तत्त्वज्ञानाची ओळख (भाग ३)

विधानांचे समर्थन तत्त्वज्ञानाच्या दोन प्रमुख कार्यापैकी पहिले कार्य म्हणजे विधानांचे समर्थन करण्याच्या प्रक्रियेची चिकित्सा. आपल्यासमोर येणार्याक कोणत्याही विधानाविषयी ते खरे आहे कशावरून?’ हा पहिला प्रश्न आपल्या मनात उद्भवतो. या प्रश्नाचे उत्तर देणे म्हणजे त्या विधानाचे समर्थन करणे.
एखाद्या विधानाचे समर्थन द्यायचे म्हणजे ते अन्य एका किंवा अनेक विधानांवरून अपरिहार्यपणे निष्पन्न होते असे दाखविणे. ती अन्य विधाने जर आपल्याला मान्य असतील आणि त्यावरून पहिले विधान निष्कर्ष म्हणून अपरिहार्यपणे निष्पन्न होते हेही आपल्याला मान्य असेल, तर ते विधान सिद्ध झाले असे आपण म्हणतो. याचा अर्थ असा की समर्थनाचे स्वरूप अनुमानाचे किंवा युक्तिवादाचे असते. अनुमान (inference) किंवा युक्तिवाद (argument) ही एकच आहेत. त्यात फरक करायचाच झाला तर असा करता येईल की युक्तिवादात आपण साध्य विधानापासून आरंभ करतो आणि नंतर त्याची साधकविधाने सांगतो, तर अनुमानात आपण साधकविधानांपासून आरंभ करतो आणि त्यावरून निष्पन्न होणारा निष्कर्ष काढतो. उदा. पर्वतावर अग्नि आहे, कारण तेथे धूर आहे, आणि जिथे धूर तिथे अग्नि हा युक्तिवाद आहे; परंतु ‘जिथे धूर तिथे अग्नि; पर्वतावर धूर आहे. म्हणून पर्वतावर अग्नि आहे हे अनुमान आहे. युक्तिवादात आपण साधक विधान आणि साध्य विधान यांतील संबंध ‘कारण या शब्दाने दाखवितो, परंतु अनुमानात तो संबंध म्हणून या शब्दाने व्यक्त करतो. यापुढे आपण ‘युक्तिवाद किंवा अनुमान’ असा दरवेळी उल्लेख न करता केवळ ‘अनुमान असा एकच शब्द वापरू.
आनुभविक समर्शन
आता समर्थने दोन प्रकारची असतात. पहिला प्रकार म्हणजे एखाद्या विधानाचा आनुभविक (empirical इंद्रियानुभवाचा) पुरावा सादर करणे. समजा आपल्याला कोणी म्हणाले की करड्या रंगाचे कावळेही असतात. त्याला आपण कशावरून?’ असे विचारल्यानंतर समजा तो म्हणाला की ‘चला, तुम्हाला दाखवितो आणि तो आपल्याला अशा ठिकाणी घेऊन गेला की जिथे आपल्याला खरोखरच अनेक करडे कावळे पाहायला मिळाले. ते पाहून आपण विचारात पडू. केवळ एवढ्याने त्याचे म्हणणे सिद्ध होते असे आपण म्हणणार नाही. आपल्यासमोर असणारे करडे पक्षी कावळे कशावरून असा प्रश्न आपण विचारू. म्हणजे ‘कावळा’ या शब्दाची व्याख्या देणे आले. व्याख्या देणे म्हणजे असे गुण सांगणे की जे एखाद्या वस्तूमध्ये असले की ती वस्तू ‘कावळा’ या जातीची आहे हे सिद्ध होईल. समजा हे करड्या रंगाचे पक्षी त्यांचा रंग सोडला तर आपल्या परिचयाच्या सामान्य कावळ्यांसारखेच आहेत. ते ‘काव, काव असा कर्कश आवाज काढतात. पण एवढ्याने आपलेसमाधान न झाल्याने समजा आपण जीवशास्त्रज्ञाकडे गेलो आणि त्याला तुम्ही कावळ्याची व्याख्या कशी करता असे विचारले. आपल्या नित्य परिचयाचे काळे पक्षी आणि हे करडे पक्षी एकाच जातीचे आहेत असे मानण्याची जीवशास्त्रीय कसोटी तो अशी सांगेल की जर काळे कावळे आणि हे करडे पक्षी यांच्या संबंधातून अपत्ये निर्माण झाली, एवढेच नव्हे तर ती अपत्येही प्रजननक्षम असली तर ते करडे पक्षी कावळेच आहेत असे आम्ही मानू. या कसोटीला जर ते करडे पक्षी उतरले तर ‘करड्या रंगाचेही कावळे असतात या विधानाचे समर्थन झाले असे म्हणता येईल. या समर्थनात केवळ आनुभविक पुरावाच आपण वापरला नाही, तर व्याख्या नावाची प्रक्रियाही आपण वापरली, आणि तिच्यावरून अनुमानही केले हे खरे आहे. पण या समर्थनात प्रत्यक्ष करडे पक्षी दृष्टोत्पत्तीस येणे या दृष्टीच्या अनुभवाचा वाटा मोठा आहे हे लक्षात येईल.
अनुमान म्हणजे प्राप्त ज्ञानापासून अप्राप्त नवीन ज्ञान मिळविण्याची प्रक्रिया. अनुमानात आपण एखादे विधान सिद्ध करीत असतो, आणि त्याकरिता एक किंवा अधिक विधाने साधक किंवा आधार म्हणून देत असतो. परंतु एवढ्याने निष्कर्ष सिद्ध झाला असे होण्याकरिता साधक विधाने आपल्याला सत्य म्हणून ज्ञात असली पाहिजेत. ती ज्ञात नसतील तर साध्य विधान सिद्ध करण्यास त्यांचा उपयोग करता येणार नाही. त्या साधक विधानांविषयीच कशावरून?’ हा प्रश्न उद्भवेल, आणि त्यांची सिद्धता आधी द्यावी लागेल. याचा अर्थ असा की आधी काही ज्ञान आपल्याजवळ असल्यावाचून आपण कसलेही अनुमान करू शकत नाही. आनुमानिक ज्ञान शक्य होण्याकरिता आनुमानिक नसलेले काही तरी ज्ञान आपल्या जवळ असले पाहिजे. अर्थात् आपले समग्र ज्ञान आनुमानिक असू शकत नाही. निदान काही ज्ञान आनुभविक असल्याशिवाय अनुमानाचे पाऊलही हलणे शक्य नाही.
अनुमानांचे प्रकार
अनुमाने दोन प्रकारची असतात. (१) निगामी (deductive), आणि (२) उद्गामी (inductive). निगामी अनुमाने सर्वथा निर्णायक (demonstrative), म्हणजे साध्य पूर्णपणे सिद्ध करणारी असतात. परंतु उद्गामी अनुमाने निष्कर्ष सिद्ध करण्यास अपुरी पडतात. त्यांचा निष्कर्ष कमी अधिक प्रमाणात संभाव्य (probable) असतो, निश्चित नतो. या दोन अनुमानप्रकारांचे स्वरूप थोडे अधिक विशद करू या.
यापूर्वी घेतलेले उदाहरण फिरून घेऊ. ‘जिथे धूर तिथे अग्नि’; पर्वतावर धूर आहे. म्हणून पर्वतावर अग्नि आहे. या अनुमानात दोन साधक विधानांवरून ‘पर्वतावर अग्नि आहे हा निष्कर्ष काढला आहे. हा निष्कर्ष मान्य होण्याकरिता त्याची दोन्ही साधक विधाने सत्य आहेत असे मानले पाहिजे. साधक विधाने सत्य असतील तर त्यावरून अपरिहार्यपणे निघणारा निष्कर्ष हा सत्यच असेल. तो असत्य असू शकणार नाही हे उघड आहे.
वरील अनुमान निर्दोष आहे. पण सर्वच अनुमाने निर्दोष असतात असे नाही. उदा. पुढील अनुमान पाहा : ‘जिथे धूर तिथे अग्नि; पर्वतावर धूर नाही. म्हणून पर्वतावर अग्नि नाही. हे अनुमान सकृद्दर्शनी बरोबर वाटते, परंतु वस्तुतः ते चुकीचे आहे. कारण त्याचानिष्कर्ष साधक विधानांपासून अपरिहार्यपणे निष्पन्न होतो असे आपण म्हणू शकत नाही. पर्वतावर धूर नाही, यावरून पर्वतावर अग्नि नाही हा निष्कर्ष निघण्याकरिता ‘जिथे धूर तिथे अग्नि’ हे विधान उपयोगाचे नाही. त्याकरिता ‘जिथे धूर नाही तिथे अग्नि नाही हे विधान साधक विधान असावे लागेल. पण ते येथे साधक विधान नाही. शिवाय ते असते तरी ते सत्य नाही हे आपल्याला माहीत आहे. उदा. लोखंडाचा तापवून लाल झालेला गोळा (तप्त अयोगोल) हा अग्नि आहे, पण त्यात धूर नसतो. म्हणजे अनुमाने जशी निर्दोष असतात तशीच ती सदोपही असतात. निर्दोष अनुमानाला valid अनुमान म्हणतात, आणि सदोष अनुमानाला invalid अनुमान म्हणतात. आपण त्यांना अनुक्रमे ‘वैध’ आणि ‘अवैध’ असे शब्द वापरू.
आता अनुमानाने निष्कर्ष सिद्ध होण्याच्या दोन अटी आहेत. (१) त्याची साधक विधाने सत्य असली पाहिजेत; आणि (२) ते अनुमान वैध असले पाहिजे. या दोन अटींपैकी एकही जरी अपूर्ण राहिली तरी निष्कर्ष सिद्ध झाला असे म्हणता येणार नाही.
अनुमानाच्या वैधतेची व्याख्या अशी आहे. ज्या अनुमानाची साधक विधाने सत्य असल्यास निष्कर्ष असत्य असू शकत नाही ते अनुमान वैध; किंवा अन्य शब्दांत हीच गोष्ट सांगायची तरः जेव्हा एखाद्या अनुमानाची साधके मान्य केल्याबरोबर निष्कर्ष मान्य करणे बंधनकारक होते तेव्हा ते अनुमान वैध असते असे म्हणतात. याच्या उलट साधके मान्य करून निष्कर्ष अमान्य करणे शक्य असते तेव्हा ते अनुमान अवैध असते.
उद्गामी अनुमाने
वर केलेले वैध आणि अवैध अनुमानांचे विवेचन निगामी अनुमानांचे होते. आता आपण क्षणभर उद्गामी (inductive) अनुमानांकडे दृष्टिक्षेप टाकू या.
पर्वतावर आनीचे अस्तित्व सिद्ध करण्याकरिता वापरलेल्या वरील अनुमानात दोन साधके आहेत. ती आपण मान्य केली, म्हणजे सत्य म्हणून स्वीकारली, की निष्कर्षापासून आपली सुटका नाही हे आपण पाहिले. ती दोन्ही साधके आपण सामान्यपणे मान्य करू. पण समजा कोणी म्हणाले की मी साधके मान्य करीत नाही, तर? ही दोन साधके म्हणजे (१) पर्वतावर धूर आहे, आणि (२) जिथे धूर तिथे अग्नि. यांपैकी पहिले साधक सत्य आहे हे वरील आक्षेपकाला पर्वतावरील धूर प्रत्यक्ष दाखवून आपण मान्य करायला लावू. पण दुसर्यात साधकाची स्थिती वेगळी आहे. ते विधान ज्याला सार्विक (universal) म्हणतात त्या प्रकारचे, म्हणजे एखाद्या प्रकारच्या सर्व वस्तूंविषयीचे आहे. त्याचे प्रतिपादन फक्त चार दोन ठिकाणी जिथे धूर होता तिथे अग्नीही होता, एवढेच नाही. ते प्रतिपादन असे आहे की ज्या ज्या ठिकाणी धूर असेल त्या सर्व ठिकाणी अग्नी असतो. परंतु ज्या ठिकाणी धूर असेल अशी सर्व ठिकाणे आपण नजरेखालून घालू शकत नाही. विशेषतः भूतकालातील आणि भविष्यातील धूमवान् वस्तू आपल्या अवलोकनाच्या बाहेर राहणार. तेव्हा आपण कितीही धूमवान् वस्तू पाहिल्या तरी त्या सर्व धूमवान् वस्तू होणार नाहीत, त्या फक्त काही धूमवान् वस्तू असणार. परंतु यावरून आपण निष्कर्ष काढणार तो मात्र सर्व धूमवान् वस्तूंविषयी, सर्वधूमवान् वस्तु अग्निमान् असतात हा. हा सार्विक निष्कर्ष पुढील प्रकारच्या अनुमानाने निघाला असे म्हणता येईल.
क धूमवान् आहे आणि अग्निमान् आहे.
ख “ “ “ “ “
ग “ “ “ “ “
घ, ड इत्यादी
म्हणून सर्व धूमवान् वस्तू अग्निमान् असतात.
या प्रकारच्या अनुमानाला उद्गामी अनुमान म्हणतात. त्याच्याकडे काळजीपूर्वक पाहिले तर आपल्या लक्षात येईल की हे अनुमान अवैध आहे. कारण त्याची सर्व साधके सत्य आहेत हे मान्य करूनही त्याचा निष्कर्ष आपण अमान्य करू शकतो. कारण भविष्यातील धुराविपयी आपण खात्री कशी देऊ शकणार?काय सांगावे उद्या एखादी वस्तू धूमवान् असूनही अग्निमान् नसेल.
ज्यांना आपण निसर्गाचे नियम म्हणतो ती सर्व सार्विक विधाने असतात. उदा. ‘सर्व कावळे काळे असतात’, ‘सर्व मनुष्य मर्त्य आहेत’, ‘उष्णतेने पदार्थ प्रसरण पावतात, ‘समुद्रसपाटीवर पाणी १०० सेंटिग्रेड इतके तापविले की उकळते,’ इ. ती ज्या अनुमानांनी आपण सिद्ध करतो ती सर्व उद्गामी असतात, आणि म्हणून ती सर्व अवैध असतात. त्यांचे प्रतिपादन पुराव्याच्या पलीकडे जाणारे असते.
ही गोष्ट शोचनीय खरी. पण तिच्यापासून आपली सुटका नाही. कारण उद्गामी अनुमाने अवैध म्हणून ती करायची नाहीत असे आपण ठरविले तर आपल्याला सर्व निसर्गनियमांचा त्याग करावा लागेल. आपले ज्ञान केवळ विशिष्ट वस्तू आणि विशिष्ट घटना यांपुरते मर्यादित राहील. कोणत्याही प्रकारच्या सर्व वस्तूंविषयी आपल्याला काही बोलता येणार नाही. जेवायला बसल्यावर आपण खाणार असलेले अन्न आपले पोषण करील, घात करणार नाही, किंवा आपण पिणार असलेल्या पाण्याने आपली तहान भागेल, ती वाढणार नाही, असे मानायला आपल्याला कारण राहणार नाही. खरे सांगायचे म्हणजे जीवनच अशक्य होईल.
परंतु आपण असे मानतो की निसर्गाचा क्रम एकविध असतो. भविष्य भूतासारखेच असते. म्हणून जेव्हा एखाद्या प्रकारच्या वस्तूंच्या निरीक्षिलेल्या सर्व उदाहरणांत आपल्याला एखादा धर्म समान आढळला तर तो धर्म न निरीक्षिलेल्या अन्य उदाहरणांतही असावा असे आपण गृहीत धरतो. हा जो आपला विश्वास आहे त्याला निसर्गाच्या एकविधतेवरील (Uniformity of Nature) विश्वास असे नाव आहे.
उद्गामी अनुमाने अवैध असतात, या म्हणण्याचा अर्थ असा आहे की त्यांची साधके सत्य असूनही निष्कर्ष असत्य असू शकतो. पण म्हणून उद्गामी अनुमाने कुचकामाची आहेत असे निष्पन्न होत नाही. त्यांचे निष्कर्ष निर्णायक नसतील, परंतु ते पूर्ण बेभरवशाचे असतात असे म्हणता येत नाही. ते संभाव्य (probable) असतात. बाहरणांच्या अभावी एखाद्या नियमाच्या साधक उदाहरणांची संख्या जितकी जास्त तितकी त्या नियमाची संभाव्यताजास्त. ही संभाव्यता कालांतराने १०० टक्क्यांच्या जवळ जाते. पण ती कधीही तेथे पोचत नाही. व्यवहारात आपण तो नियम पूर्णपणे निरपवाद नियम आहे असे समजतो; पण तत्त्वतः त्याला अपवाद संभवतो हे आपणाला नाकारता येत नाही.’जिथे धूर तिथे अग्नी’ हे साधक आपल्याला कसे ज्ञात होऊ शकेल या प्रश्नाचा आपण विचार करीत होतो. या प्रश्नाचे उत्तर आहे, उदगमनाने’ म्हणजे
‘जिथे धूर तिथे अग्नि, आणि पर्वतावर धूर आहे, म्हणून पर्वतावर अग्नि आहे ह्या निगामी अनुमानाच्या दोन साधकांपैकी एक (‘पर्वतावर धूर आहे हे) ऐंद्रिय अनुभवाने आपल्याला प्राप्त झाले, तर दुसरे (‘जिथे धूर तिथे अग्नि है) आपण धूर आणि अग्नि यांच्या साहचर्याची अनेक उदाहरणे पाहून, आणि धूर आहे परंतु अग्नी नाही असे एकही उदाहरण न सापडल्याने उद्गमनाने मिळविले.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.