भोळे यांचे परीक्षण निराशाजनक

सावरकरांचे समाजकारण : सत्य आणि विपर्यास या ग्रंथावरील श्री. भा. ल. भोळे यांचे परीक्षण उत्सुकतेने वाचायला घेतले. सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाच्या एका काहीशा दुर्लक्षित पैलूवर प्रकाश टाकणारा, स्वतंत्र दृष्टीने लिहिलेला हा संशोधनग्रंथ, आणि तोही एका ताज्या दमाच्या व नवोदित अभ्यासकाने लिहिलेला; त्यामुळे ही उत्सुकता वाटत होती. शेषराव मोरे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचे प्रा. भोळे यांनी साधार खंडन केलेले असेल, ग्रंथातील निष्कर्षांचीही साक्षेपी समीक्षा त्यांनी मांडलेली असेल, असे वाटले होते. पण परीक्षण वाचून साफ निराशा झाली, आणि आश्चर्यही वाटले.
मोर्यांलच्या या संशोधनग्रंथाचा गाभा जाणून घेऊन तो वाचकांपुढे ठेवण्याऐवजी, लेखकाच्या आक्रमक भाषाशैलीचीच चर्चा यात अधिक आहे. आणि हा आक्रमकपणा अकारण असल्याचाही अभिप्राय भोळे यांनी नोंदविला आहे. भाषाशैलीचा आक्षेप एकवेळ मान्य केला तरी, मोरे जे पुरावे देतात आणि त्यावर आधारित निष्कर्ष मांडतात, त्याचे काय? परीक्षणकार त्याविषयी आपल्याला काहीच सांगत नाहीत. ते लिहितात – “सावरकरांच्या या टीकाकारांचे म्हणणे बरोबर की प्रा. मोत्यांचे याबद्दल आम्हाला येथे काहीही म्हणावयाचे नाही.” एका ज्येष्ठ विचारवंताची ही भूमिका खरोखर बुचकळ्यात टाकणारी आहे. प्रा. मोरे प्रत्येक निष्कर्षाला पुराव्याचा वे संदर्भाचा भक्कम आधार देतात, आणि मगच आक्रमक पद्धतीने आपले म्हणणे ठासून मांडतात. त्याचा वैचारिक प्रतिवाद करण्याऐवजी, भाशाशैलीचे कारण पुढे करून मोत्यांना निकालात काढण्याचा सोपा मार्ग भोळे यांनी स्वीकारला, ही दुर्दैवाची बाब आहे. या परीक्षणात ठिकठिकाणी केलेली अनेक विधानेखटकणारी आहेत.
“सावरकरांवर टीका करणारे एकजात सारे अभ्यासक सावरकरांची बदनामी करण्यासाठी संशोधनप्रवृत्त झालेले आहेत, या प्रा. मोरे यांच्या एकूण प्रतिपादनाशी सहमत होणे आम्हाला शक्य नाही” असे भोळे लिहितात. एकतर सर्वच टीकाकारांवर प्रा. मोरे यांनी हा आरोप केलेला नाही आणि जेथे तो केला आहे, तेथे त्याचे कारण विस्ताराने दिले आहे. उदाहरणार्थ, ८ डिसेंबर १९३५ च्या सावरकरांच्या लेखातील अवतरण डॉ. यशवंत मनोहर सोईस्कर बदल करून, कापाकापी करून उद्धृत करतात आणि त्या आधारावर सावरकरांना आध्यात्मिक, कर्मविपाकवादी वगैरे ठरवितात. डॉ. मनोहर मूळ अवतरणात कापाकापी करूनच थांबत नाहीत, तर एखाद्या अवतरणात स्वतःच्या मनचे शब्द घालून बनावट पुरावाही निर्माण करतात. (पृष्ठ ६७) आता यावर भोळे यांना मूळ सावरकरसाहित्य वाचून डॉ. मनोहरांनी उद्धृत केलेले अवतरण बरोबर आहे किंवा नाही हे तपासता आले असते, किंवा मनोहरांनी उद्धृत केलेले अवतरण अगदी अचूक नसले तरी त्यांचा निष्कर्ष फारसा चूक नाही, असे दाखवून देता आले असते. आणि तिसरा मार्ग म्हणजे प्रा. मोत्यांचे प्रतिपादन बरोबरआहे, असा निर्वाळा देता आला असता. पण यांपैकी काहीही न करता मोत्यांच्या भाषाशैलीविषयी एकाच अर्थाची वाक्ये पुनःपुन्हा लिहून भोळे यांनी सात पाने खर्च केलीआहेत.
“प्रत्येकाला आपल्या परीने इतिहासाचा अर्थ लावण्याची मुभा असलीच पाहिजे, हे इतरांचे स्वातंत्र्य प्रा. मोरे यांनी मान्य केले असते तर त्यांचा तोल असा सुटला नसता” हे भोळे तर यांचे आणखी एक खटकणारे विधान. आपल्या परीने इतिहासाचा अर्थ लावण्यासाठी सोईस्कर फिरवाफिरव केलेले पुरावे व संदर्भ देण्याचे स्वातंत्र्य बहाल केले जावे, असे भोळे यांना म्हणायचे आहे की काय?हे म्हणजे, खोटे-विपर्यस्त पुरावे सादर करून एखाद्या निरपराध व्यक्तीला आरोपी ठरवायचे आणि वर तसे आपल्या परीने ठरविण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, असा शेरा मारायचा, असे करण्यासारखेच झाले. मोरे तुटून पडले आहेत ते इतिहासाच्या अर्थावर नव्हे, तर अर्थाचा अनर्थ करण्याच्या प्रवृत्तीवर, हे लक्षात घेतले पाहिजे. मोर्यां चे पुस्तक मुळातून वाचणाच्या कोणालाही ते सहज लक्षात येईल. या प्रवृत्तीची अनेक उदाहरणे मोत्यांनी दिलेलीच आहेत. वेदांचे अपौरुषेयत्व सावरकरांना मान्य होते व ते हिंदपुनरुज्जीवनवादी होते, हे धडधडीत खोटे विधान प्रा. भालचंद्र मुणगेकर कोणताही पुरावा न देता करतात; रत्नागिरीला येण्याचे सावरकरांचे निमंत्रण डॉ. आंबेडकरांनी त्यांचे सामाजिक विचार मान्य नसल्याने नाकारले ही श्री. यदुनाथ थत्ते यांची लोणकढी थाप; संदर्भ पृष्ठांक न देता अनुवंशाविपयी सावरकरांनी लिहिलेले दोन वेगवेगळे परिच्छेद ‘ते लगेच पुढे म्हणतात या वाक्याने जोडून श्री. वसंत पळशीकर यांनी केलेली ‘चतुराई – हे सर्व प्रकार निषेधार्हच आहेत. आता हा निषेध सौम्य भाषेत करायचा की आक्रमक हा ज्याच्या त्याच्या प्रवृत्तीचा, शैलीचा प्रश्न आहे. मूळ मुद्दा हा आहे की, सत्याचा प्रामाणिक शोध आपण घेणार की नाही?
ग्रंथात आंबेडकरांचे नाव एवढे वारंवार का यावे, असा प्रश्न भोळे यांना पडला आहे. पण त्याचे साधे उत्तर असे की, अस्पृश्य जातीत जन्मलेल्या डॉ.आंबेडकरांनी दलितांचा मोठा लढा उभारून, त्या समाजाला अस्मिता मिळवून दिली, एवढेच नव्हे तर अस्पृश्यांच्या प्रश्नाला कारणीभूत असलेल्या जातिसंस्थेची सखोल ऐतिहासिक व समाजशास्त्रीय चिकित्सा केली. या दोन्ही दृष्टीनी बाबासाहेबांनी भारतातील समाज-सुधारणेच्या क्षेत्रात अग्रगण्य स्थान मिळवले. या क्षेत्रातील दुसर्याब एखाद्या नेत्याचे मूल्यमापन करायचे झाल्यास, डॉ. आंबेडकरांच्या विचारांशी व कार्याशी तुलना होणे अगदी स्वाभाविक आहे.
परीक्षणाच्या अखेरीस सावरकरांच्या हिंदुत्वावरील जुन्याच आरोपांचा भोळे यांनी पुन्हा उल्लेख केला आहे. पण मोरे यांच्या पुस्तकाचा विषय तो नाही. एकूणच हे परीक्षण पूर्वग्रहदूषित आहे. महाराष्ट्रात विचारवंतांचेही ‘संप्रदाय बनत आहेत की काय, कारण या परीक्षणात्मक लेखात सत्यशोधनाची तळमळ नसून, विशिष्ट विचारवंतांविषयी झोंबणारी विधाने केल्याचा राग आहे. भोळे यांच्यासारखे विचारवंतही ‘खंडन-मंडनाची भीती बाळगू लागले आहेत की काय?तसे असेल तर महाराष्ट्राच्या प्रबोधनाची परंपरा सांगणाच्यांची सध्याची स्थिती अगदीच केविलवाणी झाली आहे, असे म्हणावे लागेल.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.