अकुतोथय गीता साने – १

वाशीमला भटगल्ली संपते तिथे थोडीशी मोकळी जागा आहे. हा टिळक चौक. त्या चौकात आजूबाजूच्या जुनेर घरांच्या मानाने एक नवी नेटकी इमारत ताठ उभी होती. तिला साने वकिलांचा वाडा म्हणत. पण आम्ही पाहिला तेव्हा तिथे रामभाऊची खाणावळ असे. मधू कायन्देबरोबर मी तिथेअधेमधे गेलो आहे. या वास्तूत थोड्याच वर्षामागे अग्नीसारखी तेजस्वी माणसे वसतीला असत याची आम्हाला तेव्हा बिलकूल कल्पना नव्हती. वाशीम साने वकीलांना विसरत चालले होते ?
एकोणपन्नास-पन्नास सालच्या या गोष्टी. साने वकिलांच्या मृत्यूनंतर दोन-तीन वर्षांतल्या. वाड्याचे मालक भाऊसाहेब साने ज्वलंत देशभक्त आणि कृतिशूर सुधारक. त्यांची ज्येष्ठ कन्या गीता साने झेपावे उत्तरेकडे या पठडीतली, रंजल्या गांजल्यांची कैवारी, स्त्री स्वातंत्र्यवादिनी, साहित्यिक आणि समाजशास्त्री. पु. भा. भावे त्यांना शोभणारेच आप्त, बुद्ध्या ‘करी सतीचे वाण धरलेले, रक्त आणि अश्रृंची भाषा लिहिणारे लेखक. हे सगळे या वाड्याचे रहिवासी होते. तेव्हा हे आमच्या गावी नव्हते. भाव्यांचे नाव आदेशमुळे कानावर होते. पण गीता साने पुष्कळ पुढे चंबळची दस्युभूमी मुळे माहीत झाल्या आणि भाऊसाहेबांचे मोठेपण तर आत्ता परवा परवापर्यंत माहीत नव्हते.
वाशीम हिंदु-मुस्लिम दंग्यासाठी फार दिवस प्रसिद्ध होते. वहाड आणि निझामस्टेटच्या सरहद्दी तिथे एकमेकींना भिडलेल्या. १९२७ चा तिथला दंगा फारच गाजला. भाऊसाहेब साने, अण्णासाहेब डबीर यांचे पुढारीपण सरकारच्या डोळ्यांत खुपत होते. जहाल टिळकांचे हे जहाल चेले. सरकारपक्षाने कुभांड रचले. पंधरा साक्षीदार पढवलेः साने वकीलाने अस्से धरून ठेवले, डबीर वकीलाने अश्शी लाठी चालवली. इ. इ.
खुनाचा आरोप खालच्या कोर्टाने पक्का केला. अपिले होत होत नागपूरपर्यंत गेली. वरिष्ठ न्यायालयाने खटल्यातल्या त्रुटी दाखवून फेरसुनावणीसाठी वाशीमला खटला रिमांड केला. देशपांडे नावाच्या न्यायाधीशांनी धाडस दाखवून आरोपींना निर्दोष सोडले. सरकारी डाव फसला. देहान्त प्रायश्चित्त न सांगणाऱ्या त्या रामशास्त्र्यांना सरकारी दबावतंत्रामुळे राजीनामा द्यावा लागला. खटल्याची तीन वर्षे ताणतणावाची. ती तीन तपांसारखी झाली. ‘दोर फासाचा’ नजरेसमोर टांगता दिसे. आरोपींनी आपापली मृत्युपत्रे करून ठेवली होती. भाऊसाहेब सान्यांनी अमरावतीला शिक्षणासाठी असलेल्या ज्येष्ठ कन्येला, गीताला लिहिले : हिंदू कायद्याने आमच्या संपत्तीत तुम्हाला वाटा नाही. पण वडील आहा – या नात्याने कुटुंबाची जबाबदारी मात्र तुमच्यावर सोपवतो.
देशभक्ति प्रारंभ जीवनाचा ।
आत्मयज्ञाने अंत व्हावयाचा
या कोटीतले हे प्रकरण.
भाऊसाहेबांच्या व्यक्तिमत्त्वात टिळक आणि आगरकर एक झाले होते. थोरलीला सायन्स शिक्षणासाठी नागपूरला ठेवताना ते म्हणाले होते:
तुम्ही मागे राहू नका. आम्हाला Push नसल्याने आम्ही फार मागे राहिलो. १९२३ साली सोळा वर्षांची मुलगी लग्न करत नाही म्हणते तेव्हा ते तिला लिहितात: तुमच्या मनाविरुद्ध लग्न करणार नाही. स्वस्थ मनाने शिका.
1)विनया खडपेकर: स्त्री स्वातंत्र्यवादिनी, पॉप्युलर प्रकाशन १९९१, पृ. २०३ २. तत्रैव पृ. २०३)
जंगलातच नवनवे उन्मेष निर्माण होण्याचा संभव असतो ही त्यांची धारणा.
भाऊसाहेबांचा प्रपंच मोठा. गीताबाईंचा जन्म ३ सप्टेंबर १९०७ चा. स्वदेशीच्या व्रतामुळे खादी आणि खांडसरी १९०८ मध्येच घरी आल्या. त्यांना ५ मुली आणि १ मुलगा. सर्व मुलींना ग्रॅज्युएट करीन असे म्हणत. पण अडचणी इंग्रजी पहिली पासूनच सुरू झाल्या. गीताबाईंना मुलांच्या इंग्रजी शाळेत घातले. दुसऱ्या वर्षी दुसरे हेडमास्तर आले. त्यांनी ही जोखीम(!) नाकारली. मग एक वर्ष मिशनच्या शाळेत काढले. तिसऱ्या वर्षी गीता आणि सीता या दोघी बहिणींना हिंगण्याला कर्त्यांच्या शाळेत पाठवले. त्या काळी वाशीम-अकोला अशी बसदेखील सुरू झाली नव्हती. टपाल नेणाऱ्या घोडागाड्या असत. त्यातून प्रवास केला. पण मुलींना वर्षभरात परत आणावे लागले कारण सीताबाईंची प्रकृती तिथे वारंवार बिघडे.
इंग्रजी तिसरीपासून अमरावतीला सोय झाली ती मॅट्रिकपर्यंत. १९२७ साली गीताबाई मॅट्रिक झाल्या. त्यांना सायन्स शिकायचे होते म्हणून नागपूरला कूच केले.
गीताबाईंनी जन्मापासूनच पहिले असण्याचा मान कायम ठेवलेला दिसतो. त्यांच्या कॉलेजमध्येही सायन्स शिकणाऱ्या त्या पहिल्या विद्यार्थिनी. एकतीस साली B.Sc. झाल्यावर गणितात M.Sc. करायचे ठरवले. एक वर्ष एम्.एस्सीचा अभ्यास केला. पण खटल्यामुळे वडिलांच्या वकिलीवर परिणाम झालेला होता. कुटुंबाची आर्थिक स्थिती अवघडलेली होती. गीताबाईंनी नोकरी करायचे ठरवले. मेरठच्या एका शाळेने त्यांना आकर्षक पगार देऊ केला म्हणून त्यांनी उत्तरेकडे झेप घेतली. वाशीम ते नागपूर ते मेरठ असा हजारो मैलांचा पल्ला पार करताना त्यांना भीती कशी वाटली नाही हा प्रश्न पडतो तो आपल्याला. त्यांना तो शब्द त्यांच्या वडिलांनी शिकूच दिला नव्हता.
१९३२ मधे सत्याग्रह झाला. गीताबाईंचे आई-वडील दोघेही तुरुंगात गेले. त्याच वर्षी गीताबाईंचे लग्न झाले. नरसिंग धगमवार नागपूरला बर्डीवर सोनी गल्लीत शेजारीच राहात. सीनियरचे विद्यार्थी होते. उंच रुबाबदार व्यक्तिमत्त्वाचे टेनिसपटू. काँग्रेसचे कार्यकर्ते. उभयतांनी पूर्ण परिचयाअंती पारख करून एकमेकांची निवड केली होती. बत्तीस साली तेही तुरुंगात गेले. त्यावेळी त्यांची आई वारली. गीताबाईंच्या आईवडिलांनी मुलीला सांगितले, तुम्ही लग्न करा. यावेळी त्यांना सोबतीची गरज आहे. विवाह नोंदणी पद्धतीने मेरठलाच पार पडला. गीताबाईचेच काय सगळ्या बहिणींची लग्ने नोंदणी पद्धतीने झाली. वडिलांच्या इच्छेप्रमाणे त्यांनी सर्वांना उच्च शिक्षण दिले. सीताबाई बी. ए. झाल्या. शांताबाई दिल्लीहून एम.बी.,बी.एस्. झाल्या. भाऊ लक्ष्मण बनारसहून मेकॅनिकल इंजीनिअर झाला. चवथी बहीण सौ. वैशंपायन त्याही ग्रॅज्युएट झाल्या. त्यांचे यजमान चंद्रशेखर आझादांच्या कटातले. ते नऊ वर्षे स्थानबद्धतेत होते. पत्रकारिता हा व्यवसाय त्यांनी निवडला. स्वतः गीताबाई मेरठला ज्या शाळेत नोकरी करत तिथे अन्यायाविरुद्ध सतत संघर्ष करीत. त्यांच्या घरी राजकीय कार्यकर्त्यांना मुक्तद्वार असे. मीरत (मेरठ) खटल्यानिमित्त कॉम्रेड (३. कुसुमावती देशपांडे : मराठी कादंबरी. दु. आवृत्ती १९७५, पृ. ३०१ )डांग्यांचे येणे होई.खटल्याच्या कामाने कधी कधी लॉरीभर पाहणे येऊन उतरत. सर्व भावंडांची शिक्षणे संपेतो १४ वर्षे त्यांनी मेरठला नोकरी केली. सर्वांत धाकटी बहीण तारा – शिक्षण चालू असतांनाच मेजर भटांनी तिला मागणी घातली. हेही लग्न मेरठलाच नोंदणी पद्धतीने झाले. ताराबाई लग्नानंतर शिकल्या. हल्ली पुण्याला स्थायिक झाल्या आहेत. समाजकार्यात आघाडीवर असतात. राहिलेले M.Sc. १९३४ मधे गीताबाईंनी पूर्ण केले. त्यांची शाळा खूप वाढली. तिचे इंटरमीजिएट कॉलेज झाले. १९४४ मधे त्यांनी नोकरी सोडली तेव्हा त्या तिथे व्हाइस प्रिन्सिपल होत्या. एखाद्या कुटुंबाची कहाणी ऐकताना हे काय बंधु असतो जरि सात
आम्ही ही स्मरणसाखळीतली कडी मधेच चमकून जावी अशी ही कथा.
विनया खडपेकरांनी स्त्रीस्वातंत्र्यवादिनी या आपल्या प्रबंधात कृष्णाबाई मोटे, मालतीबाई बेडेकर या दोघी बहिणी, शकुन्तला परांजपे आणि गीता साने या चौघींच्या कार्याचा परामर्श घेतला आहे. त्यांच्या साहित्याला प्रत्यक्ष मुलाखतींची जोड दिली आहे. त्यातून एक गोष्ट जाणवते. या सगळ्याजणींचे वडील हे परंपरामुक्त होते. त्यांनी आपल्या मुलींना घडवले म्हणण्यापेक्षा घडायला मदत केली. डॉ. शांताबाई गलांडे म्हणाल्या : ताई (सीताबाई ब्रह्म) बी.ए. असली तरी Ph.D. ला भारी आहे.
सीताबाईंनी आपल्या वडिलांवर केलेल्या कवितेच्या चार ओळी शांताबाईंनी ऐकवल्या:
बाल्य संपुनी पंख उगवता झेप नवी घेतली
विशाल सृष्टी दृष्टिस पडता मूल्येही बदलली।
बालपणींची दुनिया मोठी आज दिसे इवली
तात, थोरवी परंतु तुमची शतगुणी उंचावली ।।
शांताबाई म्हणाल्या, आमच्या वडिलांची एक ओळ त्यांच्या उंचीची कल्पना देईल. त्यांचे मागणे होते:
धर्मभेद विरहित असावे भारतभू शासन.
नरसिंग धगमवार आधी काँग्रेसमध्ये होते. नंतर कम्युनिस्ट झाले. १९४४-४५ साली कम्युनिस्टांनी इंग्रजांच्या युद्धप्रयत्नांना मदत करायचे ठरवले. आजवरचे साम्राज्यशाही युद्ध आता लोकयुद्ध बनले होते. कॉम्रेड निमकरांनी इंग्लंडहून आल्याआल्या सरकारी लेबर कमिश्नरपद स्वीकारले. धगमवारांना धनबादला टाटांकडे रीजनल लेबर ऑफिसरची नोकरी मिळाली. तेव्हा मेरठची नोकरी सोडून गीताबाई धनबादला गेल्या.
धनबादला गीताबाईंना जास्त मोकळेपणा मिळाला. समाजातला खालचा थर पाहायला मिळाला. कोळसा खाणीतल्या मजुरांचे जीवन त्यांनी जवळून पाहिले. त्यांच्या आस्थेमुळे त्यांना मजुरांच्या वेलफेअर समितीवर घेतले गेले. सभेची कार्यक्रम पत्रिका नीट अभ्यासून त्या जात. केंद्रीय निधीतून मजूर स्त्रियांच्यासाठी, त्यांच्या बालकांसाठी कल्याणकारी तरतुदी असत. त्यांचा विनियोग व्हायला हवा तसा होतो की नाही ते पाहात. सर्व केंद्रांना भेटी देत. लोकांवर माया करायची शक्ती त्यांच्याजवळ होती. तिथेच त्यांना ऑनररी मॅजिस्ट्रेट म्हणून काम करायची संधी मिळाली. तेव्हा त्यांनी इंडियन पीनलकोड पहिल्यांदा वाचले. स्त्रियांसाठी असलेल्या कलमांचा खोल अभ्यास केला. मजूर वर्गातला फुष स्त्रियांचा किती प्रकारांनी उपयोग करून घेऊ शकतो हे इतरांना कळणार नाही. त्यासाठी त्यांच्यातलेच एक व्हावे लागते. म्हणजे कळते की तो मिळवत्या बायकोला दुभत्या गायीसारखे विकू शकतो. बायको पणाला लावू शकतो. जिंकलेल्या फुषाबरोबर ती गेली नाही तर तिला जबर मारहाण होऊ शकते.
धनबादला त्यांनी शाळा काढली. ती नावारूपाला आणली. स्वतः प्रिन्सिपल झाल्या. एव्हाना त्यांची आठ पुस्तके प्रकाशित झाली होती. कथा, कादंबऱ्याच. १९३४ सालची ‘वठलेला वृक्ष’ ही त्यांची पहिली कादंबरी. मध्यमवर्गीय विवाहित स्त्री आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होताच कुटुंबातील पुरुषांच्या स्वामित्वाला आव्हान मिळते. पति पत्नी संबंधांना हादरे बसतात. कुटुंबातली भयशरण शांतता असंतोषाने शबलित होते. असे भेदक दृश्य त्यांनी या कादंबरीत रेखाटले आहे. त्यांच्या कादंबऱ्यांत लालित्याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले तरी आंतरिक जिव्हाळा ओतप्रोत भरलेला आहे. आपल्या सामाजिक जीवनाचे वस्तुनिष्ठ पण विदारक विश्लेषण त्यांनी केले आहे. त्यामुळेच त्यांच्या साहित्याचा जिवंतपणा आणि जोश कलावादी समीक्षकांनाही नाकारता आला नाही.
लेखिका म्हणून महाराष्ट्रात त्यांची पुरेशी दखल घेतली गेली नाही हे खरे आहे. याला कारण आहे. ते म्हणजे त्यांचे महाराष्ट्राबाहेर दूर वास्तव्य. त्यामुळे वाचकांचा प्रतिसाद कळायला मार्ग नाही. संपादकांशी संपर्कनाही. श्रीमती विनया खडपेकर आपल्या प्रबंधासाठी त्यांना भेटल्या तेव्हा गीताबाई म्हणाल्या: लेखिका म्हणून माझी मुलाखत घ्यायला मुंबईहून बिहारमध्ये धनबादला आलेली तूच पहिली आहेस..
गीताबाईंच्या कादंबऱ्यांपेक्षा त्यांच्या दोन शोधप्रबंधांनी जास्त लक्ष वेधले. १९६४ साली ‘चंबळची दस्युभूमी आणि १९८६ साली ‘भारतीय स्त्रीजीवन प्रसिद्ध झाले. दोन्ही मौज प्रकाशने – दोहोंनाही महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार लाभले.
त्यातल्या पहिल्याची जन्मकथा अशी.
१९६० मधे चंबळच्या खोऱ्यात डाकूचा उपद्रव फार वाढला. नरसंहार जास्त झाला. त्या आधी तेलंगणातला रक्तपात रोखण्यात विनोबा भावे यशस्वी झाले होते. म्हणून खुद्द पं. नेहरूंनी आचार्यांना विनंती केली. रक्तपाताला पर्याय म्हणून विनोबांनी पदयात्रा सुरू केली. तिला राजकारणी नि पोलिसांची अनुकूलता होती इतकेच नाही तर डाकूचाही पाठिंबा मिळाला. पर विनोबांची धनबादमधील व्याख्याने गीताबाईंनी ऐकली होती. ती त्यांना आवडली. ‘तो तिथे दाराशी भूमिहीन उभा आहे. त्याला त्याचा वाटा द्या. नाहीतर तो तुमच्या हातून हिसकला जाईल.’ ही पूर्णपणे इहवादी भाषा होती. पण पुढे पाप-पुण्याची भाषा सुरू झाली. पूर्वजन्म-पुनर्जन्म हे आले. पाहता पाहता विनोबा बाबा झाले. डाडूंनी आत्मसमर्पण सुरू केले होते. मानसिंगाची अर्धी टोळी आणि इतर मिळून २१ डाकू शरण आले होते. २१ एप्रिल १९६१ पासून पुढील चार आठवडे विनोबाजी चंबळ खोऱ्यात फिरले. या समस्येसंबंधी त्यांची पूर्वतयारी जवळ जवळ शून्य होती. आपल्याला मानसिंगाचा मुलगा तहसीलदारसिंग याचे पत्र देण्यात आले होते, असे ते म्हणाले. तेवढेच लिखित साहित्य त्यांनी वाचले होते.
त्यांच्या पद्धतीने त्यांनी डाकूच्या शौर्याबद्दल त्यांचे कौतुक केले. त्यांना डाकू न म्हणता बागी (विद्रोही) म्हणणे सुरू केले. समीकरणाच्या भाषेत बोलायच्या हौसेपायी ‘पोलिस = दस्यू’ असाअभेदसंबंध दाखवला. डाकू जनतेचे हीरो बनले. हत्या करून आपण उगाच पापाचे धनी का व्हावे अशी उपरती पोलिसांना होऊ लागली. बिकट प्रसंग उद्भवला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आचार्यांकिद्ध निदर्शने केली. इन्स्पेक्टर जनरल रुस्तुमजी सारख्या कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याची अगतिकता आकाशवाणीवरून जाहीर झाली.
दरम्यान डाकूच्या दुसऱ्या टोळ्याही सक्रिय झाल्या. वर्तमानपत्रांनी आचार्यांवर टीकेची झोड उठवली. ‘सामूहिक हृदयपरिवर्तन जगाने आजवर पाहिले नव्हते. गीताबाईंनाही ते पटले नव्हते म्हणून खुद्द चंबळघाटीत दस्युभूमीत जाऊन काय ते पाहावे या साठी त्यांनी या प्रश्नात लक्ष घातले. (उत्तरार्ध पुढील अंकी) (श्रीमती सीताबाई ब्रह्म, अमरावती आणि डॉ. शांताबाई गलांडे नागपूर या भगिनींचे कौटुंबिक माहितीबद्दल आभार)
शान्तिविहार चिटणवीस मार्ग, सिव्हिल लाइन्स, नागपूर (440 001)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.