धारणात् धर्म इत्याहुः।

नोव्हेंबर-डिसेंबर १९९२ ते जून १९९३ या दरम्यान आजचा सुधारकच्या अंकांमधून दि. य. देशपांडे, श्री. गो. काशीकर व दिवाकर मोहनी यांच्यात झालेली चर्चा परवा सलगपणे वाचली. वेगळ्या दिशेने मुद्द्याला भिडायला हवे असे मला दिसते.

काशीकर म्हणतात त्याप्रमाणे “समाजाचा घटक ह्या नात्याने म्हणजे समाजधारणेच्या दृष्टीने उपयुक्त असा व्यक्तींचा आचार-विचार-समूह म्हणजे धर्म” ही व्याख्या करून चर्चेला आरंभ होऊ शकतो.

(१) आधुनिकपूर्व काळातील सर्वच ‘रिलिजन हे त्याच वेळी काशीकरांच्या अर्थाने धर्मही होते असे यातून निष्पन्न होते. हिंदू धर्माचे वेगळेपण, तो ‘रिलिजन’ नव्हता वा नाही, यात नाही. ‘रिलिजन’ या अंगाने त्याचे ईसाई, इस्लाम या रिलिजनांच्यापेक्षा वेगळेपण अधिक ठळक आहे. एक पवित्र ग्रंथ, एक प्रेषित या भोवती हिंदू धर्माची रिलिजन या अंगाने बांधणी झालेली नाही. इतरही वैशिष्ट्ये सांगता येतील.
(२) ‘धर्मा’ची वरील व्याख्या स्वीकारली तर, भारतीय राज्यघटना हा वर्तमानकालीन भारत राष्ट्र व समाज यांचा अधिकृत धर्मग्रंथ आहे असे म्हणता येईल. यात संसद वेळोवेळी फेरबदल करीत जाते, आणि न्यायालये याचे ‘धर्मशास्त्र’रचीत जातात.
(३) भारताने राज्यघटना हा लौकिक व्यवहाराचा आधार बनविला तेव्हा काशीकरांच्याच म्हणण्यानुसार “धर्माला ‘रिलिजन च्या जोखडातून काढून” धर्माची ‘खऱ्या ऐहिक स्वरूपात’ प्रस्थापना केली.
(४) असे दिसते की, मा. गो. वैद्य वा काशीकर यांचे तेवढ्याने समाधान झालेले नाही. “जुन्या काळातील मूलभूत धर्मकल्पने”ची ‘उपयुक्तता’ या दोघांना वाटते. आणि तीनुसार “आजच्या काळाला अनुरूप असे रूप” धर्माला देण्याचा त्यांचा आग्रह आहे.
उघडच हे गौडबंगाल आहे. कारण ‘धर्म’ शब्दाची व्याख्या काशीकरांनी सुचवली ती केली तर तिला आजच्या काळाला अनुरूप असे रूप देण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. ती कल्पना आपणापाशी आहेच.
त्यांना असे म्हणावयाला हवे की, आजच्या राज्यघटनेने जो ‘आचार-विचार-समूह’ व्यक्तीला बंधनकारक केला आहे तो आजच्या व उद्याच्या काळात भारतीय समाजाच्या धारणेच्या दृष्टीने उपकारक नाही; धर्मकल्पना बदलण्याचा मुद्दा नसून त्या कल्पनेशी बांधील राहून आचार-विचारांच्या पातळीवर तपशीलात फेरबदल करावयास हवेत.
(५) मा. गो. वैद्य व काशीकर यांना जे असे बदल हवे आहेत त्यांची त्यांनी समजा एक यादी प्रसिद्ध केली तर काय होईल? या देशातील हिंदू, ईसाई, मुसलमान, पारशी, शीख आदि व्यक्ती त्यातील वेगवेगळ्या बाबींबद्दल, हे बदल आमच्या रिलिजस शिकवणुकीशी वा आदेशांशी वा रीतिरिवाजांशी वा कर्मकांडांशी संवादी नाहीत, विरोधी आहेत; सबब आम्हाला ते मंजूर होऊ शकत नाहीत असे म्हणण्याची शक्यता आहे.
अशा हरकतींचा प्रतिवाद करताना वैद्य व काशीकर यांना, वर्तमान भारतीय समाजाच्या निकोप, सुदृढ धारणेच्या दृष्टीने, म्हणजेच रिलिजन कोणताही असो ज्या समाजाचे ते घटक आहेत त्या समाजात राहून त्यांचे हित व समष्टीचेही हित साधण्याच्या दृष्टीने हे बदल करणे का चांगले, इष्ट व आवश्यक आहे हे समजावून व पटवून द्यावे लागेल.
हा युक्तिवाद करताना त्यांना शाश्वत सनातन धर्मतत्त्वे, युगधर्म, आपद्धर्म व कलिवर्ण्य या चारही संकल्पनांचा वापर करता येईल. पण प्राचीनत्वाचा, परंपरेचा, ‘बहुसंख्यक’ मुख्य प्रवाहाचा, ‘हिंदू’ या शब्दाचा या संवादात वापर करणे गैर ठरेल. त्यांच्याच कसोटीवर. कारण, ‘धर्म’ या शब्दाला जेव्हा हिंदू हा शब्द जोडला जातो, आणि हिंदू धर्म असे शिकवतो, हा आचार सांगतो असे ज्या वेळेस म्हटले जाते तेव्हा ‘रिलिजन’च्या अंगानेच ‘धर्म’ या शब्दाचा वापर होत असतो.
(६) खरी गोष्ट अशी आहे की, काशीकर व वैद्य ‘धर्म’ या शब्दाची व्याख्या विशिष्ट प्रकारे जर प्रामाणिकपणे व गंभीरपणे करीत असले तर, शाश्वत सनातन धर्माची त्यांनी प्रथम मांडणी करावयास हवी. ती या देशातल्या प्राचीन ऋषिमुनींनी परिपूर्ण स्वरूपात केली आहे असे त्यांचे प्रामाणिक मत असू शकते. पण ती “आमच्या ऋषिमुनींनी प्राचीन काळी केली आहे म्हणून तीच आधारभूत मानायला लागेल” असा युक्तिवाद तरीही ते करू शकणार नाहीत. आजच्या घडीलाही शाश्वत, सनातन धर्मतत्त्वे म्हणून ती मानवमात्रास जगाच्या पाठीवर कोठेही अंगीकारण्याजोगी कशी आहे ते विवेकाच्या आधारे दाखवून द्यावे लागेल.
उज्ज्वल भूतकाळ, आमचा श्रेष्ठ धर्म, प्राचीनत्व, या मातृभू-पितृभूची परंपरा, आमची श्रेष्ठ संस्कृती असे भावना व विकार यांचे उद्दीपन करणारे आधार न घेता शाश्वत, सनातन धर्मतत्त्वांची मांडणी करण्याचे आव्हान काशीकर-वैद्य यांच्यासमोर आहे. ‘हिंदू’ हा शब्द न वापरता, ऋषिमुनींची नावे न घेता, पवित्र वा पूजनीय ग्रंथांचा उल्लेख न करता त्याची मांडणी त्यांनी करायला हवी.
(७) ही मांडणी केल्यावर, आजचे युग कोणते आहे, त्याची वैशिष्ट्ये कोणती, त्याच्या मागण्या कोणत्या,याची मांडणी करायला लागेल. हे युग केवळ भारतापुरते आहे की पृथ्वीव्यापी एकच आहे, तेही स्पष्ट करावे लागेल. ‘युगा विषयीची मांडणी केल्यानंतर मग युगधर्म स्पष्ट करावा लागेल. युगधर्म स्पष्ट झाला की,चालत आलेल्या आचार विचारांमधील कोणत्या गोष्टी ‘कलिवर्ण्य’ (म्हणजेच युगधर्माशी विसंगत) म्हणून टाकून द्यायला हव्यात ह्याचे दिग्दर्शन करता येईल. हे दिग्दर्शन वेगवेगळ्या सर्वच रिलिजनांच्या अनुयायांसाठी असेल. कोणाला सती प्रथा टाकावी लागेल, तर कोणाला जबानी तलाक बंद करावा लागेल, कोणाला संततिनियमानाला असलेला रिलिजस विरोध सोडावा लागेल, कोणाला नसबंदीची प्रथा टाकावी लागेल, तर कोणाला देवदासी प्रथेला पायबंद घालावा लागेल, वगैरे.
(८) सरतेशेवटी ‘आपद्धर्माची स्पष्टता करावी लागेल. सामान्य नेहमीच्या परिस्थितीत आपण ज्या प्रकारचे वर्तन वा कृती करणे गैर मानू तसे वर्तन व कृती हाही ‘धर्म कधी ठरतो याच्या कसोट्या स्पष्ट कराव्या लागतील. व्यक्तीने वा समूहाने – परीक्षा /तपासणी करीत असताना कोणती पथ्ये सांभाळली पाहिजेत हेही सांगावे लागेल. तसेच जेथे ‘ आपद्धर्माचे तत्त्व लागू होत नाही अशाही स्थिती/मुद्दे/प्रसंग यांची स्पष्टता करावी लागेल.
अशा प्रकारची कोणतीच मांडणी, वानगीदाखल देखील, काशीकरांनी ‘आजचा सुधारक’मध्ये केलेली नाही.
(९) देशपांडे यांच्याबरोबर काशीकरांनी जो वाद घातला आहे त्यात वेड पांघरून पेडगावला जाण्यासारखा काहीसा प्रकार आहे. त्यांनीच घेतलेले एक उदाहरण घेऊ. “ह्यावेळी माझा धर्म काय?” असा प्रश्न रामायण-महाभारतावरील दूरदर्शन धारावाहिकांमधील पात्रे विचारतात. हा प्रश्न ती कोणाला व का विचारतात? आणि त्यांना कोणते उत्तर हवे असते? अमुक एक आचरण करणे हे धर्माचरण होईल असे म्हणणे हे अर्धेच उत्तर आहे; या म्हणण्याचा आधार कोणता, उत्तराचे प्रामाण्य कशात आहे, याची स्पष्टता झाली म्हणजे उत्तर पूर्ण होते. अमुक ग्रंथ असे सांगतो, अमुक व्यक्ती असे सांगतो,वा अशी रीत/परंपरा आहे असे उत्तर येईल.ग्रंथ वा व्यक्ती वा रीत/परंपरा प्रमाण का मानावयाची? यांचे अंतिम उत्तर इहवादी नसते, प्रामाण्य अंतिमतः पारलौकिक अधिसत्तेच्या आधारे प्राप्त झालेले असते, ही वस्तुस्थिती काशीकरांना परिचित नाही असे मानणे अंमळ कठीण आहे.
(१०) ईसाई, इस्लाम, यहुदी हे ‘रिलिजन’, तर हिंदू – आणि काशीकरांसारख्या मंडळींच्या मते ‘हिंदू’चाच भाग असलेले बौद्ध, जैन, शीख आदि- हा मात्र ‘धर्म हा भेद करण्याचे तिहेरी प्रयोजन आहे. (१) हिंदू हे ‘धर्माची गोष्ट करीत असल्याने ते उच्चतर आहेत; (२) समाजाच्या सुयोग्य धारणेसाठी आवश्यक आचार-विचार-समूह हिंदूंपाशी म्हणून आधीच उपलब्ध आहे; आणि (३) ‘रिलिजन’ चे नाव पुढे करून, समाजधारणेचा विचार न करता, मनमानी वर्तणूक व कृती करण्याचा दुराग्रह राखणाऱ्यांवर हिंदूंच्या धर्माचे प्रभुत्व प्रस्थापित करणे योग्यच आहे, हे सिद्ध करण्यासाठी हा भेद केला जात आहे. आता, धर्म ही गोष्ट भारतातील लोकसमूहांपैकी फक्त हिंदूंपाशीच आहे, त्याला हिंदू तरी काय करणार; त्यांचे भाग्य व इतरांचे दुर्भाग्य, अशी भूमिका चेहेरा निर्विकार ठेवून घेता येते,अशी तर अंदर की बात नाही?
(११) मोहनी यांना उत्तर देण्याच्या ओघात “वर्तमानकाळात अयोध्येला जे घडले तोही आपद्धर्म आहे” असे विधान करून सिंघल आदींचे समर्थन काशीकरांनी केले आहे. ही गोष्ट चांगली झाली. म्हणजे असे की, धर्म, सनातन धर्म, युगधर्म, कलिवर्ण्य, आपद्धर्म या कल्पनांचा आशय वर्तमानकाळाच्या व्यवहारी चौकटीत काशीकरांना काय अभिप्रेत आहे त्याची ठोस चर्चा होऊ शकते. आता काशीकरांनी माघार मात्र घेऊ नये. त्यांनी पुढील प्रश्नांच्या अनुषंगाने मांडणी करावी असे आवाहन करतो. मात्र मोहनींना उत्तर देताना जी निवाडे करीत जाण्याची पद्धत त्यांनी वापरली आहे तिची पुनरावृत्ती करू नये अशी विनंती आहे.
(i) सनातन धर्माच्या कोणत्या तत्त्वानुसार मुस्लिम समाजाचे मन वळविण्याचे कोणकोणते प्रयत्न झाले?
(ii) या प्रयत्नांना अपयश का आले? अपयशाची जबाबदारी सर्वस्वी मुस्लिम समाजावर कशी आहे?
(iii) आपद्धर्मानुसार कृती करावयाची ती ‘हिंदू’ म्हणून कशी काय होऊ शकते? काशीकरांच्याच ‘धर्म कल्पनेनुसार ती ‘भारतीय’ म्हणून रिलिजननिरपेक्ष व्हायला हवी.
(iv) आपद्धर्मात्मक कृती हिंदू समाज परस्पर कसा करू शकतो? हा अधिकार राज्यसत्तेचा-तोही सर्व भारतीयांच्या वतीने-नाही काय?
(v) बाबरी मशिदीच्या संदर्भात १९४९ पासून ज्या घटना घडत आहेत, ज्यांचा कळस ६ डिसेंबरला झाला, त्यांना उद्देशून ‘आपद्धर्म हा शब्द वापरणे योग्य का?
(vi) भारतीय समाजाचा एक मोठा घटक म्हणून मुस्लिम समाजाचे स्थान असेल जे स्थान आपण मानतो असे काशीकर सुचवितात- तर आपद्धर्म म्हणून बाबरी मशिदीची वास्तू राहू द्यावी असे म्हणणे इष्टतर का नाही?
(vii) राष्ट्रीय प्रवाहाची मांडणी काय आहे? हिंदू = राष्ट्रीय असे समीकरण काशीकरांच्या धर्माच्या कल्पनेशी मूलतः विसंवादी नाही काय? भारतीय समाजाच्या वर्तमानकालीन व भविष्यकालीन निकोप व सुदृढ धारणेच्या दृष्टीने घातक या प्रकारचे हे समीकरण नाही काय? ते कधीकाळी कालोचित असले तरी आज कलिवर्ण्य मानणे आवश्यक व इष्ट नाही काय?
(viii) राष्ट्रीय प्रवाहात मुस्लिम समाजाला आणण्याची जेवढी गरज आहे तेवढीच हिंदू समाजालाही राष्ट्रीय प्रवाहात आणण्याची गरज नाही काय?
(ix) हिंदू हा जन्मजात व निरंतर राष्ट्रीयच असतो, कारण तो हिंदू आहे, आणि तेवढे पुरेसे आहे; इतरांना मात्र, ते मुळात अराष्ट्रीय असल्याने वा रिलिजन बदलला की ते अराष्ट्रीय होत असल्याने, आपद्धर्मात्मक कृती करून राष्ट्रीय प्रवाहात आणण्याची गरज नेहमीच राहील का? तसे असेल तर आपण हिंदू नाही असे आग्रहपूर्वक नोंदवू लागलेल्या जैन, बौद्ध, शीख, आदिवासी, नास्तिक/सेक्युलर मंडळीसाठी कोणत्या कृती भारतीय समाजाने/राज्यसत्तेने करण्याचा विचार केला पाहिजे?
(x) राष्ट्रीय प्रवाह हा संस्कृतीच्या निकषावर ठरत असेल तर विसाव्या शतकाच्या अखेरच्या भारताची राष्ट्रीय संस्कृती आणि हिंदू संस्कृती (जी एक घटक संस्कृती आहे; मुख्य असली तरी अनेकांपैकी एक घटक हाच तिचा दर्जा आहे) यात भेद करणे व तो तपशीलांसह स्पष्ट मांडणे आवश्यक आहे. काशीकरांची ती मांडणी काय आहे?
(xi) ‘धर्म’ शब्दाचा जो मूळ अर्थ आहे त्याचे पायिक असल्यामुळे जे लोक थोडक्याच अवधीत सनातन धर्माच्या आधारे वर्तन/कृती करू लागतील त्या लोकांना त्यांनी आपद्धर्माला चिकटून राहण्याचे ठरविले तर “हिंदू धर्म व तज्जन्य हिंदू मानसिकता” तसे करू देणार नाही असे काशीकर खात्रीपूर्वक म्हणतात. त्यांनी या संदर्भात ‘हिंदू’ हे विशेषण का वापरले आहे? धर्माचे पायिकत्व पुरेसे नाही? की जे काशीकरांच्या अर्थाने ‘हिंदू’ असतात फक्त तेच ‘धर्माचे पायिक असतात? ‘धर्मा’पेक्षा ‘हिंदू धर्म व तज्जन्य’ हिंदू मानसिकता ही ते अधिक विशाल व उन्नत मानतात काय?
(xii) ‘धर्म व संस्कृती’ हे शब्द त्यांच्या अर्थाने रुजविण्यासाठी काशीकरांसारख्या मंडळींनी कटाक्षाने हिंदू हे विशेषण त्यांच्या सर्व विवेचनातून वगळणे आवश्यक व इष्ट नाही काय?

१५० गंगापुरी, वाई, ४१२८०३

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.