विवाहाविषयी आणखी थोडे

श्री संपादक, आजचा सुधारक, यांस,
आपल्या ऑक्टोबर १९९२ च्या अंकामध्ये विवाह आणि नीती ह्या विषयावर आपण आपली स्वतःची भूमिका मांडली आहे. नोव्हेंबर-डिसेंबरच्या अंकात स्त्री उवाच ह्या वार्षिकाचा परिचय अनुराधा मोहनी ह्यांनी करून दिला आहे, त्यात विवाह हा विषय आहे, आणि त्याच अंकात श्री. गं.र. जोशी ह्यांचे ‘समतावादी कुटुंब!’ ह्या शीर्षकाचे पत्र त्याच विषयावर आपण प्रकाशित केले आहे. त्यांपैकी श्री गं.र. जोशी ह्यांच्या पत्राविषयी माझे मत.
लग्न ह्या विषयाचा आवाका फार मोठा आहे. त्याचे अगणित पैलू आहेत. ती आपल्या सध्याच्या कुटुंबसंस्थेची आधारशिला असल्यामुळे तो संपूर्ण मानवजातीच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. इतकेच नव्हे तर मानवी आयुष्यातील पुष्कळशी सुखदुःखे विवाहामुळेच निर्माण झाली आहेत. त्यातही दुःखांचा आणि विवाहाचा संबंध इतकाअपरिहार्य आहे, इतका निगडित आहे, की सुखकारक विवाह, समंजस पतिपत्नी ही अत्यंत दुर्मिळ घटना आहे असे वाटू लागते. यंदाच्या ‘मिळून सार्‍याजणी’च्या दिवाळी अंकात जो वाचक-प्रतिसाद प्रकाशित झाला आहे तो वाचला की माझा हा मुद्दा स्पष्ट होईल.
‘लग्न हवंच तर का आणि कसं?’ हे वाचून आणि श्री. गं.र. जोशी ह्यांचे पत्र वाचून असे जाणवले की हे सारे लेखक महाराष्ट्रीय मध्यमवर्गीय मनोवृत्तीच्या पलीकडे जात नाहीत. लग्न का हवे म्हणजे विवाहसंस्कार का हवा ह्या प्रश्नाचा सहसा कोणीही विचार करीत नाही. लग्न म्हणजे तो संस्कार हवाच असे गृहीत धरून चालतात आणि लग्नामुळे निर्माण होणारे फक्त पतिपत्नींचे नाते लक्षात घेतात.
आता श्री. जोशी ह्यांनी उपस्थित केलेले मुद्दे बघू या. त्यानी कुमारिका आणि विधवा ह्यांच्या विवाहबाह्य संततीचा उल्लेख केला आहे. तो प्रश्न स्वच्छंद समाजाने निर्माण केला असून त्याचे स्वरूप मुख्यतः अमेरिकेमध्ये भेडसावणारे झालेले आहे आणि त्याचीच लागण आपल्या समाजाला होत आहे असे ते म्हणतात. हे प्रश्न त्यांना गृहस्थाश्रमाचा बळी न देता अत्यंत सहानुभूतीने आणि मानवी दृष्टिकोणातून सोडवावयाचे आहेत. त्यांचा सहानुभूतीचा मुद्दा मला पूर्णपणे मान्य आहे. पण त्याचमुळे माझ्यापुढे काही अडचणी उभ्या राहतात. त्या कशा ते पुढे सांगतो.
ज्यांचे विधिपूर्वक लग्न झाले नाही अशांच्या मुलांना लेकावळे, अक्करमासे अशी मराठीमध्ये संज्ञा आहे. ही संज्ञा जेव्हा निर्माण झाली तेव्हा आपला permissive society शी परिचय झालेला नव्हता. अनौरस संतती होतीच, एवढेच नव्हे तर तिचे आपल्या समाजातील स्थान स्पष्ट होते. स्वतःला पाराशर ब्राह्मण असे म्हणविणार्‍या जातीसुद्धा निर्माण झाल्या होत्या. आपली पुराणे पाहिली तर कोणत्या जातींची उत्पत्ति ही कोणकोणत्या जातींच्या संकराने झाली आहे हे त्यात लिहिलेले आढळेल. थोडक्यात काय तर हा प्रश्न नवीन नाही. कारण काही थोड्या जातींमधले अनुलोम विवाह सोडले तर भिन्नजातीयांमध्ये विवाहच संभवत नव्हता. त्यामुळे संकरज प्रजा ही विवाहबाह्य प्रजा होती असे मानावयाला प्रत्यवाय नाही. पण ही दूरच्या इतिहासातली गोष्ट झाली.
नजीकच्या इतिहासाकडे पाहिले तरी नागरित समाजांमधल्या सामाजिक (किंवा लैंगिक म्हणा) नीतीच्या कल्पना बदलत असलेल्या दिसतात. कधी सावकाश म्हणजे मंद गतीने तर कधी झपाट्याने. आणि अनागरित समाजांमध्ये किंवा नागरकरणाच्या प्रक्रियेमध्ये मागे असलेल्या समाजामध्ये नीतिनियम शिथिल असलेले आढळतात. त्यामुळे अनौरस मुलांचे समाजातील स्थानही निरनिराळ्या जातीजमातींमध्ये निरनिराळे राहिले आहे. उच्चवर्णीयांनी आणि मध्यमवर्गीयांनी गेल्या शे-दीडशे वर्षांत अशा संततीकडे पाहून जास्त नाके मुरडण्यास सुरुवात केली आणि संस्था काढून अशांची व्यवस्था करता येते हे लक्षात आल्यानंतर त्यांना समाजात स्वीकारण्याची जबाबदारी झटकून टाकली. ह्या कामांसाठी ख्रिस्ती मिशनर्‍यांची अनाथालये निर्माण होईपर्यंत त्यांना थोडे कमी दर्जाचे स्थान देऊन का होईना, समाजात स्वीकारले जात होते. महाराष्ट्रात तरी स्वतःला श्रेष्ठ आणि उच्चवर्णीय मानणारे ब्राह्मण व त्यांचे अनुकरण करणारे देशमुख, पाटील ह्यांनी ह्या संततीचा जेवढा बाऊ केला आहे तेवढा आणखी कोणीही केला नसावा. त्याप्रमाणे ब्रह्मचर्याचे अकारण स्तोमही माजविले नसावे. हा सारा आपल्या वर्गाला इतरांहून श्रेष्ठ ठरविण्यासाठी केलेला खटाटोपआणि त्यासाठी दिलेला स्त्रियांचा बळी आहे. लग्न ह्या विषयावर लिहिणार्‍या बहुतेकांची विचारसरणी मध्यमवर्गीय तथाकथित उच्चवर्णीयांशी एकरूप होऊ इच्छिणार्‍या महाराष्ट्रीयांची असते असे मला जाणवते ते ह्याचमुळे. अनौरस संतती हा शब्द श्री. जोशी ह्यांनी वापरला नसला तरी विवाहबाह्य संतती ह्या शब्दाने त्यांना तेच सुचवावयाचे आहे. ही समस्या विवाहसंस्थेचे महत्त्व कमी झाल्यामुळे आणखी वाढेल असे त्यांना वाटते आणि मला उलट विवाहसंस्थेला अतिरिक्त महत्त्व दिल्यामुळेच ती उद्भवते असे वाटते. विवाहसंस्काराचे (कुटुंबसंस्थेचे नव्हे) महत्त्व काढून घेतले की घटस्फोट, वैधव्य, विधुरत्व आणि अर्थात् अनौरसपणा हे प्रश्न शिल्लक राहणार नाहीत असा माझा समज आहे. कोणत्याही कुटुंबातील स्वास्थ्याचा पतिपत्नींची परस्परांवर एकनिष्ठा हाच एकमेव आधार आहे असे ते धरून चालतात. पण त्यामध्ये व्यावहारिक अडचणी आहेत आणि एकनिष्ठेविषयीचा निरनिराळ्या जातीजमातींचा अनुभव वेगळाआहे.
पहिली अडचण अशी की आपल्या देशात १९८१ ते ९१ ह्या दहा वर्षांच्या काळात पुरुषांच्या संख्येपेक्षा स्त्रियांची संख्या ७९,७८,००० ने घटली आहे. ही घटलेली संख्या केवळ म्हातार्‍यांची  नाही. मुख्यतः बालिकांची आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण आपल्याकडे जी गर्भलिंगचिकित्सा करून स्त्रीभ्रूणहत्या होत आहे तिच्या संदर्भात हे आकंडे दिलेले आहेत. श्री. रवीन्द्र रुक्मिणीबाई पंढरीनाथ ह्यांनी ‘स्त्री उवाच’मध्ये स्त्रीपुरुषांच्या बदलत्या गुणोत्तराचे कोष्टकच दिले आहे. म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपल्या देशातल्या सगळ्या पुरुषांना वैवाहिक (आणि लैंगिक) सुख मिळावयाचे असेल तर ते एकपतिपत्नीकत्वाचा आग्रह धरल्यास, अशक्य आहे. (सहानुभूतीने आणि मानवी दृष्टिकोणातून हा प्रश्न सोडवावयाचा असल्यामुळेच अशा अडचणी येतात!) किंवा लाखों स्त्रियांना आपल्या वैवाहिक आयुष्याची निम्मी वर्षे एका पुरुषाबरोबर नांदून व नंतर त्याला विधिवत् घटस्फोट देऊन दुसर्‍याशी विवाह करावा लागेल. ही गोष्टही प्रायः अशक्य आहे.
आणखी अडचण अशी की स्त्री-पुरुषांच्या गुणोत्तरात जसा फरक आहे तसाच आपल्या देशात लोकसंख्येचा दोन टक्के भाग हा मतिमंदांचा आहे. ह्यांपैकी अर्धे म्हणजे अंदाजे ८० लाख लोक घर वसवून स्वतंत्रपणे संसार करण्याच्या क्षमतेचे नाहीत. तेही सारे विवाहापासून वंचित राहतील. आज त्यांना जे लैंगिक सुख चोरूनमारून मिळते ते विवाहयोग्यता त्यांच्या ठिकाणी नसल्यामुळे त्यांना कधीच मिळणार नाही. कारण एकनिष्ठेच्या कल्पनांमुळे विवाहाबाहेरचे सुख त्याज्य आहे. दृष्टिहीनतेमुळे किंवा शारीरिक व्यंगामुळे ज्यांना विवाहामध्ये जोडीदार म्हणून सहसा कोणी निवडीत नाहीत अशांची संख्याही आपल्या देशात लहान नाही. तीही अंदाजे एक कोटी इतकी आहे. ह्या सार्‍याचा अर्थ असा की विवाहयोग्य वयामधल्या चाळीस कोटींपैकी अंदाजे दीड कोटी स्त्रीपुरुष विवाहापासून वंचित राहतील. इतक्या सगळ्यांचे आणि त्यातल्या त्यात मतिमंदांचे मानसिक उन्नयन इष्ट आणि शक्य आहे काय?
आपल्या मनाला जिची सवय झाली आहे ती जुनी घडी बदलावयाची असेल तर विवाहसंस्काराचे महत्त्व कमी करावे लागेल, अनौरस संततीच्या ठिकाणचे लांच्छन दूर करावे लागेल. योनिशुचितेचा बाऊ करून भागणार नाही आणि ‘पतिव्रता’ आणि ‘व्यभिचारिणी’ ह्यांच्या सामाजिक दर्जामध्ये फरक राहू देऊन चालणार नाही. त्याचप्रमाणे दुसर्‍याच्या मुलाला स्वतःच्या मुलाप्रमाणे वागवावे लागेल. आज आपण दत्तक मुलांना स्वतःच्या मुलांप्रमाणे वागविण्यास तयार असतोच ना!”
श्री जोशी म्हणतात की (विवाहित) पतिपत्नींना परस्परांच्या विवाहबाह्य संबंधांकडे दुर्लक्ष करावयाला सांगण्यापेक्षा विवाहाइतकाच विवाहविच्छेद सुलभ असणे केव्हाही व्यवहार्य राहील. एकामागे एक विवाहविच्छेद करीत सुटणे हे श्री. जोशी ह्यांना अभिप्रेत नाही हे स्पष्ट आहे. पण काही स्त्रियांच्या अशा क्रमशः होणार्‍या अनेकपतिकत्वामुळे नवीन, मागाहून झालेल्या, पतींवर आपल्या पत्नींच्या पूर्वविवाहजन्य संततीवर प्रेम करण्याची जबाबदारी येते हे तर ते मान्य करतील. हे नवीन परिस्थितीशी जुळवून घेणेच झाले. विवाहविधीचे, त्या संस्काराचे महत्त्व कमी व्हावे असे आपणांस वाटत असेल (कारण त्यायोगे संततीत औरस आणि अनौरस असा फरक होतो, त्यामुळे त्यांच्या सामाजिक दर्जात फरक होतो) आणि सर्वांबद्दलच्या सहानुभूतीने जर प्रश्न सुटावयाला हवे असतील तर समता हवी आणि कशामुळेही दर्ज्यात फरक होऊ नये.
मागच्या शतकामधल्या मध्यमवर्गीय (उच्चवर्णीय) महाराष्ट्रीय पुरुषांची स्त्रियांच्या क्रमशः घडलेल्या अनेकपतिकत्वाला (successive polyandry) स्वीकारण्याची तयारी नव्हती. ती आज झालेली आहे. तर एक पाऊल पुढे टाकून क्वचित् concurrent polyandry घडली तर त्याही नवीन परिस्थितीशी पुरुषांनी जुळवून घ्यावे असे आपणास, आपल्या संपादकीयात सुचवावयाचे आहे असे मला वाटते.
घटस्फोटाला किंवा विधवाविवाहाला मान्यता हा आपल्या समाजाच्या स्त्रीपुरुषविषयक नीतिकल्पनांमध्ये घडलेला बदलच होय. हा इष्ट बदल आहे असे श्री जोशी मानतात. स्त्रीपुरुषसंबंधविषयक कल्पनांना नीतिकल्पना म्हणणेच चूक आहे असे मला वाटते. Ethics आणि morals मध्ये फरक नाही काय? आणि Ethics मध्ये मानवी आचरणाच्या शाश्वत नियमांची चर्चा आपणास अभिप्रेत नाही काय? स्त्रीपुरुषांच्या संबंधातील बहुतेक कल्पना ह्या देशकालसापेक्ष असलेल्या आढळतात. आणि ह्या आपल्यापेक्षा वेगळ्या असलेल्या व मुख्यतः शिथिल कल्पनांमुळे त्या त्या समाजांचे काही कायमचे नुकसान झाल्याचे आढळत नाही. उलट जेथे ह्या कल्पना अतिशय कडक आहेत तेथे मानवी दुःखांमध्ये अपरिमित भर पडल्याचे आढळते, आणि योनिशुचितेविषयीच्या कल्पना शिथिल असलेल्या समाजात हे दुःख निःसंशय कमी आहे असे दिसते. ह्या दुःखाची (जे मुख्यतः स्त्रियांच्या वाट्याला येते) आपल्या मनाला इतकी सवय होऊन जाते की आपले मन त्याबाबतीत संवेदनाशून्य होते, निर्ढावते. ज्या व्यक्ती प्रत्यक्ष दुःख भोगतात त्या आपली दुःखे समाजाच्या त्या त्या काळातील कल्पनांमुळे निर्माण झाली आहेत हे जाणत नाहीत व एकतर देवाला दूषण देत स्वस्थ बसतात, ‘माझ्याच वाट्याला हे का’ असे म्हणून चिडचीड करतात किंवा व्रतवैकल्ये करून दैवाला अनुकूल करून घेण्याचा निष्फळ प्रयत्न करतात.
पतिपत्नींच्या एकमेकांवरच्या निष्ठेचे माहात्म्य असेच देशकालसापेक्ष आहे. तशी निष्ठा नसतानासुद्धा स्त्रीपुरुषांना एकमेकांवर प्रेम करता आलेले आहे. अशा अनेक जातीजमाती आहेत की ज्यामध्ये sociological father हा biological father असतोच असे नाही. आपल्या अपत्यांचा biological father कोण ह्याची फिकीर sociological father ला नसते. हा सारा आपल्या मनाच्या conditioning चा परिणाम आहे. उत्तरेकडे हिमगिरीच्या पायथ्याशी राहणार्‍याच नव्हे तर दक्षिणेकडे नीलगिरीवर राहणार्‍या जातींची माहिती वाचली की माझा हा मुद्दा स्पष्ट होईल. समाजविज्ञानाच्या, मानवशास्त्राच्या विद्यार्थ्यांना अधिक सांगणे न लगे. ह्या सार्‍यामुळे मला तर असे वाटू लागले आहे की ‘दैवजात दुःखें नसतीं, दोष समस्तांचा, पराधीन नाही जगतीं पुत्र मानवाचा’ असे मानून चालले पाहिजे आणि तसे सिद्ध करण्यासाठी कंबर कसली पाहिजे. असो.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.