संपादकीय

डॉ. रूपा कुळकर्णी ह्यांच्या धर्मान्तरामुळे श्रीमती दुर्गा भागवत ह्यांनी आमचे वर्गणीदार न राहण्याचे ठरविले आणि त्यांनी तसे आम्हाला कळविले. त्या निमित्ताने लिहिलेल्या आमच्या संपादकीयामध्ये (नोव्हें.-डिसें.९२) आमची जी इहवादविषयक भूमिका व्यक्त झाली आहे तिच्याबद्दल अधिक खुलासा मागणारी वा मतभेद व्यक्त करणारी जी पत्रे आली त्यांपैकी डॉ. आ.ह. साळुखे व श्रीमती सुनीता देशपांडे ह्यांची वेगळी नोंद घेऊ. त्या पत्रांतील काही मुद्दे अन्तर्मुख करणारे आहेत.
डॉ. आ. ह. साळुखे ह्यांच्या पत्रातील मुद्द्यांबद्दल पहिल्याने लिहितो. ते म्हणतात “डॉ. कुळकर्णी ह्यांना राजीनामा देण्यास सुचविणे अनुचित होते, ह्याची जाणीव आपणास झाली आहे ही गोष्ट समाधानाची असली, तरी आधी तसे सुचविल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणे, हे आपले कर्तव्य ठरते.”
त्यांच्या पत्रातील महत्त्वाचा भाग पुढे सविस्तर उद्धृत करीत आहोत.
मी अपल्या बहुतांश विचारसरणीवद्दल मनापासून आदर बाळगणारा मनुष्य आहे. परंतु आपली डॉ. रूपा कुळकर्णीच्या बाबतीतील भूमिका अत्यन्त क्लेशकारक आहे हे नमूद करणे भाग आहे. डॉ. कुळकर्णी ह्यांनी राजीनामा द्यावा असे आपण अप्रत्यक्षपणे सुचविल्याचे डॉ. कुळकर्णी ह्यांनी म्हटले असून तसे सुचविल्याचे आपण नाकारलेले नाही. तेव्हा, आपण त्यांना तसे सुचविले होते, हे गृहीत धरूनच मी ही प्रतिक्रिया देत आहे.
“डॉ. कुळकर्णी ह्यांनी राजीनामा देण्याचे कारण उरले नाही, असे आपण आता म्हणत आहात. ह्याचा अर्थ त्यांना राजीनामा देण्यास सुचविणे अनुचित होते, ह्याची जाणीव आपणास झाली आहे. ही गोष्ट समाधानाची असली, तरी आधी तसे सुचविल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणे, हे आपले कर्तव्य ठरते. ह्या दिलगिरीमुळे आपणाला कोणताही कमीपणा येणार नाही. उलट आपली विवेकवादाची भूमिका उजळूनचनिघेल, असे मला वाटते.
“ह्या बाबतीत आपण काहीशी धरसोड वृत्ती दाखविलीत असे म्हणणे भाग आहे. डॉ. कुळकर्णी ह्यांनी धर्मांतर करणे हे जर आपल्या मासिकाच्या धोरणाशी विसंगत होते, तर आपण धर्मान्तरानंतर लगेचच त्यांना राजीनामा द्यावयास सांगावयाला हवे होते. पण सल्लागार मंडळाच्या सदस्याकडून शंभर टक्के बांधीलकी अपेक्षित नसल्यामुळे आपण तसे केले नाहीत. ह्याचा अर्थ आपण त्यांच्या बाबतीत विचारपूर्वक एक निर्णय घेतला होता. खरे तर हा निर्णय योग्य होता आणि आपण त्यालाच चिकटून राहावयाला हवे होते. परंतु श्रीमती भागवत ह्यांच्या पत्राने कोणताही नवा पैलू पुढे आलेला नसताना त्यांच्या पत्रानंतर आपण स्वतःचाच हा निर्णय बदललात आणि डॉ. कुळकर्णीना राजीनामा देण्याविषयी सुचविलेत. त्यानंतर डॉ. कुळकर्णीचे पत्र आले. त्यांनी उपस्थित केलेले अनेक मुद्दे आपणास मान्य नाहीत. तरीही आपण आपला निर्णय मात्र पुन्हा बदललात आणि त्यांनी सल्लागार राहावे, असे सुचविलेत. येथेही डॉ. कुळकर्णीच्या पत्रामुळे एखादा नवा मुद्दा पुढे आला म्हणून आपण निर्णय बदललात असे नव्हे, तर सल्लागार मंडळाच्या सदस्यांकडून पूर्ण बांधिलकी अपेक्षित नाही ह्या मूळच्यातत्त्वाला अनुसरूनच आपण हा निर्णय बदललात. ह्याला धरसोड नाही तर काय म्हणावयाचे? ह्या संदर्भातील आपल्या विधानात आलेला ‘उरले’ हा शब्द अनावश्यक आहे. बौद्धिक पातळीवरून उत्तम सिद्धान्त मांडणाच्या व्यक्तींना व्यवहारात त्या सिद्धान्तांच्या आधारे संघर्ष करण्याचा प्रसंग आला, की काही वेळा त्या विचलित होतात. अन्यथा, सल्लागार मंडळाच्या सभासदाकडून कोणत्या अपेक्षा करावयाच्या ह्याविषयीचा सिद्धान्त सुस्पष्ट असताना श्रीमती भागवतांच्या पत्रामुळे आपण निर्णय बदलला नसता. हे आपला अवमान करण्यासाठी वा बौद्धिक कार्याला कमी लेखण्यासाठी लिहीत नाही. ते कार्यही फार फार महत्त्वाचे आहे. पण संघर्षाच्या रणभूमीवर विचलित झाल्यास त्या कार्यावर मर्यादा पडतात, हे उघड आहे. आपण ह्या धरसोड वृत्तीने डॉ. कुळकर्णीना विनाकारण अपमानित केलेत. या खेरीज काय साधलेत?…….।
एखाद्या मुद्द्यावर मतभेद झाला तर संबंधच तोडून टाकावेत, ह्याला मी विवेक मानत नाही. स्वाभाविकच आपण धर्मान्तराचे निमित्त करून आपल्या एका सल्लागाराला राजीनामा द्यावयास सुचविले, म्हणून मी आजचा सुधारकचा वर्गणीदार राहणार नाही, असे मी म्हणणार नाही. स्वतःच्या भूमिकेशी तंतोतंत जुळेल अशी भूमिका घेणार्याीशीच संबंध ठेवावयाचे असे म्हटले तर माणसाला आत्महत्याच करावी लागेल. कारण आपल्याखेरीज इतर व्यक्तींचे सोडाच, पण आपली स्वतःची एक वेळची भूमिका दुसर्याल वेळी तशीच राहील असे नाही. मग पूर्वी वेगळी भूमिका घेतलेल्या स्वतःच्या व्यक्तित्वाशी तरी नाते कसे ठेवावयाचे, हा प्रश्न खचितच निर्माण होईल. अंधश्रद्ध लोकांशी तडजोड करावी असे मी मुळीच म्हणणार नाही. परंतु विवेकवादाच्या मार्गावरील वाटचाल करताना आपल्याबरोबर कोणी राहणारच नाही असा माणूसघाणेपणा करणारे लोक समाजाला अंधश्रद्धेच्या अंधारातून बाहेर काढून विवेकाच्या प्रकाशाकडे घेऊन जाऊ शकतील काय? अखेर विवेकवाद हेही व्यापक मानवी कल्याण साधण्याचे साधनच आहे ना? की ते स्वयंपूर्ण आणि मानवनिरपेक्ष असे साध्य आहे? विवेकवादाची परिणती व्यक्तिगत अहंकार कुरवाळण्यात आणि आपल्या स्वतःच्या विवेकवादालाच शुद्धतम समजून आपल्याच दिशेने निघालेल्या इतरांना तुच्छ लेखण्यात होणार असेल, तर अशा तथाकथित विवेकवादी व्यक्तीदेखील धर्माध व्यक्तींइतक्याच अविवेकी होत, असे मला वाटते……”
डॉ. रूपा कुळकर्णी ह्यांनी धर्मान्तर केल्याची बातमी वर्तमानपत्रात आल्यावर खरे पाहता आम्हा सर्वांना धक्काच बसला. स्थूलमानाने समविचारी जी मंडळी असतात त्यांमधल्या एकाने घेतलेला इतका महत्त्वाचा निर्णय वर्तमानपत्रातून वाचावयास मिळावा ह्याचा तो धक्का होता. धर्मान्तर करण्याचा अधिकार जरी राज्यघटनेने सर्वांना दिलेला असला तरी स्नेही मंडळींनी (त्यातही जी आजचा सुधारक ह्या एका विशिष्ट धोरणाच्या मासिकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने एकत्र आली आहेत त्यांनी) एकमेकांशी न बोलता इतके मोठे निर्णय परस्पर घेऊ नये असे अंधुकपणे कोठेतरी मनात असल्यामुळे हा धक्का बसला, व त्यामुळे त्या संदर्भात अशा तर्हेहने प्रकट धर्मान्तर करणाराचा निषेध करण्याचा वा त्या अनुषंगाने त्या व्यक्तीला राजीनामा मागण्याचा विचार आमच्या मनात डोकावून गेला, इतकेच नव्हे तर ,दुर्गाबाईंचे पत्र आल्यानंतर डॉ. रूपा कुळकर्णी ह्यांनी राजीनामा दिल्याने सारे प्रश्न सुटतील असा एक मोहदेखील झाला हे आम्ही अमान्य करीत नाही.
राजीनामा मागण्याचे औचित्य वा अनौचित्य ह्याविषयीचा विचार, संपादक मंडळाच्या व सल्लागार मंडळाच्या सभासदांच्या जबाबदार्यां मधील किंवा बांधिलकीच्या प्रमाणातील फरक हे सारे मागाहून सुचले. तोवर सारे सभासद समविचारी असल्यामुळे किंवा ते तसे आहेत असे गृहीत धरून चालल्यामुळे त्याची कधी गरजच पडली नव्हती. आमच्या वर्तनात जर काही विसंगती आली असेल अथवा धरसोड झाली असेल, तर ती ह्या साध्या कारणांमुळे. कोणाचाही अवमान करण्याचा आमचा कदापि हेतु नव्हता.
डॉ. साळुखे ह्यांचे ह्या खुलाशाने समाधान होईल अशी आशा आहे. त्यांचे आणखीही एकदोन मुद्दे आहेत. पण ते आमच्याविषयीचे नसून दुर्गाबाईंशी संबंधित आहे. त्यामुळे त्यांचा ऊहापोह आम्ही येथे करीत नाही. फक्त येथे इतकेच म्हणतो की विसंगती आणि तत्त्वच्युती या दोषांपासून पूर्णपणे मुक्त असे फार थोडे. ही तत्त्वच्युती किरकोळ बाबींमध्ये झाली तरी ती तत्त्वच्युतीच हे खरे असले तरी क्षम्य तत्त्वच्युती कोणती आणि अक्षम्य तत्त्वच्युती कोणती ह्यांमध्ये विवेक केला पाहिजे. प्रत्येकाचे आचरण कसोटीच्यादगडावर बावन्नकस उतरणार नाही. दुसर्यााकडून अपेक्षा करताना किती टक्के सवलत द्यावयाची हे ज्याचे त्याने ठरवायचे असले तरी ती सवलत किरकोळ बाबींमध्येच दिली पाहिजे ह्याविषयी विवेकवादी मंडळींचे एकमत असावयास पाहिजे,
श्रीमती सुनीता देशपांडे ह्यांचे मुद्दे तडजोडीचे प्रमाण काय असावे ह्याविषयीचे आहेत. त्यांच्या पत्रातील महत्त्वाचा अंश पुढे उद्धृत करीत आहोत. त्या म्हणतात,
“विवेकवादी माणसे ही कोणत्याही धर्मात जन्माला आलेली असली तरी वयाने मोठी व समझदार झाल्यावर धर्माचे व श्रद्धेचे अविवेकित्व पटल्यामुळे मनातून धर्म मानीनाशी होतात असे सांगून त्यापुढे, अशी मंडळी व्यवहारात कोणत्या तडजोडी करतात त्याची काही उदाहरणे आपण दिली आहेत. सर्वसाधारणपणे असे मानले जाते की तडजोड ही तपशिलावर करायला हरकत नाही, तत्त्वावर करू नये. स्वतःला विवेकवादी म्हणविणार्यां नी तत्त्वावर तडजोड करणे क्षम्य नाही हे माझ्याप्रमाणेच आपल्यालाही मान्य असणार. ह्या पाश्र्वभूमीवर आपण ह्याच संपादकीयात पुढे जी तडजोडीची उदाहरणे दिली आहेत त्यांतील एक विधान मला खटकले. त्यासंबंधी हे पत्र.
(विवेकवादी माणसे) आपल्या मुलाचे लग्न नोंदणी पद्धतीने करतात आणि मुलांची मुंज करीत नाहीत. परंतु मुलीच्या लग्नात वरपक्षाकडील मंडळींनी आग्रह धरला तर वैदिक विधीने लग्न करतात. असे आपण म्हटले आहे. मला वाटते, हे विधान करतानाची आपली शब्दयोजना अनवधानाने तशी झाली असावी. त्याऐवजी ‘विवेकवादी माणसे आपल्या मुलामुलींची लग्ने नोंदणीपद्धतीने करतात आणि मुलांची मुंज करीत नाहीत. पण लग्नाच्या वेळी दुसरयाँ पक्षाने धार्मिक विधीचा आग्रह धरला तर त्यावरून लग्न मोडण्याऐवजी तडजोड करतात. त्याचप्रमाणे मुलांच्या मुंजी न करण्यावरून माता-पित्यांत मतभेद झाले तरीही तडजोडी करतात आणि शेवटी मुंजी करतात’ असे म्हणावयाला हवे होते. कारण आपल्याविधानावरून असा अर्थ निघतो की विवेकवादाला धर्मभेदावर आधारलेली समाजव्यवस्था मान्य नाही, पण लिंगभेदावर आधारलेली समाजव्यवस्था चालू शकते. वरपक्ष हा श्रेष्ठ आणि वधूपक्ष हा कनिष्ठ ही आजच्या पुरुषप्रधान समाजातली विचारसरणी विवेकवादाला अविवेकी वाटत नाही.
‘दुसरे असे की माणसाचा विवेकवाद हा त्याच्या विचारांत, मनात असला तर ते पुरेसे आहे, आचरणात उतरला नाही तरी चालेल असे मानायचे का’?कारण खर्या अर्थाने विवेकवादी माणसे मुळात मोजकीच आढळतात. त्यांच्या भोवतालची घरातली, परिवारातली, व्यवसायातली वगैरे बहुसंख्य माणसे ही त्या दृष्टीने सामान्यच असतात (म्हणजे विवेकवादी नसतात). अशा वेळी मतभेदाचे प्रसंग सतत येणार. तेव्हा संघर्ष नको म्हणून आपण तडजोडच करीत बसलो तर आपल्या विवेकवादाचा उपयोग काय? केवळ स्वतःचे बौद्धिक समाधान? आपल्या मुलामुलींच्या लग्नांत धार्मिक विधीला विवेकवादी व्यक्तीचा विरोध असेल. पण शेवटी निर्णय त्या वधूवरांनीच घ्यावा असा तिचा आग्रह राहील. तात्त्विक भूमिकेवर मतभेद होऊन ते लग्न मोडले, अगर आपापसांत तडजोड होऊन धार्मिक विधीला मान्यता दिली, तरी ते विवेकवादी व्यक्तीला मान्य असेल, कारण व्यक्तिस्वातंत्र्यावर तिचा विश्वास आहे. मात्र ते लग्न धार्मिक विधीने होणार असल्यास ती स्वतः त्या लग्नाला हजर राहणार नाही, त्या विधीत कोणताही भाग घेणार नाही. पण त्या लाग्नानंतर समजा उद्या कोणत्याही कारणाने त्या वधूवरांचे आपापसांत बिनसले आणि प्रकरण तडजोडीपलीकडे गेले तर त्या दोघांतली ज्याची बाजू न्याय्य आहे असे तिच्या विवेकवादी मनाला जाणवेल त्याच्या पाठीशी ती विवेकवादी व्यक्ती ठाम उभी राहण्याचे ठरवील.
विवेकवाद समजून घेण्यातच माझी काही गफलत होत आहे काय?”
ह्या पत्रातला मुद्दा तडजोड किती करावी, तिचे प्रमाण किती असावे हा आहे. त्याविषयी आम्हाला जे वाटते ते असे की धार्मिक विधीचे वैयर्थ दुसन्या पक्षाला समजावून देणाच्या जबाबदारीमधून विवेकवादी व्यक्तीची सुटका नाही. ते काम तिला केलेच पाहिजे. विवाहादींच्या बाबतीत मात्र ते वैयर्थ प्रतिपक्षाला समजलेच नाही तर तुटेपर्यंत ताणावयाचे कारण नाही. त्याला आज नाही तर उद्या समजेल अशी आशा धरून त्या विधींबद्दल अलिप्तपणा राखावा हे इष्ट.
मुंजीबद्दलचा निर्णय मात्र केवळ एकाच कुटुंबातल्या व्यक्तींशी संबंधित असल्याकारणाने तेथे विवेकवादी व्यक्तीची जबाबदारी जास्तच वाढते. तेथे तडजोड करण्याची पाळी सहसा कोणावरही येऊ नये. तेथे संघर्ष आम्हाला अटळ दिसतो. जेथे आपलेपणा जास्त तेथे एकमेकांकडून विवेकी वर्तनाचा आग्रहही जास्त धरणे आवश्यक मानले पाहिजे. एक पक्ष अजिबातच असमंजस असेल तरी त्यावर आपली मते लादण्याची मुभा कोणालाच नाही. येथे लिंगभेदावर आधारलेली समाजव्यवस्था व तज्जन्य विचारसरणी अर्थातच मान्य नाही.
संपादकांच्या भूमिकेबद्दल व आचरणाबद्दलच्या मुद्यांनाच फक्त प्रसिद्धी देण्याचे आणि त्यांचा परामर्श घेण्याचे सध्या ठरविले आहे. त्यामुळे व मूळ मुद्दा दूर राहण्याचीशक्यता जाणविल्यामुळे ह्या साध्या पत्रातील काही मजकूर गाळला आहे. पत्रलेखक आमच्यांशी ह्याबाबत सहकार्य करतील अशी अपेक्षा करतो.तसेच ह्या विषयावरील चर्चा पुढेही चालू राहणार अशी लक्षणे दिसत आहेत, म्हणून तूर्त येथे थांबू या.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.