चर्चा प्रा. शेषराव मोरे यांनी सादर केलेल्या पुराव्यांविषयी

आजचा सुधारक फेब्रुवारी १९९३ च्या अकांत प्रा. शेषराव मोरे यांनी माझ्या संदर्भात काही विधाने केली आहेत (पृ. ३४८-५०).पृ. ३५० वर ते म्हणतात, ‘अवतरणे जेथून घेतली त्या ग्रंथातील पृष्ठांकांचा उल्लेख पळशीकरांनी कुठेही केलेला नाही. मूळ हस्तलिखितात असे पृष्ठांक होते, मात्र प्रकाशित लेखात पळशीकरांनी ते येऊ दिलेले नाहीत, याचा पुरावा आम्ही ग्रंथात सादर केलेला आहे. सावरकरांना अनुवंशवादी व ब्राह्मण्यवादी ठरविण्यासाठी केलेले हे उद्योग आहेत. यालाच आम्ही वस्तुस्थितीचा विपर्यास असे मानतो. अशा स्वरूपाच्या आक्षेपार्ह बदलाला “जाणीवपूर्वक विपर्यास” वा “खोटेपणा” याशिवाय दुसरे काय नाव द्यावे?’
ज्या लेखाविषयी प्रा. शेषराव मोरे लिहीत आहेत तो माझा “’जात्युच्छेदक निबंध व सावरकरांचे अस्पृश्यता-निवारक कार्य” हा निबंध प्रा. विलास खोले यांनी संपादित केलेल्या सूर्यबिंबाचा शोध नामक स्वातंत्र्यवीर सावरकर गौरविकेत (शोध प्रकाशन, पुणे) प्रथम प्रसिद्ध झाला. या गौरविकेत लेखासाठी पुढील टीप छापलेली अभ्यासकांना आढळेल.
‘समग्र सावरकर वाङ्मय, खंड ३ रा, मध्ये “जात्युच्छेदक निबंध व इतर स्फुट निबंध” या विभागात समाविष्ट असलेल्या निबंधांवरच प्रस्तुत लेखावरील विवेचन आधारलेले आहे. प्रस्तुत लेखात सावरकरांच्या लेखनातील जी उदाहरणे दिली आहेत ती सर्व या खंडात समाविष्ट वेगवेगळ्या लेखांमधूनच घेतलेली असल्याने पृष्ठसंदर्भ वेगळे दिलेले नाहीत.’
वरील निबंध लिहिण्याच्या वेळची काही माहिती येथे देणे अनुचित होणार नाही. या विषयावर मी लेख लिहावा अशी विनंती प्रा. खोले यांनी मला केली तेव्हा, सावरकरांचे संपूर्ण लेखन अभ्यासण्यास मला सध्या सवड नाही, व म्हणून लेखन करणे शक्य वाटत नाही, असे मी त्यांना सांगितले. त्यावर खंड ३ रा मधील अमुक एक विभाग तुम्ही जर सगळा वाचलात तर पुरेसे आहे, असे त्यांनी म्हटले. या मर्यादेत लेखन केले म्हणून तसा स्पष्ट उल्लेख टीप देऊन मी जाणीवपूर्वक केला.
हस्तलिखितात आधार-संदर्भांचे पृष्ठांक दिलेले होते, पण ते प्रकाशित लेखात येऊ नयेत याची मी मुद्दाम काळजी घेतली, असा आरोप प्रा. मोरे यांनी केला आहे. याला आधार म्हणून जो ‘पुरावा त्यांनी त्यांच्या ग्रंथात सादर केला आहे तो मी पाहिला. समग्र सावरकर, खंड ३ रा, मधील विशिष्ट विभागातील लेख ही मी मर्यादा आखून घेतली व ती स्पष्ट केली, तेव्हा प्रत्येक ठिकाणी पृष्ठांक देण्याचे कारण नाही असे मी ठरविले. माझ्या वाचनात आलेल्या ग्रंथांत/ निबंधांत अशा प्रकारे एकच मुख्य संदर्भ देण्याची रीत कोठे कोठे मला आढळली आहे, व येथे तिचे पालन करणे मला ठीक वाटले. कारण अन्य कोणाच्या लेखनाचे संदर्भ लेखात येणार नव्हते. सूर्यबिंबाचा शोध चे संपादक प्रा. विलास खोले हे सावरकरांना मानणारे आहेत. विकृत हेतू बाळगून अशी मुद्दाम काळजी त्यांनी मला घेऊ दिली नसती. माझी टीप त्यांना समाधानकारक वाटली.
निबंध लिहिण्यास सुरुवात केली तेव्हा तळटीपेचे आकडे मी टाकण्यास सुरुवात केली. पण अन्य कोणत्याच लेखकाच्या लेखनाचा, वा सावरकरांच्याही ग्रंथाचा, संदर्भ येणार नाही हे स्पष्ट झाल्यावर आकडे टाकण्याचे थांबवले व एकच टीप दिली. टाकलेले आकडे खोडले. क्र. २ चा आकडा नजरचुकीने खोडावयाचा राहिला असावा. संपादकाने वा मुद्रिते तपासणाऱ्याने तो काढून टाकावयास हवा होता. ‘महाराष्ट्रातील जातिसंस्थाविषयक विचार’ या पुस्तकात लेख पुनर्मुद्रित करताना हा मुद्रणदोष काढून टाकला गेला. हस्तलिखित प्रत व मुद्रणप्रत अशा दोन प्रती मी केल्याच असत्या तर वस्तुतः प्रा. मोरे यांना ‘पुरावा मिळालाच नसता! मूळ हस्तलिखित प्रतच प्रा. खोले यांनी वापरली, आणि मुद्रित लेखावरून पुनर्मुद्रण झाले. मुद्दाम काळजी मी घेतली नाही याचाच वस्तुतः पुरावा प्रा. मोरे यांनी नेमक्या उलट्या युक्तिवादासाठी वापरला आहे. माझा हेतू विकृत विपर्यास करण्याचा नसल्याने मुद्दामहून काळजी घेण्याचे मला कारणच नव्हते.
निकोप वृत्तीने वाद घालण्याची ही रीत नव्हे. हेतुतः विकृत विपर्यास केला हे सिद्ध करण्यासाठी साध्या संपादन वा मुद्रितशोधन यांच्या दोषांच्या आधारे युक्तिवाद करणे, तो बिनतोड पुरावा मानणे युक्त नव्हे.
सावरकरांच्या भूमिकेला मी न्याय दिलेला नाही किंवा माझ्या विश्लेषणातून त्यांचे म्हणणे सम्यक् स्वरूपात वाचकांसमोर येत नाही असे प्रा. मोरे यांनी म्हटले तर समजण्यात काही अडचण नव्हती. असे मतभेद अभ्यासकामध्ये असू शकतात. वाद प्रतिवादामधून तत्त्वबोध होऊ शकतो. त्यांचे दोन्ही ग्रंथ बारकाईने अभ्यासल्यावर माझी मते सुधारून घेण्यास मला अडचण वाटणार नाही. या दृष्टीने त्यांनी अटीतटीने वाद घातला आहे याचे मी स्वागतच केले आहे.
पण जाणीवपूर्वक, हेतुतः विकृतीकरण करावयाचे आधी पक्के ठरवून मग मी निबंध लिहावयास घेतला ही वस्तुस्थिती नाही. ‘जात्युच्छेदक निबंध या विभागातील लेख वाचल्यावर माझे मत जे बनले ते मी मांडले. समीक्षक लेखन करतो तेव्हा आपला निवाडा, आपली मीमांसा पुढे ठेवण्यासाठी आधारासाठी अवतरणे, मुद्दे वापरतो. त्यात निवड व मांडणी जरूर असते. जशी ती प्रा. मोरे यांच्या ग्रंथातही आहे. ‘लगेचच पुढे ते (सावरकर) असे म्हणतात की या वाक्यांशाच्या आधारेही प्रा. मोरे यांनी मजवर आरोप केला आहे. लगेचच पुढे असे म्हणण्यातली तांत्रिक स्वरूपाची चूक त्यांनी दाखवून दिली. ती योग्यच टीका आहे. समग्र सावरकर, खंड ३ रा, मध्ये एका विभागात समाविष्ट केलेली, एकाच विषयावरील लेखमाला हे सलग लेखन मानता येऊ शकते असे म्हणण्यास जागा आहे. तरी पण प्रा. मोरे यांची टीका मी तांत्रिक अंगाने स्वीकारतो. त्या आधारे जो हेत्वारोप त्यांनी केला आहे तो अनाठायी आहे. असो.
सावरकरांना ‘अनुवंशवादी, चातुर्वर्ण्यवादी, ‘ब्राह्मण्यवादी ठरविण्यात मी त्यांच्या भूमिकेचा विपर्यास केला आहे की त्यांच्या मांडणीत ठळक व गंभीर अतंर्विरोध व विसंगती आढळते व ती मी उघड केली आहे? प्रा. मोरे यांच्या टीकेचा परामर्श वेगळा घ्यायला हवा. तो यथावकाश मी घेईन. ‘जात्युच्छेजक निबंध’ या विभागातील (खंड ३ रा समग्र सावरकर वाङ्मय) सावरकरांचे लेख, माझा निबंध आणि प्रा. मोरे यांची टीका याचे वाचन केल्यास, माझे विवेचन व निष्कर्ष यांच्याशी मतभेद झाले तरी, जाणूनबुजून विकृत विपर्यास केल्याचा हेत्वारोप निराधार व गैरलागू आहे हे तटस्थ अभ्यासकांना पटेल.. जिज्ञासूंनी अवश्य तिन्ही लेखन एकत्र वाचावे अशी माझी विनंती आहे.
१५० गंगापुरी वाई ४१२८०३

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.