पडद्यातला देश

गावी शेजारच्या देवकरण भटजींना ज्योतिष चांगले समजत असे. एकदा माझा हात पाहून ते म्हणाले, ‘याला विद्या नाही. हे भविष्य ऐकून माझी माय कष्टी झाली. पण ते भविष्य तिच्या अंदाजाबाहेर मी खोटे ठरविले. दुसरे, शेंदुर्णीकरांचे भविष्य : ‘तुम्हाला वाहनयोग (चारचाकी) आहे.’ तेही मी आतापर्यंत तरी खोटे ठरवले आहे. परदेशप्रवास घडेल असे मात्र माझ्या हातावर कोणालाच दिसले नव्हते. तो घडला. आणि मुळातील भविष्यावर माझा अविश्वास अधिक पक्का झाला.
मात्र परदेशप्रवासातही एक प्रकारची वर्णव्यवस्था आहे. युरप-अमेरिका अव्वल दर्जाचे, दुबई-आफ्रिका त्या मानाने दुय्यम, सिंगापूर-हाँगकाँग यांना शूद्र म्हटले तर नेपाळ अतिशूद्रात गणले जाईल. संधी हीच मोजपट्टी.
आणखी एक गंमत, मध्य आशियाला आपले लोक सरसकट दुबई म्हणणार. तेलामुळे उजेडात आलेले कितीतरी लहानमोठे देश तिथे आहेत. एकट्या सौदी अरेबियाच्या द्वीपकल्पात उत्तर येमेन, दक्षिण येमेन, ओमान, कत्तार, बहारिन, युनायटेड अरब एमिरेट्स असे अनेक देश आहेत. त्यांचे वेगळेपण आपल्या गावीच नसते. पुन्हा इंग्रजी चष्म्यातून पाहण्याची इतकी सवय झाली आहे की, मध्य पश्चिमेला आपण मध्यपूर्व म्हणणार. आपल्या इतिहासाप्रमाणे आपला भूगोलही आपण त्यांच्या चष्म्यातून पाहतो !
सौदी अरेबिया हा काही पाहायला जावा अशातला देश नाही. रब अल् खली हे जगातले सर्वात मोठे वाळवंट तेथे आहे. अल हसा हे जगातले सर्वांत मोठे ओअॅसिसही तिथलेच. विस्ताराने मात्र तो एक प्रचंड देश, पाकिस्तानच्या तिप्पट आणि भारताच्या पाऊणपट आहे. अल् हसा हा पूर्वेकडील प्रांत. त्याचे मुख्यालय होफूफ हे माफक शहर. वस्ती लाख दीड लाखाची. सौदीचे सध्याचे राजे किंग फहाद यांचे नाव दिलेले एक अत्याधुनिक विशाल हॉस्पिटल तेथे आहे. दीडेकशे भारतीय कुटुंबे या आणि आसपासच्या इस्पितळांत वैद्यकीय पेशाची लहान मोठी कामे करतात.
मुलीच्या आग्रहाने या मुसलमानी मुलखाची मुशाफरी आम्हाला म्हणजे मला आणि पत्नीला घडली. होफूफला जायला दहरान या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरावे लागते. तिथून कारने होफूफचे अडीचशे किलोमीटर अंतर दीड तासात तोडतात. रस्ते छान. कार्स वेगवान. सौदीच्या पूर्व किनाऱ्यावरचे बंदर अल् खोबर, दम्माम आणि दहरान असे हे परस्परांना लागूनच शहरांचे त्रिकूट आहे. फेब्रुवारीच्या ९ तारखेला मुंबईला रात्री सौदिआ एअर लाईन्सच्या विमानात पाऊल ठेवले. विमान सुटायला वेळ होता. मला जिने चढताना पायऱ्या मोजायची एक सवय आहे. तिला इतिहास आहेः कोर्टात साक्षीला उभ्या असलेल्या खेडूत बाईला वकील विचारतो, बाई गुन्हा घडला त्या जागेपासून किती पावलावर तुम्ही उभ्या होत्या? बाई क्षणभर विचारात पडते अन् म्हणते या उंच मंचावर हे जज्ज बसलेयत्. रोज पायऱ्या चढून जातात त्यांना विचारा बरं किती पायऱ्या चढलात ते. किस्सा ऐकल्यापासून ही सवय लागली. विमानात पूर्वीही बसलो होतो पण हे प्रचंड जम्बो होते. विचार आला किती पॅसेंजर असतील? बसलो त्या रांगेत दहा जागा होत्या. अशा जवळपास चाळीस. म्हणजे चारशे. दहरानचेच तिकीट आठ हजार. काही प्रवासी पुढे रियाधला जाणार. शिवाय फर्स्ट क्लासचे तिकीट जादा. हिशेब मांडला. चारशे गुणिले आठ हजार म्हणजे बत्तीसशे हजार, म्हणजे बत्तीस लक्ष. फर्स्ट क्लासचा डिफरन्स आणि पुढे जाणारे यांचे धरून अंदाजे ५० लक्ष, म्हणजे एका फेरीचे एक कोट. हिशेबात वेळ बरा गेला. हवाई सुंदरींनी जागा घेतल्या. सूचना सुरू झाल्या. विमानाला चालना देण्याआधी कप्तानाने कुराणातले मंत्र म्हटले आणि गती दिली.
परदेशी जाणारे प्रवासी सौदिआ एअर लाइन्स टाळत असावेत. नाहीतर आम्हाला सक्ती झाली नसती. सौदीत कामाला असणारे आणि त्यांचे पाहुणे यांना सक्ती नसती तर हे विमान रिकामे गेले असते बहुधा. इतर विमान कंपन्या अशा प्रवासात मद्याचा पाहुणचार करतात म्हणे. सौदियात मद्याला मज्जाव. हवाई सुंदऱ्यांचेही हाल. त्यांचा परिवेश त्यांना आपादमस्तक झाकणारा. आमच्यावेळी डिग्री घेताना काळ्या गाऊन वरून हूड घालावे लागे. त्या नमुन्याचे हिरवे हूड, जुन्या सोवळ्या बायका, डोकीवरचा पदर कपाळ झाकून कानामागे घेत, तसे पेहेनलेल्या. शिवाय डोकीवर हिरव्या कापडाची घडी करून बनवलेली गोल टोपी. आपले विमान पस्तीस हजार फूट उंचीवर (म्हणजे हिमालयापेक्षा सात हजार फूट जास्त) स्थिरावले आहे अशी घोषणा करून जेव्हा त्यांनी आपल्या गोल टोप्या आणि हुडे झुगारून दिली तेव्हा त्या चांगल्याच सुकान्त चंद्रानना दिसल्या. हास्य वदनाने दंतपंक्ती दाखवत भ्रूधनू सरसावून लगेच त्या कामालाही लागल्या. विमान उतरत असल्याची घोषणा झाली तेव्हा मात्र आपापल्या बुदी पुन्हा चढवायला त्या चुकल्या नाहीत.
दहरान विमानतळावर प्रवाशांना वागणूक अत्यंत असभ्य आणि चीड आणणारी होती. अरबीशिवाय दुसरी भाषा न समजणारे कस्टम्स अधिकारी. त्यांना तुम्ही काय सांगणार? आमच्या सामानातील माझी मराठी पुस्तके आणि मासिके त्यांनी सडक्या उंदरासारखी भिरकावून दिली. देवदेवतांची चित्रे, मूर्ती तर सोडाच, कुराणाशिवाय दुसरा कुठलाही धर्मग्रंथ तुम्हाला नेता येत नाही. होफूफला गेल्यावर डॉ. पारगांवकरांकडे दासबोध पाहून चकित झालो. म्हणाले, कव्हर काढून टाकले होते. नजरेतून सुटला. ‘
डॉक्टर, इंजीनीअर अशा वरिष्ठ नोकरदारांना कुटुंब काबिले आणता येतात. अरबीत काबिलह म्हणजे लायक स्त्री, दाई.
आम्ही गेलो तेव्हा हिवाळा सरला होता तरी होफूफचे किमान तापमान ५ डिग्री सेल्सिअस होते. रात्री हीटर लावून झोपावे लागे. मे मधे परतलो तेव्हा उन्हाळा नुकताच सुरू झाला होता. दुपारी एअर कंडिशनर्स लागत. तिथला खरा उन्हाळा जुलाय-ऑगस्टमधे असतो. तापमान ५० डिग्री सेल्सिअसपर्यंत चढते. या विषम हवामानापायी घरे, मोटारी सारे एअरकंडिशन्ड.
भारतीयांचे आपोआपच कोंडाळे बनले आहे. मुलांचे वाढदिवस, दिवाळी, नववर्ष दिन अशा कारणांनी मेळावे होत राहतात. बस्स, एवढेच सामाजिक जीवन. एरवी रोजची पुरुषांना नऊ तास ड्यूटी. बायकांना आठ तास. आठवड्याची सुटी शुक्रवारी. रमजान आणि हजच्या वेळी अरब कर्मचाऱ्यांना सुमारे १०-१५ दिवस सुटी असते. इतरांना त्यांच्या निम्मे सुटी. कॅज्युअल लीव्ह हा प्रकार नाही. सिक लीव्ह नाही. तीन दिवस आजारी पडलात तर दवाखान्यात भरती व्हा. कालगणना इस्लामी कॅलेंडरप्रमाणे. साडेदहा महिने ड्यूटी केल्यावर दीड महिना सुटी.वर्षातून एकदा स्वदेशप्रवास सरकारी खर्चाने.
गेल्या गेल्या तीनचार पार्थ्यांना हजर राहायचा योग आला. भारतातून नवे नवे आलेले म्हणून हालहवाल विचारत. ६ डिसेंबरचे अयोध्याकांड, जानेवारीतल्या मुंबईतल्या दंगली यांच्या पार्श्वभूमीवर जास्त आस्थापूर्वक चौकश्या करीत. भारतातून दिल्ली, राजस्थान, पंजाब, उत्तरप्रदेश, ओरिसा, महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक, तामीळनाडू, केरळ अशा राज्यातले डॉक्टर्स होते. एक मत हमखास ऐकू येई : आम्हाला भारतात हिंदुत्ववाद माहीतही नव्हता. इथे आल्यावर मात्र आम्ही कडवे हिंदू बनलो आहोत. हमीद दलवाई म्हणतातः हिंदूंचा धर्माभिमान प्रतिक्रियेतून जास्त उफाळला आहे ते खरे दिसते. तिथे हिंदुत्वाच्या या लाटेवर आरूढ व्हायला नकार देणारे दोघे होते. एक आमचे जावई डॉ. सोवनी आणि दुसरे त्यांचे मित्र डॉ. अब्राहम. आम्ही तिथे असतानाच १२ मार्चला-त्या काळ्या शुक्रवारी मुंबईला १३ बॉम्बस्फोट झाले. त्याचे वर्तमान बी.बी.सी. वर ऐकले. त्यानंतर काही दिवस बँकांमधून हिंदू खातेदारांना ड्राफ्ट मिळणे बंद झाले. फतवा एवढाच निघाला होता की, भारतातल्या हिंदुत्ववादी संघटनांना कोणी पैसे पाठवत असतील तर ते रोखा. खालच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पराचा कावळा केला. खुलासे झाले तेव्हा व्यक्तिगत व्यवहार खुले झाले.
होफूफला इंडियन एम्बसी स्कूल आहे. दम्मामच्या मुख्य शाळेची ही शाखा सुमारे सात वर्षांपासून आहे. दोनेकशे मुले मुली शिकतात – (शिकत होती.) सेंट्रल बोर्ड ऑफ एज्युकेशन दिल्लीचा अभ्यासक्रम शिकवतात. आम्ही गेलो तेव्हा हिवाळी सुटी संपली तरी शाळा सुरू होईना. अयोध्याकांडाच्या सुमारास झालेल्या शाळा तपासणीत दाखवलेल्या त्रुटी अजून पूर्ण झाल्या नव्हत्या. ‘
त्या त्रुटी अशा:
१. सहाव्या वर्गापुढच्या मुली (सुमारे १०-११ वर्षांवरील) मुलांना दिसणार नाहीत अशी व्यवस्था करा.
२. शाळेत इतिहास, भूगोल हे विषय शिकवू नयेत.
३. शिक्षक थेट भारतातून शिक्षकाच्या इकाम्यावर भरती केलेले असावेत. ‘इकामा म्हणजे तेथील निवासाचे प्रयोजन आणि मुदत दाखवणारा दाखला.
अट १ व ३ यांचा आर्थिक भार शाळेला परवडण्यासारखा नव्हता. प्रायमरीनंतर मुलामुलींच्या वेगळ्या शाळा म्हणजे जागाभाडे,स्टाफ यांवर दुप्पट खर्च. सध्याचे मुलामुलींचे वर्ग प्रायमरीपासूनच वेगळे, पण एकाच इमारतीत होते. बरेच शिक्षक सौदीत आधीच नोकरीला असलेल्या कुटुंबातून निवडलेले असत. एरवी मोकळ्या असलेल्या पदवीधर महिला कमी पगारावर शाळेला मिळत. त्यांच्या जागी भारतातून पूर्ण पगारावर भरती करणे परवडणारे नव्हते. आधीच प्रायमरी शाळेतल्या विद्यार्थ्याला दरमहा दीडशे रियाल (सुमारे १३५० रु.बस भाडे धरून) फी पडे. परिणामी शाळा बंद पडली.
बरे ‘समान काम समान दाम’ या सूत्रावर सरकारचा विश्वास आहे असेही नाही. माझ्या डॉक्टर मुलीपेक्षा तिच्या मदतनीस सौदी नर्सला पगार कितीतरी जास्त आहे.
अट २ चे रहस्य तर मला अजून उलगडले नाही. वेदविद्येचा सुकाळ असला तरी इतिहास-भूगोल यांच्या ज्ञानाचा दुष्काळ होता म्हणून पेशवाई बुडाली असा कंठशोष करणारे लोकहितवादी तिकडे जन्माला यायचे आहेत एवढाच त्याचा अर्थ.
सर्व परदेशी नागरिकांना समान वागणूक म्हणावी तर तसेही नाही. दम्माम शहराच्या जवळ अरब-अमेरिकन कंपनीची ‘आरामको नावाची वसाहत आहे. तिथे या तेल कंपनीतले अमेरिकन्स राहतात. त्यांचे नगर जणू स्वतंत्र राज्य आहे. विमानतळ,टी.व्ही. सर्व स्वतंत्र. लघु अमेरिकाच ! त्या वसतीच्या बाहेर मात्र अमेरिकन बायकांनाही इतर परदेशी स्त्रियांप्रमाणे (घराबाहेर पडताना) बुरखा घ्यावा लागतो.
प्रश्न पडतो की इतका भेदभाव चालतो तर मग लोक जातात कशाला?
उत्तर सोपे आहे. माझ्या मुलीकडे तिच्या मुलाला सांभाळायला भारतातून नेलेली दाई (काबिलह ) आहे. तिला तिथल्या नियमाप्रमाणे दरमहा चारशे रियाल पगार द्यावा लागतो. एक रियाल म्हणजे सुमारे ९ रुपये. अकुशल मजुरालाही ३ शे ते ४ शे म्हणजे सुमारे ३ हजार रु. पगार पडतो. डॉक्टर-इंजीनीअरांना भारतीय पदवी नि अनुभव जमेस धरून दरमहा ३५ ते ७० हजार रु. पगार मिळतो. ‘शिल्लक हीच कमाई या सूत्राप्रमाणे लोक जास्तीत जास्त शिल्लक टाकायचा प्रयत्न करतात. मजूरही हजार दीड हजार दरमहा शिल्लक टाकत असतील. तुमचा सर्व पैसा तुम्ही स्वदेशी पाठवू शकता. काटकसरीचे एक उदाहरण सांगतो. भारतीय डॉक्टर्स गटाने पेपर विकत घेतात. आळीपाळीने वाचतात. टाइम्स, इंडियन एक्स्प्रेस तिथे येतात. ते आधीच शिळे झालेले असतात. याचे कारण सेन्सॉर. स्त्रीदेहाचे जाहिरातीत प्रदर्शन वय॑. चित्र लहान असेल तर काळ्या शाईचा बोळा फिरवतात. मोठे असेल तर पानच फाडतात. रविवारी बत्तीस पानांच्या इंडियन एक्स्प्रेसमधे कधी १२-१४ पाने कमी येतात. पुरवणी बरेचदा गहाळ असते. एक रुपया ऐंशी पैसे किंमतीचा पेपर २७ रुपयांना (३ रियाल) पडतो. सेन्सॉरच्या या कटकटीमुळे पेपरला चार दिवस लेट होतो. तरी वाचायला मन अधीर होते. उशीर झाला तर संपूनही जाते. आम्ही ‘अरब न्यूज किंवा कधी ‘सौदी गॅझेट’ हे तेथील पेपर घेत असू. ‘इनोसंट मुस्लिम्स आर बिइंग बुचर्ड बाय फॅनॅटिक हिंदूज या पालुपदाची एखादी भारतीय बातमी रोज असे.
तिथल्या अरब समाजाकडे पाहून मला प्राचीन ग्रीकांची आठवण येई. ग्रीकांमध्ये नागरिक आणि दास असे वर्ग होते. सौदी अरेबियात कोणतेच श्रमाचे काम अरब नागरिक करत नाही. कार-चालक, मेकॅनिक, पेट्रोल पंपावरील नोकर, सर्व प्रकारच्या दुकानावरचे विक्रेते, हॉटेल्समधील खानसामे, वाढपी, शिंपी, धोबी, न्हावी, चांभार, गवंडी, सर्व प्रकारचे सफाई कामगार हे विदेशी मजूर आहेत. होफूफ पासून सुमारे चाळीस किलोमीटरवर सौदी-सिमेंट कंपनीचा कारखाना आहे. तिथली यंत्रसामुग्री आणि तंत्रज्ञ परदेशी आहेत. हे समजण्यासारखे आहे; पण यच्चयावत मजूरही परदेशातून आयात केलेले आहेत. या देशाजवळ लष्करही स्वतःचे नाही. पाकिस्तानातून परसेवेवर बोलाविले जाते. मजुरांचा भरणा भारतीय उपखंडातील भारत, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका या देशांशिवाय फिलिपाईन्समधूनही होतो. मनुष्यबळ उभारताना मुसलमान उपलब्ध नसेल तरच इतर घेतले जातात. कित्येक फिलिपिनो आपला ख्रिस्तीधर्म सोडून पैशासाठी तिथे धर्मांतर करून मुस्लिमही होतात.
मजुरांना निदान पोट भरून दोन पैसे गाठीला बांधता येतात हेही थोडे नाही असे मी एका पार्टीत म्हणालो तर डॉ. दाणी म्हणाले, तुमचा हा भ्रम आहे. ठेकेदार भरती करताना कबूल केलेला पगार देत नाहीत. इथे मजूर आणल्यावर त्यांना खाण्यापिण्यापुरता पैसा देऊन बन्धुआ मजुराप्रमाणे राबवून घेतात. दोन-तीन वर्षे अशा पिळवणुकीनंतर चाळीस बांगलादेशी मजुरांनी बंड केले. त्यांना पैशाअभावी स्वदेशीही परतता येईना. शेवटी युनियन करून कोर्टात गेले. कोर्टाने तत्काळ त्यांना बाकी आणि स्वदेशाचे तिकीट देवविले.
म्हटले, चला. इथे न्याय तरी मिळतो. अन् तोही झटपट. तेव्हा दुसरी हकीकत ऐकायला मिळाली. किंग फहाद हॉस्पिटलमधे स्त्रीरोग आणि प्रसूति-विभागप्रमुख डॉ. गौरी या होत्या. त्यांच्या कामत त्या फारच निष्णात म्हणून त्यांचा लौकिक वाढलेला. एकूणच अरबी लोकांमध्ये बाळंतपणे फार. एखादीला वीस वीस अपत्ये असू शकतात. त्यातून वरिष्ठ हुद्देदारांना द्विभार्या, त्रिभार्या योग सहज. डॉ. गौरी त्यामुळे सर्वांना माहीत. त्यांच्या विभागात एकदा एका अरब स्त्रीचा गर्भाशय काढून टाकावा लागला. पुढे आपल्याला मूल होणार नाही हे लक्षात येताच तिने फिर्याद केली. डॉ. गौरी व्यक्तिशः जबाबदार नव्हत्या, पण विभागप्रमुख म्हणून त्यांनी एक लक्ष रियाल नुकसान भरपाई द्यावी असा निवाडा झाला. भारतीय डॉक्टर मंडळींनी वर्गणी करून डॉ. गौरीचा भार सुसह्य केला. पण याने त्या पीडित स्त्रीचे समाधान झाले नाही. दरम्यान तिला नवऱ्याने मूल होत नाही म्हणून तलाक दिला. तिला डॉ. गौरीचे शिर (हेड फॉर हेड) हवे होते. या अपिलावर हुकूम व्हायच्या आत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी (बहुधा संगनमताने) डॉ. गौरीला स्वदेशी पलायन करू दिले, म्हणून त्या वाचल्या.
भारतीयांपैकी केरळीय मनुष्यबळ सर्वांत मोठे. कित्येक दुकाने त्यांनी नावारूपाला आणली. त्यांच्यात थोडे फार हिंदूही आहेत. इंडियन मार्केट आहे. तिथे सर्व भारतीय अन्न-धान्ये, मसाले-पापड, लोणची, चटण्या मिळतात. मल्याळम्मध्ये गुळाला शर्करा म्हणतात हे मला तिथेच कळले. रोजगरजेच्या वस्तू विकणाऱ्या दुकानाला बक्काला म्हणतात. विक्रेते विदेशी पण कफ़ील अरब असतो. कफ़ील म्हणजे पालक. विदेशी माणूस स्वतःचा उद्योग व्यवसाय करू शकत नाही. हुशारीने त्याने धंदा वाढवला तर एखादवेळी नफ्यात वाटा मिळेल. पण कायदेशीर मालकी नाही.
किमतींवर नियंत्रण नाही. डबाबंद वस्तूंवरही किंमत लिहिलेली नसते. शॉपिंग प्रकारात घासाघीस राजमान्य आहे. सोनीसारख्या जगद्विख्यात जपानी कंपनीच्या शोरूममध्येही टी.व्ही, व्ही.सी.आर, टेपरेकॉर्डर खरीदताना घेणारा ‘आखिर’ किती? हे विचारत असतो आणि विक्रेता न बिचकता सांगत असतो. सुवर्णालंकारांचे मार्केट डोळे दिपवणारे आहे. तिथे भाव चालतात. पण २४ कॅरेटचे सोने मुद्रा आणि बिस्किटांच्या आकारात बँकेत मिळते-तिथे सुद्धा आमच्या जावयांनी रीतीनुसार ‘आखिर’ म्हणून आमचा दहावीस रियालांनी फायदा करून दिला. सौदी सिमेंट कंपनीतले भोसले आमच्या मुलीच्या घरोब्यातले. त्यांनी दम्मामहून लहान मुलांसाठी व्हिडीओ गेम आणला. फक्त अडीचशे रियालमधे मिळाला म्हणून खुशीत सांगू लागले. दोन दिवसांपूर्वी आम्हाला होफूफला तोच दीडशे रियालला मिळाला हे जेव्हा आम्ही त्यांना सांगितले तेव्हाचे भोसले साहेबांचे हसू अजून माझ्या लक्षात आहे.
अरबी भाषा ईश्वरासारखी सर्वव्यापी आहे. दुकानांवर हमखास अरबी फलक असतात. इंग्रजी तर्जुमा ऐच्छिक असतो. त्यामुळे आपली निरक्षरासारखी गत होते. मी भोसल्यांच्या रोमाचे अरबी मुळाक्षरांचे पुस्तक मिळवले आणि अपर्णाच्या मार्गदर्शनाखाली अक्षरओळख करून घेतली. अरबीत मुळाक्षरे २८ च आहेत. पहा उच्चारच नाही. ‘प्रभाकर’ला ‘बरभाकर’ म्हणतील. मुळाक्षरे आली तरी शब्द वाचताना क्लेश होतात. मूळ अक्षरांचे रूप शब्द बनवताना पार बदलते. अरबी आधुनिक जगाच्या दृष्टीनेही महत्त्वाची भाषा आहे. सोळा देशांचे दहा. कोटी लोक ती बोलतात. कुराणाची ती भाषा म्हणून महत्त्व आहे ते आगळेच.
सौदी अरेबिया इस्लामची जन्मभूमी आहे. मक्का-मदिना या दोन पवित्र मशीदींचे संरक्षक अशी राजे फहाद यांची पदवी आहे. जगभरातून दरवर्षी लाखो लोक हज यात्रेला येत असतात. प्रत्येक देशाला संख्यामर्यादा घालून द्यावी लागते. तेलाच्या खालोखाल या यात्रेकरूंकडून मिळणारे उत्पन्न सौदी सरकारला मिळते. ‘काफ़िरांना मक्का-मदिना परिसरातही जाता येत नाही.
‘काफ़िर’ला दोन्ही अर्थ आहेत. एक केवळ ‘मुस्लिमेतर’ असा वर्णनपर, दुसरा दुष्ट, कृतघ्न असा निंदापर. कुराण हीच राज्यघटना मानली जाते. राजे फैजल यांचे पुत्र सौद अमेरिकेत १० वर्षे राहून आलेले आहेत. त्यांनी प्रिन्स्टन विद्यापीठात शिक्षण घेतले आहे. देशाला आधुनिकतेकडे नेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. तशी या देशाची निर्मिती विसाव्या शतकातली. १८९२ मध्ये इब्न सौद पहिले राजे झाले. ते १९५३ साली वारले तेव्हा त्यांचे ४३ पुत्र हयात होते. १९८० मध्ये राजकुमारांची संख्या ४००० होती. राजकुमारी निदान तेवढ्याच समजायला हरकत नाही. राजपदाचा वारसा मूळ राजपुरुष इब्न सौद यांच्या पुत्रांपैकी हयात ज्येष्ठ पुत्राकडे क्रमाने जातो. या चौतीसानंतर वारस कोण ते अल्ला जाणे. पूर्वेकडील प्रांतात शिया वस्ती बरीच आहे. त्यांना सापत्नभावाची वागणूक मिळते. जोखमीच्या सरकारी जागांवर त्यांना नेमणूक मिळत नाही. त्यांच्या आपल्या शाळांमध्येही शिया शिक्षक नेमला जाऊ शकत नाही. ‘इस्लाम’ शब्दाचा अर्थ ईश्वरेच्छेला शरण जाणे असा आहे. पण ईश्वरेच्छा काय आहे हाच तर खरा वादाचा मुद्दा आहे !
समता, व्यक्तिस्वातंत्र्य या आधुनिक मूल्यांना तेथे काही मान आहे हे म्हणणे कठीण आहे. अर्धी प्रजा-स्त्रिया-कायमच्या पडद्यात. शिक्षण, नोकरी करताना पुरुषांशी संपर्क येत नसेल तरच परवानगी. स्त्रियांना मोटरकार चालविण्याची मनाई. सर्वांचा जीव सारख्या मोलाचा नाही. कार अॅक्सिडेंटमध्ये मुस्लिम मनुष्य मरण पावला असेल तर दोषी कोणीही असो, नुकसानभरपाई १ लक्ष रियाल भरेपर्यंत कारचालक अटकेत राहील. तोच काफ़िर मेला तर दोषी कोण याचा निर्णय झाल्यावर मेलेल्याच्या योग्यतेनुरूप नुकसान-भरपाई. एकदा सौ. जया भोसले व मुली यांना घेऊन डॉ. सोवनी येत होते. श्री. भोसले त्यांची ड्यूटी संपल्यावर येणार होते. रस्त्यात एका अरब छोकऱ्याने कारला मागून ठोकर मारली. थोडी हुज्जत घालून निघून गेला. त्याला पोलिसात नेऊन गाडीचा दुरुस्ती खर्च सहज मिळाला असता. पण डॉ. सोवनी म्हणाले की पोलिसांनी मला अटक केली असती. स्वतःची पत्नी सोबत नसेल तर दुसऱ्याची पत्नी-मुलींसोबत का असेना. गाडीत असणे गुन्हा आहे.
सौदी अरेबिया श्रीमंत देश आहे. म्हणजे काय आहे ? घरोघर मोटारी. जितकी कर्ती माणसे घरात, तितक्या मोटारी. घरे सर्व आधुनिक सोयींनी सुसज्ज. रस्ते आखीव रेखीव, रुंद. पेट्रोल एका रियालला तीन लिटर. बाजार जगातल्या उत्तमोत्तम वस्तूंनी गच्च भरलेले. सकाळच्या बटर-चीज पासून, भाज्या, फळे सर्व आयात वस्तू उत्कृष्ट दर्जाच्या, मुबलक. गोडे पाणी दुकानातून १०-२० लिटर्सच्या कॅनमधून आणतात. एक लिटरच्या बॉटल्सही मिळतात.
सरसकट सर्व प्रजाजनांना एवढी सुबत्ता कशी आली? जुन्या भूगोलात सांगितलेले अरबस्तानातले बेदुईन अरब उंटाच्या पाठीवरून एकदम टोयोटा क्रेसिडामध्ये कसे शिरले असा मला प्रश्न पडे. सौदीची लोकसंख्या ऐंशी साली ऐंशी लाख होती. नव्वद साली ती एक कोटी पंधरा लाख झाली. तेलाच्या प्रचंड उत्पत्राचे राजघराण्याने मुक्त हाताने वितरण केले. इस्लामला मान्य असलेला कर्ज ए हसनह हा एक प्रकार आहे. त्यात कर्ज देणाऱ्याने ऋणकोला कधीही कर्जाची आठवण द्यायची नाही. ऋणकोने आपणहून ऐपत आल्यावर मूळ मुद्दल फक्त परत करायचे. कमी अधिक धडाडीच्या लोकांनी अशा भांडवलावर धंदे उभारले आहेत. धंदेवाढीला लागणारे कुशल व्यवस्थापन नोकरीला ठेवले आहे. विज्ञानाने जीवन किती सुसह्य केले याचे उदाहरण म्हणजे समुद्राचे खारे पाणी गोडे करून नळाद्वारे सर्वत्र पुरविले जाते. थोडे मचूळ म्हणून ऐपतदार हे पाणी पीत नाहीत, ही गोष्ट वेगळी. पण २४ तास या, पाण्याचा पुरवठा. ज्या विजेमुळे घरे, गाड्या आरामदायक झाल्या त्या विजेचे दर वर्षावर्षी घटते आहेत. स्थानिक टेलिफोनला पैसे पडत नाहीत. पोस्टमन नाहीत. पोस्ट बॅग्जमधून आपले टपाल आणावे लागते. पेपर, दूध कोणतीच गोष्ट घरपोच नाही. आपल्याकडच्या रॉकेलच्या गाड्यासारख्या गोड्या पाण्याच्या व्हॅन्स दिवसभर वस्त्यातून घोषणा देत हिंडत असतात.
‘हसनह ‘ म्हणजे चांगली गोष्ट, सुकृती. या ‘कर्जे हसनह ‘ ने सौदी अरेबियाचा कायापालट केला आहे. लोकांची क्रयशक्ती प्रचंड वाढवली आहे.
माझ्या तीन महिन्यांच्या तिथल्या वास्तव्यातले एक वैषम्य मला टोचते. मी अरबी बोलू शकत नव्हतो आणि इंग्रजी बोलू शकतील अशा एकाही सौदी हुद्देदाराशी मला भेट मिळू शकली नाही. माझ्या मुलीच्या हॉस्पिटलचे डीन इंग्रजी बोलू शकले असते पण ते इतके दूर, इतके उंचीवरचे वरिष्ठ, की माझी जिज्ञासा त्यांच्यापर्यंत पोचवणे मुलीला अशक्य वाटले. तिथे लोकशाही नाही. अतिवरिष्ठांपर्यंत तुम्ही सहज पोहोचू शकत नाही. युनिव्हर्सिटीत परभाषा विभागात इंग्रजीचे शिक्षक असतील त्यांना तरी भेटावे हीही माझी इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. माझ्या मुलीची मैत्रीण विद्यापीठातल्या दवाखान्यात काम करत होती. तिनेही असमर्थता दाखवली. त्यामुळे. माझ्या कित्येक शंका तशाच राहिल्या इतिहास भूगोलाचे शाळेत इतके वावडे का हे कोडे उकललेच नाही. माझ्या या वृत्तान्ताचा बराचसा आधार-सबूद-दुय्यम आहे याची मला खंत आहे.

शान्तिविहार.
चिटणवीस मार्ग, सिव्हिल लाइन्स, नागपूर (४४० ००१)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.