चर्चा- विवेकवादी नीतीविचाराचे शिथिल समर्थन

प्रा. दि. य. देशपांडे यांनी आजचा सुधारकच्या सप्टेंबर आणि आक्टोबर १९९२ च्या अंकांतून क्रमशः विवेकवादातील नीतिविचाराच्या त्यांच्या मांडणीवर घेतलेल्या आक्षेपांची उत्तरे देण्याची बरीच खटपट केली आहे. त्या उत्तरांवरून विवेकवादाच्या नावाने पर चात्त्य विचारांनी भारलेल्या भारतीय विद्वानांनी भारतीय नीतिविचारांना उपहसत जे तर्क कौशल्य दाखविण्याची धडपड चालविली आहे, ते मुळात किती कच्चे, अपुरे आणि भ्रामक आहे याची साक्ष पटते. एक गोष्ट प्रथम नमूद करतो की प्रा. दि. य. देशपांडे यांची त्यांनी केलेल्या नीतिविचारांच्या मांडणीचा प्रस्तुत लेखकाने आपल्या मूळ लेखात जो संक्षेप दिला आहे त्याबद्दल कोणतीही तक्रार नाही. केवळ लेखाच्या शीर्षकात नीतिविचाराला ‘भोंगळ असे विशेषण जोडणे त्यांना आवडलेले दिसत नाही .शब्दाबद्दल वाद नको यास्तव शिथिल हा शब्द प्रस्तुत लेखाच्या शीर्षकात वापरला जात आहे. प्रस्तुत लेखात त्यांच्या विवेचनात स्पष्टपणे जाणवणाच्या ज्या दोषांची चर्चा करीत आहे त्यांची समाधानकारक उत्तरे जर वादाचा अभिनिवेश बाजूला सारून देता आली तर हा नीतिमीमांसेचा विचार प्रगत होण्यास मदत होईल. माझ्या समजुतीनुसार प्रा. देशपांडे यांनाही ते आवडणारे होईल असा विश्वास वाटतो.
कांटची कर्तव्यासाठी कर्तव्य करावे हे सांगणारी विचारसरणी आणि मिलचीउपयोगितावादी विचारसरणी या दोहोत विरोध नाही हे प्रा. देशपांडे यांचे मत मानणारा आणि त्यांच्या पद्धतीने दोहोंचा समन्वय साधून नीतिविचार मांडणारा एकही मान्य नीतिमीमांसक असल्याचे उपलब्ध नाही, किंवा तसा उपलब्ध असल्याचे प्रा. देशपांडे हे स्वतःही नमूद करीत नाहीत. कांट किंवा मिल यांना गुरुस्थानी मानणाच्या त्यांच्या संप्रदायात तर, तमः प्रकाशाप्रमाणे विरोधी असणार्याव या विचारांची एकत्र सांगड घालण्याची संभावनाही। संभवत नाही. तेव्हा प्रा. देशपांडे यांचे हे म्हणणे त्यांचा अपवाद सोडल्यास कोणीही मानत नाही. यावरून वाचकांनी काय तो निष्कर्ष काढावा.
अर्थात प्रा. देशपांडे स्वतंत्र नीतिविचार म्हणून तो युक्तिवादानेपटवून देत असल्यास त्याचा विचार करण्यास मुळीच हरकत नाही. कारण, कांट किंवा मिल यांची नावे कुणी दडपून दिल्यामुळे दबून जाण्याचे भारतातील दिवस संपले आहेत. इतरही विचारक असू शकतात.कांटची कर्तव्यासाठी कर्तव्य करावे ही विचारसरणी सर्वांना मान्य व्हावी अशी प्रा. देशपांडे यांची अपेक्षा ती अनुभवविरुद्ध असल्यामुळे चुकीची आहे असा मूळ आक्षेप आहे. सर्व मानवी वर्तन (बुद्धिपूर्वक प्रवृत्ती) प्रथम ज्ञान, नंतर इच्छा, पुढे कृती (जानाति-इच्छतियतते) याच क्रमाने घडत असल्यामुळे कांटच्या पद्धतीने सर्वसामान्य मानवी वर्तन घडू शकते याचा पुरावा कांटच्या समर्थकांनी दाखविला पाहिजे आणि तो गुलाबी उंदीर पाहणाच्या एखाद्या अद्भुत मनुष्यासारख्या माणसाचे एकट उदाहरण देऊन चालणार नाही. तशी मानवी प्रवृत्ती पटवून द्यावी लागेल. याचे काहीही उत्तर प्रा. देशपांड्यांच्या लेखात नाही.
उपयोगितावादी त्या मानाने काहीशा संमजसपणे बोलतो. तो कर्तव्यनिर्णयासाठी बहुजनसुख हे प्रयोजन मानतो. प्रा. देशपांडे म्हणतात त्याप्रमाणे कांट आणि मिल यांच्यामध्ये मतभेद कर्तव्य ठरविण्यासाठी वापरावयाच्या निकषाचा आहे, कर्तव्य कोणत्या हेतूने करावयाचे यासंबंधी नाही, हे जर खरे मानले तर मिल कर्तव्यनिर्णयार्थ बहुजनसुख हे प्रयोजन गृहीत धरतो आणि कर्तव्य करतेवेळी ते सर्व विसरून जातो असा व्याघात स्वीकारण्याचीआपत्ती येते.
विवेकवादाला मान्य असणार्यार प्रत्यक्ष आणि लौकिक अनुमान या प्रमाणांनी नीतिमीमांसेसाठी कराव्या लागणाच्या तपासण्या शक्य नाहीत असा मूळ आक्षेप आहे. त्यासंबंधीचे सप्टेंबर ९२ च्या अंकातील परिच्छेद २ मधील उत्तर मूळ मुद्दा लक्षात न घेता दिले गेलेले असंबद्ध असल्याचे जाणवते. प्रमाणविचार नैतिक विधानाला लावावा असे आक्षेपक कधीच म्हणत नाही. पण समजा सत्य बोलणे हे नैतिक आहे असे मानले तर सत्य बोलणे याचे नैतिकत्व सार्विकीकरण होऊन सिद्ध होऊ शकते की नाही हे प्रत्यक्षाने वा अनुमानाने तपासून काढणे असंभव आहे असा आक्षेप आहे. तसेच ते ‘बहुजनसुखाय’ संभवते की नाही हेही पूर्वोक्त प्रमाणांनी तपासणे शक्य दिसत नाही. कारण ‘सर्व’ याचा अर्थ भूत भविष्य वर्तमान काळ व जगाचा प्रचंड विस्तार हा लक्षात घेतल्यास त्याचबरोबर सत्य बोलण्याची सर्वमान्य अपवादस्थळे विचारात घेतल्यास आणि मानवी मर्यादा लक्षातघेतल्यास सार्विकीकरण ही फक्त कविकल्पना ठरते, वास्तव सत्य नव्हे हे मूळ लेखातील आक्षेपात स्पष्ट मांडले आहे. याचे उत्तर प्रा. देशपांडे देत नाहीत.
सर्वसामान्यांच्या नैतिक अवधारणा ज्यातून व्यक्त होतात अशा भाषिक विश्लेषणातून काय स्वीकारावे व काय न स्वीकारावे हे कळते. हे प्रमाण नसले तरी प्रमाणसदृश आहे हे प्रा. देशपांडेंचे समर्थन अत्यंत केविलवाणे आणि विवेकवादी आतापर्यंत जो प्रत्यक्ष अनुमानाचा तोरा मिरवीत होते त्याचा नक्शा उतरवणारे आहे! हे चक्क ओबडधोबड शब्दप्रमाणाची कास धरण्याचा प्रयत्न करणे होय. शास्त्रप्रामाण्याने कर्तव्यनिश्चय होतो हे भारतीय नीतिमीमांसकांचे अधिक समंजसपणाचे म्हणणे धिक्कारणारी ही प्रत्यक्षानुमानवादी नीतिमीमांसक मंडळी स्वमतप्रतिदनाचेवेळी केवढा व्याघात मान्य करतात हे पाहिले म्हणजे त्या मंडळीच्या बुद्धिचातुर्याबद्दल भलताच आदर वाटू लागतो.!
प्रत्येक मनुष्यात सदीहा स्वाभाविक असते तिच्यामुळे कर्म नैतिक आणि नैतिकमूल्यवान ठरते असे कांटचे म्हणणे प्रा. देशपांडे सांगतात. हे जर मान्य केले तर कर्तव्यनिर्णयासाठी सार्विकीकरणाचे लचांड या सदीहेच्या – (रत्नाप्रमाणे स्वयंप्रकाश असणाया) मागे जोडण्याचे कारण नाही. कारण सतां हि संदेहपदेषु वस्तुषु प्रमाणमन्तःकरणप्रवृत्तयः संशयस्थळी अंतःकरणातली प्रेरणाच कर्तव्यबोध करून देते, यात सुचविल्याप्रमाणे प्रत्येक माणूस स्वयंभूच निश्चय करू शकेल. विवेकवाद्यांचे नीतिशास्त्र हे सर्वसामान्य माणसाला कर्तव्यनिर्णय शिकविते असा त्यांचा दावा आहे. आता प्रत्येक माणसात ईहा (कर्म करण्याची मानसिक शक्ती) असते. तदनुसार तो कर्म करतो. मनुष्याच्या ठिकाणी नियमाच्या कल्पनेनुसार कर्मे करण्याची शक्ती आहे. मनुष्य हा वर्तनाचा नियमही शोधतो आणि कर्मही करतो. सदीहा हा ईहेचा प्रकार आहे. ती स्वतोमूल्य आहे. ती भ्रष्ट होऊ शकत नाही. हे सर्व कांटप्रणीत विवेचन सर्वसामान्य माणसाशी संबंधित असेल तर कर्तव्यबोधासाठी नीतिमीमांसेचे ग्रंथ लिहिण्याची वा ते वाचण्याची खटपट करण्याची अजिबात आवश्यकता नाही. सर्वच स्वाभाविकपणे होऊ शकेल.
नीती ही नियमबद्ध गोष्ट आहे. एखादे कर्म चांगले किंवा युक्त ठरत असेल तर ते एका विशिष्ट प्रकारच्या नियमानुसार घडलेले असते. हा नियम सार्विकीकरणाचा होय. मी ज्या नियमाप्रमाणे वागतो त्या नियमाप्रमाणे सर्वांस वागता येईल काय या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर आले तर तो नियम नैतिक असे कांटचे म्हणणे प्रा. देशपांडे यांनी दिले आहे, आणि ही उपपत्ती त्यांना मान्य आहे.
या सर्व चिंतनात सगळा समाज एकस्तरी आणि एकसुरी असतो असे गृहीत धरले असल्यामुळे पूर्वीचे कांटचे आणि इतका काळ लोटल्यानंतर तेच स्वसंमत म्हणून सांगणाच्या प्रा. देशपांड्यांचे म्हणणे प्रत्यक्षकिद्ध दिसते. अनेक पाश्चात्त्य नीतिमीमांसक आणि त्यांचे भारतीय अनुयायी अनेक क्षेत्रांत जो विचार मांडत आहेत त्यांत त्यांनी, त्यांना धर्मशास्त्र अप्रिय म्हणून ते तूर्त बाजूला ठेऊ; पण समाजशास्त्र आणि अनेक संबंधित स्थळी वैद्यकशास्त्र यांनी काढलेल्या प्रमाणपूत निष्कर्पाकडे ढुंकूनही न पाहता अद्भुत तर्ककौशल्याने शब्दांचे फुगेसोडले आहेत असे दिसते. वस्तुतः विकासाचे आणि संस्कृतीचे स्तर लक्षात घेऊन वेगवेगळे समाज एवढेच नव्हे तर त्यातील विविध गट आपण पाहिले तर त्यांची कर्तव्यविषयक युक्तायुक्ततेची अवधारणे भिन्न भिन्न किंवा अनेकवार परस्परविरोधीही असतात. उदाहरणार्थ मुसलमान लोक काफिरांची हत्या करणे युक्त/नैतिक समजतात. किंवा हिंदूतलाच पंजाबी समाज घेतला तर त्या समाजात मोठ्या भावाच्या पत्नीशी मोठ्या भावाच्या मृत्यूनंतर लहान भावाने पत्नीसंबंध स्थापित करणे नैतिक समजले जाते. अशा स्थितीत सर्वसामान्य माणूस आधुनिक नीतिमीमांसेने आपले कर्तव्य निश्चित करू शकतो असे म्हणणारी मंडळी केवळ कल्पनासाम्राज्यात दंग असलेली वाटतात.
सुख स्वसंवेद्य असल्यामुळे दुसर्यापला होणार्याा सुखाच्या ज्ञानासाठी प्रत्यक्ष प्रमाण माणसाला उपयोगी पडू शकत नाही एवढेच लेखकाचे म्हणणे होते. मानवाच्या वर्तनाने त्याच्या सुखदुःखाचे अनुमान शक्य होते यात मतभेदाचे कारण नाही. तसेच कर्तव्ये मानवी हिताशी संबंधित असतात हे माझे वेगळे म्हणणे नसून प्रा. देशपांडे यांच्याच विधानाचा तो अनुवाद आहे. कोणती कर्मे हितकारक आणि कोणती कर्मे अहितकारक याचे ज्ञान मनुष्यजातीला हजारो वर्षांच्या अनुभवाने प्रप्त झालेले आहे. याप्रमाणे सामान्य नियमांचे ज्ञान घर, ‘शाळा, बाहेरचा समाज इत्यादींकडून भरपूर प्राप्त होते ही प्रा. देशपांड्यांची विधाने प्रत्यक्षअनुमानाच्या मर्यादा ओलांडून शब्दप्रमाणावर भर देणारी आहेत हे स्पष्ट आहे. यावर घर, शाळा बाहेरचा समाज यांचे अनुभव हे त्यांच्या त्यांच्या प्रत्यक्षाच्या अंतर्गतच येते असेही काही तर्कपंडित समर्थन करण्याचा संभव आहे! प्रत्यक्ष प्रमाणासंबंधीच्या विपरीत समजुती वागवणारे हे पंडित वंदनीय आहेत! प्रश्न त्यांच्या प्रत्यक्षाचा नसून कर्तव्यनिर्णय करणाच्या मला त्याचे प्रत्यक्ष ज्ञान होते काय हा आहे. यामुळे प्रत्यक्षानुमानांनीच आम्ही नीतिविचाराची उपपत्ती लावून देतो ही प्रतिज्ञा असत्य ठरते. हा प्रतिज्ञाविरोध गंभीर दोष आहे.
ऑक्टोबर (१९९२) च्या अंकातील उपयोगितावाद्यांचे भूयिष्ठांचे अधिकतम सुख हे कर्तव्यनिश्चयाचे साधन असते हे म्हणणे विचारात घेत असतानाचे प्रा. देशपांडे यांचे सहाव्या परिच्छेदातील विवेचन गोंधळ निर्माण करणारे आहे. ‘नैतिक निर्णय घेणान्याची समजूत चुकू शकते, मनुष्याचे बौद्धिक सामर्थ्य मर्यादित असते आणि असे असूनही ‘सामान्य माणूस आपला नैतिक निर्णय बरोबर करू शकतो या म्हणण्यातील विसंगती स्पष्टआहे. तसेच प्रा. देशपांड्यांच्या मते स्वीकरणीय असणार्याय या उपयोगितावादी विचारसरणीचे ज्यामुळे भूयिष्ठांचे अधिकतम सुख निर्माण झाले नाही आणि ते संभाव्यही नाही अशा हरिश्चंद्राचे आत्यंतिक सत्यपालन, विश्वामित्राने केलेल्या पुत्रहत्येनंतरही वसिष्ठांची क्षमा, भारताच्या चळवळीतील क्रांतिवीरांच्या आत्माहुती यासारखी कार्ये अनैतिक ठरण्याची आपत्ती कशी दूर करावी याचेही योग्य समाधान प्रा. देशपांडे यांच्या प्रतिपादनात नाही.
प्रा. देशपांडे यांनी पाश्चात्त्य नीतिमीमांसेचे समर्थन आपल्या पद्धतीने करीत असताना केलेले दावे बुद्धिवादाला मान्य होऊ शकत नाहीत. विवेकवादातील नीतिविचार ज्यागृहीतकृत्यावर आधारलेला असतो, उदाहरणार्थ कांटच्या मतानुसार नियमांचे साविकीकरणआणि उपयोगितावाद्यांच्या विचारानुसार भूयिष्ठांचे अधिकतम सुख, या दोन्ही गोष्टी विवेकवादाची आधारशिला असणार्या प्रत्यक्षाने आणि लौकिक अनुमानाने समर्थित होऊ शकत नाहीत. एवढेच नव्हे तर तशी तपासणी असंभव आहे. त्यासाठी प्रा. देशपांडे यांनी सुचविलेली भाषिक विश्लेषणातून प्राप्त होणारी युक्तायुक्ततेची विधाने किंवा समाजाने संपादन केलेला पूर्वानुभव हा चक्क विवेकवादाला निंद्य मानला गेलेल्या आणि प्रस्तुत स्थळी अत्यंत ओबडधोबड अवस्थेत असणार्याि शब्दप्रमाणावर आधारला आहे.
समाजासंबंधीची जी काही विधाने कांटवादी किंवा मिलवादी नीतिमीमांसकांनी केलेली प्रा. देशपांडे यांनी दिली आहेत ती समाज एकसुरी आणि एकस्तरी असतो अशा समाजस्वरूपाच्या अयथार्थ कल्पनेवर विसंबून दिली आहेत म्हणून ती अनुभवविरुद्ध आहेत. प्रतिज्ञाविरोध, अनुभवविरोध आणि आत्मविसंगती अशा प्रमादांवर आधारलेला विवेकवादातील नीतिविचार निर्दोष व बुद्धिवादाचे अपत्य आहे असे विधान गोविंदरावांचा वंध्यापुत्र आम्हाला भेटला या म्हणण्यासारखे आहे. मुळातले आक्षेप कोणते आणि उत्तरे कोणती याचे यथार्थ मूल्यमापन करून कोणीही समंजस वाचक आपले मत ठरवू शकतो. यास्तव निंदा आणि धिक्कार या वृत्ती सोडून इतर नीतिविचाराबरोबर भारतीय नीतिविचार अधिक समजूतदारपणे समजून घेणे आणि अभ्यासणे इष्ट होईल.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.