पुस्तक परिचय

गोपाळ गणेश आगरकर, ले.- स.मा. गर्गे, प्रकाशक – नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया, ए-5 ग्रीन पार्क नवी दिल्ली ११० ०१६, किमत रु. २३.००, पृष्ठंख्या १५० + १०
आपल्या देशात जे अनेक थोर लोक होऊन गेले त्यांचा परिचय करून देण्यासाठी पुस्तके प्रकाशित करणे ही आपली जबाबदारी आहे असे चांगले प्रकाशक समजतात. त्यासाठी ते अशी पुस्तके अभ्यासू लेखकांकडून लिहवून घेतात, आणि सुबक अशी पुस्तके वाचकांच्या हाती देतात. गोपाळ गणेश आगरकर हे छोटेखानी पुस्तक अशाच पुस्तकांपैकी एक आहे. चरित्रनायकाच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी, त्याच्या कार्याचा वा व्यक्तिमत्त्वाचा एखादा उपेक्षित पैलू वाचकांच्या नजरेस आणून देण्यासाठी लिहिलेला हा ग्रंथ नाही. हे एक साधेसुधे परिचयात्मक पुस्तक आहे. त्यामुळे आगरकरांच्या जीवनाचा अल्पसा आलेख आणि त्यांच्या विचारांचे दर्शन घडविणारे अनेक वर्गीकृत उतारे असे पुस्तकाचे स्वरूप आहे. लेखकाचे स्वतःचे वेगळेपण जाणवावे असे त्यामध्ये फारसे काही नाही. लेखकाला त्यासाठी फारसा वावच नाही.
आगरकरपूर्व महाराष्ट्राची स्थिती कशी होती, प्रबोधनाची गरज त्या काळच्या लोकांना कशी जाणवू लागली होती, हे त्यांनी प्रारंभी सांगितले आहे. बाळशास्त्री जांभेकर हे महाराष्ट्रामधले आद्य पत्रकार. त्यांच्या वाट्याला एकूण आयुष्य अवघे ३६ वर्षांचे आले. त्यामध्ये २२ व्या वर्षी त्यांनी पहिले मराठी पाक्षिक दर्पण सुरू केले. त्यांनी आणि लोकहितवादी, महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे ह्यांनी एकूणच प्रबोधनाच्या कार्याला हातभार कसा लावला व आगरकरांना त्यांच्या पूर्वी होऊन गेलेल्या प्रबोधनकारांच्या कार्याचा लाभ कसा झाला ते लेखकाने सांगितले आहे.
लेखकाने केलेल्या वर्णनावरून आगरकरांच्या वैयक्तिक जीवनामध्ये त्यांच्या प्रखर अशा बुद्धिमत्तेचा वाचकाला आढळ होतो, तसेच त्यांना त्या काळच्या एकूण दारिद्र्यामुळे आणि त्यांच्या वाट्याला आलेल्या विपरीत परिस्थितीमुळे किती कष्ट सोसावे लागले त्याचे हृदयस्पर्शी दर्शन होते, आणि आगरकरांच्या व्यक्तिमत्त्वाची घडण कशी झाली असावी त्याची थोडी कल्पना येते. पुस्तक प्रकाशकाने पृष्ठसंख्येची मर्यादा प्रारंभीच लेखकाला घातली असावी. त्यामुळे प्रत्येक भाग त्याला थोडक्यात आटोपता घ्यावा लागला आहे असे वाटते. आगरकरांच्या सार्वजनिक जीवनामध्ये त्यांचे केसरीचे संपादकत्व अतिशय महत्त्वाचे आहे. वयाच्या पंचविशीत टिळक-आगकरांनी तीन उपक्रम सुरू केले. त्यांनी पहिल्याने न्यू इंग्लिश हायस्कूलची स्थापना केली. वर्षभराने दोन वर्तमानपत्रे मराठा व केसरी ही सुरू केली. आणि तीन वर्षांनी फर्ग्युसन कॉलेजची स्थापना करण्यात आली. ह्या घटनांमुळे महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलण्यास कशी सुरुवात झाली, आगरकर टिळकांच्या कारावासामुळे एकूणच राजकीय कैद्यांकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन कसा बदलला ते लेखकाने थोडक्यात मांडले आहे, आणि केसरी सोडून वेगळे सुधारक साप्ताहिक प्रकाशित करण्याची निकड त्यांना भासल्यामुळे त्यांनी ते सुरू केले त्याचा वृत्तांतही लेखकाने दिलाआहे.
आगरकरांच्या वैचारिक जीवनाची तीन वेगवेगळी दालने करून त्यांनी ह्या भागात त्यांच्या लेखनाचे बरेच उतारे दिले आहेत. त्यावरून त्यांच्या विचारसंपदेशी वाचकाचा परिचय होतो. आगरकर म्हणजे समाजसुधारणा हे समीकरण दूर करण्याएवढे त्यांचे राजकीय आणि आर्थिक विषयांवरील विचार श्री गर्ने ह्यांनी उद्धृत केले आहेत. तसेच आगरकरांची जीवनमूल्ये आणि समालोचन ही शेवटची दोन प्रकरणे व्यक्तिमहात्म्याच्या आहारी न जाता लिहून त्यानी आपल्या तटस्थपणाचा परिचय करून दिला आहे.
पुस्तकाचे मुद्रण मात्र सदोष आहे. ‘दुष्प्राप्य’ सारखे शब्द ‘दृश्यप्राप्य असे छापले गेले आहेत. कोठे ‘तात्कालिक’ चे ‘तत्कालीन झाले आहे, ‘मुद्रणकले’च्या ऐवजी ‘मुद्रण केलेल्या’ असेही छापले गेले आहे. पण मुख्य म्हणजे पान ३७-३८-३९ वर एकूण सहा परिच्छेदांचा मजकूर हुबेहूब त्यातील चुकांसह पुन्हा छापला गेला आहे.
पुस्तक पूर्ण जुळविले गेल्याशिवाय सूची करता येत नसते. कारण सूचींमध्ये पृष्ठांक द्यावयाचे असतात. त्यासाठी सूचीकाराला प्रत्येक पान बारकाईने वाचावे लागते. इतका दीड दोन पानांचा मजकूर दोनदा जुळविला गेल्याचे त्यावेळी सूचीकाराला समजले नसेल तर त्याकडे सावधानतेने काम न केल्याचा दोष येतो. तो कोणत्याही परिस्थितीत क्षम्य नाही. प्रकाशकाला तो मजकूर गाळणे शक्य नसेल तर त्याने निदान शुद्धिपत्र जोडून दिलगिरी व्यक्त करावयास हवी होती. नॅशनल बुक ट्रस्ट सारख्या मातबर प्रकाशन-संस्थेने प्रकाशित केलेल्या पुस्तकाची ही अवस्था मराठी प्रकाशनव्यवहाराच्या एकूण परिस्थितीच्या अधोगतीचा परिचय करून देण्यास पुरेशी आहे. शुद्धमुद्रण हा वाचकाचा अधिकार आहे. शुद्धलेखनाच्या प्रचलित नियमांप्रमाणे जुने उतारे न छापता ते त्या त्या काळच्या पद्धतीप्रमाणे छापले पाहिजेत ह्याकडेही मुद्रकांचे दुर्लक्ष होत आहे. अशुद्ध मुद्रणासाठी प्रकाशकांना काय शासन करावे ह्याचा आम्ही सर्वांनी एकत्रित विचार करण्याची गरज आता निर्माण झाली आहे, असे प्रस्तुत पुस्तक वाचून मनात आल्यावाचून राहत नाही.

पुस्तक परिचय
संवाद, विद्या बाळ, रोहन प्रकाशन, १९९२, पुणे ४११ ०३८, किं. रु. ५०/
आठ वर्षांपूर्वीच्या शोध स्वतःचा या पुस्तकानंतर विद्या बाळ यांनी वेगवेगळ्या ठिकाणी लिहिलेल्या लेखांचे संकलन नुकतेच ‘संवाद’ या नावाने प्रकाशित केले आहे. स्त्रीमुक्तीचा विचार जनमानसाच्या पचनी पडावा यासाठी संवाद हेच सर्वाधिक परिणामकारक साधन असल्याबद्दल लेखिकेची खात्री पटली आहे. म्हणून त्यांनी आपले हे विचार हलक्या फुलक्या शैलीत, संवादाच्या अंगाने व्यक्त केले आहेत. यामध्ये आर्जव आहे, आग्रह नाही. स्त्री-मुक्ती चळवळीत सामील झाल्यानंतर लेखिका जगाचे अनुभव अधिक सजगपणे घेऊ लागली. त्या संपन्न दृष्टीमध्ये इतर वाचकांना सहभागी करून घेण्यासाठी या पुस्तकांचा प्रपंच केला आहे.
संवाद
स्त्रीमासिकाच्या संपादिका म्हणून काम करीत असताना त्यांना वेगवेगळ्या वयाच्या स्त्री-पुरुषांची वेगवेगळ्या विषयांवर पत्रे येत. स्त्रीमधील पुरोगामी विचारांचा परिचय झालेल्या वाचकांनी ती मते आचरणात आणतांना आलेले अनुभव व अडचणी त्यांना लिहिलेल्या पत्रांमधून व्यक्त केल्या, आणि या पत्रांना उत्तरे देण्याच्या निमित्ताने त्यांनी स्त्रीच्या इतर वाचकांशीही संवाद साधला. अशा २८ पत्रोत्तरांचे संकलन त्यांनी संवाद या नावाने पुस्तकांच्या सुरुवातीसच दिले आहे. यात कधी घरकामात नवर्‍याची मदत न घेणार्‍या बाईची समजूत घालणे आहे, तर कधी मारणार्‍या नवर्‍याला विरोध करणारीची पाठ थोपटली आहे. हुंडा, बुवाबाजी यांविरुद्ध लढणार्‍यांचे किंवा लढू पाहणार्‍यांचे कौतुक केले आहे. एका पत्रात एका सुशिक्षित मध्यमवयीन व्यापार्‍याने एक प्रिय मैत्रीण मिळवून देण्याची विनंती केली आहे. एका भाग्यवतीने नवर्‍याच्या जवळ असून दूर असल्याची व्यथा वर्णन केली आहे, तर एका पत्रात बायकोच्या ऑफिसमध्ये येऊन तिच्या थोबाडीत मारणारा नवरा वागवल्याबद्दल तिला समज दिली आहे. काही ठिकाणी त्या पत्रलेखकांना मार्गदर्शन करतात, तर काही ठिकाणी त्यांचे दुःख समजून घेऊन नुसताच दिलासा देतात.

परदेशातील स्त्रीमुक्ती
जागतिक महिला परिषद, फेमिनिझमचा अभ्यासक्रम, इ. निमित्तांनी केलेल्या परदेशवार्‍यांचे अनुभव त्यांनी ‘शिकण्याशिकवण्याच्या नाना परी’, ‘आदिम निःशब्दता झुगारतांना’ आणि ‘जपून ठेवलेला आठ मार्च’ या लेखांमध्ये दिले आहेत. तिथल्या अनुभवांचे मोल दोन परीचे आहे. एक म्हणजे ज्या मोकळेपणाचा अनुभव आपल्या देशातील स्त्रिया घेत नाहीत आणि स्वतःला निरर्थक बंधनांमध्ये अडकवून घेतात, तो मोकळेपणा लेखिकेला दुसर्‍या देशांमध्ये अनुभवायला मिळाला आणि पुढे त्यांची जन्मभराची शिदोरी ठरला. नैरोबीच्या विमानतळावर स्त्रियांनी दिलखुलास आलिंगन देऊन केलेले एकमेकींचे स्वागत, ससेक्स विद्यापीठातील विविधदेशी विद्यार्थी, मित्र आणि प्राध्यापक यांच्याबरोबर केलेल्या मनमोकळ्या चर्चा, मेजवान्या आणि नाटुकली, ब्रायटनमधील आठ मार्चच्या कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या देशातल्या स्त्रियांनी साड्या नेसून एका व्यासपीठावरून म्हटलेले,
या देशाच्या आयाबायांना
सांगाया जायाचं एक करून
ह्यो तुरुंग फोडायचा हाय ग!
हे गाणे ही त्याची उदाहरणे.
त्यांच्या अनुभवांचे दुसरे महत्त्व हे की स्त्रियांच्या ज्या प्रश्नांना, आपण आपल्या देशापुरतेच समजून संकुचित स्वरूप देतो ते वास्तवात विश्वव्यापी आहेत हे आपल्याला समजते आणि त्यामधून त्याविरुद्ध लढण्याचे बळ प्राप्त होते. अशा समस्यांना तोंड देणार्‍या अनेक व्यक्ती या पुस्तकात आपल्याला भेटतात. उदा. आपल्या मुलांच्या तोंडी घास भरवण्यासाठी स्वतःचे शरीर विकणारी आणि ते जाहीरपणे स्वतःच्या तोंडाने सांगणारी ऑस्ट्रेलियन महिला, ‘माझं घर’ या निबंधात बाबा नसलेल्या घराचं खरेखुरे वर्णन करणारी आणि शिक्षिकेने तो निबंध वाईट ठरवल्यावर हिरमुसणारी आफ्रिकेतील छोटीशी मुलगी, आणि नवर्‍याच्या मारहाणीने मेलेली इस्रायलमधील बाई व ‘ती मरेल असं मला वाटलंच नाही, कारण तिला माझा मार खाण्याची सवय होती’ असे म्हणणारा तिचा नवरा.
‘आदिम निःशब्दता’ झुगारताना मध्ये लेखिकेने ‘Breaking the Silence’ या चित्रपटाचा उल्लेख केला आहे. मुलींना लहान वयातच त्यांच्या घरातल्या जवळच्या पुरुषांकडून त्यांचे शरीर वापरले जाण्याचा अत्यंत कटू अनुभव येतो. या आघाताने झालेल्या परिणामाचे ओझे वागवीतच त्यांना पुढचे आयुष्य व्यतीत करावे लागते. या भीतीचे अनेक अनिष्ट परिणाम होतात, पण याविषयी कुठेही बोलता येत नाही. ‘Breaking the Silence’ मध्ये ही आदिम निःशब्दता झुगारणार्‍या चार मुलींवरील प्रसंग चित्रित केलाआहे. सगळ्या देशांमधल्या आणि सगळ्या स्तरांवरील कुटुंबांमध्ये हे होत असते.
स्त्री-अत्याचाराचे कारण त्यांचे आर्थिक परावलंबन असल्याचे मानले जाते. परंतु Women of the World-Fancy and Fact या नावाचा जागतिक पातळीवरचा अहवाल असे सांगतो की जगातील एक चतुर्थांश ते एक तृतीयांश कुटुंबामध्ये स्त्रियाच पूर्ण आर्थिक जबाबदारी उचलतात आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे.
भारतातील स्त्री-मुक्ती
बायका जास्त बोलतात हे खरे, पण जे बोलायला पाहिजे ते बोलत नाहीत, कारण एकतर त्यांना खरे बोलायची सवय नसते, आणि त्यासाठी आश्वासक वातावरण नसते. पण आजच्या महिलामंडळांचा आपल्याला तसा उपयोग करून घेता येईल. त्यातून स्वतःच्या अनुभवांचा अर्थ लावता येईल आणि आपल्या वर्तनाचा व स्वभावाचा शोध घेता येईल असा विचार त्यांनी महिला मंडळ नव्या जाणिवांचं केंद्र’ या लेखामध्ये व्यक्त केला आहे. ‘सौंदर्य-संकल्पनांची सक्ती’ यामध्ये पुरुषांच्या मापदंडाने स्वतःच्या सौंदर्याचे मोजमाप – करणार्‍या आणि पुरुषांना उपभोग्य असे सौंदर्य जोपासणार्‍या स्त्रियांच्या मानसिकतेचा धिक्कार केला आहे आणि स्वतःच्या कर्तृत्वावर आधारलेले स्वतःचे स्थान निर्माण करण्याचे आवाहन केले आहे. हळदीकुंकू हा सुवासिनी ही महन्मंगल संकल्पना कुरवाळणारा समारंभ. सुवासिनी म्हणजे नवरा जिवंत असलेली आणि त्याच्याबरोबर राहणारी स्त्री. असे असण्यात खरे तर तिचे कर्तृत्व काहीच नाही आणि ज्या तशा नाहीत त्यांचाही त्यामध्ये गुन्हा काहीच नाही. ‘हळदीकुंकवाला रामराम’ या लेखात असे स्त्रियांमधील जातिभेद जोपासणारे समारंभ सोडून देण्याचे आवाहन केले आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.