असे देशपांडे म्हणतात. प्रस्तुत चर्चेला अत्यंत आवश्यक असलेले महाभारतातील वचन मी माझ्या पत्रातच उद्धृत केले आहे. ते म्हणजे “जो सुखोदकरतो तो धर्म” ही धर्माची व्याख्या. प्रा. देशपांड्यांना महाभारताचे अध्ययन करून गीतेवर अधिक अभ्यस्तरीतीने लिहिण्याची इच्छा असेल तर त्यांना सांगू इच्छितो की महाभारतातील श्रीकृष्ण, विदुर, युधिष्ठिर, भीष्म, भीम, द्रौपदी वगैरे पात्रे निरनिराळ्या प्रसंगी धर्माधर्माची चर्चा करतात ती त्यांनी अभ्यासावी. केवळ चर्चाच नव्हे तर या व्यक्तींचे निरनिराळ्या प्रसंगीचे वर्तन त्या चर्चेबरोबर विचारात घेतले म्हणजे त्यांच्या नीतिविषयक भूमिका स्पष्ट होण्यास व त्या नीतीची तत्त्वे कळण्यास अत्यन्त उपयुक्त आहेत. विशेषतः श्रीकृष्णाचा केवळ उपदेशच नव्हे तर त्याचे समग्र चरित्र हे नीतिमत्तेचे प्रात्यक्षिक आहे. येथे महाभारतातल्या श्रीकृष्णाशी भागवतातल्या श्रीकृष्णाशी गल्लत न करण्याची काळजी घेतली पाहिजे.
मोक्षापेक्षा लोकसंग्रह श्रेष्ठ आहे.
देशपांड्यांनी माझ्या मुद्द्यांना केवळ बगलच मारली नाही तर मी जे म्हटलेच नाही तेही माझ्या तोंडी घातले आहे. ‘योगः कर्मसु कौशलम्’ या श्लोकाचा देशपांड्यांनी दिलेला अर्थ बरोबर नाही असे वर्हातडपांडे म्हणतात असे देशपांडे म्हणतात. वर्हााडपांडे असे कोठे म्हणतात हे देशपांडे दाखवून देतील तर बरे होईल. लोकसंग्रह व सर्वभूतहित यांच्या चर्चेपेक्षा ज्ञान, भक्ति, योग वगैरे ‘मोक्षमार्गाच्या चर्चेला गीतेत जास्त श्लोक खर्ची पडले आहेत यावरून कर्म हे गीतेचे मुख्य प्रतिपाद्य नसून मोक्ष हे आहे असा देशपांडे निष्कर्ष काढतात. ही तमद्धति बरोबर मानली तर भोजनापेक्षा स्वयंपाकाचे महत्त्व आपल्या जीवनात जास्त आहे, कारण स्वयंपाकाला भोजनापेक्षा कितीतरी जास्त वेळ लागतो असे म्हणावे लागेल. कोणत्या मुद्द्याला किती जागा दिली जाते हे तो समजावून सांगण्यास किती विस्तार आवश्यक आहे यावर अवलंबून असते. सर्वभूतहित हा नीतीचा निकष आहे हे तत्त्व समजण्यास इतके सोपे आहे की ते समजावून सांगण्यास जास्त विस्तार करण्याची जरूर नाही. पण ज्ञान, योग व भक्ति हे विषय इतके सहज समजण्यासारखे नाहीत, त्यामुळे त्यांच्या बाबतीत जास्त विस्तार करावा लागतो. गीतेला या विषयांचे जे महत्त्व वाटते ते मोक्षासाठी नाही, तर ज्ञान, भक्ति व योग हे स्थितप्रज्ञता अंगी बाणविण्याचे उपाय आहेत व स्थितप्रज्ञता कर्मकौशलासाठी आवश्यक आहे म्हणून. भक्ति, ज्ञानसाधना व योगसाधना करताना सतत कर्म करीत राहिलेच पाहिजे, योग म्हणजे ‘कर्मयोगं युंजन्’ या साधना केल्या पाहिजेत, व त्यात यश मिळाल्यावरही, म्हणजे मोक्ष वगैरे निष्पत्ति त्यातून झाल्यावरही कर्म सोडण्याचा अधिकार कोणासही नाही असे गीतेने स्वच्छ सांगितले आहे.‘मला जगान न मिळालेले काही नाही तरी मी कर्म करतो, कारण कर्म केले नाही तर लोक उत्सन्न होतील असे गीतेने स्वच्छ सांगितले आहे’. जनकही मोक्षाच्या दृष्टीने‘पोचलेला होता, पण त्याने मोक्षप्राप्ति हो कर्म सोडण्याचा परवाना आहे असे मानले नाही व तो आपल्या राजधर्माचे पालन करीत राहिला.’ म्हणजे मोक्षमार्ग हा केवळ सत्कर्माचे साधन आहे, तेस्वयमेव साध्य नाही, व सत्कर्माचे साध्य लोकसंग्रह व सर्वभूतहित हे आहे हा क्रांतिकारक व अपूर्व विचार गीतेने मांडला आहे.
गीतेचे स्वरूप धर्मग्रंथाचे असल्यामुळे तिची चिरफाड करू नये असे मत देशपांड्यांनी माझ्या माथी मारले आहे.
नास्तिक वा. म. जोशांचे गीताप्रेम
धर्मग्रंथांची चिकित्सा करू नये असे माझे मत नाही. पण ग्रथांचे स्वरूप लक्षात न घेता त्याची चिकित्सा ही चिकित्साच नाही. गणिताची चिकित्सा, भौतिकीची, काव्याची चिकित्सा व नाटकाची चिकित्सा या सर्वथैव वेगळ्या नाहीत काय?भास्कराचार्यांच्या सिद्धान्ताशिरोमणीला काव्य समजून त्याची चिकित्सा करणार्यावला आपण विवेकवादी म्हणू काय? गीता हा धर्मग्रंथ तर आहेच, पण तो एका आर्ष महाकाव्याचा भाग आहे. तेव्हा आर्ष महाकाव्याच्या चिकित्सेचे दण्डकही तिच्या बाबतीत पाळण्यात आले पाहिजेत. साने गुरुजींची श्यामची आई ही कादंबरी आहे, पण तिचा विषय आईने मुलाला केलेला सदाचाराचा उपदेश हा आहे, म्हणजे एका दृष्टीने तोही नीतिशास्त्रावरचा ग्रंथच आहे. पण नीतिशास्त्रप्रवेशाचे परीक्षण व श्यामची आईचे परीक्षण देशपांडे एकाच पद्धतीने करणार काय? नीतिशास्त्रप्रवेशाच्या मूल्यमापनाचे दण्डक श्यामची आईला लावले तर तेही पुस्तक मूल्यहीन मानता येईल. पण अशी परीक्षणे करणार्याीला कोणीही विवेकवादी म्हणणार नाही.
‘मी हिंदूंच्या श्रद्धांचे परीक्षण करतो आणि इतरांच्या श्रद्धांचे करीत नाही याचे कारण एवढेच आहे की तसे केल्यास कसलाही इष्ट परिणाम न होता उलट त्या धर्माच्या अनुयायांचे वैर व अप्रीति ही मात्र होतील,’असे देशपांडे म्हणतात. एकूण मुसलमान व ख्रिस्ती यांची अप्रीति होणे हा अनर्थ आहे,हिन्दूंची अप्रीति मात्र कस्पटासारखी आहे. कुठे गेले देशपांड्यांचे समतेचे तत्त्वज्ञान?
‘प्लेटोचे ग्रंथ’ वर्तमान ग्रंथांच्या बरोबरीने वाचण्यासारखेआहेत. हे दुर्दैवाने गीतेबद्दल म्हणता येत नाही हा देशपांड्यांचा शेरा आहे. तुम्हाला जगातल्या कोणत्यातरी एकाच ग्रंथाच्या वाचनात आयुष्य कंठायला सांगितले तर तुम्ही कोणता ग्रंथ निवडाल? असे वा. म. जोशांसारख्या नास्तिकाला विचारले असता त्यांनी गीतेचे नाव घेतले. मी महाभारतांतर्गत गीतेचे नाव घेईन.आता कांट, कर्तव्य सार्विक असते या त्याच्या मताची हास्यास्पदता मी पूर्वी दाखवलीच आहे. त्यावर देशपांड्यांनी मौन धारण केले आहे.
आता मनुस्मृति.मनुस्मृति १९ व्या शतकातील नीट्शेला वन्द्य वाटली व दोन तीन वर्षांपूर्वी झालेल्या मनुस्मृतीवरील परिसंवादात न्यायमूर्ति पौनीकर यांनी आज मनुस्मृतीत काय ग्राह्य आहे हे दाखवून दिले. ‘पुरोगामी’ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी डॉ. आंबेडकरांशी . चर्चा करताना मनुस्मृतीत न जाळण्यासारखे व न जळण्यासारखे पुष्कळ आहे, उदाहरणार्थ सुखदुःखाची व्याख्या, हे दाखवून दिले.
मनुस्मृतिप्रणीत विकेन्द्रीकरण
मी वरील विद्वानांनी न मांडलेला एक मुद्दा मांडू इच्छितो. मनुस्मृतीमधील चातुर्वण्र्यव्यवस्थेत कोणत्याही एका जातिसमूहात सर्व इष्ट गोष्टींचे एकीकरण व दुसर्या. एखाद्या जातीत सर्व अनिष्ट गोष्टींचे एकीकरण होऊ नये अशी खबरदारी घेतलेली आहे. ब्राह्मणांच्या हाती ज्ञान व प्रतिष्ठा असली तरी त्यांच्याजवळ धन व सत्ता असू नये, क्षत्रियांच्या हाती सत्ता असली तरी त्यांच्याजवळ वैश्यांच्या मानाने धनाची व ब्राह्मणांच्या मानाने ज्ञानाची कमतरता असावी, व वैश्यांच्याजवळ मुबलक धन असले तरी सत्ता व ज्ञान यांची अल्पता असावी अशी ही इष्टांच्या विकेन्द्रीकरणाची व्यवस्था आहे. यात आधुनिक कालात देखील अनुकरणीय असे काही नाही हे म्हणणे दुराग्रहाचे आहे.
आता समता व आपले आजचे संविधान. संविधान म्हणजे संविधानाची कलमे, तदन्तर्गत वैध ठरलेले कायदे व न्यायालयांनी दिलेले निवाडे हे सर्व अभिप्रेत आहे. या सर्वांतून खालील विषमतांचे रानच दृष्टीस पडते. (१) अ जातीने ब जातीला जातीवरून शिव्या दिल्या तर गुन्हा होतो, शिव्या दिल्या होत्या हे सिद्ध करण्याची जबाबदारी में जातीच्या इसमावर नाही. ब जातीच्या माणसाने अ जातीच्या माणसास जातीवरून शिव्या दिल्या तर गुन्हा होत नाही. (२) हिंदूंना आपल्या धर्माचे शिक्षण देणार्याि स्वायत्त संस्था काढण्याचा अधिकार नाही, मुसलमान व ख्रिस्ती यांना तो आहे. (३) ‘हिंदूंवर अन्याय होतो, आम्ही निवडून आलो तर तो अन्याय दूर करू’ असे म्हणून हिंदूंची मते मागितली तर झालेली निवडणूक रद्द होऊ शकते. ‘मुसलमानांवर व ख्रिस्त्यांवर अन्याय होतो तो दूर करण्यासाठी आम्हास मते द्या असे म्हटले तर निवडणूक रद्द होऊ शकत नाही. (४) मुसलमानांना सरकारी नोकर्यांहत प्रवेश मिळावा म्हणून सरकारी खर्चाने त्यांच्या प्रशिक्षणाचे वर्ग चालविणे व अशा वर्गात हिंदूंना प्रवेश नाकारणे वैध आहे. हिंदूंसाठी असे प्रशिक्षणवर्ग चालविणे अवैध आहे. (५) हिंदूंनी अस्पृश्यता पाळली तर तो गुन्हा आहे, मुसलमान व ख्रिस्ती यांनी अस्पृश्यता पाळली तर तो गुन्हा नाही. (सर्वोच्च न्यायालयाचा महंत खटल्यातील गर्भित निर्वाळा) (६) काश्मीरच्या नागरिकाला भारताचे नागरिक होता येते, पण भारताच्या नागरिकाला काश्मीरचे नागरिक होता येत नाही. काश्मीरात अर्धशतक जवळपास राहिलेल्या लोकांना काश्मीरात जन्म झाला नसेल तर शिधापत्रदेखील घेण्याचा अधिकार नाही. (७) नागा लक्षाधीश असला तरी त्याला आयकर द्यावा लागत नाही. बाकीचे नागरिक कनिष्ठ मध्यम वर्गाच्या सीमेवर असले तरी त्यांना आयकर द्यावा लागतो. (८) ब जातीतला मनुष्य लक्षाधीश असला तरी त्याला जातीच्या आधारावर नोकर्याल व बढत्या मिळाल्या पाहिजेत. इतर जातीतला कितीही दरिद्री व शिक्षित असला तरी त्याला नोकरीत मज्जाव आहे.
सहज लक्षात आले ते मुद्दे वर दिले आहेत. सीरवाईंचा ग्रंथ हाताशी असता तर ही यादी यापेक्षा मोठी झाली असती. पण दिली एवढी यादीदेखील आजचे संविधान मनुस्मृतीच्या तुलनेत किती हीन आहे हे दाखविण्यास पुरेसे आहे.
‘सेक्युलॅरिस्ट’ छागला न्यायमूर्ति असताना त्यांनी मुसलमानांना शरियतप्रमाणे वागू देणे हा आपल्या संविधानाचा भंग नाही असा निकाल दिला. या निकालाप्रमाणे शरियत वख्रिस्ती कायदा हे भारतीय संविधानाच्या अन्तर्गतच आहेत. तेव्हा या कायद्यावरील सर्व टीकाआजच्या संविधानालाही लागू होते.
आता पुनः मनुस्मृतीकडे वळतो. मनुस्मृतीने त्रैवणिकांपैकी कोणत्याही एका वर्णात सर्व इष्ट वा अनिष्ट गोष्टींचे केन्द्रीकरण होऊ नये म्हणून काळजी घेतली आहे. पण शूद्रांना मात्र सर्वच दृष्टीने नागविले आहे असा आक्षेप नेहमी येतो व या बाबतीत आजचे संविधान श्रेष्ठ आहे असा दावा सांगण्यात येतो. हा आरोप अज्ञानावर आधारित आहे. मनुस्मृतीने सेवा हा शूद्राचा धर्म सांगितला आहे. सेवा म्हणजे झाडलोट असा आजकाल अर्थ करण्यात येतो. पण या शब्दाचा मनुस्मृतीतील अभिप्रेत अर्थ सव्र्हिसेस असा आहे. शल्यकर्म म्हणजे सर्जरी, विश्वकर्म म्हणजे निर्माणकार्य व सर्व नोकर्यार हे शूद्रांचे क्षेत्र आहे. यामुळेच ब्राह्मणापेक्षा शूद्र गरीब असतात हे सिद्ध करा असे म्हटले की तथाकथित पुरोगाम्यांची पंचाईत होते वआरक्षणासाठी आर्थिक निकष वापरण्यास विरोध होतो.
मनुस्मृतीतील स्त्रियांबद्दलचे उद्गार अनुदार असले तरी आजच्या संविधानाने स्त्रियांवर जेवढा अन्याय केला आहे तेवढा मनुस्मृतीने व परंपरागत हिंदू कायद्याने केलेला नाही. आजच्या कायद्याप्रमाणे एकापेक्षा अधिक स्त्रियांशी विवाह करणे हा गुन्हा आहे व त्यासाठी ७ वर्षे दण्ड होऊ शकतो. पण वाटेल तितक्या स्त्रियांशी विवाह न करता संबंध ठेवणे व त्यांच्याबरोबर राजरोस राहणे हा गुन्हा होत नाही. एवढेच नव्हे तर अशा अविवाहित स्त्रियांच्या व त्यांच्या अपत्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी पुरुषावर येत नाही. परंपरागत कायद्याप्रमाणे जनश्रुति हे प्रमाण आहे व स्त्रीपुरुष पतिपत्नीसारखे राहात असले तर ते विवाहित आहेत हे गृहीत धरण्यात येते. आम्ही विवाहित नाही हे दोघांनीही कबूल केले तरी जिच्याशी संबंध आहे त्या स्त्रीच्या व तिच्या अपत्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी पुरुषावरच येते. स्त्रीच्या अपत्यांत त्या पुरुषापासून न झालेल्या इतर अपत्यांचाही समावेश होतो.
आजच्या कायद्यात याच्या शतांशही सुबुद्धता नाही.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.