आगरकर-चरित्राच्या निमित्ताने

राष्ट्रीय चरित्रमालेसाठी गोपाळ गणेश आगरकर यांचे एक संक्षिप्त चरित्र प्रख्यात विचारवंत, लेखक आणि समाजविज्ञान-कोशकार श्री स. मा. गर्गे यांनी लिहिले आहे. आजचा सुधारक गेली दोन अडीच वर्षे आगरकरांनी पुरस्कारलेल्या विवेकवादाचा प्रसार आपल्या मगदुराप्रमाणे करीत आहे. तेव्हा त्याने या अल्पचरित्राची ओळख आपल्या वाचकांना करून द्यावी म्हणून श्री गर्गे यांनी ते आमच्याकडे धाडले. त्या चरित्राच्या निमित्ताने आगरकरांना आदरांजली वाहण्याची ही संधी आम्ही घेत आहोत.
टिळक आणि आगरकर या दोघांचाही जन्म १८५६ चा. धाकट्या शास्त्रीबुवांनी निबंधमालेतून आधुनिक शिक्षितांस केलेल्या विज्ञापनेने भारावून गेलेले हे दोघेही तरुण या हतभाग्य भारतभूच्या चरणावर आपली जीवनकुसुमे वाहण्यासाठी शास्त्रीबुवांच्या उद्योगात सामील झाले. स्वकीयांचे स्वत्व जागवावे, त्यांच्यातील सत्त्वाची वृद्धी करावी यासाठी शाळा आणि वर्तमानपत्रे यांसारखे प्रभावी साधन नाही हे ओळखून शास्त्रीबोवांनी पुण्याला न्यू इंग्लिश स्कूल (१८८०) आणि ‘केसरी’ हे मराठी आणि ‘मराठा’ हे इंग्रजी साप्ताहिक पत्र काढले (१८८१). वर्षभरात या उपक्रमांचे नेते विष्णुशास्त्री हे वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी १८८२ मध्ये इहलोक सोडून गेले. त्यांच्यावरील मृत्युलेखात आगरकर लिहितात, “शास्त्रीबोवांचीच कथा काय, आम्हांपैकी एक जरी तळावर असला तरी तो आम्ही सर्वांनी आरंभिलेले उद्योग अविच्छिन्न चालविण्यास होईल तेवढी खटपट करील.” दोन वर्षांच्या आत डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना (१ जाने. १८८४) आणि १८८५ साली या सोसायटीचे फग्र्युसन कॉलेज या मित्रमंडळीने सुरू केले.
दोघांचा हा सतत सात वर्षे चाललेला सहप्रवास १८८७ मध्ये खंडित झाला. त्यावर्षी आगरकरांनी केसरी सोडला. म्हणजे त्यांना तो सोडावा लागला. (२५ ऑक्टो. १८८७)
यानंतर पुढील एका वर्षाच्या आत आगरकरांनी स्वतःचे साप्ताहिक काढले. त्याला त्यांनी त्याकाळी शिवी समजले गेलेले ‘सुधारक’ हे नाव दिले. आगरकरांचे निधन १७ जून १८९५ रोजी झाले. या सात वर्षांत ‘सुधारका’ने जी कामगिरी केली तिची थोरवी सातशे वर्षांपूर्वीच्या ज्ञानेश्वरीसारखीच आहे. मराठी भाषा आहे तोपर्यंत या दोन्ही गोष्टी राहणारआहेत.
टिळक आगरकरांना जी मान्यता मिळाली तीत मात्र फार अंतर आहे. टिळक भारतभर लोकमान्य झाले. आगरकरांना महाराष्ट्राची मर्यादा पडली. याचे कारण असे की, आगरकरांनी राजवाड्यांप्रमाणे मराठीतच लिहीन असा नेम केला होता. बरे महाराष्ट्रात देखील त्यांचे विचार सर्वमान्य व्हावेत असे नव्हतेच. त्यांचा बुद्धिवाद फार दाहक होता. त्यांनी जीव तोडून पुरस्कृत केलेल्या सुधारणा आपण स्वीकारल्या, पण परिस्थितिशरण होऊन प्रवाहपतितासारख्या! आगरकरांच्या पद्धतीने आपण सुधारलो नाही.
आजही सुधारणावादी कार्यकर्ते आणि संस्था आहेत. पण त्या आगरकरांचे ऋण मान्य करण्याचे कटाक्षाने टाळतात अशी श्री गर्ग्यांची तक्रार आहे. त्यांना कोणत्या व्यक्ती आणि कोणत्या संस्था अभिप्रेत आहेत हे आम्हाला माहीत नाही. पण तसे असल्याशिवाय ते म्हणणार नाहीत. म्हणून त्यांच्याप्रमाणेच आम्हालाही या गोष्टीची खंत वाटते.
अशा कोणत्या पद्धती आगरकरांना अभिप्रेत होत्या? त्यांना सुधारणा तरी किती पाहिजे होत्या? आगरकर इतिहासजमा झाले असे म्हटले तर काय बिघडले? या प्रश्नांची उत्तरे श्री गर्ग्यांच्या लहानशा पुस्तकातदेखील मिळतात. आगरकरांच्या सार्वजनिक जीवनाचा आणि वैचारिक जीवनाचा आलेख त्यांनी दिला आहे. वैचारिक जीवनाचे पुन्हा सामाजिक, राजकीय आणि आर्थिक असे भाग करून, शेवटी आगरकरांची जीवनमूल्ये सारांशाने सांगून समालोचनात आगरकरांचे सामाजिक सुधारणेचे कार्य आता संपलेले आहे हा समज कसा पोकळ आणि खोडसाळपणाचा आहे हे दाखवले आहे.आगरकरांच्या सार्वजनिक जीवनाची पार्श्वभूमी म्हणून ‘आगरकरपूर्व महाराष्ट्र’ आणि ‘आगरकरपूर्व समाजसुधारक’ ही दोन छोटीशी प्रकरणे गर्ग्यांनी घातली आहे.
इ.स. १८१८ त पेशवाई बुडाली. इंग्रजी राजवट धीरे धीरे लोकप्रिय होऊ लागली होती. लोकांना पूर्वी कायद्याचे राज्य माहीतच नव्हते. आता पेंढार्‍यांचा बंदोबस्त झाला होता. सुरक्षितता आली होती. विज्ञानाची करणी, तंत्रज्ञान चकित करीत होती. दळणवळण सुखाचे झाले होते. यंत्रे आली. हस्तव्यवसाय धोक्यात येऊ लागले. धर्म-समजुतींना हादरे बसू लागले. कायद्यासमोर सगळे सारखे अशी न्यायाची भाषा प्रथमच ऐकू येऊ लागली. अवघे नवलच होते.
वाघिणीचे दूध आपला प्रभाव दाखवू लागले. बाळशास्त्री जांभेकरांनी मराठी भाषेतले पहिले ‘पत्र दर्पण’ (पाक्षिक) सुरू केले (१८३२). बाळशास्त्रींना केवळ ३६ वर्षांचे आयुष्य लाभले (१८१० ते १८४६). त्यांनी पाश्चात्त्य विद्यांचे स्वागत केले. सुधारणेच्या विचारांना पूर्वेचे, पश्चिमेचे अशी जात नसते असे आर्जवपूर्वक सांगितले. स्त्रियांचे शिक्षण, विधवांचा पुनर्विवाह ही भाषा दर्पणच्या मुखातून महाराष्ट्राने पहिल्यांदा ऐकली. त्या मानाने लोकहितवादी दीर्घायुषी (१८२३ ते १८९२)! त्यांनी साप्ताहिक प्रभाकरात दोन वर्षे (१८४८-१८५०) लोकांना हितोपदेश केला. हिंदू समाजातील दुष्ट रूढींवर हल्ले केले. इतिहास-भूगोल या भौतिक विद्यांच्या अभावी आपली किती पिछेहाट झाली याचे चित्रण केले. त्यांचे हे लेख शतपत्रे म्हणून प्रसिद्धीला आले.
महात्मा फुल्यांनी शूद्रातिशूद्रांसाठी जिवाचे रान केले. त्यांचे विवेकनिष्ठ सामाजिक तत्त्वज्ञान सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक या नावाने त्यांच्या मृत्यूनंतर एका वर्षाने प्रसिद्ध झाले.
न्या. मू. महादेव गोविंद रानडे (१८४२ ते १९०१) समन्वयवादी सुधारक होते. धर्मनिष्ठा की विवेकनिष्ठा, ऐतिहासिक परंपरा की आधुनिक समता यांच्यात त्यांना विरोधाभास दिसत नव्हता. ते सर्वांगीण प्रगतिवादी होते. एकाच वेळी राजकीय, सामाजिक आणि आर्थिक!
विष्णुशास्त्र्यांनी एक जानेवारी १८८० रोजी न्यू इंग्लिश स्कूल सुरू केले. आगरकर एम.ए. ची परीक्षा आटोपून वर्षाअखेर त्यांना येऊन मिळाले. लगेच चार जानेवारी १८८१ रोजी केसरी निघाला. त्याचे पहिले संपादकपद आगरकरांना मिळाले. त्यावेळी त्यांचे वय फक्त २४ वर्षांचे होते. पहिल्याच अंकात पत्रकर्त्याची गस्त सरकारी कारभारासंबंधाने लोकांस हितावह व्हावी यासाठी केसरीची गर्जना वरचेवर होत जाईल अशी घोषणा करून, सदरील पत्रातील लेख पत्राच्या ठेवलेल्या नावाप्रमाणे येतील असे बजावायला ते विसरले नाहीत. केसरीकार हा लौकिक टिळकांचा खराच, पण स्थापनेपासून पहिली सात वर्षे आगरकरांनी त्याला आकार दिला, नावाला शोभेसे रूप दिले. शास्त्रीबुवा निबंधमालेमुळे मराठी भाषेचे शिवाजी ठरले. पण शास्त्रीबुवांच्या हातचा केसरीत एक निबंध असे आणि तो बहुशः पहिला, असा खुलासा त्यांच्या मृत्यूनंतर केसरीत (१३.६.८२) आहे. नवीन मते लोकांची मने न दुखावतील अशा रीतीने आणण्याचा केसरीकार मनापासून प्रयत्न करतील, असे आगरकरांनी आश्वासन दिलेले असले तरी बालविवाहाच्या प्रश्नावरून मतभेद विकोपाला गेलेच.
मतभेद झाले नसते तर कदाचित सुधारक निघाला नसता. आगरकरांच्या कार्याला जी कलाटणी मिळाली ती मिळाली नसती म्हणून त्यांची थोडी माहिती वाचकाला उपयोगी होईल.
बालविवाहाविरुद्ध शतपत्रांनी ओरड केली असली तरी पुढील काळात अशा तीन घटना घडल्या की त्यांची परिणती संमतिवयाचा कायदा होण्यात झाली आणि त्या निमित्ताने उभा महाराष्ट्र ढवळून निघाला. एक म्हणजे १८८४ ते १८८७ पर्यंत चाललेला रखमाबाई दादाजीचा खटला. दुसरी शेठ बेहेरामजी मलबारी यांची बालविवाह व असंमत वैधव्य यावरील टिपणे (१८८४). आणि तिसरी म्हणजे फुलमणीचा मृत्यू (१८९०). रखमाबाईचे लाग्न अकराव्या वर्षी दादाजीशी झाले. दादाजी कबूल करूनही लग्नानंतर शिकला नाही. आधीच निःसत्त्व, त्यातून वाईट संगत, शिवाय क्षयाने अशक्त झालेला. रखमाईला लग्न होऊन दहा वर्षे झाली तरी संसारसुखाचा अनुभव नाही. ती आपल्या आईजवळ, आईच्या पुनर्विवाहित पतीजवळच राहिली. तिथे इंग्रजी शिकली. दादाजीने कोर्टाद्वारे तिचा ताबा घेण्याचा आदेश मिळवला तरी ती गेली नाही. नवर्‍याच्या घरी जाण्यापेक्षा सहा महिने तुरुंगात जायची तिची तयारी होती. बाब प्रिव्ही कौंसिलकडे लंडनला न्यायची वेळ आली. शेवटी तडजोड निघाली. रखमाबाईने दादाजींना खर्चापोटी दोन हजार रु. एवढी रक्कम द्यायची व दादाजीने कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी मागायची नाही. मलबारींनी टिपणांमध्ये मागणी केली की धर्माचे खोटेच नाव सांगून बारा वर्षाखालील मुलींची लग्ने होतात ती बंद करावी. मानवीय भूमिकेतून सरकारने कायदा करावा. बंगालमधील फुलमणीची कहाणी फारच करुण आहे. तिचा नवरा हरिमोहन तिशी उलटलेला. त्याने या दहा वर्षांच्या मुलीवर तिच्या माहेरीच बळजबरी केली. त्याच्या अत्याचाराने ती रक्तरंजित होऊन गतप्राण झाली. दहाव्या वर्षानंतर नवर्‍याने बायकोकडे जाणे बेकायदेशीर नाही असा पक्ष त्याने घेतला. तो कायदेशीर होता. पण इजा करण्याबद्दल त्याला एक वर्षाची सजा झाली. या प्रकरणानंतर बालिकावधूची संमतिवयाची मर्यादा वाढवावी असे खुद्द सरकारलाच पटले.
सरकारने मलबारींची मागणी उचलून धरली. सरकारी हस्तक्षेपामुळे आमच्या रूढीस व शास्त्रास धक्का बसतो हाच आमचा मुख्य मुद्दा असे टिळकांनी केसरीत लिहिले आहे.आगरकरांनी सवाल केला की, ‘नहाण आल्याशिवाय मुलींची लग्ने करू नयेत असा अकबर बादशहाने केलेला कायदा मान खाली घालून सार्‍या लोकांनी कसा ऐकला? याखेरीज त्यांनी आणखी एक उपपत्ती मांडली की, या रूढी, स्त्री पुरुषाची मालमत्ता आहे या भावनेतून आल्या आहेत. मालमत्तेचा दुरुपयोग केला जातो असे स्पष्ट दिसत असता कायदा केलाच पाहिजे. शेवटी संमतिवयाचे बिल सर्वोच्च कायदेमंडळात १८९१ मध्ये मांडण्यात आले व पुढे रीतसर त्याचे कायद्यात रूपांतर झाले.
‘इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार’ या बाण्यानेआगरकरांनी सुधारक चालवला. सुधारकांत थोडा इंग्रजी व बाकीचा मजकूर मराठी असे. इंग्रजी विभाग गोपाळ कृष्ण गोखले सांभाळत. स्त्रियांनी लिहावे यासाठी खास जागा राखून ठेवली असे. शिक्षकांसाठी सदर असे. तीन वर्षात सुधारकाने तीन हजारांची मजल गाठली. केसरी थोडा पुढे होता. केसरी तेव्हा चार हजारांहून थोडा अधिक खपत होता. आगरकरांच्या लेखणीचे बळ पुन्हा एकदा सिद्ध झाले.
संमतिवयाच्या बिलप्रकरणी कटुता शिगेस पोहोचली होती. तरी १८९३ मध्ये टिळकांनी आपल्या तेरा वर्षांच्या मुलीचे लग्न केले तेव्हा अनुकरणीय विवाह, म्हणून सुधारकाने त्यांची पाठ थोपटली.
स्वदेश, स्वभाषा आणि स्वधर्म यांचे शास्त्रीबुवांनी जे बाळकडू निबंधमालेतून पाजले त्यातल्या पहिल्या दोहोंचे आगरकरांनी शेवटपर्यंत कडवे समर्थन केले, आणि स्वधर्माचे न्यायनिष्ठुर परीक्षण केले.
सुधारणेची त्यांची पहिलीच प्रतिज्ञा, ‘भारतीय आर्यत्व न सोडता’, अशी आहे. पाश्चात्यांचे आंधळे अनुकरण त्यांना नको होते. प्रसंगी धोतरे नेसणे सोयीचे नसले तरी दिवसभर पाटलोण घालून बसणे त्यांना चालणारे नव्हते.
सुधारणा हव्यात तरी किती? या प्रश्नाला त्यांचे उत्तर आहे : त्याच्या (सुधारकाच्या) सुधारणा-बुभुक्षेस मर्यादाच नाही… मनुष्याच्या स्थितीत पूर्णता येणे बहुधा अशक्य आहे, पण ती येईतोपर्यंत सुधारकाच्या मनाची शांति व्हावयाची नाही… हिंदुस्थानातील एकूण एक प्रौढ स्त्री-पुरुषास लिहिता वाचता आले पाहिजे, तसेच प्रत्येक व्यक्तीस आपला चरितार्थ चालविण्यासारखा एखादा तरी धंदा येत असला पाहिजे…. इतकेच नाही तर सहजगत्या उदरपोषण करता येऊन दिवसाचा काही वेळ आत्मचिंतनाकडे, आवडत्या शास्त्राच्या अभ्यासाकडे, मनास रुचेल ती करमणूक करण्याकडे किंवा विश्रान्तीकडे लावताआला पाहिजे हे वाचल्यावर आगरकर संपले असे म्हणणारा मनुष्य आंधळाच असला पाहिजे.
आगरकर केवळ सामाजिक सुधारणवादी होते या विपर्यासाला खुद्द टिळकांनीच परस्पर उत्तर दिले आहे. १९१६ साली आगरकर स्मृतिदिनानिमित्त केसरीत ते लिहितात, ‘आगरकर हे पक्के स्वराज्यवादी होते… जो तार्किकपणा समाजसुधारणेसंबंधाने त्यांच्या अंगी वसत होता तोच तार्किकपणा त्यांनी राजकीय बाबींवरील आपल्या लेखांतहि पूर्णपणे उपयोगांत आणिला आहे.’ स्वतः आगरकरांनी एका निबंधात म्हटले आहे, राजकीय सुधारणा सामाजिक सुधारणांच्या अगोदर झाल्या पाहिजेत. सुधारणांचा वास्तविक पाहतां असा क्रम असून आमचे सरकार त्याचा व्युत्क्रम करू पाहाते… या घटकेस ज्या विधवा वैधव्यदुःख भोगीत आहेत, किंवा येथून पुढे आणखी शेपन्नास वर्षात ज्यांना ते भोगावे लागेल त्या सर्वांचे दुःख एके ठिकाणी केले तरी ते १८७५-७६-७७ सालच्या दुष्काळात जी साठ लक्ष मनुष्ये अन्नान्न करून मेली, त्यांच्या दुःखाबरोबर येणार नाही, अशी आमची खात्री आहे.
व्यक्तिस्वातंत्र्य आणि समता ही दोन आधुनिक मूल्ये त्यांनी पाश्चात्यांकडून आत्मसात केली होती. लोकशाही हा या तत्त्वांचाच उपसिद्धांत. त्या तत्त्वाबद्दल ते लिहितात, कोणत्याहि राष्ट्राला राष्ट्रपण येणे म्हणजे त्यावर अंमल करणार्‍या सरकारचे नियंत्रण किंवा नियमन त्यातील लोकांचे हाती येणे होय.
आगरकर घरच्या म्हातारीचे काळ, हिंदुधर्मद्रोही होते हाही असाच एक गैरसमज. मुंबईत हिंदुमुस्लिम दंगा १८९३ साली झाला. फोडा व झोडा या राज्यकर्त्यांच्या कूटनीतीला उद्देशून ते म्हणतात. राज्य काबीज करण्यात भेद करण्याने कदाचित फायदा होत असेल (पण)…प्रजा संतुष्ट राहण्यास निःपक्षपाती न्यायासारखे दुसरे साधन नाही. दुसर्‍या एका निबंधात ते म्हणतात, हिंदू हा जरी पराकाष्ठेचा कृतज्ञ, राजनिष्ठ व शांतिप्रिय प्राणी आहे, तरी अन्यायाचा अतिरेक झाला असता त्याचे सुद्धा स्वस्वामित्व नाहीसे होणे हे अगदी स्वाभाविक आहे. इस्माइलखान नामक कोण्या गृहस्थाने हिंदूंना उद्देशून लंडन टाइम्समध्ये अनुदार उद्गार काढले. त्याला आगरकरांनी ठणकावले की, …मुसलमान लोकांचा खरा तरणोपाय हिंदू लोकांशी एकमत करण्यात आणि जोडीने ज्ञान, संपत्ति व राजकीय हक्क संपादण्यात आहे. हिंदू धर्माच्या शांत व सहिष्णुता या गुणांबद्दल ते लिहितात, एका दृष्टीने त्यांच्या धर्मासारखा दुसरा धर्म नाही. परधर्माच्या लोकांनी हिंदू व्हावे अशी या धर्माची बिलकूल इच्छा नाही…तथापि जोपर्यंत दुसर्‍या लोकांची डोकी धर्मवेडांनी भणभणून गेलीआहेत तोपर्यंत त्यांच्याशी संबंध पडणार्‍या लोकांतहि धर्माभिमानाचे थोडेसे वारे असले पाहिजे, नाहीतर त्यांच्या हातून स्वधर्माचे संरक्षण व्हावयाचे नाही. हिंदू लोकांचा धर्माभिमान इतक्यापुरता आहे व तो श्लाघ्य आहे.
ख्रिस्ती मिशनच्यांनी चालविलेल्या धर्मांतराच्या उपद्व्यापांबद्दल ते लिहितात, ‘आम्ही चालू हिंदूधर्मावर कितीही तीक्ष्ण प्रहार केले तथापि आमचा देश ख्रिस्ती व्हावा ही नुसती कल्पनाही आम्हांस सहन होणारी नाही. आमच्यातील अतिशूद्र लोकांस आम्ही अगदी दूर टाकल्यामुळे त्यांची एकसारखी ख्रिस्ती धर्माकडे धाव चालू आहे….या लोकांस आम्ही जवळ घेऊ लागून त्यांचा तिकडील ओघ परत फिरेल तो सुदिन असे आम्हांस वाटत आहे!’
स्त्रियांना दिली जाणारी पाषाणहृदयी वागणूक, विधवा बालिकांविषयी अमानुष क्रूर रूढी, आपल्या दलित धर्मबांधवांची विटंबना पाहून ते व्याकुळ होऊन उपहासाने सवाल करतात, ‘भेकड प्रतिष्ठाखोर हिंदू लोकांनो, ज्या वेळेस पोर्तुगीज लोकांनी ख्रिस्ती धर्म स्थापण्यासाठी कोकणपट्टीत तुमचे अनन्वित हाल केले, त्यावेळेस तुमचा धर्माभिमान कोठे गेला होता? विषयलंपट नि:शक्त वाचाल बाबूंनो, महंमदीयांनी हिंदुस्थानच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत सार्‍या हिंदु लोकांस धर्मवेडाने जर्जर करून सोडले….तेव्हा धर्मरक्षणासाठी आताप्रमाणे तुम्ही नुसता आरडा तरी करावयाचा होता!…. धिक्कार असो तुम्हाला, तुमच्या धर्माला, आणि तुमच्या हक्काला!!’.
ही अवतरणे कोणाला अधिक वाटतील. पण खोडसाळपणाने केलेल्या दुष्ट आरोपांना दुसरे उत्तर कसे देणार!
आगरकरांना सर्वांगीण सुधारणा हवी होती. राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक हे भेद केवळ व्यवस्थेकरता आहेत असे ते मानत. व्यक्तिस्वातंत्र्याबद्दल सुधारकाच्या पहिल्याच अंकात ते म्हणतात, ‘समाजाचे कुशल त्यास अधिकाधिक उन्नतावस्था येण्यास जेवढी बंधने अपरिहार्य आहेत तेवढी कायम ठेवून बाकी सर्व गोष्टींत व्यक्तिमात्रास (पुरुषास व स्त्रीस) जितक्या स्वातंत्र्याचा उपभोग घेता येईल तितका द्यावयाचा, हे अर्वाचीन पाश्चात्त्य सुधारणेचे मुख्य तत्त्व आहे. ‘समाजपुरुष’ ही भाषा अलंकारिक आहे. समाज हा काल्पनिक पुरुष आहे. व्यक्तिमात्र हे अवयव समजणे बरोबर नाही. अवयवांना स्वतंत्र मन नसते. व्यक्तीला ते असते. व्यक्तीच्या हिताहून निराळे असे समाजाचे हित नाही. तेव्हा समाज म्हणजे त्यातील बहुतेक लोक असाच अर्थ घेतला पाहिजे अशी त्यांची विचारसरणी आहे.
व्यक्तिस्वातंत्र्य आणि समता स्वीकारली की सक्तीचे तत्त्व लयाला जाते. त्याची जागा संमतितत्त्व घेते. म्हणून आधुनिक युगात, राजा व प्रजा, कुलेश व कुलावयव, पति व पत्नी, मातापितरे व अपत्ये, स्वामी आणि सेवक, गुरू आणि शिष्य, विक्रेता आणि ग्राहक यांतील व्यवहार आणि संबंध उत्तरोत्तर बलात्काराने न होता, संमतिपूर्वक होत जाणारआहेत.
समाज कुटुंबांचा मिळून बनतो. आणि कुटुंबाचे मुख्य घटक स्त्रीपुरुष. तेव्हा कुटुंबांचा विचार करताना प्रथम स्त्रीपुरुषांमधील संबंधाचा विचार केला पाहिजे, असा त्यांचा आग्रह. आपल्या कुटुंबरचनेत केवढा अन्याय कायम करण्यात आला होता याकडे त्यांनी लक्ष वेधले. समाजाच्या खालच्या वर्गातील देखील स्त्रीला जी मोकळीक, ती उच्चवर्गातील स्त्रीला नव्हती. तिचा विवाह एकदाच शक्य होता. तोही अल्पवयात, बारा वर्षे वय होण्यापूर्वी. पुरुषाने कितीही वेळा लग्ने करावीत, किंवा एक बायको असताही अधिक बायका कराव्यात. यांच्या वर्गातील स्त्रीला काडीमोड घेण्याचा अधिकार नाही. विधवा झाली तर पुनर्विवाह नाही. बालविधवा झाली तरी सक्तीचे आजन्म ब्रह्मचर्य. त्यासाठी केशवपनासारख्या विद्रूप करणाच्या चाली. आणि पुरुषाला? पाऊणशे वय झाले तरी बोहल्यावर बसायची मोकळीक!
आगरकरांचे म्हणणे होते, पुरुषांना जे जे स्वातंत्र्य, हक्क आणि अधिकार आहेत ते सर्व स्त्रियांना दिले पाहिजेत, पुरुषांना दिले जाणारे शिक्षणच त्यांना द्यावे आणि तेही एकत्र. स्त्रीला व्यवसायस्वातंत्र्य असले पाहिजे. त्यामुळे कित्येक पुरुषांना घरी बसून मुले खेळविण्याचे, लुगडी धुण्याचे, भांडी घासण्याचे, स्वयंपाक करण्याचे, दळणकांडण करण्याचे काम करावे लागले तरी हरकत नाही, असे त्यांचे म्हणणे होते. संततिनियमनाचे कृत्रिम उपाय तेव्हा नव्हते. या संबंधाने पुरुषांकडून स्त्रियांवर जुलूम होतो असे त्यांना वाटे. ते म्हणतात, ‘स्त्रियांप्रमाणेच त्यांनाही कधीकधी प्रसूतिवैराग्य होण्याचा संभव असता, तर उभयतांच्या संयमाने बराच भूभार कमी होता. संततिनिरोधनाचे कृत्रिम उपाय असे काही असतात याची वार्ता मिळताच परदेशात वास करून ज्या उपायांचे तंत्र व मंत्र हस्तगत करणारा शिष्योत्तम पुढे आगरकरांना मिळाला. समाज-स्वास्थ्यकार रघुनाथ धोंडो कर्वे यांनी या उपायांचा पुरस्कार आणि प्रसार आगरकरांच्या इतकाच प्राणपणाने केला हे आज सर्वविदित आहे.
आगरकरांच्या कार्याची ही व्याप्ती ठाऊक असूनही जर त्यांना कोणी फक्त ब्राह्मणी सुधारक असा शिक्का मारत असतील तर अशा जन्मांधांना सूर्य कसा दाखवणार?
आगरकरांना अभिप्रेत असलेल्या अनंत सुधारणांपैकी निदान बालविवाहाची तेवढी एक तरी करून दाखवा आणि आगरकरांना संपले असे खुशाल म्हणा, असे आम्हाला वाटते. हा त्यांचा अभिप्राय घ्याः ‘बालविवाहांचे खंडन म्हणजे स्वयंवराचे मंडन…जी स्वयंवरे नाहीत त्या सर्वास आम्ही बालविवाहच समजतो!’ ज्याचे त्याने लग्न करणे म्हणजे स्वयंवर! एकाचे दुसर्‍याने करणे म्हणजे बालविवाह. स्त्रियांना स्वतःच्या पैशाचा इच्छेनुसार विनियोग करण्याचे स्वातंत्र्यदेखील आम्हाला देववत नाही, आणि म्हणे आगरकर संपले!. टिळकांचे म्हणणे असे की, इंग्रजी शिक्षण मिळालेले बहुतेक सुशिक्षित लोक सामाजिक प्रश्नांवर विचार करू लागले आहेत. व्यापारउदीम, नोकर्‍या, प्रवास या कारणांनी जातिबंध आपोआप सैल होत आहेत. विज्ञानाच्या प्रसाराने वेडगळ धर्मसमजुती जातील. उगाच लोकांना का दुखवा?
जे बदल झाले ते कसे झाले? लोकसंख्या वाढली. एकत्र कुटुंबे फुटली. गरजा वाढल्या. महागाईचा पाठलाग संपतच नाही. स्त्रियांना घराबाहेर पडणे जरूर झाले. नोकरी पाहिजे तर शिकणे आलेच. चरितार्थसंपादक शिक्षण हवे म्हणून विवाहाचे वय वाढले. लग्नाच्या बाजारात उठाव व्हावा यासाठी लहानमोठ्या नोकर्‍या आल्या. पण हे सगळे परिस्थितिशरण होऊन. प्रवाहपतितासारखे झाले.
आगरकरांची पद्धत विवेकाची आहे. बुद्धिप्रामाण्याची आहे. त्यांची मागणी समतेची आहे, व्यक्तिस्वातंत्र्याची आहे. स्वसंमतीची आहे. ती पटल्यामुळे या सुधारणा झाल्या असत्या तर वधूपरीक्षा बंद झाली असती. वरदक्षिणा अदृश्य झाली असती. हुंडाबळी गेले नसते. वरसंशोधन, मानापमान मान्य करण्यात स्त्रीचे दुय्यम स्थान आपण पक्के करत असतो. आपल्याला हे कळत नाही, वळतही नाही आणि वरून खुशाल म्हणायला तयार की ‘आगरकर संपले!’
साधी गोष्ट आहे. राजकारण्यांना मतांचे गठ्ठ बांधायला सोपी ठरणारी जातपात अजून का जात नाही? मग आगरकर इतिहासजमा कसे होतील?
श्री. गर्ग्यांनी समालोचनात या मुद्द्यांचा परामर्श घेतला आहेच. आगरकर स्वप्नाळू आशावादी नव्हते, पण ते निराश कधीच झाले नाहीत. या गोष्टीकडे आवर्जून लक्ष वेधले आहे. त्यांचा आत्मविश्वास तपःपूत होता यात काय संशय? एरवी ते असे का म्हणते की, ‘कोणतेहि आचार घालण्यास पूर्वीच्या ऋषींस जितका अधिकार होता तितकाच आम्हांसही आहे….बर्‍यावाईटांसाठी निवडानिवड करण्याची जितकी बुद्धि त्यांना होती तितकी किंवा तीहून अधिक आम्हांसहि आहे. अनुजांसाठी त्यांचे अंतकरण जितके कळवळत होते, तितके किंवा त्याहून अधिक आमचेही कळवळत आहे, सृष्टिविषयक व तत्कर्तृत्वविषयक ज्ञान जितके त्यांस होते तितके किंबहुना त्याहून बरेच अधिक ज्ञान आम्हास आहे. सबब त्यांनी घालून दिलेल्या नियमांपैकी जेवढे हितकारक असतील तेवढ्यांचेच आम्ही पालन करणार, व जे अपायकारक असतील ते टाकून देऊन त्यांचे जागी आम्हास निर्दोष वाटतील असे नवीन घालणार.’
आणि त्यांची जिद्द तरी कशी? हिंदुधर्माला नावे ठेवण्यापेक्षा सुधारकांची वेगळी जात का करत नाही या सनातन्यांच्या प्रश्नावर त्यांचे उत्तर असे की, ‘सुधारकां’चे प्रयत्न केवळ त्यांच्या सुखापुरते असते तर तुम्हांपासून वेगळे होण्यास तुमच्या ग्रामण्याची त्यांनी वाटच पाहिली नसती. परंतु समाजसुधारणा ही त्यांस स्वतःच्या सोईहून अधिक महत्त्वाची वाटत असल्यामुळे तुम्हांस सोडल्यावर त्यांनी सुधारणा करावी तरी कोणाची?’ याच जिद्दीने ‘टाकांतून अर्थबोधक अक्षरे काढण्याचे सामर्थ्य असेल व ती वाचण्यास निदान एक इसम तयारअसेल, तोपर्यंत लिहिण्या’चा बाणा घेऊन आगरकरांनी दिलेल्या विचारधनाचे मोल आज तर आम्हाला आहेच पण पुढेही निरंतर राहणार आहे. आगरकर कधीच इतिहासजमा होणार नाहीत!

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.