पुस्तक परिचय -सावरकर ते भाजपः हिन्दुत्वविचाराचा चिकित्सक आलेख

सावरकर ते भा. ज. प. हा ग्रंथ छोटेखानी दिसत असला तरी त्याचा आवाका मोठा आहे. किमान १९२० पासून १९९२ पर्यंत म्हणजे अंदाजे सत्तर-पंचाहत्तर वर्षांचा कालखंड त्यामध्ये प्रतिबिंबित झाला आहे. भारताला भेडसावणाच्या मुस्लिम प्रश्नाचे त्यामध्ये केलेले चित्रण बरेचसे यथातथ्य आहे. काही ठिकाणी मात्र थोडे जास्त अतिसामान्यीकरण (overgeneralization) झाल्यासारखे वाटते.
ग्रंथाची रचना बांधेसूद आहे. लेखकाने त्याचा आरंभ मुस्लिम प्रश्नापासून करून आपल्या प्रतिपाद्य विषयाचा भरभक्कम पाया रचला आहे. हिन्दुराष्ट्रवाद किंवा हिंदुत्व हा विचार मुख्यतः मुसलमानांकडून (आणि गौणतः ख्रिश्चनांकडून) होणार्यार आक्रमणाची प्रतिक्रिया म्हणून निर्माण झाला आहे आणि आजही त्याचा मुख्य संदर्भ मुस्लिम प्रश्नाचाचआहे असे लेखकाचे मत आहे.
ही मांडणी करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातल्या चार मान्यवर विचारवंतांच्या लेखनाचा आधार घेतला आहे. ते आहेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, श्री. अ. भि. शहा, श्री. नरहर कुरुंदकर आणि श्री. हमीद दलवाई. चौघांच्याही लेखनातले विपुल उतारे लेखकाने उद्धत केले आहेत. हे चारही विचारवंत हिंदुत्ववादी म्हणून प्रसिद्ध नाहीत. ते तटस्थ किंबहुना हिंदुत्वविचाराच्या विरुद्ध बाजूला झुकणारे म्हणून ख्यातनाम आहेत.
ह्या चौघांच्या उताच्याखेरीज ‘मुस्लिम प्रश्नः भाग दुसरा ह्या प्रकरणात उत्तर व दक्षिण भारतातील मुस्लिम नियतकालिकांमधील भरपूर आणि विस्तृत उतारे दिलेले आहेत. हे उतारे उर्दू भाषेच्या मराठी जाणकारांनी मुस्लिम मानसाची दखल घेण्यासाठी मुद्दाम जमा करून प्रकाशित केलेले आहेत. ह्या उर्दू भाषेच्या जाणकारांमध्ये श्री. स. मा. गर्गे, श्री. श्रीपाद जोशी व श्री. श्रीकृष्ण दातार असे तिघे जण आहेत. सुमारे ३५ पाने भरून असे उतारे आहेत. मुस्लिम नियतकालिकांनी ओकलेले ते सारे गरळ वाचून मुस्लिम प्रश्न म्हणून काही आहे ह्याविषयी प्रस्तुत पुस्तकाचा वाचक छिन्नसंशय होतो असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही.
इतक्या वर्षांच्या हिंदूंच्या सहवासानंतरसुद्धा मुस्लिम मानसांमध्ये त्यांच्याविषयी कटुता पुरेपूर भरलेली आहे हे नशेमन(बंगलोर), नई दुनिया (दिल्ली), दावत (दिल्ली), निदा ए मिल्लत (लखनौ), सियासत (हैदराबाद), जम्हूरियत (मुंबई), बागवान (अमरावती), रहनुमा इ दक्कन (औरंगाबाद), अखबार ई नौअ (दिल्ली), मुसलमान (मद्रास), Radiance (दिल्ली), Muslin India (दिल्ली) अशा अनेकानेक भिन्नभिन्न प्रदेशांतील लोकांचे मनोगत व्यक्त करतील अशा सनातनी त्याचप्रमाणे पुरोगामी विचारांच्या नियतकालिकांमधून घेतलेल्या उतार्यांववरून सिद्ध आहे.
स. ह. देशपांडे ह्यांची एकूण मांडणीअतिशय व्यवस्थित आहे. प्रत्येक प्रकरणाच्या प्रारंभीच ते पुढे काय सांगणार ह्याची ते ज्याप्रमाणे झलक देतात त्याचप्रमाणे उतारे, मते ह्यांचे वर्ग पाडतात आणि गुंतागुंतीचे विषय सुबोध करतात. प्रस्तुत उतार्यां ची त्यांनी १३ वर्गात विभागणी केली आहे. त्यांत इस्लामचे आणि मुसलमानांचे श्रेष्ठत्व, मुसलमान आणि राष्ट्राभिमान, धर्मनिरपेक्षता आणि समान नागरी कायदा, जातीयवादी हिंदूंविषयीची मतेआणि धमक्या इत्यादींचा समावेश आहे.
मुस्लिम प्रश्नांना वाहिलेल्या पहिल्या दोन प्रकरणांचा लेखकाने काढलेला निष्कर्ष अगोदर पाहू या. तो असा :
ज्याने खडबडून जाग यावी असे हे भीषण वास्तव आहे. पण हिंदू अजून सुप्त आहेत. ह्याला कारण हिंदूंना आपल्या स्वत्वाची जाणीव पूर्वी झाली नव्हती आणि आजही पुरेशी झालेली नाही.
म्हणून आंबेडकरांपासून दलवाईंपर्यंत चित्रिल्या गेलेल्या प्रश्नाला हिंदुसंघटन हे तर्कसंगत उत्तर आहे. दलितांवर दलित म्हणून अत्याचार होतात तेव्हा त्यांनी दलित म्हणूनच एकत्र येणे स्वाभाविक आणि इष्टही असते. आदिवासींवर अन्याय झाले तर त्यांनी आदिवासी म्हणून एकत्र येणे स्वाभाविक आणि इष्टही असते. त्याच न्यायाने हिंदूंवर ज्यावेळी आघात होतात त्यावेळी त्यांनी हिंदू म्हणून एकत्र येणे स्वाभाविक आणि इष्टही आहे. इतके हे खरे म्हणजे साधे आहे.
मात्र हे उत्तर शहा-कुरुंदकर-दलवाई देत नाहीत.एक काळ असा होता की आंबेडकर हे उत्तर देत होते. शहा-कुरुंदकर-दलवाई व आंबेडकर मुस्लिमसमस्या सोडविण्यासाठी कोणते उपाय सुचवितात ते पुढच्या प्रकरणात लेखकाने वाचकांसमोर मांडले आहेत.
शहांचे ह्या प्रश्नाला उत्तर आहे आधुनिकीकरण. ते एका ठिकाणी म्हणतात, हिंदूमुस्लिम प्रश्नावर एकच उपाय आहे. तो म्हणजे आपल्या (हिंदूमुसलमानांच्या) सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचे हेतुपूर्वक आणि वेगवान आधुनिकीकरण घडवून आणणे.’ त्यांनी आधुनिकतेची तत्त्वेही सांगितली आहेत. ती म्हणजे विवेकवाद (रॅशनॅलिटी), व्यापक अर्थाने उदारमतवाद (लिबरल स्पिरिट), विविध विचारसरणींचा मुक्त आविष्कार, निर्णयप्रक्रियेची अनेक केन्द्रे, अनुभवाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांची स्वायत्तता, धर्मनिरपेक्ष नीतिशास्त्र आणि व्यक्तीच्या खाजगी विश्वाचा आदर. ह्याचा अर्थ धार्मिक भावनेची जीवनातून हकालपट्टी करणे असा नाही; पण येथे धार्मिक भावनेचा अर्थ सृष्टीच्या अंतिम गूढाच्या चिंतनातून निर्माण होणारा विनम्र भाव एवढाच आहे. कुरुंदकरांचा भर इहवादावर आहे. मुस्लिम समाजामध्ये आधुनिक मन निर्माण करणारी प्रभावी चळवळ असती, आपल्याच धर्माने निर्माण केलेल्या आपल्याच प्रजेच्या गुलामगिरीची चीड आणणारे मन जर मुस्लिम समाजात निर्माण झाले असते, तर हा सेक्युलर प्रवाहच फक्त फाळणी टाळू शकला असता. तसा प्रवाह नव्हता हे फाळणीचे मूळ कारण. त्याचप्रमाणे ‘हिंदूंनाही एकत्र येण्यासाठी आपल्या मनावरील धर्माचा सगळा गंज घासून पुसून काढणे आवश्यक आहे असे कुरुंदकर म्हणतात.
तर दलवाई म्हणतात, एक छोटा बुद्धिवादी वर्ग देखील समाजाला इष्ट वळण लावीत असतो.’ समाजाच्या चळवळींचे नेतृत्व करीत असतो. सनातनीपणाविरुद्ध लढत असतो. नव्या कल्पना, नव्या जीवनमूल्यांचा सतत स्वीकार करीत असतो. आपल्या बुद्धीच्या कसोटीवर घासून त्यातील सत्यता अजमावून पाहत असतो. हिंदू समाज अशा प्रक्रियेतून गेला, तावूनसुलाखून निघाला, आणि एका उदारमतवादी चिकित्सक बुद्धिवादी वर्गाला त्या समाजाने जन्म दिला. मुस्लिम समाज ह्या प्रक्रियेतून अजून गेलेला नाही.’ ‘मुसलमानांमध्ये एक उदारमतवादी वर्ग निर्माण झाला पाहिजे. मुस्लिम समजाची ती आजची ताबडतोबीची गरज आहे.
शहा, कुरुंदकर आणि दलवाई हे तिघेही मुस्लिम समाजाचे असे परिवर्तन घडवून आणण्यात हिंदु समाजाची मोठी जबाबदारी आहे असे मानतात.
शहा म्हणतात, एक तर हिंदू समाजाने स्वतः आधुनिक बनले पाहिजे, कारण तो जर सनातनी झाला तर मुसलमान अधिक सनातनी होतील. ‘काही सुशिक्षित आणि आधुनिक दृष्टिकोण स्वीकारलेले मुसलमान भारतात आहेत. पण त्यांची संख्या मोठी नाही आणि म्हणून ते समाजापासून दुरावलेलेही आहेत. पण हेही खरे की.. जी नवी समावेशक संस्कृती भारतात उदयास येत आहे ती त्यांना आपलीशी वाटेल ह्यासाठी हिंदूंनी फारसे काही केले नाही.’
कुरुंदकर म्हणतातः ‘भारतीय सेक्युलॅरिझमचा खरा प्रश्न भारतीय संविधानाच्या चौकटीत मुस्लिम जमात कशी पचवावी हा नाही; ८५ टक्के असणारा हिंदु समाज मनाने सेक्युलर कसा करावा हा प्रश्न आहे. ‘ ‘हिंदू समाजाची प्रगती आणि आधुनिकता ह्यांच्या धक्क्याने जेव्हा भारतीय मुसलमानांची झोप उडेल तेव्हा मुस्लिम समाजातही तसलीच प्रक्रिया सुरू होईल आणि माझ्यासारख्यांच्या प्रयत्नांना मदत होईल. मुसलमान बदलत आहेत. पण तो बदल क्षीण आहे, त्या बदलाची गति अतिशय मंद आहे. त्याचप्रमाणे समान नागरी कायदा व्हावा असे तिघांनाही वाटते.
हिंदूंनी अधिकाधिक आधुनिक झाले पाहिजे ह्याविषयी देशपांडे ह्यांना शंका नसली तरी हिंदूंची आधुनिकता मुसलमानांना अधिक आधुनिक करील ह्याविषयी त्यांच्या मनामध्ये संशय आहे.
ह्या मुस्लिम प्रश्नावर इलाज काय तर तो हिंदुसंघटन हाच आहे असे देशपांडे निघून प्रतिपादन करतात. शहा-कुरुंदकर-दलवाई ह्यांनाही मुस्लिम प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी हिंन्दुसंघटन आवश्यक आहे असे वाटते. पण हिंदू ह्या शब्दाबद्दल त्यांना तिटकारा असल्यामुळे ते तो इलाज सांगत नाहीत. त्यांचे हिंदूंबद्दल आणखीही काही गैरसमज आहेत. डॉ. आंबेडकरही शहा-कुरुंदकर-दलवाई (शकुद) ह्यांच्या भूमिकेपासून फार दूर नव्हते. किंबहुना त्यांनाही हिंदूंसघटन हवेच होते. पण पुढेपुढे ते ह्या विचारसरणीपासून पूर्णपणे नाही तरी बर्याहच अंशी दुरावले, ह्याचे महत्त्वाचे कारण तथाकथित हिंदुसंघटकांचा प्रतिगामी दृष्टिकोण हे आहे असे देशपांडे ह्यांचे मत आहे.
स्वा. सावरकरांचा हिंदुराष्ट्रवाद कसा होता याचे विस्तृत विवेचन यानंतर देशपांडे करतात. त्यांचे हिंदुत्व हे हिंदुधर्मीयत्वाहून वेगळे व हिंदुराष्ट्रीयत्वाला पोषक होते असे ते प्रतिपादन करतात.
स्वा. सावरकरांचा त्यांच्या अनुयायांनी कसा पराभव केला ते देशपांडे विस्ताराने पुढे विशद करतात. हा त्यांच्या सखोल अध्ययनाचा जुनाच विषय असून त्यावर मौजमध्ये १९८९ मध्येच त्यांनी लिहिलेल्या प्रदीर्घ लेखाचा महत्त्वाचा अंश येथे आपणास वाचावयास मिळतो. मिळतो.
सातव्या प्रकरणापासून पुढचा भाग हा संघविचार समजावून देण्यासाठी उपयोगात आणला आहे. हा भागही या पुस्तकाच्या बाकीच्या भागासारखाच अतिशय वाचनीय झाला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्त्वज्ञान, हिंदुत्वविचाराचे त्या तत्त्वज्ञानामधील स्थान, हिंदुत्वविचाराची होत गेलेली उत्क्रान्ति, इतकेच नव्हे तर संघविचाराच्या मर्यादा,त्यामधील दोष लेखकाने अतिशय परखडपणे दाखवून दिले आहेत. ते मुळातूनच वाचावे अशी आमची शिफारस आहे.
स. ह. देशपांडे यांचे एकूण लेखन अत्यंत सहृदयतेने केलेले व सर्व पक्षांविषयी सहानभूती असलेले असे आहे. पण ते सहानुभूती म्हणजे भीड नव्हे हे चांगले जाणतात, त्यामुळे ते कोणाचीही मुर्वत न बाळगता त्यांना योग्य वाटते ते निःसंदिग्धपणे सांगतात. त्याचा प्रत्यय पुस्तक वाचताना ठायी ठायी येतो. त्यांनी प्रस्तुत पुस्तकात हिंदुत्वविचारविषयक पुस्तकांमध्ये मोलाची भर घातली आहे.
पुस्तकाची छपाई उत्तम आहे. पुस्तकामधील मुद्रणदोषांची संख्या अत्यल्प आहे. शुद्धमुद्रण करवून घेणे किती दुष्कर झाले आहे ते ठाऊक असल्यामुळे लेखकाचे, प्रकाशकाचे व मुद्रकाचेही अभिनंदन.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.