प्रीतिवाद

मुख्य विषयाला हात घालण्याआधी विवेकवादातील एका मुद्द्याला हात घालतो. त्याची संगती नंतरच्या युक्तिवादात आहे. तेव्हा थोडे विषयांतर.

व्याख्यात्मक विधाने
व्याख्यात्मक विधाने ही स्वतःहून सत्य किंवा असत्य असत नाहीत. उदाहरणार्थ : “भ्र म्हणजे एक यंत्र की जे दूध व पाणी (मिसळलेले) दूर करते.” या व्याख्यारूपी विधानास स्वतःची अशी सत्यता नाही. या विधानावरून एकच बोध होतो की यापुढे मी ‘भ्र’ चा उल्लेख केला तर काय समजावे. ज्याप्रमाणे एखाद्या निर्धारास सत्यता वा असत्यता पोचत नाही त्याप्रमाणे या व्याख्यांनाही ती (सत्यता वा असत्यता) चिकटू शकत नाही. ‘भ्र’ हा अपरिचित शब्द वापरल्याने हे शक्य झाले असे कुणी म्हणू शकेल. परंतु प्रचलित आणि परिचयाच्या शब्दांच्या विविध अर्थवाही व्याख्या बघितल्यावर व्याख्यात्मक विधानांच्या या गुणाची सत्यता पटू शकते. अनेक वादांमध्ये सध्या वापरल्या जाणाऱ्या ‘हिंदू’ व ‘धर्म’ या शब्दांच्या विविध रंगी व्याख्या यासाठी आठवल्या तरी चालतील.

प्रचलित शब्दाच्या वेगवेगळ्या व्याख्यांचे प्रयोजन दोन कारणांनी असते. एक म्हणजे शब्दाचे अर्थ व वापर अनेक असू शकतात. किंवा दुसरे म्हणजे शब्दाचे अर्थ कधी कधी संदिग्ध असतात आणि तो निःसंदिग्ध करताना वेगवेगळे लोक वेगवेगळा अर्थ लावत जातात. याशिवाय अकारण विपरीत व्याख्या करण्याचा पण प्रयत्न दिसतो. त्याच्या मुळाशी चुकीची समजूत, असमंजसपणा वा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न असू शकतो. जोपर्यंत एखाद्या शब्दाची आपण व्याख्या करीत नाही तोपर्यंत तो सैलसर रीतीने वापरण्याची आपल्याला मुभा असते. पण व्याख्या मांडल्यावर मात्र तो शब्द व्याख्येची व्याप्ती मोडत नाही ना हे बघायची जबाबदारी पडते. आणि याच काटेकोरपणामुळे अभिव्यक्ती सुधारण्यास मदत होते.

व्याख्यांचा मुख्य उद्देश संवाद साधणे हा असल्याने, विपरीत व्याख्यासुद्धा आपण समजा अशी सुरुवात करून खपवून घेऊ शकतो. आणि त्यातून अर्थवाही संवाद देखील साधू शकतो. उदाहरणार्थ : “समजा हिंदु म्हणजे गोमांसभक्षक व मूर्तिभंजक मनुष्यप्राणी. असा हिंदु गीतेवर विश्वास ठेवीत नाही.” जे अशा पद्धतीची विपरीत व्याख्या करतात, ते तोच अर्थ कायम ठेवून त्या व्याख्येत शब्दाचा मुक्त प्रयोग करू शकतात. मात्र सुसंवाद साधण्यासाठी इतरांना त्या अर्थी (विपरीत) शब्द वापरायचा झाल्यास, त्या शब्दापूर्वी व्याख्या करणाऱ्याचे नाव लावावे लागते. जसे “मी टिळकनिर्देशित हिंदु नाही पण सावरकरनिर्देशित हिंदु आहे”.

व्याख्यात्मक विधानांमुळे एका आणखी वाक्यप्रकाराची भर पडते. ती म्हणजे निरर्थक विधाने, की जी सत्य किंवा असत्य असू शकतात. उदाहरणार्थ:“कावळा म्हणजे काळ्या रंगाचा काव काव ओरडणारा पक्षी, ही कावळ्याची व्याख्या. कावळे काळे असतात वा नागपुरातील कावळे पक्षी असतात, ही सत्य निरर्थक विधाने. तो कावळा पांढरा आहे किंवा समुद्र किनाऱ्यावरील कावळे कुहूकुहू गातात, ही असत्य निरर्थक विधाने.” .

सुख :
सुखाची व्याख्या उपयोगितावाद्यांनी (जुन्या) केली आहे ती अशी (पहा : आजचा सुधारक, जून १९९२ पान ६) “सुखाखेरीज जगात स्वतोमूल्यवान काही नाही”. जवळपास हीच व्याख्या के.रा. जोशींनी उद्धृत केली आहे. (पाहा : आजचा सुधारक, जुलै, १९९२ पान १२१) “ज्याची इच्छा इतर कोणत्याही इच्छेवर अवलंबून नसते ते सुख”.

नवीन उपयोगितावाद्यांना मात्र ही व्याख्या मान्य नाही व ते सुखाखेरीज ज्ञानप्राप्ती, कलास्वाद इत्यादी गोष्टीनांही स्वतोमूल्यवान मानतात, (पाहा आजचा सुधारक, जून १९९१ पान ६) मात्र ज्यावेळी ते “या सर्वप्रकरणी, म्हणजे ज्ञानोपासनेत, कलोपासनेत सुख असते हे खरे …. “असे म्हणतात तेव्हा ते निरर्थक असत्य विधान करीत असतात.कारण स्वतोमूल्यवान वस्तूपासून अन्य काहीही अपेक्षित नसते. यामुळे किंवा याशिवाय जुन्या व नव्या उपयोगितावाद्यांच्या एकंदर तथ्यात फारसा फरक पडत नसल्याने या चुकीला विशेष महत्त्व येत नाही. मात्र ज्या वेळेस कांट असे म्हणतो (पाहा आजचा सुधारक, ऑक्टो. १९९२ पान २०९) “आता या स्वतोमूल्यवान वस्तूंपैकी एक वस्तू अशी आहे की जिचे मूल्य नैतिक आहे. ही वस्तू म्हणजे सदीहा”. त्यावेळेस त्याने सुखाची वरील व्याख्या नामंजूर केली असते. कारण सदीहेतून सुख जन्माला येत नाही हे देखील त्यांचे म्हणणे आहे. यामुळे आता कांटवर (वा कांटवाद्यांवर) अशी जबाबदारी पडते की “सुख म्हणजे काय व सदीहा काय असते ” याचे उत्तर द्यावे. याला एक पळवाट पण आहे की जशी ‘ज्ञान’ही एक मूलभूत संकल्पना आहे त्याप्रमाणे सुख व सदीहा यांना पण मूलभूत संकल्पना मानता येईल.

सदीहेचे स्वरूप :
कल्पना करू या की जगात केवळ एकच मनुष्य आहे. या मनुष्यास सुख, दुःख, क्रोध, भीती, ईहा (will) या सर्व ‘वस्तु’ आहेत. पण असा मनुष्य नीतीने आचरण करू शकेल काय? अर्थातच नाही. तो एकमेव मनुष्य असल्याने तो केवळ स्वतःच्याच फायद्याचे निर्णय घेत असणार. याचाच अर्थ असा की अशा माणसास ‘सत्’ व ‘असत्’ ‘ईहा असणार नाही. त्या सृष्टीवर जेव्हा दुसरा कोणी उगवेल तेव्हाच सदीहेचा जन्म होऊ शकेल. याचाच अर्थ असा होतो की सदीहा ही स्वयंभू वस्तू नाही तर तिला दुसऱ्यांच्या अस्तित्वाची आणि प्रतिक्रियेची गरज आहे. (प्रतिक्रियेशिवाय अस्तित्व हे निर्जीवांनाच असते.) म्हणजेच समूहाच्या प्रतिक्रिया जशा बदलत जातात तशाच नीतीच्या कल्पना वा सदीहेचे स्वरूप बदलत जाणार.

तेव्हा स्वतोमूल्यवान सदीहा या गृहीत तत्त्वाचे (Postulate) इतके जटिल रूप पाहिल्यावर असे वाटते की यापेक्षा काही सरळ सिद्धान्त असल्यास मान्य करता येईल. असा सिद्धान्त मांडण्यापूर्वी कांटच्या तत्त्वाचे सूत्रमय स्वरूप पाहू.

गृहीत तत्त्वे :- १) मी आहे (म्हणजे मला ज्ञान, ईहा, शक्ति इत्यादि आहे. २) इतरेजन आहेत. (त्यांनाही ज्ञान वगैरे आहे.) ३) सदीहा आहे.
व्याख्या : नीती म्हणजे सदीहेने दर्शविलेले कृत्य करण्याची वृत्ती ( यामुळे नीतीचे स्वरूप संदिग्धच राहते व जास्त स्पष्टीकरणासाठी एका नियमाची गरज पडते.)
नियम :- ज्या क्रियेचे सार्विकीकरण होऊ शकत नाही ती अनीतिवान असते.

प्रीतिवाद
गृहीत तत्त्वे : १) मी आहे. (मला ज्ञान वगैरे आहे.) २) इतरेजन आहेत (त्यांनाही ज्ञान वगैरे आहेत.) व्याख्या :- १) सुख : एकमेव स्वतोमूल्यवान वस्तू.
२) प्रीती : ‘अ’ला सुख मिळाले हे समजल्यावर ‘ब’ ला सुख होणे व ‘अ’ ला दुःख प्राप्त झाले हे समजल्यावर ‘ब’ ला दुःख होणे. या क्रिया ‘ब’ ची ‘अ’ वर प्रीती दर्शवितात.
३) नीती : (स्थूल व्याख्या) माझी इतरेजनांवर असलेली समुच्चय (बीजगणितीय) प्रीती. अर्थात याविरुद्ध संज्ञांच्या व्याख्यादेखील आपोआपच होतात, पण सोयीसाठी त्या देऊन ठेवतो.
अ) दुःख : एकमेव ऋण स्वतोमूल्य असलेली वस्तू. .
ब) द्वेष ः अ ला सुख तर ब ला दुःख आणि अ ला दुःख तर ब ला सुख हे द्वेष दर्शविते.
क) अनीति : जर नीतीची बेरीज ऋण येत असेल तर त्यास अनीति समजावे.
याशिवाय काही गणितीय निर्देशांकाची व्याख्या करतो की ज्या योगे सदृशीकरण (Simulation) करता येईल तसेच प्रमेयांची तार्किक मांडणी करता येईल.
४) प्रीतिद्वेषनिर्देशांक : ‘अ’ च्या सुखदुःखाच्या प्रमाणात होणारे ‘ब’ ला सुखदुःख.
५) नीतिनिर्देशांक : प्रीति द्वेष निर्देशांकाची बीजगणितीय बेरीज भागिले इतरेजनांची संख्या.
६) नीतिगुणवत्तास निर्देशांक : प्रीतिद्वेषनिर्देशांकाचे प्रमाण अपगमन (Standard deviation).
७) समाजनीति निर्देशांक : सर्व जणांच्या नीतिनिर्देशांकाची बेरीज भागिले सर्वांची संख्या. या बरोबरीने इतर अनेक निर्देशांक तयार होतील पण त्या सर्वांचा इथे उल्लेख करणे अप्रस्तुत ठरेल.

नियम : प्रीतीचे समीकरण होते.
(येथे नियम हा शब्द निरीक्षित सत्य म्हणून वापरला आहे जसे Boyles Law.) याचा अर्थ अ ची ब वर प्रीती असेल आणि ब मात्र अ चा द्वेष करीत असेल तर ही स्थिती सहसा फार काळ टिकत नाही व एकतर परस्पर प्रीती वा द्वेषात त्याचे रूपांतर होते.

प्रमेये :
१). इतरेजनांची प्रीती लाभणे ही माझी सर्वोत्तम स्थिती असते.
२) अनीतिवान मनुष्य प्रीती अयोग्य होतो.
३) परस्परद्वेष कलह उत्पन्न करतो.
४) परस्परप्रीतिद्वेषनिर्देशांक जर पूर्णांकाहून अधिक असतील तर अस्थिर परिस्थिती निर्माण होते. (म्हणून हा निर्देशांक सहसा एकाच्या पेक्षा लहान असतो.)
५) सार्विकीकरण असलेली क्रिया द्वेष दर्शवीत नाही. (कांटचा सर्विकीकरणाचा नियम)
६) एक किंमत असलेला नीतिनिर्देशांक व शून्य किंमत असलेला नीतिगुणवत्ता निर्देशांक (ही जवळपास पूर्ण नीतिमत्ता वा जास्तीत जास्त शक्य नीतिमत्ता दर्शविते) म्हणजेच उपयोगितावादी तत्त्व..
शक्याशक्यतेच्या अभ्यासासाठी सदृशीकरण करून खालील नियम पण पडताळून पाहता येतील.
अ) जास्त समाजनीतिनिर्देशांक सामाजिक स्थैर्य दर्शविते.
ब) नीतिनिर्देशांकांचे अपगमन हे अस्थिरतेशी सरळ संबंधित आहे.

वरील प्रमेयांची सिद्धता कोणासही पडताळून पाहणे शक्य आहे.

प्रीतिवादाचे यश:
१) सदीहेची गरज न राहणे.
२) साविकीकरणाचा नियम सिद्ध होणे.
३) उपयोगितावाद्यांचे तत्त्व म्हणजे पूर्ण नीतिमत्ता हे सिद्ध होणे.
४) नीति अनीतीचे सोपे निकष.
५) सदृशीकरणाची शक्यता.

प्रीतिवाद पडताळणे
सर्वसामान्यरीत्या अनीती म्हणून मानलेल्या गोष्टी म्हणजे गुलामगिरी, वेठबिगारी, शोषण, फसविणे, चोरी करणे या सर्वांत द्वेष दडलेला असल्याने प्रीतिवादाने पण त्या अनीती ठरतात. गांधीनी ‘कर्तव्य बुद्धीने अंगीकारलेली अहिंसा वा तैमूरलंगाने कर्तव्यबुद्धीने केलेल्या कत्तली यामधील नीति-अनीतीचा प्रश्न प्रीतिनिकषाने सरळ सुटतो. धार्मिक आज्ञेमुळे आचरलेली कृत्ये जी सर्वसंमत नीति दर्शवितात. ननीतिच असतील कारण त्यात परप्रीती हे कारण नसेल.

याशिवाय इतर उदाहरणांवरूनही हा वाद पडताळणे आवश्यक आहे. माझ्या एकट्याच्या विचारातून ही क्रिया म्हणावी तितकी होणार नाही या मताचा मी असल्याने इतरांनीही त्याला साथ द्यावी ही विनंती.

प्रीतिवादातून ज्या गणितीय उपलब्धी होतील तसेच जी नवीन प्रमेये निघतील त्यातील काहीवरून हा वाद फेटाळला जाण्याची शक्यता आहे पण तत्पूर्वी जी चर्चा होईल तिचा नीतिशास्त्रास काही उपयोग होईल ही शेवटी आशा.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.