‘सय्यदनांचा हस्तक्षेप कोठपर्यंत?

अस्मा ताहेर बारावीच्या परीक्षेत राज्यात सर्वप्रथम आलेली औरंगाबादची गुणवान, बुद्धिमान विद्यार्थिनी. तिचा कल वैद्यकीय शाखेकडे; परंतु ‘सय्यदनां’नी – बोहरा धर्मगुरूंनी परवानगी दिल्याशिवाय ती वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकणार नाही. का ?
जुलेखाची कहाणी हृदयद्रावक. जन्मतःच हृदयाला छिद्र असलेली जुलेखा वेळीच उपचार न झाल्याने ‘अल्लाला प्यारी झाली. शस्त्रक्रिया करायची की नाही, याविषयीचे आदेश ‘सय्यदनांकडून मिळविण्यासाठी तिच्या आई-वडिलांनी मधली तब्बल पस्तीस वर्षे वाया घालविली होती ! असे का घडावे ?
माझ्या पत्नीने-झेनबने १९५१ मध्ये पुणे विद्यापीठातून एम.एस्सी. ची पदवी संपादन केली, दिल्ली विद्यापीठात पीएच.डी. करण्याची तिची इच्छा होती; परंतु निर्णय घेण्यापूर्वी याबाबत ‘सय्यदनांची परवानगी घ्यावी, असा तिच्या वृद्ध आईचा आग्रह होता.. याची आवश्यकता काय होती? अर्थातच, झेनबने ‘सय्यदनांची परवानगी घेतली नाही, की त्यांचा आशीर्वाद मागण्याच्या भानगडीतही ती पडली नाही. मात्र, आपल्या आईच्या भावना जपण्यासाठी तिने त्या वेळी सुरतला मुक्काम करून दरबार भरविलेल्या सय्यदनांना आपल्या निर्णयाची माहिती दिली.
मुंबईचे शेरीफ फक्रुद्दीन खोराकीवाला यांनी शेरीफपद स्वीकारतानाही ‘सय्यदनांची परवानगी विचारली होती. कशासाठी?
ही सारी उघडपणे अंधश्रद्ध प्रवृत्तीचीच उदाहरणे आहेत.
बोहरा ही एक अतिशय छोटी जमात. महाराष्ट्र, गुजरात, मध्य-प्रदेश, राजस्थान, कराची, येमेन, आफ्रिका, आखाती देश, इंग्लंड, अमेरिका आणि इतर देशांत यांची संख्या उणीपुरी दहा लाख. एखाद्या महापालिकेतसुद्धा ते स्वतःचा प्रतिनिधी पाठवू शकणार नाहीत, इतके ते इतस्ततः विखुरलेले आहेत. मग विधानसभा किंवा संसदेची बातच सोडा!
इतर धर्मांतरित मुस्लिमांप्रमाणेच बोहरा हेही एक. धर्मांतरापूर्वी ते गुजरातमध्ये वैष्णवपंथीय म्हणून जीवनक्रम आक्रमीत असल्याचे सांगितले जाते. आणि म्हणूनच त्यांची मातृभाषा गुजराती. तरीही ही जमात कशी जन्माला आली, याविषयी अस्सल ऐतिहासिक आधार सापडत नाही. गुजरातमधील हिंदूंशी-विशेषतः वैष्णव व ब्राह्मणांशी त्यांची विशेष सलगी होती. ‘जातिवंत,”खानदानी मुस्लिम त्यांना अवहेलनेने ‘रावजीज या अपमानास्पद नावानेच संबोधतात. गुजरातमध्ये औरंगजेबाच्या सरदारांनी या जमातीचा अनन्वित छळ केला.
संकटांना, हालअपेष्टांना तोंड देत खडतर मार्गावरून चाललेल्या बऱ्याच बोहरांनी देशाबाहेर आश्रय घेतला. त्या काळी बोहरा धर्मगुरू संन्यस्त जीवन जगत होते. ठिकठिकाणी विखुरलेल्या आपल्या जातिबांधवांना भेटून आपला धर्म जपण्याची तळमळ त्यांच्या मनात निर्माण करण्याचे कार्य करीत होते.
इंग्रजांचे राज्य आले, आणि बोहरा जमातीला काहीसे स्थैर्य, सुरक्षितता लाभली. समाजातील इतर जाती-जमातींशी, घटकांशी त्यांचा संपर्क दळणवळण वाढले. त्यांनी इंग्रजी शिक्षण घेण्यास सुरवात केली. नशीब आजमावण्यासाठी दूरवर भटकंती करण्यासही सुरवात केली. पाश्चात्य संस्कृतीचे पडसाद आणि हिंदू-धर्मीयांमधील परिवर्तन यांचा बोहरा समाजातील उच्च मध्यमवर्गीयांवर परिणाम झाला. इतर जमातींप्रमाणे आपणही संघटित व्हावे, अशी गरज त्यांनाही वाटू लागली. धर्मगुरूच्या शिकवणीकडे ते दुर्लक्ष करू लागले. बोहरांच्या ऐहिक बाबींत धर्मगुरूंनी हस्तक्षेप केला, तर त्याला आक्षेप घेऊ लागले. काही उच्च मध्यमवर्गीयांनी स्वीकारलेल्या या दृष्टिकोनामुळे संघर्ष निर्माण होऊ लागले. त्यातून काही न्यायालयीन खटलेही उभे राहिले. परंतु ‘सय्यदना’ पुरेसे चलाख असल्याने त्यांनी धार्मिक भावनांना आवाहन करून काही बेसावध आणि भोळसट बोहरांचा गैरफायदा घेतला. त्यांचे मानसिक व आर्थिक पाठबळ मिळवले आणि त्या जोरावर दीर्घ काळ चालणारे महागडे खटले लढवले. हे खटले हरले, तरी तसे न भासवता विजयी झाल्याचेच दर्शवून ‘आनंदोत्सवही साजरे केले. इकडे ‘सय्यदनांच्या विरोधात न्यायालयीन खटले लढवणारे बोहरा स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करीत होते. या झगड्यांत ते आर्थिकदृष्ट्या टिकाव धरू शकले नाहीत. ‘सय्यदनांच्या विरोधात जाणारे अशा रीतीने कंगाल होत गेले.
हळूहळू सय्यदना राजकारण्यांशी संधान बांधू लागले. राज्यकर्त्यांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचे धोरण तर अद्यापही राबवले जात आहे. या पुढची पायरी म्हणजे सय्यदनांनी ‘हिज होलीनेस’ आणि ‘फर्स्टक्लास सरदार ऑफ द डेक्कन’ अशी बिरुदे स्वतःला चिकटवून घेतली. जमवलेली प्रचंड संपती, राजकीय संबंध आणि धार्मिक सत्ता यांच्या जोरावर सय्यदना सर्वशक्तिमान बनले. मोरारजी देसाई या एकमेव राजकीय नेत्याने ‘सय्यदनांच्या विळख्यातून सर्वसामान्य बोहरांची सुटका करण्यासाठी प्रयत्न केले. एखाद्याला वाळीत टाकण्याच्या विरोधी कायदा लागू करण्याचा त्यांचा प्रयत्न हे याचेच द्योतक होते. परंतु या कायद्याच्या विरोधात सय्यदनांनी सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागितली आणि तकलादू तांत्रिक मुद्यांचा आधार मिळवून सय्यदनांनी खटला जिंकलादेखील !
आज बोहरा जमातीत सुधारणावादी चळवळी होत नाहीत असे नाही. सय्यदनांविषयी आकस अशा मर्यादित स्वरूपातच सय्यदना व सुधारणावादी नेते यांच्यातील संघर्ष चालतो. दिवंगत नेते नोमानभाई काँट्रॅक्टर यांनी मात्र समाजहित लक्षात घेऊन या चळवळीला व्यापक रूप देण्याचा प्रयत्न केला. तथापि, आजच्या चळवळीत फारसा दम नाही. सामाजिक सुधारणांच्या दृष्टीने ही चळवळ समाधानकारक प्रगती करू शकलेली नाही. श्री. नोमानभाई काँट्रॅक्टर यांच्यानंतर चळवळीचे नेतेपद असगरअली इंजिनिअर यांच्याकडे आले आहे. पण त्यांच्या नेतृत्वाखालील चळवळ ‘सय्यदनांच्या संस्थेला, ‘दावतला, हरकत वा आक्षेप घेण्यास राजी नसते. न पटणारी, अव्यवहार्य तरीही धर्माची म्हणून राबवली जाणारी विशिष्ट शिकवण किंवा धार्मिक तत्त्व यांना आक्षेप घेण्यासही हे सुधारणावादी तयार नसतात.
चिमुकल्या बोहरा जमातीसह भारतीय मुस्लिमांना कधी धाडसी, सुज्ञ नेतृत्व आजवर लाभलेलेच नाही. कुराण, हदीस आणि सुना यांचे पुनःपुन्हा अर्थ लावून समाजात सुधारणा घडवून आणता येणार नाहीत, हे उघड आहे. आजकाल यांचे अर्थ लावण्याचीच चढाओढ सुरू असल्याचे चित्र सगळीकडे दिसत आहे. आणि त्याचा अर्थ लावणारे आपण प्रेषित असल्याच्या आविर्भावात वावरत असतात.
आजच्या काळाची खरी गरज या कुराण, हदीस किंवा सुन्नाच्या पलीकडे जाऊन मानवी जीवन सुसह्य कसे होऊ शकेल, हे पाहण्याची आहे. परंतु दुर्दैवाने डोके वर काढणारा हिंदू मूलतत्त्ववाद आणि बाबरी मशिदीचा विध्वंस व त्यानंतरच्या घटना यांमुळे येथील मुस्लिमांच्या मनावर असुरक्षिततेचे सावट पसरले आहे. यामुळे ते पुन्हा एकवार विशिष्ट व्यक्तींच्या हाती एकवटलेली सत्ता, स्वार्थी बुद्धिमंत, आंधळा मूलतत्त्ववाद आणि तत्त्वनिष्ठतेचा विधिनिषेध न बाळगणारे राजकीय नेते यांच्या गर्तेत ढकलले गेले आहेत.
फिरदौस
११३७/२ शिवाजीनगर, पुणे – ४११०१६

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.