विवाह संस्था आणि स्त्री

प्रश्न : विवाहसंस्था नष्ट झाली तर मुलांचा प्रश्न निर्माण होईलही; पण स्त्रियांचा तरी विकास होईल का ?

गीता साने: हो, विवाहसंस्था नष्ट झाली तर स्त्रीवरच्या जबाबदाऱ्या कमी होतील आणि विकास होईल. आज बायकांना हे करावसं वाटतं, ते करावस वाटतं, पण जमत नाही. उर्मी एकदा निघून गेली की गेली! हा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. माझ्यासारख्या बाईचं सुद्धा मुलं लहान असताना हेच झालं. पण मुलींची जबाबदारी समाजावर व्यवस्थितपणे सोपवून मगच विवाहसंस्था नष्ट करता येईल. दुसरं असं की, बाईला कुणा पुरुषाचं आकर्षण वाटलं की आज समाज तिला धारेवर धरतो. पुरुष आपला इकडेतिकडे धावतच असतो. त्याला कोणी काही म्हणत नाही. विवाहबंधन नष्ट झाल्याशिवाय स्त्रीचं हे नष्टचर्य संपणार नाही. एकदा लग्न झालं की, नवरा-बायकोला एकमेकांना सोडणं सोपं नसतं. त्यातल्या त्यात पुरुष बाहेर जाऊ शकतो. स्त्री कुठे जाऊ शकत नाही. कुटुंबाच्या रेषेबाहेर बाईचं जाणं हे फार वाईट समजलं जातं. तर ती रेषाच पुसून टाकली म्हणजे झालं. मग का नाही स्त्री बाहेर जाऊ शकणार? लैंगिकतेसाठी बाईनं मुक्तपणे हिंडावे असं मी म्हणणार नाही. मी काही मुक्त लैंगिकतेच्या फारशी बाजूची नाही.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.