तत्त्वज्ञानाची ओळख (भाग ४)

(तार्किकीय ज्ञान)

अनुमान शेवटी प्रत्यक्षावर म्हणजे ऐंद्रिय अनुभवावर आधारलेले असते हे आपण गेल्या लेखात पाहिले. जगात कुठे काय आहे, किंवा कुठे काय केव्हा घडले याचे ज्ञान आपल्याला प्रत्यक्षाशिवाय होऊ शकत नाही. अमुक दिवशी सहा महिन्यानंतर सूर्यग्रहण होईल हे आपणअनुमानाने सांगू शकतो. पण या अनुमानात वापरायची साधके शेवटी इंद्रियांनी झालेल्या सामग्रीवरच आधारलेली असतात. अनुमान हे प्रत्यक्षाहून भिन्न असे ज्ञानसाधन असले आणि ते अतिशय महत्त्वाचे असले, तरी ते स्वतंत्र प्रमाण नाही हे मान्य केले पाहिजे.
परंतु असेही काही ज्ञान आहे की जे शुद्ध तार्किकीय ज्ञान आहे. शुद्ध तार्किकीय ज्ञान म्हणजे असे ज्ञान की जे जगातील कोणत्याही वास्तवाचे ज्ञान नसते. जे जगातील कोणत्याही वास्तवाचे ज्ञान नाही, पण जे ज्ञान आहे, असे ज्ञान कसे असू शकेल असा प्रश्र येथे उपस्थित होईल. या प्रकारच्या शुद्ध तार्किकीय ज्ञानाचे स्वरूप आपण या लेखांकात पाहणार आहोत.
विधानांचे प्रकार
तत्त्वज्ञानात आपण विधानांचा अभ्यास करतो हे आपण लेखांक १ मध्ये पाहिले आहे. निसर्गाचा, विश्वाचा, जगाचा अभ्यास विज्ञान करते, आणि हे काम करताना ते निसर्गातील घटकांचे सामान्य (सार्विक) नियम शोधून काढते. हे सामान्य नियम सुट्या, एकेकट्या वस्तूंच्या आणि घटनांच्या निरीक्षणावरून सार्विकीकरणाने प्राप्त होतात. परंतु तत्त्वज्ञान निसर्गाचा किंवा जगाचा अभ्यास करत नाही. ते वस्तुविषयक घटनाविषयक विधानांचा अभ्यास करते.
परंतु विधानांचा अभ्यास करावयाचा म्हणजे काय ? विधाने असंख्य आहेत, आणि त्यांचे विषयही असंख्य आहेत. त्यांचा अभ्यास कसा करायचा?
विधानांचे विषय जरी असंख्य असले तरी विधानांचे प्रकार असंख्य नाहीत. त्यांचे प्रधान प्रकारात विभाजन करून त्यांचा प्रकारशः अभ्यास करणे शक्य होते. व्याकरणाच्या उदाहरणाने ही गोष्ट स्पष्ट करू.
व्याकरणाचा विषय आहे भाषा, आणि भाषा लक्षावधी शब्दांची बनलेली असते. पण या लक्षावधी शब्दांचे विभाजन वैयाकरण नाम, सर्वनाम, इत्यादि आठ जातींत करतात. तसेच वाक्येही अक्षरशः असंख्य असली तर त्यांचे केवल वाक्य, मिश्र वाक्य,आणि संयुक्त वाक्य अशा तीन प्रकारांत ते करतात. त्यांना रस असतो शब्दप्रकारांत, वाक्यप्रकारांत. उदाहरणार्थ सर्व नामे किंवा विशेषनामे त्यांच्या दृष्टीने सारखीच. राम, कृष्ण, नागपूर, शनिवारवाडा ही सर्व विशेषनामे म्हणून सारखीच. तसेच गोल, हिरवा, गोड इत्यादि शब्द विशेषणे म्हणून सारखेच.
तर्कशास्त्रातही (म्हणजे तत्त्वज्ञानाच्या ज्या शाखेचा परिचय आपणआज करून घेणार आहोत त्या शाखेत) विधानांचा अभ्यास त्यांचे विविध उपजातींत विभाजन करूनच केला जातो. विधानांचा सर्वांत सरल प्रकार म्हणजे केवल विधाने. त्याहून अधिक गुंतागुतीचा प्रकार म्हणजे दोन केवल विधानांच्या एकत्रीकरणाने तयार होणारी संयुक्त विधाने. त्याहून अधिक गुंतागुंतीचा प्रकार म्हणजे सामान्य विधाने. तर्कशास्त्रातील विभाजने विधानांच्या आकारानुसार केली जातात.
विधानांचा आकार आणि द्रव्य
भौतिक वस्तूंचा आकार आपल्या परिचयाचा आहे. स्थूल मानाने बोलायचे तर ज्या पदार्थाची एकदा वस्तू बनलेली असते तो पदार्थ तिचे द्रव्य, आणि त्या द्रव्याची त्या वस्तूत असलेली मांडणी म्हणजे तिचा आकार. उदा. मृत्तिकेचा एखादा घट जसा करता येईल तशीच तिची एखादी मूर्तीही (उदा. विनायकाची किंवा वानराची) करता येईल. आणि तसेच घट जसा मातीचा करता येईल तसाच तो पितळ, तांबे किंवा सोने यांचाही करता येईल. विधानांच्या बाबतीत त्यांचा विषय म्हणजे द्रव्य, परंतु त्या द्रव्याची मांडणी म्हणजे त्याचा आकार. उदा. केवल विधानात केवळ दोनच घटक असतात, त्यांचे उद्देश्य आणि विधेय. उदा ‘राम शूर आहे किंवा ‘सीता गाते ही उद्देश्य-विधेय’ या जातीची एकवचनी केवल विधाने आहेत. काही विधाने याहून अधिक गुंतागुंतीची असतात. उदा. ‘आणि’, ‘किंवा ‘जर-तर’ या उभयान्वयी अव्ययांनी दोन केवल विधाने जोडून तयार होणारी संयुक्त विधाने. उदा. ‘सूर्य मावळला आणि रात्र झाली’, ‘तो खेळेल किंवा झोपेल, ‘जर राम वनात गेला तर तो रावणाला मारील. त्यांच्याहून गुंतागुंतीची विधाने म्हणजे सामान्य विधाने. या विधानांत एखाद्या प्रकारच्या सर्व वस्तूत किंवा काही वस्तूत अमुक एक गुण आहे असे सांगितले आसते.
वरील संयुक्त किंवा सामान्य विधानांत वापरलेल्या अव्ययांकडे पाहिले तर एक चमत्कारिक गोष्ट आपल्या दृष्टीस पडेल. ती ही की आपल्या भाषेतील बहुतेक शब्द जगातील विविध घटकाची नावे आहेत. उदा. नामे वस्तूंची नावे आहेत, विशेषणे गुणांची नावे आहेत, क्रियापदे क्रियांची किंवा प्रक्रियांची नावे आहेत, शब्दयोगी अव्यये संबंधांची नावे आहेत. परंतु ‘आणि’, ‘किंवा, ‘जर-तर’ ही अव्यये कशाची नावे आहेत? असा प्रश्र विचारला तर त्यांनी वाचित असा निसर्गातील घटक दाखविता येत नाही. हे टेबल आहे. ‘हे पांढरे आहे. किंवा ‘हे गोल आहे असे आपण बोट दाखवून सांगू शकतो, तसे हे पाहा आणि’ असे आपण कशाकडेही बोट दाखवून सांगू शकत नाही. हे शब्द जगातील कोणत्याही घटकाचे वाचक नाहीत. तसेच सामान्य विधानात वापरण्यात येणारे ‘सर्व, ‘काही’, ‘नाही’, हे शब्दही त्याच प्रकारचे आहेत. या सर्व शब्दांना तार्किकीय शब्द (logical words) म्हणतात.
तार्किकीय शब्द म्हणजे काय हे पाहिल्यानंतर आपण आता तार्किकीय सत्य म्हणजे काय या प्रश्राकडे वळू शकतो.
तार्किकीय सत्य (logical truth)
आपण फिरून आपले जुने उदाहरण घेऊ या.
सर्व धूमवान वस्तू वह्निमान असतात
हा पर्वत धूमवान आहे
हा पर्वत धूमवान आहे
.:. हा पर्वत वह्निमान आहे.
हे अनुमान वैध आहे हे स्पष्ट आहे. त्याची साधके सत्य असतील तर त्याचा निष्कर्ष असत्य असू शकत नाही. साधके सत्य मानणे आणि निष्कर्ष असत्य मानणे व्याघातमय होईल. आता ही गोष्ट, म्हणजे या अनुमानाची वैधता त्या अनुमानाच्या आकाराशी (म्हणजे त्यातील विषयांच्या मांडणीशी) संबद्ध आहे हे, लक्षात घ्यावयास हवे. वरील अनुमानाचा आकार उघड करण्याकरिता आपण त्यातील द्रव्यवाचक शब्दांऐवजी एकाक्षरी चिन्हे वापरू. त्या अनुमानात एकून तीन विधाने आहेत, दोन साधके आणि एक निष्कर्ष. या प्रत्येक विधानात उद्देश्य आणि विधेय अशी दोन पदे असली तरी त्यात एकूण तीनच पदे आहेत आणि ती प्रत्येकी दोनदा आली आहेत. ही पदे म्हणजे ‘धूमवान वह्निमान आणि हा पर्वत त्यांच्या ऐवजी जर आपण क, ख आणि ग ही चिन्हे वापरली तर आपल्याला पुढील आकार मिळेल :
सर्व क ख आहेत
ग क आहे
:. ग ख आहे
हा त्या अनुमानाचा रिकामा आकार किंवा सांगाडा झाला आहे. आता दुसरे एक अनुमान घ्या.
सर्व कवी द्रष्टे असतात
केशवसुत कवी आहेत.
.:. केशवसुत द्रष्टे आहेत.
हेही अनुमान पहिल्या अनुमानाच्याच आकारात आहे हे आपल्या लक्षात सहज येईल. त्याचे चिन्हीकरण केले तर त्याचा आकार
सर्व क ख आहेत
ग क आहे
.:. ग ख आहे
हाच आहे हे दिसून येईल. आणि हेही दिसून येईल की हे दुसरेही अनुमान वैध आहे. तसेच आपण क, ख आणि ग यांच्या ठिकाणी कोणतेही शब्द घातले आणि अनुमानाचा आकार कायम ठेवला तर तयार होणारे अनुमान वैधच असते. परंतु आपण जर आकार बदलला, समजा त्याचे दुसरे साधक ग क आहे या एवेजी ‘ग ख आहे असे केले, आणि निष्कर्ष ‘ग ख आहे या एवेजी ग क आहे असा लिहिला तर मात्र अनुमान अवैध होते. म्हणून अनुमानाची वैधता त्याच्या आकाराशी संबद्ध असते असे म्हणतात.
आता आपण एक पाऊल आणखी पुढे जाऊ. वरील अनुमानांपैकी कोणतेही एक घेऊन त्यापासून आपण ‘जर-तर’ या आकाराचे विधान तयार करू. त्याकरिता त्याची साधके आणि ने जोडून एक संयुक्त वाक्य तयार करू आणि ते वाक्य जर-वाक्य(पूर्वांग) म्हणून वापरू, आणि त्याचा निष्कर्ष तर-वाक्य (उत्तरांग) म्हणून वापरू. उदा. असेः
जर सर्व कवी द्रष्टे आहेत आणि केशवसुत कवी आहेत तर केशवसुत द्रष्टे आहेत. आता हे एक संयुक्त वाक्य आहे, अनुमानासारखी तीन वाक्ये नाहीत, आणि कोणत्याही विधानार्थी वाक्याप्रमाणे हे संयुक्त वाक्यही सत्य किंवा असत्य असले पाहिजे. तसे पाहू लागलो तर वरील जर-तारी वाक्य (अशा वाक्यांना औपाधिक वाक्ये म्हणतात) सत्य आहे हे आपल्या सहज लक्षात येईल. ते सत्य आहे ते कशामुळे? ते ‘कवी’, ‘द्रष्टे आणि ‘केशवसुत यांच्याविषयी आहे म्हणून आहे काय? या प्रश्राला उत्तर ‘नाही असेच द्यावे लागेल, कारण त्या शब्दांऐवजी अन्य कोणतेही शब्द आपण घातले तरी ते वाक्य सत्यच राहील. म्हणजे या वाक्यातील द्रव्यवाचक शब्दांची उपस्थिती व्यर्थ आहे. त्यातील आकारवाचक किंवा तार्किकीय शब्दांची उपस्थितीच त्याच्या सत्यतेकरिता अवश्य आणि पुरेशी आहे. अशा विधानांना तार्किकीबलाने सत्य विधाने म्हणतात. पुढील औपाधिक विधान तार्किकीबलाने सत्य नाही.
जर पाऊस पडेल तर जमीन भिजेल.
कारण पावसाने जमीन भिजते हे वस्तुस्थितीचे ज्ञान इंद्रियानुभवाने मिळणारे आहे. परंतु
जर कवी द्रष्टे असतील आणि केशवसुत कवी असतील तर केशवसुत द्रष्टे असतील ह्या वाक्याची सत्यता कवी द्रष्टे असतात किंवा केशवसुत कवी आहेत याच्याशी संबद्ध नाहीच. ‘कवी’, ‘द्रष्टे ‘आणि केशवसुत’ हे शब्द यातून काढले आणि तिथे केवळ एकाक्षरी चिन्हे ठेवली तरी ते विधान खरेच राहील.
जर सर्व क ख असतील आणि ग क असेल, तर ग ख असेल
ह्या वाक्यात द्रव्य नाहीच. अशी वाक्ये तार्किकीबलाने सत्य असतात असे म्हणतात. हे शुद्ध तार्किकीय ज्ञान आहे, म्हणजे असे ज्ञान की जे जगातील कोणत्याही वास्तवाविषयी नाही, पण जे सत्य आहे अशा ज्ञानाचे हे उदाहरण आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.