शास्त्रीयतेची प्रतिष्ठा फलज्योतिषाला मिळणे अशक्य आहे

सुधारकच्या वाचकवर्गापैकी कुणीही फलज्योतिपावर विश्वास ठेवणारे असतील असे मला वाटत नाही. माझ्या या लेखाचा हेतू कुणाचा भ्रमनिरास करण्याचा नाही. माझा हेतू असा आहे की फलज्योतिषात ज्या अंगभूत (built-in) अंतर्विसंगती आहेत त्यांची ओळख वाचकांना व्हावी.
फलज्योतिपावर आमचा विश्वास नाही ‘ असे म्हणणाऱ्यांना जर असा प्रश्न विचारला की, तुमचा विश्वास का नाही त्याची कारणे सांगाल का, तर अनेक प्रकारची उत्तरे ऐकायला मिळतील. त्यातली कित्येक उत्तरे गैरलागू असतात, कित्येक उत्तरे उथळ असतात, आणि काही तर अगदी चुकीची असतात. फलज्योतिषावरची लोकांची अंधश्रद्धा दूर व्हावी या हेतूने केलेल्या प्रचारात जर असे सदोप युक्तिवाद केलेले असले तर त्या प्रचाराचा परिणाम उलटाच होतो. ज्योतिष-समर्थक लोक अशा प्रचारात केलेल्या युक्तिवादाची थट्टा उडवतात, आणि लोकांच्या अंधश्रद्धा जास्तच बळकट होतात. एक उदाहरण देऊनच हा मुद्दा स्पष्ट करतोः
फलज्योतिपाच्या वाढत्या प्रचारामुळे अस्वस्थ झालेल्या काही नामवंत शास्त्रज्ञांनी सन १९७५ मध्ये ‘ह्यूमॅनिस्ट’ नावाच्या अमेरिकेतल्या नियतकालिकांत एक निवेदन प्रसिद्ध केले. ‘Objection s to Astrology हे त्या निवेदनाचे शीर्षक. या निवेदनावर १८६ शास्त्रज्ञांनी सह्या केल्या होत्या, त्यामुळे या निवेदनाचा खूप गाजावाजा झाला. या निवेदनात असे म्हटले होते की, “फलज्योतिष हे शास्त्र नाही कारण ग्रह व तारे हे पृथ्वीपासून फार प्रचंड अंतरावर आहेत. प्रचंड अंतरामुळे त्यांचे गुरुत्वाकर्षणात्मक आणि अन्य प्रकारचे प्रभाव हे अत्यंत क्षीण असतात. माणसाच्या जन्मवेळी त्याच्यावर हे प्रभाव पडून त्याचे भविष्य घडवले जाते ही समजूत अगदी चुकीची आहे.”
ग्रह-ताऱ्यांच्या प्रभावांची क्षीणता हा मुद्दा निवेदनात घालण्याची चूक या शास्त्रज्ञांनी केली, तिचा फायदा ज्योतिष-समर्थकांनी भरपूर घेतला, आणि हे शास्त्रज्ञ लोकच कसे बंदिस्त मनाचे आहेत ते दाखवण्यासाठी नाना त-हेचे शास्त्रीय पुरावे मांडण्याची एक लाटच उसळली. प्राण्यांच्या मेंदूमधले व्यापार चालण्यासाठी किती क्षीण-तम विद्युत्-प्रवाह पुरेसा होतो याची चर्चा करून झाली.इथे थोडे विषयांतर करून, अलीकडेच घडलेले एक उदाहरण देण्याचा मोह मला होतो. जलाभेद्य वेष्टनांत बांधलेली स्फोटक पदार्थांची पुडकी २०-२५ फूट खोल पाण्याच्या तळाशी लपवलेली, ती केवळ वासावरून हुडकून काढणारा जंजीर कुत्रा. त्याच्या घ्राणेंद्रियाने मेंदूकडे जी काय माहिती पाठवली असेल ती विद्युत्-रासायनिक संदेशांच्या स्वरूपातच पाठवली असणार. त्या संदेशांच्या देवाण-घेवाणीसाठी लागणारा विद्युत्-भार किती पराकोटीचा क्षीण असेल त्याची कल्पनाही करवत नाही. ग्रह-ताऱ्यांच्या प्रभावांची क्षीणता आणि ही क्षीणता एकाच कोटीत बसणाऱ्या आहेत असा युक्तिवाद ज्योतिष समर्थकांनी केला, त्यामुळे क्षीणतेचा मुद्दा निकालात निघाला. पण त्याबरोबरच हेही लक्षात ठेवायला हवे की या प्रभावांच्यामुळे माणसाचे भविष्य कसे व का घडते या प्रश्नाला नेमके उत्तर अद्याप कुणीच देऊ शकलेले नाही. तरीपण, गैरलागू युक्तिवादाचा परिणाम कसा उलटा होतो ते यावरून ध्यानात येईल.
ज्योतिष-समर्थकांचा एक ठराविक युक्तिवाद असा असतो की, ‘का व कसे या प्रश्नांची उत्तरे आज आमच्याजवळ नाहीत हे खरे, पण आमच्या शास्त्रात जे सिद्धान्त किंवा नियम सांगितलेले आहेत त्यांचे प्रत्यंतर जर येत असेल तर हे एक खरेखुरे शास्त्र आहे असे का म्हणू नये?’ हा युक्तिवादही योग्यच आहे. पाश्चात्य देशांत या दिशेनेही खूपच मोठ्या प्रमाणावर चाचणी प्रयोग झालेले आहेत. पुष्कळशा प्रयोगांचे निष्कर्ष फलज्योतिषाला .. प्रतिकूल असेच निघालेले आहेत. परंतु ज्योतिषसमर्थक अशा प्रयोगांवर नाना त-हेचे आक्षेप घेतात. त्या सगळ्यांची चर्चा इथे करता येणार नाही; परंतु या पद्धतीने ठाम असा निर्णय लागू शकलेला नाही ही वस्तुस्थिती आहे.
मी एका निराळ्याच दिशेने माझे प्रतिपादन आता करणार आहे. सारांशरूपाने माझे प्रतिपादन असे की ग्रह-ताऱ्यांचे प्रभाव माणसावर पडतात असे आपण समजून चालू. त्या प्रभावांचे पर्यवसान काय होते ते ठरवण्यासाठी मनुष्याने जे एक तंत्र बनवले आहे ते तंत्र कुचकामी आहे, आणि म्हणून फलज्योतिपाला शास्त्रीयतेची प्रतिष्ठा प्राप्त होणे अशक्य आहे. हे तंत्र कुचकामी अशा अर्थाने आहे की या तंत्रात स्वीकारण्यात आलेल्या अनेक अभ्युपगमांत किंवा गृहीतकांत अंतर्विरोध आहे. अशा सर्व अभ्युपगमांची चर्चा या लेखाच्या मर्यादेत मला करता येणार नाही, परंतु अगदी प्राथमिक अशा एका अभ्युपगमाची मी तपशीलवार चर्चा करणार आहे; आणि तो अभ्युपगम म्हणजे –
जन्मकुंडली
फलज्योतिषाचे अगदी प्रारंभीचे गृहीतक असे की, मनुष्याच्या जन्मस्थानाच्या क्षितिजपातळीच्या अनुपंगाने त्याच्या जन्मवेळी जी काही आकाश-स्थिती होती, तिच्यावरून त्या मनुष्याच्या आयुष्याची रूपरेखा निश्चित होते. ही आकाशस्थिती एका वर्तुळाकार आराखड्यात दर्शवण्यात येते, त्या आराखड्याला जन्मकुंडली असे म्हणतात. (सोयीसाठी ही जन्मकुंडली चौकटीच्या रूपांत मांडण्याचा प्रघात आहे.)
जन्म-कुंडलीत दोन अंगे असतात. पहिले अंग राशिचक्रात कोणते ग्रह कुठल्या ठिकाणी आहेत ते दर्शवते; आणि दुसरे अंग जन्मस्थळावरून दिसणारा आकाश-गोलार्ध कोणता आणि मावळलेला आकाश गोलार्ध कोणता ते दर्शवते. येथपर्यंत मी कुंडलीचे जे वर्णन केले आहे तेवढेच ध्यानात घेतले तर असे म्हणता येईल की यात अशास्त्रीय किंवा काल्पनिक असे काहीच दिसत नाही. पण इथूनच पुढे फलज्योतिषातले कल्पनारंजन सुरू होते, आणि ते नीट समजावून घ्यायला हवे.
फलज्योतिष या दोन्ही आकाश-गोलार्धांचे प्रत्येकी सहा समान भाग पाडते, म्हणजे एकूण आकाश-पोकळीचे बारा समान भाग पडतात. या बारा भागांनाच कुंडलीतली घरे म्हणून ओळखले जाते. हे बारा भाग जन्मलेल्या व्यक्तीचे “व्यक्तिगत” भाग असतात. व्यक्तिगत अशा अर्थाने की, त्याचवेळी दुसऱ्या कुठल्यातरी स्थळी जन्मलेल्या मुलाचे क्षितिज वेगळे असल्यामुळे त्या मुलाचे बारा आकाशभाग या पहिल्या व्यक्तीच्या आकाश भागापेक्षा वेगळे असतील, हे उघड आहे. ह्या मुद्याची चर्चा पुढे येणार आहे, म्हणून हा मुद्दा पक्का ध्यानांत ठेवावा.
आकाश-पोकळीचे बारा काल्पनिक भाग पाडूनच फलज्योतिष थांबत नाही, तर ते प्रत्येक भागाचे स्वयंभू आणि विशिष्ट गुणधर्म आहेत असे मानते. या बारा भागांना १ ते १२ अनुक्रमांक दिलेले असतात. पहिला भाग पूर्व-क्षितिजाला लागूनच, पण क्षितिजाखाली असतो. चौथा भाग बरोबर पायाखालच्या (पृथ्वीच्या पलीकडच्या बाजूच्या) आकाश-मध्यावर असतो, सातवा भाग पश्चिम-क्षितिजाला लागून, क्षितिजावर असतो, आणि दहावा भाग बरोबर आपल्या माथ्यावर येतो. या भागांच्या गुणवैशिष्ट्याची कल्पना येण्यासाठी एक उदाहरण देतो. समजा की आत्ताच इथे एक मुलगी जन्मली आहे, आणि मंगळ ग्रह बरोबर डोक्यावर आहे. याचा अर्थ असा की या मुलीच्या कुंडलीत मंगळ ग्रह दहाव्या घरात पडला आहे. या मंगळाचा त्या मुलीला काही त्रास होणार नाही असे फलज्योतिष मानते. पण समजा की हीच मुलगी आणखी ६ तास उशीरा जन्मली असती तोपर्यंत मंगळ ग्रह मावळतीला, म्हणजे सातव्या घरात पोचला असता, आणि मग या मुलीच्या वाट्याला कदाचित वैधव्ययोग आला असता, कारण सप्तमातला मंगळ म्हणजे फार अनिष्ट असे फलज्योतिप म्हणते. याचा अर्थ असा की दहावे घर आणि सातवे घर यांचे स्वतःचे असे काही गुणधर्म आहेत. याप्रमाणे प्रत्येक घराचे गुणधर्म मानलेले आहेत. चतुर्थातला शनी, द्वितीयातला रवी वगैरे शब्दप्रयोग सर्वांच्या परिचयाचे आहेतच.
आकाशाच्या पोकळीचे असे व्यक्तिगत बारा भाग मानणे आणि त्या बारा भागांचे गुणधर्म मानणे हे कॉमन सेन्सला पटणारे नाही, कारण पृथ्वी या आकाश पोकळीतून ताशी ६० हजार मैल वेगाने धावत आहे हे तर झालेच, आणि शिवाय संपूर्ण सूर्यमालाही प्रचंड वेगाने आकाशगंगेच्या मध्याभोवती फिरत आहे. अशा स्थितीत पृथ्वीच्या भोवतालची आकाश पोकळी दर क्षणाला बदलत आहे हे उघड आहे. अशा या आकाश पोकळीचे बारा भाग पाडून त्यांचे गुणधर्म ठरवणे कसे शक्य आहे?
जन्मकुंडलीच्या अभ्युपगमात जो अंतर्विरोध आहे तो आता एका उदाहरणाने मी दाखवणार आहे:
नागपूर शहराचे रेखांश ७९० (पूर्व) आहेत. त्याच्यापासून बरोबर १८०° अंतरावर अमेरिकेत बिस्मार्क नावाचे शहर आहे (रेखांश १०१० पश्चिम) म्हणजेच ही दोन शहरे एकमेकांच्या पायाखाली आहेत. आता असे समजू या की नागपुरात एका मुलीचा जन्म झाला, आणि त्याच क्षणी बिस्मार्क शहरातही एक मुलगी जन्मली. हल्ली जगात दर सेकंदाला तीन मुले जन्मत आहेत, त्यामुळे ही गोष्ट असंभवनीय नाही. नागपूरच्या मुलीचा जन्म झाला तेव्हा सूर्य बरोबर माथ्यावर होता. म्हणजे जन्मकुंडलीच्या दृष्टीने तो तिच्या दहाव्या घरात होता. अमेरिकेतल्या बिस्मार्क शहरात त्यावेळी मध्यरात्र होती, आणि तिथल्या मुलीच्या जन्मकुंडलीत तोच सूर्य चौथ्या घरात पडला. (पायाखालच्या आकाशाच्या मध्यावर चौथ्या क्रमांकाची आकाशपोकळी येते हे वर सांगितलेच आहे). याचा अर्थ असा झाला की एकाच आकाश-विभागाला दहावा क्रमांक आणि चौथा क्रमांक एकाच वेळी द्यावे लागतात. तेव्हा आता प्रश्न असा की या ठिकाणात असलेला सूर्य (किंवा दुसरा कोणताही ग्रह) जे काय फल देणार ते कोणत्या क्रमांकाच्या घराचे फल देणार? आणि समजा की त्याच वेळी न्यूझीलंड मध्ये १६९० (पूर्व) या रेखांशावर एक मूल जन्मले, तर त्याच्या दृष्टीने सूर्य मावळण्याच्या बेतात असल्याने तो सातव्या घरात पडेल. (पश्चिम क्षितिजावर सातवे घर असते). म्हणजे आणखी एक क्रमांक त्या आकाश-विभागाला चिकटेल.
ज्या त्या आकाश-विभागाचे स्वयंभू गुणधर्म त्या-त्या विभागाच्या अनुक्रमांकाशी निगडित असतात हा जो सिद्धान्त जन्मकुंडलीच्या विश्लेषणासाठी गृहीत धरलेला आहे तो या प्रकारच्या अंतर्विसंगतीमुळे बाद ठरतो. कितीही प्रकांड पंडित होराभूपण असो, तो या विसंगतीचा काहीही निरास करू शकणार नाही.
मी सुरुवातीस म्हटल्याप्रमाणे फलज्योतिपात अनेक अभ्युपगम असे अंतर्विसंगतीमुळे बाद ठरतात, पण स्थलाभावी त्यांची चर्चा करणे शक्य होणार नाही. फलज्योतिपाला अशा सदोष अभ्युपगमामुळे शास्त्रीय मान्यता मिळणे अशक्य आहे.
फलज्योतिपातले सिद्धान्त त्याच्यावरच कसे उलटवता येतात हे सर्वसामान्य लोकांना समजले तर मग फलज्योतिप हे शास्त्र आहे की थोतांड आहे हा प्रश्नच शिल्लक राहणार नाही.
२, वासवी, २१०१ सदाशिव,
पुणे-३०

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.