श्रद्धेपुढे शहाणपण चालत नाही- सावरकर ते भाजप ह्या पुस्तकाच्या निमित्ताने

डॉ. स. ह. देशपांडे ह्यांनी अत्यन्त अभ्यासपूर्वक लिहिलेला सावरकर ते भा. ज. प. हिन्दुत्वविचाराचा चिकित्सक आलेख हा ग्रन्थ माझ्या नुकताच वाचनात आला. ग्रन्थ वाचल्यानंतर माझ्या मनात पुष्कळ विचार आले. त्यांपैकी काही येथे संक्षेपाने मांडण्याचा प्रयत्न करतो.

मुस्लिम विरोधात हिन्दुत्व
हिन्दुत्वविचाराचा आलेख मांडताना डॉ. देशपांडे (सहदे) ह्यांनी फक्त मुस्लिमविरोधात हिन्दुत्व अशी त्याची मांडणी केली असल्यामुळे ग्रंथ वाचून माझे तरी समाधान झाले नाही. लेखकाने मनाशी काही एक निष्कर्ष आधीच काढून ठेवला असून त्या निष्कर्षाला पूरक अशीच अवतरणे (उद्धरणे) त्यांनी प्रचुर मात्रेमध्ये जमविली आहेत असे मनात आल्यावाचून राहिले नाही. सगळा ग्रंथ वाचून असे वाटले की येन केन प्रकारेण हिन्दुसंघटन घडवून आणलेच पाहिजे; तसे न केल्यास आपल्या देशाची धडगत नाही अशी लेखकाची मनोमन खात्री झाली आहे. धर्माच्या पलीकडे जाऊन, म्हणजेच हिन्दुत्वविचाराच्याही पलीकडे जाऊन, देशातील लोकांचे ऐक्य साधण्याची कल्पनासुद्धा लेखकाला विचारार्ह वाटत नाही. आणि असे वाटले की हिन्दुसंघटन करावयाचे झाल्यास आर्थिक, भौगोलिक आधारावर किंवा सर्व हिदूंना समान प्रमाणावर जाणविणार्‍या इतर अनेक सामाजिक प्रश्नांवर हिंदूची एकी करण्याऐवजी ती मुस्लिमविरोधात करणे सोपे आहे. सहदे ह्यांनीसुद्धा हा सोपा मार्गच स्वीकारला आहे. सहदे हे राजकारणी नेते नाहीत, त्यांना राजकीय आकांक्षा नाहीत. ते अतिशय अभ्यासू असे अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्यांनीसुद्धा असे जेव्हा मी म्हणतो तेव्हा माझ्या डोळ्यांपुढे ‘आम्ही राजकारण करीत नाही’ असे म्हणत म्हणत, ज्यांनी राजकीय पक्ष स्थापना केले अशा राप्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शिवसेना अशा दोन संघटना आहेत. ह्या दोनही संघटनांनी मुसलमानांविषयी अन्यधर्मीयांच्या मनांत असलेल्या पूर्वग्रहांचा पुरेपूर लाभ उचलला आहे आणि अजूनही तो घेणे चालु आहे.

‘हिंदूच्या वा ‘हिन्दुत्वाच्या’ चतुर्विध व्याख्या
सहदे यांनी काढलेला हिन्दुत्वाचा हा आलेख जरी स्पष्ट असला तरी ग्रंथ वाचून झाल्यानंतरही हिन्दू कोण हा माझ्या मनातला संभ्रम कायमच राहिला. कोणाचीही व्याख्या घेतली तरी तिच्यामध्ये निःसंदिग्धता नाही. लोकमान्य टिळकांची व्याख्या अपुरी म्हणून पुढे अनेकांनी नव्या व्याख्या केल्या. प्रस्तुत ग्रंथामध्ये लोकमान्यांव्यतिरिक्त सावरकरांची, रा. स्व. संघाची आणि विश्वहिन्दुपरिषदेची अशा एकूण चार व्याख्या दिल्या आहेत. ‘हिंदू’ ह्या नावाने ओळखली जाणारी व्यक्ती धर्माने हिन्दू असण्याची गरज नाही ह्याबाबतीत टिळकांनंतरच्या व्याख्याकारांचे एकमत दिसते. हिन्दुधर्मीयत्व वेगळे आणि हिंदुत्व वेगळे. हिन्दुधर्मीयत्वापेक्षा हिन्दुत्व अधिक विशाल आहे. हिन्दुत्वामध्ये एकाचवेळी अन्य धर्मीयांचा, अन्य सांप्रदायिकांचा अन्तर्भाव आहे आणि नाहीही. त्यामुळे टिळकांनंतरच्या प्रत्येक व्याख्याकाराला अतिशय कसरत करावी लागली आहे. शिवाय हिन्दुधर्मीयत्व आणि हिन्दुत्व वेगळे हे सावरकर जरी मान्य करीत असले तरी इतरांना ते उघडपणे मान्य करावयाची इच्छा नाही. त्यामुळे ह्या साध्या व्याख्या निसरड्या झाल्या आहेत. पण हिन्दुत्वाला मुस्लिमद्वेष हा मुख्य आधार घ्यावयाचा असल्यामुळे त्या निसरड्या व्याख्यामुळेही व्याख्याकारांचे काम भागते.

करुणास्पद खटाटोप
ज्या मुस्लिमांना इस्लाममधले किंवा मुसलमानांमधले दोष दिसू शकतात व जे ते प्रकटपणे मान्य करतात, ज्यांच्या ठिकाणी आपल्या धर्माविषयी आत्यंतिक अभिमान नाही व त्यामुळे हिन्दुधर्मीयांबद्दल द्वेष नाही. अशांना त्यांनी धर्मान्तरण केले नाही तरी ‘हिन्दुत्वाच्या व्याख्येमध्ये सामावून घेण्यासाठी केलेला हा सारा खटाटोप मला करुणास्पद वाटतो. त्याचप्रमाणे आज ज्या ज्या भारतीय जनसमूहांना, त्यांच्या श्रद्धा मनात धर्मीयांपेक्षा वेगळ्या असल्या (उदा. बौद्ध, जैन, शीख, बसवानुयायी लिंगायत वगैरे हे स्वतःला हिंदू म्हणवीत नाहीत.) तरी हिंदू कोड बिल लागू होते कारण त्या सर्वांच्या काही समजुतींत किंवा काही चालीरीतींत सारखेपणा आहे, त्या सर्वांना आपल्या राजकीय लाभांसाठी हिंदू म्हणण्याचा प्रयत्नही मला केविलवाणा वाटतो. कारण असे हिंदूमध्ये मागाहून सामावून घेतलेले परधर्मीय आमच्या हिंदू समाजाचे अंगभूत घटक (अवयव) होत नाहीत. हिंदुसमाजाच्या जातींच्या उतरंडीमधले त्यांचे स्थान स्पष्ट होत नाही. त्यांच्याशी सरसकट बेटी-व्यवहार सुरू होणार नाही. ह्या हिंदुत्वाचा अर्थ इतकाच की हिदूंसाठी चालविलेल्या सार्वजनिक संस्थांचे सदस्यत्व त्यांनी मागितले तर ते ‘ हिंदू’ नाहीत म्हणून ते यापुढे नाकारले जाणार नाही. विश्वहिंदुपरिषदेची हिंन्टूची व्याख्या तर अत्यंत शिथिल आहे. आदर्श हिंदूंनी कसे असावे असे व्याख्याकाराला वाटते त्याचे ते वर्णन आहे. प्रत्यक्षात हिंदू तसे नाहीत ८० कोटींच्या हिदुस्थानात त्या आदर्शवादी व्याख्येमध्ये बसणारे एक हजार हिंदू सापडले तर वाहवा.
स्वधर्माभिमानी मुसलमान आणि ख्रिस्ती ह्यांना वगळण्याच्या दृष्टीने आणि पोथीनिष्ठ नसलेल्या अनेकविध भारतीयांना कवळण्याच्या दृष्टीने केलेली सावरकरांची व्याख्या आधी पाहू. ही व्याख्या सर्व हिंदूचे एक राष्ट्र – हिंदूराष्ट्र – निर्माण करण्याच्या हेतूने घडविली आहे. व्याख्या अशी आहे :
आसिन्धुसिन्धुपर्यन्ता यस्य भारतभूमिका ।।
पितृभूः पुण्यभूश्चैव स वै हिन्दुरितिस्मृतः ।।
ह्या व्याख्येमध्ये हिंदूंची भौगोलिक मर्यादा, ‘आसिन्धुसिन्धु’ अशी दिलेली आहे. तीत उत्तरेच्या, ईशान्येच्या किंवा पूर्वेच्या सीमांचा उल्लेख नाही. भारताच्या किंवा भारतवर्षाच्या सीमा कोणीही, कधीही, स्पष्टपणे मांडल्या असल्याचे मला माहीत नाही. तशा त्या असत्या तर पुढे McMahon Line ओढण्याची गरज पडली नसती. आणि भारताच्या सीमा जर पूर्वीपासून निश्चित असत्या तर ‘आसिन्धुसिन्धु’ असे त्यांचे वर्णन करण्याचे प्रयोजन नव्हते. ‘आसिंधुसिंधु’ ह्या शब्दामुळे सिंधुनदीच्या पश्चिमेचा क्वेटा, पेशावर वगैरे सर्व प्रदेश भारताच्या बाहेर जातो. त्याचप्रमाणे अंदमाननिकोबार बेटे इतकेच नव्हे, तर विवेकानन्दशिलास्मारकसुद्धा भारताच्या सीमांच्या बाहेर जाते. हिन्दुराष्ट्रवाद्यांना किंवा हिन्दुत्ववाद्यांना ही सीमा कधीच मान्य होण्यासारखी नाही!

पुण्यभू
व्याख्येमधल्या ‘पुण्यभू’ ह्या शब्दाचा अर्थ स्वतः स्वा. सावरकरांनीच सांगितला आहे तो असा, “होय, ही भारतभूमी …. आमची पुण्यभूमी आहे. कारण ह्याच भूमीमध्ये आमच्या धर्माचे संस्थापक आणि ज्यांच्यापुढे वेद प्रकट झाले असे द्रष्टे, वैदिक ऋषि आणि दयानन्द, जिन आणि महावीर, बुद्ध आणि नागसेन, नानक आणि गोविन्द, बंदा आणि बसव, चक्रधर आणि चैतन्य, रामदास आणि राममोहन असे आमचे गुरू आणि संत जन्मास आले. येथल्या धुळीमधूनसुद्धा आमचे प्रेषित आणि गुरू ह्यांचा पदरव ऐकू येतो. येथल्या नद्या आणि वने पवित्र आहेत. …… येथे रामचन्द्राने वनवासाला निघाल्यावर पहिला मुक्काम केला, येथे जानकीने सुवर्णमृग पाहिला …. येथे देवस्वरूप अशा त्या गुराख्याने आपली मुरली वाजविली ….. येथे बोधिवृक्ष आहे, ही महावीराच्या निर्वाणाची जागा ……इ. (हे वाचून पवित्र म्हणजे काय? येथलीच वने पवित्र का? असे प्रश्न मला पडतात.)
अन्यत्र ते म्हणतात, ‘पुण्यभूचा अर्थ इंग्लिश ‘होली लँड’ ह्या शब्दातील अर्थ होय. ज्या भूमीत एखाद्या धर्माचा संस्थापक, ऋषी, अवतार वा प्रेषित प्रकटला, त्या त्या धर्मास उपदेशिता झाला, त्याच्या निवासाने ह्या भूमीस धर्मक्षेत्राचे पुण्यत्व आले, ती त्या धर्माची पुण्यभू. जशी ज्यूंची वा ख्रिश्चनांची पॅलेस्टाइन, मुसलमानांची अरेबिया. अशा अर्थीच ‘पुण्यभू’ शब्द वापरलेला आहे. नुसत्या पवित्र भूमी ह्या अर्थाने नव्हे.
आता माझ्यापुढे प्रश्न असा की अमकी भूमी पवित्र असे म्हटल्यामुळे ती सोडून बाकीची अपवित्र म्हणजे तिचा विटाळ. आणि पवित्र किंवा अपवित्र कसे ठरवावयचे, तर श्रद्धेच्या बळावर, आणि श्रद्धा म्हटले की पुढे बोलणेच खुटले!

परस्परविरुद्ध निष्ठा असून पावित्र्य कायम
आणखी एक प्रश्न. पवित्र भूमीची सीमा कशी ठरवावयाची? राजपुत्र गौतमाला बोधिवृक्षाखाली सिद्धार्थपद (बुद्धत्व) प्राप्त झाले. त्यामुळे केवळ बोधगयाच नव्हे तर पूर्ण मगधदेश पवित्र झाला. किंबहुना संबंध भारतवर्ष पवित्र झाला. गंमत अशी की त्यामध्ये एका बाजूला बौद्धमताचा ज्याने पाडाव केला अशा आचार्य शंकराची तपोभूमि कालडी ही-सुद्धा बुद्धामुळे पावन झालेली भूमी ठरते आणि दुसर्‍या बाजूला शंकराचार्यामुळे मगधदेश आणि त्यामधील बोधगया ही पवित्र होतात. मग परस्परविरुद्ध मते असलेल्या उभयतांमुळे संपूर्ण विश्व का पवित्र होऊ शकत नाहीआणि काही प्रदेश अपवित्र कसा शिल्लक राहतो. आणि ही पावित्र्याची मर्यादा नेमकी राजकीय सीमेपर्यन्त जाऊन कशी थांबते ते मला कळत नाही. राजकीय सीमा तर सारख्या बदलत असतात. म्युनिसिपल वॉर्डाच्या सीमा बदलतात. शहरांच्या सीमा बदलून निरनिराळे प्रदेश त्यांमध्ये समाविष्ट होत असतात. जिल्ह्याच्या, राज्यांच्या, राष्ट्रांच्या सीमा फार काळपर्यंत स्थिर नसतात. इतकेच नव्हे तर नद्या आपली पात्रे बदलतात. समुद्रही आपल्या सीमा बदलत असतो. पण धर्माभिमान्यांच्या श्रद्धा बदलत नाहीत. अथवा ज्या बदलत नाहीत त्यांनाच श्रद्धा म्हणतात आणि जे श्रद्धाळू असतात त्यांना धार्मिक म्हणतात. असो.
‘पितृभू’ ह्या शब्दामध्ये वंशाचा विचार समाविष्ट आहे. वंशांमधले भेद आणि त्यांवर आधारलेले श्रेष्ठकनिष्ठत्व हा विचार मला मुळातच मान्य नसल्यामुळे त्यावर मीआणखी काही लिहीत नाही. सहदे ह्यांनीही त्यांची पुरेशी चिकित्सा केली आहे.सहदे ज्या व्याख्येला ह२ म्हणतात तिचा विचार तूर्त पुरे.

संघाची उदार व्याख्या
ह्यानंतरची व्याख्या संघाची. हिचा उल्लेख सहदे ह३ असा करतात. ही व्याख्या लोकमान्यांनी किंवा स्वातंत्र्यवीर तात्यारावांनी केलेल्या व्याख्यांसारखीअनुष्टुभात नाही. ती सरसंघचालक श्री. बाळासाहेब देवरस, प. पू. गोळवलकर गुरुजी, संघाचे बौद्धिकप्रमुख श्री. मा. गो. वैद्य, संघाचे सरकार्यवाह श्री. हो. वे. शेषाद्रि, डॉ. श्रीपतिशास्त्री, पं. दीनदयाल उपध्याय, श्री. दत्तोपंत ठेंगडी, श्री. एकनाथजी रानडे, प्रा. राजेन्द्रसिंहजी ह्या संघपरिवारातील विचारवंतांच्या आणि संघविचाराच्या प्रवक्त्यांच्या वेळोवेळी प्रकट झालेल्या शब्दांमधून मांडली गेली आहे आणि ती सावरकरांच्या व्याख्येपेक्षा निःसंशयपणे अधिक उदार आहे. कारण ह्याच्यामध्ये हिंदू कोण हे ठरविण्यासाठी भूगोलाच्या सीमा नाहीत किंवा पुण्यभूपितृभू अशीही अट नाही. ह्या व्याख्येचा सारा भर सांस्कृतिक ऐक्यावर आहे.
भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा, ह्या देशातील गौरवास्पद आणि अभिमानास्पद घटना, ह्या देशातील थोर पुरुष ह्या सार्‍यांशी एकरूप होण्याची गरज व मातेची थोरवी, गाईचे पूज्यत्व ही उपरोल्लिखित बहुतेक सर्व प्रवक्त्यांनी हिंदुत्वासाठी आवश्यक मानली आहेत. कोणत्याही पंथ/संप्रदायांच्या (धर्माच्या नव्हे धर्म एकच. कारण धर्म म्हणजे नैतिक आचरण, धर्म म्हणजे कर्तव्य, धर्म म्हणजे न्याय. ह्यामुळे धर्मनिरपेक्ष शासन असूच शकत नाही. ते संप्रदायनिरपेक्ष असू शकते, वगैरे वगैरे.) अनुयायांचे संघप्रणीत राजकीय पक्ष व काही संस्था (म्हणजे, जनसंघ/भाजप, अभाविप वगैरे) ह्यांना वावडे नाही असे सिद्ध करण्याचा हा प्रयत्नआहे.
ह्यांच्या लिखाणात आम्ही बहुसंख्य असलेल्या देशात आमच्याशी मगरूरी चालणार नाही. आम्हाला तुम्ही हवे आहात, पण तुमची पायरी ओळखून वागाल तर. आमच्या श्रद्धांना धक्का न लावाल आणि तुमच्या श्रद्धा बदलाल तर. आमच्या परंपरांची थोरवी मान्य कराल तर. मग तुम्ही धर्मान्तरण न केले तरी चालेल. त्याचा आग्रह आम्ही धरणार नाही असा एकूण आविर्भाव मला जाणवतो. पण शब्द असे नाहीत. शब्द संसदीय आचारसंहितेमध्ये शोभतील असेच (parliamentary) आहेत. त्यामुळेच सांस्कृतिक ठेवा, आमची गौरवास्पद महान परंपरा, राष्ट्रीय जीवनधारा, हा देश व संस्कृती ह्यावरचे पराकाष्ठेचे प्रेम, संप्रदायनिरपेक्षता अशा शब्दसंहती ह्या सार्‍यांच्या लेखनामध्ये आपणास वारंवार भेटतात.
नमुन्यादाखल एक प्रातिनिधिक उतारा देतो. हा उतारा प. पू. गुरूजींच्या आम्ही कोण ह्या पुस्तकामधून घेतलेला आहे व प्रस्तुत पुस्तकाच्या पृष्ठ १५४ वर आला आहे. त्यावरून माझा मुद्दा स्पष्ट होण्यास मदत होईल.
(१) अगदी सुरुवातीला आपण हे स्पष्टपणे ध्यानात ठेवले पाहिजे की, आपण केलेल्या राष्ट्राच्या पंचगुणात्मक घटनेच्या चौकटीत जे लोक बसत नाहीत, त्यांनी आपले स्वतंत्र राष्ट्रीयत्व सोडून देऊन ह्या हिंदूराष्ट्राच्या धर्म, संस्कृती आणि भाषा यांचा स्वीकार केला पाहिजे, आणि येथील राष्ट्रीय वंशाशी पूर्णपणे समरस झाले पाहिजे. त्यांनी तसे केले नाही तर आपल्या राष्ट्रीय जीवनात त्यांना कोणतेही स्थान देणे शक्य नाही. जोपर्यंत ते स्वतःचे वांशिक, धार्मिक आणि सांस्कृतिक भिन्नत्व राखू इच्छितात तोपर्यंत ते पूर्णपणे परकीय मानले जातील.
(२) ह्या परिच्छेदात ते पुढे म्हणतात, ‘सर्व जुन्या म्हणजे महायुद्धपूर्वकाळात ज्यांचे जीवन चांगले विकसित झालेले होते त्या राष्ट्रांनी हेच मत ग्राह्य धरिले आहे. जरी ही राष्ट्र धार्मिक सहिष्णुतेचा अवलंब करीत असली, तरी राष्ट्रीय धर्म हाच देशाचा धर्म आहे, ही गोष्ट तेथील परकीयांना मान्य करावी लागते. सांस्कृतिकदृष्ट्या आणि भाषेच्या बाबतीत त्यांना तेथील राष्ट्रीय वंशाशी एकरूप व्हावे लागते. तेथील राष्ट्रीय वंशाच्या भूतकाळाचाआणि भविष्यकालीन महत्त्वाकांक्षांचा त्यांना स्वीकार करावा लागतो. किंवा थोडक्यात म्हणजे त्या विशिष्ट राष्ट्रांशी त्यांना इतके एकजीव व्हावे लागते की, ते तेथले नैसर्गिक रहिवाशीच आहेत असे वाटू लागले पाहिजे. तेव्हा स्वाभाविकपणे या जुन्या राष्ट्रांमध्ये परकीय लोक शिल्लकच राहत नाहीत.
ह्यावर वेगळ्या भाष्याची गरज आहे असे मला वाटत नाही.

हिंदूंना वेगळा न्याय
मला दुःख याचे आहे की संघाच्या सांस्कृतिक ऐक्यावर आधारलेल्या हिंदूत्वाच्या कल्पनेमध्ये सर्वांना सारखा न्याय नाही. कारण हिंदूस्थानामध्ये राहणार्‍या अन्य संप्रदायांच्या अनुयायांनी येथल्या मूळ जनतेशी पूर्णपणे एकरूप झाले पाहिजे अशी जरी अपेक्षा असली, तरी ‘हिंदू’नी परदेशांत आपले वेगळेपण, आपले स्वत्व कायम राखून ठेवले पाहिजे अशी संघाची इच्छा आहे, व त्यासाठी तेथे हिंदू स्वयंसेवक संघाच्या शाखा चालविल्या जातआहेत.
हिंदूत्वाचा एकमेव आधार ‘सांस्कृतिक ऐक्य’ असे म्हणत त्या सांस्कृतिक ऐक्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून जे संस्कृतीने सर्वसाधारण नागरित हिंदूधर्मीयांपेक्षा वेगळेच नव्हेत तर अगदी दुसर्‍या टोकाला आहेत, पण व्याख्येमध्ये न उल्लेखिलेल्या राजकीय सीमांमध्ये वसतात अशा आपल्या वनवासी बांधवांना ते ‘हिंदूच’ असे म्हटले जात आहे. त्यांना चुचकारून आपलेसे करण्यासाठी वनवासी कल्याण आश्रम चालविले जात आहेत.
शीख गेली कित्येक वर्षे आपल्या देशबांधवांविरुद्ध बंडखोरी करीत आहेत. त्यांना, ते जेथे बहुसंख्येने आहेत त्या प्रदेशात इतरांपेक्षा अन्य सांप्रदायिकांपेक्षा अधिक स्वायत्तता हवी आहे. त्यासाठी ते आपल्या शत्रुराष्ट्राकडून साहाय्य घेत आहेत. काश्मिरातले मुस्लिम परधर्मीयांचे साह्य घेत नाहीत. ते अन्यराष्ट्रीय स्वधर्मीयांचे साह्य घेत आहेत. ह्याउलट शीख. ते परराष्ट्रीयांचेच नव्हे तर परधर्मीयांचेही साह्य घेत आहेत. असे असले तरी शीख ‘हिंदू’! ते हिंदूत्वद्रोही नाहीत. धन्य त्या हिंदूत्वाची! हिंदूंना यामधली विसंगती बोचत कशी नाही?मला वाटते, त्यांना यामधली विसंगती बोचत नाही याचे एकमेव कारण त्यांची श्रद्धा!
आपल्या देशात मुस्लिमांचा प्रश्न आहे तसा शीखांचा प्रश्न आहे. सुभाष घीशिंग यांचा गुरखालँडचा प्रश्न आहे; आणि ईशान्य भारतात किती प्रश्न आहेत त्यांचा पत्ताच नाही. पण ज्यामुळे खडबडून जागे व्हावे असा प्रश्न आम्हांला मुसलमानांचाच वाटतो, कारण आपल्या मनांत परस्परांविषयी प्रतिकूल पूर्वग्रह आहेत, आणि त्या पूर्वग्रहांचा लाभ घेण्याच्या मोहातून कोणीही म्हणजेच कोणताही पक्ष सुटलेला नाही.
आपल्या देशामध्ये आम्ही राष्ट्रीय एकात्मतेच्या कितीही गप्पा मारीत असलो तरी आम्ही परस्परसंबधांत खूप समस्या निर्माण करीत असतो. त्या समस्या कशामुळे निर्माण होतात? आपापल्या श्रद्धा न सोडल्यामुळे निर्माण होतात. श्रद्धा ह्या न सोडण्यासाठी असतात. आणि पूर्वग्रह जेव्हा श्रद्धांचे स्वरूप प्राप्त करतात तेव्हा समस्यांची तोड निघूच शकत नाही. मुसलमानच नव्हे तर शीख, गुरखा, झारखंडी हेही आपल्या श्रद्धा सोडत नाहीत, त्या श्रद्धांच्या योगे त्यांच्या ठिकाणी येणारे वेगळेपण, त्यांचे स्वत्व विसरत नाहीत, म्हणून हे सारे प्रश्न निर्माण होतात. कोणीतरी श्रद्धा सोडल्याशिवाय, स्वत्वाला मुरड घातल्याशिवाय हे प्रश्न सुटावयाचे नाहीत. पण श्रद्धा सोडील कोण? श्रद्धा सोडील तो धर्मभ्रष्ट होईल! मुसलमान तर सर्वात जास्त कडवा. असो.

विश्व-हिन्दु-परिषदेची व्याख्या
वि. हिं. प. ची हिन्दूंची व्याख्या पुढीलप्रमाणे आहे.
(हा उतारा प्रस्तुत पुस्तकाच्या १६९ व्या पानावरून घेतला आहे.)
भारतीयर्षिसंप्रोक्तान् इहामुत्रार्थसाधकान्।
योगीकरोति सश्रद्धं सत्सिद्धान्तान् सनातनान् ।।
महात्माभिर्दिव्यशीलैः काले काले प्रवर्तितान् ।।
संप्रदायान् आद्रियते यः सर्वान् पारमार्थिकान् ।।
यन्नकुञाsपि जातोस्तु वा sस्तु यः कोsपि जन्मना।
सच्छीलोदारचरितः सोत्र हिन्दुरिति स्मृतः ।।।
या व्याख्येचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे : ‘इहलोक आणि परलोक त्या दोन्ही लोकांमधले श्रेय प्राप्त करून देणार्‍या व भारतीय ऋषींनी प्रतिपादलेल्या सनातन सिद्धांतांना जो माणूस आत्मसात करतो, दिव्य असे चारित्र्य असलेल्या महात्म्यांनी वेगवेगळ्या काळी प्रचलित केलेल्या सर्व पारमार्थिक संप्रदायांचा जो आदर करतो, तो सच्छील आणि उदारचरित माणूस हिन्दु आहे असे आम्ही समजतो मग तो जन्माने कोणीही असो व त्याचा जन्म कोणत्याही प्रदेशात झालेला असो.
ही व्याख्या भारताबाहेर जन्मलेल्या आणि जगभर पसरलेल्या हिन्दूंना एकत्र बांधणारा धागा कोणता असावा याचा विचार करून घडविलेली आहे. पण त्यामुळे तिच्यामध्ये एक उणीव राहिली आहे. ती आज हिन्दु जसे आहेत त्याचा विचार करीत नसून आदर्श हिन्दु कसे असावेत याचा विचार करते. आणि आदर्श हा बहुधा वास्तवापासून दूर असतो. त्यामुळे आजच्या वास्तव हिंदूंचे दर्शन या व्याख्येमध्ये मला अजिबात होत नाही. आजच्या बहुसंख्य हिंदूंना चार वेदांची नावे क्रमाने सांगता येणार नाहीत, उपनिषदांची तर गोष्टच सोडा. त्यामुळे भारतीय ऋषींनी प्रतिपादिलेले सनातन सत्सिद्धान्त त्याच्या परिचयाचे नाहीत. त्याच्या परिचयाचे ऋषि, कुत्तेवाले बाबा, विक्तूबाबा, किंवा जे चमत्कार करू शकतात असे ताजुद्दीनबाबा किंवा गजानन महाराज अशांसारखे आहेत. अशा सत्पुरुषांकडे तो त्यांनी सांगितलेल्या सिद्धान्तांसाठी नव्हे तर त्यांच्या कृपाप्रसादामुळे होणार्‍या ऐहिक लाभासाठी आकृष्ट झालेला आहे. त्याचे चारित्र्य विचारावे तर येथे भ्रष्टाचार हा शिष्टाचार झालेला आहे. तो स्वभावतः दुःशील आणि कृपण व्हे. भारतीय ऋषींच्या सिद्धान्तांना अनुसरल्यामुळे इहलोकातील श्रेय त्याने प्राप्त केले आहे असे म्हणावे तर त्याच्या कर्जबाजारीपणाची लक्तरे वेशीवर लोंबत आहेत. पारलौकिक श्रेय तेवढे त्याच्या पदरी पडले असावे असे म्हणावयास मला प्रत्यवाय नाही, कारण त्याविषयी मजजवळ कोणताही प्रतिकूल पुरावा नाही. म्हणून त्याला तेवढा संशयाचा फायदा दिलाच पाहिजे. त्याला गोमातेविषयी आदरभाव आहे म्हणावे तर नागपूरच्या गोरक्षणसभेला शंभर वर्षे झाली आहेत; आणि आजही देवनारच्या कत्तलखान्यासमोर प्रत्यही सत्याग्रह करावे लागत आहेत. स्त्रीजातीविषयी त्याच्या ठिकाणी आदर आहे असेही मला, जोवर गर्भजल परीक्षा करून स्त्रीगर्भाचेच तेवढे हनन होत आहे असे मी ऐकतो, तोवर छातीठोकपणे म्हणता येत नाही. बलात्कारांच्या व वधूदहनाच्या बाबतीतही आमचा देश जगातील इतर समाजांच्या तुलनेने सर्वोत्तम स्थितीत आहे असे मला वाटत नाही.
वरील सर्व कारणांमुळे मला हिंदूंच्या सगळ्याच व्याख्यांमध्ये वास्तव थोडे आणि स्वप्नरंजन फार दिसते. त्या स्वप्नांना व्याख्याकारांनी आपल्या श्रद्धांचा आधार घेतलेला दिसतो. कारण श्रद्धा तपासावयाच्या नसतात. त्यांचा वास्तवाशी संबंध नसला तरी भागते.
हिंदूंची व्याख्याच करावयाची झाल्यास तिला येथे जन्मलेल्या लोकांच्या बाबतीत भौगोलिक आधार घ्यावा. त्यांच्या श्रद्धा भिन्न असल्या तरी चालतील. त्यासाठी भारताच्या सीमा निश्चित कराव्या व बाहेर जन्मलेल्यांच्या बाबतीत विशिष्ट श्रद्धांचा आधार घ्यावा. आणि माझ्यासारखे जे अश्रद्ध आहेत त्यांना वाट चुकलेले वगैरे न म्हणता सरळ अहिंदु म्हणावे असे मला वाटू लागले आहे. कारण धर्माचा आणि श्रद्धांचा संबंध अतूट आहे. धर्माला अथवा हिंदुत्वाला संस्कृती ही जरी आधार घेतला तरी संस्कृती कोणत्या प्रदेशाची (म्हणजे त्या प्रदेशाच्या स्वच्छ सीमा) ते अगदी स्पष्ट शब्दांत सांगावे व संस्कृतीचा कोणता भाग गौरवास्पद-अनुकरणीय वगैरेसुद्धा दुसर्‍याच्या अनुमानावर सोडून देऊ नये. अंदमाननिकोबार हा भारताचा अविभाज्य प्रदेश आहे. पण म्हणून तेथील स्थानिक संस्कृतीला भारतीय संस्कृती म्हणत नाहीत. म्हणून त्या-त्या प्रदेशातील अमके आचार स्वीकार्य आणि अमके त्याज्य असे निःसंदिग्ध शब्दांत सांगावे. तसे केल्याशिवाय केलेल्या व्याख्यांमुळे काहींच्या आत्मगौरवाची भावना जरी उद्दीपित होत असली तरी व्याख्या म्हणून त्या पोकळच होतात. आणि जोवर त्या तशा पोकळ असतील तोवर संघटनेसाठी त्यांना परक्यांच्यापरधर्मीयांच्या-वैराचा-निदान विरोधाचा-आधार आवश्यक राहील. त्याचप्रमाणे जे प्राचीन, ते त्याज्य असले तरी त्याचे यथाशक्य समर्थन करण्याचाही मोह पडेल आणि त्यामुळे तसा प्रयत्न चालू राहील.
सहदे हे शहा-कुरुंदकर-दलवाई ह्या त्रयीशी सहमत नसले तरी संघाने हिंदुत्वाच्या व्याख्येसाठी घेतलेला आधार जास्त व्यापक करावा, धर्मनिरपेक्षतेकडे आता आपली वाटचाल सुरू व्हावी अशी त्यांची इच्छा त्यांच्या पुस्तकाच्या उत्तरभागात त्यांनी स्पष्टपणे मांडली आहे. प्रसंगी कटुता पत्करून त्यांनी हितोपदेश केला आहे. त्या हितोपदेशाला क्वचित्शर्करावगुंठन केले आहे. किंबहुना पुस्तकाचा पूर्वार्ध हा शर्करावगुंठनाचाच प्रकार आहे असे वाटू शकते. पण संघनेतृत्वाला सहदे ह्यांचे हिन्दुत्वाला विशाल बैठक देण्याचे प्रयत्न मान्य नाहीत. संघनेतृत्व आपल्या धोरणांत बदल घडवून आणण्यासाठी ह्या संधीचा लाभ घेण्याच्या मनःस्थितीत नाही. प्रा. मा. गो. वैद्यांनी नुकतेच तरुण भारतामध्ये दोन लांबलचक लेख लिहून सहदे ह्यांच्या सूचना त्यांना मान्य नसल्याचे सांगितले आहे. ते वाचून माझ्या मनात जो विचार आला तो ह्या लेखाच्या शीर्षकासाठी मी वापरला आहे. तो म्हणजे श्रद्धेपुढे शहाणपण चालत नाही. इतके दिवस मुसलमानांच्या श्रद्धेपुढे आपले शहाणपण चालत नाही असे मला वाटत होते. पण आता … असो.
मुस्लिम प्रश्नावर हिंदुसंघटन हे उत्तर शहा-कुरुंदकर-दलवाई ह्यांना मान्य नाही ह्याचे कारण त्यांना हिंदूंनीही बदलावे, उभयतांनी बदलावे असे वाटते. हिन्दुत्ववाद्यांना फक्त मुसलमानांनीच हिंदूशी जुळवून घ्यावे असे वाटते. एकट्या मुसलमानांनीच हिंदूंशी जुळवून घ्यावयाचे असेल तर ते त्यांना अपमानास्पद वाटत असावे. तडजोड एकतर्फी होऊ शकत नाही.
शहा-कुरुंदकर-दलवाई ह्यांना श्रद्धेचे माहात्म्य कमी करावयाचे आहे तर हिंदुत्ववाद्यांना ते वाढवावयाचे आहे. जेथे प्रश्न श्रद्धेचा असतो तेथे तर्क न्याय वगैरे शहाणपण गौण असते. म्हणून न्याय, शहाणपण जर मुस्लिमांच्या गळी उतरवावयाचे असेल तर त्यांच्या श्रद्धांना धक्का द्यावाच लागेल. आणि श्रद्धेला धक्का देण्याचे काम अश्रद्ध जितके चांगले करू शकतो तितके कोणताच सश्रद्ध करू शकत नाही.
आणखीही काही लिहावयाचे आहे, पण विस्तारभयास्तव आता आटोपते घेतो. अत्यन्त विचारप्रवर्तक असे पुस्तक लिहिल्याबद्दल सहदे ह्यांना शतशः धन्यवाद.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.