परिसंवाद निसर्ग आणि मानव -५

दि. य. देशपांडे यांना उत्तर – उत्तरार्ध वसंत पळशीकर (या लेखाचा पूर्वार्ध आजचा सुधारकमार्च ९३ या अंकात आला आहे.)
६ डेव्हिड बोम (Bohm) या भौतिकी वैज्ञानिकांचे एक विधान पुढीलप्रमाणे आहे: ‘We have seen that each world-view holds within itself its own basic notions of order. What is order ? How we do presuppose that there is some kind of order – so a general and explicit definition of order is not actually possible’. बोम हे भौतिकीमधील विभिन्न word-views बद्दल बोलत आहेत. विश्व ही व्यवस्था (order) आहे हे माणसाचे एक साक्षात्कारी दर्शन आहे असे मी म्हणेन. ‘God doesn’t play dice’ या आशयाचे आइन्स्टाइन यांचे वचनही त्यांना विश्वाविषयीच्या सत्याचे झालेले साक्षात्कारी दर्शन आहे. पण सत्याची अशी दर्शने ज्या माणसाला होतात त्याच्या अपूर्णतेमुळे व मर्यादांमुळे अंतिम सत्य त्याला परिपूर्ण स्वरूपात गवसले आहे असे होत नाही व कदाचित ती अवस्था कधीच गाठली जाणार नाही.
साक्षात्कारी दर्शनातून गवसलेल्या सत्यांचे स्वरूप, त्यांचे मानवी जीवनातील कार्य मला गुंतागुंतीचे दिसते. ‘विश्वात order आहे हे केवळ वर्णनात्मक विधान नसते, विश्वात order असणे उचित आहे, आवश्यक आहे, विश्वात order आहे ही चांगली, उपकारक गोष्ट आहे, order आहे म्हणून विश्व ही एक विधायक, इष्ट जागा आहे असेही त्यात गर्भित असते. मानवी कृतींना, जीवनाला अर्थ व वळण प्राप्त करून देणे, त्याच्या कर्तृत्वाला, सर्जनशीलतेला वाट मोकळी करून देणे, त्याचे जीवन व व्यवहार नियंत्रित व नियमित करणे असेही त्यांचे कार्य असते. ‘साक्षात्कारी’, ‘सत्य’ या शब्दांच्या वापराचीही अडचण येथे नमूद केली पाहिजे. माझा असा ग्रह होतो की प्रा. देशपांडे हे ज्या विचारधारेतील तत्त्वज्ञ आहेत तीमध्ये ‘साक्षात्कार’ हा शब्द निरर्थक आहे, व साक्षात्कार होतो हा भ्रम आहे. तर्कव युक्तिवाद यांची एकेक पायरी चढत चढतच दरवेळी ज्ञान वा समज (understanding) आपणास प्राप्त होते असे मी अनुभवीत नाही. चित्ताची एकाग्रता, दृष्टीची पूर्वग्रहविरहित निर्मळता, सत्य जाणण्याची तीव्रता, आधी संगृहीत झालेली माहिती, निरीक्षणे, अनुभव व त्यावरील चिंतनाची एक पूर्ण झालेली प्रक्रिया अशा काही गोष्टी जुळून आल्या म्हणजे साक्षात् ज्ञान वा समज यांची प्रतीती येते. अशा रीतीने जे सत्य म्हणून उमगते ते खरोखरच सत्य आहे का, याचा पडताळा जीवनात घ्यावा लागतो. त्याची चिकित्सक तपासणी करणे इष्ट व आवश्यक असते. या अर्थाने सत्य provisional असते असे म्हणता येईल. भौतिकीच्या क्षेत्रातील नवनव्या उपपत्ती मांडणाऱ्या शाखेमध्ये (Theoretical Physics) कार्य करणाऱ्या शास्त्रज्ञांना कूट प्रश्नांच्या संदर्भात ‘सत्या’चे दर्शन काहीसे याच पद्धतीने होते असे मला दिसते. सत्य या शब्दाच्या या वापरालाच देशपांडे हरकत घेतील हे शक्य आहे. विश्वाविषयी मी केलेली विधाने मला साक्षात्कारी पद्धतीने मिळालेली नाहीत. या विषयात काही वाचन करीत असताना माझी जी समज बनली तिच्यावर ती आधारलेली आहेत. ती खोडून काढण्यासाठी जो तार्किक युक्तिवाद प्रा. देशपांडे यांनी केला आहे त्यात माझी विधाने खोडून काढणारा युक्तिवाद मला आढळला नाही. हे ‘अनाकलनीय आहे, असे म्हणणे युक्तिवाद नव्हे. ‘नवनवोन्मेषशाली’ या शब्दाचा वापर मूलद्रव्यांच्या विश्वातील निर्मितीलाही उद्देशून करता येईल असे मला दिसते. प्रा. देशपांडे ह्या शब्दाच्या आशयाचे संक्षेपण (reduction) करतात. नवनवे जीव जीवजातींमध्ये जन्माला येतात याला उद्देशून कवी हा शब्द वापरतात, हे त्यांचे म्हणणे मला कोणालाच न्याय देणारे वाटले नाही. तुच्छ भाव प्रकट करून मुद्दा निकालात काढणे म्हणजे युक्तिवाद करणे नव्हे.

निसर्गसृष्टी आणि माणूस यांचा संबंध मायलेकराचा आहे असे म्हणणे आलंकारिक आहे. पण म्हणजे ते खोटे आहे असे नाही. या दोहोंतील संबंधाचे स्वरूप स्पष्ट करणारे व त्यासाठी रूपकाचा वापर करणारे आहे. हे वैज्ञानिक विधान अर्थातच नाही. पण वैज्ञानिक ज्ञानाशी विसंवादी पण नाही. वैश्विक, तसेच जीवसृष्टीतल्या घडामोडींचे फळ, एक फलित म्हणूनच मानवाचा अवतार झाला ना?
निसर्ग आणि माणूस यांच्या संबंधाकडे इतरही दृष्टीने बघता येते. विज्ञानवादी तंत्रविज्ञानवादी आधुनिक व्यक्ती हा संबंध कसा पाहते हे प्रा. देशपांडे यांच्या लेखनामधून स्ष्ट होते. हा संबंध कसा पाहणे, जाणून घेणे अधिक हितावह व उपकारक आहे?
‘निसर्गावर मात करण्याच्या आलंकारिक भाषेचा जो अर्थ प्रा. देशपांडे यांनी स्पष्ट करून सांगितला आहे त्यात त्यांच्या मनाची उदारता व वृत्तीची सज्जनता प्रकट होते. तो त्यांचा स्वभावविशेष आहे. पण ‘काँक्वेस्ट ऑफ नेचर’ चे लक्ष्य ईश्वराची जागा घेण्याचे होते व आहे, हे याविषयीचे साहित्य वाचलेल्यांच्या लक्षात येईल. सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, आणि सर्वंकष सत्ताधीश बनण्याची प्रेरणा, आकांक्षा या शब्दांमधून व्यक्त होत आली. ‘निसर्गनियमांच्या ज्ञानाचा उपयोग करून मानवी जीवन समृद्ध व सुखी’ करण्याच्या आकांक्षेपोटी अण्वस्त्रांचे संशोधन व प्रयोग केले गेले आहेत का ? औद्योगिक उत्पादनवाढीसाठी उपयोजिलेले तंत्रविज्ञानही ‘मानवी जीवन समृद्ध व सुखी’ करण्याच्या प्रेरणेतून शोधले गेले, वापरले गेले की धनाढ्य, सत्तावान बनण्याच्या आकांक्षेमधून ? टिहरी, सरदार सरोवर, आस्वान यांसारख्या महाकाय अजस्र धरणांची कल्पना करणाऱ्या, ती बांधणाऱ्या अभियंत्यांना गर्व कशाचा असतो ? ‘न भूतो’ यश मिळविल्याच्या गोष्टी प्रौढीने जगाला सांगून, स्वतःखेरीज इतरांना मागास, अविकसित ठरविणाऱ्या सधन, समृद्ध व सुखी (?) देशांना पृथ्वीच्या पर्यावरणाच्या रक्षण-संवर्धनाची एवढी तातडी का निर्माण झाली? आधुनिक विज्ञानाची उभारणी व उत्कर्ष युरोपमध्ये झाला. ज्या वैज्ञानिकांनी यात पुढाकार घेतला आणि ज्यांनी त्यांना राजाश्रय दिला, त्या मंडळींच्या प्रेरणा कोणत्या होत्या ? वैज्ञानिक ‘निसर्गाची रहस्ये हिकमतीने छिनून घेत होते (prying out secrets of nature). रहस्यभेद जसजसा होत चालला तसतसे एक दिवस सर्वज्ञ बनणे वैज्ञानिक संशोधनाच्या उद्योगाचे (‘scientific enterprise) लक्ष्य बनले; इतकेच नाही तर, सर्वज्ञ आपण बनणारच हा “विश्वास” (व घमेंडही) उत्पन्न झाला. तंत्रवैज्ञानिक उद्योगातील ‘न भूतो यशामुळे वैज्ञानिकांना आपण प्रति-ईश्वरच जणू आहोत असे वाटू लागलेले दिसते. विशेषतः जे वैज्ञानिक विज्ञान-तंत्रविज्ञान या दोन्ही क्षेत्रांना जोडणारे संशोधन कार्य करतात त्या वैज्ञानिकांच्या बाबतीत ही गोष्ट जास्त खरी दिसते. वैज्ञानिक संशोधनाच्या उद्योगाचे (आणि आज हा एक बड़ा उद्योग अन्य अर्थानही बनला आहे) मुख्य लक्ष्य (target and thrust) निसर्गाच्या अशा रहस्यांचा भेद करण्यावर आहे की ज्यामुळे मानवाला (आणि व्यवहारात राज्यकर्त्यांना / राष्ट्र-राज्यांना) प्रति-ईश्वराची सत्ता प्राप्त होईल. मानवी जीवन समृद्ध व सुखी करण्यासाठी वस्तुतः अनेकानेक क्षेत्रांतील मूलभूत व उपयोजित संशोधनाची गरज नाही. पण अमाप पैसा अशा संशोधनावर खर्च होत आहे. हे सर्व प्रा. देशपांडे यांना दिसत नसेल, चिंतनीय वाटत नसेल, तर ती सखेद आश्चर्याची बाब आहे असे मला वाटते. व निसर्गसृष्टी व माणूस यांच्या संबंधाविषयी एक भूमिका अशी की, नैसर्गिक स्वरूपातली सृष्टी, विशेषतः जीवसृष्टी, मानवाने पूर्णतया कृत्रिमरीत्या पुनर्घटित करण्यास माणूस सार्वभौम आहे, नव्हे, मानवी कर्तृत्व, सर्जनशीलता व क्षमता यांचे ते उच्चतम लक्ष्य आहे. विज्ञान-तंत्रविज्ञान हे साधन आहे. ही भूमिका मानवी सुख व समृद्धीच्या नावे मांडली गेली तर प्रा. देशपांडे यांना ती ठीक, स्वागतार्ह वाटेल असे दिसते. हे लक्ष्य गाठताना मानवजातच नष्ट होण्याचे संकट ओढवून न घेण्याचे पथ्य तेवढे सांभाळावे, असे ते म्हणतील.
सृष्टीकडे केवळ ऊर्जा व द्रव्ये यांचे कोठार म्हणून पाहणे, सृष्टीचे नियम केवळ तंत्रवैज्ञानिक उपयोजनाच्या हेतूने जाणून घेणे यात माणसाच्या माणूसपणाचा संकोच वा संक्षेपण (reduction) आहे. ही भूमिका माणसाला एकांगी बनविणारी आहे.
असे एकांगीपण यावयाचे नसेल तर तंत्रवैज्ञानिक हस्तक्षेपाच्या मर्यादा, पथ्ये तात्त्विक पातळीवरूनच स्पष्ट करण्याची जबाबदारी प्रा. देशपांडे यांनी पार पाडली पाहिजे.

विवेक आणि बुद्धिप्रामाण्य यांत प्रा. देशपांडे भेद करतात. हा भेद नेमका काय आहे? बुद्धिप्रामाण्यवादी भूमिका घेणारी प्रत्येक व्यक्ती उपभोगवादी असते असा निष्कर्ष मी काढत नाही. पण आजच्या उपभोगवादाला रूढ, शिष्टमान्य बुद्धिप्रामाण्यवादाचेच अधिष्ठान आहे. उपभोगवादी जीवन जगणारी मंडळी आधीच्याही काळात होती. पण आज उपभोगवाद ही एक प्रणाली (ideology) म्हणून प्रतिष्ठित केली गेली आहे. तिला तात्त्विक बैठक दिली गेली आहे. यासाठी बुद्धिप्रामाण्यवादाचा आधार घेतला गेला आहे. – विज्ञानवाद (scienticism) हा या बुद्धिप्रामाण्यवादाचा एक मध्यवर्ती घटक आहे.
विवेकनिष्ठा या उपभोगवादाला छेद देण्यासाठी आवश्यक आहे. पण असा छेद देण्यासाठी तिला बुद्धिप्रामाण्यवादालाही छेद द्यावा लागेल व विज्ञानवादालाही. ‘ज्ञानाच्या क्षेत्रात ज्ञान मिळविण्याचा उपाय व पद्धती एकच आहे व ती म्हणजे आधुनिक विज्ञानाने प्रतिष्ठित व शिष्टमान्य केलेली पद्धती हा विज्ञानवाद झाला. ज्ञानाचे एक क्षेत्र असे आहे की जेथे हा दावा करणे युक्त ठरते. पण ज्ञानाची इतरही क्षेत्रे आहेत आणि तेथे ही पद्धती एकमेव पद्धती नाही. असे विवेकनिष्ठ म्हणेल. एक व्याख्या करून आणि प्रचलित शिष्टमान्य वैज्ञानिक पद्धतीचा अंगीकार करून प्राप्त होते तेच फक्त ज्ञान असे ठरविणे, हा आजचा बुद्धिप्रामाण्यवाद होय. त्यालाही विवेकनिष्ठा आह्वान देईल. विवेकात सारासारविवेक ही मुख्य गोष्ट आहे, आणि सारासारविवेक हा जीवनाच्या श्रेयाच्या संदर्भात करावयाचा असतो. अमुक एक जीवन श्रेयस्कर आहे असा स्वीकार युक्तिवादासाठी बुद्धीचा हत्यार म्हणून वापर करून केला जात नाही. ‘आपले जीवन संयमाने, विवेकाने नियंत्रित करावे हा सारासार विवेक बुद्धिप्रामाण्यातून निष्पन्न होतो का?
आपण काय करावे, आपली ध्येये, साध्ये काय असावीत, याविषयी निर्णय करणे हे प्रा. देशपांडे यांच्या मते विवेकाचे कार्यक्षेत्र आहे. मानवप्राणी हा स्वतः साध्य आहे, आपण कोणाही मानवाला केवळ साधन म्हणून वापरू नये ही विवेकाची कार्यक्षेत्रातील प्रमुख शिकवण आहे असे ते म्हणतात. या म्हणण्याचा आधार युटिलिटेरियन तत्त्वज्ञान वा नीती हा आहे असे ते म्हणतात. पण जीवनाचे श्रेय म्हणून, जीवनमूल्य म्हणून या गोष्टीचा स्वीकार का करावयाचा, मानव हा स्वतः साध्य आहे हे कसे ठरते व का मानावयाचे, या प्रश्नांचे युटिलिटेरियन मांडणी समाधान करू शकते असे मला आढळत नाही. श्रद्धेने या गोष्टी स्वीकारल्यावर, हे श्रेय प्राप्त होण्यासाठी काय केले पाहिजे, कसे जगले पाहिजे, कोणता संयम पाळला पाहिजे याचा विवेक कसा करावयाचा याची मांडणी करता येते. इथे बुद्धीचा (तर्क युक्तिवाद यांचे साधन/हत्यार म्हणून) निश्चितच उपयोग आहे.
तेव्हा, विवेकवाद आणि बुद्धिप्रामाण्यवाद यातील भेद, विवेक ही संकल्पना, ‘बुद्धी ही संकल्पना यांच्याविषयी प्रा. देशपांडे यांनी मांडणी करणे आवश्यक आहे. ‘आजचा सुधारक’ च्या अंकांमधून त्यांनी केलेली मांडणी त्यांची याविषयीची अंतिम व प्रमाण मांडणी मानली तर बरेच प्रश्न उत्पन्न होतात. विवेकवाद आणि बुद्धिप्रामाण्यवाद यातले अंतर मला तरी स्पष्ट होत नाही हे माझे न्यून असेल. ते दूर करण्याचे आवाहन मी त्यांना करतो.

तंत्रविज्ञान न वापरणारा समाज मानवजातीच्या आदिमकाळातही अस्तित्वात नसावा. दगड उचलून फेकून मारणे, हे तंत्रविज्ञानच होते. ‘ग्रामोद्योगी संस्कृती ही सुयोग्य तंत्रविज्ञानावर भर देते. कोणते तंत्रविज्ञान कसे व कोणत्या स्वरूपाच्या औद्योगिक, आर्थिक, राजकीय-सामाजिक व सांस्कृतिक-नैतिक व्यवस्थेच्या चौकटीत वापरावयाचे याचा विवेकाने निर्णय करण्यावर भर देते. आज विजेवर चालणाऱ्या पंपाचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. पण ते अलीकडील आहे म्हणून ते प्रगत, इष्ट व अनिवार्य मानू नये आणि रहाटगाडग्याचा वापर करून बैलांच्या शक्तीने पाणी उपसणे जुन्या काळचे म्हणून अप्रगत, टाकाऊ मानू नये.
रहाटगाडग्याने पाणी काढण्याच्या काळात जीवन दरिद्री व भरड होते हा निवाडा कोणत्या कसोट्यांवर प्रा. देशपांडे करतात ? दरिद्री व भरड जीवन जगणाऱ्या माणसांचे प्रमाण आज जगात कदाचित जास्तच आढळेल. अनेक आदिवासी जमातींचे जीवन साधे होते. पण दरिद्री व भरड ही विशेषणे त्या जीवनाला का लावावीत हा प्रश्न आहे. ‘सापेक्ष वंचिततेच्याशी (relative deprivation) दरिद्रीपणाचा अंगभूत संबंध आहे. जीवनाचा भरडपणा हा उपभोगाच्या मानाशी वा फुरसतीच्या वेळाची उपलब्धता (leisure) यांच्याशी सरळसरळ जोडलेला असतो असे मला आढळत नाही. तसेच श्रमनिष्ठ जीवन म्हणजे भरड जीवन असेही समीकरण योग्य नाही. दारिद्र्य, भरडपणा यांची प्रथम चोख मांडणी करावी लागेल. ती करण्यासाठी प्रचलित धारणा, समज व पूर्वग्रह यांच्या पकडीतून मुक्त व्हावे लागेल.
विज्ञानाचा त्याग करावा असेही मी सुचविलेले नव्हते. पण सगळा अपराध वापर करणाऱ्या लोकांवर, राज्यकर्त्यांवर ढकलणे तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ, विचारवंत यांना सोयीचे असले तरी ते योग्य नाही. Ideas rule the world हे खरेच आहे. जे भेद करणे (distinctions, discriminations) आवश्यक व महत्त्वाचे आहे, जो सारासार विवेक करणे आवश्यक आहे तो न करण्यामधून विज्ञानाची एका दिशेने, एक वळणाची उपासना होत आहे या वास्तवाकडे दुर्लक्ष होऊ देता कामा नये.
– १० –
धर्म, अध्यात्म या शब्दांना प्रा. देशपांडे यांची तत्काळ तीव्र प्रतिक्रिया होते. ज्या ‘विवेकाची ते भलावण करतात तो विवेक मानवसमूहांमध्ये रुजविण्याचे कार्य आजवर कोणी केले ? आजही हे कार्य कसे घडत आहे? मानव स्वतः श्रेष्ठ साध्य आहे, हे तत्त्व/मूल्य कोणी सांगितले, शिकवले ? याचे श्रेय ‘धर्म’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या संस्थेला (समाजशास्त्रीय परिभाषेतील institution), धार्मिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिकवणुकीला आहे. एक ना एक स्वरूपातल्या ईश्वराचे अस्तित्व गृहीत धरून, या गृहीताच्या आधारे ही गोष्ट साधली गेली. युटिलिटेरियन नीतिप्रणालीची मांडणी देखील हा वारसा स्वीकारूनच, त्या वारशाच्या चौकटीतच केली गेली. पण असेही दिसते की, जड भौतिकापलीकडील या अर्थाने पारलौकिक (non-material, transcendent, non rational) शक्तीचे अधिष्ठान गंभीरपणे जेव्हा नाकारले जाते तेव्हा युटिलिटेरियन नीतीही टिकाव धरू शकत नाही. तिची झपाट्याने धूप होते. आज जगात जो सारासार विवेक केला जातो, त्यानुसार व्यक्तिगत व सामूहिक व्यवहार केला जातो त्याची बैठक धार्मिक शिकवणुकींमधून प्राप्त झालेला वारसा हीच आहे.
धर्मपीठे व पुरोहितवर्ग यांच्या मार्फत धर्माचे कार्य चालते. राज्यसंस्थेशीही धर्मसंस्थेचा संबंध राहिला आहे. कोणताही विवक्षित धर्म केवळ तात्त्विक मांडणी करून थांबत नाही. लोकांच्या दैनंदिन ऐहिक जीवनाच्या सर्व अंगांमध्ये धर्मसंस्था मार्गदर्शन करते. लोकजीवनाचे नियमन-नियंत्रण करते. ऐहिक जीवन कसे जगावे हे सांगणे, त्या दृष्टीने यमनियम, विधिनिषेध, कर्मकांड ठरवून देणे या कामांसाठी तर धर्माची उत्पत्ती आहे. पण वेगवेगळ्या प्रकारच्या ऐहिकातील गुंतवणुकीमुळे धर्म भ्रष्ट होण्याची गोष्ट अटळपणे घडते. धर्माच्या नावाने प्रत्येक धर्माच्या पीठांनी, पुरोहित-आचार्यांनी व अनुयायांनी अधर्माचरण केले आहे हा इतिहास आहे हे खरेच. पण म्हणून आपण throwing out the baby with the dirty bath water असे करता कामा नये. धर्मप्रणाली व धर्मसंस्था, यांच्या व्यवहारांची चिकित्सा व शुद्धीकरण करण्याचे आव्हान पेलले पाहिजे.
सर्व धर्म एकच आहेत, त्यांच्या शिकवणीत वा त्यांच्या संघटनेत काही भेद नाहीत हे म्हणणे भाबडेपणाचे आहे हे प्रा. देशपांडे यांचे म्हणणे बरोबर आहे. धर्मसंस्थापकांची, विभिन्न धर्मांची मांडणी व विस्तार नंतरच्या काळात करणाऱ्या प्रमुख धर्मोपदेशकांची व्यक्तित्वेही अनेक अंगांनी वेगळी असल्याचे आढळते. देशकालपरिस्थितीही वेगळी होती. तेव्हा लहानमोठे फरक आढळणे अगदी स्वाभाविक आहे. इतकी प्रस्तावना केल्यावर, जीझस, महंमद, गौतम बुद्ध, महावीर यांच्यासारखे प्रेषित कोणत्या प्रेरणेने धर्मचक्रप्रवर्तन करीत होते हा प्रश्न उपस्थित न करता, विषय बाजूला टाकणे मात्र गैर आहे. या सर्व व्यक्ती त्यांच्या त्यांच्या काळी व ठिकाणी आधीपासून चालत आलेल्या संकुचित कर्मकांडावर भर देणाऱ्या, हिंस्र व आक्रमक धर्मांशी झगडल्या असे दिसते. धर्माच्या नावे माजविल्या जाणाऱ्या अनाचाराविरुद्ध उभ्या ठाकल्या असे दिसते. या बंडखोरांच्या शिकवणुकीत पुष्कळ गोष्टी समान आशयाच्या, पण वैशिष्ट्यपूर्ण परिभाषेत मांडलेल्या आढळाव्यात ही गोष्टदेखील मग स्वाभाविक असल्याचे लक्षात येते. अशा गोष्टींकडे लक्ष वेधणे, त्यांच्यावर भर देणे, त्यांची पुष्टी करणे ही गोष्ट धर्मांच्या नावे पोसल्या जाणाऱ्या वैमनस्यांचा व लढायांचा उच्छेद करण्याच्या, अनुयायांना स्वतःच्या धार्मिक अस्मिता (identity) कायम राखून एका उन्नत धार्मिकतेच्या भूमिकेवर येण्याच्या दृष्टीने आवश्यक, इष्ट, श्रेयस्कर आहे. सर्व धर्म समान आहेत असे असलेच तर मग आपण हिंदू आहोत किंवा मुसलमान आहोत असे म्हणणे निरर्थक आहे असे प्रा. देशपांडे यांना वाटणे समजू शकते. कारण त्यांनी धार्मिक अस्मिताच टाकून दिली आहे. बहुसंख्य लोकांचा आरंभबिंदू त्यांची जातजमातीय व धार्मिक ओळख हा असतो. ही अस्मिता टाकून दिल्यावरच ते अन्य अस्मिता धारण करणाऱ्यांशी एकोप्याने, सामंजस्याने वागतील अशी भूमिका तार्किकदृष्ट्या निरपवाद असेल, पण ते आरामखुर्चीतले स्वप्नरंजन आहे. विवक्षित धर्माचे प्रयोजन आता उरले नाही, अनेकानेक धर्मांचे अस्तित्व व त्यांना लोकांच्या मनात असलेली निष्ठा ही व्यत्यय आणणारी गोष्ट आहे असे मत बाळगणाऱ्यांमध्ये विनोबा भावे यांचा समावेश होता असे दिसते. पण हे लक्ष्य गाठण्याचा मार्गही सर्व धर्मांच्या शिकवणुकीतल्या समान आशयावर भर देऊन, त्याचा संस्कार रुजवून, त्या आधारे सर्वधर्मसमभाव उत्पन्न करून अनुयायांचे मानसपरिवर्तन करणे हा आहे. ही गोष्ट लोकांमध्ये मिसळून काम करीत असल्याने, त्यांनी सतत ध्यानात बाळगली. हेच कार्य सातत्याने करीत आलेल्या साधुसंत फकीर यांचा मोठा वारसा भारताला आहे.
प्रा. देशपांडे परधर्मसहिष्णुतेसाठी धर्मच त्यागायला शिकविण्याची गरज प्रतिपादतात. यातली अंतर्गत विसंगती त्यांच्या ध्यानात आली कशी नाही ? पण अनुभव असाही येतो की त्यांच्या भूमिकेमधून ज्यांनी धर्म टाकला त्यांच्यापैकी बहुसंख्य सुधारक धार्मिकदृष्ट्या भाविक मंडळी व धर्म यांच्या संदर्भात कमालीची असहिष्णुता प्रकट करतात. ते कडवे (fanatic) बनतात, आक्रमक बोलतात व वागतात. उलट आपापल्या धार्मिक अस्मिता जगत राहूनही साधुसंतफकीर यांचे बोलणे, वागणे विभिन्न धर्मीयांना जवळ करणारे असते असे अनुभवास येते. गांधीजींचे उदाहरण देऊन जो युक्तिवाद प्रा. देशपांडे यांनी केला आहे तो तर्कसंगतीच्या कसोटीला उतरणारा आहे. पण युक्तिवाद तर्कसंगत आहे म्हणून त्या युक्तिवादाच्या आधारे घेतली जाणारी भूमिका जीवनव्यवहाराच्या क्षेत्रात योग्य वा खरी ठरतेच असे नाही. गांधींना अपयश आले, पण त्यांचा मार्ग योग्यच आहे; काळ विशेष प्रतिकूल होता, किंवा he was acting before his time असे म्हणणेही तेवढेच तर्कसंगत ठरते, हेही ध्यानात घ्यावे. गांधीजींच्या अपयशानंतरही, धार्मिक सहिष्णुता रुजविण्यासाठी धर्मश्रद्धा डोळस व उन्नत बनविणे आवश्यक आहे, सर्वधर्माविषयी चिकित्सक पण समभावाने आदर करण्याची वृत्ती रुजविण्याची गरज आहे असाही निष्कर्ष काढणे तर्कसंगत ठरते. एक वेळ निर्बुद्ध व अप्रबुद्ध काळातील अडाणी लोकांना ‘धर्माची गरज असेल, पण प्रबुद्ध काळातील शिक्षित लोकांना विवेकवाद पर्याप्त आहे, धर्माची अडगळच होते, अशी भूमिका घेऊन बघण्याखेरीज प्रा. देशपांडे यांना गत्यंतर नाही. कारण ती त्यांची बौद्धिक निष्ठा (intellectual conviction) आहे. असे असल्यामुळे जो काही इतिहास आहे, आजची वस्तुस्थिती आहे तिच्या विश्लेषणाआधारे अमूक एका निष्कर्षाप्रत येण्यासाठी उपयोगी व आवश्यक युक्तिवादांची मालिका त्यांनी गुंफावी हे ठीकच आहे. विवक्षित सारे अनेकानेक धर्म काळाच्या ओघात विसर्जित झाले तर काही बिघडणार नाही पण त्यांच्या गाभ्याशी असलेले ‘अध्यात्म (धर्माचा गाभा) राखले पाहिजे अशी बौद्धिक निष्ठा ज्याची असेल त्याचे युक्तिवाद वेगळे असतील. ते युक्तिवादही तेवढेच तर्कसंगत असतील.
विनोबा भावे यांनी अध्यात्म आणि विज्ञान यांच्या संयोगाची गोष्ट केली. डेव्हिड बोम देखील, एका अर्थाने, व वेगळ्या अंगाने, असेच काहीसे प्रतिपादन करतात असे दिसते. त्यांनी ‘Soma-significance’ असा शब्दप्रयोग केला आहे. संवादचर्चेवर आधारित Unfolding Meaning या त्यांच्या पुस्तकात (प्रकाशकः रूटलेज अँड केगन पॉल, लंडन, १९८७, आर्क पेपरबॅक्स आवृत्ती) आध्यात्मिक व वैज्ञानिक यांच्यातला भेद हा केवळ सोयीसाठी आपण करतो, वस्तुतः वास्तव (वा सत्य) हे एकात्म पूर्ण आहे, त्याचे हे दोन पैलू (aspects) आहेत, असे ते म्हणतात. विनोबा भावे व डेव्हिड बोम एकच गोष्ट सांगत आहेत असे मला घाईगर्दीने म्हणावयाचे नाही.
वैज्ञानिकांच्या धारणा बदलत आहेत. धर्मनिष्ठांच्याही धारणा बदलत आहेत. मी असे म्हणेन की, विज्ञान आणि धर्म (‘अध्यात्म) यांची परस्परांना आत्मसात करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. ही जी frontier वरील घडामोड आहे ती मला बौद्धिक व्यापारांच्या क्षेत्रातील सर्वांत महत्त्वाची व क्रांतिकारक घडामोड वाटते.
शेवटी बोम यांच्या वरील पुस्तकातील एक अवतरण देऊन मी थांबतो. भौतिकांच्या क्षेत्रात जी क्रांतिकारक घडामोड विसाव्या शतकाच्या आरंभी घडून आली (Relativity व Quantum उपपत्तींद्वारा) तिला डोळ्यासमोर ठेवून, आणि लॉर्ड केल्व्हिन या शास्त्रज्ञांचे नाव घेऊन बोम लिहितातः ‘Now this clearly illustrates the danger of com placency about our world views, and makes it evident how necessary it is to constantly have a provisional, inquiring attitude towards them. That is, in some sense, we have to have enough faith in our world-view to work from it, but not that much faith that we think it’s the final answer, right ?’ आपण सर्वांनीच ही सावधानता बाळगण्याची गरज आहे.
१५० गंगापुरी वाई ४१८०३

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.