सुधारकाग्रणी गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार वितरण-समारंभाचा वृत्तांत –

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने दि. १४ जुलै ह्या गोपाळ गणेश आगरकर ह्यांच्या जन्मदिनी, पुणे येथील टिळक स्मारक मंदिरात सुधारकाग्रणी गोपाळ (४ त्र्यंबक शंकर शेजवलकर : निवडक लेखसंग्रह. पृ. १०७, ह. वि. मोटे प्रकाशन. ५. तत्रैव, पृ. १०८ ६. सत्तांतर, पृ. २८३ ७. तत्रैव, २८७ )
गणेश आगरकर पुरस्कार-वितरणाचा कार्यक्रम संध्याकाळी सहा वाजता आयोजित केला होता.
पाहता पाहता टिळक स्मारक मंदिरातील सभागृह श्रोत्यांनी गच्च भरले. त्यात आपापल्या क्षेत्रातील ज्येष्ठश्रेष्ठ मंडळी होती. डॉ. भा. दि. फडके, श्री वसंत पळशीकर, डॉ. अनिल अवचट, ताहेरभाई पूनावाला, श्री मुकुंदराव किर्लोस्कर, डॉ. बाबा आढाव, श्री विलास चाफेकर, डॉ. भा. ल. भोळे, इ. इ.
सुरुवातीला श्रीमती नीता शहा यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याचा अहवाल सादर केला. डॉ. नरेंद्र दाभोळकर ह्यांनी अं. नि. चळवळीच्या कार्याचे स्वरूप सांगितले. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याला तात्त्विक बैठक आजचा सुधारक सारख्या विवेकनिष्ठ मासिकामुळे मिळण्यास मदत होते असे मत त्यांनी व्यक्त केले.
डॉ. भा.ल. भोळे ह्यांनी आजचा सुधारक ची पार्श्वभूमी सांगितली. “अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे केवळ भूत, पिशाच्च, भानामती दूर करणे नव्हे. कृती जशी आवश्यक आहे त्याचप्रमाणे कृतीला वैचारिक अधिष्ठान असणेही आवश्यक आहे, हे अधिष्ठान आजचा सुधारक पुरवीत असते असे” ते म्हणाले.
यानंतर प्रत्यक्ष पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम झाला. प्रा.ग.प्र. प्रधान ह्यांच्या हस्ते प्रा. दि. य. देशपांडे ह्यांना आगरकर-पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र व अडीच हजार रुपये रोख असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सत्काराला उत्तर देताना प्रा. दि. य. देशपांडे ह्यांनी विवेक म्हणजे काय, विवेकाचे शत्रू कोण, श्रद्धा व अंधश्रद्धा यातील फरक, इ. मुद्यांवर आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘विवेकवाद हे सबंध जीवनाचे तत्त्वज्ञान आहे. मनुष्याचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे त्याची विवेकक्षमता… जीवनाची ज्ञान आणि कर्म ही जी दोन प्रमुख क्षेत्रे आहेत त्या दोन्ही क्षेत्रात विवेकाचा उपयोग होणे अवश्य आहे… विवेकाचा मुख्य शत्रू श्रद्धा. विवेक चिकित्सक, डोळस असतो, तर श्रद्धा अंध, अचिकित्सक असते. विवेकाचा धर्म हाही एक प्रधान शत्रू आहे. धर्म आणि नीती या अत्यंत भिन्न गोष्टी आहेत… धर्म आणि नीती यांची प्रेरणा आणि आवाहन ही सुद्धा अगदी भिन्न आहेत… काही लोकांना असे वाटते की धर्माचा उपयोग माणसांना जोडण्याकरिता होण्यासारखा आहे. पण हा त्यांचा भ्रम आहे. धर्माचा इतिहास पाहिला तर धर्मामुळे मानवसमाजाचे विभाजनच झाले आहे असे दिसून येईल. त्यामुळे सर्वधर्मसमभाव हा धार्मिक संघर्षावर उपाय नव्हे. उपाय एकच आहे, आणि तो म्हणजे धर्माचे आपल्या जीवनातून समूळ उच्चाटन. धर्मविषयक विवेक याचा अर्थ कोणताही धर्म पूर्णपणे खरा नाही अशी खात्री. ही एकदा झाली की सर्वधर्मांचा त्याग अनिवार्य असतो.’
प्रा. ग. प्र. प्रधान ह्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा. दि.य. देशपांडे व त्यांच्या पत्नी श्रीमती म.गं. नातू ह्यांची तुलना कवी रॉबर्ट ब्राउनिंग व यांच्या पत्नी यांच्याशी केली. दि. यं. नी केलेली अखंड ज्ञानसाधना व आपल्या पत्नीची केलेली निःस्पृह सेवा ह्यांचा त्यांनी गौरवाने उल्लेख केला. समान बौद्धिक आवडींतून या दोघांचे मनोमिलन झाले. या दोघांनी मिळून संपादित केलेले आगरकरांचे समग्र वाङ्मय ही मराठी भाषेला दिलेली फार मोठी देणगी आहे.
‘प्रा. दि. य. देशपांडे ह्यांनी आपल्या पत्नीच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू केलेल्या आजचा सुधारक मासिकाला मिळालेला आगरकर-पुरस्कार प्रा. दि. य. देशपांडे ह्यांना प्रदान करताना मला अतिशय धन्यता वाटते’ या शब्दांत त्यांनी गौरव केला.
या प्रसंगी प्रा. व. वि. यार्दी, इंग्रजीचे सेवानिवृत्त प्राध्यापक, मराठवाडा विद्यापीठ, ह्यांनी प्रा. दि.य. देशपांडे ह्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
शेवटी आभार-प्रदर्शन डॉ. विद्याधर बोरकर ह्यांनी केले व कार्यक्रम संपला.

संपादक , आजचा सुधारक,
स.न.वि.वि.
भारतातून जे लोक अमेरिकेला जातात त्यांच्याबद्दल एक गोष्ट प्रकर्षाने मला फार जाणवते, ती अशी की हे सर्वजण उच्च शिक्षित आहेत. ते हुशार आहेत. ते ज्या काळांत उच्च शिक्षित झाले त्या काळांत कॅपिटेशन फीची कॉलेजेस् नव्हती.
साहजिकच हे सर्वजण शासकीय शिक्षण संस्थांमधून उच्च शिक्षित झाले. तेथे शुल्क अत्यल्पच होते. त्या शुल्कामधून मिळणाऱ्या पैशातून कोणतीही शिक्षणसंस्था चालविता येणार नाही. साहजिकच ह्या उच्च शिक्षणाच्या संस्था सरकारी अनुदानावर चालविण्यात येतात. जे. जे., के. ई. एम. किंवा पवईचे आय. आय. टी. पाहिली की व्याप्तीची आणि खर्चाची कल्पना येईल.
अशा संस्थानातून कमी फीया देऊन हे हुशार विद्यार्थी पदव्या घेऊन अमेरिकेला जातात. शासन हा सर्व खर्च त्यांच्या तिजोरीतून करिते. हा सरकारी तिजोरीतला पैसा गरीबांच्याकडून अप्रत्यक्षकरातून वसूल केला जातो. अनेक अग्रगण्य पुढारी, संपादक, अर्थतज्ञ ह्यांची हुशार मुले अमेरिकेत आहेत.
परंतु ह्या अमेरिकेत स्थायिक झालेल्या मुलांनी आपापल्या शिक्षणसंस्थेला काही देणगी देऊन कमी खर्चात मिळालेल्या पदवीची कधीतरी भरपाई केल्याचे माझ्या वाचनात नाही. कळावे.
आपला तत्त्वबोध
केशवराव जोशी
हायवे चेक नाक्याजवळ, नेरळ ४१० १०१ (जि. रायगड)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.