पत्रव्यवहार

संपादक,आजचा सुधारक यांस स.न.वि.वि. आपल्या मासिकाच्या ऑगस्ट १९९३ च्या अंकात श्री. शांतिलाल मुथ्था ह्यांचा ‘समाजातील मुलींची घटती संख्या: कारणमीमांसा व उपाययोजना’ ह्या शीर्षकाचा लेख व त्यावरील श्री. दिवाकर मोहनी ह्यांचे भाष्य वाचावयास मिळाले. श्री. मुथ्था ह्यांची चिंता सार्थ आहे व त्यांनी केलेली कारणमीमांसा व सुचविलेली उपाययोजनाही बुद्धीला पटणारी आहे. पण श्री. मोहनींनी ह्या संदर्भात व्यक्त केलेले विचार मात्र तर्कसंगत वाटले नाहीत.

मूळ प्रश्नाचा विचार करणे व त्यावर उपाय कोणते करावेत ह्याचा शोध घेणे सोडून, श्री. मोहनी ‘पुरुषांकडून स्त्रियांची होणारी छेडखानी’ ह्या विषयाकडे वळले आहेत. त्यांच्या मते ह्या छेडखानीचे मूळ समाजात ‘स्त्रीपुरुष गुणोत्तर विषम असणे हे आहे. समाजात स्त्रियांची संख्या पुरुषांच्या तुलनेत अधिक झाली तर स्त्रिया पुरुषांची छेडखानी करायला लागतील असा निष्कर्ष श्री. मोहनींना संमत असलेल्या तर्कावरून काढता येऊ शकेल.

दिल्लीतील एका कारागृहासारख्या उंच काटेरी भिंतीच्या इमारतीवर मुलींच्या शाळेची पाटी पाहिली, आणि श्री. मोहनी अतिशय लज्जित झाले, असे मोहनी लिहितात. नागपुरात हा प्रकार श्री. मोहनींच्या पाहण्यात आला नसावा. आजही समाजात बुरखाधारी स्त्रिया पाहून मोहनींना काय वाटते ? ह्यामुळे ते लज्जित होत नाहीत काय ?

श्री. मोहनी म्हणतात, “जेथे विषमता आहे तेथे सुरक्षितता नाही. आपल्या घरातल्या स्त्रियांना सुरक्षित ठेवण्यासाठी, त्यांची राखण करण्यासाठी पुरुषांना सदैव सज्ज राहावे लागेल.” “स्त्रियांची राखण” हा शब्दप्रयोग, ‘आजचा सुधारक’ च्या सल्लागार मंडळातील श्री. मोहनींच्या विचारात व लिखाणात कसा काय आला ? हा स्त्रियांच्या समाजातील सुरक्षिततेचा विचार सुचविताना, श्री. मोहनींच्या विचारात- आजच्या सुधारकाच्या सल्लागार मंडळीतील श्री. मोहनींच्या विचारात — त्यांनी स्त्रीस्वातंत्र्यविरोधक मनू कसा काय शिरू दिला ?

श्री. मुथ्थांनी चर्चिलेल्या समस्येवरचे उपाय सुचविताना श्री. मोहनी, आदिवासी- वनवासी ह्यामध्ये प्रचलित असलेल्या स्त्रीपुरुष संबंधविषयक चालीरीतींचे आदरपूर्वक अध्ययन करण्याचे सुचवितात. ‘योनिशुचितेचे स्तोम’, ‘अनौरस संततीचा’ बागुलबोवा, टाळणे इष्ट, असा पर्यायही अप्रत्यक्षपणे सुचवितात. स्त्रियांच्या बहुपतिकत्वाला, तसेच स्त्रीपुरुषांच्या अनेक-पतिपत्नीकत्वाला कायद्याने मान्यता दिली पाहिजे व त्यासाठी आंदोलन सुरू केले पाहिजे म्हणतात. हा सर्व अवांछित द्राविडी प्राणायम करण्याऐवजी श्री. मुथ्थांनीच सुचविलेले उपाय अधिक तर्कसंगत व समस्येच्या कारणांना थेट भिडणारे नाहीत काय ?

— बा. के. सावंगीकर २

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.