अपत्यांनी मातापितरांचे कृतज्ञ राहावे?

पुष्कळ अविचारी आईबापे आपणास प्रतिपाल न करण्याइतकी संताने अस्तित्वात आणतात आणि उपजल्यापासून मरे तोपर्यंत त्यांचे जीवित शुद्ध दुःखभार करून ठेवतात ……अशा आईवापांच्या अंतःकरणात खरे अपत्यवात्सल्य असते तर त्यांनी असली संतती जगात आणलीच नसती. कित्येक लोक असे म्हणतात की मुले होणे ही काही कोणाच्या हातची गोष्ट नाही. नसेल बापडी! पण आम्हांस येवढे ठाऊक आहे की जरी प्रत्येक लग्न अपत्यावह होतेच असे नाही, तरी लग्नावाचून, म्हणजे स्त्रीपुरुषांच्या संयोगावाचून अपत्योत्पत्ती होते असे नाही. पावसाप्रमाणे मुले आकाशातून पडत असती….तर आईबापांचे निःसीम आणि निर्व्याज प्रेम आणि त्याबद्दल मुलांची कृतज्ञता यांचे खरे महत्त्व कोणाच्याही मनात बरोबर उतरले असते. मुले अस्तित्वात आणणे यात मुलांवर आईबाप कोणता उपकार करतात हे समजणे थोडे कठीण आहे. जन्माच्या आधीची स्थिती कष्टमय असती, आणि तीतून मुक्त होण्याकरिता मुले आईबापांकडे प्रार्थना करण्यास येती, आणि आईबापे त्यांची विनंती मान्य करून आपल्या संयोगामुळे त्यांस त्या कष्टावस्थेतून मुक्त करती, तर त्यांच्या हातून मुलांवर मोठे उपकार होते खरे! पण वास्तविक तसा प्रकार नाही ….तात्पर्य, अन्य कारणामुळे घडलेल्या संयोगापासून अस्तित्वात आलेल्या संततीचा, केवळ जन्म दिला येवढ्याच मुद्द्याच्या आधाराने कृतज्ञतेवर म्हणण्यासारखा हक्क शाबीत करता येत नाही!

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.