पत्रव्यवहार धर्माचा स्वीकार व विवेकनिष्ठा

कोणत्याही गोष्टीचे अस्तित्व वा नास्तित्व सिद्ध करण्यासाठी आपण पुरावा ग्राह्य (अग्राह्य /पर्याप्त/ अपर्याप्त मानतो तेव्हा आपण एका चौकटीत तो निवाडा करीत असतो. त्या चौकटीत त्या गोष्टीचे त्या चौकटीतील विशिष्ट अर्थाने अस्तित्व नाही, व कधीच सिद्ध होऊ शकणार नाही, असे विधान करता येईल.
ऐंद्रिय अनुभवप्रामाण्यवाद वा बुद्धिप्रामाण्यवाद या चौकटीत ज्यांचे नास्तित्व स्वीकारावे लागते अशा काही गोष्टी सामान्यतः धर्म मानणाऱ्या व्यक्ती सत्य म्हणून स्वीकारत असतात असे विधान करता येईल असे मला दिसते.
व्याघातमय नसलेली, तार्किकीय दृष्ट्या शक्य असलेली अशा स्वरूपाची ईश्वराची संकल्पना केली जाऊ शकते असे आपल्यास मान्य आहे असे दिसते.
तार्किकीयदृष्ट्या शक्य असलेली गोष्ट ही भौतिक/ नैसर्गिक पदार्थस्वरूपी आहे असे म्हणायचे झाले तर नैसर्गिक शक्याशक्यतेचा मुद्दा निश्चितच प्रस्तुत होईल. एरवी तो प्रस्तुत ठरणार नाही.
तार्किकीयदृष्ट्या शक्य असलेल्या गोष्टीचे सत्यत्व वा अस्तित्व स्वीकारणे अमुक तमुक चौकटीत बसत नाही असे म्हणता येईल. पण ते विवेकसंमत होणार नाही, विवेकनिष्ठेच्या विरोधी होईल असे आपण म्हणता तेव्हा विवेक या शब्दाला स्वतःचा विशिष्ट अर्थ देता. ‘विवेक’ या शब्दाची विशिष्ट व्याख्या करता.
विवेक या शब्दाच्या अर्थवत्तेचा आपण संकोच करीत आझत, संक्षेपण (reduction) करीत आहात असे मी म्हणेन.
याच प्रकारची गोष्ट ‘श्रद्धा’ या शब्दाऐवजी ‘विश्वास’ हा शब्द वापरता येईल असे आपण म्हणता तेव्हा घडते. विश्वास व श्रद्धा दोन्ही भंग पावू शकतात. पण विश्वास अनाठायी होता हे लक्षात आल्यावर माणूस मुळातून हादरत नाही. श्रद्धा भंग पावते, किंवा तिला तडा जाण्याचा प्रसंग घडतो तेव्हा मुळापासून हादरा बसतो. कारण श्रद्धा व्यक्तित्व व जीवन यांना आधार देते, आकार देते, आशय प्राप्त करून देते.
ज्ञानाच्या क्षेत्रात ज्याच्या सत्यत्वाचा कसलाही पुरावा नाही अशा विधानावरील अढळ विश्वास म्हणजे श्रद्धा, अशी व्याख्या केल्यास, अर्थातच, अशी श्रद्धा बाळगणे हे विवेकसंमत होणार नाही. ज्ञान संपादण्याची अमुक एकच एकमेव रीत/ चौकट आहे अशी मर्यादा वरील विधानाला नसल्याने हे म्हणणे मला स्वीकारण्यात अडचण नाही.
धार्मिक असणे हे ऐंद्रिय अनुभवप्रामाण्यवादी वा बुद्धिप्रामाण्यवादी असण्याशी मेळ न खाणारे आहे. पण त्यात अविवेकच आहे असे तुमची टीका वाचल्यावरही मला म्हणावेसे वाटते. कोणत्या परिष्कृत स्वरूपातील धार्मिकता ही विवेकनिष्ठेशी विसंवादी नाही याची काटेकोर स्पष्टता करणे ही गोष्ट तत्त्वतः व व्यवहारतः अधिक निकडीची, महत्त्वाची व उपयोगाची (अगदी युटिलिटेरियन भूमिकेमधूनही) आहे कसे मी म्हणू इच्छितो.
लोकसंख्या वाढ
‘अपत्याला जन्माला घालणे या क्रियेत काही गंभीर जबाबदाऱ्या अंतर्भूत आहेत हे आपले म्हणणे योग्य आहे. या जबाबदाऱ्यांची जाण वा त्या किमान समाधानकारकपणे पार पाडण्यासाठी आवश्यक ते ज्ञान, ती वृत्ती व ती कौशल्ये अंगी बाणविण्याची पर्वा न करता अनेकानेक नवरा-बायको मुले जन्माला घालीत असतात, हे आपण पाहू शकतो.
आपण जबाबदाऱ्यांचा संबंध योगक्षेमाशी जोडला आहे. त्यांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, औषधोपचार इत्यादी अत्यावश्यक गोष्टी जी मातापितरे देऊ शकत नाही त्यांना अपत्योत्पादनाचा अधिकार असूच शकत नाही असे म्हणणे म्हणजे वेगळ्या शब्दांमध्ये गरिबांना हा अधिकार नाही असे म्हणणे होय. वास्तविक अपत्यसंगोपनाच्या संदर्भातल्या जबाबदाऱ्या केवळ वरील अनि योगक्षेमाच्या व्यवस्थेपुरत्या नसतात. तेव्हा असे म्हणण्यात संक्षेपण (reduction) आहे.
अपत्यांना जन्म द्यावयाचा नाही पण समागमसुख हवे अशी इच्छा असणाऱ्यांची आज पुष्कळ अधिक तांत्रिक सोय झाली आहे, तिचा लाभ स्त्रीपुरुषांनी घ्यावा, व केव्हा व किती मुलांना जन्म द्यावा याचा स्वतःचा आवाका पाहून विचार करावा, देशाचा आवाका पाहून विचार करावा असे म्हणणेही ठीक आहे. पण अधिकार असूच शकत नाही ही भूमिका ‘1984’ या जॉर्ज ऑर्वेल यांच्या कादंबरीतील सर्वंकष, संचालित हुकूमशाहीला जन्म देऊ शकते. कारण आपल्या संपादकीयानुसार हा अधिकार योगक्षेमाची व्यवस्था करू न शकणाऱ्या कुटुंबांना नाकारण्याची सत्ता राज्यसंस्थेच्या हाती राहील. तसे जर आपणास अभिप्रेत नसेल तर, लोकशिक्षणाच्या मर्यादेत तीव्र स्वरूपात व्यक्त केलेले आपले मत हाच या विधानाचा दर्जा आहे ही गोष्ट आपण स्पष्ट करणे आवश्यक आहे.
योगक्षेमाची व्यवस्था करण्याची क्षमता आहे की नाही याचे वस्तुनिष्ठ, शास्त्रपूत मोजमाप असू शकते काय? योगक्षेम आपण करू शकतो याचा निर्णय कोणी करावयाचा? मुलांची संख्या कोणी ठरवावयाची?
‘जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख या तत्त्वाच्या इष्टते बद्दल आपली खात्री आहे असे दिसते. याही कसोटीवर कोणत्या व्यवहारामधून दुःख जास्त निर्माण होते हे ठरविणे अशक्यप्राय आहे. ‘योगक्षेमाची व्यवस्था करण्याची क्षमता नाही’ असा आपला ज्या अगणित कुटुंबांच्या संदर्भात निवाडा होईल त्या कुटुंबांमध्ये वाढणाऱ्या मुलांच्या वाट्याला फक्त दुःखच येते असे आढळत नाही. जे काही आयुष्य त्यांच्या वाट्याला येते त्यात त्यांनाही सुखाचे अनेकानेक क्षण असतात. सुखदुःखाचा असा हिशेब मांडून ताळेबंद काढण्याचा गंभीर खटाटोप काही निवडक कुटुंबांच्या बाबतीत आपण करून पाहण्यासारखा आहे.
मला तर असे म्हणावयाचे आहे की, हा विषयच विषेषतः असा आहे की, जेथे ‘जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख’ ही कसोटी लागण्याची भूमिका, तो अधिकार स्वतःकडे घेणाऱ्यास, माणुसकीच्या नावावर अमानुष बनविते. ‘सक्तीने व्यक्तींना सुखी करण्याची गोष्ट व्याघातमय आहे.
‘लक्षावधी मुले कुत्र्यामांजरांसारखी जन्मतात’ हे विधान ‘आरामखुर्ची’त बसून केलेले विधान आहे. आणि ज्यांना उद्देशून हे विधान केले गेले आहे ती मातापितरे व बालके यांचे माणूसपण नाकारणारे आहे. बालकांविषयीची आपली कणव सच्ची आहे. गोरगरीब व ‘अडाणी’ जनसामान्यांविषयी घृणा, तुच्छभाव व भीती याची छाया या विधानावर जडलेली मला दिसते..
बुद्धिप्रामाण्यवादास (rationalism) बंधुभाव, सहानुभाव व करुणा यांची जोड जर नसेल तर विवेक धोक्यात येतो; बुद्धीला निरपवाद सत्य वाटणाऱ्या ‘शास्त्रशुद्ध, तार्किकीयदृष्ट्या बिनतोड मानदंडांच्या (norms) आग्रहातून समाजाच्या सर्वांगीण पुनर्रचनेचा असा एक आराखडा, अशी एक रणनीती व प्रक्रिया समोर येते जी माणसाला एक संयंत्र समजून त्याच्याशी व्यवहार करणे समर्थनीय मानते. जेम्स मिल्ल – बेंथम प्रणीत युटिलिटेरियन प्रणालीची या प्रकारची मर्यादा व गंभीर न्यून यांचे भान जॉन स्टुअर्ट मिल्ल यांना आले होते असे दिसते.
बहुतेक वंश इतके सामान्य असतात की ते चालू राहिले काय किंवा न राहिले काय त्याने काही फरक पडणार नाही हे विधानही राज्यसत्तेने अंगीकारावयाच्या धोरणाचा व कार्यक्रमाचा पाया होऊ शकत नाही, होऊ नये. त्या त्या मातापित्यांनी ठरवायचे आहे की आपला वंश चालू राहावा की नाही. हा राज्यसत्तेचा अधिकार असता कामा नये.

‘धारणाद्धर्म इत्याहुः।
धर्म म्हणजे religion नव्हे ह्या श्री. मा. गो. वैद्यांच्या मताचे श्री. श्री. गो. काशीकर ह्यांनी केलेले समर्थन (फेब्रु. १९९३) थोडे त्रोटक वाटले. ते अधिक विशद झाल्यास आनन्द होईल.
धर्म आणि religion ह्या संकल्पना भिन्नभिन्न काळी विभिन्न भूमीत उद्भवलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी एकरूपत्व वा परिपूर्ण पर्यायवाचिकत्व आहे असे मानणे योग्य होणार नाही हे श्री. मा. गो. वैद्यांचे म्हणणे, त्याचप्रमाणे ‘धर्म हा जास्त व्यापक आहे हे विधान वास्तविक कोणासही मान्य करण्यास हरकत असू नये.
त्या किती जवळच्या आहेत, त्यांच्यांत नेमका भेद कोणता, त्यांची व्यवच्छेदक लक्षणे कोणती हे श्री. काशीकर ह्यांनी सांगितले असेल तरी मला त्यांच्या लेखातून पुरेसा बोध झाला नाही. शंका कायम आहेत. त्या धर्म व्यापक आहे ह्याविषयी नसून तो ‘स्पष्टपणे ऐहिक आहे एवढ्या पुरत्याच आहेत. माझ्या अजून न फिटलेल्या शंका अशा :
१) धर्म हा शब्द जर स्पष्टपणे ऐहिक अर्थ व्यक्त करतो तर धार्मिक कृत्ये कोणती? ती इहलोकासंबंधी आहेत की परलोकासंबंधी आहेत? धर्म हे नाम व त्यापासून झालेले विशेषण धार्मिक – इहापासून ऐहिक तद्वत्. धर्म जर ऐहिक तर धार्मिक ह्या शब्दापासूनसुद्धा इहलोकाशी निगडित असे ज्ञान झाले पाहिजे. मग आजवर धार्मिक हा शब्द इहाविषयी का बरे कधी वापरला गेल्याचे आढळत नाही? तो नेहमीच पारलौकिकाशी, पापपुण्याशी संबंधित राहिला आहे. अगदी क्वचित् का होईना, तो धर्माच्या स्पष्ट अशा ऐहिक अर्थाने वापरला जावयास हरकत नव्हती असे माझ्या मनात येते. तसा तो वापरला गेलाही असेल, पण माझ्या पाहण्यात नाही. तशी उदाहरणे पाहावयास मिळाली की माझी ही शंका फिटेल.
२) धर्म हा शब्द प्राधान्याने ऐहिकाशी व गौणत्वाने पारलौकिकाशी संबंधित आहे असे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मानले [पाहा : (अ)”…. religion ला धर्मातून काढून टाकायचे असे नाही…..” (आ) “ धर्मात समाजधारणेसाठी सर्व क्रिया करावयाच्या असतात. आणि त्या योग्य रीतीने केल्यास त्यांचे अतिरिक्त फलित पारलौकिक कल्याण हे असते.] तरी त्याचा पारलौकिकाशी असलेला संबंध जर अविभाज्य असेल तर धर्म स्पष्टपणे ऐहिक राहत नाही, असे मला वाटते. कारण एखादी नोकरी स्वीकारताना पगाराबरोबर बोनस व महागाईभत्ता ह्यांची रक्कम (total emoluments) पाहिल्याशिवाय कोणी ती स्वीकारीत नाही. तसेच पारलौकिक लाभाकडे दृष्टी ठेवूनच धर्मकृत्ये केली जात असतात, ह्याविषयी माझ्या मनात शंका नाही.
समजा एखाद्या वस्तूचा रंग मला नारिंगी दिसतो. तोच श्री. मा. गो. वैद्य व श्री. काशीकर ह्यांना स्पष्टपणे तांबडा दिसतो. व पुन्हा त्या तांबड्यात गौणत्वाने पिवळा आहेच असे ते म्हणतात. मग त्या गौण पिवळ्याचे प्रमाण कोठपर्यंत वाढवीत नेले तरी तो त्यांना स्पष्टपणे तांबडा दिसत राहणार हे कळले तर बरे असे मनात येते.
३) धर्म जर स्पष्टपणे ऐहिक मानला तर सदाचरणाचे नियम हे धार्मिक नियम मानावे लागतील व कोणत्याही देशांमध्ये प्रचलित असलेल्या सदाचरणाच्या नियमांना (त्यामध्ये तेथले फौजदारी कायदेकानूसुद्धा आले) धर्माचरणाचे नियम म्हणावे लागेल. आणि मग सर्व जगतात ‘धर्म एकच आहे असे मानावे लागेल. (समाजधारणेसाठी उपयोगी पडणारे नियम देशोदेशी भिन्न कसे असतील ते मला कळत नाही.) म्हणजेच एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति असे मान्य केले तर मागे जी मी एक शंका काढली होती तीच माझ्या मनात पुन्हा डोकावते की मग कोणत्याही व्यक्तीचे धर्मान्तरण व्यवहारातसुद्धा शक्य होणार नाही! तेव्हा धर्मान्तराबाबत एवढा गहजब कशासाठी?
४) अशा स्पष्टपणे ऐहिक, जगतः स्थितिकारण (हिन्दुसमाजस्य स्थितिकारण नव्हे) असलेल्या आणि त्यामुळे अखिल मानवमात्राला लागू होणाऱ्या धर्माला हिंदुधर्म का म्हणावयाचे? एखाद्या समाजामध्ये जो सदाचार दिसतो तो पापभयामुळे, पुनर्जन्मभयामुळे वा रौरवकुंभीपाकादिनरकभयामुळे दिसत असेल तर धर्म स्पष्टपणे ऐहिक राहत नाही. मृत्यूनंतर परमेश्वराकडून होणाऱ्या निवाड्याच्या कल्पना वेगवेगळ्या religions मध्ये बदलतात. म्हणूनच ते निरनिराळे religions म्हणवितात. त्रिकालाबाधित असे सदाचाराचे नियम सगळ्यांना सारखेच लागू व्हावयाला हवेत – हिंदुधर्मामध्ये सांगितलेल्या सदाचारांच्या नियमामुळे हे जगत् टिकते असे मानले तर इतर religions चे अनुयायी अधिक दीर्घायु, अधिक प्रभावशाली वा अधिक वैभवसंपन आढळावयाला नकोत. पण त्यांचाच अभ्युदय होताना दिसतो. ( परमेश्वर त्यांनाच पेट्रोलियमचे साठे भरभरून देतो व त्यांचा उपयोग करून इतरांचे शोषण करण्याचे तंत्रज्ञान तेथेच विकसित करतो.) म्हणजे अभ्युदय religions च्या वाट्याला व निःश्रेयस धर्माच्या असे दिसते व मग धर्म स्पष्टपणे ऐहिक राहत नाही.
अभ्युदयनिःश्रेयसहेतुः स धर्मः हे मानले तर धर्म हा ‘जगतः स्थितिकारण राहत नाही. तो ‘जगतः उन्नतिकारण ठरतो. व निरनिराळ्या संस्कृतींमधले उत्कर्षापकर्ष पाहिले तर त्याच्या सनातनत्वाला बाधा येते. आम्ही धर्मापासून च्युत झाल्यामुळे आमचा अपकर्ष झाला असेल तर मग आम्ही खरे हिंदु राहत नाही. नामधारी हिंदु राहतो. मग नामधारी हिंदूंच्या नामधारी धर्मान्तराचा एवढा बाऊ का?
५) आपल्या हिंदुस्थानात religion प्रचलित नाहीच काय? की येथे फक्त धर्मच आहे ? हिंदुस्थानात जर religion असेल तर ( किंवा नसेल तरी ) त्यासाठी योग्य, चपखल पर्यायी शब्द कोणता? संप्रदाय, संस्कृती हे दुसऱ्या अर्थाने आजवर वापरले गेलेले शब्दसुद्धा धर्म या शब्दाप्रमाणेच ढोबळपणे त्या दिशेकडे अंगुलिनिर्देश करतात. religion साठी एखादा नवा शब्द तयार करून ह्यापुढे तरी त्याचाच वापर करणे इष्ट होईल. तो श्री. वैद्यांसारख्या संस्कृतपंडितांनी केला तर त्यापासून अनेक प्रत्ययोपसर्गघटित शब्दही सहजतेने होतील आणि religion सारख्या संकुचित अर्थाच्या शब्दासाठी पर्याय म्हणून व्यापक अर्थाचा शब्द वापरण्याचा दोष ह्यापुढे तरी घडणार नाही व ही चर्चाही एकदाची बंद पडेल. कारण सगळा त्रास जुने शब्द शिथिलपणे वापरल्याने निराळेच संदर्भ डोक्यात निर्माण होतात त्यामुळे होत असतो (धर्म हा शब्द ही पूर्वी असाच शिथिलपणे वापरला गेल्यामुळे त्याला इतके अर्थ प्राप्त झाले !). अजून असा शब्द का बरे निर्माण झाला नाही?
आता एकच शंका
६) स्थूलपणे सर्व मानवजातीला सर्वकालात उपकारक ठरणारे जे सिद्धांत – सत्य अहिंसा इ. हे जर सनातन किंवा शाश्वत धर्म म्हणवत असतील तर युगधर्मामध्ये कशाचा अन्तर्भाव होतो? काळानुरूप सत्याहिंसादिकांत ( तपशिलामुळे का होईना ) फरक पडला तर ते शाश्वत नाहीत असे म्हणावे लागेल. सत्य, अहिंसा, अस्तेय इत्यादींचा आपल्या ह्या कलियुगातला तपशील कोठे पाहायला मिळेल? आपद्धर्म हा धर्म नव्हे. ते स्वहितसंरक्षणासाठी केलेले अनैतिक आचरण आहे. तेव्हा त्याची चर्चा येथे अभिप्रेत नाही.
‘प्रा. वैद्य ह्यांच्यासारख्यांचा प्रयत्न धर्माला आजच्या काळाला अनुरूप असे रूप देण्याचा आहे असे प्रा. काशीकर म्हणतात. हे वाचून असे वाटते की प्रा. मा. गो. वैद्य शाश्वत धर्मापासून वेगळा असा युगधर्म सांगत आहेत. पण मग पुढचे वाक्य पाहा. ‘जुन्या काळातील मूलभूत धर्मकल्पना त्यांना आजही उपयुक्त वाटते, परंतु त्यातील कालबाह्य घटकांबद्दल त्यांची दृष्टी सुधारकीच आहे.’ आता मुळातला धर्म जर स्पष्टपणे ऐहिक तर त्याचा गौणत्वाने पारलौकिकाशी असलेला संबंध हा कालबाह्य घटक मानावयचा काय? त्याला ते खरोखरच त्याज्य मानत असते तर religion ला धर्मातून काढून टाकावयाचे नाही असे त्यांनी मग म्हटले नसते.
माझ्या डोक्यात नुसता गोंधळ उडाला आहे. माझे शंकानिरसन कोणीही केले तरी मला ते हवे आहे.
दिवाकर मोहनी, धरमपेठ, नागपूर -१०

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.