लोकहिताचे विवेकी भाष्यकार : लोकहितवादी

उणीपुरी दोन वर्षे आपण महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणी उत्सवाने काढीत आहोत. आपला समाज ज्यावेळी गलितगात्र, स्तंभित आणि संवेदनाहीन होऊन पडला होता त्यावेळी त्यांनी आपल्या आयुष्याच्या कशा मशाली पेटवल्या आणि त्याला चेतवले याचे संस्मरण करणे आपले कर्तव्यच आहे. याच भावनेने आपण आणखीही एका पणतीची आठवण ठेवली पाहिजे. ही आठवण करणे हे जेवढे सौजन्याचे तेवढेच औचित्याचे आणि कृतज्ञपणाचेही होणार आहे. त्या मिणमिणत्या पणतीने पुढे मोठमोठ्या दीपस्तंभांना ज्योत पुरविली आहे. आणि आज तिची गरज आपल्याला मुळीच उरली नाही असेही नाही.
९ ऑक्टोबर १९९२ ला लोकहितवादींच्या मृत्यूला एक शतक पूर्ण झाले. इंग्रजी विद्या शिकून लोकहिताचा विवेक सांगणारे गोपाळ हरी देशमुख तसे पाहिले तर पेशवाईचे अवशेष. पेशवाईचा अस्त झाल्यावर ५ वर्षांनी ते जन्माला आले (१८ फेब्रुवारी १८२३). त्यांचे वडील हरिपंत हे शेवटच्या पेशव्यांचे सरसेनापती बापू गोखले यांचे फडणवीस होते. ज्या एलपिष्टण साहेबाने पेशवाई गुंडाळली त्याची स्वारी हरिपंतांच्या वाड्यावरून जाई तेव्हा त्याचे तोंड पाहणे नको म्हणून हरिपंत खिडकीकडे पाठ फिरवून बसत. चिरंजीवांनी मात्र साहेबाच्या वारुणीची अशी काही आराधना केली की तीन वर्षांत ती त्यांना अगदी वश होऊन गेली. त्यांच्या आंग्लशाळेच्या हेडमास्तरांनी प्रमाणित केले की … (हा) ज्या थाटात इंग्रजी लिहितो तो ही आमची लेखनभाषा आहे असा दावा सांगणार्‍या देशात सहसा आढळणार्‍या दर्जापेक्षा वरच्या दर्जाचा आहे.’ ((He)…. composes in English in a style superior to what is met with among nations who profess to write that language.)
या इंग्रजी वारुणीच्या एकाच झुरक्याने झिंगलेले आमचे ‘विद्वान’ म्हणून शास्त्रीबुवा त्यांची कितीही हेटाळणी करोत, पण या इंग्रजी विद्येनेच त्यांचे डोळे उघडले. ते खडबडून जागे झाले, आणि ‘आधी केलेच पाहिजे ’या बुद्धीने आप्तस्वकीयांचा प्रकोप होईल याची पर्वा न करता त्यांना उपदेशाचे कडू घोट पाजत राहिले. ते लिहू लागले, मुसलमानांनी सहाशे वर्षे राज्य केलें, व इथे सोयरगतीहि केल्या. परंतु हे कोण, यांचा धर्म, मतलब व धोरणकार्य याविषयी एकाहि हिंदूने विचार केला नाहीं, व कोणीं ग्रंथहि लिहिला नसून आजपर्यंत कोणास काही ठाऊकहि नव्हते. पोटाकरितां फारशी भाषा शिकले, हकिमांची औषधे घेऊ लागले, व फौजेत तबीब ठेवू लागले. मुसलमान गवई यांनी तर गंधर्ववेदासहि मागे हटविलें, तरी त्यांचा शोध केला नाहीं, व आता तर तेच बहुतेक लोक इंग्रजी शिकत आहेत. सारांश,
१. लोकहितवादी काळ आणि कर्तृत्वःनिर्मलकुमार फडकुले. पृ. ६ वरील अवतरण. .
भाड्याच्या बैलाप्रमाणे, ज्याने गोणी घालावी व काठी मारावी त्याच्यापुढे चालण्याचा क्रम पडला. ह्याप्रमाणे इतके उदासीन, बेफिकीर, बेपर्वा व पराक्रमहीन असे लोक या भूमंडळात कोठेही नसतील.’ याउलट इंग्रज राज्य करू लागल्यास दोनशे वर्षे झाली आणि या लोकांच्या डोकीवरचे केसदेखील त्यांनी मोजिले. परंतु या लोकांस त्यांचे डोकेंहि ठाऊक नाहीं हा केवढा चमत्कार! (पत्र ३४) हे चित्र नि ते चित्र पाहून या विचारी पुरुषाचे अंतःकरण कळवळून उठले.
त्यांचे लक्ष इतिहासाच्या अभ्यासाकडे वळले. ‘इतिहासापासून उपयोग आहे व खरा इतिहास लिहावा ही गोष्ट हिंदु लोकांस कळलीच नाही याची त्यांना फार खंत वाटे. त्यांचे पहिले लेखन इतिहासाचेच. पुढे पन्नास वर्षे ते इतिहास लिहीत होते. गुजरात, सौराष्ट्र, राजस्थान, उदेपूर, सिलोन इत्यादींचे इतिहास त्यांनी लिहिले. भारताचा त्यांचा इतिहास अपूर्ण राहिला. इतिहासाच्या आकलनाने परिवर्तनाचे रहस्य कळते असा त्यांचा ठाम गृह झाला. इतिहासाप्रमाणेच भूगोलाचे ज्ञान ऐहिक उत्कर्षाला नेणारे विज्ञान आहे हे आमच्या लोकांना उमजले नाही ही त्यांची दुसरी खंत आहे.
ते म्हणतात, “आतां इंग्रजी विद्या फार सुधारली आहे. त्यामुळे त्यांतील भूगोलावर एक ग्रंथ पढलेला आणि जितके संस्कृत किंवा इतर भापंत ग्रंथ आहेत, ते सर्व जमा केले, तर त्या एकाची बरोबरी व्हायची नाही’ (पत्र ६९)…. त्यांना एवढेच माहीत की मेरूपर्वत भूमीच्या मध्ये आहे. तो लक्ष योजने उंच आहे. स्वर्गाची वाट हिमालयांतून आहे.’ (पत्र १०१)
‘लोक पोरांसारखे बोलतात की विलायत बेट लहान दोनचार कोसांचे आहे, कोणी म्हणतो टोपकार हे पाण्यतले राहणारे, कोणी म्हणतो कंपनी सरकार बायको आहे.’ (पत्र ३४) ब्राह्मणांना अजूनहि वाटतें कीं पृथ्वी शेषावर आहे. ग्रहमात राहू चंद्रास ग्रासतो. हिंदुस्थान एवढीच पृथ्वी (पत्र ६२).
गोपाळरावांनी स्वकीयांचे हे वैगुण्य ओळखले, आणि आयुष्यभर जे जे काही आपणासी ठावे ते ते इतरांना शिकवून सकळजन शहाणे करून सोडण्याचा लोकहिताचा ध्यास घेतला. आमच्या देशाची स्थिती सुधारण्यासाठी ‘सत्यप्रतिपादक आणि वास्तविक जे व्यवहार … यांच्या दर्शक विद्या त्यांना आणायच्या होत्या. आधुनिक भाषेत सांगायचे तर, ‘विज्ञाने व सामाजिकशास्त्रे अशा ज्या विद्या त्यांच्यामुळे आमचा उत्कर्ष होईल अशा विद्या त्यांना हव्या होत्या. इतिहास भूगोलाप्रमाणेच गणित, रसायन, अर्थ, राज्यशास्त्र यातील प्रावीण्य त्यांना हवे होते. याच अर्थाने ते म्हणतात की, इंग्रजी विद्वान पूर्वी हिंदुस्थानांत एक असता तर राज्य न जाते. (पत्र ३१)
वर्तमानपत्रांना ते ‘बृहत्तर जिह्वा म्हणत, कारण त्यांच्याद्वारे त्यांना दूरदूरच्या देशबांधवांशी बोलता येत होते. प्रभाकर साप्ताहिकात त्यांनी लोकांना हितोपदेश करण्यासाठी थोडी थोडकी नाही १०८ पत्रे लिहिली. ही ‘शतपत्रे’ लिहिली, तेव्हा ते पंचविशीत होते (१८४८-१८५०). स्वतः ब्राह्मण असूनही त्यांनी ब्राह्मणांना आपल्या टीकेचे सर्वप्रथम लक्ष्यकेले, कारण ब्राह्मणांकडे विद्येचे नेतृत्व होते. तरुणवयामुळे त्यांचे हे लिखाण साहजिकच जोमदार झाले आहे. गोपाळ हरी देशमुख मूळचे सिधये, चित्पावन ब्राह्मण. देशमुखी हे वतन. ब्राह्मणी विद्या घोकंपट्टीच्या. नुसते पाठांतर, अर्थावीण! शिवाय असंख्य वेडगळ समजुती, एक अशी की प्राचीन ग्रंथांचे लेखक द्रष्टे होते. ते ऋषी आणि त्याचे ग्रंथ ‘वेद! वेदांचा अर्थ करू नये! इ. (पत्र ६२) या गोष्टींची त्यांना चीड येई. या प्रतिबंधाद्वारे ब्राह्मणांनी ज्ञानात वाढ होऊ नये याची तजवीज केली. पांच हजार वर्षामागें जी रीती आणि जे ग्रंथ संस्कृत पढावयाचे असतील तेच आतां आहेत. ही ब्राह्मणांची मुख्य आगळीक.
याशिवाय परदेशगमनावर बंदी. ही सिंधुबंदी का? तर म्लेंच्छांचा संसर्ग येतो म्हणून. आता म्लेंच्छच आपल्या घरात घुसून राजे झाले होते. म्हणून ते हळहळतात की, इतरांच्या विद्या, त्यांचा विकास या सर्व ज्ञानाला आपण मुकलो. समुद्रबंदी केली ही ब्राह्मणांची दुसरी आगळीक.
म्हणून ते खंत करतात, ‘आमचे लोकांत ब्राह्मण पुढारी झाले याजमुळे फार घात झाला. जर कुळंबी, क्षत्री इत्यादिक पुढारी असते तर बरे होते. कारण ब्राह्मणांच्या हातापायांत बेड्या आहेत.'(पत्र ९६) या बेड्या तोडण्यासाठी त्यांनी आजन्म श्रम घेतले. मानवतेला काळिमा लावणार्‍या रूढींवर सतत कडक टीकास्त्र सोडले.
आपल्या समाजातील स्त्रियांची परवशता त्यांना पाहवण्यासारखी नव्हतीच. दहा दहा, बारा बारा वर्षांच्या बालिका विधवा होत होत्या. धर्माच्या नावाखाली त्यांचे मुंडन करून त्यांना विद्रूप केले जात होते. गोपाळरावांनी या कुप्रथेवर वाग्बाण सोडला, ‘…. एका भटाच्या बोलण्यावरून लोकांनी आपल्या पोटच्या लेकी, बहिणी, सुना, भाच्या, नाती यांस भादरावे काय? काय हें वेड्यांचे इस्पितळ? किंवा शाहाण्यांचा दरबार? बडोदे संस्थानात सयाजीराव महाराजांचे वडील खंडेराव महाराज गायकवाड यांच्या कारकीर्दीतील एक प्रसंग त्यांच्या फार जिव्हारी लागलेला होता. सीताराम जोशी नासिककर नावाचे गृहस्थ महाराजांचे दानाध्यक्ष होते. त्याने महाराजांस बडोद्यामध्ये सकेशा विधवांचा फार जमाव जमत चालला आहे हें बरें नाहीं, वगैरे गोष्टी सांगून त्यांचे मन कलुषित केले. हे ऐकल्यावर मग महाराजांचा क्रोध काय विचारावयाचा?झाला लागलाच एकसहा हुकूम की, सर्व सकेशा विधवांच्या केशकलापावरून नापिताने आपली पोलादी फणी फिरविली!….. बिचार्‍या बायकांच्या केसांचे पर्वत पडले.’
स्वतः लोकहितवादींना खात्री होती की पुनर्विवाहाला शास्त्राची आडकाठी नाही. म्हणून त्यांनी शंकराचार्यांसमोर शास्त्रार्थ करून धर्माज्ञा मिळविण्याचा प्रयत्न केला. शंकराचार्यांनी पुण्याच्या दोन शास्त्र्यांची निवाडा करण्यासाठी नेमणूक केली. या वादात वादी म्हणून लोकहितवादींचे मित्र विष्णुशास्त्री पंडित उभे राहिले. सुधारणापक्षास न्या. मु. रानडे यांचे साहाय्य होते. नऊ दिवस वाद चालला. पण शेवटी सनातनी कर्मठांचा विजय झाला.ही गोष्ट आहे मार्च १८७० ची. शास्त्राधारे सुधारणा घडवून आणण्याचा लोकहितवादींचा प्रयत्न असा फसला.
या वादासाठी थोरले शास्त्रीबुवा कृष्णशास्त्री चिपळूणकर हे एक पंच होते. त्यांना पंच म्हणून घ्यायला सनातनी पक्षाची सुरवातीला हरकत होती. कारण असे देण्यात आले की, त्यांनी एकदा युरोपियनांबरोबर फळफळावळे खाल्ली होती. शास्त्रीबोवांकडून ५०० रु दंड वसूल करण्यात आला. त्यांनी क्षौर करून सर्वदेह प्रायश्चित घेतले तेव्हा त्यांना पंच म्हणून मान्य करण्यात आले.
वास्तविक पुनर्विवाहाची सर्वात अधिक निकड पटावी असा तो काळ होता. कॉलरा, प्लेग असे साथींचे रोगच काय, साध्या साध्या रोगांचेही प्रतिबंधक उपाय तेव्हा नव्हते. त्यामुळे अपमृत्यूचे प्रमाण फार असायचे. १५-२० वर्षांची कोवळी मुले मरत. त्यांची लग्ने झालेली असायची. शिवाय जरठकुमारी विवाह होते वेगळेच. आठ दहा वर्षांच्या मुली विधवा होत. घरोघरी बालविधवा असत. तरी ब्राह्मण आणि काही थोड्या उच्च म्हणणार्‍या जातींना पुनर्विवाह विहित नव्हता. चाल म्हणजेच धर्म असा लोकभ्रम पक्का झाला होता. उच्चवर्णीय हिंदू स्त्रियांना लग्न हा एकच संस्कार होता. जणू स्त्रियांचा जन्म लग्नाकरिताच असतो! म्हणून लोकहितवादींनी लग्न या विषयावर एक पत्र लिहिले. ‘लग्नाविषयी विचार’ असे त्याचे शीर्षक आहे (शतपत्रांमधील हे पत्र १५ फार बोलके आहे). म्हणून त्याचा संक्षेप, त्यांच्याच शब्दांत पुढे दिला आहे.
कच्छमध्ये झाडीज रजपूत कन्या जन्माला आली की मारितात. (१) आपल्याकडील मोठे लोकहि घरीं कन्याजन्म झाला तर अवदसा घरात शिरली असे समजतात. (२) ज्योतिषी यास लग्नासंबंधीं कांहीं एक पुसू नये. येणे करून फार अकल्याण होईल. आजपर्यंत ब्राह्मणांनी जोश्यांचे अनुमतीने लग्ने केली तरी बहुत विधवा झाल्या आहेत.(३) मुलीचे लहानपण विद्या शिकविण्यात घालावे व पुढे सरासरी वीस वर्षांचे आंत तिला कळू लागले म्हणजे तिचे व आईबापांचे संमतीने लग्न करावें.(४) आतां किती एक म्हातारे पुरुष मरणास पात्र, आपल्यास तरुण स्त्रिया नऊ दहा वर्षांच्या करितात. जर स्त्रियांना स्वसत्तेत लग्न करू दिलें तर, अशा प्रेतरुप पुरुषांस त्या वरतील काय? (५) जी भयें धरून लहानपणी लग्ने करितात, तीच पुढे येतात. चुकत नाहींत, स्त्रियांचा पुनर्विवाह होत नाहीं. याचमुळे मुलींचे जन्माचे मोठे संकट प्राप्त होते. पूर्वी परशरामभाऊ पटवर्धन यांची मुलगी विधवा झाली. तेव्हा त्यांनी ‘मार्तंड’ वगैरे पुस्तकांवरून असे ठरविले की, पुनर्विवाह करावा; परंतु राज्यांत नाना फडणीस मोठे शहाणे होते. त्यांनी त्यांस विघ्न केले आणि सांगितले की, ‘तुम्ही असे करूं नका. एकाने केले म्हणजे सर्व करतील.’ तेव्हां तें सिद्धीस गेलें नाहीं. (६) पानसे तोफखान्यावरील सरदार. त्यांचे घरीं सत्तावन्न बोडक्या होत्या. हा मनुष्ययज्ञ होय. स्त्रियांचा पुनर्विवाह केला तर किती लोक सुखी होतील! (७) एका जिल्ह्यांत सरासरी शंभर बाळवध होत असतील. पुण्यांत व आसमंतांत … दोन तीन हजार लेकरें मारली जातात. (८) मनु हा जर ईश्वरांश होता तर त्यांने अशीहि सत्ता को प्रकट केली नाहीं कीं,कोणे एकेहि ब्राह्मणाचे स्त्रीचा नवरा (तिचे आधी) मरणार नाही.(९) म्हणून नवरा मेला तर दुसरा वरावा हें ठीक आहे.
या एका पत्रात पुत्र व कन्या यांच्या जन्मावरून केला जाणारा अन्याय्य भेदभाव, ज्योतिष्याचा फोलपणा, मुलीचे विवाहयोग्य वय व तिची विद्या, मुलीच्या वरपसंतीचे महत्त्व, पुनर्विवाहाच्या अभावी तरुण स्त्रियांचे वाकडे पाऊल पडण्याचे वय, विधवा स्त्रियांवर जबरदस्तीचे ब्रह्मचर्य लादण्यातले क्रौर्य, भ्रूणहत्या मनुप्रणीत धर्माचा वृथा बडिवार – या सगळ्या मुद्यांचा सूत्ररूपाने तरीही संयुक्तिक विचार आला आहे. ब्राह्मणी दुराग्रह पाहून ते त्रागा करतात, ‘जुने लोक मेले म्हणजे हें लौकर होईल’. (पत्र ७०) त्यांचे निक्षून सांगणे असे की ‘शास्त्रास’ एकीकडे ठेवा, आपली बुद्धी चालवा. धर्मशास्त्र हा केवळ कायदा आहे. स्त्रियांस पुरुषांसारखे अधिकार आहेत असे ठरवा. (पत्र ७०) सर्व अडचणी मोडून स्वयंवर व्हावें हेंच प्रशस्त. लग्न हे ज्याचे त्याचे काम आहे. त्यांत इतरांनीं पडणे अयोग्य आहे. बाप जरी झाला तरी त्याने लग्नाचे काम मुलीचे इच्छेवर व मुलाचे इच्छेवर ठेवावे.’ (पत्र ९०)
सुमारे दीडशे वर्षापूर्वी स्वयंवराचे असे स्वच्छ समर्थन महाराष्ट्राच्या या प्रबोधनकाराने केले आहे हे आज खरे वाटणार नाही.
स्त्रीपुरुषसमतेबद्दल तर त्यांना शंकाच नव्हती. ते ठणकावतातः ‘स्त्रीवुद्धिः प्रलयं गता’ म्हणणारे शतमूर्ख! पुरुप तशाच बायका स्वभावाने व बुद्धीने आहेत. शास्त्रांची गुलामगिरी झुगारा असे ते परोपरीने विनवीत. ‘जें सुखास आडवे येईल तें दूर करावे. लग्नाचा नियम हा धर्म नव्हे, ही रीत आहे.( पत्र १०६) ही त्यांची भूमिका आहे. धर्मकर्ते तरी असे कोण लागून गेले? तेही मनुष्यच होते ना? असा त्यांचा सवाल असे. ब्राह्मणांनी उगीचच त्यांना अलांकिकत्व चिकटवले. जो दिव्यत्वाचा मुलामा चढवला तो काढा असे त्यांचे आग्रहाचे सांगणे. ‘जे ग्रंथकर्ते’ त्यांसच ऋषि म्हणतात. आपण नवे ग्रंथ केले तर आपण ऋषि होऊ … आपण ऋषि होऊन शास्त्र यथायुक्त असेल ते ठरवावें हेंच योग्य.(पत्र ९०). जुनी शास्त्रे अपुरी पडतात हे दाखवताना ते दाखला देतात, “केवळ लहानपणाचा अंगरखा व मोठेपणाचा अंगरखा सारखा नाही.’ (पत्र ३०)
शास्त्रात् बुद्धिर्बलीयसी हा बुद्धिप्रामाण्यवादाचा पहिला धडा देणारे लोकहितवादी पहिले सुधारक.
‘अज्ञान व भोळसरपणामुळे सर्वत्र जुलूम चालतो असा नेम आहे या निष्कर्षाला ते तरुणपणीच आले. त्यामुळे नोकरीनिमित्त ते जेथे जेथे गेले तेथे ग्रंथालये, शाळा, चर्चामंडळे, वर्तमानपत्रे यांचे निर्माते बनले. लोकहितवादींची दृष्टी किती सर्वस्पर्शी होती हे नुसत्या शतपत्रांच्या वाचनानेही दिसते. त्यांनी लहानमोठे चाळीस ग्रंथ लिहिले, अनुवादिले आहेत. समाजकारणाइतकेच राजकारण आणि राजकारणाइतकेच अर्थकारणावरील विचारवंत आणि प्रबोधनकर्ते असे त्यांचे स्थान आहे.
**७ लोकहितवादींची शतपत्रे. संपाः पु. ग. सहस्रबुद्धे. प्रस्ता. पृ. २९ ,
इंग्रजी शिक्षण घेऊन लोक सुधारण्यास दोन-चारशे वर्षे लागतील असे त्यांना वाटे. ‘मग लोक अमेरिकेंत झालें तसे इंग्रजांस सांगतील कीं, तुम्हीं आपले देशास जावे. त्यांना वाटले त्यापेक्षा पुष्कळ आधी सुमारे शंभर वर्षांतच आपण इंग्रजांना ‘चले जाव’ म्हटले आणि घालवलेही. पण त्यांना अभिप्रेत होते ते मतपरिवर्तन मात्र झाले नाही. कायद्याने सक्तीने सुधारणा व्हावी या मताचे ते नव्हते. ते म्हणतात. स्वइच्छेने अशा सुधारणा व्हाव्या हे चांगले… आजचे उद्या होईल, काय चिंता आहे? (पत्र ७)
कायद्याने सक्ती केली आणि ‘आत्मजागृती झाली नाही तर लोक पुन्हा पूर्वपदावर जातील असे त्यांना वाटे. पण पुनर्विवाहाच्या बाबतीत मात्र त्यांचा हा धीर सुटला आहे. पत्र क्र. १०६ ते म्हणतात ‘एक घटका उशीर झाला तर हजारो स्त्रियांस समुद्रांत लोटून दिल्याचे पातक डोकीवर बसते. म्हणून कदाचित् त्यांनी चारशे वर्षांचा हिशेब मांडला असेल. आणि तसेच पाहिले तर त्यांच्या अगदी साध्या साध्या शिफारशींपासून आजही आपण शेकडो योजने दूर आहोत. लग्न जुळवताना ज्योतिष पाहू नका आणि स्वयंवरे करा या दोन गोष्टीदेखील समाजाच्या पचनी पडायला किती शतके लागतील कोण जाणे!
भारतासाठी पार्लमेंटची राज्यपद्धती योग्य होईल हे त्यांनी १८४८ सालीच सुचविले. लोकांची बुद्धी सुज्ञ होईपर्यंत इंग्रजी राज्य राहावे असे मात्र त्यांना वाटे.
आर्थिक विषयांवर त्यांचे विचार ‘लक्ष्मीज्ञान’ या पुस्तकात १८४९ सालीच व्यक्त झाले आहेत. दादाभाई नौरोजी १८५० साली एल्फिन्स्टन कॉलेजात गणिताचे प्राध्यापक झाले. त्यांचा खंडणी सिद्धांत पुढे मांडला गेला. लोकहितवादींना वाटे, ‘लोकांस सुखी होण्याची युक्ती कोणती म्हणाल तर अशी आहे की, जितके इंग्रज लोकांचे व्यापार व रोजगार इकडे कमी होतील तितके या (आपले) लोकांस जास्ती सुख आहे. याजकरितां….. इंग्रजाप्रमाणे शहाणे व्हावे, आणि जे व्यापार ते करतात ते आपण करावे. त्यांनी इशारा दिला की, ‘आपले देशांत दुसर्‍या मुलखाचा जिन्नस आला तरी घ्यावयाचा नाहीं … आपले लोक कापडे जाडी वाईट करतात. परंतु तींच नेसावीं.. परंतु हे लोक असे करीत नाहींत. आणि थोडी किंमत म्हणून लोकांचा जिन्नस विकत घेतात.
स्वदेशीचा पहिला पुरस्कर्ता हाही मान गोपाळरावांकडे जायला हरकत नाही.
इंग्रजी राजवट आली आणि तिच्याबरोबर परदेशी हुन्नराची चढाई झाली. ते सर्वात मोठे आक्रमण आहे हे त्यांनी एक लहानसा हिशेब मांडून मजेदार रीतीने सिद्ध केले आहे. विलायतेत १ लक्ष बाइलर म्हणजे वाफेची यंत्रे आहेत हे सांगून ते हिशेब करतात,
एक यंत्र म्हणजे ४० घोड्यांची शक्ती. चाळीस लाख घोडी म्हणजे तीन कोटी वीस लक्ष माणसे. ज्या देशात ही माणसे एक पैशाच्या मजुरीने कामे करतात त्या देशाचे कापड व सूत सर्व पृथ्वीस आच्छादन करील यात नवल नाही. हीच तीन कोटी माणसांची चढाई, ‘याजमुळे आपण अगदीं भिकारी होऊन लुटले गेलों हा विचार १८७६ साली “ हिंदुस्थानास दरिद्र येण्याची कारणे” या निबंधात त्यांनी मांडला आहे. (पृ. ५६-५७)
*८. लोकहितवादीकृत निबंधसंग्रह. *९.तत्रेव पृ. ११३ * * १०. .तत्रेव पृ. १४३
व्यक्तिस्वातंत्र्य हा सुखाचा मूलतंत्र आहे हे त्यांनी जाणले. त्यामुळेच ते संयुक्त कुटुंबपद्धतीवर टीका करतात. राज्य सुधारणेबद्दल त्यांना असे वाटते की, ‘राजा सुधारण्यापूर्वी प्रथम लोक सुधारले पाहिजेत.’ सरकार जितकें घटत जाईल आणि लोकांची सत्ता जितकी वाढत जाईल तितके चांगले असा त्यांना विश्वास होता. एकूणच ऐहिक जीवन सुखी करावे, दीर्घायुष्य संपादावे, ते समृद्ध आणि निरोगी करावे हा अभ्युदयी विचार मांडणारे एकोणिसाव्या शतकातले ते पहिले प्रबोधनकार होते. आणि राज्याने या गोष्टींसाठी उपाय योजले पाहिजेत असा त्यांचा आग्रह होता. ‘आपले आयुष्यवृद्धीस अनुकूल व प्रतिकूल कोणत्या गोष्टी आहेत हे हम्मेष चिंतीत जावें.’ वैद्यविद्येचे ज्ञान वृद्धिंगत होऊन त्यांतील कर्मे बहुतांस कळावी असे करावे. कारण आयुष्याची हानी झाली तर नाश आहे. यास्तव अधिक दिवस जगावे कसे याचा विचार सर्वांनी करावा.
स्वतः लोकतहितवादी त्यांच्या काळाच्या मानाने दीर्घायुषी, त्यांना ६९ वर्षांचे आयुष्य लाभले. ते त्यांनी अत्यंत समृद्ध केले. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांची नावे वाचली तरी त्यांचा व्यासंग दिसून येतो. त्यांच्या ज्ञानकोशात माहितीचा इतका साठा होता की कोणत्याही वेळी पूर्वतयारीवाचून ते व्याख्यान देऊ शकत. ‘ईश्वर, भक्ति, उपासना या सर्वांकडे, सर्व जगाकडेच, सस्मित उपेक्षेने दृष्टिक्षेप करणार्‍या एखाद्या तटस्थ द्रष्ट्याला शोभण्यासारखेच त्यांचे बोलणे व वागणे असे.’ अशा शब्दात त्यांचा एक मित्र आणि प्रार्थनासमाजाचा गुजराती नेता याने त्यांच्या स्वभावाचे मर्म सांगितले आहे. एरवी त्यांच्या जीवनात वरवर पाहता दिसणार्‍या विसंगतींचा उलगडा व्हायचा नाही.
लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख तेरा वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले. मराठी शिक्षण आटोपल्यावर वयाच्या अठराव्या वर्षी ते इंग्रजी शाळेत गेले. १८४४ साली ७७ रु. पगारावर त्यांना ट्रान्स्लेटरची नोकरी मिळाली. १८५१ मध्ये वाई येथे जज्ज म्हणून पहिली नेमणूक मिळाली. १८५५ ते ५७ असिस्टंट इनाम कमिशनर व १८५७ मध्ये कमिशनर हे हुद्दे त्यांना मिळाले. मात्र त्यांची ही कारकीर्द अपकीर्तीची ठरली. अनेकांची इनामे, वतने, जहागिरी इत्यादी दावे त्यांना बेकायदेशीर ठरवावे लागले. सनदा किंवा लेखी पुरावे देण्याऐवजी ही मंडळी तोंडी दावे सांगत. नोकरीनिमित्त महाराष्ट्रात, वाई, सातारा, पुणे, नगर, नाशिक, ठाणे, मुंबई या ठिकाणी आणि गुजरातेत सुरत व अहमदाबाद येथे त्यांचे वास्तव्य घडले. ते दहा वर्षे अहमदाबादच्या स्मॉल कॉज कोर्टाचे जज्ज होते. त्यांची ही कारकीर्द मात्र फार लोकप्रिय झाली. ते गुजराती मराठीइतकी सफाईदार बोलत आणि लिहीत. त्यांनी गुजरातीतही ग्रंथ लिहिले. १८८० ते ८२ अशी तीन वर्षे सरकारने त्यांना मुंबई विधिमंडळावर सभासद म्हणून नेमले होते. इ. स. १८८१ मध्ये सरकारने त्यांना ‘डेक्कनचे फर्स्टक्लास सरदार’ हा बहुमान दिला. शेवटच्या दिवसांत स्वतःचे ५ हजार रुपयांचे ग्रंथ त्यांनी केवळ टपाल हशीलावर वाटून टाकले. ‘मरते समयी देऊळ बांधण्याससांगू नका, पण नवे छापखाने व नवी पुस्तके करण्यास सांगा, देवळे पुष्कळ आहेत’, तितकी पुरेत.’ (पत्र ९१). असो तरूणपणी इतरांना केलेला उपदेश त्यांनी स्वतः गिरवला.
एवढी सत्ता, एवढी संपत्ती भोगलेला आणि एवढी विद्वत्ता आणि मान्यता मिळविलेला हा पुरुषार्थसंपन्न नरश्रेष्ठ कमालीचा विनम्र होता. त्यांचा साधेपणा लोकोत्तर होता. सामान्य माणसाबद्दल वाटणारा अकृत्रिम जिव्हाळा होता. या सद्गुणाच्या कहाण्या त्यांच्या चरित्रात जागोजाग विखुरल्या आहेत.
लोकहितवादींच्या चरित्रावर घेतला जाणारा मुख्य आक्षेप असा की, अखेरी ते बोलके सुधारक होते. टिळकांच्या शब्दांत ‘परस्पर सुधारक’ कारण त्यांनी पुनर्विवाहाचा पुरस्कार केला, पण स्वतः उत्तेजन देऊन घडवलेल्या अशा एका विवाहप्रसंगी ते स्वतः गैरहजर राहिले. त्यांचे चिरंजीव कृष्णराव हे कोकणस्थांमधले पहिले बॅरिस्टर. ते विलायतेत तीन वर्षे राहून परतले तेव्हा गोपाळरावांनी काशीहून परस्पर ब्राह्मणांकडून शुद्धिपत्र मागविले, प्रायश्चित देवाविले आणि मगच गृहप्रवेश होऊ दिला. स्वतःला विलायतेत जायची पाळी आली तर बहिष्कार आणि प्रायश्चित्ताला भिऊन त्यांनी ते टाळले. आर्यसमाजाचे अनुयायी बनले, श्रीमद्दयानंद सरस्वतींचे चरित्र लिहिले, पण स्वतः मूर्तिपूजा करीत राहिले. प्रार्थना समाजाची दीक्षा घेऊन, स्वतः उपासना चालवूनही धार्मिक कर्मकांडाच्या जंजाळातून बाहेर पडले नाहीत. हे सारे खरे आहे. तसे त्यांच्या चरित्रावरूनच दिसते.
आता पूर्वी उल्लेखिलेले सर्वाकडे, सर्व जगाकडेच सस्मित उपक्षेने दृष्टिक्षेप करणारे तटस्थ द्रष्टे हेच त्याचे उत्तर आहे, की ‘अलौकिक न होआवे, लोकांप्रति’ हे लोकसंग्रहाचे तत्त्व त्याच्या मुळाशी आहे याचा ज्याचा त्यानेच निर्णय करायचा आहे.
आणखी पुढे पाहिले तर तसे महाराष्ट्रात सुधारकांना पुष्कळ वर्षे प्रायश्चित्ते घ्यावी लागली आहेत असे दिसेल. न्या. मू. रानडे एवढे लोकाग्रणी, पण पंचहौद मिशन चहा प्रकरणी (१८९१-९२) त्यांना प्रायश्चित घ्यावे लागले. न्यायमूर्ती तेलंग संमतिवयाचे पुरस्कर्ते, रखमाबाई-दादाजी खटल्यात रखमाबाईचे वकील. त्यांना स्वतःच्या मुलीचे लग्न तिच्या वयाच्या आठव्या वर्षी (१८९३) करावे लागले. पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते असून डॉ. भांडारकरांची विधवा कन्या व रावसाहेब पाणंदीकर यांच्या पुनर्विवाहास हजर राहून आजारपणाच्या सबबीवर तेलंग त्यांच्या पंक्तीस बसले नाहीत. धोंडो केशव कर्वे एवढे महर्षि. १९११ साली ज्येष्ठ पुत्र रघुनाथ धोंडो कर्वे याच्या लग्नात ब्राह्मणांच्या पंक्तीस बसून किराणा घराण्याचे खाँसाहेब अब्दुल करीम खाँ या नवर्‍या मुलाच्या मित्राने श्लोक म्हटला. ब्राह्मणांना पाप लागले. म्हणून त्यांना दीडशे रुपये दंड भरून प्रायश्चित्त घ्यावे लागले. त्या प्रतिकूल काळीदेखील जनक्षोभाला भीक घातली नाही – ती एका गोपाळ गणेश आगरकर या सुधारणाकेसरीने!

अभिप्राय 1

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.