चर्चा – ‘धारणात् धर्म इत्याहुः।’ – दुसरी बाजू

‘आजचा सुधारक’च्या नोव्हें-डिसें. ९२ च्या अंकात ‘धारणात् धर्म इत्याहुः ।’ ह्या शीर्षकाखाली प्रा. मा.गो. वैद्य यांच्या पुस्तकातील ‘धर्म’ कल्पनेला विरोध करणारा प्रा. दि.य. देशपांडे यांचा लेख आला आहे. प्रा. वैद्य धर्म म्हणजे religion नव्हे असे म्हणतात, तर प्रा. देशपांडे यांचा आग्रहअसा की गेली दीडशे वर्षे धर्म म्हणजे religion हेच समीकरण अस्तित्वात आहे.
इंग्रजी भाषेत ‘धर्म’ शब्दाला पर्यायी शब्द नसल्यामुळे त्याकरिता जवळचा असा इंग्रजी religion हा शब्द रूढ झाला आहे हे खरे आहे. परंतु धर्म शब्दातील संकल्पना religion च्या संकल्पनेहून वेगळी आहे हे जर कोणाच्या लक्षात आले तर त्याने तसे म्हणू नये काय?
धर्मशास्त्राचे विद्वन्मान्य अभ्यासक म.म. भारतरत्न डॉ. पां.वा. काणे यांनी लिहिलेल्या ६००० पृष्ठांच्या पंचखंडात्मक History of Dharmashastra ह्या ग्रंथात धर्म शब्दाचा ऊहापोह करण्यात आला आहे. १९६७ मध्ये ह्या ग्रंथाचा मराठी अनुवाद प्रसिद्ध झाला. त्यात ‘धर्म’ शब्दाबद्दल पुढील स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
“संस्कृत भाषेत असे काही शब्द आहेत की त्यांचा यथातथ्य अनुवाद दुसर्या कोणत्याही भाषेत करणे शक्य होत नाही. धर्म हा अशांपैकीच एक शब्द आहे.” (पृ.१) धर्म शब्दाच्या अर्थात झालेल्या निरनिराळ्या बदलांची चिकित्सा करून डॉ. काणे म्हणतात, “आर्यांच्या समाजाचा एक घटक ह्या नात्याने आणि विशिष्ट जातीची आणि एका विशिष्ट अवस्थेत असणारी व्यक्ती ह्या नात्याने एखाद्या मनुष्याचे अधिकार, त्याची कर्तव्ये आणि त्याच्या जबाबदार्‍याच” हा अत्यंत महत्वाचा अर्थ धर्म शब्दाला प्राप्त झाला. (पृ.२) हा अर्थ स्पष्टपणे ऐहिक आहे व तो प्रा. देशपांडे म्हणतात त्याप्रमाणे आत्ताच ‘कोणाच्या सुपीक डोक्यातून निघालेला’ किंवा कोणाला साक्षात्कार झालेला नसून विद्वत्तापूर्ण व सर्वंकष अध्ययनातून स्पष्ट झालेला आहे.
आज वंशभेद, जातिभेद इ. कल्पना कालबाह्य ठरल्यामुळे वर्तमानकाळाच्या संदर्भात व वरील अर्थाच्या अनुषंगाने समाजाचा घटक ह्या नात्याने म्हणजेच समाजधारणेच्या दृष्टीने उपयुक्त असा व्यक्तींचा आचार-विचार-समूह म्हणजे धर्म’ अशी धर्माची व्याख्या करता येईल. ‘संस्कृती ह्या शब्दाने श्री. वैद्य यांना हाच अर्थ अभिप्रेत आहे. प्रा. देशपांडे यांनी श्री. वैद्य यांच्या विवेचनातील संदर्भाने सूचित होणारा संस्कृती शब्दाचा अर्थ त्यावर इतर अर्थही लादून अगदी विकृत करून टाकला (reducioabsurdi) हा तर्कदोषच समजला पाहिजे. मात्र संस्कृति हा शब्द धर्म शब्दाला पूर्णतः पर्यायी नाही हे मान्य केले पाहिजे.
धर्माचा ‘गाढ संबंध मरणोत्तर अस्तित्व, ईश्वर इ. गोष्टींशी असतो असे प्रा. देशपांडे म्हणतात. परंतु हे विधान religion ला लागू आहे; धर्माला नाही. धर्म आणि मोक्ष हे दोन भिन्न पुरुषार्थ आहेत हे येथे लक्षात घ्यावयास पाहिजे. Religion चा हेतू मरणोत्तर सद्गती, मोक्ष, ईश्वरप्राप्ती इ. असतो व त्या हेतूने इहलोकाची कर्मे करावयाची असतात. ह्या दृष्टीने religion साठी संप्रदाय, पंथ ह्यासारखा एखादा शब्द रूढ करणे योग्य होईल. धर्माचा मुख्य हेतु मोक्षप्राप्ती नाही, तो ऐहिक आहे, समाजधारणा आहे. डॉ. काणे म्हणतात, “धर्मशास्त्राचा मुख्य हेतू मनुष्याच्या नित्य व्यवहारातील क्रिया चांगल्या रीतीने कशा कराव्या ह्यासंबंधी निर्बध सांगण्याचा आहे. (पृ. १०९) यावरून ‘धारणात् धर्म इत्याहुः।’ हेच धर्माचे खरे स्वरूप आहे व त्याला religion शी समव्याप्त मानल्यामुळे त्याबद्दल विकृत प्रतिमा निर्माण झाली आहे. भारतासारख्या धर्मप्रवण देशात धर्माला विरोध करून चालणार नाही असे आता साम्यवादी पक्षही म्हणू लागले आहेत. अशा स्थितीत धर्माला religion च्या जोखडातून काढून त्याच्या खच्या ऐहिक स्वरूपात प्रस्थापित केले तर ते सुधारणावादी पाऊल ठरणार नाही काय व त्याचे विवेकी माणसाने स्वागत करावयास नको काय?
धर्माला religion च्या जोखडातून काढावयाचे म्हणजे religion ला धर्मातून काढून टाकावयाचे असे नाही. धर्मात religion चा म्हणजे संप्रदायाचा अंतर्भाव होतो, कारण धर्म हा मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांचे नियंत्रण करणारा असा समाजधारणेला आधारभूत असलेला नियमसमूह आहे. धर्माने संप्रदाय (religion) नियंत्रित होतो. इस्लाम, ख्रिश्चॅनिटी यांत religion नेच सर्व व्यवहार नियंत्रित होतात, व पारलौकिक कल्याण हाच त्यांचा हेतू असतो. धर्मात समाजधारणेसाटी सर्व क्रिया करावयाच्या असतात आणि त्या योग्य रीतीने केल्यास त्याचे अतिरिक्त फलित पारलौकिक कल्याण असते. अभ्युदयनिःश्रेयसहेतुः। स धर्म:। ह्या व्याख्येच्या प्रारंभी ‘जगतःस्थितिकारणम्’ हे धर्माचे व्यवच्छेदक लक्षण दिले आहे हे येथे लक्षात घेतले पाहिजे. मोक्षप्राप्तीसाठी एखाद्याला संन्यास घ्यावयाचा असेल तर आधी आपल्या कुटुंबीयांच्या चरितार्थाची नीट व्यवस्था लावल्याशिवाय त्याला तसे करता येणार नाही हा धर्माचा दंडक ह्याचाच निदर्शक आहे. ग्राहकांचा योग्य वजन घेण्यादेण्याचा अधिकार शाबूत राहावा, त्यांची लुबाडणूक होऊ नये ह्या समाजधारणेच्या दृष्टीने धर्मकाट्याची व्यवस्था असते. त्यात पापपुण्याचा संबंध लावला तरी तो गौणच समजला पाहिजे. कमी अधिक प्रमाणात धर्मार्थ दवाखाना, धर्मार्थ पाणपोई यांतही धर्मकल्पनेनुसार हाच अर्थ अभिप्रेत आहे. रिलिजनवाल्यांचा मात्र त्यात वेगळा प्रमुख हेतू असू शकतो.
स्थूलपणे सर्व मानवजातीला सर्वकाळात उपकारक ठरणारे असे सत्य, अहिंसा इ. सिद्धान्त असू शकतात. त्यांना शाश्वत किंवा सनातन धर्म अशी संज्ञा आहे. त्यांना पूरक किंवा कार्यान्वित करणारे जे तपशिलाचे सिद्धान्त असतात व ज्यांचे स्वरूप कालानुरूप बदलू शकते त्यांना युगधर्म म्हणतात. अपवादात्मक परिस्थितीत त्यांना करावयाचे अपवाद यांना आपद्धर्म म्हणतात. एखादा मुळात चांगला असलेला सिद्धान्तही जर कालबाह्य होऊन अपकारक ठरू लागला तर कलिवर्ण्य म्हणून त्याचा त्याग करण्याचाही धर्माचा आदेश आहे. यावरून दिसून येईल की धर्म ही कल्पना religion प्रमाणे अपरिवर्तनीय नाही. ती गतिशीलआहे व म्हणूनच समाजधारणेसाठी प्रत्येक काळाला अनुरूप असे तिचे स्वरूप ठरविता येते. प्रा. वैद्य ह्यांच्या सारख्यांचा प्रयत्न धर्माला आजच्या काळाला अनुरूप असे रूप देण्याचा आहे. जुन्या काळातील मूलभूत धर्मकल्पना त्यांना आजही उपयुक्त वाटते, परंतु त्यांतील काहबाह्य घटकांबद्दल त्यांची दृष्टी सुधारकीच आहे. ह्या दृष्टिकोनाला कोणत्याही विवेकी व्यक्तीचा विरोध असू नये असे वाटते.
भारताची सध्याची सांसदीय राज्यव्यवस्था दिवसेंदिवस अधिकाधिक विकृत होत चालली आहे ह्याचे एक प्रमुख कारण ती भारतीय प्रकृतीला अनुसरून नाही हे आहे. तेव्हा भारताच्या धर्मप्रवण प्रकृतीला अनुसरून उपरोक्त धर्मकल्पनेवर आधारित अशी राज्यव्यवस्था निर्माण करता आली तर भारतापुढील अनेक प्रश्न सुटतील. ह्या हेतूने लिहिलेला ‘प्राचीन भारतीय राज्यव्यवस्थेचे स्वरूप आणि भारताची राज्यघटना’ हा माझा लेख दि. १५-११-८७ च्या तरुण भारतात प्रसिद्ध झाला होता. त्या लेखाला अधिक सुधारून ‘भारताला भारतीय राज्यव्यवस्थाच हवी असा एक निबंध मी तयार केला. दीनदयाल शोधसंस्थानतर्फे दि. २४-४-१९८८ ला त्यावर नागपूर येथे एक पूर्ण दिवसाचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यात विदर्भ व मराठवाड्यातील निरनिराळ्या क्षेत्रांतील विचारवंत, प्राध्यापक, कायदेपंडित, राजकारणी इ. उपस्थित होते. माझ्या निबंधात वरीलप्रमाणे धर्मकल्पना विशद करून त्यावर आधारित परंतु आधुनिक काळाशी सुसंगत अशी धर्मराज्याची रूपरेखा मी मांडली होती. हे धर्मराज्य सर्व संप्रदायांना (religions), इस्लाम, ख्रिस्तपंथ यांना देखील स्वीकार्य राहू शकेल, ते ऐहिक स्वरूपाचेच (secular) राहील. परंतु ज्याला आपला आध्यात्मिक विकास करून घ्यावयाचा असेल त्याच्यासाठी त्यात अनुकूल परिस्थिती राहील आणि सर्वांची मूलभूत धर्मतत्त्वे एकच राहून सर्व संप्रदायांना (religions) त्यात समान वागणूक मिळू शकेल. म्हणजेच हे धर्मराज्य सकारात्मक ऐहिक (Positive Secularism) राज्य राहील हे मी त्यात विशद केले होते. चर्चासत्रात स्थूलपणेमाझ्या विचारांना अनुकूल प्रतिसाद मिळाला.
इतकेच नव्हे तर माझ्या निबंधाची एक प्रत मी त्यावेळी धर्मशास्त्राचे गाढे अभ्यासक व सर्वमान्य आधुनिक विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचेकडे पाठविली होती. त्यावर दि. २९-३-१९८८ रोजी मला पत्र पाठवून त्यांनी पुढील अभिप्राय कळविला आहे.
‘आपण धर्मराज्याची केलेली व्याख्या योग्य आहे’. आपला दृष्टिकोन स्वीकारलेले तज्ञ लोकसभेत म्हणजे संसदेमध्ये व विधिमंडळांतून निवडून आले तर नवीन विधिविषयक चर्चावर काही प्रमाणात प्रभाव पाडू शकतील. आपली धर्मराज्य-संकल्पना समजावून सांगणे आवश्यक आहे.’
तर्कतीर्थाचा हा अभिप्राय लक्षात घेऊन बुद्धिवादी विचारक पूर्वग्रह सोडून धर्मसंकल्पनेचा विचार करतील तर धर्म म्हणजे religion नव्हे हे त्यांच्या सहज लक्षात येईल व धर्मराज्य म्हणजे theocratic state नव्हे हेही त्यांना कळेल.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.