जातीय दंगली आणि त्यामागील विचारप्रणाली

१८९३ साली मुंबईत पहिली जातीय दंगल झाली. म्हणजे एका अर्थी यावर्षी आपण जातीय दंगलींचा शतकोत्सव साजरा करीत आहोत. गेल्या शंभर वर्षांत अशा जातीय दंगलींचा उद्रेक अधून मधून सतत होत आला आहे व त्या दंगलींतून माणसातील पशुत्वाचे दर्शनही भरपूर झाले आहे. प्राणहानी व वित्तहानी किती झाली याचे तपशीलवार आकडे या दंगलींच्या अहवालातून उपलब्ध आहेत. अशा दंगलींमुळे राष्ट्राची एकता धोक्यात येते, त्याच्या प्रगतीला खीळ बसते, हे मान्य असूनही आपल्या सामाजिक व राजकीय जीवनातून अशा दंगलीना कायमचे निपटून काढण्यात आपण अपेशी ठरलो आहोत. उलट बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्यानंतर उफाळलेल्या दंगलीत परस्पर-विद्वेषाचा व हिंसाचाराचा एक नवाच उच्चांक गाठला गेला. अर्थात ही घटना अनपेक्षित नव्हती. कारण बाबरी मशीद- रामजन्मभूमी वाद सुरू झाल्यापासून, विशेषतः १९८६ पासून, ज्या त-हेने मुस्लिम समाजाविषयीचा विद्वेष पद्धतशीरपणे व प्रभावीपणे पसरविला जात होता ते पाहिल्यावर त्याचे पर्यवसान हिंसाचारात होणे अपरिहार्य होते. या अयोध्याकांडातून आणखीही काही गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. हिंदुत्ववाद्यांचा मुस्लिम-विरोध सर्वश्रुतच होता. पण अयोध्याकांडापर्यंत तो काहीसा सुप्त होता. बाबरी मशीद- रामजन्मभूमि प्रकरणाने तो उघडा नागडा होऊन समोर आला. इतकेच नव्हे तर त्या विरोधाला पराकोटीच्या विद्वेषाची व शत्रुत्वाची विलक्षण धार चढली. आणखी एक गोष्ट या दंगलीतून स्पष्ट झाली. आतापर्यंत हिंसाचार हा इस्लामी परंपरेचा अविभाज्य घटक मानला गेला आहे. त्यामुळे मुस्लिम समाज कमालीचा असहिष्णु, हिंस्र व असंस्कृत आहे असे एक खरे खोटे चित्र लोकांसमोर सातत्याने उभे केले जात होते. पण गेल्या डिसेंबर -जानेवारीतील घटनांनी, तथाकथित सहिष्णु हिंदुधर्मीयसुद्धा तितकाच कमालीचा असहिष्णु व हिंस्र होऊ शकतो हे सिद्ध केले आहे. प्रश्न दुसऱ्याचे न्यून काढून स्वतःच्या चुकांचे समर्थन करण्याचा नाही. दंगलींमुळे कुठलेही प्रश्न सुटत नाहीत. उलट नवे प्रश्न निर्माण होतात. म्हणून या हिंसक दंगली थांबल्या पाहिजेत, असे मानणारा फार मोठा वर्ग या देशात आजही अस्तित्वात आहे, आणि तरीही दंगली कायमच्या थांबण्याची चिन्हे नाहीत. असे का होते हा खरा प्रश्न आहे. स्वातंत्र्योत्तर काळात या देशातील विविध धार्मिक गटांत कधी नव्हे इतकी प्रचंड दरी पडलेली आपणास दिसते. परस्परांविषयीचा विशेषतः हिंदु आणि मुस्लिम या दोन प्रमुख धार्मिक गटांत पराकोटीचा अविश्वास व द्वेष निर्माण झाला आहे व त्यामुळे साऱ्या देशातील वातावरण दूषित झाले आहे. कालपरवापर्यंत गुण्यागोविंदाने राहणारी माणसे आज एकमेकांच्या नरडीचा घोट घेण्यास आसुसली आहेत. एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर आपण उभे असताना नव्या वैज्ञानिक संस्कृतीचे स्वप्न पाहात माणुसकीला मात्र पारखे होत चाललो आहोत. असे का व्हावे? दंगली कायमच्या निपटून काढण्याचे प्रयत्नच आम्ही केले नाहीत काय? की ते प्रयत्न अपुरे पडले? असे अनेक प्रश्न, या देशाचे व पर्यायाने या देशातील सामान्य माणसाचे भले व्हावे, असे वाटणाऱ्या प्रत्येक समंजस माणसाच्या मनात आज निर्माण होत आहेत.
जातीय दंगली होऊ नयेत किंवा झाल्या तरी त्यांना ताबडतोब आळा बसावा म्हणून प्रयत्न होत नाहीत किंवा झाले नाहीत असे नव्हे. दंगली वेळीच काबूत याव्या म्हणून शासन आपल्या दंडशक्तीचा पुरेपूर वापर करीत असते. मोहल्ल्या-मोहल्ल्यातून शांति-समित्या स्थापन करून त्यांच्यामार्फतही परस्परविरोधी धार्मिक गटांमध्ये सामंजस्य व सलोखा निर्माण करण्याचे प्रयत्न केले जातात. वृत्तपत्रे, दूरदर्शनसारखी प्रचार-माध्यमे जातीय सलोख्यासाठी आपापल्या परीने हातभार लावीत असतात. हे सगळे प्रयत्न आवश्यक आहेत यात शंका नाही. अशा प्रयत्नांमुळे आळा बसतो. हेही मान्य केले पाहिजे. पणअशा प्रयत्नांमुळे दंगली तेवढ्यापुरत्या थांबतात. काही काळानंतर त्यांचा पुन्हा उद्रेक होतो. कारण या संदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा दुर्लक्षित केला जातो. कुठल्याही जातीय दंगलींमागे. त्या दंगलींचे समर्थन करणारी एक विशिष्ट विचारप्रणाली असते आणि जोपर्यंत ही विचारप्रणाली समाजात या ना त्या स्वरूपात अस्तित्वात आहे तोपर्यंत जातीय दंगली होतच राहणार. म्हणून या विचारप्रणालीशी सातत्यपूर्ण संघर्ष करून तिला निष्प्रभ केल्याशिवाय आपण आपल्या सामाजिक व राजकीय जीवनातून दंगली कायमच्या निपटून काढू शकणार नाही. दुर्दैवाने दंगलीविरोधी उपाययोजना करताना या महत्त्वाच्या मुद्द्याकडे द्यावे तितके लक्ष दिले जात नाही. वरवरची मलमपट्टी करण्यातच समाधान मानले जाते.
जातीयवादी विचारप्रणालीचे स्वरूप
एका धर्माच्या अनुयायांची दुसऱ्या धर्माच्या अनुयायांविषयीची विरोधी व वैरभावी भावना अशी जातीयवादाची व्याख्या करता येईल. इथे धार्मिक प्रवृत्ती व जातीयवादी विचारप्रणाली यामधील नेमका फरक विचारात घेणे आवश्यक आहे. प्रत्येक धर्मात धार्मिक प्रवृत्तीची माणसे असतात व ती निष्ठेने धर्माचरण करीत असतात. पण म्हणून त्यांना जातीयवादी म्हणणे योग्य होणार नाही. उदाहरण घेऊन म्हणायचे झाले तर वारकरी संप्रदायाविषयी बोलता येईल. ही मंडळी मनस्वी धार्मिक असतात. पण इतर कुठल्याही धर्माविषयी त्यांच्या मनात अनादराची किंवा आकसाची भावना नसते. म्हणून त्यांच्या कुठल्याही उत्सवावरून किंवा मिरवणुकीवरून वाद निर्माण होत नाहीत. याउलट जातीयवादी व्यक्ति भिन्न धर्मीयांचा विचारच अनादराने व आकसाने करीत असते. एखाद्या जातीयवादी हिंदूला मुसलमान केवळ तो मुसलमान आहे म्हणून वाईट दिसत असतो. तो व्यक्तिशः चांगला किंवा वाईट आहे काय हे जाणून घेण्याची त्याला गरज वाटत नसते. जातीयवादी मुसलमान, शीख किंवा इतर कुणाविषयीही हेच सांगता येईल. तेव्हा जातीयवाद हा हिंदू, मुस्लिम किंवा शीख जातीयवाद नसतो. तो फक्त जातीयवाद असतो व जातीयवादी विचारप्रणाली ज्या समाजात प्रभावी असते तो समाज जातीयवादी असतो. मग तो कुठल्याही धर्माचा असो. जातीयवादाचे हे स्वरूप विचारात घेऊन त्याला नष्ट करण्याचे उपाय योजले पाहिजेत.
जातीयवादी विचारप्रणालीचे स्वरूप विशद करताना सुप्रसिद्ध इतिहास-संशोधक व विचारवंत बिपिनचंद्र यांनी तिचे तीन टप्पे मानले आहेत. कुठल्याही धार्मिक गटाची मानसिक व वैचारिक जडणघडण या तीन टप्प्यांत होत असते आणि जेव्हा तिसरा टप्पा ओलांडला जातो तेव्हा त्या धार्मिक गटात जातीयवादी विचारप्रणाली पूर्णपणे रुजली आहे. असे ते मानतात. या तीन टप्प्यांचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे करता येईल.
(१) एखादा धार्मिक गट आपल्या आध्यात्मिक श्रद्धा व उपासनापद्धतीच केवळ समान आहेत असे न मानता, आपले सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक असे भौतिक हितसंबंधही समान आहेत असे मानू लागतो तेव्हा त्या धर्माच्या अनुयायांनी जातीयवादी विचारप्रणालीच्या आहारी जाण्यास सुरुवात केली आहे असे मानण्यास हरकत नाही. अशा त-हेच्या मानसिकतेतूनच भिन्नधर्मीय समाज गटांची वेगवेगळी अस्मिता तयार होत असते. ही मानसिकताच जातीयवादी विचारप्रणालीच्या बीजारोपणास पोषक ठरत असते. व्यक्ति जेव्हा आपल्या समाजाचा किंवा हितसंबंधांचा विचार करताना, हिंदु समाज, मुस्लिम समाज, शीख समाज असा, म्हणजेच आपल्या पृथक् अस्मितेचा जाणीवपूर्वक उल्लेख करू लागतो तेव्हा त्या व्यक्तीने जाणता अजाणता जातीयवादी विचारप्रणालीच्या दिशेने वाटचाल सुरू केलेली असते.
(२) “एखादा धार्मिक गट आपले सामाजिक, राजकीय, आर्थिक वा सांस्कृतिक हितसंबंध केवळ समान आहेत एवढेच न समजता ते इतर धर्मीयांच्या तत्सम भौतिक हितसंबंधापेक्षा भिन्न आहेत असे मानू लागतो तेव्हा त्या समाजगटात जातीयवादी विचारप्रणालीचा दुसरा टप्पा गाठला गेला आहे, असे समजण्यास हरकत नाही.” हिंदु, शीख, इस्लाम इ. धर्म परस्पराहून भिन्न आहेत असे मुद्दाम सांगण्याची गरज नसते, कारण ते तसे आहेत हे सर्वांनीच मान्य केलेले असते. पण एका धर्माच्या अनुयायांचे भौतिक हितसंबंध इतर धर्मीयांपेक्षा वेगळे आहेत असे जेव्हा एखादा धार्मिक गट मानू लागतो तेव्हा तो समाजगट आपली वेगळी अशी अस्मिता निर्माण करत असतो.
(३) “जेव्हा एखादा धार्मिक गट आपले भौतिक हितसंबंध इतर धर्मीयांच्या तत्सम हितसंबंधांपेक्षा केवळ भिन्न आहेत असे न मानता ते परस्परविरोधी व वैरभावी (होस्टाईल) आहेत असे समजू लागतो तेव्हा त्या समाजगटात जातीयवादी विचारप्रणाली पूर्णावस्थेस पोचलेली असते.” म्हणजेच जातीयवादी विचारप्रणालीचा तिसरा व अंतिम टप्पा गाठलेला असतो. या विचारप्रणालीने जी मानसिकता निर्माण झालेली असते त्या मानसिकतेतच फॅसिस्ट प्रवृत्ती जोपासल्या जातात. प्रत्यक्ष हिंसाचाराचा उद्रेक हा मग केवळ निमित्ताचा प्रश्न उरतो व कुठल्याही क्षुल्लक कारणाने हिंसाचाराचा भडका उडतो.
या तीन्ही टप्प्यांचा नीट विचार केला तर काही गोष्टी आपल्या स्पष्टपणे लक्षात येतील. पहिला टप्पा हा जातीयवादी विचारप्रणालीची फक्त सुरुवात असते. एखादा धार्मिक समाज गट आपले भौतिक हितसंबंध समान आहेत असे समजत असेल तर तो समाजगट तेवढ्यामुळे काही वावगे करतो असे मानण्याचे कारण नाही. त्याचप्रमाणे त्या समाजगटाची दुसऱ्या टप्प्यापर्यंतची वैचारिक व मानसिक भूमिका ही बऱ्याच अंशी उदार व मवाळ असू शकते. महत्त्वाचा प्रश्न आहे तो तिसऱ्या टप्प्याचा ! कारण या टप्प्यावर कुठलाही धार्मिक समाजगट आपले भौतिक हितसंबंध इतरांपेक्षा फक्त वेगळे आहेत असे समजून गप्प बसत नसतो. आपले भौतिक हितसंबंध इतर धर्मीयांच्या तशा हितसंबंधांच्या विरोधी आहेत व त्यांच्यात केवळ वैराचेच नाते असते व असू शकते असे मानण्याइतकी त्या समाजगटाची मनोभूमिका पक्की झालेली असते. या मनोभूमिकेतूनच इतरांविषयीचा अविश्वास, विद्वेष व शत्रुत्वाची भावना निर्माण होत असते. अशा मानसिक व वैचारिक भूमिकेप्रत जेव्हा एखादा धार्मिक समाजगट आलेला असतो तेव्हा तो समाजगट जातीयवादी विचारप्रणालीच्या पूर्णपणे आहारी गेलेला असतो. या विचारप्रणालीच्या पायावर ज्या समाजगटाच्या मानसिकतेची जडणघडण झालेली असते त्या समाजगटाची मानसिकताच जातीय दंगलींचे मूळ असते. म्हणून आपल्या सामाजिक व राजकीय जीवनातून जातीय दंगलींचे पूर्णपणे व कायमचे उच्चाटन करायचे असेल तर त्या समाजात अस्तित्वात असलेल्या व त्या समाजाच्या विशिष्ट अशा मानसिक जडणघडणीस कारणीभूत होणाऱ्या जातीयवादी विचारप्रणालीच्या विरोधात संघर्ष करणे अपरिहार्य आहे. दंगली झाल्यानंतर कुठल्याही मार्गाने त्यांचे दमन केल्यामुळे दंगली थांबतात पण त्यांना कारणीभूत होणारी विचारप्रणाली संपत नाही. ती समाजमनात दडून राहून पुढील संधीची वाट पहात असते. तेव्हा समाजमनात जातीय दंगली थांबविण्याचा एकमेव उपाय आहे.
जातीयवादी विचारप्रणालीशी मुकाबला
जातीयवाद मूलतः एका विशिष्ट विचारप्रणालीवर पोसला जात असतो हे आता पर्यंतच्या विवेचनाने आपल्या ध्यानी आले असेल. तेव्हा तो समाजमनातून निपटून काढायचा असेल तर त्यामागील विचारप्रणालीशी वैचारिक पातळीवरच मुकाबला केला पाहिजे हे ओघानेच आले. कारण कुठलीही विचारप्रणाली बलशक्तीने वा बंदी घालून नष्ट करता येत नसते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जातीयवादाचा असा वैचारिक पातळीवर मुकाबला करण्याची भूमिका एकदा आपण स्वीकारली की मग कुठल्याही परिस्थितीत वा कुठल्याही अवस्थेत जातीयवादी व्यक्ती, संस्था संघटनांबरोबर तडजोडी करण्याचे कटाक्षाने व निग्रहाने टाळले पाहिजे या मुद्द्यावर विशेष भर द्यावासा वाटतो. कारण गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षांत स्वतःला पुरोगामी समजणाऱ्या राजकीय पक्षांनी व नेत्यांनी जातीयवादी वृत्तिप्रवृत्तींशी सतत तडजोडी केल्या आहेत. त्यामुळे त्या पक्षांनी व नेत्यांनी आपली विश्वासार्हताच गमाविली आहे. अशा परिस्थितीत जातीयवादाचा मुकाबला करण्याच्या त्यांच्या भूमिकेविषयी वा ते व्यक्त करीत असलेल्या विचारांविषयी लोक साशंक असले तर त्यांना दोष का द्यावा ? समाजात जो विचार आपल्याला रुजवायचा आहे त्या विचारांशी व त्याला आधारभूत असलेल्या मूल्यांशी असलेली आपली बांधिलकी प्रामाणिक असली पाहिजे. तरच समाज तो विचार स्वीकारू शकेल; अन्यथा नाही.
तिसरा आणि सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जातीयवादी विचारप्रणालीचा पराभव करण्यासाठी तिला पर्यायी व तिच्यापेक्षा अधिक प्रभावी अशी विचारप्रणाली आपल्यापाशी असली पाहिजे. अशी विचारप्रणाली फक्त एकच आहे व ती म्हणजे सेक्युलर विचारप्रणाली ! या विचारप्रणालीसमोर जातीयवादाचा टिकाव लागणार नाही याची पूर्ण कल्पना भाजपापासून विश्व हिंदु परिषदेपर्यंत सर्वच संघपरिवाराला आहे. म्हणूनच सेक्युलर विचारप्रणालीला दांभिक ठरवून तिला निष्प्रभ करण्याचे त्यांनी पद्धतशीर प्रयत्न चालविले आहेत व सेक्युलर म्हणविणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांनी व नेत्यांनी आपल्या क्षुद्र राजकीय स्वार्थासाठी सेक्युलर विचारप्रणालीचा विकृत अर्थ लावून संघपरिवाराच्या प्रयत्नांना हातभार लावला आहे. म्हणून जातीयवादाचा मुकाबला करण्यासाठी सेक्युलर विचारप्रणाली एक हत्यार म्हणून वापरायची असेल तर त्या विचारप्रणालीचा नेमका अन्वयार्थ आपल्याला लावता आला पाहिजे. त्या बाबतीत कसलीही संदिग्धता असता कामा नये.
सेक्युलर विचारप्रणालीचा अन्वयार्थ
सेक्युलर विचारप्रणालीचा नेमका अन्वयार्थ लावण्यासाठी आपल्याला काही वस्तुदर्शी निकषांचा आधार घेणे भाग आहे. असे तीन निकष आपल्याला स्वीकारता येतील. एक म्हणजे या विचारप्रणालीचा इतिहाससिद्ध अर्थ. दुसरे म्हणजे ज्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी भारतीय संविधानाने ही विचारप्रणाली स्वीकारली त्या उद्दिष्टांशी सुसंगत असा अर्थ आणि तिसरा निकष म्हणजे ज्या ग्रंथप्रामाण्याच्या आधारे धर्माने मानवी मन आणि बुद्धी गुलाम केलेली असते त्या गुलामगिरीतून मानवी मनाची आणि बुद्धीची मुक्तता करण्याची प्रक्रिया.
अठराव्या शतकात युरोपात राजसत्ता व धर्मसत्ता यांच्यातील संघर्षाची जी चळवळ झाली तीच पुढे सेक्युलरिझमची चळवळ म्हणून प्रसिद्धी पावली. या चळवळीचे पर्यवसान शेवटी राजसत्ता धर्मसत्तेच्या प्रभावातून मुक्त होण्यात झाले व पर्यायाने धर्मसत्तेची अधिकारकक्षा आध्यात्मिक बाबींपुरती मर्यादित झाली. याच सुमारास युरोपमध्ये एकीकडे वैज्ञानिक शोध लागत होते तर दुसरीकडे औद्योगिक क्रांतीमुळे सर्व एमाजाची मूल्यव्यवस्थाच आमूलाग्र बदलू लागली होती. भौतिक प्रगतीबरोबरच मानवी हक्कांची जाणीव मोठ्या प्रमाणात होऊ लागली होती. अशा परिस्थितीत वाढत्या अपेक्षा पूर्ण होण्यात सर्वांत मोठा अडसर चर्चचा म्हणजेच धर्मसत्तेचा होता. तेव्हा राजसत्तेबरोबरच सामान्य जनांचाही धर्मसत्तेबरोबर संघर्ष अटळ होता. या दुहेरी संघर्षातूनच चर्चची अधिकारकक्षा आध्यात्मिक
बाबींपुरती मर्यादित करण्यात आली व इतर सर्व भौतिक बाबी राजसत्तेच्या कक्षेत आणल्या गेल्या. त्यामुळे समाजाचे नियमन करण्याचे सर्वाधिकार राजसत्तेकडे आले. दुसरीकडे माणसांच्या आचार-विचारांवरची धर्मसत्तेची पकड सैल होऊ लागली होती. या सर्व संघर्षातून जी विचारप्रणाली विकसित झाली तिलाच पुढे सेक्युलर विचारप्रणाली हे नाव मिळाले.
सेक्युलर विचारप्रणालीचा हा इतिहाससिद्ध अर्थ विचारात घेऊनच भारतीय संविधानातील उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी या विचारप्रणालीचा कोणता अर्थ लावता येईल हे पाहावे लागेल. जो प्रगत, आधुनिक व एकात्म भारतीय समाज निर्माण करण्याचे स्वप्न भारतीय संविधानाने आपल्यासमोर ठेवले आहे तो समाज समता, न्याय व बंधुत्व या आधुनिक मूल्यांच्या आधारेच प्रत्यक्षात येऊ शकतो. ही मूल्ये संविधानाच्या प्रास्ताविकात नमूद करण्यात आली आहेत. या उलट कुठलीही धर्मपरंपरेने मान्य केलेली व स्वीकारलेली समाजव्यवस्था विषमता, अन्याय व शोषणावर आधारित असते. ही समाजव्यवस्था धर्माच्या मान्यतेने निर्माण झालेली असते व त्यामुळे त्यात कसलेही परिवर्तन अशक्य होऊन बसते. असे परिवर्तन घडवून आणायचे असल्यास व सामाजिक न्याय व समता या मूल्यांना व्यवहारात काही अर्थ प्राप्त करून घ्यायचा असेल तर धर्मपरंपरेतून निर्माण झालेली समाजव्यवस्था मोडीत काढणे भाग असते. पण अशा परिवर्तनाला सनातन्यांचा विरोध असतो व म्हणून धर्मसत्तेचा आधार घेऊन ते कसलेही परिवर्तन अशक्य करून टाकतात. सतीप्रथेचे समर्थन, दलितांवरील अन्याय, रामजन्मभूमी प्रकरणातील साधुसंतांची भूमिका, शहाबानू प्रकरणातील मुल्ला मौलवींचा प्रभाव या साऱ्या बाबी धर्मसत्तेच्या आविष्काराच्या बाबी आहेत.
तिसरा निकष मानवी मन आणि बुद्धी धर्माच्या गुलामगिरीतून मुक्त करण्याचा आहे. सर्वच धर्मांनी ग्रंथप्रामाण्य सर्वंकष करून स्वतंत्र विचार करण्याची माणसाची शक्ती बंदिस्त करून टाकलेली असते. ज्या समाजांनी धर्माच्या या गुलामगिरीतून स्वतःला मुक्त करून घेतले त्या समाजांनीच आपली भौतिक प्रगती करून जीवन सुखी व समृद्ध केले. तेव्हा मानवी जीवनाच्या समृद्धीसाठी ग्रंथप्रामाण्यातून निर्माण होणाऱ्या या मनाच्या व बुद्धीच्या गुलामगिरीच्या विरुद्ध संघर्ष हाही सेक्युलर विचारप्रणालीचा महत्त्वाचा घटक आहे. मानवी जीवनातील भौतिक बाबींचा विचार करताना जेव्हा माणसाला धार्मिक सिद्धांताचा आधार किंवा धार्मिक आदेशांची गरज लागत नाही तेव्हा ती व्यक्ती खऱ्या अर्थाने सेक्युलर झालेली असते.
या तीन्ही निकषांचा एकत्रित विचार केला तर असे दिसून येईल की सेक्युलर विचारप्रणाली ही अशी एकच विचारप्रणाली आहे की जी धर्म, जाती, पंथ इ. कसलेही भेद न मानता माणसाचा माणूस म्हणून विचार करायला शिकविते. त्याला माणूस म्हणून प्रतिष्ठा द्यावयाला शिकविते. यातूनच मानवी हक्कांची जपणूक करण्याची उदारमतवादी शिकवण मिळत असते. समाजाची अशी उदारमतवादी व मानवी हक्कांची जाणीव ठेवणारी, माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठा द्यायला शिकवणारी मानसिक व वैचारिक भूमिका तयार होते तेव्हा धर्माच्या विशिष्ट आणि पृथक अस्मिता जपण्याची व त्या आधारे इतर धर्मीयांचा विचार करून त्यांना भली बुरी वागणूक देण्याची गरज उरत नाही. म्हणून जनमानसात सेक्युलर, सहिष्णू व उदारमतवादी विचारप्रणाली रुजविणे हाच जातीयवादी विचार व शक्ती पराभूत करण्याचा एकमेव मार्ग आहे.
९-बी/२०३ नीलम नगर, गवाणपाडा मुलुंड (पू.) मुंबई ४०००८१

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.