परिसंवाद निसर्ग आणि मानव: एक अनिवार्य समग्रता – ४ प्रा. दि.य. देशपांडे यांच्या लेखाच्या निमित्ताने

प्रा. दि. य. देशपांडे यांचा साधनेतील (१४ नोव्हें. १९९२) टिपणवजा लेख वाचून मनात आलेले काही विचार म्हणा, काही शंका आणि प्रश्न म्हणा मी येथे व्यक्त करू इच्छितो. प्रा. दि. य. देशपांडे यांच्या लेखाला एक दुहेरी पाश्वभूमी आहे. एक म्हणजे मा. नानासाहेब गोरे यांचा साधनेतील (१८ जुलै ९२) लेख आणि दुसरी म्हणजे त्या लेखावरील मा. श्री. वसंत पळशीकर (साधना २९ ऑगस्ट ९२) यांची प्रतिक्रिया. माझ्या प्रस्तुत । लेखनालाही ही पाश्वभूमी अंशतः असणे स्वाभाविकच आहे. तथापि, श्री. गोरे काय किंवा श्री. पळशीकर काय, यांच्या विचारांचे खंडन अगर मंडन करावे या हेतूने मी हे लिहिलेले नाही. वरील दोन्ही-तिन्ही लेखांच्या निमित्ताने – विशेषतः श्री. पळशीकर यांच्या विचारप्रवर्तक प्रतिक्रियेच्या निमित्ताने – मनात डोकावलेले काही विचार श्री. दि.य. देशपांडे यांच्या लेखाला अनुलक्षून या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न आहे. ही मांडणी काहीशी विस्कळीत वाटेलही; मतांचा ठामपणा हेतुतः टाळण्याचा प्रयत्न केल्याने तसा समज होणे स्वाभाविक आहे. परंतु अशा महत्त्वाच्या आणि, माझ्या मते, अतिशय संकीर्ण, आणि विवादास्पद विषयांविषयी लिहीत असताना अशीच दृष्टी आणि मोकळेपणा असायला हवा असे माझे आपले मत आहे. ‘नमनालाच घडाभर तेल’ झाले हे खरे. आता मुख्य विचार धारा !
प्रारंभीच जी एक गोष्ट स्पष्टपणे नमूद करायला हवी ती ही की प्रा. दि.य. देशपांडे यांनी आपल्या टिपणाच्या सुरवातीला जीवशास्त्रीय उत्क्रांतीच्या स्वरूपाचे आणि प्रक्रियेचे जे वर्णन-विवरण केले आहे ते, अगदी शाळकरी नाही म्हटले तरी, फार तर स्नातकस्तरीय आहे असे म्हणणे भाग आहे. पण मग तेवढ्याने ते सदोष आणि गैर ठरते काय? या प्रश्नाचे उत्तर ढोबळमानाने कदाचित ‘नाही’ असेच द्यावे लागेल. मात्र त्यासोबत हेही आवर्जून ध्यानात घेणे आवश्यक आहे की आज वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र, अणु प्राणिशास्त्र, पेशी-प्राणिशास्त्र, पदार्थविज्ञानशास्त्र, भूगर्भशास्त्र इत्यादि अभ्यासक्षेत्रांमध्ये जे सीमान्त संशोधन आणि अनुसंधान होत आहे आणि त्यांचे जे संभाव्य निष्कर्ष समोर येत आहेत ते कोणत्या दिशेला अंगुलिनिर्देश करीत आहेत, अथवा या निष्कर्षामुळे उत्क्रांतिशास्त्रातील आणि प्राणिशास्त्रातील रूढ आणि आजच्या मान्यताप्राप्त संकल्पनांना कसे मुळापासून धक्के बसत आहेत, निदान त्या संकल्पना कशा प्रश्नांकित होत आहेत याची यत्किंचितही बूज वरील विवरणात प्रा. देशपांडे यांनी राखलेली नाही. परिणामी त्यांचे वर्णन-विवरण काहीसे अतिसुलभ, ढोबळ आणि दुर्दैवाने अतिठामही झालेले आहे.
वस्तुतः ग्रेगरी बेट्सन, जेम्स लवलॉक, रेने दूबाँ, डेव्हिड बोम, रूपर्ट रोलड्रेक यांच्यासारख्या आजच्या अग्रगण्य वैज्ञानिकांच्या संशोधनांचे निष्कर्ष किंवा त्यांनी पुरस्कारलेल्या परिकल्पनांचे वा गृहीतकांचे संकेतार्थ इतके क्रांतिकारी वाटतात की त्यामुळे रूढ प्राणिशास्त्रीय संकल्पना किंवा प्रस्थापित भौतिकीय गृहीतके मोडीत निघतील की काय अशी शंका मनात डोकावते. उदाहरणच द्यायचे झाल्यास, चेतन आणि अचेतन यांच्यातील सीमारेषा किती धूसर आणि विरळ झाल्या आहेत याची भौतिकीमधील अलीकडच्या संशोधनांची सामान्य माहिती असणारांना चांगलीच कल्पना आहे. जडता आणि चैतन्य यांच्या आधारावर निसर्गाची मूलभूत विभागणी करणे गैर आहे अशाप्रकारचे मत व्हाइटहेडने मागेच व्यक्त करून ठेवले होते. इतकेच नव्हे तर ‘प्राणिशास्त्र म्हणजे मोठ्या जीवाणूंचा अभ्यास तर भौतिकी म्हणजे सूक्ष्म जीवाणूंचे अध्ययन अशीच व्याख्या त्याने केली होती. वस्तुस्थिती अशी असताना प्रा. देशपांडे ज्यावेळी ज्याला आपण निसर्ग म्हणतो तो प्रथम भौतिक निर्जीव पदार्थांचा… बनलेला आहे आणि भौतिक निसर्ग हा पूर्णतः अचेतन आणि निर्जीव आहे अशी विधाने ठामपणे करतात त्यावेळी काय म्हणावे?
‘व्हाइटहेड आता जुना झाला हो, असे यावर कुणी म्हणेलही! परंतु त्याने फारसा फरक पडत नाही. आजच्या क्वॉन्टम पदार्थविज्ञानाने भौतिक वस्तुजाताच्या स्वरूपाचे जे स्पष्टीकरण दिलेले आहे ते ध्यानात घेतल्यास जड आणि चेतन किंवा निर्जीव आणि सजीव अशा हवाबंद संकल्पना गतार्थ झाल्या आहेत असेच लक्षात येईल. आजपर्यंत रूढ कल्पनांना अनुसरून आपण भौतिक वस्तुजाताचे सामान्यपणे जे व्यवच्छेदक गुणधर्म मानीत आलो आहोत ते तीनही गुणधर्म क्वॉन्टम पदार्थविज्ञानाने एकप्रकारे गतार्थ केले आहेत. (१) गतीचे सर्वसामान्य सातत्य (कन्टिन्युइटि ऑफ मुव्हमेन्ट), (२) इलेक्ट्रॉनसारखे घटक कधी पार्टिकलसारखे तर कधी लहरींसारखे तर आणखी कधी या दोहोंमधील अवस्थेसारखे वागतात. इतकेच नव्हे तर – आणि हा मुद्दा अधिकच महत्त्वाचा आहे – इलेक्ट्रॉनचे हे वैविध्यपूर्ण स्वरूप कधी पर्यावरणीय घटकांवर तर कधी चक्क प्रयोग करणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून असल्याचे दिसून आलेले आहे. (३) स्थानिकता (लोकॅलिटी) हा जडाचा महत्त्वाचा व्यवच्छेदक नेहमीच मानण्यात आला आहे. पण आता ती सोयही उरलेली दिसत नाही. इलेक्ट्रॉनसारखे दोन घटक जर एकत्र येऊन त्याचे एक मॉलिक्यूल तयार झाले आणि नंतर पुनश्च त्या मॉलिक्यूलचे विभाजन झाले तर त्या दोन घटकात एक विलक्षण, स्थाननिरपेक्ष असा संबंध प्रस्थापित होत असतो असे ‘ई.पी.आर्.’ म्हणून परिचित असलेल्या प्रयोगातून सिद्ध झाले आहे ! याचा अर्थ काय ? याचा अर्थ असा की परस्परांपासून अंतरावर असलेल्या दोन घटकांमध्ये एकप्रकारचा स्थाननिरपेक्ष आणि पर्यायाने सातत्यविरहित असा कार्यकारणसंबंध अस्तित्वात असू शकतो. वरील तीन मुद्दे नीट लक्षात घेतल्यास सजीव आणि निर्जीव यांच्यात हवाबंद भिंती उभ्या करणे किती अशास्त्रीय ठरेल याची कल्पना यावी. परंतु याचा संकेतार्थ एवढ्यावरच थांबत नाही. क्वॉन्टम भौतिकीच्या या निष्कर्षांचा गर्भितार्थ किती मूलगामी आहे याचे स्पष्टीकरण डेव्हिड बोम’ यांच्या खालील उद्गारांवरून नीट ध्यानात येईल. (शास्त्रीय निष्कर्ष आणि वैज्ञानिक परिभाषेचा अभाव यामुळे बोम यांचे म्हणणे मला इंग्रजीमधूनच उद्धृत करणे भाग आहे याचा खेद होतो.) “Thus, if all actions are in the form of discrete quanta, the interactions between different entities (e.g. electrons) con stitute a single structure of indivisible links, so that the entire universe has to be thought of as an unbroken whole. In this whole each element that we can abstract shows basic properties (wave or particle etc.) that depend on its overall environment, in a way that is much more reminis cent of how the organs constituting living beings are related, than it is of how parts of a machine interact. Further, the non-local, non-causal nature of the relationships of elements distant from each other evident ly violates the requirements of separateness and independence of fun damental constituents that is basic to any mechanistic approach.” Figur विश्व ही एक अक्षुण्ण अशी समग्रता अथवा एकसंधता आहे ही बोम यांची संकल्पना विशेष लक्षणीय आहे ! या समग्रतेला अधिष्ठानभूत असणारी एक अव्यक्त (‘इम्प्लिकेट) व्यवस्था असून तिचाच पायरीपायरीने होणारा आविष्कार म्हणजेच निसर्ग, मानव, विश्व होय अशा स्वरूपाची एक विचारसरणी प्रा. बोम यांनी मांडलेली दिसते. प्रा. बोम हे लंडनच्या बबेक महाविद्यालयातील सैद्धान्तिक भौतिकीचे जगद्विख्यात प्राध्यापक आहेत हे लक्षात घेतल्यास त्यांनी मांडलेले गृहीतक एखाद्या तव्हेवाईक डॉन क्रिक्झोटचे अकलेचे तारे म्हणून झटकून टाकणे सहजासहजी शक्य होईल असे वाटत नाही. ज्यावेळी श्री. वसंत पळशीकर ही पृथ्वी एक सचेतन, समग्रताप्रधान अशी व्यवस्था आहे अशा प्रकारची विचारसरणी ध्वनित करतात त्यावेळी त्यांच्याही मनात असलीच एखादी कल्पना असण्याचा संभव नाकारता येत नाही. अलीकडे अनेक तत्त्वज्ञ- विचारवंतांना ‘जीवनाची समग्रता’ अथवा ‘विश्वाची एकसंधता असल्या कल्पना – अगदी विनोबांच्या स्थितप्रज्ञ दर्शनाइतक्याच – भोंगळ आणि अशास्त्रीय वाटतात ! परंतु एका पदार्थविज्ञानाच्या संशोधकाने वर जो निर्वाळा दिला आहे त्या आधारे या कल्पनेचाही थोडा मोकळेपणाने आणि गंभीरपणे विचार व्हायला हरकत नसावी. एरवी विज्ञानाच्या क्षेत्रातही सिंघलवादाने (विश्व हिन्दू परिषदेचे आडमुठे कार्यवाह) मुसंडी मारली की काय अशीच शंका घ्यावी लागेल.
प्रा. बोम यांच्या भौतिकशास्त्रातील वरील गृहीतकाशी मिळत्याजुळत्या गृहीतकांच्या आधारे आजच्या प्राणिशास्त्रात, बीजाणुशास्त्रात अथवा जीवशास्त्रात जे सीमान्त अनुसंधान चालू आहे व त्याचे जे प्रायोगिक परंतु काहीसे ‘टेंटेटिव्ह’ असे निष्कर्ष हाती आले आहेत त्यांनी उत्क्रांतिविषयक रूढ आणि प्रस्थापित ज्ञानाच्या व निष्कर्षांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न, शंका आणि आव्हाने निर्माण केली आहेत. रूढ अथवा प्रस्थापित सिद्वान्तांच्या साक्षीने प्रा. दि.य. देशपांडे आपल्या लेखात एका ठिकाणी म्हणतात, “नवीन जीवजातीच्या उत्पत्तीला….. वैयक्तिक किरकोळ भेदांव्यतिरिक्त ज्यांना ‘म्यूटेशन्स’ म्हणतात ते मधूनच घडून येणारे (म्हणजेच ‘अपघाताने अथवा ‘चान्सने घडून येणारे ? हे शब्द माझे आहेत.) मोठाले भेदही कारणीभूत होतात….. कालान्तराने एक नवीन जीवजाती निर्माण होते. पण याही प्रक्रियेत कोठे हेतुपूर्णतेचा मागमूसही दिसून येत नाही.”
प्रा. देशपांडे यांच्या या विवरणाचा थोडा विस्ताराने विचार व्हायला हवा. वस्तुतः वैश्विक उत्क्रांतीच्या एकूण प्रक्रियेमधील सजीवाची निर्मिती हे प्रकरण आजही अत्यंत अंधुक, अस्पष्ट आणि रेने दूबाँ याने म्हटल्याप्रमाणे ‘फझी’ (fuzzy) आहे. सचेतनाचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे बीजाणूतील (gene) न्यूक्लेइक आम्ल असे आज मानतात. फार काय, त्यालाच प्रायः ‘जीवतत्त्व’ म्हणून मानले जाते असे म्हटले तरी चालेल. “सजीवाच्या निर्मितीमधील ‘कळीचा क्षण म्हणजे स्वजातिजननाची क्षमता न्यूक्लेइक आम्लाच्या परमाणूंचे अपघाती मिश्रण” असे मुळी अॅसिमॉव्हने म्हटलेच आहे. प्रा. देशपांडे यांना ही विचारसरणी पूर्णतः मान्य व्हायला हरकत नाही.
या बाबतीत हे ध्यानात घ्यायला हवे की अनेक मातब्बर जीवशास्त्रज्ञांना वरील उपपत्ती मान्य नाही. अनेकांच्या मते न्यूक्लेइक आम्लांचे संघटन इतके संकीर्ण असते की स्वजातिनिर्मितीची क्षमता असणारे सूक्ष्माणू होण्याचे श्रेय त्या आम्लाला देणे शक्य नाही. दुसरे असे की न्यूक्लेइक आम्लांच्या संश्लेषणाच्या साह्याने आजपर्यंत जगातील कुठल्याही प्रयोगशाळेत सजीवाची निर्मिती झालेली नाही. याउलट, मॉस्कोमध्ये सन १९५९ मध्ये भरलेल्या एका जीवशास्त्रज्ञांच्या परिपदेत असे सामान्यपणे मानण्यात आले की आदिम पर्यावरणाच्या काळातच आज सजीवांमध्ये दिसून येणाऱ्या द्रव्यांशी साधर्म्य असणाऱ्या द्रव्यांची निर्मिती झाली व यांपैकीच काही द्रव्यांच्या ठिकाणी स्वजातिनिर्मितीची क्षमता असली पाहिजे. उत्क्रांतिवादाच्या रूढ सिद्धान्ताहून ही विचारसरणी किती भिन्न आहे हे वेगळे स्पष्ट करण्याची गरज नाही. आणखी असे की आज अस्तित्वात असलेल्या सजीवांच्या आधारावरच आपण जडापासून चेतनाची निर्मिती कशी झाली असेल याविषयीचे कयास करतो. वस्तुतः या संदर्भात उपलब्ध असलेला पुरावा मुळातच अतिशय अपूर्ण आहे हे मान्य करणे भाग आहे. अशा निर्णायक पुराव्याच्या अभावीच आपण कधी ‘चान्स’, तर कधी ‘अपघात’ तर कधी ‘निर्हेतुकता असल्या शब्दांचा वापर करीत असतो. वस्तुतः तार्किकदृष्ट्या विचार केल्यास ‘चान्स’ अथवा ‘अपघात’ अथवा ‘निर्हेतुकता’ ह्या प्रयोगान्ती हाती आलेल्या गोष्टी (फाइन्डिग्ज) नव्हेत. ती मूल्यात्मक विधाने आहेत; व त्यांचे तार्किक स्वरूप एखाद्या नैतिक विधानाप्रमाणे पूर्णपणे व्यक्तिनिष्ठ आहे; वस्तुनिष्ठ नाही. विज्ञान आपल्याला केवळ ज्ञान देते व त्याचा नीतीशी संबंध नसतो असे एकीकडे म्हणायचे आणि दुसरीकडे मात्र त्याच दमात अमुक प्रक्रिया चान्सने अथवा अपघाताने घडून येते असे व्यक्तिनिष्ठ विधान करायचे यातील तर्कदोष तर अगदी सरळच आहे ! ग्रेगरी बेट्सन, आर. डी. लेंग इत्यादींच्या मते या तर्कदोषाच्या बुडाशी उत्क्रांतिप्रक्रियेकडे बघण्याचा आपल्या दृष्टिकोनामधील एक ज्ञानशास्त्रीय दोष (‘एपिस्टिमॉलॉजिकल एरर’) असून तो दोष थेट डार्विनपासून चालत आलेला आहे. ज्ञान आणि नीती, वस्तुस्थिती आणि मूल्य, प्रयोगकर्त्याच्या पातळीवरील वैयक्तिकतेचे हेतुपुरस्सर निराकरण करण्याचा (मुळात ‘व्यक्तिगत असलेला) निर्णय इत्यादि आजच्या नीतिविचारात पुनःपुन्हा निर्माण होणाऱ्या समस्या म्हणजे वस्तुतः वरील ज्ञानशास्त्रीय दोषाचाच वारसा आहे.
हा दोष आपल्याला थोडक्यात खालीलप्रमाणे स्पष्ट करता येईल. ग्रेगरी बेटसनच्या मते मन आणि निसर्ग ही एक अटळ अशी समग्रता आहे. निसर्गाचे संघटन आणि मानवी मनाची रचना परस्परांची प्रतिबिंबे आहेत ! परिणामी त्याच्या विचारात ज्ञानप्रक्रियेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. मनाचे स्वरूप आणि मनाची परिभाषा यांसंबंधी त्याचे चिन्तन अत्यंत मूलगामी आहे. त्याच्या मते ‘मन’ ही एका अत्यंत संकीर्ण अशा व्यवस्थेची निर्मिती आहे. मात्र ती व्यवस्था म्हणजे मन नव्हे. याचा अर्थ असा की जीवाणूच्या संदर्भात मेंदू आणि मज्जासंस्था यांच्या निर्मितीच्या पूर्वीही मन अस्तित्वात असते. कारण मन, मागे सांगितल्याप्रमाणे, एका बंधाची (पॅटर्न) अथवा व्यवस्थेची निर्मिती आहे. सचेतन शरीराच्या बाहेर देखील त्यामुळे मनाच्या अस्तित्वाची कल्पना करता येते. बेटसनच्या दृष्टीने जीवसृष्टीच्या बुडाशी असलेले व्यवस्थेचे तत्त्व अथवा बंधतत्त्व मूलतः मनोमय असून अचेतनातसुद्धा मनाचे अस्तित्व असल्याने ज्याला आपण सामान्यपणे जड म्हणतो ते देखील सजीवाचेच वेगवेगळे स्तर आहेत. अशा रीतीने त्याने ‘सजीव’ आणि ‘निर्जीव’ यांचे एक नवे संश्लेषण पुरस्कृत केले व त्याचे हे गृहीतक एका बाजूने जसे यांत्रिक भौतिकवादापासून मुक्त आहे तसेच दुसऱ्या बाजूने ते पारलौकिकही नाही. बेटसन म्हणतो, “We would correct the nineteenth century thinkers, not by adding a non-stochastic mind to the evolutionary process, but by proposing that thought and evolution are alike in shared stocasticism. Both are mental processes”. बेटसनची भूमिका किती स्पष्ट आहे ! जाता जाता, एका मुद्द्याकडे सहज लक्ष वेधले पाहिजे व तो म्हणजे शरीर व मज्जासंस्था यांची अपेक्षा नसताही मनाची पूर्व उपस्थिती व त्या अनुषंगाने होत जाणारी उत्क्रांती आणि मागे उल्लेखिलेली बोमची अव्यक्त व्यवस्थेची संकल्पना यातील लक्षणीय साधर्म्य !
बेटसनच्या विचारात जसे एक नवे ज्ञानशास्त्र अध्याहृत आहे तसेच त्याला अनुकूल असे एक आवर्ती तर्कशास्त्रही त्याला अभिप्रेत आहे. रूढ तर्कशास्त्र एका कार्यकारणभावाच्या नियमाने एकदिशीय असा प्रवास करणारे आहे. ते आवर्ती अथवा वर्तुळात्मक नाही. परिणामी रूढ तर्कशास्त्राच्या चौकटीत ज्यावेळी आपण सजीवाच्या उत्क्रांति-प्रक्रियांचे वर्णन करतो त्यावेळी आपल्याला एकप्रकारच्या आन्तर्विरोधाचा सामना करावा लागतो. खरे म्हणजे अनेकदा अशीच परिस्थिती यांत्रिक प्रक्रियांचे विशेषतः ज्या यांत्रिक प्रक्रिया पार्श्वपुष्टीच्या (feedback) व्यवस्थेवर बेतलेल्या असतात अशा- प्रक्रियांचे वर्णन करतांनासुद्धा आपल्याला असल्याच आन्तर्विरोधास तोंड द्यावे लागते. ही कल्पना स्पष्ट करण्यासाठी बेटसन नेहमी थर्मोस्टॅटचे उदाहरण देत असतो. उदाहरणार्थ, खोलीचे तापमान ज्यावेळी फार खाली जाते त्यावेळी आपोआप हीटर सुरू (ऑन) होते; आता हीटर सुरू राहिले तर खोलीचे तापमान वाढत जाते आणि ज्यावेळी ते ठराविक उष्णतामानापेक्षा जास्त उष्ण होते त्यावेळी आपोआप हीटर बंद (ऑफ) होते. ही प्रक्रिया स्पष्टपणे आवर्ती आहे. म्हणजेच असे की “ज्यावेळी बटन ऑन असते त्याचवेळी एका अर्थाने ते ऑफही असते; व ज्यावेळी ते ऑफ असते त्याचवेळी ते ऑनही असते.” बेटसनच्या मते या आन्तर्विरोधाचे कारण असे आहे की कार्यकारणभावाची प्रक्रिया मुळात एक कालसापेक्ष अशी प्रक्रिया आहे; याउलट, तर्कशास्त्र मूलतः कालनिरपेक्ष आहे. आवर्ती अथवा वर्तुळात्मक तर्कपद्धतीचे महत्त्व बेटसनच्या विचारसरणीत अगदी अनन्यसाधारण आहे व ते स्वाभाविकही आहे. कारण त्याच्या मते उत्क्रांती ही एक व्यवस्थानिर्मिती अथवा घाटनिर्मिती आहे !
कोणत्याही एका अथवा एका गटाच्या वैज्ञानिकाच्या विचारांचा पुरस्कार करावा अथवा अमुक एक सिद्धान्तच अखेरचा शब्द आहे असे मांडावे अशी या टिपणवजा लेखाची भूमिका अजिबात नाही हे येथे निःसंदिग्धपणे स्पष्ट करावयाचे आहे. मात्र या सोबतच हेही स्पष्ट व्हावे अशी अपेक्षा आहे की अनेक शास्त्रांतील (पदार्थविज्ञान, जीवशास्त्र, वनस्पतिशास्त्र इ.) रूढ आणि एकप्रकारची ‘ऑफिशियल मान्यता प्राप्त झालेल्या अनेक सिद्धान्तांना, गृहीतकांना आणि विचारांना कधी मोडीत काढणारे, तर कधी प्रश्नांकित करणारे जे सीमान्त संशोधन वरील ज्ञानशाखांमधून चालू आहे त्यांची यथोचित दखल घेणेही तितकेच आवश्यक आहे. इतकेच नव्हे तर या नव्या निष्कर्षांच्या आधारे मानवी जीवनाच्या सर्वच क्षेत्रांच्या पुनर्विचाराची गरजही मान्य करायला हवी. तसे न करता विज्ञानाच्या क्षेत्रातही एकप्रकारची रूढिप्रधान, ‘सिंघलवादी भूमिका स्वीकारून त्या दंडुक्याने, वेगळा विचार करणारांना, हाणत सुटणे अयोग्य आणि असमंजसपणाचे ठरेल. याउलट, असे न करता नव्या ज्ञानाच्या निष्कर्षांच्या संकेताची यथार्थ अशी दखल घेऊन अखिल मानवी जीवनाच्या आणि समाजाच्या पुनर्बाधणीसाठी योग्य ठरेल अशा नव्या ‘पॅराडाइम’चा शोध घेणे हे आधुनिक विचारवंताचे, माझ्या मते, आद्य कर्तव्य आहे. अनेकांनी या नव्या पॅराडाइमलाच ‘समग्रता’ (होलिझम् ) अथवा ‘जीवनाची एकसंधता’ असे नाव दिले आहे.
तात्पर्य हे की जड-चेतनाचे स्वरूप असो की सचेतनाच्या उत्क्रांतीची प्रक्रिया असो. या बाबी इतक्या संकीर्ण आहेत की आज उपलब्ध असलेल्या नव्या संशोधनाच्या संदर्भात त्यांच्यासंबंधी कोणतीही एकांगी भूमिका ठामठोकपणे स्वीकारणे शास्त्रीय वृत्तीचे ठरणार नाही. उदाहरणार्थ, विख्यात जीवशास्त्रज्ञ रेने दुबाँ याने वनस्पतींच्या संदर्भात सर्जनशीलतेचा आणि एकंदर उत्क्रांतीच्या संदर्भात सहेतुकतेचा जो मुद्दा उपस्थित केला आहे तो निश्चितच उपेक्षणीय नाही. या संदर्भात ‘लायकेन (दगडफूल, शेवाळे इ.) संबंधीचे प्रयोग अतिशय महत्त्वाचे ठरले आहेत. सामान्यपणे लायकेन ही वनस्पती आहे असे समजतात; मात्र वस्तुस्थिती अशी आहे की परस्परावलंबी व परस्परसहचारी अशा दोन भिन्न सूक्ष्मजीवाणूंपासून ते बनलेले असतात ! प्रत्येक लायकेन म्हणजे एका विशिष्ट प्रकारच्या शेवाळजातीच्या परस्परसाहचर्यातून व विशिष्ट प्रकारच्या बुरशीच्या जातीच्या साहचर्यातून निर्माण झालेले असते. व हे दोन्ही सूक्ष्मजीवाणू परस्परांशी इतके निगडित असतात की त्यांना वेगवेगळे करणे अत्यंत अवघड असते. विशेष म्हणजे या विलक्षण साहचर्यातून अशा रासायनिक द्रव्यांची निर्मिती होत असते (उदा. सुगंधी द्रव्ये, लिटमस रंग इ.) की जी निर्मिती या भिन्न घटकांमधील ज्ञात गुणधर्मांपासून होणे असंभव होते. म्हणजेच असे की हे साहचर्य सर्जनशील ठरते. सर्जनाची ही क्षमता – अशी क्षमता की ज्यामुळे अनपेक्षित असे नवे कार्य, नवी रचना आणि नवे गुणधर्म निर्माण होतात – सर्जनाची ही क्षमता कशी आली आणि कुठून आली हे एक गूढच नाही काय ? याला कुठलेही यांत्रिक स्पष्टीकरण देता येत नाही. या सर्जनशीलतेची दखल घेण्याची गरज भासल्यानेच लिऑन रोझेनफेल्ड या डॅनिश सैद्धान्तिक पदार्थविज्ञानशास्त्रज्ञाने ‘परिणामसापेक्ष कार्यकारणसबंधाचा नवा सिद्धान्त मांडला आहे. एखाद्या जीवाणूचे कार्य (फंक्शन) काय आहे हे आपल्याला जोपर्यंत अगोदरच समजत नाही तोपर्यंत त्या जीवाणूच्या संघटनेविषयी कोणतेही निश्चित ज्ञान आपल्याला होऊ शकत नाही, हा या प्रमेयाचा मथितार्थ आहे. कार्य (फंक्शन) व हेतू (पर्पज) यात फरक आहे हे खरे. परंतु ही उडी फार उंच नाही हेही तितकेच खरे आहे.
सहेतुकतेच्या संकल्पनेला (Teleology) अगदी चिमट्याने सुद्धा स्पर्श करू नये असे मानणारांचा एक वर्ग आहे हे खरे आहे. त्याची कारणेही स्पष्टच आहेत. त्या संकल्पनेला धार्मिकतेचा, अध्यात्माचा वास आहे. परंतु या सोबतच हेही आपण विसरता कामा नये की कोणत्या ना कोणत्या स्वरूपात, मागल्या दाराने का होईना या सहेतुकतेच्या संकल्पनेला मानल्याखेरीज अनेक जीवशास्त्रीय प्रक्रियांमधील परिणामांचे, कार्यांचे आणि जडणघडणीचे समाधानकारक स्पष्टीकरण देता येत नाही याचे भानही आज अधिकाधिक वैज्ञानिकांना होत आहे. आजच्या जीवशास्त्रीय अभ्यासकांची ही जी गोची आहे तिचे मोठे मजेशीर वर्णन रेने दूबाँ याने केले आहे. त्याच्या मते सहेतुकता ही एक अशी लावण्यवती पण काहीशी चावट नि अवखळ स्त्री आहे की जिच्याशी चाळे करायला सर्वच जीवशास्त्रज्ञांना आवडते; मात्र तसे करताना आपल्याला कुणी बघायला नको असेही वाटत असते ! या अनवस्थेतून सुटका व्हावी म्हणून अलीकडे ‘Teleology’ ऐवजी ‘Teleonomy या शब्दाचा वापर करण्यात येऊ लागला आहे. ‘सर्वंकष सहेतुकता’ असा वस्तुतः या नव्या संकल्पनेचा अर्थ आहे. खरे म्हणजे हा शब्दांचा खेळ आहे ! वस्तुस्थिती अशी आहे की आज बहुतांश जीवशास्त्रज्ञांना असे वाटते की “आपल्या जडणघडणीच्या आणि कार्य व परिणाम यांच्या माध्यमातून सचेतनाचे जे वर्तन आपण बघतो त्यामागे निश्चितपणे कुठला ना कुठला हेतू अथवा ध्येय आहे; आणि हे ध्येय व्यक्तीच्या तसेच तिच्यापुढील पिढ्यांच्या कल्याणाचे ध्येय आहे. जीवाचे मूळ भूतकाळात रुतले आहे आणि भविष्यात त्याची भूशिरे शिरलेली आहेत.” आणि म्हणूनच जडणघडण आणि गुणधर्म यांच्या मर्यादित आधारावर जड आणि चेतन, निर्जीव आणि सजीव असा भेद करणे सर्वथैव गैर आहे. जीवनाची, निसर्गाची समग्रता येथे पुन्हा एकदा तारांकित होते हे मुद्दाम स्पष्ट करण्याची गरज नसावी.
रूपर्ट शेलड्रेकच्या नव्या जीवनविज्ञानविषयक प्रमेयाचा येथे उल्लेख करणे आवश्यक आहे. शेलड्रेक जितका जगद्विख्यात आहे तितकाच तो वादग्रस्तही आहे याची जाणकारांना कल्पना आहेच. सुमारे अकरा वर्षांपूर्वी ‘ए न्यू सायन्स ऑफ लाइफ हे त्याचे पुस्तक सर्वप्रथम प्रसिद्ध झाले त्यावेळी जीवशास्त्रीय अभ्यासकांत जणू हलकल्लोळ माजला. ‘नेचर’ या विख्यात पत्रिकेतील अग्रलेखात ‘ए बुक फॉर बर्निंग’ अशा जळजळीत शब्दात त्या ग्रंथातील प्रमेयाच्या अक्षरशः चिंधड्या उडविण्यात आल्या ! मात्र त्याही वेळी जगातील अनेक जीवशास्त्रज्ञांनी शेलड्रेकच्या संकल्पनेच्या मौलिकतेला ‘नेचर’मधूनच आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करून एकप्रकारे दाद दिली होती. आता गेल्या अकरा वर्षांच्या काळात परिस्थिती इतकी बदलली आहे की १९८२ मध्ये टेरिटाऊन ग्रूपने शेलड्रेकच्या गृहीतकाची सर्वोत्तम कसोटी शोधून काढणाराला दहा हजार डॉलर्सचे पारितोषिक घोषित केले. लगेच ‘न्यू सायन्टिस्टनेही हे गृहीतक सिद्ध करणाऱ्या प्रयोगक्षम डिझाइनचा शोध लावणारालाही असाच पुरस्कार जाहीर केला. मुद्दा असा की शेलड्रेकच्या संकल्पनेची वादग्रस्तता कमी होऊन त्यातील मूलभूत मौलितकेची जाणीव व्यापक होऊ लागली. डॉ. निक हम्फरी या एका पुरस्कारविजेत्या संशोधकाने असे सुचविले की शेलड्रेकचे गृहीतक जर खरे मानले तर एखाद्या कोड्यामधील लपलेली प्रतिमा, ते कोडे अनेक लोकांना दाखविल्यानंतर, ज्या लोकांनी ते कोडे आतापर्यंत बघितलेले नाही अशा लोकांना जर ते दाखविले तर नंतरचे लोक कोड्यात लपलेली प्रतिमा सुरवातीच्या लोकांच्या तुलनेत अधिक लवकर, म्हणजेच कमी अवधीत ओळखू शकतील आणि प्रयोगातील हे लोक परस्परांपासून शेकडो मैल अंतरावर असतील!
शेलड्रेकप्रणीत ज्या गृहीतकाच्या सिद्धीसाठी हा प्रयोग करण्यात आला त्या गृहीतकास शेलड्रेकने ‘आकृतिप्रधान कार्यकारणबंध’ (फॉर्मेटिव्ह कॉझेशन) असे म्हटले आहे. यातील मुख्य कल्पना अशी आहे : आज निसर्गात आपल्याला जे बंध अथवा जी जडणघडण दिसते ती नेमकी तशीच असण्याचे कारण हे आहे की भूतकाळातही ती तशीच होती. म्हणजेच एकप्रकारची पुनरावृत्ती. एखाद्या सचेतन रसायनातील सूक्ष्माणूंची रचना जर आज आपल्याला एका विशिष्ट घाटाची दिसत असेल तर ती तशीच असण्याचे कारण म्हणजे पूर्वीही ती तीच होती. एखाद्या वनस्पतीची वाढ एका विशिष्ट पद्धतीने का होते ? तर पूर्वीही ती तशीच होत होती म्हणून ! आता पूर्वी म्हणजे केव्हा ? असा प्रश्न आपण विचारू शकतो. परंतु तर्कशास्त्रीय दृष्टीने हा प्रश्न जीवशास्त्रीय नसल्याने त्या प्रश्नाचे उत्तर देण्यास शेलड्रेक बांधलेला नाही. तसाच विचार केल्यास हा प्रश्न पूर्णपणे यंत्रवादी भौतिकवादी भूमिका घेणारालाही विचारता नाही का येणार ? सर्वकाही निर्हेतुक निसर्गनियमानुसार घडते असे तो म्हणेल ! पण केव्हापासून ? तर पूर्वीपासून ! पण म्हणजे केव्हापासून ? तर ‘बिगबँग (Big Bang) पासून असे उत्तर कदाचित तो देईल. पण मग बिगबँगच्यापूर्वी निसर्गनियम नव्हते काय ? आता चूप बसायचे; झाले ! तेव्हा हा प्रश्न एकप्रकारचा अनंत पुच्छप्रवास आहे व त्याला न निघालेलेच बरे ! याउलट शेलड्रेकच्या गृहीतकाच्या संभाव्यतेविषयी करण्यात आलेल्या एका प्रयोगशाळेतील प्रयोगासंबंधी थोडी माहिती करून घेणे आपल्या चर्चाविषयाच्या दृष्टीने अधिक उद्बोधक ठरेल याची मला खात्री आहे.
यांत्रिक जीवशास्त्रात जन्मगत वर्तन आणि शिक्षित वर्तन यांत मूलभूत भेद करण्यात येतो. यातील जन्मगत वर्तन हे ‘डीएनए’मधील सूक्ष्माणूंच्या विशिष्ट रचनेवरच सर्वस्वी अवलंबून असल्याचे मानतात, आणि शिक्षित वर्तन हे मज्जाव्यवस्थेतील शारीरिक-रासायनिक परिवर्तनातून निष्पन्न होत असते असे मानतात. विशेष म्हणजे अर्जित अथवा शिक्षित वर्तनाच्या संघाताने ‘डीएनए’च्या रचनेवर कुठलाही परिणाम होत नसल्याने अर्जित वर्तन कुठल्याही प्रकारे आनुवंशिक मानले जात नाही. मात्र या सुप्रस्थापित निष्कर्षाला प्रश्नांकित करतील असे निष्कर्ष अलीकडील काही प्रयोगांच्या साह्याने काढण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, एखादा प्राणी, समजा पांढरा उंदीर, जर एक विशिष्ट वर्तनसंघात शिकला असेल तर तोच वर्तनसंघात शिकण्यासाठी त्या जातीच्या उंदरांना लागणारा वेळ पूर्वीपेक्षा कमी असतो. इतकेच नव्हे तर तो वर्तनसंघात अर्जित करणाऱ्या उंदरांची संख्या जितकी जास्त असेल त्या प्रमाणात नंतरच्या उंदरांच्या संघात शिक्षणाची प्रक्रिया आणखी जास्त जलद झाल्याचे आढळले. म्हणजे असे की समजा लंडन मधील एका प्रयोगशाळेत जर हजारो उंदरांना एक विशिष्ट वर्तनसंघात शिकविण्यात आला, तर तशाच प्रकारच्या न्यूयॉर्कमधील प्रयोगशाळेतील उंदरांना तोच वर्तनसंघात शिकण्यासाठी तुलनेने कितीतरी कमी वेळ लागेल ! आणि या परिणामामागे दोन प्रयोगशाळांतील उंदरांमधील कोणत्याही प्रकारचा – शारीरिक अथवा इतर कोणताही – संबंध अथवा संक्रमण अजिबात अस्तित्वात नाही ! चमत्कार वाटावा असा हा प्रयोग आहे व जिज्ञासूंनी शेलड्रेकच्या ‘ए न्यू सायन्स ऑफ लाइफ’ या ग्रंथातून मुळातूनच त्याची सविस्तर माहिती करून घ्यावी.
हे कसे घडून आले ? अर्थात सर्वमान्य असे उत्तर याला अजून सापडलेले नाही. तथापि, शेलड्रेकप्रणीत दोन गृहीतकांच्या साह्याने याचे सर्वाधिक समाधानकारक उत्तर मिळू शकते व ती दोन्ही गृहीतके शंभर टक्के प्रयोगक्षम आहेत असे मानण्याकडे आज अधिकाधिक जीवशास्त्रज्ञांचा आणि पदार्थविज्ञन शास्त्रज्ञांचाही कल आहे यात शंका नाही. ही दोन गृहीतके म्हणजे ‘आकृतिप्रधान कार्यकारणबंध’ (फॉर्मेटिव्ह कॉझेशन) आणि ‘गतिशील प्रतिध्वनिक्षेत्र (मोटर रेसोनन्स फील्ड) ही होत. या सिद्धान्ताच्या आधारे शेलड्रेकचे काढलेले जे प्रमुख चार निष्कर्ष आहेत त्यांची येथे चर्चा करण्याची गरज नाही. मात्र त्यातील अखेरचा आणि अनेक दृष्टींनी सर्वाधिक महत्त्वाचा व काहीसा धक्कादायक जो निष्कर्ष आहे तो त्याच्याच शब्दांत उद्धृत करणे उचित ठरेल. (अवतरण काहीसे दीर्घ असले तरी त्याचे महत्त्व लक्षात घेता ते जसेच्या तसेच खाली देत आहे. क्षमस्व.)
“The universe as a whole could have a cause and a purpose only if it were itself created by a conscious agent which transcends it. Unlike the universe, this transcendent consciousness would not be developing towards a goal; it would be its own goal. . . it would be complete in itself. . . If this transcendent conscious being were the source of the universe and of everything within it, all created things would in some sense participate in its nature. The more or less limited ‘wholeness of organisms at all levels of complexity could then be seen as a reflection of the transcendent unity on which they depended and from which they were ultimately desired. Thus this fourth metaphysical position affirms the causal efficacy of the conscious self, and the existence of a hierarchy of creative agencies immanent within nature and the reality of a transcendent source of the universe.” (रूपर्ट शेलड्रेकच्या “ए न्यू सायन्स ऑफ लाइफ” मधून उद्धृत, पृष्ठ २०९-१०) हे सगळे अवतरण इतके सरळ आणि निःसंदिग्ध आहे की त्यावर वेगळे भाष्य काय करायचे? हा ज्ञानेश्वरीमधील चिविलास तर नव्हे अशी चावट शंका एखाद्या श्रद्धाळू मनाच्या माणसाला जर चाटून गेली तर? पण ते नकोच. अशावेळी कानावर हात ठेवणे हेच शहाणपणाचे धोरण ठरते ! श्री. पळशीकरांनी वापरलेल्या ‘लीला’ या शब्दावर प्रा. दि.य. देशपांडे यांनी बराच आक्षेप घेतला आहे. शेलड्रेकचे वरील अवतरण नीट लक्षात घेतल्यास या समग्र विश्वनिर्मितीला एक ‘लीला’ म्हणून संबोधण्यात निदान शेलड्रेकला फारशी हरकत राहील असे वाटत नाही !
प्रा. दि.य. देशपांडे यांनी व्यक्त केलेल्या काही निवडक विचारांचाच काय तो परामर्श घ्यावा असा या प्रतिक्रियेचा उद्देश आहे. त्यामुळे सर्वच मुद्द्यांची चर्चा करण्याची गरज नाही. मानवी जीवनाच्या समग्रतेचे अथवा एकसंधतेचे भान ही केवळ कविकल्पना अथवा ‘अर्थहीन’ आध्यात्मिक संकल्पना नसून अत्याधुनिक विज्ञानाच्या अनेक शाखातील सीमान्त संशोधनातून त्या विचाराला नवी प्रयोगसिद्ध अशी पुष्टी मिळत आहे याची हवी तशी जाणीव आपल्याकडील विद्यापीठीय विद्वानांमध्ये व विचारवंतांमध्ये दुर्दैवाने दिसून येत नाही. याउलट, अधिकाधिक पाश्चात्य विचारवंत आणि शास्त्रज्ञ या दिशेने विचार करू लागल्याचे दिसून येते. ‘समग्रता हा एक नवा पॅराडाइम् मानून मानवी जीवनदृष्टीची एक नवी आदर्श मांडणी व्हावी अशी भावना या विचारवंतांमध्ये आज प्रकर्षाने आढळून येत आहे. आम्हाला या दिशेने विचार करून बघावा असे का बरे वाटत नाही?
६०, अंबाझरी लेआउट नागपूर-४४० ०१०

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.