चर्चा – निसर्ग आणि मानव

प्रा. दि. य. देशपांडे यांच्या निसर्ग आणि मानव (आजचा सुधारक नोव्हें.डिसें. ९३) या लेखात त्यांना म्हणावयाचे आहे ते असे :
-१.-
चेतन-अचेतन असा फरक करण्याची कसोटी कोणती?माणसाला त्याच्या ठायीच्या चेतनेचा जसा स्वानुभव येतो, तिचे ज्या स्वरूपाचे आत्मभान त्याला असते तसा स्वानुभव येणे व आत्मभान भाषेद्वारा प्रकट करता येणे ही कसोटी मानली तर, प्रा. देशपांडे यांचे म्हणणे मान्य करण्यात कोणतीच अडचण नाही. पण ही कसोटी मानवकेंद्री (anthropocentric) आहे. भौतिक निर्जीव सृष्टीत चेतना कार्य करीत असते की नाही हे केवळ या स्वयंकेद्री कसोटीच्या आधारे ठरविणे सयुक्तिक आहे का?
पदार्थांमधील अणु-परमाणू परस्परांशी विशिष्ट प्रकारे संयोग पावतात, परस्परांपासून विलग होतात, काय कसे घडते याचा अभ्यास विज्ञान करते. पण असेच वर्तन का घडते याचे जे उत्तर विज्ञान देते ते अखेरीस आधिभौतिक (metaphysical) स्वरूपाचे आहे. निसर्ग नियमांनुसार कार्य करतो हे देखील अंतिमतः आधिभौतिक स्वरूपाचे स्पष्टीकरण आहे. कोणत्या नियमानुसार आपण वर्तन करावयाचे, कोणत्या परिस्थितीत व कोणाच्या उपस्थितीत वा सहवासात आपण कसे वर्तन करावयाचे या गोष्टी अणु-परमाणूंना कशा कळतात?तर, त्यांची अंतस्थ रचना व प्रक्रिया (atomic or molecular structure and processes) हीच एका अंगाने ज्ञानस्वरूप (information) असते व तिच्यात सूचनाही (instructions) अंतर्भूत असतात, असे स्पष्टीकरण विज्ञान देते. स्वतः स्वीकारलेल्या गृहीतांच्या (axioms) मर्यादांमुळे विज्ञान चेतना’ हा शब्द वापरू शकत नाही. मग ‘प्रोग्रॅम’ असा शब्द वापरणे भाग पडते.
पण निर्जीव भौतिक निसर्गसृष्टीतही नियमांना सोडून घटना, वर्तन सतत घडत आले आहे. या अनियमिततेखेरीज उत्क्रांती शक्य झाली नसती. पहिल्या सजीवाच्या निर्मितीआधी भौतिक निसर्गसृष्टी ही उत्क्रांत होत गेली. पृथ्वीलाही इतिहास आहे. नियमबद्ध अणु-परमाणू नियम तोडतात कसे? असे अपघाताने (chance) घडते हेम्हणणे, वास्तविक माणसाच्या आकलनाच्या ज्ञानाच्या मर्यादा स्पष्ट करणारे आहे.वैज्ञानिक याचे स्पष्टीकरण विज्ञानाच्या चौकटीत असे देतो की, सगळ्याच गोष्टी सर्व स्थलकाळी पूर्णपणे पूर्वनिर्धारित नसतात (indeterminate). कारण विज्ञान चेतनामान्य करू शकत नाही.
पण शिष्टमान्य असलेली विज्ञानाची ही चौकट (paradigm) भौतिकी व रसायनशास्त्रांचा वरचष्मा संपुष्टात आल्याने आज खिळखिळी होत आहे. चेतनेचीसंकल्पना अंतर्भूत करून घेतल्याखेरीज विज्ञानाचेही पाऊल पुढे पडणार नाही अशा टप्प्यापर्यंत आता आपण आलो आहोत. मन-शरीर यांचे परस्परसंबंध, मनाचे स्वरूप व कार्य यांची उकल आजवरच्या चौकटीच्या आधारे होऊ शकत नाही.
वैज्ञानिक ज्ञानसाधनेच्यासाठी अधिक योग्य व समावेशक चौकट कोणती याचा शोध व मांडणी आज केली जात आहे. Paradigmaticshift च्या दिशेने पावले पडत आहेत असे दिसते.
-२-
‘सहजप्रवृत्ती’ (instinct) या शब्दाच्या अर्थाच्या खोलीत जाण्याचा प्रयत्न केला तर काय हाती लागते?जीवांच्या वर्तनाच्या संदर्भात आपण परमाणु-जैविकी (molecular biology) च्या प्रांतात तरी शिरतो किंवा सवयीनुसार दर वेळी नव्याने विचार करून न ठरविता वागत असतात असे तरी सुचवीत असतो. परमाणू जैविकी ही विज्ञानशाखा भौतिकी व रसायनशास्त्र यांचा विस्तार मात्र आहे. सवयीने होणारे वर्तन हे सहजप्रवृत्तीनुसार घडणारे वर्तन हा अर्थ घेतला तर, सवयीच्या मुळाशी जाणे आवश्यक ठरते. ‘सहजप्रवृत्तिबद्ध जीवन जगत असताना बदल त्यांच्या नकळत घडत असतात’ असे प्रा. देशपांडे यांनी लिहिले आहे. जीवन जर पूर्णपणे बद्ध असेल तर बदल अशक्य ठरतात. पण बदल तर घडतात. नेमके काय घडते याविषयी आपल्याला ज्ञान नाही. कारण आपण (म्हणजे वैज्ञानिक) बाहेरून अभ्यास करीत असतो, आणि मानवेतर प्राणी आपल्याला समजणाच्या भाषेत संवाद करीत नाहीत. स्वतःमध्ये डोकावून आपण त्यांच्या वर्तनाचा छडा लावू शकत नाही. म्हणजे, खरे तर, बदल घडतात, पण आपल्या “नकळत घडतात, आणि विज्ञानाच्या आजच्या चौकटीत व पद्धतीनुसार त्यांचे गूढ उकलण्यास आपण असमर्थ आहोत असे म्हणावयास हवे. त्यांच्या नकळत असे म्हणून आपण आपल्या अज्ञानावर, ज्ञानाच्या मर्यादांवर पांघरूण घालतो. तो काय वागला, का वागला हे त्याचे त्यालाही कळत नाही असे आपण माणसाबद्दल अनेकदा म्हणतो. पण तसे म्हणत असतानाही ‘चेतना’ आपण नाकारीत नाही. कारणांचा गुंता उकलण्याच्या पलीकडचा आहे. एवढेच आपणास म्हणावयाचे असते.
-३-
ज्या क्लृप्तीच्या (mechanism) योगे जीवसृष्टीत उत्क्रांती घडून येते असा डार्विनने सिद्धांत मांडला ती ‘नैसर्गिक निवडीची (natural selection) प्रक्रिया प्रा. देशपांडे यांनी विस्ताराने वर्णन केली आहे. वैज्ञानिक पद्धतीच्या आधारे व त्या पद्धतीत स्वीकृत कसोट्यांच्या जोरावर कधीच सिद्ध न होऊ शकणारा एक अभ्युपगम (hypothesis) असे डार्विनच्या उपपत्तीचा दर्जा (status) आहे असे कार्ल पॉपर यांनी म्हटले आहे. मात्र ‘ज्ञानाच्या कक्षा विस्तारण्यासाठी अतिशय उपयोगी, लाभदायी ठरलेला अभ्युपगम’ असे वर्णन त्यांनी केले आहे.
प्रा. देशपांडे यांनी अभ्युपगमाची मांडणी विस्ताराने केली आहे. जीवसृष्टीत घडून आलेल्या उत्क्रांती च्या प्रक्रियेचे हे एक स्पष्टीकरण मानता येते. इतकेच. कोणतीही एक जीवजाती घेतली तर तिच्या सभासद व्यक्ती वा त्या व्यक्तींचा मिळून बनणारा समुदाय(species as a collective) यांच्या ठायी चेतनेची कल्पना करूनही मांडणी करता येईल. मानवाच्या ठायी चेतना आहे, तो कृती करतो हे स्वीकारूनही याच डार्विनप्रणीत चौकटीत मानवजातीच्या वाटचालीची उकल करणारे ‘सोशियोबायॉलॉजी नावाचे एक ‘विज्ञान’ एडवर्ड विल्सन यांनी विकसित करण्याची कसोशी चालवली आहे. या मांडणीत माणसाच्या ठायी असलेल्या चेतनेचेही एकमेव अंतिम प्रयोजन जीवसृष्टीतल्या अन्य जीवांप्रमाणेच जातिसातत्य व जातिवृद्धी साधणे हेच आहे, असे स्पष्ट करण्याचा प्रयत्न ते करतात. जी गोष्ट इतर जीव सहजप्रवृत्तींच्या आधारे साधतात तीच गोष्ट साधायला माणसाला चेतना वापरावी लागते. तत्त्वज्ञान, कला, साहित्य अशा सर्व गोष्टीही विकसित केल्या गेल्या, नीतितत्त्वे, मूल्ये जन्माला घातली; हे सर्व स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी करणे इष्ट व आवश्यक होते म्हणूनच झाले. विल्सन यांच्या म्हणण्याचा माथितार्थ असा निघतो की माणूस कृती करतो हाही गोड भ्रमच आहे. तोही रेटला, ढकलला जात असतो. बदलत्या परिस्थितीशी यशस्वी समायोजन त्याच्या हातून घडत असते, तेही तेवढ्याच आंधळेपणाने, निर्हेतुकपणे.
डार्विनच्या उपपत्तीमध्ये प्रत्येक पायरीवर असे काही ‘दुवे आहेत जे काल्पनिक (imaginative speculation) आहेत. जगण्यासाठीच्या स्पर्धेमधून, त्यासाठी कराव्या लागणाच्या संघर्षामधून, विकसित जागा (niche) व्यापणाच्या अनेक प्रजाती (varieties) एकाच प्राणिजातींमध्ये निर्माण झाल्या, हे आव्हान पत्करण्याखेरीज गत्यंतर नव्हते असे मानलेले आहे. याला आधार काय?बरे, भिन्न पर्यावरणांच्या रेट्यामधून आंतरिक बदल घडून का यावेत?ते आलेले दिसतात म्हणून कल्पनेने तर्क करावयाचा! जाणीवपूर्वक बदल करण्याची धडपड केली असे म्हणण्याची वाट मात्र स्वतःच बंद करून घेतल्यामुळे मग, अपघाताने काही सभासद (individuals) वेगळ्या घडणीचे अस्तित्वात आले व त्यांच्यातील हे आंधळे बदल नव्या पर्यावरणात जगण्याच्या दृष्टीने योगायोगाने उपकारक ठरले असे पुन्हा मानावयाचे. नवनव्या जीवजातींच्या उत्पतीचेही स्पष्टीकरण या प्रकारे देणे हे तर न पटण्यासारखे आहे. एकाच जीवजातीच्या अगणित प्रजाती निर्माण व्हायला वाव असताना असे का घडले? पण नवनव्या जाती निर्माण होत गेलेल्या दिसतात. मग पुन्हा असे घडले असे मानावयाचे. पृथ्वीवर अगणित जीवजाती अस्तित्वात का याव्यात; त्यातल्या अगणित नष्ट व्हाव्यात आणि इतर अगणित टिकून राहाव्यात असे का?उत्तरोत्तर जाणीव, आत्मभान यांची कोटी वाढत जाऊन मानवाचा अवतार का व्हावा?ही कोडीच राहतात.
आजच्या, अद्यापिही अधिकृत व शिष्टमान्य असलेल्या विज्ञानाच्या चौकटीत सुसंगतपणे बोलावयाचे झाले तर, अशा रीतीने विश्वाच्या आरंभापासून जे काही घडते आहे ते निर्हेतुक, आंधळेपणाने घडते आहे, व नेहमीच ते तसे घडणार, असेच फक्त आपणास म्हणणे भाग पडते. एकदा ही चौकट स्वीकारली की दुसरे काही करता येत नाही. माणूस गुणात्मकदृष्ट्या वेगळा आहे, तो डोळस, सहेतुक कृती करतो हा त्याचा आत्मप्रत्ययही नाकारावा लागतो. एका निर्बुद्ध, आंधळ्या निर्हेतुक व यांत्रिक प्रकारे घडत आलेल्याप्रक्रियेतून अद्भुत अशी सृष्टी निर्माण व्हावी याने आश्चर्यचकित व मुग्ध होणेही निरर्थक ठरते.
म्हणजे डार्विन वा विल्सन यांची मांडणी खरोखर स्वीकारावयाची तर मानवी कृतींचेही वेगळेपण नाकारावयास हवे.
-४-
एक गोष्ट निर्विवाद आहे. माणसासह सर्व सृष्टी, जड आणि सजीव, यांचे एकत्व? (unity) ही ती गोष्ट होय.
मानवी कृतींचीही फोड करीत करीत आपण भौतिकी व रसायन या शास्त्रांच्या चौकटीत त्यांचे अंतिम स्पष्टीकरण देऊ शकतो. जर या पातळीवरच्या सर्व घटना यांत्रिक, निर्हेतुक व आंधळ्या असल्या तर मग मानवी कृतीचा अपवाद करण्यास काही आधार नाही.
विज्ञान प्रगत नव्हते तेव्हा मनुष्य एकीकडे आणि इतर सर्व जड व सजीव सृष्टी दुसरीकडे असा भेद करणे शक्य होते. आज ती सोय उरली नाही.
माणसाच्या वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपणाचेही या एकत्वाचा भंग न करता ज्यात स्पष्टीकरण मिळते असे सिद्धांत मांडण्याखेरीज गत्यंतर नाही. विज्ञानाच्या क्षेत्रातही या दिशेने पावले पडताना दिसतात.
माणसाला ज्ञान प्राप्त होते, त्याला आकलन होते, प्रतिभेने तो गोष्टी पाहू शकतो, त्याला गोष्टी भावतात हे प्रा. दि. य. देशपांडे स्वीकारतात. मी -पणाची (l-ness) जाणीव ही प्रत्ययाची गोष्ट आहे. हा ‘मी’ कोठे स्थित असतो? मेंदू, हृदय हे अवयव शरीरातील इतर अवयवांप्रमाणेच असल्याने मींचे वास्तव्य या अवयवांमध्ये आहे असे म्हणणे अवैज्ञानिक आहे. सर्व शरीर मी-पणाने सदैव व्यापलेले असते, मी-पणा शरीराशी समकक्ष असतो असे म्हणता येईल. पण शरीरात चालणार्याल यांत्रिक (involuntary, mechanical systematic) क्रिया म्हणजे तर काही मी -पणा नव्हे. असे म्हणता येईल की मानवी शरीर हे अत्यंत प्रगत व उच्च कोटीचे व्यामिश्र असे एक सुसंघटित चैतन्य आहे, ज्याचे अगदी सूक्ष्मातले सूक्ष्म घटकही सचेतनच आहेत. अन्य सचेतन जीवांच्या तुलनेत जी आगळीवेगळी वैशिष्ट्ये माणसाच्या ठायी आढळतात त्यांचे रहस्य संघटनेच्या व्यामिश्रतेमध्ये, उच्च कोटीच्या प्रगल्भतेत आहे.
विश्वात, पृथ्वीवरील सजीव-निर्जीव सृष्टीत जी नित्य, गतिमान अशी ) नवनवोन्मेषशीलता आढळते तिच्या मुळाशी एक क्रियाशील चैतन्यतत्त्व/शक्ती (active intelligent force) आहे. तिचे कार्य आपणास अनुभवास येते. पण ती स्वतः आपणास अगम्य व अनिर्वचनीय राहते अशी मांडणी भविष्यात, नजिकच्या भविष्यात, विज्ञानाच्या क्षेत्रातही करण्याची इष्टता व आवश्यकता शिष्टमान्य व प्रतिष्ठित ठरेल अशी चिन्हे मला । दिसतात. माइंड-बॉडी प्रॉब्लेम या नावाने ओळखल्या जाणार्याठ कळीच्या मुद्द्याची वा is there a mind operating in Nature’ al ‘the factor of intelligence in the Universe’ या सारख्या प्रश्नांची / मुद्द्यांची अधिक समाधानकारक उकल करण्यासाठी विज्ञानाची चौकट (paradigm) बदलून घेतली जात असल्याचे दिसते.
-५-
विश्व ही एक विराट व्यवस्था आहे हे प्रा. देशपांडे यांना मान्य आहे. ती पूर्णपणे नियमबद्ध आहे असे ते म्हणतात. आणि नियमांचे पूर्ण ज्ञान अद्यापि आपणास झालेले नाही म्हणून आपण ‘लहरी’ हे विशेषण वापरतो असे स्पष्टीकरण ते देतात. म्हणजेच, वास्तविक व्यवस्था लहरी नाही हे तेच सांगतात. राहतो प्रश्न निर्हेतुकतेचा, व नियमबद्धतेचा. एखादी व्यवस्था पूर्णपणे नियमबद्ध असेल तर बदल, उत्क्रांती या गोष्टी अशक्य ठरल्या पाहिजेत. Mutationsनाही, वाव मग संभवत नाही. पण विश्वाची व्यवस्था ही अशी बंदिस्त (closed) व्यवस्था नाही. ती खुली, परिवर्तनीय (open-ended) आहे.म्हणजे ती पूर्णतया नियमबद्ध नाही. निर्हेतुकता गृहीत (axiomatic) धरणे जसे शक्य १ आहे, तसे सहेतुकता गृहीत धरणे तेवढेच शक्य आहे. याबाबतीत आजच्या विज्ञानाच्याचौकटीत आपणास खरे काय ते कळणे शक्य नाही असे आपण म्हणून आपल्या मर्यादेची, अज्ञानाची कबुली देणे जास्त शहाणपणाचे आहे.
व्यवस्थेला हेतू नाही : पण व्यवस्थेचे घटक असलेल्या वैयक्तिक प्राण्यांना वैयक्तिक हेतू आहेत, असे म्हणण्याची पाळी देशपांडे यांच्यावर येते. समूहपातळीवरही हेतू असतात ही गोष्ट आपण मुंग्यांचे वारूळ किंवा मधमाश्यांचे पोळे यांच्या बाबतीतही बघतो. अमर्याद १ विविधतेने समृद्ध असे जीवन ‘विकसित करणे हा पृथ्वी या विराट व्यवस्थेचा हेतु दिसतो असे म्हणायला काय अडचण आहे?मानवाकरवी हे वैविध्य नष्ट करणे व
मानवनिर्मित प्रतिसृष्टी साकार करणे हा विराट व्यवस्थेचा भावी हेतू दिसतो, असेही विधान करणे शक्य आहे. तसेच, या विराट व्यवस्थेत ओतप्रोत असलेले चैतन्यतत्त्व जीत प्रकट झालेले आहे अशा मानवजातीची उत्पत्ती करून, त्याच्याकरवी ही अद्भुत लीला जाणीवपूर्वक सृजनशीलतेने आणखी विकसित करण्याचा हेतू असावा असेही म्हणता येईल.
-६-
विश्व, जीवसृष्टी, जीवसृष्टीची उत्क्रांती यात प्रा. देशपांडे यांना ‘निर्बुद्ध शक्तीचा आढळ होतो. हा आढळ होणारा माणूस सुबुद्ध असल्याचे गृहीत धरावे लागते, एरवी हा निवाडा निरर्थक ठरेल! निर्बुद्ध शक्तीच्या निर्हेतुक, आंधळ्या, नियमबद्ध क्रियाप्रतिक्रियांमधून सुबुद्ध मानव अवतीर्ण व्हावा हा चमत्कारच नव्हे का?हे कायगौडबंगाल आहे?
विश्व, पृथ्वी, जीवसृष्टी यांची मिळून एक विराट व्यवस्था आहे असे म्हणावयाचे, पण ती सर्वस्वी आंधळी, निर्हेतुक व पूर्णपणे नियमबद्ध यांत्रिक असल्याचे प्रतिपादन आग्रहाने करावयाचे यातली विसंगती प्रा. देशपांडे यांच्या ध्यानात यायला हवी.
या विश्वाला एक निर्माता आहे, त्याने नियमांनी बद्ध अशी सृष्टी उत्पन्न केली, आणि मग कालांतराने या सृष्टीचा उपभोग घेण्यास माणूस निर्माण केला; हा माणूस मात्र गुणात्मकदृष्ट्या वेगळा व वेगळ्याच नियमांनी नियमित असा निर्माण केला. या गृहीतावर आधुनिक पाश्चात्य विधानाची तात्त्विक मांडणी केली गेली. असा स्वतंत्र, वेगळा निर्माता व त्याचे हेतु गृहीत धरले तर मग मानवेतर विश्व हे आंधळे, निर्हेतुक, नियमबद्ध मानण्यात विसंगती उत्पन्न होत नाही. ‘निर्बुद्ध शक्ती’ च्या भाषेत प्रा. देशपांडे यांना लिहावेलागले कारण ईश्वराचे अस्तित्व ते नाकारतात. त्यांच्या लक्षात यायला हवे की, ईश्वर व त्याचे हेतू नाकारल्यावर, व्यवस्थेच्या निर्मितीचा व तिच्या नियामक हेतू/लक्ष्य यांचा प्रश्न त्यांना समाधानकारकपणे सोडवायला हवा. ईश्वर व त्याचे हेतू गृहीत धरण्याच्यास निर्मित व्यवस्था (अंतर्गत मर्यादेत) निर्हेतुक यांत्रिकपणे नियमांनुसार क्रियान्वित असते असे म्हणण्याची सोय आहे. प्रा. देशपांडे यांना ती उपलब्ध नाही.
आपापल्या विशिष्ट विज्ञानशाखांमध्ये तुकड्या तुकड्यात वैज्ञानिक संशोधन करणार्याा वैज्ञानिकाला या तत्त्वज्ञानात्मक आधिभौतिक कूटप्रश्नांच्या खोलात शिरण्याची गरज नसते. परमाणू व पेशीच्या पातळीवरील जीवशास्त्रज्ञ, भौतिकी, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र इत्यादी शाखांमधील वैज्ञानिक, सामग्याने विचार क्वचित करतात. समोरचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने अनेक गोष्टी ते बाहेर ठेवतात वा गृहीत धरतात. पण ईश्वर, त्यांची सर्वशक्तिमानता, त्याचे हेतू यांचा आधार सोडावयाचा म्हटल्यावर कोणत्या तात्त्विक प्रश्नांची समाधानकारक पर्यायी उकल करणे अगत्याचे ठरते याचा शोध प्रा. देशपांडे यांच्यासारख्या तत्त्वज्ञांना घेतलाच पाहिजे.
‘म्यूटेशन्स,’ ‘चान्स,’ ‘इव्हेंट्स,’ ‘नेसेसिटी’ हे व या प्रकारचे शब्द वापरून सृष्टीतील घडामोडींचे, उत्क्रांतीचे रहस्य उकलले असा आभास होतो. वास्तविक पाहाता, ज्यांचा रहस्यभेद करणे आवश्यक आहे वा ज्यांची संगती तात्त्विक पातळीवर लावणे गरजेचेआहे असे मुद्दे यासारख्या शब्दांनी आरेखित होतात.
हेतू, लक्ष्य, intelligence, स्मृती अशा गोष्टी मानवेतर सृष्टीत नाहीत (कारण त्या ईश्वराच्या ठायी असणे पुरेसे होते) असे गृहीत धरल्याने जी परिभाषा शास्त्रज्ञांनी स्वीकारली तिचा आधार घेऊन, हा सर्व निर्बुद्ध शक्तीचा निर्हेतुक, आंधळा खेळ आहे ही गोष्ट सिद्ध होते असे म्हणणे बरोबर नाही. आजच्या प्रस्थापित शिष्टमान्य विज्ञानपद्धतीच्या चौकटीत त्या पद्धतीमागील गृहीत कृत्ये स्वीकारून काम करणारा वैज्ञानिक म्हणेल की, वैज्ञानिक ज्ञान आज नियमबद्ध, अनियमित, चान्स अँड नेसेसिटी यांच्या चौकटीतच प्राप्त करून घेण्यास, व या चौकटीतच स्पष्टीकरण देण्यास तो बांधलेलाआहे. शास्त्रज्ञ या चौकटीत संशोधन करतो तेव्हा घडामोडी (happenings) व घटना (events) म्हणूनच कृतींचादेखील विचार करायला वैज्ञानिक बाध्य असतो. तो नियमित (laws, regularities) आणि अनियमित (irregularities, chance) याच परिभाषेत बोलतो. त्याच्या चौकटीत त्याला प्राप्त होणार्या( ज्ञानाच्या आधारे तो इतकेच म्हणू शकतो की, ज्या चौकटीत मी संशोधन करतो तिच्यामध्ये आपल्याला हेतू, लक्ष्ये यांचा आढळ कधीच होणार नाही. या गोष्टी मी मुळातच माझ्या कक्षेबाहेर ठेवल्या आहेत. या प्रश्नांत मी हात न घालण्याचे पथ्य वैज्ञानिक म्हणून सांभाळावयाचे असते.’
प्रा. देशपांडे माझ्या म्हणण्याला आधार काय असे विचारतात. आधुनिक विज्ञान काय शोघते, कार्य कसे करते, कोणत्या गोष्टी गृहीत धरते, कोणते मुद्दे व प्रश्न आरंभालाच बाहेर ठेवते याबद्दलच्या अभ्यासातून माझी जी समज बनलीय ती माझा आधार आहे.
मी वर म्हटल्याप्रमाणे, विज्ञानाची आजची शिष्टमान्य चौकट अनेक वैज्ञानिकांनाहीअसमाधानकारक वाटत आहे. स्मृती (memory), बुद्धी (intelligence), उद्दिष्ट, लक्ष्य समोर ठेवून कृती यांचा आढळ त्यांना होतो. पण विज्ञानाच्या आजच्या चौकटीमुळे यांचे अस्तित्व व कार्य अमान्य केले जाताना त्यांना दिसते. म्हणून यांना सामावून घेणारी त्यांना योग्य स्थान देणारी विज्ञानाची चौकट घडविण्याचे प्रयत्न होताना दिसतात, ‘गाया (Gaia) हे पुस्तक लिहिणारा जेम्स लवलॉक, ‘माइंड अड नेचर’ लिहिणारा ग्रेगरी बेट्सन, ‘ए न्यू सायन्स ऑफ लाइफ व‘द प्रेझेन्स ऑफ द पास्ट’ या पुस्तकांचा लेखक रूपर्ट शेल्ड्रेक, ‘ऑर्डर आउट ऑफ केऑस’चे लेखकद्वय अशी काही नावे मला सांगता येतील.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.