तत्त्वज्ञानाची ओळख (भाग ८)

उद्गमन (Induction)

सहाव्या प्रकरणात आपण विधानांचे दोन प्रमुख प्रकार पाहिले. ते म्हणजे (१) विश्लेषक- अवश्य-प्रागनुभविक विधाने आणि (२) संश्लेषक आयत्त-आनुभविक विधाने. त्याआधी तिसऱ्या प्रकरणात आपण निगामी आणि उद्गामी अनुमानप्रकारांची ओळख करून घेतली होती. आता या प्रकरणात विधानांच्या वरील विभाजनाच्या साह्याने निगामी व उद्गामी अनुमानप्रकारांचे स्वरूप अधिक विस्ताराने समजाऊन घेऊ.

‘उद्गमन’ हा शब्द काहीसा शिथिलपणे वापरला जातो. त्याच्या प्रमुख अर्थी त्याने निगमनाच्या पूर्ण विरुद्ध प्रकारच्या अनुमानाचा बोध होतो. निगमन हा अनुमानप्रकार पूर्णपणे निर्णायक आहे, हे आपण पाहिले आहे. त्याला ‘demonstrative inference’ म्हणजे सिद्धिकारक (सिद्धिक्षम) अनुमान असेही म्हणतात, कारण त्याची साधके जर सत्य असतील तर वैध निगमनाचा निष्कर्ष अवश्यपणे सत्यच असतो. म्हणजे साधके सत्य असतील तर निगमनाने निष्कर्षाची पूर्ण सिद्धी होते. परंतु निगमनाची सत्यता औपाधिक (conditional) असते. म्हणजे त्याची साधके जर सत्य असतील तर त्याचा निष्कर्ष सत्य असतो. आता साधकांच्या सत्यतेची हमी निगमन देत नाही, आणि म्हणून प्रश्न असा उद्भवतो की ‘मग सत्य विधाने प्राप्त करण्याचा उपाय कोणता आहे ?’ या प्रश्नाचे उत्तर देणे. म्हणजे उद्गमनाची चर्चा करणे होय.

या ठिकाणी कोणी असे म्हणू शकेल की तार्किकीय ज्ञान हे तार्किकीबलाने सत्य असणारे ज्ञान आहे, आणि तसेच ते सार्विकही असते. मग तार्किकीबलाने सत्य असणारी विधाने हे वरील प्रश्नाला उत्तर नव्हे काय ? आता हे खरे आहे की तार्किकीय विधाने सत्य असतात आणि सार्विकही असतात. पण ती विधाने विश्वाविषयी कसलीही माहिती देत नाहीत हेही आपण पाहिले आहे. जगाच्या माहितीच्या दृष्टीने तार्किकीय ज्ञान रिक्त (empty) किंवा शून्य असते, आणि म्हणून मग सत्य विधाने मिळविण्याकरिता आपल्याला उद्गमनाकडे जावे लागते, म्हणजे विश्वाचे अवलोकन करावे लागते.

विश्वाच्या अवलोकनाने होणारे ज्ञान म्हणजे आपल्या पाच ज्ञानेंद्रियांनी होणारे ज्ञान. हे ज्ञान इंद्रियांच्या प्रत्यक्ष संबंधात येणाऱ्या वस्तूंचे असते. आता एकावेळी एकाच वस्तूशी इंद्रियांचा संबंध येत असल्यामुळे, इंद्रियांनी होणारे ज्ञान एकेकट्या, सुट्या सुट्या वस्तूंचे असते. उदा. हे टेबल, ती (ऐकू येणारी) घंटा, हा (मखमलीचा) स्पर्श, ही (चॉकोलेटची चव, हा (फुलाचा) सुगंध इ. हे ऐंद्रिय ज्ञान भाषेत व्यक्त केल्यास ते एकवचनी (singular) विधानांत करावे लागते. उदा. ‘मोत्या भुंकतो’, ‘मनी दूध पितें’, ‘आई लाड करते, इ. या एकवचनी विधानांची उद्देश्ये विशेषनामे असतात.

परंतु विश्वाविषयी आपल्याला जे ज्ञान आहे ते केवळ एकवचनी विधानांचे ज्ञान नसते, त्याखेरीज ज्यांना सामान्य (general) विधाने म्हणतात त्यांचेही ज्ञान आपल्याला असते. सामान्य विधानांची उद्देश्ये सामान्य नामे असतात. ही विधाने दोन प्रकारची असतात. (१) सार्विक (universal) आणि (२) कातिपयिक (particular). सार्विक विधान म्हणजे एखाद्या प्रकारच्या सर्व वस्तूंविषयीचे विधान. उदा. ‘सर्व कावळे काळे असतात. कातिपयिक विधान म्हणजे एखाद्या प्रकारच्या काही वस्तूंविषयीचे (कतिपय = काही) विधान. उदा. ‘काही माणसे दयाळू असतात.

एकवचनी, कातिपयिक आणि सार्विक या तीन प्रकारच्या विधानांपैकी एकवचनी आणि कातिपयिक या दोन प्रकारच्या विधानांचे ज्ञान आपल्याला इंद्रियांनी होते असे आपण म्हणू शकतो. परंतु सार्विक विधानांचे ज्ञान मात्र आपल्याला इंद्रियांनी होऊ शकत नाही असे म्हणणे भाग आहे. कारण बहुतेक वस्तुप्रकार असे आहेत की त्यांतील वस्तूंची संख्या अनंत असते, पण आपला इंद्रियानुभव सांत असतो. उदा. कावळा या जातीच्या पक्ष्यांची संख्या प्रायः अनंत आहे. त्यांपैकी असंख्य कावळे भूतकाळात होऊन गेलेले असल्यामुळे त्यांचे अवलोकन आपण करू शकत नाही; आणि तसेच भविष्यात जन्माला येणार असलेले कावळेही आपल्या अवलोकनाच्या टप्प्याबाहेर असणार. म्हणजे आपण कितीही कावळे तपासले, तरी सर्व कावळे तपासू शकत नाही. त्यामुळे कावळ्यांविषयी सार्विक विधान प्राप्त करायचे म्हणजे काही कावळ्यांच्या ज्ञानावरून सर्वांचे अनुमान करणे याहून अन्य उपाय नाही. हे अनुमान अर्थातच सदोष होईल. एखाद्या प्रकारच्या काही वस्तूंच्या ज्ञानावरून त्या प्रकारच्या सर्व वस्तूंविषयी अनुमान करण्यात धोका आहे. असे अनुमान अनेकदा चुकीचे असते असा आपला अनुभव आहे. अशा अनुमानाला उद्गामी अनुमान असे नाव असून, ते सर्वदा अवैध असते असे म्हणावे लागते.

निगामी अनुमान व उद्गामी अनुमान यांच्यातील भेद विश्लेषक व संश्लेषक विधानांतील भेदासारखा आहे. विश्लेषक विधानातील विधेय उद्देश्य संकल्पनेचाच एक भाग असल्यामुळे ते विधान पुनरुक्तीच्या स्वरूपाचे असते, आणि म्हणून ते असत्य असू शकत नाही. हे खरे असले तरी असले विधान कसलेही नवीन ज्ञान देत नाही. तीच गोष्ट निगामी अनुमानाची आहे. त्याचा निष्कर्ष साधकांत पूर्णपणे समाविष्ट असतो. साधकात अव्यक्तपणे (implicitly) समाविष्ट असलेली माहितीच निष्कर्षात व्यक्तपणे मांडली जाते, आणि म्हणून ते अनुमान वैधच असते, आणि त्याचे तुल्य औपाधिक (corresponding conditional) विधान तार्किकीबलाने सत्य असते. पण त्यामुळेच निगामी अनुमानात आपल्याला नवीन ज्ञान मिळत नाही. याच्या उलट जसे संश्लेषक विधानात उद्देश्यसंकल्पनेत समाविष्ट नसलेले काहीतरी विधेयाने उद्देश्याला जोडले जाते, आणि म्हणून ते विधान असत्य असू शकते, तसेच उद्गमनाचा निष्कर्ष साधकांनी दिलेल्या माहितीत समाविष्ट नसतो, आणि म्हणून त्याची साधके सत्य असूनही त्याचा निष्कर्ष असत्य असू शकतो. सारांश, निगमनात सत्यतारक्षणाची हमी असते, पण त्यात नवीन ज्ञान असत नाही, तर उद्गमनात नवीन ज्ञान देण्याचा प्रयत्न असतो, पण त्याच्या सत्यतेची शाश्वती नसते. असे हे त्रांगडे आहे, आणि यातूनच आपल्याला मार्ग काढावा लागतो.

विज्ञान म्हणजे निसर्गनियमांचे ज्ञान आपण ज्याला विज्ञान म्हणतो तो सार्विक विधानांचा एक विराट आणि प्रत्यही वाढणारा संचय आहे. हे सर्व ज्ञान संश्लेषक प्रकारचे, म्हणजे जगाविषयीचे ज्ञान असल्यामुळे ते उद्गमनानेच प्राप्त होऊ शकणारे असते, म्हणून विज्ञानाला उद्गामी विज्ञान म्हणतात. कोणत्याही सार्विक विधानाला नियम म्हणतात. उदा. ‘सर्व गायी रवंथ करतात हे सार्विक विधान निसर्गातील एक नियम व्यक्त करते. तसेच ‘उष्णतेने पदार्थ प्रसरण पावतात’ हेही एक सार्विक वाक्यच आहे, कारण त्यात जरी ‘सर्व’ हा शब्द नसला तरी तो त्यात अभिप्रेत आहे, कारण ते सर्व पदार्थांसंबंधाने प्रतिपादलेले वाक्य आहे, आणि म्हणून त्यातही एक नियम व्यक्त झाला आहे. निसर्गात असलेले काही नियम सुबोध, म्हणजे सहज लक्षात येऊ शकणारे असतात, परंतु सर्वच नियमांसंबंधाने असे म्हणता येत नाही. निसर्गातील सर्व नियम हुडकून काढून ते स्पष्टपणे आणि नेमकेपणाने ग्रथित करणे हे विज्ञानाचे कार्य आहे. हे कार्य म्हणजे उद्गमनाचेच कार्य असल्यामुळे विज्ञानांना उद्गामी विज्ञाने म्हणतात. त्याच्या उलट तर्कशास्त्र आणि गणित ही शास्त्रे निगामी आहेत. त्यांचा उद्गमनात खूप उपयोग होतो, एवढेच नव्हे तर उद्गमनाचे त्यांच्यावाचून चालत नाही. हे खरे असले तरी ती स्वतः मात्र उद्गामी नाहीत हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.

उद्गमनाची समस्या आतापर्यंतच्या विवेचनावरून जिला उद्गमनाची समस्या म्हणतात तिचे स्वरूप स्पष्ट झाले असेल. ती समस्या म्हणजे कोणत्याही प्रकारच्या काही वस्तूंच्या ज्ञानावरून त्या प्रकारच्या सर्व वस्तूंचे ज्ञान कसे मिळवायचे ही. अशी माहिती मिळविण्याचे एकमेव साधन म्हणजे उद्गामी अनुमान. पण हे अनुमान अवैध असते, म्हणजे सत्यतासंरक्षक नसते. त्याची सर्व साधके जरी सत्य असली तरी त्याचा निष्कर्ष असत्य असू शकतो. अशा अवैध अनुमानाच्या साह्याने निसर्गाविषयी सत्य आणि सार्विक विधाने कशी प्राप्त करावयाची ही उद्गमनापुढील समस्या आहे. ती ‘the problem of induction’ या नावाने प्रसिद्ध आहे.

ह्या समस्येची स्पष्ट जाणीव डेव्हिड ह्यूम (David Hume) या अठराव्या शतकातील ब्रिटिश तत्त्वज्ञाने केलेल्या कारण-संकल्पनेच्या विश्लेषणातून प्रथम झाली. ह्यूमच्या काळापूर्वी असे मानले जाई की कारणसंबंध हा एक अवश्य संबंध (necessary connection) आहे. अ या घटनेचे जर ब हे कारण असेल तर ब घडल्यावर अ घडणे अपरिहार्य आहे असे मानले जाई. परंतु ह्यूमने दाखवून दिले की ज्याला आपण कारणसंबंध म्हणतो त्यात एक घटना आधी आणि दुसरी नंतर घडते याखेरीज आणखी काहीही निरीक्षणाला सापडत नाही. कारण कार्य निर्माण करते (the cause produces the effect) असे आपण म्हणतो, परंतु कारण घडल्यानंतर कार्य घडते या नियमित आनुचर्याखेरीज आपल्याला आणखी काहीच आढळत नाही. परंतु आनुचर्यसंबंध (म्हणजे एका घटनेनंतर दुसरी घडणे) अवश्य संबंध आहे असे म्हणता येत नाही, कारण तसे म्हणता येण्याकरिता पहिली घटना घडल्यानंतर दुसरी न घडणे अशक्य आहे असे असावे लागेल, आणि तसे म्हणता येत नाही. अ या प्रकारची घटना अनेकदा ब या घटनेनंतर घडताना दिसली तरी ती क्वचित् तशी घडत नाही असेही दिसते, आणि म्हणून आतापर्यंत ब नंतर घडताना दिसलेली अ ही घटना यापुढेही सदैव तशीच घडत राहील याची कसलीच शाश्वती आढळत नाही. भविष्य भूतासारखेच असेल (the future will resemble the past), म्हणजे भूतकालात नियमाने घडत आलेल्या घटना भविष्यातही तशाच घडत राहतील याची शाश्वती कोणी देऊ शकत नाही.

उद्गामी अनुमान कदापि निर्णायक असत नाही, त्याचा निष्कर्ष कधीही १००% निश्चित असू शकत नाही ही गोष्ट मान्य करणे आरंभी कठीण वाटते. आपल्याला स्वाभाविकच असे वाटते की जे आजपर्यंत न चुकता घडत आले ते पुढेही चुकणार नाही. या ठिकाणी बर्ट्रांड रसेलने दिलेले उदाहरण लक्षात ठेवण्यासारखे आहे. तो कोंबडीच्या एका पिल्लाचे उदाहरण देतो. ह्या पिल्लाला त्याच्या मालकाने ते जन्मल्यापासून नेमाने खाऊपिऊ घातले आहे, आणि त्यामुळे त्याची स्वाभाविकच अशी समजूत होते की हा क्रम पुढेही चालू राहील. पण एक दिवस येतो आणि त्याचा मालक त्याची मान मुरगाळतो आणि त्या पिल्लाचे उद्गमन खोटे पडते. हीच गोष्ट सर्वच घटनांसंबंधाने खरी आहे असे रसेल म्हणतो, आणि ते नाकारणे कठीण आहे. सूर्य आजपर्यंत रोज सकाळी पूर्वेकडे उगवला आहे, पण म्हणून तो उद्याही तसाच उगवेल असा निष्कर्ष काढायला कारण सापडत नाही. आजपर्यंत अमुक परिस्थितीत अमुक घटना घडली म्हणून त्याच परिस्थितीत ती उद्याही घडेल हे अनुमान ‘न निष्पद्यते’ (non-sequitur) चे उदाहरण आहे. ‘सर्व मनुष्य मर्त्य आहेत आणि सॉक्रेटीस मनुष्य आहे’ या विधानावरून ‘स्टॉक्रेटीस मर्त्य आहे हे विधान ज्या अर्थाने निष्पन्न होते, म्हणजे पहिल्यात दुसऱ्याचे निर्णायक समर्थक कारण असते, त्या अर्थाने सूर्य आजपर्यंत सदैव पूर्वेकडे उगवला आहे या विधानावरून ‘उद्याही तो पूर्वेकडेच उगवेल’ हे निष्पन्न होत नाही हे मान्य केले पाहिजे. या कारणामुळे काही तत्त्वज्ञ असे प्रतिपादतात की ज्याला उद्गामी अनुमान म्हणतात ते अनुमानच नव्हे, तो एक अंदाज बांधण्याचा प्रकार आहे.

उद्गमनाचे समर्थन करण्याचे अनेक प्रयत्न झाले आहेत. उद्गमनाचे निगामी अनुमानाने समर्थन शक्य नाही हे आपण पाहिले. म्हणून त्याचे उद्गामी समर्थन देण्याचा प्रयत्न काही तत्त्वज्ञांनी केला आहे. ते म्हणतात की उद्गमनाचे उद्गामी समर्थन करता येते. निसर्गाची वाटचाल एकविध (uniform), किंवा नियमित आहे या मताला ‘the uniformity of nature’ असे नाव आहे. निसर्गाची वाटचाल नियमबद्ध असल्यामुळे ते नियम हुडकून काढणे मनुष्याला शक्य होते असे हे मत आहे. पण निसर्गाची वाटचाल नियमबद्ध आहे हे कशावरून ? ते सिद्ध करता येईल काय ? निसर्गाची संपूर्ण वाटचाल नियमबद्ध आहे, म्हणजे त्यात अनियमित असे काही नाही. ही गोष्ट दुर्दैवाने स्वयंसिद्ध नाही, आणि म्हणून ती सिद्ध करण्याची आवश्यकता आहे. ते सिद्ध करण्याकरिता निगामी अनुमान शक्य नाही. म्हणून ते उद्गामी अनुमानाने सिद्ध करणे असे काही तत्त्वज्ञांचे म्हणणे आहे. पण असे करण्यात चक्रदोष (vicious circle) आहे. आपल्यापुढील प्रश्न आहे उद्गामी अनुमानाचे समर्थन कसे करता येईल हा. ते समर्थन उद्गमनाने करता येईल असे म्हणणे म्हणजे ज्या उद्गमनक्रियेचे समर्थन करायचे आहे तिचाच उपयोग करण्यासारखे आहे. या दोषाला ‘स्वाश्रय दोष’, (petitio principii) असे नाव आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.