विवाह आणि नीती- आमची भूमिका

Morals या जगप्रसिद्ध ग्रंथाचा अनुवाद सादर केला. त्याचा हेतू विवाह, कुटुंबसंस्था आणि नीती या अतिशय महत्त्वाच्या विषयावरील एका थोर विचारवंताचे विचार वाचकांना कळावे व त्यांच्या विचारांना चालना मिळावी. रसेल यांची सर्वच मते सर्वांना पटतील अशी अर्थातच आमची अपेक्षा नव्हती. परंतु मनुष्यसमाजाविषयी ज्यांनी खोल विचार केला आहे आणि तो विचार सुबोध आणि स्वच्छ शैलीत वाचकांपुढे मांडला आहे. अशा समाजचिंतकाच्या विचारापासून आमचे वाचक वंचित राहू नयेत एवढाच हेतू त्यामागे होता. तो अनुवाद आता संपला आहे. त्या ग्रंथातील विचारांविषयी आमचे मत काय आहे हा प्रश्न वाचकांच्या मनात अनेकदा उद्भवला असणार, आणि खरे म्हणजे तो अनेकवार विचारलाही गेला आहे. अशा स्थितीत त्या प्रश्नाचे स्पष्ट आणि निःसंदिग्ध उत्तर देणे हेआमचे कर्तव्यच ठरते.
या विषयाविषयी आमची भूमिका थोडक्यात सांगायची तर ती व्यक्तिस्वातंत्र्यवादी आणि समतावादी अशी आहे. व्याक्तिस्वातंत्र्य आणि समता या मूल्यांचे समर्थन आज नव्याने देण्याची गरज नाही. ते गेल्या दोनशे वर्षांत अनेकदा अतिशय प्रभावीपणे देऊन झाले आहे. म्हणून या दोन मूल्यांविषयी संक्षेपाने दोन शब्द मांडून आपण पुढे जाऊ.
स्वातंत्र्य आणि समता ही स्वतोमूल्ये आहेत काय? ती बहुधा नसावीत. परंतु ती प्रधान साधनमूल्ये आहेत हे निर्विवाद. तसेच सुख हे एकमेवस्वतोमूल्य आहे काय यावरही वाद होऊ शकेल. पण सुख हे एक प्रधान स्वतोमूल्य आहे हे निश्चित. आता कोणत्याही प्रकारची सुखसाधना किंवा सुखप्राप्ती स्वातंत्र्याशिवाय अशक्य आहे हे युक्तिवादाने सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. परतंत्र मनुष्याच्या बहुतेक इच्छा अतृप्तच राहतात, आणि म्हणून त्याच्या जीवनात अनेक प्रकारचे असुख, असमाधान, असंतोष या गोष्टी मोठ्या प्रमाणात असतात. परंतु या सर्व गोष्टी अनिष्ट किंवा अपमूल्ये आहेत. सुखप्राप्तीकरिता स्वातंत्र्य अपरिहार्य असल्यामुळे ते प्रधान साधनमूल्य आहे असे वर म्हटले आहे. स्वातंत्र्याच्या समर्थनार्थ सांगण्यासारखे पुष्कळ आहे, परंतु ते सुखाचे अनिवार्य साधन आहे हे त्याचे पुरेसे समर्थन आहे.
परंतु प्रत्येक मनुष्याला स्वातंत्र्य असावे हे म्हणणे खरे असले तरी ते अपुरे आहे. कारण स्वातंत्र्य किती असावे?हा प्रश्न त्यातून लगेच उद्भवतो. समाजात अमर्याद स्वातंत्र्य कोणालाच असू शकत नाही. कारण एका व्यक्तीच्या स्वातंत्र्याने अन्य सर्व व्यक्तींच्या स्वातंत्र्यावर मर्यादा येणार. समाजाबाहेर गिरिकंदरांत मनुष्य पूर्ण स्वतंत्र राहू शकेल. परंतु समाजातील प्रत्येक नागरिकांच्या स्वातंत्र्याने अन्य सर्वांचे स्वातंत्र्य मर्यादित होते. ही एक मर्यादा सोडली तर व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर अन्य कोठलेही बंधन नसावे असे म्हणता येईल.
वर जे स्वातंत्र्यावरील मर्यादेविषयी लिहिले आहे त्यातच समतेचे तत्त्व समाविष्ट आहे. कारण सर्व मनुष्यांना समान स्वातंत्र्य नसेल तर ज्यांचे स्वातंत्र्य कमी असेल त्यांच्या सुखसाधनेत अधिक व्यत्यय येणार. म्हणून स्वातंत्र्याबरोबर समताही अनिवार्य मानावी लागते. स्वातंत्र्याला सामाजिक मूल्य प्राप्त होते ते समतेमुळे. अमर्याद स्वातंत्र्य म्हणजे जंगलाचा न्याय. म्हणून स्वातंत्र्याबरोबरच समताही अनिवार्य साधनमूल्य आहे असे म्हणावे लागते.
परंतु समतेचे एवढेच समर्थन पुरेसे वाटत नाही. सर्व मानव समान आहेत हे म्हणणे सकृद्दर्शनी तर असत्य दिसते. ‘समान’ या शब्दाच्या सामान्य अर्थी सर्व माणसे समान नाहीत ही गोष्ट नाकारणे अशक्य आहे. जरी सर्व मनुष्य मानव या एकाच जातीचे असले, आणि त्यामुळे त्यांच्यात अनेक गोष्टींचे साम्य असले तरी त्यांच्यात व्यक्तिपरत्वे अनेक भेदही आहेत हे स्पष्ट आहे. उंची, वजन, रंग, शक्ती, बुद्धी इत्यादि सर्व बाबतीत माणसे परस्परांहून भिन्न असतात. मग ती सर्व समान आहेत असे म्हणण्याचा अर्थ काय आहे? समता एक कविकल्पना आहे, काही आदर्श वेड्या लोकांचे स्वप्न आहे हे खरे नाही काय?
या प्रश्नांची उत्तर असे आहे की सर्व मनुष्य समान आहेत हे वाक्य वाच्यार्थाने घेतले तर ते असत्य आहे हे मान्य करावे लागते हे खरे आहे. पण ते वाक्य त्या अर्थाने अभिप्रेतच नाही. त्याचा अभिप्राय नैतिक आहे. सर्व मनुष्यांना समान वागणूक मिळावी असा त्याचा अभिप्राय आहे. तत्त्वज्ञांनी आणि राज्यशास्त्रज्ञांनी हे तत्त्व सर्व मनुष्य समान आहेत अशा वास्तववर्णनात्मक वाक्यात – म्हणजे विधानात व्यक्त केले असले तरी ते विधान नव्हे, तर तो एक विधी आहे, म्हणजे आपण काय करावे याचे दिग्दर्शन करणारे एक विध्यर्थी वाक्य आहे. आणि या विध्यर्थी वाक्याचे समर्थन वर सांगितल्याप्रमाणे ते सुखप्राप्तीचेअनिवार्य साधन आहे हे आहे.
समतावादी कुटुंब
आता स्वातंत्र्य आणि समता या दोन गोष्टी जर सुखसाधनेकरिता अपरिहार्य असतील तर समाजातील सर्वच व्यवहारांत त्या आधारभूत मानाव्या लागतील. शासनसंस्था, अर्थसंस्था इत्यादि सामाजिक अंगांप्रमाणेचकुटुंबसंस्थेचीही उभारणी या दोन आधारांवर केली पाहिजे. याचा अर्थ कुटुंब स्वातंत्र्यवादी आणि समतावादी असावे लागेल. आदर्श कुटुंब कसे असावे या प्रश्नाचे उत्तर ते कुटुंबातील सर्व घटकांना जास्तीत जास्त आणि समान स्वातंत्र्य देणारे असावे असे द्यावे लागेल. असे कुटुंब कशा प्रकारचे असेल याचे दिग्दर्शन करण्यापूर्वी एका महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे.
कामवासनेविषयी वास्तववादी विचार करणे आवश्यक
कामवासनेविषयी आपली अभिवृत्ती आपल्या समाजातच केवळ नव्हे तर सामान्यपणे सर्वच मानवसमाजात विकृत, अंधश्रद्धेने ग्रस्त अशी राहिलेली आहे. त्यामुळे तिच्याविषयी वास्तववादी, निर्विकार मनाने विचार करणे अशक्य होऊन बसले आहे. हीस्थिती पालटली पाहिजे. कामप्रेरणा ही भुकेसारखीच स्वाभाविक आणि तिच्याइतकीच प्रबळ अशी प्रवृत्ती आहे हे आपण ओळखले पाहिजे. हे न ओळखल्यामुळे ती एक गुह्य आणि अनिष्ट प्रवृत्ती असून तिचे दमन करणे हाच तिला काबूत ठेवण्याच्या उपाय आहे असे सामान्यपणे मानले गेले. मानवाच्या इतिहासात सर्वत्र तापसवादी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात आढळते आणि ब्रह्मचर्याचा उदोउदो सर्वत्र केलेला दिसतो. परंतु कामप्रेरणा ही इतकी प्रबल प्रवृत्ती आहे की तिचे पूर्ण दमन करणे अशक्यप्राय आहे, आणि ते शक्य झाले तरी अपवादात्मक प्रकरणातच. सामान्यपणे शमदमाचे सर्व बंध तोडून ती सतत व्यक्त होत असते, आणि कामवासना निषिद्ध मानल्यामुळे ती लपविण्याची आपली खटपट असते. त्यामुळे या प्रवृत्तीचा आविष्कार लपूनछपून अनिष्ट मार्गानी होत असतो. कामप्रेरणा हा उघड चर्चेचा विषय नव्हे असे मानले गेले. खाणेपिणे या नैसर्गिक गरजांची चर्चा ज्या मोकळेपणाने, अकृत्रिमपणे केली जाते त्या अकृत्रिमपणे आणि मोकळेपणाने कामप्रेरणेचीही चर्चा केली पाहिजे. त्याशिवाय सध्या विकृत अवस्थेत असलेले, कामजीवन निरोगी होण्याची आशा नाही. बालकांना लैंगिक गोष्टींची माहिती अल्पवयातच स्वाभाविकपणे करून द्यायला हवी. म्हणजे मग त्यांच्याविषयी ती चोरून माहिती मिळविणार नाहीत. कामप्रेरणा हा सध्या जो एक घाणेरडा विषय मानला जातो तो त्याऐवजी मानव जीवनातील एक महत्त्वाचा विषय मानला जाऊन त्याविषयी आपली अभिवृत्ती शास्त्रीय आणि वास्तववादी झाली पाहिजे.
आदर्श कुटुंब कसे असेल हे सांगण्यापूर्वी त्याकरिता वरील सुधारणा अगोदरच झालेली असेल असे गृहीत धरायला हरकत नाही. आदर्श कुटुंबात त्याचे घटक जे पती, पत्नी आणि अपत्ये त्या तिघांनाही समान स्वातंत्र्य असेल. (अपत्यांच्या स्वातंत्र्याचा प्रश्न काहीसा गुंतागुंतीचा आहे. त्या संबंधाने थोडे नंतर बोलू.) सध्याचे कुटुंब या आदर्शापासून फारच दूर आहे. हे स्पष्ट आहे. वर्तमान कुटुंब पितृसत्ताक आहे, म्हणजे त्याचा आधार पित्याची सत्ता हा आहे, आणि त्यामुळे पत्नी आणि अपत्ये या दोन घटकांच्या स्वातंत्र्याची मोठ्या प्रमाणावर गळचेपी होते. आता हे खरे आहे की सुधारकांच्या अविश्रांत धडपडीमुळे मूळच्या पितृसत्ताक कुटुंबाला बरीच भगदाडे पडली आहेत. विशेषतः हिंदू कोड कायद्याने पती आणि पत्नी, पुत्र आणि कन्या, यांना मोठ्या प्रमाणात समान अधिकार दिले असल्यामुळे पितृसत्ताक कुटुंब पुष्कळ खिळखिळे झाले आहे. परंतु कायद्याने जरी स्त्रीला पुरुषाबरोबरीचे हक्क मिळाले असले तरी त्या कायद्याची अंमलबजावणी समाजाच्या वरच्या थरातील काही मूठभर कुटुंबांतच होऊ शकली आहे. बाकीच्या कुटुंबांत पुरुषसत्ता, पितृसत्ता अजूनही जवळपास मूळच्या स्वरूपात चालू आहे असे म्हणावे लागते. कोणतीही सुधारणा होण्यास केवळ कायदा पुरत नाही. तो कायदा प्रत्यक्षात उतरण्याकरिता समाजाचे शिक्षण व्हावे लागते. आपले अधिकार काय आहेत, त्यांना कायद्याचे कोणते संरक्षण मिळणे शक्य आहे हे ज्यांना माहीत नाही आणि बहुसंख्य स्त्रियांचा त्यांत समावेश होतो.त्यांच्या दृष्टीने कायदा असून नसल्यासारखाच असतो. अर्थात् त्यामुळे कायद्याचे महत्त्व कमी होत नाही. कायदा असेल तर त्याची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी आपण करू शकतो, आणि ती मागणी नेटाने आणि सतत केल्यानेच समाजाच्या व्यवहारात फरक पडत असतो.
आदर्श कुटुंबात वर म्हटल्याप्रमाणे पती किंवा पत्नी कोणाचेही वर्चस्व राहणार नाही. दोघांचेही अधिकार समान असतील. पुरुषाला जसे हव्या त्या व्यवसायात शिरून पैसे कमावता येतात, तसेच स्त्रीलाही करता येईल, एवढेच नव्हे तर ती आपल्या कमाईची पूर्ण मालकीण असेल. विवाह जर काही कारणामुळे (उदा. पती आणि पत्नी अननुरूप असल्यामुळे) संपवायचा असेल तर त्याची सोय असेल. स्वच्छच सांगायचे तर विवाहविच्छेद विवाहाइतकाच सुलभ असेल. सामान्यपणे उभयसंमतीने तो करता यावा. कुटुंबाचा तिसरा घटक जी अपत्ये त्यांच्याही हक्कांचे संरक्षण त्यात व्हावे. बालकांच्या शारीरआणि मानस विकासाच्या जास्तीत जास्त संधी त्यांना दिल्या जाव्यात. आईबापांनी आपल्या आवडी निवडी त्यांच्यावर लादू नयेत. लहान मूल सर्वथा पराधीन असले तरी ते एक न उमललेले स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असते हे लक्षात ठेवून त्याचा नैसर्गिक विकास होण्याचा मार्ग उघडा ठेवला पाहिजे.
अपत्यांना जन्म देणे ही अत्यंत जबाबदारीची गोष्ट आहे, आणि तिच्याकडे अतिशय गंभीरपणे पाहिले पाहिजे. परंतु वर्तमान समाजात अपत्यांना जन्म देणे हे कुत्र्यामांजरांच्या प्रजननाहून अधिक विचाराने होत असेल असे दिसत नाही. या विषयासंबंधी फार चुकीचे विचार व्यक्त केले जातात. उदा. महारोगी किंवा वेड लागलेल्या स्त्रीपुरुषांना प्रजननाला अक्षम करून टाकावे अशी सूचना कोणी केल्याबरोबर एक गृहस्थ असे म्हणालेले मी पाहिले आहे की, प्रत्येक मनुष्याला अपत्य प्राप्त करून घेण्याचा हक्क आहे. हे बोलणे बेजबाबदारपणाचा कळस म्हणावे लागेल. कारण अपत्य जन्माच्या बाबतीत प्रथम विचार करावा लागेल तो अपत्यांचा, त्यांच्या हक्कावर गदा आणणारी मातापितरे आपले कर्तव्य पूर्णपणे विसरली आहेत असे म्हटले पाहिजे. अपत्ये जन्माला येतात त्याला त्यांची मातापितरे पूर्णपणे जबाबदार असतात. अपत्ये काही स्वेच्छेने जन्माला येत नाहीत. तेव्हा एखाद्या अपत्याला जन्माला घालण्यापूर्वी ते निरोगी निपजेल, आणि त्याचे संगोपन, शिक्षण इत्यादींची पुरेशी सोय असेल याची व्यवस्थामातापित्यांनी करणे अवश्य आहे. सध्या ज्या अविचाराने आणि बेपर्वाईने अपत्यांना जन्माला घातले जाते ते पाहिले म्हणजे त्यांचे आईबाप बुद्धिमान माणसे नसून बुद्धिहीन पशू आहेत असे वाटू लागते.
समतावादी कुटुंबात अपत्यांच्या हितांची पूर्ण काळजी घेतली जाईल, एवढेच नव्हे तर कौटुंबिक जीवनात अपत्यांना प्रधान स्थान दिले जाईल असे म्हणता येईल.या सर्व दृष्टीने पाहिले तर आपले परंपरागत वर्तमान कुटुंब या आदर्शापासून फारच दूर आहे असे म्हणावे लागते.
समतावादी कुटुंब शक्य आहे काय?
वर ज्या आदर्श कुटुंबाचे चित्र आपण रेखाटले आहे तसे कुटुंब दिसायला फार आकर्षक दिसते खरे; पण ते कधीकाळी प्रत्यक्षात येऊ शकेल काय? असा प्रश्न काही लोक करतात. त्यांचे म्हणणे असे असते की कुटुंब हे अनेक व्यक्तीचे बनलेले असल्यामुळे त्यात कोणाचा तरी एकाचा अधिकार सर्वोच्च असणे आवश्यक आहे. समाजात कोठेही अशी संस्थादिसत नाही की जिच्यात कोणी एक मनुष्य प्रमुख नाही. पती आणि पत्नी यांना जर कुटुंबात समान अधिकार असतील तर त्यांच्यात सतत मतभेद होत राहतील आणि ते मिटविण्याचा कोणताही उपाय उपलब्ध राहणार नाही. अशा कुटुंबांत सतत भांडणे, अबोला, आदळआपट इत्यादि होत राहतील, आणि ते फार काळ टिकणे ही दुरापास्त होईल. कुटुंबातील सत्ता एका मनुष्याच्या हातात असेल तर वरील प्रकारचे वाद फारसे उद्भवणार नाहीत, आणि उद्भवलेच तर त्यांचा निकाल सहज लागू शकेल. म्हणून समतावादी कुटुंब हे सुधारकांचे केवळ स्वप्नरंजन आहे असे ते म्हणतात.
हा आक्षेप सयुक्तिक दिसतो यात शंका नाही. परंतु वर्तमान कुटुंबाहून भिन्न प्रकारचे कुटुंब असू शकत नाही, निदान ते टिकू शकणार नाही असे म्हणणार्याट लोकांची कल्पनाशक्ती फारच तोकडी आहे असे म्हणावे लागते. मनुष्यसमाजात गेल्या पाच हजार वर्षांत भिन्न स्थळी आणि भिन्न काळी इतक्या अतिशय भिन्न प्रकारची कुटुंबे अस्तित्वात होती, आणि आजही आहेत, की त्यांशी परिचित माणसाला अमुक प्रकारचे कुटुंब शक्य नाही असे म्हणणे अशक्य व्हावे. मानवाच्या इतिहासात जसे पितृसत्ताक कुटुंब दिसते, तशीच प्राचीन काळी सर्वत्र मातृवंशीय पद्धती होती. शिवाय अनेकपत्नीकत्वाप्रमाणेच अनेकपतिकत्व एवढेच नव्हे तर अन्यही अनेक विवाहप्रकार आढळतात. तेव्हा विवाहाच्या बाबतीत अमुक प्रकार मानवस्वभावाविरुद्ध आहे आणि तो दीर्घकाळ टिकणार नाही अशा प्रकारची विधाने छातीठोकपणे करणे अविवेकी आहे असे म्हणावे लागते. पती किंवा पत्नी कोणाचेही कुटुंबात वर्चस्व असणे अनिष्ट आहे असे जर मनुष्यांना पटेल तर ते सामोपचार आणि सहकार्य यांवर आधारलेल्या कुटुंबात राहणे पसंत करतील. शेवटी महत्त्वाचे काय आहे हे ठरविणे महत्त्वाचे. ते एकदा ठरले की त्यानुसार जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न माणसे करू लागतात. स्वामिसेवकभावावर आधारलेले वर्तमान कुटुंब अनिष्ट आहे आणि कौटुंबिक जीवनाचा मूलाधार स्नेह आहे हे एकदा पटले म्हणजे मग समान स्त्रीपुरुषांच्या स्वयंस्फूर्त सहकार्यावर आधारलेल्या कुटुंबाचा प्रयोग होऊ शकेल. निदान हा प्रयोग प्रत्यक्ष करीपर्यंत तो फसेल असा निश्चित दावा करणे चुकीचे आहे हे तरी मान्य केले पाहिजे.
समतावादी कुटुंबावरील आक्षेप
स्त्रीस्वातंत्र्याची वाटचाल हळूहळू पण अखंड चालू आहे. वर म्हटल्याने हिंदू कोड कायद्याने त्या वाटचालीला मोठीच मदत केली आहे, हे निःसंशय. त्यानंतरही सुधारणावादी चळवळींनी या विषयाचा पुष्कळ प्रचार केला असून सुधारणेचे पाऊल रोज पुढेच पडत आहे हेही खरे आहे. परंतु असे असले तरी प्रौढ मंडळींचा असा सूर उमटू लागला आहे की झाली एवढी सुधारणा पुरे झाली! यापुढे जर आपण स्त्रीस्वातंत्र्याचेगाडे पुढेच दामटत राहिलो तर लवकरच आपल्यावर पश्चात्ताप करण्याची पाळी आल्यावाचून राहणार नाही. स्त्रीस्वातंत्र्याच्या नावाखाली आपण समाजाचे मूलाधारच पोखरतो आहोत. स्त्रीला आज मिळाले आहे त्याहून अधिक स्वातंत्र्याचा हव्यास जर आपण धरला तर कुटुंबसंस्थाचउद्ध्वस्त होऊन जाईल आणि मग स्त्री आणि पुरुष दोघांवरही आपला हजारो वर्षे जतन केलेला सांस्कृतिक ठेवा गमावण्याचा प्रसंग येईल.’
या आक्षेपात थोडे तथ्य आहे यात शंका नाही. समतावादी कुटुंब पती आणि पत्नी दोघांचाही दर्जा समान असल्यामुळे त्यांच्यात मतभेद झाल्यास त्याचा निकाल लागणे कठीण होणार आहे. शिवाय पुरुषाइतकेच स्त्रीलाही सर्व अधिकार असल्यामुळे सध्या पुरुष जे स्वातंत्र्य उपभोगतो ते स्त्रीही उपभोगण्याचा आग्रह धरील. आज पुरुष ज्याप्रमाणे विवाहबाह्य संबंध ठेवू शकतो तसेच स्त्रीही ठेवू लागेल. मग अशा संबंधातून उत्पन्न झालेली संतती कोणाची असा प्रश्न होऊन त्यातून कुटुंब मोडणे अपरिहार्य होऊन बसेल. सारांश, पुरुषाइतके स्वातंत्र्य स्त्रीलाही मिळाले तर कुटुंब फार काळ टिकणार नाही हे निश्चित. सध्या ज्याप्रमाणे आमरण टिकणारी कुटुंबे सर्वत्र दिसतात तशी कुटुंबे अपवादात्मक होतील. अशा स्थितीत अपत्यांची किती ओढाताण होईल आणि त्यांच्या मनावर त्याचा किती अनिष्ट परिणाम होईल याची कल्पनाच केलेली बरी.
या आक्षेपाला समतावादी काय उत्तर देऊ शकेल?
या आक्षेपात तथ्य आहे हे कबूल करायला हवे. परंतु त्यामुळे स्वातंत्र्यवादी आणि समतावादी लोकांनी आपले सुधारणेचे प्रयत्न आवरते घ्यावेत असे म्हणणे सयुक्तिक होणार नाही. सध्याचे कुटुंब स्त्रीच्या पारतंत्र्यावर आधारलेले आहे, आणि त्या पारतंत्र्याशिवाय ते टिकू शकत नाही हे स्पष्ट आहे. वर्तमान कुटुंब स्थिर, म्हणजे चिरकाल, आमरण टिकणारे असेल, पण त्याकरिता त्यातील एका व्यक्तीच्या स्वातंत्र्याची किंमत द्यावी लागते हे लक्षात ठेवले पाहिजे. असे कुटुंब आमरण टिकले तरी त्यात सुखाचा अंश किती असणार? अशा कुटुंबात खर्याे प्रेमाचा अंश अत्यंत अल्प असणार. कुटुंब टिकावे, पण ते पतिपत्नींच्या प्रेमावर. सध्याचे कुटुंब तसे नाही. ते टिकाऊ आहे, पण त्याचे कारण त्यात एका व्यक्तीची पूर्ण मुस्कटदाबी झाली आहे. तेव्हा समतावादी कुटुंब चिरकाल टिकणारे नसेल हे मान्य करूनही, त्यात उपलब्ध असलेल्या मोठ्या सुखसाधनेच्या शक्यतेमुळे ते वर्तमान कुटुंबाच्या तुलनेत स्वीकरणीय असू शकेल हे लक्षात ठेवण्यासारखे आहे.
समतावादी कुटुंब अल्पजीवी होण्याची भीती आहे हे खरे असले तरी ज्यामुळे ते दीर्घकाल टिकू शकेल अशा काही नैसर्गिक प्रवृत्ती आहेत याकडेही आपण लक्ष दिले पाहिजे. त्यांपैकी एक गोष्ट म्हणजे अपत्याविषयी मातापित्यांना वाटणारा स्नेह. या स्नेहाखातर एरव्ही मोडू पाहणारे कुटुंबही दीर्घ काळ अभंग राहू शकेल. मातापित्यांना अपत्यांविषयी निःस्वार्थ प्रेम वाटत असते, आणि म्हणून पतिपत्नींचे परस्परांवरील प्रेम ओसरल्यावर (आणि त्यांची मने अन्यत्र थोडीफार गुंतल्यावरही) ती अपत्याच्या प्रेमाने एकत्र राहू शकतील. सध्या पत्नी ज्याप्रमाणे नवऱ्याच्या विवाहबाह्य संबंधांकडे काणाडोळा करते, तसा नवर्यातनेही बायकोच्या विवाहबाह्य संबंधांकडे काणाडोळा केला तर हे शक्य होईल.
समतावादी कुटुंबामुळे समाजात अनीती वाढेल
वरील उपायाने कुटुंब थोडेबहुत दीर्घकाल टिकले तरी या व्यवस्थेत अनीती माजेल त्याचे काय?असा प्रश्न टीकाकार विचारतात. त्या प्रश्नाला समतावाद्याचे उत्तर काय आहे?
नीती-अनीतीच्या प्रश्नासंबंधी एक गैरसमज आधी दूर केला पाहिजे. आपल्या समाजात नीतीविषयी रूढ असलेली कल्पना अतिशय संकुचित आणि अवास्तव आहे.
नीती म्हणजे लैंगिक नीती आणि अनीती म्हणजे लैंगिक व्यवहारातील अनियमितपणा असे समीकरण प्रस्थापित झालेले आहे. लैंगिक नीती म्हणजे केवळ विवाहांतर्गत लैंगिक संबंध असणे, आणि अनीती म्हणजे विवाहबाह्य लैंगिक संबंध अशी आपली समजूत असते. ज्या मनुष्याचे लक्ष आपल्या पत्नीखेरीज अन्य स्त्रीकडे जात नाही तो नीतिमत्तेचा पुतळा. मग त्याचे बाकीचे जीवन कितीही आक्षेपार्ह असले तरी हरकत नाही. याच्या उलट ज्याचे विवाहबाह्य संबंध आहेत तो मनुष्य मूर्तिमंत अनीती. परंतु ही नीतीची कल्पना अतिशय एकांगी आणि कोती आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. नीतीचे क्षेत्र सबंध मानवी जीवन व्यापणारे आहे, केवळ लैंगिकजीवन नव्हे. मनुष्यांचे अन्य मनुष्यांशी संबंध कसे असावेत हा नीतीचा प्रश्न आहे, आणि मानवांचे सर्व प्रकारचे संबंध नीतीत समाविष्ट आहेत. पतिपत्नीसंबंधाखेरीज आईबाप आणि अपत्य यांचे संबंध, तसेच गुरुशिष्यसंबंध, मालकमजूर संबंध इत्यादि अनेकविध संबंधांचा त्यात समावेश होतो. परंतु आपली मने लैंगिक संबंधाविषयी अविवेकी आणि अंधश्रद्ध समजुतींनी इतकी भारलेली असतात की मानवांच्या अन्य क्षेत्रातील व्यवहाराकडे आपण दुर्लक्ष करतो, आणि आपले सर्व लक्ष त्यांच्या लैंगिक व्यवहाराकडे लागलेले असते. ज्यांचे लैंगिक जीवन प्रचलित अर्थाने दोषास्पद असेल त्यांचे बाकीचे जीवन कितीही चांगले असले तरी त्याचा त्याला उपयोग होत नाही, आणि तो माणसांतून उठविला जातो. हे अर्थातच चुकीचे आहे. ‘नीती’ या शब्दाचा वास्तव अर्थ लक्षात घेऊन त्यानुसार एखाद्या व्यक्तीची किंवा समाजाची नैतिक योग्यता ठरविली पाहिजे.
नीतीच्या स्वरूपाचा व्यापक दृष्टीने विचार केल्यास सामान्यपणे सर्वांस मान्य होण्यासारखी नीतिमीमांसा म्हणजे उपयोगितावादी मीमांसा. या मीमांसेनुसार जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख हे मानवांच्या प्रत्येक कर्माचे अंतिम उद्दिष्ट असले पाहिजे आणि म्हणून आपण करू ते प्रत्येक कर्म नीतिमान की अनीतिमान ते या कसोटीने ठरेल. जो मनुष्य सामान्यपणे जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख वाढेल अशी कर्मे करतो तो चांगला मनुष्य, आणि ज्या समाजातील बहुसंख्य माणसे या अर्थाने नीतिमान असतील तो समाज नीतिमान. असा समाज अर्थातच सुखीही असेल. आपण असेही म्हणू शकतो की नीतिमान समाज सुखी असतो एवढेच नव्हे तर सुखी समाज नीतिमान असतो. हे म्हणणे सकृद्दर्शनी चमत्कारिक वाटेल, परंतु एखादा समाज सुखी असेल तर त्यातील बहुसंख्य व्यक्ती जास्तीत जास्त लोकांच्या जास्तीत जास्त सुखार्थ झटणाच्या असल्याशिवाय ते शक्य नाही, आणि जर त्यातील बहुतेक व्यक्ती अशा असतील तर त्या नीतिमान असणार आणि म्हणून त्यांचा समाजही नीतिमान असणार असे म्हणावे लागेल.
नीती आणि अनीती म्हणजे काय हे पाहिल्यानंतर आता आपण समतावादी कुटुंबामुळे समाजात अनीती वाढेल या आक्षेपाचा विचार करू.
आक्षेपकांचा आक्षेप असा आहे की स्त्री आणि पुरुष यांच्या समान स्वातंत्र्यावर आधारलेल्या कुटुंबात स्वैराचाराच्या संधी भरपूर मिळणार आणि म्हणून ते व्यभिचारानेपोखरले जाणार. आक्षेपक जे म्हणतो ते खरे आहे असे आपण क्षणभर समजू या. पण एवढ्यानेचते कुटुंब आणि तो समाज अनीतिमानहोईल काय? मला वाटते केवळ तेवढ्यानेच हे सिद्ध होणार नाही. ते कुटुंब अनीतिमान आहे असे सिद्ध करण्याकरिता अशा कुटुंबात सुखाची मात्रा वर्तमान कुटुंबापेक्षा कमी असते, एवढेच नव्हे तर अशा कुटुंबामुळे समाजातील सुखही वर्तमान कुटुंबातील सुखाहून कमी असेल हेही दाखवावे लागेल. पण हे दाखविता येणार नाही; कारण समतावादी कुटुंबात कोणाची कोणावर जबरदस्ती चालणार नाही, सर्व व्यवहार समजूतदारपणे परस्परांच्या संमतीने होतील, आणि असे असेल तर त्यातून असुखापेक्षा सुखाची निष्पत्ती केव्हाही जास्त होणार हे निश्चित. या कुटुंबातील स्त्री आणि पुरुष क्वचित् परस्परांशी एकनिष्ठ राहात नसले तरी जर हे उभयतांच्या समतीने होत असेल तर त्यातून असुखापेक्षा सुखाची मात्रा अधिक प्रमाणात निर्माण होईल हे गृहीत धरायला हरकत नाही.
पण अशा शिथिल संबंधांमुळे पतिपत्नींच्या सुखात थोडीफार भर पडेल असे मानले तरी अशा कुटुंबातील अपत्यांचे काय होणार असा प्रश्न आक्षेपक विचारील. तो म्हणेल की नवे कुटुंब सामान्यपणे अल्पजीवी असेल हे आपण वर पाहिलेच आहे. क्षुल्लक कारणांसाठी घटस्फोट घेतला न गेला तरी लैंगिक स्वातंत्र्यामुळे विवाह नाममात्र राहील, आणि या सर्वांचा अपत्यांवर होणारा परिणाम सर्वांत चिंताजनक होईल. ऊठसूठ घटस्फोट घेणारे किंवा अनिर्बध लैंगिक संबंध ठेवणारे आईबाप असल्यावर अपत्यांची आबाळ आणि परवड होईल तिला अंत राहणार नाही. शिवाय अशा कुटुंबांत वाढलेली मुलेमुली त्याच प्रकारचे व्यवहार अधिक मुक्तपणे आणि निःसंकोच करू लागतील. ही स्थिती सुधारकाला अभिप्रेत आहे काय?
स्पष्टच सांगायचे तर मी असे म्हणेन की समतावादी कुटुंब तरीही वर्तमान कुटुंबापेक्षा श्रेयस्कर असेल. स्त्रीच्या (म्हणजे अध्र्या मनुष्यजातीच्या) पारतंत्र्यावर आधारलेल्या कुटुंबातून सुटण्याची वर उल्लेखिलेली किंमत दिल्यानंतर निर्माण होणारा समाज वर्तमान समाजाहून अधिक सुखी तर असेलच, पण अधिक नीतिमानही असेल. या नव्या समाजात जर सर्वांना स्वातंत्र्य असेल आणि तेही समान स्वातंत्र्य असेल, तर पारतंत्र्यांमुळे आणि विषमतेमुळे उद्भवणारे अनिष्ट परिणाम त्यात मोठ्या प्रमाणात नाहीसे झालेले असणार. असा समाज अस्तित्वात येण्याकरिता अर्थातच सर्व व्यक्तींना शिक्षण द्यावे लागेल. स्वातंत्र्य आणि समता यांचा दुरुपयोग त्यांनी करू नये असे शिक्षण देणे नव्या समाजात वर्ण्य मानण्याचे कारण नाही. बाह्य बलप्रयोग नाहीसा झाल्यावर प्रत्येक मनुष्याला स्वयंस्फूर्तीनिच संयमाने वागावे लागेल. संयमाने वागणे अशक्य आहे असे समजण्याचे कारण नाही. सध्याच्या विषम समाजात स्त्रीवर जरी बंधने असतील तरी पुरुषांवर नसतात, आणि त्याने दुराचार करू नये याची शाश्वती देणारी एकच गोष्ट आहे त्याचा विवेक आणि संयम. सध्या पुरुष संयम फारशा प्रमाणात पाळत नसले तरी थोड्या फार प्रमाणात पाळतात. तोच संयम नव्या समाजातही त्यांनी पाळावा अशी अपेक्षा करणे गैर होणार नाही. तोच संयम नव्याने स्वतंत्र झालेल्या स्त्रीनेही पाळावा अशी अपेक्षा केली जाईल आणि ती अपेक्षा ती पुरी करू शकणार नाही असे मानायलाकसलेही कारण नाही. असे झाले तर कालांतराने एक नवा समाज निर्माण होईल आणि तो जरी आपल्या वर्तमान समाजापेक्षा अधिक शिथिल आणि स्वैराचारी दिसला तरी त्यात एकूण सुखाचे प्रमाण वर्तमान समाजातील सुखापेक्षा जास्तच असेल. आणि समाजाच्या श्रेष्ठतेचे गमक त्यातील सुखाची मात्रा याखेरीज आणखी काय असू शकेल?
शेवटी वर्तमान व्यवस्थेतील एका घोर अनिष्टाचा उल्लेख करणे अवश्य आहे. ते अनिष्ट म्हणजे वर्तमान समाजात सतत निर्माण होणारी अनौरस संतती. विवाहबाह्य संतती। स्वीकारण्याची पित्याची इच्छा नसते आणि तो नामा निराळा राहूही शकतो. परंतु मातेला अपत्याला जन्म देऊनही त्याचा स्वीकार करता येत नाही. विशेषतः कुमारी आणि विधवा स्त्रियांच्या जीवनात असे प्रसंग येतात, आणि ते उघडकीस आल्यास त्याचे परिणाम देशोधडीस लागण्याइतके भयंकर होतात. त्यामुळे नवजात बालके अनाथालयाच्या पायरीवर गुपचूप सोडून येणे याखेरीज अन्य उपाय नसतो. या सर्व प्रकाराचे मातेला किती दुःख होत असेल याची कल्पनाच केलेली बरी. परंतु त्यांच्याहूनही शोचनीय अवस्था त्या मुलांची होते. निष्प्रेम अशा अनाथाश्रमात भाडोत्री दायांच्या करवी वाढविल्या जाणार्यान त्या मुलांना बालपणी प्रेमाचा स्पर्शही मिळत नाही आणि उत्तरायुष्यात एक शापित जीवन कंठणे त्यांच्या नशिबी येते. अशा मुलांची जगाकडे पाहण्याची दृष्टी कटू आणि विकृत न झाली तरच नवल.
या समस्येचे कारण म्हणजे प्रचलित व्यवस्थेतील स्त्रीचे पारतंत्र्य. अनौरस मुलांचा बाप आपण त्या गावाचे नाही असा आविर्भाव करून सहज सुटतो, परंतु मातेची मात्र त्यातून सुटका होत नाही. ही विषमता जरी बढ्शी निसर्गकृत असली तरी ती भयानक दुःखांना जन्म देणारी असल्यामुळे शक्य त्या उपायांनी नाहीशी करणे अत्यावश्यक आहे. असा एक सामाजिक उपाय म्हणजे कुमारी किंवा विधवा मातेला मान्यता देणे, तिला पतिता न मानणे. या उपायाला पर्याय नाही हे आपण जितक्या लवकर ओळखू तितके तिचे निराकरण लवकर होऊ शकेल.
समतावादी आणि व्यक्तिस्वातंत्र्यवादी समाजात वरील समस्या उद्भवूच शकत नाही हे उघडआहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.